हिवाळी भटकंती: चंदेरी ( Chanderi )
मुंबई - पुणे लोहमार्गावरून कल्याणहून कर्जतकडे जाताना उजवीकडे एक डोंगररांग दिसते, ती म्हणजे बदलापूर डोंगररांग .नाखिंड, चंदेरी, म्हैसमाळ, नवरी, बोयी, पेब , माथेरान ही शिखरे याच डोंगररांगेत येतात. या डोंगररांगेत आपला भलाथोरला गोपुरासारखा दिसणारा माथा उंचावलेला एक प्रचंड सुळका दिसतो, त्या किल्ल्याचे नाव आहे "चंदेरी".
ईतिहासात डोकावल्यास मे १६५६ मध्ये शिवरायांनी कल्याण ,भिवंडी ,रायरी पर्यंतचा सारा मुलूख घेतला, तेव्हा त्यात हा गडही मराठ्यांच्या ताब्यात आला असावा. अल्प विस्तार,पाण्याची कमी साठवणूक, बांधकामाचा अभाव, मर्यादित लोकांची मुक्कामाची सोय, अतिशय अवघड वाट हे सारे पाहून हा किल्ला नसून, एक लष्करी चौकी असावी असेच वाटते.
काही जणांच्या मते ७ ऑक्टोबर १९५७ रोजी चंदेरी किल्ल्याच्या सुळक्यावर संघटित प्रस्तरारोहणाचा प्रारंभ झाला.
चंदेरी परिसराचा नकाशा
या गडावर जायचे झाले तर मुंबई - कर्जत लोहमार्गावरील ‘वांगणी’ या रेल्वे स्थानकावर उतरावे. तेथून लोहमार्गाच्या कडेकडेने (बदलापूरच्या दिशेस) जाणार्या वाटेने गोरेगाव गाठावे. मुख्य स्त्यावरून डावीकडे जाणारी वाट चिंचोली या पायथ्याच्या गावी घेऊन जाते. बदलापूर स्थानकात उतरून चिंचोलीस साधारण पाऊण तासाची पायपीट करूनही पोहचता येते. (वांगणी स्थानकातून गोरेगाव पर्यंत जाण्यास भाड्याची वहानेही मिळतात.)
सह्याद्रीला संमातर असणार्या या हाजीमलंग माथेरान रांगेतील किल्ले पाहून झाले होते. मुंबईला जाताना चंदेरीचा माथा सारखा खुणावायचा.
मात्र एकदा जुलैच्या पावसात जाण्याचा प्रयत्न केला , पण दाट ढगांचा बुरखा बघून चंदेरीला जाण्याची हे वेळ नव्हे हे समजले. त्यानंतर ऑक्टोबरमधे केलेला प्रयत्न वाट न सापडल्याने सोडून द्यावा लागला. अखेरीस एक दिवस विकास या मित्राचा फोन आला आणि सुमो मधून रात्री आमचे टोळके चंदेरीकडे निघाले. कर्जतवरून बदलापुर रोडला लागलो. मधेच लोकल किंवा रेल्वे उजवीकडून जाताना दिसत होत्या. वांगणी स्टेशन मागे पडले आणि गोरेगाव फाट्याकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी माझ्याकडे आली, कारण याआधी फक्त मीच काय तो या परिसरात आलेलो होतो. हा फाटा ओळखण्याची मुख्य खुण, म्हणजे उजवीकडे असलेले 'हॉटेल चंदेरी'. ईथून डावीकडे वळालो आणि साधरण दोन कि.मी.वर असलेल्या चिंचवली गावात जाउन पोहचलो. अंधार असल्याने गाडीतच झोप काढली. या रस्त्याला अनेक श्रीमंत लोकांनी फार्महाउस बांधलेली आहेत. जर स्वताची गाडी नसेल गोरेगाव फाट्याला उतरुन चिंचवली गाव गाठणे किंवा खाजगी सहा आसनी रिक्षाने चिंचवली पर्यंत येणे हे दोन पर्याय आहेत.
पहाट झाली, थोडे पोटात ढकलले आणि अंधारातच चाचपडत चंदेरीच्या दिशेने निघालो. चिंचोली गावास उजवीकडे ठेऊन वर जाणार्या दोन वाटा आहेत. एका लहानश्या टेकाडाच्या दोन बाजूंनी ह्या वाटा जातात. टेकडीच्या उजवीकडून जाणारी वाट दगडधोंड्यांमधून जाणारी खडकाळ आहे. तर टेकडीच्या डावीकडून जाणारी वाट घसरडया लाल मातीवरील झाडांझुडपांतून जाणारी आहे. ह्या दोन्हीही वाटा मध्यभागी असणार्या एका लहानशा पठारावर घेऊन जातात.
आम्ही उजवी वाट पकडून पठारावर आलो. विस्तृत असे हे गवताळ पठार कोवळ्या उन्हात न्हाउन निघाले.
गंमत या सर्व चालीत डोक्यावरून सतत उडणार्या विमानांची आपणास साथ असते. चेन्नई, सिंगापुर, ईंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया या आग्नेय दिशेने मुंबईकडे येणारी विमाने दिसत असतात. एकदा या विमानाच्या खिडकीतून हि रांग पहायची आहे.
लांबवर दिसणारा चंदेरी जवळ आला.
उजव्या डोंगरावर म्हैसमाळचा सुळका सोबत करत होता.
अचानक मला हा मेलेला किडा दिसला. सकाळच्या कोवळ्या उन्हात त्याचा निळसर काळा रंग विलक्षण चकाकत होता.
वाटेत काही रानफुलेहि दिसत होती.
लांबवर दिसणारे चिंचवली गाव
अखेरीस चंदेरी आणी म्हैसमाळच्या डोंगरामधून वहाणार्या ओढ्याच्या पात्रात आलो. पावसाळ्यात यातून तुफान पाणी वहात असते आणी पुढे एक छोटा धबधबा देखील आहे. आम्ही दिवाळीनंतर लगेच आलो असलो तरी अदयाप ओढ्यात पाणी वहात होते.
ओढ्यातूनच आम्ही चढाई सुरू केली आणि चिंचवली सोडल्यापासून साधारण तासाभरात चंदेरी आणि म्हैसमाळच्या इंग्रजी व्हि ( V ) आकाराच्या खिंडीत जाउन बसलो.
पलीकडच्या बाजुचे प्रबळगड आणी माथेरानच्या मधील खोरे उलगडून सामोरे आले. समोर गाढेश्वर तलाव दिसत होता. या बाजुला पायथ्याशी तामसई नावाचे खेडे आहे. इथूनही चंदेरीवर येता येते. तामसईला जायचे झाल्यास पनवेलवरून बसची सोय आहे. याच खिंडीत तामसईची वाट वर आली होती.
आता उत्तरेची वाट म्हैसमाळ सुळक्याकडे तर दक्षिणेची वाट चंदेरी गडाकडे जात होती. बरोबर आणलेला दिवाळीचा फराळ संपवून आम्ही चंदेरीकडे कुच केले. काहीशी खडी असणारी हि वाट चांगलाच दम काढते.
अखेरीस चंदेरीच्या सुळक्याच्या अलिकडे असणार्या थोडक्या सपाटीपाशी पोहचलो. इथे दगडी पायर्या आहेत आणि थोडीफार बांधीव तटबंदी आहे. चंदेरीच्या किल्लेपणाची हिच काय ती खुण.
सुळक्याचे रुप मोठे भेदक दिसत होते. सुळक्याच्या उजव्या बाजुने वाट आहे, त्याने चालत गुहेपर्यंत येउन पोहचलो.
सॅक ठेवून थोडे आडवे झालो. इथेपर्यंत यायला साधारण दिड ते दोन तास पुरतात.
या गुहेत शिवलिंग आहे , मात्र समोरचा नंदी गायब आहे.
सध्या ईथे कोणीतरी शिवाजी महाराजांचा सिंहासनारुढ पुतळा बसवला आहे.
गुहेच्या एका कोपर्यात पाण्याचे टाके आहे , मात्र पाणी खराब होते. चंदेरीवर मुक्काम करावयाचा झाल्यास पश्चिमाभिमुख अशी हि गुहा हा एकमेव निवारा आहे. ८ ते १० जणांच्या मुक्कामासाठी गुहा उत्तम आहे.
या गुहेच्या आधी एक पाण्याचे टाके आहे त्यात पिण्यायोग्य पाणी आहे. गुहेच्या थोडे पुढे सुळक्याच्या पायथ्याशी देखील एक टाके आहे.
या गुहेतून थेट समोर प्रबळगड व कलावंतीण सुळका दिसतात.
आता बेत होता माथ्यावर जाण्याचा. कातळमाथ्याचा विस्तार फक्त लांबी पुरताच आहे. रुंदी जवळजवळ नाहीच. दरड कोसळल्यामुळे सुळक्याचा माथा गाठणे फारच कठीण झाले आहे. तरीही प्रस्तरारोहण कलेची आवड असणार्या गिर्यारोहकांचे हा सुळका खास आकर्षण आहे.
यासाठी गुहेतून बाहेर पडून दक्षिणेकडे , कातळकडा डावीकडे ठेवून निघालो. क्लांईब असल्याने विकासने रोप वगैरे साधनसामुग्री आणलेली होती. मात्र थोडे अंतर कापल्यानंतर वाट अक्षरशः सत्तर अंशाच्या उभ्या उतारावर यु आकारात खाली उतरून पुन्हा वर चढते.
उजव्या बाजुला खोल दिसणारी दरी थरकाप उडवत असते तर पायखालचे बॉलबेरींग सारखे सटकणारे छोटे खडे गाळण उडवतात. कच्चा दिलाचे भिडू असतील तर इथे रोप बांधलेला चांगला. त्यासाठी डाव्या बाजुच्या खडकात एक पिटॉन मारलेला आहे. कसाबसा हा पॅच मागे टाकून जेमतेम पाउलभर रुंद वाटेने चंदेरीच्या दक्षिण टोकाशी आलो. इथे एक पाण्याचे टाके आहे पण कोरडे.
आता खरी परिक्षा होती. कारण डाव्या बाजुला आ वासलेली दरी भिती दाखवत होती आणि जेमतेम पाउल रोवता येईल अशी खडी वाट चढायची होती. थोड्या पायर्या आहेत त्यावर चढून वर पोहचले कि खिंड येते, इथल्या घसार्यावरुन मात्र जपूनच वर चढावे लागते. विकास रोप अँकर करत पुढे गेला आणी कॅरेबिनर बांधून मागून आम्ही चढलो.वास्तविक हि चढण तितकी अवघड नाही, पण दरीच्या थेट एक्पोजरमुळे भिती वाटते. सुर्य वरून आग ओकत होता, दगडाला हात लावावा तर चटके बसत होते, पण चढणे भाग होते. अखेरीस अत्यंत अरुंद माथ्यावर पोहचलो आणि या श्रमाचे सार्थक झाले ते भन्नाट दॄष्याने.
माथेरानचा डोंगर आणि डाव्या कोपर्यात पेब उर्फ विकटगड जवळचा डोंगर नाखिंद
जवळचा सुळका म्हैसमाळ, डावीकडे मागे हाजी मलंग उर्फ मलंगगड, तर उजवीकडचा डोंगर बदलापुरजवळचा टावली गुहांचा डोंगर
दक्षिणेला राजमाची, पेठचा किल्ला उर्फ कोथळीगड, माथेरानचा डोंगर, पेबचा किल्ला, नाखिंद, पुर्वेला भिमाशंकरचे नागफणी टोक, गोरखगड, मच्छिंद्रगडाचे जुळे सुळके, सिध्दगड, तर उत्तरेला माहुली, हाजीमंलग, बदलापुरचा सुळक्याचा डोंगर आणि अगदी जवळ म्हैसमाळ, पश्चिमेला प्रबळगड, कलावंतिणीचा सुळका, इर्शाळगड आणी कर्नाळा दिसत होते.
माथ्यावर उजव्या बाजुला एक पाण्याचे टाके आहे.
माथ्याच्या उत्तर टोकाला बदलापुरच्या अंजिक्य हायकर्सनी बसवलेला शिवाजी महाराजांचा सिंहासनाधीश पुतळा पाहून थक्क व्हायला झाले. जिथे आम्हाला येताना ईतका त्रास झाला होता, तिथे या शिवभक्तांनी किती जिध्दीने हे काम केले होते. त्यांच्या कार्याला मुजरा. उन्हाचे चटके बसायला लागले तसे माथ्यावरून उतरण्यास सुरवात केली. माथा दक्षिण-उत्तर आहे , त्यामुळे माथ्यावर जायचे झाल्यास सकाळी लवकर किंवा संध्याकाळी जावे. अन्यथा तापलेल्या कातळावर चटके बसून चढता-उतरताना खुप त्रास होतो. माथा समुद्रसपाटीपासून २३०० फुट उंचावर आहे.
असह्य चटके सहन करून आणि घसरड्या वाटेचे दिव्य पार करून गुहेत आलो आणि अक्षरशः थंड्गार जमिनीवर आडवे झालो. पंधरा मिनीटे कोणीही एकमेकांशी चकार शब्दही बोलेले नाही. शेवटी एकेकाला कंठ फुटला आणि राहिलेले खाद्यपदार्थ संपवून आम्ही उतरण्यास सुरवात केली. एरवी कोणत्याही किल्ल्यवरून उतरणे सोपे जाते. मात्र थेट सत्तर अंशाचे उतार आणि दोन्ही बाजूला आ वासलेली दरी यामुळे जपुनच उतरून खिंडीत आलो.
खालच्या पठारावर पोहचेपर्यंत सुर्य कलला होता. सकाळी पठार पार करताना फार त्रास झाला नव्हता, मात्र आता तीन कि,मी.ची ती चाल चालणे चांगलेच जीवावर आले. अखेरीस गाडीपाशी पोहचलो तोपर्यंत चांगलाच अंधार झाला. थकलेले शरीर सीट्वर टाकून आणि सॅक मागे फेकून सगळेच जण डोळे मिटून शांतपणे झोपलो. ईतके दिवस हुलकावणी देणार्या चंदेरीचा माथा सर केल्याचे समाधान मात्र होते.
तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.
ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची
संदर्भ ग्रंथः-
१ ) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !!- प्र.के. घाणेकर
२ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट
३ ) रायगड जिल्हा गॅझेटियर
4 ) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
वाचने
11351
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
जबरा
+1
जबरदस्त हो मालक _/\_
जबरदस्त
जबरदस्त +१००
In reply to जबरदस्त +१०० by सिरुसेरि
सहमत!
अवघड आहे हे कळले होते म्हणूनच
घराच्या अगदी मागे दिसतो हा,
जबरदस्त
भन्नाट ! ट्रेक, फोटो आणि
भन्नाट
In reply to भन्नाट by गामा पैलवान
स्थानिक लोक चांदेरी म्हणतात.
कोकणातले किल्ले दमटपणा आणि
In reply to कोकणातले किल्ले दमटपणा आणि by प्रचेतस
केवळ नशिबानेच मला चंदेरीवर
मस्तच....
जबरदस्त
ईतके प्रतिसाद मिळतील असे वाटले नव्हते
जबरदस्त.
महाराष्ट्राचे बेअर ग्रिल्स
जाहिरात वाल्यांचा लाडका ..