डेस्टिनेशन - देवभूमी अर्थात हिमाचल प्रदेश, मु.पो.सांगला, किन्नर कॅंप्स भाग १

मालविका's picture
मालविका in भटकंती
22 Nov 2017 - 5:22 pm

फिरायला जायचं ठरवलं तेव्हा दोघांच्याही डोक्यात आणि मनात बरेच विचार होते . शांत पण निसर्गयरम्य ठिकाणी जायचं. अगदी जिथे वायफाय सोडा मोबाईलची रेंज सुद्धा नाही आली तरी चालेल. खूप गर्दी नको पण सुरक्षित सुद्धा हवं. काही वेगळं ट्राय करता आलं तरी हरकत नाही. तीच ती मोठाली हॉटेल्स , तेच ते खाणं या सर्वापासून काहीतरी वेगळं असं ठिकाण आम्ही शोधत होतो. सगळ्यांनी नेहमीची सगळी ठिकाण सांगून बघितली. कुणी केरळ ला जायचा सल्ला दिला तर कुणी शिमला मनाली सुचवलं. काहींनी परदेशात जायचा सल्ला दिला. यातील एकही ठिकाण आमच्या पसंतीस उतरत नव्हतं. कारण हि सगळी टिपिकल टुरिस्ट डेस्टिनेशन झालेली आहेत. गर्दी ,त्यामुळे होणारा त्रास , न मिळणारा एकांत, फेमस नावाखाली दुकानदारांची चाललेली लूटमार , प्रशासनाच्या गैरसोयी यातील कुठलाही त्रास करून घेऊन मला माझा संयम घालवायचा नव्हता. त्यामुळे सुचवणाऱ्यांच्या यादीतील एक एक ठिकाण आम्ही बाद करत होतो. शेवटी एक मित्र मदतीला आला. तो countryside या ट्रॅव्हल एजन्सी मध्ये काम करतो. तो अशाच वेगळया टूर्स घेऊन जातो. आम्ही ग्रुप मधून न जाता फक्त दोघांनी जायचं ठरवलं होत तर त्याने सगळी बुकिंग करून दिलंन. त्याने सांगितलेल्या ठिकाणाचं नाव होत सांगला, हिमाचल प्रदेश !
नेहमीच्या ऐकलेल्या नावांमध्ये हे नाव नव्हतं त्यामुळे जरा उत्सुकता होती पण हिमाचल प्रदेश म्हटल्यावर परत एक शंका आली कि गर्दीची. मग गुगल बाबाला विचारलं कि या आमच्या मित्राने सुचवलेलं हे ठिकाण आहे तरी कुठे?, दिसत तरी कसं?, जाऊन आलेले लोक काय म्हणतात त्याबद्दल?, फोटोत कसं वाटतंय गाव? गुगल बाबाने जराही वेळ न दवडता सगळ्या प्रश्नांना पटापट उत्तर दिली. सांगला हे हिमाचल प्रदेश मधलं तिबेट च्या सीमेलगतच छोटस गाव. शिमला पासून साधारण ८ तासाच्या अंतरावर. खरं तर करण्यासारखं किंवा खूप काही बघण्यासारखे पॉईंट्स असं इथे काही नाही. तरीहि मूळचा निसर्गच इतका सुरेख आहे कि बाकी कशाची गरजच लागत नाही. मुद्दाम तयार केलेले अम्युझमेंट पार्क किंवा सनराईज /सनसेट पॉईंट यातलं काहीही तिथे नव्हतं .
पण सुंदर निसर्ग आणि शांतता मात्र भरपूर होती. नेट वर वाचलेल्या प्रतिसादांमध्ये या ठिकाणाबद्दल चांगलेच मत होत. क्वचितच ज्याला फक्त मॉल मध्ये फिरायची नि शॉपिंग ची हौस अशांनी दिलेल्या नकारात्मक प्रतिक्रिया होत्या. अन्यथा सगळ्या चांगल्या प्रतिक्रिया होत्या . फोटो मध्ये सुद्धा बघून ठिकाण आवडलं . आमची राहायची सोय किन्नर कॅम्प या ठिकाणी असणार होती. इथे मुक्काम तंबूत असणार होता. हेही काहीतरी वेगळं आवडलं होत. वाचलेल्या सगळ्या प्रतिसादांमध्ये किन्नर कॅम्प बद्दल खूपच चांगलं मत व्यक्त केले होते. तिथलं राहणं आणि खाणं दोन्ही खूपच चांगल्या दर्जाचं असल्याचं जाऊन राहून आलेल्यांचे म्हणणं होत. एकूण सगळ्या आमच्या अपेक्षांना उतरेल असं हे ठिकाण आम्ही जाण्यासाठी पसंत केलं .
आमच्या या ट्रिप मध्ये मोठा मुद्दा होता प्रवासाचा. कोकणातल्या आमच्या गावाहून म्हणजेच महाराष्ट्रातल्या एका टोकाकडून हिमाचल प्रदेश च्या शेवटच्या टोकाला जायचं हा प्रवास फारच लांबलचक होता. आमचा प्रवास थोडक्यात असा होता - चिपळूण ते मुंबई , मुंबई ते चंदीगड, चंदीगड ते नारकंदा ,नारकंदा ते सांगला . प्रवासाला एकूण ३ दिवस लागले. अर्थात आम्ही फार आरामशीर प्रवास केला. चिपळूणहुन मुंबईला जाऊन काही भेटीगाठी घडल्या. दुसऱ्या दिवशी मुंबई चंदीगड विमान प्रवास . तिथे टूरचा माणूस गाडी घेऊन आणायला आला होता. इथून पुढे चंदीगडला परत येईपर्यंत स्विफ्ट डिझायर मधून सगळा प्रवास होणार होता. ड्राइवर आणि गाडी पूर्णवेळ आमच्या दिमतीला होती. चंदीगड हुन प्रवास सुरु झाला तो मध्ये शिमला लागलं म्हणून तासभर तिथे घालवून पुढे गेलो आणि नारकंदा ला येऊन राहिलो. चंदीगड ते नारकंदा साधारण ८ तासच अंतर आहे. एक रात्र तिथे घालवून दुसऱ्या दिवशी पुढे ५ तास प्रवास करून सांगला या ठिकाणी पोहोचलो.
थोडक्यात सुरवात आमच्या सांगला ट्रिपची. चंदीगड पासून सुरवात. चंदीगडला टूर एजन्सी चा माणूस कम ड्राइवर आम्हाला आणायला गाडीसह आला होता. त्याच नाव भीमसिंग. नाव भीम असलं तरी देहाने हा माणूस विदुराच्या जवळपास सुद्धा नव्हता. अगदीच किरकोळ शरीरयष्टी आणि बेताचीच उंची असलेला हा माणूस स्वभावाने फारच नम्र होता. ४ दिवसांच्या सहवासात आम्हाला हा माणूस आवडून गेला. ड्राइवरला शोभेल अशी उगाच बाष्कळ बडबड नाही कि भोचकपणे प्रश्न विचारणे नाही. विचारलेल्या सगळ्या प्रश्नाची व्यवस्थित उत्तरे देत होता. शांत माणूस होता एकदम. जिथे लागेल तिथे तो माहिती द्यायचा. आम्ही नाश्त्यासाठी कुठल्याही हॉटेल वर थांबायला सांगितलं तरी त्याची ना नसायची. तो म्हणेल तिथेच, कुठल्यातरी महागड्या हॉटेलात न्यायचं, आम्ही बिल भरतोय म्हणून उगाच वाटेल तेव्हढं खायचं असले कोणतेही प्रकार त्याने केले नाहीत. आम्ही जागोजागी फोटो काढायला थांबलो, त्याने कधी कुरकुर केली नाही वेळेची. सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्याबद्दल असेल तर ती म्हणजे त्याचा गाडीवर असलेला ताबा अर्थात कंट्रोल. गाडी कधी आचके देऊन बंद पडली नाही कि अचानक सुरु झाली नाही, स्पीड कधी लिमिट च्या बाहेर गेला नाही, अगदी घाटात आणि अवघड वळणार वर सुद्धा त्याची गाडी इंचभर सुद्धा इकडची तिकडे हलली नाही. मोठे मोठे आणि भीतीदायक असे तिथले घाट होते. एखाद्या वळणावर एका वेळी एखादीच गाडी पास व्हायची. पण त्याचे गाडी चालवायचे कौशल्य खरंच वाखाणण्यासारखे होते. आम्ही ४/५ वेळा आग्रह करूनही तो कधी आमच्या बरोबर जेवायला बसला नाही. शेवटी आम्ही तो नाद सोडून दिला. कदाचित आलेल्या टुरिस्ट बरोबर बरोबरीनं न वागण्याची सवय असावी. अत्यंत नम्र आणि मितभाषी असा हा ड्राइवर आमच्या ट्रिपचा एक महत्वाचा भाग बनून गेला .

क्रमशः

प्रतिक्रिया

फोटो नाय तर भटकंती नाय...!!

पुढील भागांच्या आणि फोटोंच्या प्रतिक्षेत.

प्राची अश्विनी's picture

22 Nov 2017 - 5:55 pm | प्राची अश्विनी

छान लिहिलंय. पुभाप्र.
आणि मोदकशी सहमत.:)

प्राची अश्विनीताईंशी सहमत. :-P

स्रुजा's picture

22 Nov 2017 - 8:17 pm | स्रुजा

वरच्या तिघांशी सहमत :)

टवाळ कार्टा's picture

23 Nov 2017 - 7:31 am | टवाळ कार्टा

वरच्या तिघांनशी आणि येणाऱ्या सर्व प्रतिसादांशी सहमत :)

नाखु's picture

23 Nov 2017 - 8:50 am | नाखु

पु भा प्र

पैसा's picture

29 Nov 2017 - 4:20 pm | पैसा

मोबाईल वरून फोटो अपलोड करून बघ, नाही जमले तर साहित्य संपादक मदत करतील.

चौथा कोनाडा's picture

29 Nov 2017 - 5:06 pm | चौथा कोनाडा

वा, छान !
सुरुवात आवडली.
आता फोटो अन पुढिल भागाच्या प्रतिक्षेत !