✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

परमहंसांची दाल-बाटी

श
शाली यांनी
Sun, 05/13/2018 - 16:22  ·  लेख
लेख
ऐन ऊन्हाळ्याचे दिवस. माझी साईट परळी जवळ सोनपेठ रोडला सुरु होती. निर्जन प्रदेश. सावलीसाठी राखलेले एखादे झाड सोडले तर दुर दुर पर्यंत ऊंच वाढलेले वाळलेले गवत. साईटजवळ एक छोटी वाडी. पण तिही दिवसभर मोकळी. एखाद दोन चुकार कुत्री, काही म्हातारी माणसे. बाकी काही हालचाल नाही. सगळे रानात किंवा औष्णीक केंद्रावर कामाला जायचे. वाडीला वळसा घालून लहाण टेकडीआड दिसेनासा होणारा एक छोटा डांबरी रस्ता. त्यावरचे डांबरही दुपारी वितळायला लागायचे. या टेकडीच्या पायथ्याशीच तात्पुरते ऑफीस आणि डंपर्ससाठी डेपो आणि गॅरेज ऊभारलेले. साईट नऊ किमी पसरलेली. चाळीस डंपर्स आणि दहा-बारा पोकलेन. कामाच्या सुरवातीलाच स्थानिक लोकांनी त्रास दिल्याने मी सर्व ड्रायव्हर्स पुण्याला परत पाठवले आणि स्थानिक ड्रायव्हर्स भरती केले. पोकलेन ऑपरेटर्स युपी साईडचे. एखाद दोन मराठी. काही प्रचंड खडक कामाच्या मध्ये अडचण ठरायचे. ते काढण्यासाठी एक राजस्थानी टोळीही होती. त्यांचे दिवसभर कुठे ना कुठे ड्रिलिंगचे काम सुरु असायचे. कंट्रोल ब्लास्टींगसाठी. पोकलेनचा खडखडाट, ड्रिलर्सची थड थड, डंपर्सची वर्दळ, प्रचंड धुरळा आणि डोक्यावर आग ओकनारा सुर्यनारायण. या सगळ्यातुन साईटच्या एका टोकापासुन दुसऱ्या टोकापर्यंत सतत धावणारी माझी जीप. कधी कधी ड्रायव्हर असायचा पण बरेचदा मलाच ड्राईव्ह करायला लागायचे. कुणाच्या पोकलेन बकेटचा टुथ तुटलाय, तर कुणाच्या हायड्रॉलीक पाईपचा प्रॉब्लेम तर कुठे डंपरचा रॉड निखळलेला. एकुन युध्दभुमीपेक्षा वातावरण काही कमी नसायचे. दुपारी जेवायला ऑफीसवरच यावे लागे. कारण अजुबाजूला जेवायला बसन्यासाठीसुध्दा झाड नाही. मेस नावाची एक मोठी शेड होती. त्यात ड्रायव्हर्सनीच बनवलेले टेबल. त्या शेडखाली टेबलवर बसुन जेवायचे म्हणजे बंकर मध्येच बसल्यासारखे वाटायचे. कामाची डेड लाईन ठरलेली असल्याने काम सुरु करायची वेळ ठरलेली नसे तसेच संपवायची वेळही ठरलेली नसे. सुर्योदयापुर्वी बरेचसे काम ऊरकण्याकडे सगळ्यांचा कल असे. संध्याकाळपर्यंत शरीर अगदी शिणून जाई. पण त्या कामाची एक नशा असल्यासारखं व्हायचं. युध्दज्वर चढावा तसे सगळेच कामाला भिडत. पण या सगळ्या शिणवट्याची भरपाई होई ती संध्याकाळ झाल्यावर. ओसाडपणातही खुप सौंदर्य असते हे तिथे कळाले. संध्याकाळ झाली की आजुबाजूचा सगळा परिसर जणू व्हॅन गॉगचे पेंटींग बनुन जाई. नजर जाईल तिथपर्यत पिवळेधमक गवत. सगळे पिवळे डंपर्स रांगोळी काढल्यासारखे रांगेत लावलेले. दिवसभर ज्या मातीशी धडका घेतल्या त्या मातीवरच नांगी टाकून शरण आल्यासारखे ऊभे असलेले पिवळे पोकलेन. अधून मधून नांगरलेली राखाडी शेतपट्टी. दिवसभर खोदलेल्या माती-मुरुमाच्या विटकरी छोट्या छोट्या टेकड्या. व्हॅन गॉगच्याच पेंटीगसारखी दमलेली, घराकडे परतनारी माणसे, खाली निवलेली पण तरीही किंचीत गरम असलेली जमीन आणि अतिशय अल्हाददायक हवेच्या हलक्या झुळकी. ऑफीस समोर खुप मोठे गवताळ मैदान होते. तेथे सगळे डंपर्स लागत. रोज काम संपल्यावर एका मागोमाग एक चाळीस डंपर मैदानकडे येत तेंव्हा या ड्रायव्हर्समधला कलाकार जागा होई. रोज वेगवेगळ्या आकारात, चक्रव्युह रचावा तसे डंपर्स पार्क केले जात. मध्ये आठ-दहा लोखंडी पाईप्सच्या, कॉटन पट्ट्यांनी विणलेल्या बाजा टाकलेल्या असत. त्यांना केंद्रबिंदू धरुन हा व्युह रचला जाई. चाळीस गाड्यांचा हा व्युह काही गम्मत म्हणून आखला जात नसे. सकाळी कामावर निघताना एका गाडीची दुसऱ्या गाडीला किंचीतही अडचण न होता हा ताफा फक्त दहा मिनिटात रस्त्यावर धुळ ऊडवत धावायला लागे. रविवारी संध्याकाळी आवर्जुन विचारपुर्वक गाड्यांची रचना केली जाई. कारण सोमवारी सुट्टी असे. मग आम्ही विरंगुळा म्हणून बाजुची टेकडी चढून जायचो. टेकडीवरुन या गाड्यांची रचना फार सुंदर दिसे. संध्याकाळी या मधल्या वर्तुळातल्या बाजांवर बैठक बसे. सगळे ड्रायव्हर्स, ऑपरेटर्स असत. माझ्याबरोबर सहा ईंजीनीअर्स आणि पाच ‘ईतर काम पहाणारे’ होते पण ते संध्याकाळी परळीला जात. कंपणीने स्टाफसाठी एक छान बंगला भाड्याने घेतला होता. पण मी साईटवरच रहाणे पसंत करी. तर असो. या बाजांवर झालेल्या बैठका म्हणजे माझ्या आयुष्यात आलेल्या अनेक आनंदां पैकी एक होत. यात युपी, राजस्थानी आणि काही मराठी असत. जेवणं वगैरे ऊरकून आमची बैठक एकदा जमली की मग वेळकाळाचे भान नसे. एक युपीचा ड्रायव्हर त्याची एकतारी घेवून येई. एकतारी वाद्य हे ईतकं सुंदर तालवाद्यही आहे हे माहीत नव्हते मला. त्याच्या एकतारीला एका खाली एक अशा दोन तारा होत्या. त्यावर तो एका बोटाने ऱ्हिदम पकडून छान भजने म्हणे. अतिशय सुरेल आवाजात. राजस्थानी गृपमधला एक चिलिम ओढी. गप्पा मारताना अर्धा तास त्याचे चिलिम भरण्याचे कसबी काम चाले. चिलिम भरुन झाली आणि जर वारा नसेल तर तो हाताने खुण करी. सगळे गप्पा थांबवून त्याच्याकडे पहात. हा एक-दोन मोठे दम भरी आणि वर तोंड करुन धुराची ईतकी मोहक रुपे साकारी की विचारता सोय नाही. कुणीतरी एखाद्या डंपरचा हेडलँप ऑन करी. मग ती धुराची एकात एक गुंतलेली वलयं एकदम चमकदार दिसायला लागत. कुणी “माझ्या आजोबाची गोष्ट सांगतो” म्हणत एखादी थरारक घटना सांगे. खरी खोटी त्याची त्याला माहीत. पण सांगण्याच्या हातोटीमुळे आमचा वेळ बाकी मस्त जाई. या कष्टकरी, मुलूखापासून, कुटूंबापासुन दुर असणाऱ्या लोकांचे वेगळेच रुप मला पहायला मिळे. सोमवारी सुट्टी असे. आणि सोमवारीच आजुबाजूच्या अनेक छोट्या वाड्या वस्त्यांमध्ये देवळात भजने असत. असाच एकदा रात्री पोकलेनवर बसलो असताना भजनाचा आवाज आला. माझ्या सोबत राजस्थानी गृपचा लिडर ‘बाजी’ होता. त्याला म्हणालो “चल बाजी, येतो का? बघू कुठे भजन चाललय ते.” बाजी तयारच असायचा अशा गोष्टींसाठी. तो पळत गेला आणि दहा मिनिटात जीप घेऊन आला. त्याच्या सोबत त्याच्याच गृपमधला एक होता आणि युपीचा ‘बडे’ही त्याची एकतारी घेऊन आला होता. आम्ही दहा पंधरा मिनिटातच भजन सुरु असलेले देऊळ शोधून काढले. मंडळीनी भैरवीच घेतली होती. माझा जरा हिरमोड झाला. पण मला पहाताच भजनी मंडळाने मोठ्या प्रेमाने सतरंजी टाकून जागा करुन दिली. कुणाला तरी “गवळण घ्या रे एखादी. साहेब आलेत ऐकायला.” म्हणत हुकूम दिला. (बहुतेक वाड्यांना मी नुकसानभरपाई मिळवून देताना जरा ढिला हात सोडला होता.) आता आठवत नाही कोणती होती पण गवळण मस्त रंगली. बाजीबरोबर आलेल्या मुलाने खिशातुन त्याच्या लाकडी चिपळ्या (करताल) काढल्या आणि बसल्या जागेवरुनच ताल मिळवला. हे कोण आणि काय वाजवतय हे भजनीमंडळींना समजेना. बाजीने त्याला ऊठवला आणि पुढे नेऊन बसवला. ईतर लोक पहिल्यांदाच हे वाद्य पहात होते. पण त्यांचे आश्चर्य काहीवेळातच बाजूला राहीले आणि त्यांच्या टाळात याच्या चिपळ्या मस्त सामावून गेल्या. मग बाजीने बडेला (हा घरात सर्वात थोरला म्हणून युपी पद्धतीने ‘बडे’) पुढे केले. त्याला भजनाचा काहीही अर्थ कळत नव्हता पण सुरतालात चांगला मुरलेला. त्यामुळे भजनाची सुरावट पकडून बडे एखादे त्याचे कडवे भजनात बेमालून मिसळत होता. थोड्या वेळाने पेटी-पखवाद आणि एकतारी-चिपळी अशी जुगलबंदी सुरु झाली. मला खात्री आहे की त्या देवळातला देव त्या दिवशी नक्की प्रसन्न झाला असणार. रात्री दहा वाजता संपणारे भजन पहाटे नाईलाजाने आवरते घेतले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी वाडीतले लोक साईटवर आले. बडेला आणि त्या राजस्थानी मुलाला जेवायचे आमंत्रण द्यायला. अर्थात सोबत मी आणि बाजीही होतो. पुरणपोळी-गुळवणी, कुरडई खाताना त्यांची होणारी तारांबळ पाहून सगळं घर हसत होतं. दोघांनीही हे पदार्थ पहिल्यांदाच चाखले होते. आणि पहिल्यांदाच भरपुर चापलेही होते. अगदी पोटभर जेवले. जेवणानंतर त्यांना टोपी नारळ आणि परत भजनाला यायचे आमंत्रण मिळाले. कामे सुरु होती. अडचणी येत होत्या, तरीही आम्ही काम पुढे रेटत होतो. अशातच पुण्याला हेडऑफीसला काहीतरी गडबड झाली आणि काम दोन दिवस थांबले. दिवसभर बसुन कंटाळा आला होता. मी बाजीला हाक मारली. काही पैसे काढून दिले. बाजी तसा हुशार होता. त वरुन ताकभात ओळखायचा. तासाभरातच बाजीची जीप परळीकडे जाताना दिसली. संध्याकाळी टेकडीच्या दुसऱ्या बाजूला ऊतारावर बाजीने जागा बऱ्यापैकी साफ करवून घेतली, बाजली मांडली. टेकायला दोन रग टाकले. पाच-सहा लाकडे होळीला रचावी तशी रचून पेटवली. बाजूलाच एक बांबू रोवून त्यावर एक बल्ब टांगला. त्याला जीपच्या बॅटरीचे कनेक्शन दिले. मग बाजी आणि त्याची टिम कामाला जुंपली. कुणी तुपामध्ये कणीक मळायला घेतले तर कुणी पातेल्यांच्या बुडांना चिखल लावायला घेतला. दोघांनी डाळी स्वच्छ धुऊन घेतल्या. बाजीने येतानाच वाडीतुन भरपुर गोवऱ्या आणल्या होत्या. त्या एकमेकांना टेकवून त्यांची छोटी रांग केली. त्यावर तुप टाकून पेटवल्या. जो तो कामात गढून गेला. संध्याकाळची अल्हाददायक हवा, सगळीकडे पसरलेला गवताचा पिवळा रंग, समोर सुर्यास्त, मावळत्या सुर्याची सोनेरी किरणे, जीपमध्ये मेहदीसाहेबांचे अलवार ‘गुलोमे रंग भरे, बादे नौबहार चले’, बाजीने कुठूनतरी पैदा केलेली व्होडका, बाजूलाच चाललेली दाल-बाटीची जय्यत तयारी. अहा हा! काय सुरेख संध्याकाळ होती ती. साईट पुर्ण झाली. मी पुण्याला परत आलो. तिकडच्या ड्रायव्हर्सने तिकडेच दुसरे काम शोधले. बाजी आणि त्याची टिम पोटामागे अजून कुठे कुठे भटकत गेली. मीही काही दिवसांनी कंपणी सोडली आणि स्वतःचा व्यवसाय सुरु केला. कंपणीतल्या सहकाऱ्यांचा संपर्क हळू हळू कमी होत पुर्ण थांबला. पण मधेच त्या दिवशी रंगलेले भजन आठवते, (त्यानंतर अनेक दिग्गजांच्या मैफीली ऐकल्या पण त्या दिवसासारखे भान नाही हरपले.) बडेची एकतारीवरची भजने आठवतात, बाजीची चिपळीच्या तालावर गायलेली राजस्थानी लोकगीते आठवतात. त्याच्या हातची ती दाल-बाटी आठवते. अचाणक आलेल्या वळवाच्या पावसात कोसळलेली मेस आणि त्या दिवशी संध्याकाळी जेवणाच्या नावाखाली बडेनी केलेले मिळेल त्या डाळींचे अत्यंत चवदार सुप आठवते. यातल्या कोणत्याच गोष्टी आता परत मिळणार नाही याची जाणिव असुनही काही गोष्टींसाठी अट्टाहास करतो अधुन मधून. कुठे दाल-बाटी चांगली मिळते असे ऐकले की आवर्जुन जाऊन येतो. परिसरातील एकही हॉटेल सोडलं नाही. चोखी धानीही ट्राय करुन झालं. एकदा तर औरंगाबादजवळ कुठल्या तरी धाब्यावर छान मिळते ऐकून तेथवर धडक मारली. (तिकडे बट्टी म्हणतात.) शेवटी एका राजस्थानी आचाऱ्याला गाडीत टाकून गावाला नेले. मित्राच्या शेतात दाल-बाटीचा कार्यक्रम केला. पण बाजीच्या हातची चव काही मिळाली नाही ते नाहीच. हे सगळं आठवायचं कारण म्हणजे काही दिवसांपुर्वी कुठेसे जात असताना रस्त्यात एक छोटेसे हॉटेल दिसले. नाव जरा वेगळे वाटले. “परमहंस”. मला वाटले बंगाली असेल. मला बंगाली डिश आवडतात. हिलसा वगैरे मिळाला तर बरेच होईल असा विचार केला. जेवायचीही वेळ होती. मी गाडी वळवून परत मागे आलो. गाडी पार्क केली आणि परमहंसला गेलो. प्रथमदर्शनीच मुड जरा गेला. कारण फक्त टेबलांच्या दोनच रांगा. मागे किचन असावे. हात धुवायचे बेसीन हॉटेलच्या बाहेरच्या बाजूला. आणि बोर्डवर लिहिलेलं “राजस्थानी थाळी”. टेबलवर बसलो. पत्नीच्या चेहऱ्यावर “मिळू दे बाबा याला एकदाची मनासारखी दाल बाटी” असा भाव. मेन्यूकार्ड पाहीले. १२० रुपयाला दाल-बाटी. म्हटलं १२० रुपयात हे काय देणार? पण आता आलोच आहो तर खावूया. मग ऑर्डर दिली दोन थाळ्यांची. पाचच मिनिटात दोन ताटे समोर आली. ताटात फक्त दाल, लाल चटणी, पापड, लोणचे. ईतक्यात दुसरा आला. त्याने दोघांच्याही ताटात दोन दोन बाट्या अगदी बारीक कुस्करुन दिल्या. दोन दोन बाट्या बाजूच्या डिशमध्ये ठेवल्या. तो गेल्यावर दुसरा एकजण तुपाची किटली घेवून आला. छोट्या मापट्याने त्याने भरपुर तुप ताटातल्या आणि डिशमधल्या बाटीवर घातले. अगदी ‘पुरे’ म्हणेपर्यंत वाढले. माझी तब्बेत खुष झाली. कारण बाजीशिवाय मला कोणी हाताने बाटी चुरुन दिली नव्हती आजवर. पहिला घास खाल्ला. आणि काय सांगू? चक्क ‘बाजी’ची आठवण झाली. अगदी तशीच नसली तरी बरीचशी जवळ जाणारी चव होती. पहिल्या दोन बाट्या खाईपर्यंत मग मी सगळं विसरुन गेलो. नंरत मग दोन बाट्या अत्यंत चवीने खाल्या. शेवटी ईतक्या दिवसांची ईच्छा “परमहंसां’नी पुर्ण केली. दाल बाटी दाल बाटी
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर

प्रतिक्रिया द्या
16048 वाचन

💬 प्रतिसाद (72)

प्रतिक्रिया

अद्भुत!! निव्वळ अप्रतिम

जेम्स वांड
Sun, 05/13/2018 - 17:02 नवीन
क्षणभर मी साईटवर, वाडीतल्या देवळात, नंतर पुरणपोळीचा पंगतीला अन शेवटी तंबू बाहेरच्या वोडका -दालबाटी पार्टीला तुमच्या सोबत मांडीला मांडी लावून बसल्यासारखं फीलिंग आलं. काय जिवंत लेखन आहे हो तुमचं, म्हणायला 'साईटवरच्या एका मुकादमाने खायला घातलेल्या पदार्थाची चव ती सय परत जगणे होय' पण त्याला जी तुम्ही उत्तम जोड दिलीत, कामाची, घामाची, मेहनतीची, धुळीचीही अन गरीब वाडीकर लोकांच्या सोबत दूर प्रांतातून आलेल्या ड्रायव्हर मुकादम अन कामगारांसोबत जुळल्या सुरांची. जियोच. अजून लिहा ना असे, विनंती करतो जाता जाता संध्याकाळ झाली की आजुबाजूचा सगळा परिसर जणू व्हॅन गॉगचे पेंटींग बनुन जाई. कडक उन्हाळ्यात धुळीचे फुफाटे उडवणाऱ्या वातावरणातही तुमची सौंदर्य शोधायची वृत्ती खूप आवडली!
  • Log in or register to post comments

धन्यवाद

शाली
Mon, 05/14/2018 - 05:39 नवीन
सविस्तर प्रतिसादाबद्दल आभार. अजुन लिहायचा प्रयत्न करेन नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

छान,कुरकुरीत आठवण.

मार्मिक गोडसे
Sun, 05/13/2018 - 17:02 नवीन
छान,कुरकुरीत आठवण.
  • Log in or register to post comments

छान

manguu@mail.com
Sun, 05/13/2018 - 17:34 नवीन
आताच ठाण्यात लिट्टी चोखा खाऊन आलो. मनातल्या मनात लिट्टी चोखा आणि डाल बाटीची तुलना करत होतो.
  • Log in or register to post comments

वा ! मस्त ... आवडला लेख .

उगा काहितरीच
Sun, 05/13/2018 - 17:53 नवीन
वा ! मस्त ... आवडला लेख . यावरून आमच्या घरावर स्लॕब टाकला होता त्या दिवशी सगळ्या मजुरांसोबत खाल्लेली खिचडी आठवली (शाबुदाण्याची नव्हे , तांदूळाची .) १७-११-१२ ( तारीख लक्षात रहायला कारण की त्या दिवशी बाळासाहेब ठाकरे गेले होते. असो ! ) आमच्या घरावर छत टाकायला हा दिवस मुक्रर करण्यात आला होता.( इथे पुण्यामुंबईला ६ महिन्यात बिल्डिंग पूर्ण करणे वेगळे अन् लहान शहरात स्वतः वॉटरींग केलेल्या स्वतःच्या घरावर छत पडणे वेगळे ) दिवसभर नुसती धावपळ... ३-४ वाजता छताचे काम पूर्ण झाल्यावर सगळ्या मजूर , मिस्त्री लोकांनी एकत्रच बसून खाल्लेल्या खिचडीची चव अप्रतिमच होती . त्यानंतर काही "ती" चव परत मिळालीच नाही.
  • Log in or register to post comments

खरं आहे. बेदम काम केल्यानंतर

शाली
Mon, 05/14/2018 - 05:41 नवीन
खरं आहे. बेदम काम केल्यानंतर एकत्र करुन खाल्लेल्या एखाद्या साध्या पदार्थाची चव अप्रतिम लागतेच. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

दिवस भर सिस्टीम समोर बसून

भीमराव
Sun, 05/13/2018 - 18:00 नवीन
दिवस भर सिस्टीम समोर बसून बोटं बडवणाऱ्या आणि संध्याकाळी मुंग्या आलेल्या मेंदूने घराकडे शरीरं ओढत जणारांना हे जग कधीच जगायला भेटणार नाही.
  • Log in or register to post comments

दासोपंत

जेम्स वांड
Sun, 05/13/2018 - 19:07 नवीन
त्यांना दुसरं काही दिसत असेल दुसरे अनुभव मिळत असतील. बाबू मोशाय ये जिंदगीही एक रंगमंच है.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीमराव

+१

शाली
Mon, 05/14/2018 - 05:42 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

@ईश्वरदास

शाली
Mon, 05/14/2018 - 05:45 नवीन
@ईश्वरदास शरीर आणि मन थकवणारे काम असेल, मग ते कोणत्याही स्वरुपाचे असो, मानूस त्यातुन आनंदाचा कोणता ना कोणता भाग शोधायला सुरवात करतोच करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीमराव

काय सुरेख लिहिलंय ...

पद्मावति
Sun, 05/13/2018 - 18:08 नवीन
काय सुरेख लिहिलंय ... साधासाच विषय पण किती सुंदर रंगवलाय.
  • Log in or register to post comments

+१

निशाचर
Sun, 05/13/2018 - 18:19 नवीन
खूप सुरेख! जेम्स वांड यांचा प्रतिसादही आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

@पद्मावती खुप खुप धन्यवाद!

शाली
Mon, 05/14/2018 - 05:47 नवीन
@पद्मावती खुप खुप धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

काय सुरेख लिहिलेय!

यशोधरा
Sun, 05/13/2018 - 18:14 नवीन
काय सुरेख लिहिलेय!
  • Log in or register to post comments

सुरेख चित्रदर्शी लेखन... अगदी

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 05/13/2018 - 18:36 नवीन
सुरेख चित्रदर्शी लेखन... अगदी तुमच्या मनात घर करून राहिलेल्या दालबाटीची चव आमच्या जिभेवर यावी इतके ! तुमचे इतर अनुभवही अश्याच खास शैलीत वाचायला आवडतील.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

शाली
Mon, 05/14/2018 - 05:49 नवीन
धन्यवाद! फोटो टाकायची आवश्यकता नव्हती पण ऊत्सुकता होती, फोटो टाकता येतात की नाही याची. पण जमले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

फोटो हवेच... फोटोने तर

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 05/15/2018 - 13:01 नवीन
फोटो हवेच... फोटोने तर दालबाटीची चव तडक जिभेवर येऊन तोंडाला पाणी सुटले :) अर्थ मुव्हर्सचे फोटो काढले असतील तर तेही टाका... म्हणजे वाचताना त्यांचा खडखडाट कानांत घुमू लागेल ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाली

अहाहा!!

कंजूस
Sun, 05/13/2018 - 18:46 नवीन
अहाहा!! **दिवसभर ज्या मातीशी धडका घेतल्या त्या मातीवरच नांगी टाकून शरण आल्यासारखे ऊभे असलेले पिवळे पोकलेन. ** भारी लेखन.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

शाली
Mon, 05/14/2018 - 05:51 नवीन
धन्यवाद! पोकलेन बकेट जमिनीवर बकेट टेकवून ऊभा राहीला की अगदी असाच दिसतो. त्यामुळे सुचले असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

सुंदर लेख

बबन ताम्बे
Sun, 05/13/2018 - 19:18 नवीन
लेखनशैली खासच !!
  • Log in or register to post comments

क्लासिक!

चांदणे संदीप
Sun, 05/13/2018 - 19:19 नवीन
पोकलेन आणि माती उकरण्याच्या मातकट विषयाला आज तुम्ही ग्लॅमर मिळवून दिलेत. Sandy
  • Log in or register to post comments

+१११

नाखु
Sun, 05/13/2018 - 20:05 नवीन
दिसणं आणि बघणं यातला नेमका फरक आपली ओघवती शैली अधोरेखित करणारी आहे सलाम नितवाचक नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

@नाखु धन्यवाद!

शाली
Mon, 05/14/2018 - 05:52 नवीन
@नाखु धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

भारी !!

माहितगार
Sun, 05/13/2018 - 19:20 नवीन
भारी !!
  • Log in or register to post comments

लेखनातील जिवंतपणा अनुभवायला

विशुमित
Sun, 05/13/2018 - 19:46 नवीन
लेखनातील जिवंतपणा अनुभवायला मिळाला..!!
  • Log in or register to post comments

जबरदस्त लिहिलय. खुप दिवसांनी

स्पा
Sun, 05/13/2018 - 20:22 नवीन
जबरदस्त लिहिलय. खुप दिवसांनी असले ताजे लिखाङ वाचुन दिल खुष झाला :) आम्ही अजुन त्या साईटवरच रमलो आहोत
  • Log in or register to post comments

निव्वळ अप्रतीम.

पुंबा
Sun, 05/13/2018 - 20:25 नवीन
निव्वळ अप्रतीम. अतिशय नितळ, चित्रदर्शी वर्णन.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

शाली
Mon, 05/14/2018 - 05:55 नवीन
माहितगार, विशुमित, स्पा, पुंबा सगळ्यांचे आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

सुंदर!

अनन्त्_यात्री
Sun, 05/13/2018 - 21:28 नवीन
लिहिते रहा.
  • Log in or register to post comments

सुरेख.

एस
Sun, 05/13/2018 - 21:40 नवीन
सुरेख.
  • Log in or register to post comments

भारी !

सस्नेह
Sun, 05/13/2018 - 21:55 नवीन
लेख वाचत नसून चित्रपट पहात आहोत असे वाटले.
  • Log in or register to post comments

आभार!

शाली
Mon, 05/14/2018 - 05:58 नवीन
अनन्त_यात्री, एस आणि स्नेहांकिता सगळ्यांचेच खुप आभार!
  • Log in or register to post comments

क्लासीक

अर्धवटराव
Mon, 05/14/2018 - 06:16 नवीन
परमहंस बाजीच चालवत असल्याचं वाचायला मिळेल असं काहितरी वाटत राहिलं शेवटपर्यंत. फारच चविष्ट धागा.
  • Log in or register to post comments

एकही फोटो दिला नसता तरी सगळे

शेखरमोघे
Mon, 05/14/2018 - 08:08 नवीन
एकही फोटो दिला नसता तरी सगळे कसे जिवन्त वाटले असते - शब्दान्तच ओसाडपणातील सौंदर्य दिसतेच आहे, , धुराची एकात एक गुंतलेली वलयं, रंगलेले भजन, एकतारी आणि चिपळीचा आवाज, रन्गलेले भजन आणि जुगाल्बन्दी, बाजीच्या हातची दाल-बाटी आणि "परमहंस" मध्ये झालेला साक्षात्कार - सगळे अगदी रसरशीत. शेवटी टाकलेले फोटो म्हणजे तर तर छान पैकी फोडणीच!! छान, छान!!
  • Log in or register to post comments

@शेखरमोघे

शाली
Tue, 05/15/2018 - 09:50 नवीन
@शेखरमोघे
एकही फोटो दिला नसता तरी सगळे कसे जिवन्त वाटले असते
मिपावर फोटो टाकता येतात का? हे पहाण्यासाठी फोटो टाकले. जमलेही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखरमोघे

सुरेख लिहिलंय

प्रचेतस
Mon, 05/14/2018 - 08:57 नवीन
सुरेख लिहिलंय
  • Log in or register to post comments

लेखन आवडले.

मितान
Mon, 05/14/2018 - 09:37 नवीन
लेखन आवडले. परिसर ओळखीचा असल्याने चित्र डोळ्यासमोर उभे राहिले.
  • Log in or register to post comments

अरे व्वा ! मस्तच की !

जयंत कुलकर्णी
Mon, 05/14/2018 - 10:33 नवीन
अरे व्वा ! मस्तच की !
  • Log in or register to post comments

अप्रतिम

संजय पाटिल
Mon, 05/14/2018 - 11:02 नवीन
अतिशय सुंदर लेखन...
  • Log in or register to post comments

@ शाली, ,

अनिंद्य
Mon, 05/14/2018 - 11:23 नवीन
@ शाली, , तुम्हाला रणरणते ओसाड रान पैंटिंग सारखे भासते तुमची अनोळखी स्वर-कल्लोळात समाधी लागते तुमची सर्वस्तरीय लोकांशी जिवाभावाची दोस्ती होते, टिकते भाव जिवंत आणि मन नितळ असल्याशिवाय हे घडत नाही, तुम्ही भाग्यवान आहात. लेखन आवडलेच, शुभेच्छा. अनिंद्य
  • Log in or register to post comments

@अनिंद्य खुप धन्यवाद!

शाली
Tue, 05/15/2018 - 09:47 नवीन
@अनिंद्य खुप धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिंद्य

मस्त!

राघव
Mon, 05/14/2018 - 11:35 नवीन
खूप आवडले. तुमचा अनुभव [मला] उभारी देऊन गेला! :-) पु.ले.शु.
  • Log in or register to post comments

___/\___

तिमा
Mon, 05/14/2018 - 12:12 नवीन
तुमच्या लेखनकौशल्याला आणि त्या जिवंत अनुभवांना सादर प्रणाम!
  • Log in or register to post comments

खुप छान लिहिलय. आणि मला असं

सालदार
Mon, 05/14/2018 - 14:22 नवीन
खुप छान लिहिलय. आणि मला असं कधीच लिहिता येणार नाही याचं वाईट वाटतय :(
  • Log in or register to post comments

मस्तच हो, आवडले लिखाण.

अभ्या..
Mon, 05/14/2018 - 15:01 नवीन
मस्तच हो, आवडले लिखाण.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

शाली
Tue, 05/15/2018 - 09:45 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अप्रतिम वर्णन

सुखीमाणूस
Mon, 05/14/2018 - 15:35 नवीन
ईतक्या धकाधकीच्या जीवनशैलीत आनंद शोधला तुम्ही. आणि त्याचे सुन्दर वर्णन देखिल केलेत. कौतुक वाट्ते तुमचे. असेच लिहित रहा.
  • Log in or register to post comments

मस्त...

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 05/14/2018 - 15:48 नवीन
सकारात्मक विचार कसा असावा या साठी हा लेख म्हणजे उत्तम उदाहरण ठरु शकेल. काही माणसे कोठेही टाकले तरी तिकडे आनंद शोधतातच. तुम्ही अशांपैकी एक दिसताय. काही काही वाक्यतर फारच लाजवाब आहेत. अक्षरशः खिळून राहिलो वाचताना.. लिहिते रहा... पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

@ज्ञानोबाचे पैजार

शाली
Tue, 05/15/2018 - 09:44 नवीन
@ज्ञानोबाचे पैजार खुप धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

सुंदर!!

तुषार काळभोर
Mon, 05/14/2018 - 15:52 नवीन
पेंटिंगसारखा सुंदर लेख!! बादवे, हे परमहंस झेन्सरसमोरचं का?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा