पुणे ते लेह (भाग ४ - शाहपुरा ते जम्मू)

अभिजीत अवलिया's picture
अभिजीत अवलिया in भटकंती
3 Dec 2017 - 10:02 pm

पुणे ते लेह (भाग ३ - शामलजी ते शाहपुरा)

२७ ऑगस्ट
आज सकाळी ७:१५ ला चंदीगडला जाण्यास निघालो. तसे मध्यरात्री पण निघू शकलो असतो. कारण मध्यरात्रीच्या २:३० पासून मी जागाच होतो. अनोळखी ठिकाणी मला बऱ्याचदा नीट झोप लागतच नाही. यावर काही उपाय ?

जरी चंदीगड फक्त ४६० किमी असले तरी वाटेत आम्हाला पानिपतजवळ काला आम्ब ह्या ठिकाणी पानिपत युद्धाचे स्मारक बघायला जायचे होते. राष्ट्रीय महामार्ग ८ वरून प्रवास सुरु झाला. आज वातावरण फारच उदासवाणे वाटत होते. हवेत प्रचंड धूळ आणि धुके होते. ह्या महामार्गाचा जयपूर ते दिल्ली भाग तितकासा खास नाही. एंट्री आणि एक्झिट सिस्टीम एकदम फालतू. कुठूनही कसेही रस्ता ओलांडणारे लोक, मनसोक्त हुन्दडणाऱ्या गाई आणि बैल, उलट्या दिशेने येणारे मोठमोठे ट्रेलर सगळं आहे ह्या महामार्गावर. ह्या रस्त्यावर देखील प्रचंड संख्येने ट्रक. निमरानाजवळ एक ट्रेलर अचानक मधल्या लेन मधून उजवीकडच्या फास्ट लेन मध्ये घुसला. जर ब्रेक मारायला मला २ सेकंद उशीर झाला असता तर आमची केवळ लडाख न्हवे तर आयुष्यरूपी ट्रिपचं इथे संपुष्टात आली असती. गुजरात, राजस्थान, हरयाणा इथले ड्रायव्हिंग अत्यंत रॅश आणि 'आली लहर केला कहर' प्रकारचे वाटले. लेन बदलताना आपण इंडिकेटर देणे, ज्या लेन मध्ये आपल्याला जायचे आहे त्या लेन मधली सर्व वाहने निघून केली आणि दुसरे कोणतेही वाहन जवळपास नाही ह्याची खात्री पटल्यावरच त्या लेन मध्ये घुसतो. पण इथे असला प्रकार दिसला नाही. डायरेक्ट घुसवायची गाडी. बाकीचे जाईनात का तिकडे बोंबलत. दुचाकीवर तर किमान तीन मोठी माणसे असलीच पाहिजेत.

शेवटी एकदाचा हरयाणात पोचलो. तिथे एका हॉटेलमध्ये चहा पीत असताना बाबा राम रहीम प्रकरणामुळे सरकारने हरयाणामध्ये इंटरनेट सेवेवर तात्पुरती बंदी घातलेली आहे असे बातम्यांमध्ये सांगितले जात होते. आता काला आम्बला जावे का न जावे हा प्रश्न होता. कारण आपण काला आम्बला गेलो आणि काही कारणाने पानिपत मध्ये संचार बंदी वगैरे लागली तर अडकून पडायचो. त्यामुळे काला आम्बचा प्लॅन रद्द करून सरळ चंदीगड गाठावे आणि काला आम्बला परतीच्या प्रवासात जावे असे ठरवले.

माजरा गुरुदास आले. मुंबईपासून साथ देणारा NH ८ सोडून इथे NH ३५२ वर गेलो. रेवाडी ओलांडताच वाटेत एका ठिकाणी पोलिसांनी थांबवले. माझे ओळखपत्र तपासून त्यांच्याकडच्या वहीत नाव, गाव, कुठे जाणार त्याची नोंद केली. काश्मीरला जातोय असे ऐकताच 'इधर और उधर दोनो जगह टेन्शन है. सोच लिजिए एक बार फिर'. असे पोलीस म्हणाला. पण आता मागे फिरायचे नाही हा निश्चय पक्का होता. पुढे निघालो. झज्जर, रोहतक झपाट्याने मागे टाकले. रोहतक वरून पुढे पानिपत साठी NH ७०९ वरून प्रवास करावा लागतो. NH ३५२ आणि NH ७०९ दोन्ही अप्रतिम होते. रोहतकचा बायपास तर अतिशय सुंदर. या दोन्ही महामार्गांवर कारसाठी ९० किमी/तास वेगमर्यादा आहे. इकडे घाट वगैरे प्रकार नाही. एकदम सरळसोट रस्ता. भरीला महामार्गावर अजिबात गर्दी न्हवती. त्यामुळे अंतर झपाट्याने कापले जात होते. हरयाणाच्या प्रवासात रस्त्याकडेने भाताची शेते आणि निलगिरीची झाडे ह्यांचीच सोबत होती.

हरयाणा मधील भात शेती

ह्या भात शेतीचा मंद सुवास दरवळत होता. अतिशय प्रसन्न वाटले.

पानिपत जवळ येत होते आणि डोक्यात परत विचार सुरु झाले. परतीच्या प्रवासात आपण नक्की कधी पानिपत जवळ असू ह्याची खात्री नाही. जर रात्रीचे आलो तर स्मारक बघता येणार नाही. त्यामुळे थोड्या वेळापूर्वी घेतलेला निर्णय फिरवून आत्ताच काला आम्बला जायचे असा ठरवले. पानिपत शहरात प्रवेश करून काला आम्बला जायला निघालो. गूगल मॅप्सने अतिशय भयानक रस्ता शोधून दिला. एका ठिकाणी तर रस्ताच संपला आणि समोर होते घाण पाण्याने भरलेले प्रचंड मोठे डबके. त्याच्या खोलीचा काहीच अंदाज येईना म्हणून थांबलो. तर समोरून एक रिक्षावाला आला आणि त्याने बिनधास्त यायला सांगितले. मग ते डबके पार करून परत एका रस्त्यावर आलो. यथावकाश १२:३० च्या दरम्यान स्मारकाजवळ पोचलो. जवळपास तासभर गेला स्मारक बघण्यात.

पानिपत युद्धाचे स्मारक

स्मारक ९ ऑगस्ट १९९२ रोजी राष्ट्राला समर्पित करण्यात आले आहे. स्मारकाची अतिशय उत्तम प्रकारे व्यवस्था राखलेली आहे. दीडच्या दरम्यान काला आम्बमधून परत निघालो. पानिपत मधील बेशिस्त ट्रॅफिक आणि गर्दीने भरलेला बाजार पार करून पुन्हा महामार्गावर आलो. एका ढाब्यावर जेवण केले. आपल्याकडील मे महिना वाटावा इतके गरम होत होते. सूर्य अक्षरश: भाजून काढत होता. त्यामुळे जास्त जेवण गेलेच नाही. कर्नाल, कुरुक्षेत्र, अंबाला ओलांडून शेवटी एकदाचा संध्याकाळी ४:४५ च्या दरम्यान चंदीगड मध्ये प्रवेश केला.

चंदीगड हे भारतातीलच न्हवे तर जगातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक आहे असे वाचले ऐकले होते. त्याची झलक शहरात प्रवेश करतानाच दिसली होती. शहरात जंगल नसून जंगलात चंदीगड शहर आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. चंदीगड मध्ये सरळ जाट भवनला गेलो. तिथे ए. सी. रूम फक्त ८०० रू. मध्ये मिळाली. सामान रूमवर टाकून आंघोळ करून थोडेफार चंदीगढ बघावे म्हणून बाहेर पडलो. महत्वाच्या कागदपत्रांच्या फोटोकॉपी करून घेतल्या. (प्रत्यक्षात पासपोर्टची एक प्रत सोडली तर अन्य कुठल्याही कागदाची पुढे गरज पडली नाही). अत्यंत चांगल्या दर्जाचे, आखीव रेखीव आणि खड्डेविरहित सरळसोट रस्ते, व्यवस्थित चौक, ट्रॅफिक सर्कल्स, डावीकडे वळणाऱ्या वाहनांसाठी सिग्नलला न थांबता एक्सिट घेण्याची सोय, सगळ्या वाहनचालकांना/पादचाऱ्यांना नीट दिसतील अशा जागी लावलेले सिग्नल, रस्त्याच्या कडेने कोणतेही अतिक्रमण नसलेले फूटपाथ व त्यावर देखील ओळीने झाडे, मोठं मोठ्या गार्डन्स, काही सेक्टर्स मध्ये शॉपिंग साठी दुकाने आणि तिथे देखील पार्किंगची केलेली पुरेशी व्यवस्था. त्यामुळे रस्त्यावर गाड्या लावण्याची गरज नाही. विकसित देशांतल्या कुठल्याही शहराशी तोडीस तोड आहे चंदीगड.

चंदीगड

गूगल मॅप मध्ये देखील चंदीगड बघितल्यास फक्त चौकोन चौकोन दिसतात. ह्यापूर्वी दिल्लीला काही वेळा जाणे झाले होते. दिल्लीचा देखील बराच भाग व्यवस्थित विकसित आहे. म्हणजे इच्छाशक्ती असेल तर आपली शहरे पण व्यवस्थित विकसित करता येतात तर. इतकी झाडे असून देखील हवेत उकाडा प्रचंड होता. अगदी मुंबईत असल्यासारखे वाटत होते. त्यामुळे पाय खूप दुखू लागले. जाट भवनला फक्त शाकाहारी जेवण मिळते. त्यामुळे तिथे जेवण करण्याचा पर्याय बाद करून मोबाईलवर दुसरे पर्याय शोधायला सुरवात केली. एका ठिकाणी एक आईस्क्रीमवाला होता. त्याच्याकडून आईस्क्रीम घेतले. 'यहां पाल धाबा फेमस है. उधर जाईये' - आईस्क्रीमवाल्याने पर्याय सुचवला. म्हणून पाल ढाब्यावर गेलो. तिथे अफगाणी चिकन व अन्य काही प्रकार खाऊन चालत चालत जाट भवन गाठले. ह्यावेळी वेळ न्हवता. भविष्यात पुन्हा एकदा चंदीगड मध्ये येऊन निवांत राहण्याची इच्छा आहे.
########################################################################################

२८ ऑगस्ट
आजचे मुख्य काम होते गाडीचे सर्व्हिसिंग. गेल्या ३ दिवसाच्या प्रवासात गाडीतून हे सामान काढ, ते सामान काढ असे केले होते पण ते त्याच्या मूळ बॅगेत परत न जाता तसेच गाडीत विखुरलेले पडलेले होते. त्यामुळे शोरूमला जाण्यापूर्वी गाडीत अस्तव्यस्त पडलेले सगळे सामान नीट बॅगांमधे भरून टाकले. ९ वाजताची अपॉइंटमेंट होती पण वेळेच्या १० मिनिटे आधीच हजर झालो. शोरूमच्या सर्व्हिस मॅनेजरने पहिला नंबर बुक केलाच होता. गाडीचे रेग्युलर चेक करून झाले. गेले काही महिने मला गाडीच्या चावीत एक समस्या जाणवत होती. चावी स्टिअरिंग मध्ये अडकूनच बसायची.
'ये प्रॉब्लम आपको छोटा दिखता है. लेकिन असल में बहुत बडी समस्या बन शकता है. आपकी 'की' बार बार अटक रही है. एक दिन ऐसा आयेगा की ये 'की' बिलकुल काम करना बंद कर देगी.' - सर्व्हिस मॅनेजर
मग ती 'की सिस्टिम' पण बदलून टाकायला सांगितले. कारण नेमके लडाखच्या दुर्गम भागात पोचलो आणि तो 'एक दिन' तिथे आला असता तर भयानक हाल झाले असते. ह्याचा एक दुसरा फायदा पण झाला. तो म्हणजे आम्ही घरातून निघताना गाडी खरेदी करताना मिळालेली दुसरी चावी घरभर शोधाशोध करून पण सापडली न्हवती. की सिस्टिमच बदलल्याने दोन नव्या चाव्या मिळाल्या. गाडीचे सर्व्हिसिंग पूर्ण होईपर्यंत तिथेच शोरूमला बसून घड्याळाकडे बघत राहणे हे एकच काम उरले होते. गाडी किती वाजता परत मिळेल ह्यावर आपण आज कुठपर्यंत जाऊ शकतो ह्याचा अंदाज बांधायला चालू केला. कमीतकमी पठाणकोट तरी गाठूच हे नक्की केले.

Men At Work

थोड्या वेळाने बाहेर जाऊन एका कर्मचार्यांशी बोलत बसलो. तो मूळचा मनालीचा होता. आमच्या प्लॅन प्रमाणे आम्ही चंदीगड मधून होशियारपूर पठाणकोट मार्गे सांबाला जाऊन तिथून जम्मूला बायपास करून उधमपूर, पटनीटॉप असे जाणार होतो. पण 'सांबा ते उधमपूर भाग बराच असुरक्षित आहे. त्या रस्त्याने तुम्ही जाऊ नका. आज जम्मूला जा आणि तिथून उधमपूर मार्गे श्रीनगरला जा असे त्याने सुचवले. म्हणून आम्ही देखील आज जम्मूला जायचे नक्की केले. तसेच फोर्डची एक वर्षाची assured सर्विस घेण्याचे त्याने सुचवले. ह्यात तुमची गाडी कुठे बंद पडली आणि चालू झालीच नाही तर कंपनी स्व:खर्चाने जवळच्या शोरूम पर्यंत टो करून घेऊन जाते. १०८४ रु. भरून ती assured सर्व्हिस पण घेऊन टाकली. लडाख मध्ये रस्ते भयानक असल्याने गाडीचा खालचा भाग बऱ्याच ठिकाणी घासला जातो. त्यामुळे गाडीचा कोणता भाग सांभाळला पाहिजे तसेच ज्यादा इंजिन ऑइल, ब्रेक ऑइल बरोबर घ्यावे का ह्याची देखील चौकशी केली.
'आप सिर्फ ऑइल संप डॅमेज ना हो इतना देखिये. फोर्ड के बाकी पार्टस बहुत स्ट्रॉन्ग रहते है. उनको जनरली कुछ डॅमेज नही होगा. इंजिन ऑइल, ब्रेक ऑइल, कूलंट साथ लेने की कोई जरुरत नहीं. आपको उसकी जरुरत नहीं पडेगी' - कर्मचारी

ऑइल संप कुठे असतो ते मी पूर्वी एकदा बघून ठेवले होते.

दुपारी १:०० वाजता गाडीची सर्व्हिसिंग पूर्ण झाली. बिल भरत असतानाच 'अभी लंच ब्रेक हुआ है. आप भी यहीं से खाना खाकर जाईये' असे सांगून सर्व्हिस मॅनेजरने तिघांनाही तिथेच जेवण आणून दिले. त्यांचे आभार मानून शेवटी दुपारी १:३० वाजता चंदीगड मधून निघालो. चंदीगड मधून बाहेर पडताच न्यू चंदीगड लागले. पण इथे फारशी घरे न्हवती. फक्त प्लॉटिंग केलेले दिसले. आता प्रवास सुरु झाला पंजाब मधून. रुपनगर मार्गे होशियारपूर गाठले. पूर्णपणे दुपदरी असलेला हा रस्ता अतिशय उत्तम असून रस्त्याच्या कडेने हिरवीगार तांदळाची शेते होती.

पंजाबमधील शेती

लस्सी हा प्रकार तितकासा आवडत नसूनही केवळ पंजाब मध्ये आलोय म्हणून पिऊन बघावी ह्या याउद्देशाने गर्हद्दीवाला गावाच्या थोडे अगोदर एका अतिशय साध्या दिसणाऱ्या हॉटेलमध्ये लस्सी पिऊन बघितली. चव आवडली. प्रवासास निघताना अतिरिक्त डिझेल साठी कॅन घेण्याचे राहूनच गेले होते म्हणून एक २० लिटरचा कॅन घेतला. दासूया जवळ NH -४४ सुरु झाला. पठाणकोट मध्ये पोचेपर्यंत संध्याकाळ झाली. पठाणकोट हा पंजाबचा शेवटचा जिल्हा असून इथून पुढे जम्मू काश्मीरची हद्द सुरु होते. पठाणकोटची सीमा पाकिस्तानला भिडलेली आहे. पठाणकोट मध्ये चहा पिऊन पुढे निघालो. लखनपूर आले. हे पंजाब मधून जम्मू काश्मीरला जाताना लागणारे जम्मू काश्मीर मधील पहिले गाव आहे. जम्मू काश्मीर मध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला लखनपूर मध्ये प्रवेश कर द्यावा लागतो. टोल बुथच्या जवळ पोचतच होतो तोच माझ्या पुढे असलेला ट्रक अचानक थांबला. आणि त्या ट्रकच्या पुढे असलेली एक SUV एकदम रस्ता सोडून ९० अंशात वळली आणि डिव्हायडर वरून जाऊन मधल्या गॅप मध्ये अडकली. बरेचसे पोलीस धावत आले. नक्की काय झाले ते कळलेच नाही. बहुतेक ट्रकने तिला ठोकले असावे. पण आवाज तर काही आलाच न्हवता. ७:२० च्या दरम्यान लखनपूरला टोल भरून जम्मू काश्मीर मध्ये प्रवेश केला. आतापर्यंत उत्तम दर्जा राखलेल्या NH-४४ ची काश्मीर मध्ये प्रवेश करताच दैना उडालेली होती. जिओ, व्होडाफोनची रेंज पण गायब झाली म्हणून खास ह्या प्रवासासाठी घेतलेले BSNL चे सिम कार्ड मोबाईलमध्ये टाकले. तर नेट चालूच होईना. ग्राहक सेवा केंद्राशी ३-४ दा संपर्क साधला पण काहीच उपयोग झाला नाही. लखनपूर ते जम्मू ह्या ९० किमीच्या प्रवासात उखडलेला रस्ता, भयाण काळोख आणि रस्त्याच्या बाजूने अत्यंत गचाळ गावे ह्यांचीच सोबत होती. रात्री ९ च्या सुमारास जम्मू आले. हा आम्ही केलेला एक मूर्खपणा होता. जम्मूत आत न जाता हायवे वरच लॉज शोधला असता तर बरे झाले असते असे नंतर वाटले. एक फ्लायओव्हर ओलांडून थोडे पुढे आलो. तिथे दोन माणसे भेटली. त्यांना बस स्टॅण्डचा रस्ता विचारला. तिथे नक्कीच लॉज मिळाला असता. त्या माणसांनी सांगीतल्याप्रमाणे मागे फिरून बस स्टॅन्ड जवळ आलो. तिथून एका छोट्या रस्त्यावर जाऊन गाडी लावली आणि लॉज शोधायला गेलो. रिलॅक्स नावाचा एक लॉज दिसला. फक्त ७०० रु. मध्ये एसी रूम मिळाली. रूम काही तितकीशी खास न्हवती. पण आता दुसरा लॉज शोधण्याचे पेशन्स संपले होते. एकतर निघायला उशीर झाल्याने पोचायला उशीर झाला होताच. प्रचंड भूक लागली होती. त्यामुळे आता दुसरा लॉज शोधत बसण्यापेक्षा कशीतरी एक रात्र काढू असा विचार करून तिथे रूम घेऊन टाकली. लॉज जवळच एका हॉटेल मध्ये ह्या प्रवासातील सर्वात बेचव नॉन व्हेज जेवण खाऊन आजचा दिवस संपला. खरा प्रवास उद्यापासून सुरु होणार होता.

प्रतिक्रिया

फार व्यवस्थित, डिटेलमध्ये लिहीत आहात. या लेखमालेचा अनेकांना उपयोग होईल यात शंका नाही.

एक प्रश्न : वाहतुकीचे काही नियम काही राज्यांत वेगवेगळे असू शकतात. उदा. कुठे गाडीच्या हेडलाईटला अर्धा भाग पिवळ्या रंगाने रंगवायचा, तर कुठे काळ्या, अशा छोट्याछोट्या कारणांमुळे पोलिसांनी कधी अडवले वगैरे?

अभिजीत अवलिया's picture

4 Dec 2017 - 9:30 am | अभिजीत अवलिया

नाही. कुठेच पोलिसांनी अडवले नाही. कारण चंदीगड सोडून अन्य कुठेही वाहतूक पोलिस दिसलेच नाहीत. :)
ना हायवेवर ना कुठल्या शहरात. हरियाणा मध्ये हायवेवर ज्यांनी थांबवले ते देखील राम रहीम केस मुळे बंदोबस्ताला असलेले पोलीस होते.

टवाळ कार्टा's picture

4 Dec 2017 - 7:27 pm | टवाळ कार्टा

बहुतेक खाजगी गाडीला असे काही करावे लागत नाही

अमितदादा's picture

3 Dec 2017 - 11:17 pm | अमितदादा

छान प्रवासवर्णन लिहिलंय....चंदिगढ शहरनियोजन बाबत आणि पानिपत स्मारक चांगल्या निगेबाबत ऐकून छान वाटले.

पद्मावति's picture

3 Dec 2017 - 11:46 pm | पद्मावति

मस्तच!

किल्लेदार's picture

4 Dec 2017 - 1:43 am | किल्लेदार

चंदिगढ राहूनच गेले आहे. कधी योग येतो बघू.

श्रीधर's picture

4 Dec 2017 - 10:34 am | श्रीधर

छान प्रवासवर्णन

वरुण मोहिते's picture

5 Dec 2017 - 6:15 pm | वरुण मोहिते

वर्णन चालू आहे . लवकर टाका पुढचा भाग .अजून खरा प्रवास बाकी आहे . वाचायला उत्सुक .

तपशीलवार वर्णनामुळे वाचायला मजा येत आहे.

मराठी कथालेखक's picture

6 Dec 2017 - 5:56 pm | मराठी कथालेखक

कारण मध्यरात्रीच्या २:३० पासून मी जागाच होतो. अनोळखी ठिकाणी मला बऱ्याचदा नीट झोप लागतच नाही. यावर काही उपाय ?

अनोळखी ठिकाणी झोप लागत नाही तसेच कधी थकव्यामुळेही झोप लागत नाही.
झोपण्यापुर्वी चित्त शांत करण्याचा प्रयत्न करा.. [मेंदूत चालू असणार्‍या उच्च वारंवारतेच्या लहरी कमी होवून कमी वारंवारतेच्या लहरी चालू व्हायला हव्यात असं काहीतरी ते असतं ]

  • रात्रीचे जेवण अगदी निवांत करा
  • मद्यपान करत असाल तर थोडेसे (३० किंवा जास्तीत जास्त ६० मिली) मद्यपान करा
  • झोपण्यापुर्वी हलक्याफुलक्या गप्पा मारा , संगीत ऐका
  • दुसर्‍या दिवशी प्रवास करायचा असेल तर डोक्यात त्याचं नियोजन घोळत रहातं ते टाळा , तुम्ही उद्या जणू दिवसभर लॉजवरच झोपून काढणार आहात अशा मुडमध्ये रहा.

रात्री शांत झोप लागण्यासाठी मला उपयोगी पडतो तो हमखास उपाय म्हणजे खेचरी मुद्रा...
पाठ टेकवून, शांतपणे हे २ ते ३ मिनिटे केल्याने झोप उत्तम लागते..

  1. टाळूला जीभ मागे वळवून लावावी
  2. मनातल्या मनात १ ते ४ मोजत श्वास आत ओढावा
  3. श्वास कोंडून, १ ते ६ आकडे हळूहळू मोजावेत (मनातल्या मनात)
  4. आता श्वास सोडावा. १ ते ८ आकडे सावकाश मोजताना...शेवटच्या ८ आकड्यावर श्वास सगळा बाहेर पडला पाहिजे (आकडे पुन्हा मनातल्या मनात, आणि हे हळू हळू जमेल).

ह्याने एकतर रक्तदाब लगेच नियंत्रित होतो, आणि मला शांत झोप लागते..करून बघा..रोज केले तरी हरकत नाही...

केडी's picture

8 Dec 2017 - 3:37 pm | केडी

हे इथे अजून वाचा ह्याबद्दल

मस्त रे..सही जा राहे हो....लवकर टाक, पुढचा प्रवास फारच इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे उत्सुकताः आहे!

यशोधरा's picture

25 Dec 2017 - 8:07 pm | यशोधरा

वाचते आहे..

मनिमौ's picture

26 Dec 2017 - 6:24 am | मनिमौ

मजा येतेय वाचून