वाचकांचा पत्रव्यवहार अर्थात जनमानस
आपण सर्वजण इथे वाचन आणि लेखन करण्यासाठी जमतो. अनेक विषयांवर चर्चा होतात, रंगतात, वादविवाद अन काथ्याकूटही होतो. या माध्यमाव्यतिरिक्तही आपण इतर वाचन करतो. रोजचे वृत्तपत्र वाचन हा आपल्या दिनक्रमाचा एक भाग असतो. त्यावरून एक नजर फिरवल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. आज जरी इ-माध्यम प्रस्थापित झालेले असले तरी आपल्यातील बहुतेकांना एखादे तरी छापील वृत्तपत्र वाचायला आवडतेच. जेव्हा आपण ते चाळू लागतो तेव्हा त्याच्या पानांमध्ये आपल्याला विविध विषयांची विभागणी केलेली दिसते. मग आपल्या आवडीनुसार आपण हव्या त्या पानावर रेंगाळतो.
संपादकीय पान हा वृत्तपत्राचा आत्मा असतो. त्याचा एक कोपरा हा खास वाचकांच्या पत्रांसाठी राखीव असतो. त्यामध्ये अनेक वाचक अल्प शब्दांमध्ये आपापली मते, विचार, तक्रारी वा सूचना मांडत असतात. अशा सदरातून सातत्याने पत्रलेखन करणे हे एक जागरूक नागरिक असल्याचे लक्षण असते. साधारणपणे असे म्हटले जाते की वृत्तपत्रे ही राज्यकर्त्यांचा ‘विरोधी पक्ष’ असतो. त्यापुढे जाऊन असे म्हणता येईल की नियमित पत्रलेखक हे वृत्तपत्रांचा ‘विरोधी पक्ष’ असतात. एक प्रकारे ते ‘जागल्या’ची भूमिका करतात ! ( ही दोन्ही विधाने शब्दशः तसेच पूर्णसत्य म्हणून घेऊ नयेत ही विनंती).
मला खात्री आहे की आपल्यातील अनेकांनी असे पत्रलेखन केले असेल आणि अधूनमधून करतही असाल. अशा लोकांपैकी मीही एक. या धाग्याचा हेतू सांगण्याआधी थोडे माझ्याबद्दल लिहितो.
माझ्या पत्रलेखनाची सुरवात झाली वयाच्या २१व्या वर्षी. ते माझे एम बी बी एसचे अखेरचे वर्ष. अभ्यासाच्या पुस्तकांच्या गराड्यात बसून प्रचंड वाचन, मनन, पाठांतर आणि मग चर्चा असा तो व्यस्त दिनक्रम असे. पण या सगळ्यातून थोडी तरी फुरसत काढून काहीतरी अभ्यासबाह्य करावे असे मनातून वाटे. आपल्या आजूबाजूस असंख्य घटना घडत असतात त्यातील काही मनाला भिडतात. त्यावर आपण कुठेतरी व्यक्त झाले पाहिजे असे अगदी आतून वाटे.
तशा आपण मित्रांबरोबर चर्चा करतोच. पण त्या विस्कळीत स्वरूपाच्या असतात. पुन्हा त्या ठराविक वर्तुळात सीमित राहतात. जर मला काही विचार मुद्देसूद मांडायचे असतील आणि ते समाजात व्यापक स्वरूपात प्रसारित व्हावे असे वाटले तर ते लिहून काढणे क्रमप्राप्त होते. त्यातूनच लेखनाची ठिणगी मनात पडली आणि वाचकपत्र ही त्यासाठीची पहिली पायरी झाली.
तो जमाना हा फक्त छापील माध्यमाचा होता. रोज सकाळी घरी पेपर येऊन पडल्यानंतर तो प्रथम पटकावण्यासाठी घरच्या लोकांमध्ये स्पर्धा असायची ! वृत्तपत्रे ही बऱ्यापैकी गांभीर्याने वाचली जात. त्यांत लोक पत्रलेखन बऱ्यापैकी आवडीने करत. नामांकित वृत्तपत्रात आपले पत्र प्रसिद्ध होणे हे तितकेसे सोपे नव्हते आणि ते मानाचे समजले जाई. आपले पेपरात छापून आलेले नाव पाहण्याचा आनंद काही औरच असे. त्यामुळे मलाही हे सर्व खुणावत होते.
अशाच एका उर्मीतून मी पहिलेवहिले पत्र लिहीले. ते क्रिकेटवर होते. आता लिहून तर झाले पण छापून येण्याची काय शाश्वती? आपल्या शहरातील सर्वाधिक खपाच्या पेपरात तर ते छापून येणारच नाही असे मनोमन वाटू लागले. मग एक युक्ती केली. त्या पत्राच्या तीन हस्तलिखित प्रती सुवाच्य अक्षरात लिहिल्या आणि त्या तीन वृत्तपत्रांना पाठवल्या.
आता ते पत्र प्रसिद्ध होणार की नाही याची जाम उत्सुकता लागलेली. रोज सकाळी पेपर आल्यावर त्यावर झडप घालून ‘ते’ पान उघडायचे आणि त्यावर अधाशासारखी नजर फिरवायची. ८-१० दिवस गेले आणि एके दिवशी माझे स्वप्न साकार झाले ! यथावकाश ते पत्र अन्य दोन पेपरांतही प्रसिद्ध झाले.
मग या प्रकाराची गोडी लागली. विविध विषयांवर पत्रलेखन हा माझा छंद झाला.
आता ह्या धाग्याचा हेतू सांगतो. आपल्यापैकी काहीजण असेच पत्रलेखक असू शकतील. आपण पूर्वी लिहिलेल्या पत्रांची कात्रणेही जपून ठेवली असतील. तर अशा जुन्या पत्रांचे या धाग्यात पुन्हा प्रकाशन करावे अशी कल्पना आहे. एक पथ्य आपण पाळू. ते पत्र इथे लिहिल्यावर त्याखाली संबंधित वृत्तपत्र वा नियतकालिकाचे नाव, तेव्हाचा प्रकाशन दिनांक आणि ‘साभार’ अशी टीप यांचा उल्लेख करावा. म्हणजे ‘प्रताधिकार’ वगैरे समस्या येत नाही. आपण स्वतःचेच पत्र इथे पुन्हा प्रकाशित करत आहोत. तरीही यात काही वावगे असल्यास साहित्य संपादकांनी मार्गदर्शन करावे ही विनंती.
आपल्या गत लेखनाची पुनर्भेट अशी यामागची कल्पना आहे. पत्र जेवढे अधिक जुने तेवढी अधिक मजा आता वाचताना येईल.
अजून एक. आपल्यातील काही जण स्वतः पत्रलेखक नसले तरी ते सदर आवडीने वाचणारे असू शकतात. त्यांनीसुद्धा एखाद्या चांगल्या अथवा संस्मरणीय पत्राची आठवण लिहायला हरकत नाही. एखाद्या विषयाचा पाठपुरावा पत्रांतून करून जर त्यावर काही शासकीय अंमलबजावणी झाली असेल, तर तेही जरूर लिहा. इतरांसाठी ते स्फूर्तीदायक ठरते.
तर मग मित्रांनो, काढा आपली जुनी कात्रणवही आणि घडवूयात आपल्या पत्रांची पुनर्भेट !
धन्यवाद.
*********************************************
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अशी काही कात्रणे वगैरे नाहीत.
Same here
खूप छान विषय आहे. काही लिहीलं
एस व श ल भ,
२००१ साली प्रकाशित झालेले हे
कपिलदेव
येऊ द्यात ..
पत्रलेखन : काही आठवणी
वाचकांची पत्रे वरुन आठवले,
एखादा ‘लेख’ पाठवला तर तो
माहितगार,
परिसरातील
नाखु,
एक छान पत्रसंवाद !
१९८४ मधील