सिनेमागृहातल्या अंधाराच समाजशास्त्र आणि मानसशास्त्र
'गुलाबजाम ' मधली राधा आगरकर जेंव्हा जेंव्हा vulnerable असते तेंव्हा तेंव्हा चित्रपटगृहात जाऊन बसत असते . तिला रणबीर कपूर आवडत असतो हे एक कारण झालंच . पण माझा असा अंदाज आहे की सिनेमागृहातला तो विशिष्ट अंधार तिला comforting वाटत असणार नक्कीच . तो अंधार तिला काही तासांपुरता का होईना तिच्या वेदना पुरून टाकण्यास मदत करत असणार . थियेटरमधला अंधार ही प्रचंड टेम्पटिंग गोष्ट असते . अंधाराच्या पण जातकुळी असतात . माजघरातला अंधार , दिवे गेल्यावर होणारा अंधार , निर्मनुष्य शेतातला अंधार ह्या सगळ्या अंधाराच्या जातकुळी वेगवेगळ्या आहेत . अंधार हा बहुतेकवेळा भयानक आणि काहीवेळा प्रचंड सुंदर असतो . पण सिनेमा थियेटरमधला अंधार हा टेम्पटिंग आणि comforting असतो . कधीच खुश नसणारा बॉस , घरातल्या कटकटी , आपण खूप काही बनण्याची पाहिलेली आणि पूर्ण न झालेली स्वप्न या सगळ्यांचा विसर पाडण्याचं सामर्थ्य चित्रपटगृहातल्या अंधारामध्ये असतं .हा अंधार थोडा ओलसर असतो .त्या अंधारामध्ये अनेक सुंदर गोष्टी घडतात . आजूबाजूच्या चकचकाटी , कर्कश आणि उत्साही मैफली रंगवण्यात तरबेज झालेल्या जगापासून इथं काहीवेळापुरता का होईना ब्रेक मिळतो . सिनेमा हा पलायनवादी असतो असं एक विधान अनेकदा केलं जातं . ते बऱ्याच प्रमाणात खरं आहे . पण सिनेमाला पलायनवादी हे विशेषण मिळण्यामागे सिनेमातल्या कंटेंटनंतर हा अंधार पण कारणीभूत असणार . सिनेमा आणि अंधार हे कॉम्बिनेशन भारी आहे . पडद्यावर चालणारे visuals , ऐकू येणारं संगीत हे तुम्हाला शंभर टक्के बधिर पण होऊ देत नाही . तुम्ही हा अंधार आणि पडद्याचा फिकट प्रकाश एकाचवेळेला एन्जॉय करू शकता . थिएटरमध्ये एकाचवेळा काहीशे लोक उपस्थित असतात . तरी पण हा अंधार तुमचाच असतो . तो थिएटरमध्ये हजर असलेल्या शेकडो अपरिचित लोकांसोबत वाटून घेण्याची गरज नसते . सिनेमागृहातल्या अंधाराची पण एक sociology असतेच पण ह्या अंधारातलं सौंदर्य हे वैश्विक आणि त्याचवेळेस सगळ्यांसाठी एकसारखंच असतं . म्हणजे आमच्या परभणीमधल्या मोडकळीला आलेल्या फिरोज टाकीमधला अंधार , पीव्हीआर मधला महागडा अंधार , NFAI सारख्या जागांमधला अंधार हे एकसारखेच असतात . हा अंधार आर्थिक -सामाजिक -जातीय -धार्मिक भेद करत नाही . या ठिकाणी सिनेमा बघणाऱ्या लोकांचे समूह -वर्ग वेगवेगळे असतील पण हा अंधार सगळ्यांना एकाच पातळीवर आणून ठेवतो . माझा एक रूम पार्टनर होता . प्रचंड हळवा .काहीसा अस्थिर .तो त्याच्या जीवाचं काही बर वाईट करेल अशी भीती त्याच्या आईवडिलांपासून ते आमच्या घरमालकांपर्यंत सगळ्यांना वाटायची . त्यानं असं काही करू नये याची जबाबदारी त्या सगळ्यांनी माझ्यावर टाकली होती . तो असाच थियेटरमधल्या अंधारात स्वतःला बुडवून टाकायचा . त्यावेळेस इम्रान हाश्मीचा 'जहर ' नावाचा सिनेमा आला होता . या पठ्ठ्याने सलग आठ दिवस तो सिनेमा थेटरात जाऊन पाहिला होता . तो मला सांगायचा की थेट्रातल्या अंधारात त्याला जितकं सुरक्षित वाटतं तितकं चार लोकांमध्ये वाटत नाही . त्याने सगळ्यांना भीती वाटायची तसं जीवाचं बर वाईट काही केलं नाही याचं मोठं श्रेय या अंधाराला आहे . वर्षानुवर्षे हा अंधार कित्येक जीव वाचवत आला असेल . कोण हिशेब ठेवतंय ? सिनेमात काम करणाऱ्या लोकांना तरी या अंधाराचं महत्व किती कळलंय याबद्दल शंका आहेत .थेटरातल्या या अंधाराचं खोलवर मानसिक विश्लेषण होण्याची गरज आहे . हा अंधार सायकॉलॉजिकल थेरेपी म्हणून वापरता येऊ शकतो अनेकांसाठी . ट्रॅव्हलसमध्ये किंवा रेल्वेमध्ये खिडकीजवळ बसून बाहेरचा अंधार निरखून बघत बसणे हा थोडा याच्या जवळ जाणारा प्रकार . अंधार हा शब्द आपल्याकडे नकारात्मक अर्थाने वापरला जातो . अंधार म्हणजे एखाद्या गोष्टीचं संपून जाणं , सुष्ट शक्तीचं संपून जाण असा अर्थ घेतला जातो . पण थेटर /टाकी / टॉकीज मधला अंधार खऱ्या आयुष्यात अनेक लोकांना आधार /आशा /बळ देत आला आहे . थेटरात सिनेमा संपतो . लाईट लागतात . काही वेळ तो प्रकाश डोळ्यांना खुपतो . पण डोळे सरावल्यावर , थेटरातल्या अंधाराने मागचे काही वेळ दिलेला आनंद या त्रासापेक्षा मोठा आहे याची जाणीव होते . बाहेर पडतो तेंव्हा फिकट हसू असतं चेहऱ्यावर .राधा आगरकर जेंव्हा शेवटच्या प्रसंगात सिनेमागृहातून बाहेर पडते , तेंव्हा कॅमेऱ्यात बघून अगदी लख्ख हसते त्या जातकुळीतलं हे हसू असत . आय लौ अंधार .
वर्गीकरण
प्रतिक्रिया
खरंय!
सहमत
मला सुद्धा खूप आवडतो थिएटर
चांगलाच उजेड पाडलात. अंधाराचं
वेगळा विचार!
लेख आवडला . काहीसा पटलापण !
अतिमहाप्रचंड आवडले
सहमत
कडक लेख!!!
छान लेख . थिएटरमधील अंधारात
जबरदस्त
अंधारातली सुरक्षा
अंधारातील आधार
खूपच वेगळा दृष्टिकोन
थेटरातल्या या अंधाराचं खोलवर मानसिक विश्लेषण होण्याची गरज आहे . हा अंधार सायकॉलॉजिकल थेरेपी म्हणून वापरता येऊ शकतो अनेकांसाठीहे पटलं एकदमछान, वेगळ्या विषयावरचा .......
मला रात्रीचा प्रवास करायला
...
उंच छताखाली सुरक्षितता आणि
चांगला विषय.
हा महाल कसला, रानझाडी ही दाट
हुंह??