तुम गगन के चंद्रमा हो
बरेच दिवस झाले या गोष्टीला. तेव्हा ज्या घरात मी रहायचे त्या घराला एक छानशी गच्ची होती. रात्री जेवण झाल्यावर त्या गच्चीत अगदी मस्त शतपावली करता यायची. ती सवयच झाली होती. आणि मग बरेचदा त्यावेळी काही काही विचार चालू असायचे मनात.
असंच एकदा शतपावली चालू होती. आजूबाजूला अगदी शांत वातावरण होतं. कानात हेडफोनवर मंद आवाजात रेडिओ चालू होता. रात्रीची विविध भारतीवर सुंदर सुंदर जुनी हिंदी गाणी लागतात. मुख्य म्हणजे त्यात आता एफेम वाहिन्यांवर चालते तशी बकबक नसते. निवेदक कामापुरतंच बोलतात. गाण्यांचा मूड जात नाही त्यामुळं. निवेदक सांगत होता की आता पुढचं गाणं सती-सावित्री चित्रपटातलं आहे आणि लता मंगेशकर / मन्ना डे यांनी गायलंय. गीतकार भरत व्यास आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचं संगीत आहे.
गाणं सुरू झालं... आणि पुढची तीन-चार मिनिटं फक्त काहीतरी होतंय आपल्याला एवढंच जाणवत होतं. काय होतंय ते कळत नव्हतं... अजूनही कळलेलं नाहीये. काहीतरी जादू होत होती हे नक्की. मधले सगळे क्षण 'ना मी इथली! ना इथले कोणी माझे!' अशी माझी अवस्था झाली होती. गाणं संपून पुन्हा निवेदक महाशय बोलायला लागले तेव्हा ती तंद्री भंगली. मला आलेला सुरांचा साक्षात अनुभव.
त्यानंतर ते गाणं शोधण्याकरता मी जालावर कुठे कुठे नाही शोधलं! जंग जंग पछाडलं! शेवटी कुठल्यातरी एका गाण्यांच्या संस्थळावर सापडलं. आता युट्युबवर सहज उपलब्ध आहे. त्यानंतर ते गाणं मी कित्येकवेळा ऐकलं! भरभरून ऐकलं!! वाट्टेल तेव्हा ऐकलं!!! वारंवार ऐकूनही कायम माझ्या मनाला मोहिनी घालणारं हे गाणं गेल्या आठवड्यात असंच परत एकदा ऐकलं आणि त्याबद्दल लिहावंसं वाटलं.
हे गाणं ज्या चित्रपटातलं आहे तो मी कधी पाहिलेला नाही की गाणं पाहिलेलं नाही. गाण्यातले अभिनय करणारे कलाकार कोण, गाण्याची पार्श्वभूमी, आधी-नंतरचा प्रसंग, काही-काही माहिती नाही. माहिती आहे ते गाणं, त्याचे शब्द, संगीत आणि आवाज! बास, तेवढ्याच आधारावर जे काही वाटतं ते लिहितेय!
*****
ते गाणं आहे ... तुम गगन के चंद्रमा हो, मै धरा की धूल हूं!
*****
गाण्याच्या सुरुवातीला असलेलं साधंच पण अतिशय मधुर संगीत जाणीव करून देतं की पुढे आपण काहीतरी सुरेख अनुभव घेणार आहोत, मूड सेट होतो आणि तेवढ्यात लताबाईंचा अतिशय गोड आवाज आपल्या कानातून मनाचा ताबा घेतो. त्यांच्या गळ्याबद्दल काय बोलावं? तो दैवी आहेच. पण त्यांचा असा आवाज मी तरी पहिल्यांदाच ऐकला होता. (ते गाणं खरं तर सुमन कल्याणपूर यांनी गायलंय असाही एक प्रवाद नंतर वाचला. पण त्यात किती तथ्य आहे याची मला कल्पना नाही). गाण्यातलं मला फारसं कळत नाही. सूर, ताल, रस काहीच नाही. पण हे युगलगीत असलं तरी मला त्यात शृंगारापेक्षा शांतरस जास्त आहे असं वाटतं. हा शृंगार शांतवणारा आहे, भरभरून तृप्त करणारा आहे. गाणं ऐकताना निखळ, नि:स्वार्थी भावना जाग्या होतात. एका शांत चांदण्या उत्तररात्री एखाद्या सरोवरातल्या नौकेवर शांतपणे विहार करतोय असं वाटतं.
अतिशय अर्थवाही आणि समर्पक शब्द, उपमा... गायक-गायिकेचा सुमधुर आवाज आणि परिणामकारक संगीत या एखाद्या गाण्याला गरजेच्या असणार्या सर्वच गोष्टी या ठिकाणी छान जुळून आल्या आहेत.
*****
तुम गगन के चंद्रमा हो, मै धरा की धूल हूं!
तुम प्रणय के देवता हो, मै समर्पित फूल हूं!!
लताबाईंच्या आवाजातील ओळींनी गाण्याला सुरुवात होते. निरतिशय प्रेमात असलेल्या प्रेयसीने तिच्या प्रियकराला तिच्या भावविश्वात सर्वोच्च स्थान दिलं आहे. तिच्याकरता तो आकाशिचा चंद्र आहे आणि त्याच्यापुढे ती केवळ जमिनीवरची धूळ आहे. इथे ती त्याला आपल्या प्रेमविश्वात सर्वोच्च स्थानी बघतेय आणि स्वतःला मात्र त्याच्यापुढे तितकीशी अनुरूप(पात्र) समजत नाही. तो तिच्या प्रेमाची देवता आहे आणि ती त्या देवाला अर्पण केलेलं फूल आहे. आह्ह्ह! मला सगळ्यात जास्त आवडलेली उपमा आहे ही. गाण्याला आणि आपल्या मूडला एका वेगळ्याच उंचीवर घेवून जाणारी.
तुम हो पूजा मै पुजारी, तुम सुधा मै प्यास हुं
प्रेयसी आपल्या प्रियकराला देवता मानतेय तर प्रियकर तिला त्याच्या जगण्याचं कारण मानतोय. तो पुजारी तर ती त्याच्या आयुष्याचं एकमेव कारण, ध्येय, साध्य आहे. त्याच्यासारख्या तहानलेल्यासाठी ती सुधा म्हणजेच संजीवनी आहे.
तुम महासागर की सीमा, मै किनारे की लहर
तुम महासंगीत के स्वर, मै अधुरी सांस पर
तुम हो काया मै हुं छाया, तुम क्षमा मै भूल हूं
इथे पुन्हा एकदा प्रेयसी आपल्या प्रियकराला सर्वच क्षेत्रांत सर्वोच्च स्थानावर बघतेय. या ओळी केवळ इथे नुसत्या वाचणं वेगळं... ऐकताना जाणवतं की त्याचं प्रेम मिळवून ती इतकी तृप्त आणि धन्य झालीये की या जगात तिच्याकरता आता अजून काही मिळवायचं बाकी राहिलंच नाहीये आणि तिचं अस्तित्व आता त्याच्यासाठीच आहे. त्याला शरीर आणि स्वतःला सावली म्हणवून घेत ती हेच सांगतेय की त्याच्याशिवाय तिला काही अस्तित्वच नाही. तो आहे म्हणून ती आहे, तो नसेल तर ती असण्याचा प्रश्नच नाही. त्याला क्षमा आणि स्वतःला चूक म्हणून ती तिचं त्याच्यामुळे असलेलं अस्तित्व तर दाखवतेच आहे आणि सोबतीला पुन्हा त्याच्या उच्च स्थानाचा आणि तुलनेत स्वतःच्या दुय्यम स्थानाचा उल्लेख करतेय.
खरं तर तीसुद्धा त्याच्यावर तेवढेच प्रेम करतेय पण त्याच्याकडून मिळणार्या प्रेमाने ती एवढी भारावून गेलीये की तिला तिचे प्रेम त्याच्या प्रेमाच्या तुलनेत कमी वाटतेय. त्याच भ्रमामुळे ती वारंवार स्वतःला सर्वात खालच्या पायरीवर ठेवून तेथून सर्वोच्च स्थानी असलेल्या प्रियकराच्या बरोबरीला येण्याइतपत भरभरून प्रेम करू इच्छित आहे.
तुम उषा की लालिमा हो, भोर का सिंदूर हो
मेरे प्राणो की हो गुंजन, मेरे मन की मयुर हो
तुम हो पुजा मै पुजारी, तुम सुधा मै प्यास हूं
आपल्या प्रेयसीला तिचं स्वतःचंच प्रेम कमी वाटतंय हे बघून प्रियकर तिचा भ्रम दूर करण्याकरता तिला तिच्या सुंदर, लोभस, मोहक व्यक्तिमत्वाची जाणीव करून देतोय. जशी ती त्याच्या उत्कट प्रेमाने भारावून गेली आहे त्याचप्रमाणे त्याचंही हृदय तिच्या समर्पित प्रेमाच्या अधीन झालंय. त्याच्या मनात तिचे विचार मोरासारखे थुईथुई नाचत असताना आणि तिचेच विचार श्वासागणिक गात असतानाही ती त्याला पहाटेच्या लालीप्रमाणे पवित्र वाटते. हे सांगून तो तिला पुन्हा पटवून देतोय की केवळ तीच आता त्याच्या जीवनाचे सार्थक आहे, तीच त्याच्या आयुष्याची संजीवनी आहे.
वाह! काय ते उत्कट प्रेम आहे. भलेही त्यांनी एकमेकांना दिलेल्या उपमा निव्वळ अतिशयोक्तीपूर्ण असतील, पण प्रेमात आकंठ बुडाल्यावर मनाची काय स्थिती होते ती प्रत्येकाने केव्हा ना केव्हा तरी अनुभवली असणारच! या गाण्यातून नायक-नायिकेची तीच स्थिती दिसून येतेय.
असं एखादं गाणं आपण ऐकतो... नव्हे असं एखादं गाणं अवचित आपल्या पुढ्यात उभं ठाकतं, त्यातही नेमकं एखाद्या हळव्या वळणावर गाठतं तेव्हा ते सगळं उसळून वर येतं... त्या शब्दात आपल्याच भावना गुंफत जातो आपण आणि ते मनोमन आपल्या प्रणय देवतेला अर्पणही होऊन जातं!
वर्गीकरण
व्वा!
In reply to व्वा! by प्रास
+१
छान वाटले.
गाण्याच्या सुरुवातीलाच अंगावर
१००% सत्य आहे हे.
ह्म्म्म
In reply to ह्म्म्म by रामपुरी
राग एकच आहे!
In reply to राग एकच आहे! by बहुगुणी
धन्यवाद
In reply to धन्यवाद by रामपुरी
एका छान गाण्याची अतिशय छान
In reply to ह्म्म्म by रामपुरी
माझ्यामते
In reply to ह्म्म्म by रामपुरी
अतिशय सुरेख गाणं.
व्वा व्वा..छानच हो
खूप सुंदर लिहिलं आहेस
प्रत्येकाचं भावविश्व स्थलकाला
फार मस्त लिहीलं आहेस स्मिता.
सुरेख लेख
अतिशय सुंदर गाणे. कधी ऐकले
सुंदर
धन्यवाद
मस्त
पॉशच
In reply to पॉशच by परिकथेतील राजकुमार
आता लेखणी पुन्हा थांबवू नका.
In reply to आता लेखणी पुन्हा थांबवू नका. by गणपा
+२
In reply to +२ by बिपिन कार्यकर्ते
+३ असच म्हणते.
In reply to +३ असच म्हणते. by प्रीत-मोहर
+४
In reply to +४ by प्यारे१
+५
व्वा..
असाच झपाटलेला अनुभव लताचे
मस्त
स्मिता जबरदस्त पहिल्यांदाच
अतिशय सुंदर अनुभव स्मिता.!
छान
In reply to छान by तिमा
हे का?
In reply to हे का? by स्मिता.
हो
In reply to छान by तिमा
लतादिदी- मदन मोहन
In reply to लतादिदी- मदन मोहन by चिंतामणी
धन्यवाद!
In reply to लतादिदी- मदन मोहन by चिंतामणी
अजुन काही अगर मुझसे मोहब्बत
In reply to अजुन काही अगर मुझसे मोहब्बत by मराठी_माणूस
आणखी काही..
स्मिता, काय सुरेख लिहिले आहे!
छानच ओळख
अतिशय सुंदर गाणं आहे स्मिता
व्वा क्या बात है !
@ स्मिता.,
भरत व्यास आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे अजून एक तितकेच छान गाण
अजुन एक लक्षात राहिलेले गीत
+ १ . ज्योतीकलश छलके . -
गीत : राह पे रहते है...
यांचा उल्लेख राहुन गेला
या गाण्याने भावविभोर केले. अगदी प्रेमातच पडलो.