मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ढबू मिरचीची पीठ पेरून भाजी

प्रभो · · पाककृती
काल घरी बसूनच काम केलं... संध्याकाळी बराच कंटाळा आला होता.... त्यात बेसन पेरून सिमला मिरची खायची इच्छा झाली. फ्रीज उघडून बघितला तर मिरच्या होत्या.. मस्तपैकी पीठ पेरून भाजी केली. ही घ्या कृती. साहित्यः १. ३-४ मोठे चमचे तेल २. १-२ हिरव्या मिरच्या तुकडे करून ३. २-३ सिमला मिरच्या चिरून ४. ३-४ मोठे चमचे चण्याचे पीठ ५. बरेच जण ह्यात कांदा घालत नाहीत. पण मला आवडतो म्हणून मी वापरला..त्यामुळे हवा असल्यास १ मोठा कांदा चिरून ६. फोडणीसाठी हिंग, मोहरी. जिरे, कडिपत्ता ७. अर्धा चमचा हळद ८. मीठ (चविनुसार) ९. लाल तिखट (चविनुसार) कृती: १. कढईमधे मध्यम आचेवर तेल गरम करा. २. तेल गरम झालं की त्यात हिंग, जिरे, मोहरी,हिरव्या मिरच्या व कडिपत्त्याची फोडणी करा. ३. त्यात कांदा टाकून सोनेरी होईपर्यंत परता.. (साधारण ३-४ मिनिटे) ४. त्यात चिरलेली सिमला मिरची टाकून एक मिनिट परता. ५. आता त्यात मीठ टाकून हलवा व झाकण ठेवून मंद आचेवर ५-७ मिनिटे शिजवा. ६. सिमला मिरची शिजली की त्यात हळद,तिखट टाकून एकजीव करा. ७. त्यावर बेसन भुरभुरवा. ८. सर्व मिश्रण एकत्र करून त्यावर झाकण ठेवा. मंद आचेवर एक दणदणीत वाफ काढा. (५-७ मिनिटे) म्हणजे बेसन शिजेल. मस्त गरमा गरम पोळीसोबत खा. तोंडी लावायला मेतकुट घ्यायला विसरू नका.. ;) @रेवतीताई : मेतकुट संपलं आहे... पुढचा लॉट लवकर पाठव.. ;)

वाचन 12742 प्रतिक्रिया 0