Skip to main content

सुधारस

लेखक नूतन यांनी मंगळवार, 30/01/2018 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
सुधारस हे पक्वान्न बहुसंख्य मराठी घरात ऐतिहासिक किंवा आठवणींच्या कोषात जाऊन पडलं असलं तरी आमच्याकडील जेवणाच्या ताटात मात्र आजही सुधारस आपलं स्थान टिकवून आहे. याचं मुख्य कारण म्हणजे यासाठी लागणार्‍या सामग्रीची सहज उपलब्धता, कमीत कमी लागणारा वेळ आणि कौशल्य ,ही त्रिसूत्री. तर मग करुया की सुधारस लगेचच! आधी साहित्याची जमवाजमव करू. ३ मोठ्या लिंबांचा रस किंवा १ वाटी रस साखर रसाच्या तिप्पट म्हणजे ३ वाट्या भरून पाणी दीड वाटी ८-१० केशरकाड्या थोड्या पाण्यात भिजत घालणे बदाम ,पिस्ते काप,बेदाणे,वेलची दाणे/पूड, स्वाद आणि सजावटीसाठी ,आवडीनुसार s2 आता कृती. १.एका पसरट भांड्यात साखर घ्या, त्यात पाणी घाला(साखर भिजली पाहिजे) २.मध्यम आचेवर पाक करायला ठेवा. सतत ढवळत रहा. ३.पारंपारीक भाषेत गोळीबंद पाक हवा.पण बरेचदा गोळीबंद पाक करण्याच्या नादात पुन्हा साखर व्हायला लागते. (अनुभवाचे बोल). म्हणून साधारण ५ ते ७ मिनिटांनी आच बंद करा. ४.पाक जरा गार होवू दे. मग पाकाचा दाटपणा तपासा.(कारण गार झाल्यावर पाक थोडा दाट होतो) ५.साधारण मधाइतपत झाला की पुरे. पातळ वाटल्यास पुन्हा १-२ मि. उकळावा. ६.पाक निवला की त्यात लिम्बुरस,केशरपाणी(हे पाक करतान घातलं तरी चालेल),बदाम,पिस्ते,वेलची घालून नीट ढवळा. ७.सुधारस तयार आहे पण खायला मात्र दुसर्‍या दिवशी घ्यायचा.कारण सारे घटक समरस झाल्यावरच त्याचा आंबट गोड स्वाद चाखता येतो. s1 तर मग मंडळी,आता सुधारसाची फक्त आठवण न काढता मनात आलं की करा आणि खा! जाता जाता अजून एक युक्ती! यात थंडगार पाणी घातलं की झटपट लिंबू सरबत तय्यार!

वाचने 10794
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

फोटो टाकले आहेत पण काहीतरी तांत्रीक घोटाळा झाला असावा .आज पुन्हा टाकून बघते

In reply to by नूतन

फोटो दिसत नाहीत. बहुतेक, गुगलफोटोंमध्ये तुम्ही फोटोंना "पब्लिक अ‍ॅक्सेस" दिलेला नाही.

बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या

जागु +१ तयार सुधारसाचा फोटो सुरेख !

सर्वांच्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार

सुधारस म्हणजे राजस पदार्थ आहे. सणाला किंवा सहज म्हणूनही घरी नेहमी होतो. चांदीच्या वाटीत सुधारस, त्यावर लोणकढं तुप. सण असेल तर गरम पु-या, नसेल तर तव्यावरून थेट पानात पडलेल्या पोळ्या. आम्ही केळं घालतो सुधारसात. कंसिस्टंसी मधापेक्षा थोडी पातळ. लिंबाचे प्रमाणही थोडे कमी.

हो. सुधारसात केळे अगदी मस्ट आहे. देशस्थांच्या लग्नाच्या आदल्या रात्री सीमांतपूजेच्या भोजनात हमखास करतात.

मस्त, साधी सोपी पाककृती.

मस्तच