Skip to main content

लिव इन आणि समाजाची मानसिकता 

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 12/01/2018 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
"अग ते माझ्या शेजारच्या flatमध्ये राहायला आलेलं जोडपं आहे ना त्याचं लग्न नाही झालेलं." "काय सांगतेस काय? तुला बऱ्या असल्या बातम्या मिळतात." "अग, काल मी घरी येत असताना ती भेटली जिन्यात. तर विचारल तुझा नवरा काय करतो? म्हणाली तो माझा नवरा नाही काही. आम्ही अजून लग्न नाही केलेलं असंच राहातो. कमाल आहे न? काय बोलणार यावर? मी आपली गपचूप घरात शिरले माझ्या." 'काय सांगतेस? स्पष्ट सांगितलं तिने?" दोन मैत्रिणी बागेत आपापल्या मुलांना खेळायला सोडून गप्पा मारत बसल्या होत्या. मी नेमकी त्यांच्या बाजूच्याच बाकावर बसले होते त्यामुळे त्यांचा संवाद एकू आला आणि मनात विचार आला.. हे लिव इन नातं इतक का बर अस्वीकारार्ह्य असावं अजूनही? या दोघींची मुलं लहान आहेत म्हणजे या देखील जेमतेम तिशीच्या आतल्या असणार. ती नवीन आलेली शेजारीण देखील साधारण याच वयातली असू शकते. मग तरीही ती अशी लिव इन मध्ये का राहात असावी असा विचार या का नाही करत. थोडे नकारार्थी विचार का आहेत यांचे?  समजा एक मुलगा आणि एक मुलगी यांनी लग्न न करता रहायचे ठरवले तर त्या बाबतीत समाजाची नकारार्थी भावना का असावी? त्या मुलांच्या पालकांचे मत खूपच महत्वाचे असणार. पण मग तो त्या दोन कुटुंबांचा प्रश्न ठरतो. अनेक सोसायटीजमध्ये लिव इन नातं असणाऱ्या जोडप्याला घर भाड्याने द्यायला कोणी तयार नसते. अस का असावं? जर ते जोडपं सभ्यता पूर्वक रहात असेल तर इतरांना त्यात हरकत घेण्यासारखं काय असाव? माझ्या एका मैत्रिणीने प्रेम केलं आणि वर्षभरातच लग्न केलं. तीन वर्ष झाली असतील-नसतील आणि तिचं आणि तिच्या नवऱ्याच पटेनास झालं. अगदीच सतत आणि टोकाची भांडण व्हायला लागली तेव्हा तिने घटस्फोट घेण्याचं ठरवलं. तशी ती चांगल्या कंपनीमध्ये काम करत होती आणि भरपूर पगार देखील होता. पण खुद्द तिच्या आई-वडिलांनी सांगितलं अग अस एकदम घटस्फोट नको घेउस. सुधरेल तो हळूहळू. लग्न केलं आहेस न? मग थोडं सहन करायला शिक. तिच्या निर्णयात तिला फक्त मानसिक बळ हवं होत. पण तिच्या बाजूने तेव्हा कोणीच उभं राहिलं नाही. आज तिच्या लग्नाला चौदा वर्ष झाली आहेत. दहा वर्षाचा मुलगा आहे. ती आणि नवरा एकमेकांशी अजिबात बोलत नाहीत. मात्र केवळ लग्न केलं आहे म्हणून एका छताखाली रहातात. ती अनेकदा म्हणते की जर त्याच्या बरोबर लग्नाअगोदर राहात असते तर कदाचित लग्नच नसत केलं अशा माणसाबरोबर.  एक अजून घटना अगदी चांगली माहितीतलीच. दोघ मुलगा-मुलगी एकमेकांच्या प्रेमात होते. मुलगी अजून शिकत होती त्यामुळे त्यांना तितक्यात लग्न करायचं नव्हत. मात्र कुटुंबाच्या आग्रहामुळे दोघांनी लग्न केल. शिक्षण चालू असेपर्यंत मुलीने पुढे काय करायचं याचा फारसा विचार केला नव्हता. कॉलेजच्या शेवटच्या वर्षी तिने एका जाहिरात कंपनीत इंटरव्ह्यू देला आणि तिला खूप चांगली नोकरी मिळाली. तिचा performance इतका चांगला होता की तिला तिच्या कंपनीने वरची पोस्ट दिली. मात्र त्यासाठी तिला दुसऱ्या शहरात जावं लागणार होत. मात्र सासरच्यांनी नाही म्हंटल त्यामुळे तिला ती ऑफर घेता आली नाही.  अशा काही घटना पहिल्या किंवा ऐकल्या की वाटत की लग्नाअगोदर एकमेकांना समजून घेण कितीतरी महत्वाच असत. दोघांचे स्वभाव, आवडी-निवडी, पुढील करीयर प्लान्स सगळ समजून घेण आवश्यक असत. केवळ 'आवडला/आवडली' म्हणून लग्न करून टाकलं; हे अलीकडच्या काळात थोडं अवघड आहे.  अर्थात इतकं प्रक्टीकल असावं का? हा देखील चर्चेचा विषय होऊ शकतो. लिव इन मधील मुला-मुलीच्या पालकांचा याबद्दल विचार/मत देखील महत्वाच आहे. मुख्य म्हणजे लिव इन म्हणजे 'लग्न न करता एकत्र राहाण'. मग जर पुढे पटलं नाही तर मग दुसरा पार्टनर का? आणि अस पटेपर्यंत किती लिव इन नाती? असे अनेक प्रश्न उभे राहू शकतात. अलीकडे pre-marrage councelling देखील असतच. पण  'अलीकडची पिढी' अस म्हंटल तरी  या मुलांना देखील मन-भावना असतातच न. त्यामुळे जर पालकांनी थोडा विश्वास दाखवला तर ही मुलं सतत धरसोड वृत्तीने नक्कीच वागणार नाहीत. त्यामुळे लिव इन नात्याकडे नकारात्मक दृष्टीकोनातून पाहू नये अस मला वाटत.
लेखनप्रकार

वाचने 26285
प्रतिक्रिया 72

प्रतिक्रिया

मी पाहिलेल्या गोष्टी -- लिव्ह इन हि बहुतांश वेळेस एक तात्पुरती सोय म्हणून दिसते. सुरुवातीला आपण मुक्त/ आधुनिक आहोत हे लोकांना सांगायला किंवा दाखवायला जोडपी लिव्ह इन मध्ये जातात. काही जण थ्रिल म्हणून पण लिव्ह इन मध्ये जातात. किंवा करियर मध्ये व्यस्त असल्यामुळे लग्नाच्या जबाबदारीत पडण्याची भीती नको वाटते म्हणूनहि काही लिव्ह इन मध्ये जातात. बरेच पुरुष आणि काही स्त्रिया बांधिलकी( कमिटमेन्ट) नको म्हणून सुरुवातीला लग्नाला पर्याय म्हणून याकडे पाहतात आणि काही काळाने काही पुरुष आणि बऱ्याचशा स्त्रिया बांधिलकी हवी म्हणून अपेक्षा करू लागतात. काही वर्षे गेल्यावर एक तर ते विभक्त होतात किंवा लग्न करतात. ज्यांचे पटत नाही किंवा करियरच्या रेट्यात जमत नाही किंवा दोघांतील एकाला जरी बांधिलकी नको असेल तरी ते विभक्त होतात. आणि ज्यांना एकमेकांबद्दल ओढ आणि प्रेम वाटतं अशी जोडपी लग्न करतात. मी आतापर्यंत पाहिलेल्या/ऐकलेल्या लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या जोडप्यानी मुले होऊ दिलेली नाहीत. किंवा जेंव्हा आता आपण जबाबदारीला तयार झालो अशा जोडप्यांनी लग्न करणे पसंत केले.( काही लोकांचे लिव्ह इन मध्ये राहण्याचे थ्रिल संपले किंवा त्यांना मिळणारा "टी आर पी" कमी झाला असावा किंवा लिव्ह इन मध्ये राहताना येणाऱ्या कायदेशीर अडचणी कटकटीचा वाटू लागल्या असाव्या). थोडक्यात लिव्ह इन या क्षणाला तरी एक तात्पुरती सोय आहे असेच मला वाटते आणि बहुसंख्य जोडपी आयुष्यभर एकत्र राहण्यासाठी/ मुलांच्या भविष्यासाठी लग्नाद्वारे कायद्याचा/समाजाचा आधार घेताना दिसतात. एकंदर लिव्ह इन चा बाऊ करण्याची गरज नाही किंवा त्याला जास्ती भाव देण्याचीही गरज नाही.