गतिरोधक एक चिंतनिका
लेखनविषय (Tags)
गतिरोधकांचा शोध हा एक क्रांतिकारी शोध मानला जावा हा अमुचा हट्ट आहे. क्रांतीची फळे ही कायम गोडच असतात असे नव्हे परंतु एखाद्या ठिकाणी क्रांतीची ठिणगी पेटून उठत असेल किंवा क्रांतीज्योतीचे रूपांतर क्रांती वणव्यात होत असेल तर मात्र त्या क्रांतीची गळचेपी करणे साठी प्रतिक्रांती(च) घडावी लागते हा अमुचा(च) अनुभव आहे.
भार्येच्या आर्जवपूर्ण (धमकीयुक्त) संदेशास कानाडोळा करून दूरचित्रवाणी वरील चेंडूच्या लाथाळ्या पाहण्यास प्राधान्य देणे ही क्रांतीची ठिणगी आणि ततपश्चात जे घडते ती प्रतिक्रांती.
अर्थात हा वरील अनुभव अनेकांनी अनुभवला असेलच. आणि वरील क्रांतीची फळे जर कोणास (चुकूनही) गोड लागली असतील तर त्या व्यक्तीचे विश्वातील असंख्य चाहतेगण त्याची हजार मीटर उंचीची प्रतिमा अरबी समुद्रात राहू द्या सरळ पॅसिफिक समुद्रात उभी करतील याची आम्हास खात्री आहे.
असो... तर विषय आहे गतिरोधकांच्या शोधाचा.
डोंगरावरून घरंगळत जाणाऱ्या दगडावरून ज्या कोण्या आदिमानवाच्या मेंदूच्या सुरकुतीतून चाकाचा विचार बुडबुडला, त्याच क्रांतिकारकांच्या भावी पिढीतून आपल्या प्रजाजनांच्या अंगावर रथांची चाके घालणाऱ्या राजव्यवस्थेची पुढची अवस्था - सध्या रस्त्यांवर फिरणारी बहुसंख्य वाहने घेऊन पादचाऱ्यांचा जीव अस्वस्थ करणारे आधुनिक क्रांतिकारक होय.
आता या क्रांतिकारकांच्या क्रांतीपूर्ण वाहनचालना बद्दल जितके कौतुकास्पद लिहावे तितके शब्द आणि कागदांचे बहुमजली पानांचे ढिगही कमी पडतील. आता या क्रांतीसुर्यांस अटकाव करावयाचा तर त्यास योजले जाणारे बहुपेडी कासरे देखील क्रांतीपूर्णच असावयास हवेत की नाही? म्हणूनच आम्हास वाटते ते गैर नाही. गतिरोधक हा एक क्रांतिकारीच शोध आहे.
आता या गतिरोधकांचे असंख्य प्रकार आणि वैशिष्ट्ये. मुदलात वाहनांची गती कमी करणे हा त्या गतिरोधकांचा मूळ हेतू नाहीच. त्यांची योजना म्हणजे "नाम कूछ और" आणि "काम कुछ और" असेच आहे. वाहनांचा बेफाम आणि बेफाटपणा कमी करणे बरोबरच आवाक्यापलीकडे असणाऱ्या क्रांतिकारकांस हळुवारपणे रद्दबादल करणे तसेच दुचाकी वा जास्त चाकांच्या त्यांच्या रथांचे सर्व अवयव खिळखिळे करणे (हाच) मूळ हेतू आहे याबद्दल आमची ठाम खात्री आहे.
गतिरोधकांचा अभ्यास करावयास गेले असता त्या गतीरोधकांचे व गतिरोधक तयार करण्याच्या वैविध्यपूर्ण बौध्दीक चढउतारांचे कौतुक करावे तितुके थोडे. काही गतिरोधक हे अगदी पहाडासारखे ठाम रस्त्यांत उभे असतात. तुम्ही अगदी कोणतेही वाहन त्यावरून न्या, ते उधळण्याचे काम गतिरोधक अगदी प्रामाणिकपणे पार पाडतात. काही असतात केवळ उंचवटे - त्यास उतार द्यावयचे ठेकेदार विसरून गेलेला असतो. काही रस्त्याच्या मध्यावर उंच आणि कडेला पसरट तर काही निमुळते, काही नागमोडी आणि काही अगदीच जमिनीलगत. हे सर्वच्या सर्व ठेकेदारांप्रति आणि त्यांच्या अंगावर पडलेल्या कामांप्रति अत्यंत प्रामाणिक असतात. ते येणाऱ्या जाणाऱ्या कोणत्याही वाहनास आपपर भाव न बाळगता समान न्याय देत असतात.
आमच्या एका वैद्यक क्षेत्र गाजवणाऱ्या मित्राकडून मिळालेल्या माहिती अन्वये तुम्ही गतिरोधकावरून गाडी भरधाव नेली तर तुमच्या पाठीच्या मणक्यास दुखापत होते आणि हळुवार नेलीत तर कमरेचा मणका दुखावला जातो. एकूणच काय तर हर एक क्रांतिकारक हळूहळू शारीरिक दृष्ट्या नेस्तनाबूत करणे हा या मागचा डाव. बरे वाहन त्या रोधकावरून गेले असता त्या वाहनाचा देखील एखादा सांधा नवा करावा लागतो. या सर्व गोष्टींमुळे वाहन खरेदी विक्री ही अत्यंत जोमाने होते आणि राष्ट्रातील असंख्य बेरोजगारांस रोजगारसंधी उपलब्ध होतात. ईतुका खोलवर अर्थ या गतिरोधकांच्या योजनेबद्दल आहे. वरवर पाहता गतिरोधक योजना ही त्रासदायक वाटत असली तरी राष्ट्राच्या भल्याकरिता, नवराष्ट्रवादाच्या उदयाकरिता आणि नवीन पिढीच्या निर्माणाकरिता गतिरोधक अत्यावश्यकच आहे अशी आमची खात्री पटत चालली आहे.
आपल्याकडील रस्त्यांवर मीटरभर अंतरावर किमान दोन खड्डे असतात, (सरकारदरबारी त्या रस्त्याइतका गुळगुळीत रस्ता उभ्या अमेरिकेत नसतो किंवा सरकारी दफ्तरात खड्डे मोजवयास जाणारे कर्मचारी हे त्यांच्या दुसऱ्या इयत्तेतच अंकगणिताची पुस्तके फाडणारी असल्याने आकडे त्यांच्यापासून इतुके दूर पळतात की त्यांनी मोजलेले खड्डे हे सामान्य नागरिकाने मोजलेल्या खड्ड्यांच्या सहस्रअंश देखील येत नाहीत. रस्त्याच्या मध्यभागी तळे साचून जोवर त्यात बोटिंग सुरू होत नाही तोवर त्यास खड्डा म्हणू नये अशी सक्त तंबी सर्व कनिष्ठ कर्मचाऱ्यास सर्व श्रेष्ठ कर्मचाऱ्यांकडून दिलेली असावी) इतके खड्डे असणाऱ्या रस्त्यांवर देखील गतिरोधके कशासाठी? असे कोणीही विचारू शकेल. परंतु क्रांतीचे महत्व सुरुवातीस केवळ मूठभरांस कळते आणि आपण त्या मुठभरांत नाही हे त्या अज्ञ प्रश्नकर्त्याने समजून घ्यावे. तोवर त्यांस विरोध करणेसाठी आपले वाहन व शरीर दोन्ही गतिरोधकांवरून नेणे बंद करू नये. काळजी नसावी, कोणीतरी एक नक्की संपेल, एक तर प्रश्नकर्ता किंवा गतिरोधक......!
प्रतिक्रिया
क्रांतीशत्रू मशीन
आवडला
सरसकट गतिरोधकांना विरोध करणे
+१
:-D
गतिरोधक समोर दिसत असताना
गतीज ऊर्जेचे स्थितीज ऊर्जेत
लेख आवडला.. (पुण्याची ओळख आता