Skip to main content

चितळेंपेक्षाही जास्त माजोरडे दुकान!

लेखक mayu4u यांनी मंगळवार, 17/10/2017 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
शीर्षक वाचून आश्चर्य वाटलं ना? कालपर्यंत मी सुद्धा अशी काही कल्पना केली नव्हती... पण सत्य हे कल्पनेपेक्षाही विचित्र असते, याचा फर्स्ट ह्यांड अनुभव घेतला मी! =============================================================================== कार्यालयीन कामानिमित्त गेल्या आठवड्यात बंगलोरास आलेलो, आणि वीकेंड मैसुरच्या कार्यालयात घालवून, धनत्रयोदशीच्या संध्याकाळीच घरवापसी करणार होतो. हा मैसुर म्हणजे महिषासुराचा धाकटा भाऊ आणि बकासुराचा चुलत भाऊ असावा असं उगीच वाटत रहातं. असो. तर, दिवाळीच्या आधीच्या वीकांताला मी घरात नसल्याने सौ तुफान चिडलेली... “वर्षभर घरात पसारा कर आणि साफसफाईच्या वेळेला बरोबर पसार हो! पसाभर हातभार लाऊ नकोस कामांना... घर माझं एकटीच आहे का?” इत्यादी इत्यादी... त्यामुळे दिवाली को मनानेसे पैले घरवाली को मनाना था! तस्मात् “मैसुरास रेशमी साड्या चांगल्या मिळतात, तिथून तुझ्यासाठी काही छानश्या साड्या आणतो” असं सांगून मांडवली केली. कबूल करून बसलो खरा; पण कपडे खरेदी, ती सुद्धा बायकांची, हा एक प्रचंड वैतागवाणा प्रकार आहे, हे समस्त पुरुषवर्ग मान्य करेल. या विषयावर पु लं नी एव्हढ खुमासदार लिहिलेलं असतानाही बायका आपापल्या नवऱ्यांना कापड खरेदीस का ओढून नेतात हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे दिलेला शब्द कसा पाळावा हा यक्षप्रश्न होताच. एकदा वाटलेलं, की तसही माझे शब्द हिंस्र असल्याने नाही पाळला तर? पण सौ दुर्गावतार धारण करतील, या भीतीने मनाचा हिय्या करून कापड खरेदी उरकायची ठरवली. सर्वात पहिला अडथळा आला दुकान निवडण्यात. रांगेत ३५-४० साड्यांची दुकानं, आणि प्रत्येक दुकानात मैसूरच्या “अस्सल आणि सर्वोत्तम” रेशमी साड्या मिळणार. योग्य दुकानाचा शोध ईश्वराच्या शोधाईतकाच कठीण वाटू लागला. मग निमूट कार्यालयातल्या भगिनी समाजाला शरण गेलो, आणि म्हणालो, “बायांनो, एखादं बरंसं दुकान सुचवा!” त्यांनी आपापसांत काहीतरी अगम्य बडबड केली आणि एक भगिनी मला म्हणाली, “गो टू कर्नाटका सारी सेंटर!” दुसरीने स्वत:च्या फोन वरून उबर सुद्धा बोलावली. आणि मी शुंभासारखा आपल्या पायांनी त्या गाडीत बसून वधस्तंभाकडे चाललेल्या वसंतसेनाघातकी चारुदत्तासारखा निघालो पण! कर्नाटका सारी सेंटर! स्वर्ण महाल हे नाव धारण करणाऱ्या, आणि सशाच्या टाळूला गंडस्थल म्हणण्याचा गटणेपणा करणाऱ्या एका चारमजली कळकट्ट इमारतीत हे दुकान आहे. न्यूटनचं नाव घेऊन आत शिरलो. तळमजल्यावर चारास एक या गुणोत्तरात काही विक्रेत्या ग्राहकांकडे दुर्लक्ष करत होत्या. त्यातल्या एकीसमोरच्या घोळक्यात भर टाकत मी म्हणालो, “सिल्क सारीज दिखाइये!” “रेंजा?” “फुल रेंज इन रोमिंग” खिशातून फोन काढत मी उद्गारलो, आणि मग माझी ट्यूब पेटली! आधल्या रात्री सौंशी बोलून मातोश्री आणि शत्रुपक्षाच्या पुढारी स्त्री साठी (पहा: नारायण) साडी; आणि सौंसाठी ड्रेस मटेरियल असा बेत नक्की झालेला. पण किती रुपड्या खर्च करायच्या ही महत्वाची तहाची कलमं राहून गेलेली. आली की नाही पंचाईत! आणि त्यात ती मद्रकन्या कंटाळवाण्या चेहऱ्यानं माझ्याकडे रोखून बघत होती. “फाईव थाउजंड?” मी, भीतभीत. “पिलावूल्कंडी तेरेपारम्पील उषा!” “???” नक्की काय म्हणायचंय हिला? मी किंमत खूप कमी सांगितली का? साड्यांच्या किमती किती असतात? इकडे कुणी हिंदी बोलतच नाही का? अशा प्रश्नांच्या वावटळीत चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह घेऊन मी उभा. आमचा हा आध्यात्मिक पातळीवरचा संवाद पाहून तिसरीच एक दुर्मुखसुंदरी मला म्हणाली, “सर, सेकंड फ्लोअरा यू गो.” “इंग्लीश हम शरमिंदा है, तेरे कातील...” असं काहीतरी पुटपुटत पावनखिंडीसारख्या त्या अरुंद जिन्यावरून चढून दुसऱ्या मजल्यावर पोचलो, आणि.... तिथं उफाळलेली गर्दी पाहून फेफरं यायचं बाकी राहिलं. शुष्क दिना आधी मदिरेच्या दुकानासमोर पण एवढी गर्दी नसते राव... खरेदी करणारी एक अनाहिता, तिला सोबत करणाऱ्या दोन बायका आणि अशा तीन टोळ्यांना सांभाळायला एक विक्रेती या प्रमाणात त्या वीस बाय वीस च्या दालनात तीन-चारशे बायका कलकलाट करत होत्या. फुल कुंभमेळा लागलेला. आल्यापावली मागे वळावं असा विचार करत असतानाच मागून आलेल्या लोंढ्याने मला आत ढकलून दिलं, आणि अभिमन्यू सारखा मी त्या चक्रमव्यूहात एकाकी लढू लागलो. क्षणभर वाटलं, एवढ्या गर्दीत घुसून खरेदी केल्याने सौ खूष होईल. पुराव्याने शाबीत करण्यासाठी एखादा फोटो घेऊन ठेवावा. पण खिशातून फोन काढायचा प्रयत्न केला आणि त्या भानगडीत डझनभर बायकांच्या निरनिराळ्या अवयवांना स्पर्श झाला. मग डंकर्क च्या यशस्वी माघारी सारखी ती मोहीम मी रद्द केली.. मुंबईच्या लोकलचा अनुभव असल्याने मागच्या लोंढ्याचा फायदा घेऊन एका कौंटरजवळ पोचलो. आणि चक्क त्या विक्रेतीला हिंदी येत होतं. चटकन तिने २ साड्या दाखवल्या. त्यातली पहिली पसंत केली आणि त्याच डिझाईन मध्ये आणखी रंग मागितले. प्रत्युत्तरादाखल तिने समोर टाकलेली पहिलीच साडी उचलली. ठरवलेल्यापैकी दोन जिन्नस दोन मिनिटात घेतले! “जितं! जितं!!” अशी आरोळी ठोकली मी! “ये दो सारीज पॅक कर दिजीये. और मुझे ड्रेस मटेरिअल दिखाईये.” मी, ऐटीत. “नै सर. पैले इसका बिलिंग होना.” “नहीं, मै सारा बिलिंग साथमे करुंगा.” “नै सर. पैले इसका बिलिंग होना.” तिची रेकॉर्ड एकाच ठिकाणी अडकलेली. “ठीक है!” आलीया भोगासी... म्हणत मी त्या गर्दीतून वाट काढत तिच्या मागून बिलिंग कौंटर पाशी गेलो. तिथही झुंबड उडालेली होतीच. त्या गोंधळात थोडा वेळ गेल्यावर माझा नंबर लागला. त्या हिंदी बोलणाऱ्या विक्रेतीने तिच्या हातातल्या साड्या बिल बनवणाऱ्या हेडमास्तराकडे दिल्या. मी निमूट कार्ड काढून त्याच्या हातात दिल आणि काही सहस्र रुपयांचा चुराडा करून घेतला. नाकावर घसरलेल्या चष्म्याच्या वरून माझ्याकडे बघत त्या बुवाने कार्ड आणि बिल माझ्या हातात दिलं. मी साड्यांच्या प्रतीक्षेत उभा. “हो गया.” हेडमास्तरबुवा. “लेकीन मेरी सारीज?” मी “वो नीचे फर्स्ट फ्लोर से लेनेका.” डिसमिस! च्यायला! ही आणखीच भानगड! इथंच माझ्या हातात साड्या देऊन टाकल्या असत्या तर काय बिघडणार होतं? तरी बरं, खाली उतरता उतरता साड्या घेऊन जायचं होतं. वरून येणाऱ्या बायकांना चुकवत, मास्टर अफझुलखानच्या पाठीवरच्या तोफेसारख्या (पहा: असा मी असामी) त्या जड लॅपटॉप बॅगेला सांभाळत आणखी वर जाणं म्हणजे शिक्षाच झाली असती. “थँक्यू!” म्हणून मी खाली जायला निघालो, आणि आठवलं! सौंसाठीची खरेदी शिल्लक आहे... पोटात एक छोटासा गोळा आला! “सर, ड्रेस मटेरियल चाहिये” अजीजीने मी हेडमास्तरबुवाला म्हणालो. “थर्ड फ्लोर.” जेवणाची वेळ झालेली. आतापर्यंत माझा उत्साह पार संपलेला. दोन मिनिटात खरेदी संपवल्याचं भारी फिलिंग केव्हाच उडून गेलेलं. पोटातला छोटासा गोळा आता भुकेचं रूप घेऊन दंगा करत होता. नाईलाजाने, टाचा घासत घासत मी अजून एक मजला चढून गेलो. इथं गर्दी जरा कमी होती. विरार ट्रेन मधून बांद्रा ट्रेन मध्ये आल्यासारखं वाटलं. पण इथं सौंसाठीची खरेदी करायची होती. त्यामुळे एका कानाला फोन लाऊन तिच्याशी बोलायचं. सॉरी, तिचं बोलण ऐकायचं. आणि ते विक्रेतीला सांगायचं. दुसऱ्या फोन वरून ती दाखवेल त्या कापडाचे फोटो काढून सौंना पाठवायचे. मग पुन्हा “यात फ्युश्या कलर आहे का बघ, लेमन ग्रीन ऐवजी ओशन ग्रीन किंवा बॉटल ग्रीन आहे का विचार, या पॅटर्न मध्ये जडावाचं काही माग...” असे हल्ले परतवायचे. अशी सगळी सव्यापसव्य करून चार कापडं नक्की केली. “आईये सर, बिलिंग करते है.” त्राणच गेलं माझ्या पायातलं. पुन्हा मघाच्यासारखे सगळे उद्योग करून बिल बनवलं. फक्त इथं हेडमास्तरबुवा ऐवजी मुख्याध्यापिका बाई होत्या. बिल माझ्या हाती देऊन “फर्स्ट फ्लोर” असं म्हणत तिने मोबाईलमध्ये डोकं खुपसलं. “मॅडम, ये ड्रेस मटेरियल इधरही मेरेको क्यू नही देते?” हमारे बगीचे मै पैदा हुवा फुलदणाणा च्या शैलीत मी. “नै सर, आपको फर्स्ट फ्लोर से ही लेना होगा!” मुख्याध्यापिका “लेकीन ऐसा क्यू? इधर ही देंगे तो आपका भी टाइम बचेगा और हमारा भी.” आता वैताग बोलायला लागलेला. “नै सर, हमारा प्रोसेस है, आपको फर्स्ट फ्लोर से ही लेना होगा” प्रोसेस? उद्या सांगाल आमची डेव्हलपमेंट, टेस्टिंग आणि क्यूए टीम आहे. “ये कैसा प्रोसेस है? इसमे आपका भी टाइम जाता है और हमारा भी!” मी चिकाटीने माझा मुद्दा लाऊन धरलेला. “सर आप इधर आर्ग्यू करनेसे फर्स्ट फ्लोर जायेंगे तो आपका भी टैम बचेगा और हमारा भी!” इनस्विंगिंग यॉर्कर. क्लीन बोल्ड. जमिनीवर पडलेला माझा चेहरा उचलून घेत मी फर्स्ट फ्लोर कडे. पहिल्या मजल्यावर पॅकिंग कौंटरकडे सगळे ग्राहक आपापले जिन्नस घ्यायला जमा झालेले. रांग लावल्याने आम्हा भारतीयांच्या राष्ट्रवादावर गदा येते. त्यामुळे तिथं मारामारी चालू होती. मुसंडी मारून त्या गर्दीत घुसलो. कौंटर पल्याड दोन अण्णा लोकांकडून बिल घेऊन जिन्नस शोधून आणून देत होते. आणखी एकजण येणारे जिन्नस तपासत होता. एकजण खुर्चीवर नुसता बसून होता. मी हातातली दोन बिल त्याच्यासमोर सरकवली. अवाक्षर न बोलता त्यान दुसऱ्या दोघांकडे बोट दाखवलं. आता माझ्यात वाद घालायचं देखील त्राण उरलं नव्हतं. मी निमूटपणे माझ्यावर कृपादृष्टी पडायची वाट बघू लागलो. एवढ्यात माझ्या नंतर आलेल्या एका सुंदरी कडून त्या दादाने बिल घेतलं. आणि माझ्यात वाद घालायचा नवा उत्साह संचारला. “मै पैले आया, पैले मेरा बिल ले लो.” “आपका दो बिल है. दुसरा आदमी आपका बिल लेगा. मै सिर्फ एक बिल देखता है.” “और किसिका दो से जादा बिल होगा तो?” मलाही कंडू कमी नाही. त्यानं खुर्चीवर बसलेल्याकडे बोट दाखवलं. प्रोसेस! मग मी तो दो बिल वाला मोकळा व्हायची वाट बघत निमूट उभा राहिलो. यथावकाश माझा नंबर लागला. माझे सगळे जिन्नस माझ्या ताब्यात आले. दो बिल वाल्याने मला “येक्ष्ट्रा ब्याग्ज” पण दिल्या. आणि जखमेवर मीठ चोळायला मला म्हणाला, “सर! प्लीज व्हिजीट अगेन!” =============================================================================== घरी आल्यावर साडी बघून मातोश्रींनी साडी बघून अपेक्षेप्रमाणे संतोष व्यक्त केला. सौंनी, तिच्या मातोश्रीन्साठीची साडी बघून (अपेक्षेप्रमाणे) असंतोष व्यक्त केला. “तुझा चॉईस अगदी बंडल आहे!” इति सौ. “ते पाच वर्षांपूर्वीच सिद्ध झालंय!” विजयी स्वरात मी. पण हा टोमणा कळायला एक किमान बौद्धिक कुवत लागत असल्याने, माझा बाउन्सर तिच्या डोक्यावरून वाईड! =============================================================================== दीपावलीच्या शुभेच्छा!
लेखनविषय:

वाचने 18491
प्रतिक्रिया 92

प्रतिक्रिया

टी आर पी घेण्यासाठी पुण्याला किंवा चितळे वैगरे यांना नावं ठेवणाऱ्यांची किंवा येते !! चितळे आणि माज अशी सुरवात करून लेखात पुढे अकलेच्या घोड्याला घोडे लावलेत ... पण शीर्षक व लेखातला संधर्भ गवसला नाही ...

In reply to by धडपड्या

आणि शरीराच्या डॉक्टरांसोबत मनाच्या डॉक्टरांना पण दाखवा, म्हणजे जरा आनंदी रहाल. बरे होण्यासाठी शुभेच्छा! गेट वेल सून!

In reply to by धडपड्या


लय झ्याक लिवलय...

In reply to by डॉ श्रीहास

येवढा मोट्टा लेख टायपायला हात, आणि जोक मारायला डोकं शाबूत आहे, म्हणजे अजून (नेहमीप्रमाणेच) वाचलेला नसावा...

अंगावर काटा येणार अनुभव

डॉकच्या प्रश्नाला +१ देश

“सर! प्लीज राईट अगेन!”

खासकरून
पण हा टोमणा कळायला एक किमान बौद्धिक कुवत लागत असल्याने, माझा बाउन्सर तिच्या डोक्यावरून वाईड!
ही मुक्ताफळे वाचल्यावर हा प्रश्न खास पडला(च)

चितळे माजोरडे कधीच वाटले नाहीत, त्यांच्या दुकानातील कर्मचारी वर्गही हसतमुख, शिवाय तत्पर असतो. उद्धटपणा त्यांच्या दुकानांत कधीच अनुभवाला आला नाही. आता त्यांच्या वेळा पाळण्याला (दुपारी १ ते ४ दुकान बंद) ह्याला माजोरडेपणा म्हणत असाल तर मग असोच.

In reply to by प्रचेतस

सहमत. आणि दुपारी १ ते ४ दुकान बंंद ठेवण्याची त्यांंची परंंपरा त्यांंनी हल्लीच मोडीत काढलीय. विनाकारण चितळ्यांंची बदनामी केलीय लेखात.

In reply to by आनन्दा

तिथला उद्धट नोकरवर्ग आणि मख्ख चेहर्‍याचे बिलिंगवाले यांना वैतागून तेथे बरीच वर्षे गेलो नव्हतो पण औंधचे मीठा'ज सोडले तर कुठेही चितळ्यांच्या मिठाईच्या जवळपास जाणारी चव मिळाली नाही. म्हणून नाईलाजाने का होईना परत चितळ्यांच्या दुकानात जाणे सुरू केले आहे. अर्थात पर्याय मिळाला की चितळ्यांना टाटा करणार यात शंका नाही. याचा चितळ्यांना काहीच फरक पडणार नाही हे ही माहिती आहे. मालकाचा धंदा डुबला तरच आपली नोकरी जाईल याची नोकरवर्गाला खात्री आहे आणि धंदा काय पुढची १० वर्षे डुबत नाही त्यामुळे गिर्‍हाईकासारखी क्षुद्र गोष्ट सांभाळणे चितळ्यांना आणि नोकरांना गरजेचे वाटत नाही.

In reply to by मोदक

चितळ्यांच्या मिठाईच्या जवळपास जाणारी चव मिळाली नाही चितळेंची कुठली मिठाई नेमकी नाव सांगाल का ? म्हणजे बाकरवडीचे कौतुक समजु शकतो पण मिठाई चे ही ? हाय कमब्ख्त तुने असो

In reply to by मारवा

काजूची कोणतीही मिठाई.. चितळेंकडे काजूची चव लागते तसे इतर ठिकाणी काजूसोबत साखरेची थोडी थोडी चव लागते. काजू+आणखी फ्लेवर असतील तर ते समसमान चवीचे चितळ्यांकडेच मिळते. इतर ठिकाणी दोन घटकातला बॅलन्स बिघडलेला असतो. बाकरवडीला पर्याय नाहीच..! हाय कमब्ख्त तुने.. - म्हणजे आणखी कुठे चांगली मिठाई मिळते सांगताय का..?

In reply to by मोदक

काजूची कोणतीही मिठाई.. चितळेंकडे काजूची चव लागते तसे इतर ठिकाणी काजूसोबत साखरेची थोडी थोडी चव लागते. काजू+आणखी फ्लेवर असतील तर ते समसमान चवीचे चितळ्यांकडेच मिळते. इतर ठिकाणी दोन घटकातला बॅलन्स बिघडलेला असतो. तुम्ही काजु चा उल्लेख केलात म्हणुन केवळ एकच नाव सुचवतो ( अनेकांपैकी ) पण तुम्ही फार चोखंदळ खव्वये दिसता म्हणुन एकच तुम्ही या आयुष्यात एकदा तरी जळगाव ( उत्तर महाराष्ट्रातील खान्देश जळगाव ) या शहरातील एक विख्यात दुकान आहे. महालक्ष्मी स्वीटस म्हणुन तुम्ही कधी जळगावला गेलात वा कोणी मित्र गेल्यास त्याला आवर्जुन महालक्ष्मी स्वीट स ची काउ कतली आणायला सांगा त्यात चार फ्लेवर आहेत एक स्ट्रॉबेरी एक मँगो एक चॉकलेट आणि हे फ्लेवर ची भानगड आवडत नसल्यास क्लासिक पांढरी काजु कतली ( पण मी आग्रहाने तुम्हास फ्लेवर ही टेस्ट करा असे म्म्हणेन ) माझा दावा आहे इतकी शुद्धत्तम इतकी अचुक इतकी दर्जेदार काजु कतली तुम्हास कुठेठेच मिळणार नाही दावा है एक बार जरुर आजमाइम्गा मुझे याद करोगे http://www.mahalaxmifoods.com/category/Sweets

In reply to by मारवा

अरे व्वा.. नवीन ठिकाण कळाले.. लै लै धन्यवाद. जळगांव, भुसावळ भागात एकदा फक्त भरीत खाण्यासाठी जायचे आहे. इरसाल बुवा नामक एका मिपाकराने वर्णन करून करून जळजळ करवली आहे. आणखी माहिती (शक्यतो एखादा वेगळा धागा काढून) जरूर द्या..!

In reply to by मोदक

इरसाल बुवा नामक एका दुष्ट मिपाकराने मला पदवि मिळुन प्रमाणपत्र काय मिळालं नाहि अजुन.......पगडिसहित पाहिजे :-)

In reply to by मोदक

आए हाए एक तीर जिगर के आर पार निकल गया अहो हे जे दुकान आहे ना महालक्ष्मी स्वीट्स त्या दुकानापासुन त्याच रोडवर अगदी जवळ एक बी. जे. मार्केट आहे त्या मार्केटात " कृष्णा भरीत सेंटर " नावाचे एक अगदी तसे साधेसे हॉटेल आहे. मात्र इथेच तुम्हाला एकदम ऑथेंटीक खान्देशी वांग्याचे जबरदस्त टेस्टी भरीत मिळेल. या दुकानात दोन तीन च आयटेम मिळतात एक वांग्याचे भरीत एक शेव भाजी व अजुन काही तरी आणि हो भरीत कळणाच्या भाकरी बरोबर ठेचा बरोबर ट्राय करा. मी इथे अगोदर भरीत वर ताव मारतो व मग महालक्ष्मी त जाऊन मिठाई घेतो. एका रोडवर दोन्ही काम होतात.

In reply to by मोदक

जळगावला जाऊन भरताबरोबरच १. चटणी भाकरी (पंढरपुरी डाळीपासून बनवलेली यथेच्छ तेल ओतलेली हिरवी फारशी तिखट नसलेली पातळ चटणी असते. तेल भरपूर असले तरी त्रास होत नाही. एकदा ट्राय करायला काय हरकत आहे?) (भाकरी बाजरीची असते शक्यतो). २. शेव भाजी आणि भाकरी. ३. कचोरी (तिकडच्या कचोरीला MP टच असतो). हे पदार्थ पण अवश्य ट्राय करा. आणि हो, ते कचोरी सोडून बाकीचे पदार्थ कोणाच्या घरी खायला मिळाले तरच त्याची अस्सल चव मिळेल. हाटेलात खाल्ली तर हैद्राबादेत जाऊन कामत मध्ये बिर्याणी खाल्ल्यावर जी मजा येते तीच इथेही येईल. त.टी.: मला हैद्राबादेत कामतवाल्यांनी बिर्याणी म्हणून पिवळ्या रंगाचा पुलाव दिला होता तेव्हापासून बावर्ची सोडून कुठेही बिर्याणी खायची हिम्मत झाली नाही.

In reply to by मोदक

गिर्‍हाईकासारखी क्षुद्र गोष्ट सांभाळणे चितळ्यांना आणि नोकरांना गरजेचे वाटत नाही
याला आमच्या मुंबईत माजोरडेपणा म्हणतात. कर्नाटका सारी सेंटर मध्ये पण साधारण असाच अनुभव आला. असो, लैच विस्कटून लिहिलो.

In reply to by mayu4u

गिर्‍हाईकासारखी क्षुद्र गोष्ट सांभाळणे चितळ्यांना आणि नोकरांना गरजेचे वाटत नाही
गिर्‍हाईक लाचार असल्यासार्खे दाखवत असतील तर ते तसे वागणारच . आपण पैसे देउन वस्तु घेत असु तर अशी लाचारी का दाखवावी ?

सर.. तुमच्या सौंची बौद्धिक कुवत सुद्धा ५ वर्षांपूर्वीच सिद्ध झाली आहे, नाही का?! (आता ह्यातून चांगला अर्थ काढायचा की वाईट हे तुम्ही ठरवा. सौ. विन - विन मध्येच आहेत.. नेहमीच असतात..) बाकी लेख चांगला आहे.

In reply to by पिलीयन रायडर

सौ. विन - विन मध्येच आहेत.. नेहमीच असतात..
बेशर्त सहमत! ती स्पोर्ट आहे म्हणूनच मी तिच्यावर जोक मारून पण सहीसलामत आहे :) मला सहन केल्याबद्दल तिला जीवनगौरव पुरस्कार द्यायलाच हवा!

निर्विष विनोदाचे अधिक प्रयत्न करा. पुलेशु.

एकदम खुसखुशीत पण तुमच्या बायकोला तुमचे टोमणे bouncer जात असतिल तर तुम्ही फारच सुखी वैवाहिक आयुष्य जगत आहात...

मस्त लिहिलंय! वर्णन अचूक जमलंय?

आणि लेखाचा ताळमेळ लागत नाही, प्रपंच करावा"नेट"का , जरी स्वभाव भटका, उगी चटका धरू नये उठाठेवी चा!!! मुवि संपादित बाबा संतवचने प्रकरण : संसारातील सार आणि भुसार पृष्ठ ५६ नितवाचक नाखु स्वगत : मुवि कुठे गायब झाले आहेत?

लेखन मस्तच जमलंय. खुदुखुदू हसून मजा आली. पण काही गोष्टी खटकल्या. चितळे आणि या दुकानामध्ये काहीच विशेष साम्य वाटलं नाही त्यामुळे शीर्षक अस का दिल हा प्रश्न पडला. आणि विनोदी करायचं म्हणून बायकोवर मारलेले ताशेरे काही ठिकाणी पटले नाही. उदा. “तुझा चॉईस अगदी बंडल आहे!” इति सौ. “ते पाच वर्षांपूर्वीच सिद्ध झालंय!” विजयी स्वरात मी. पण हा टोमणा कळायला एक किमान बौद्धिक कुवत लागत असल्याने, माझा बाउन्सर तिच्या डोक्यावरून वाईड! असे शेरे तर सर्रास गमतीने मारले जातात घरात. इतके कि ते कळू नयेत असं होणंच शक्य नाही.

In reply to by सही रे सई

बायकोवर मारलेले ताशेरे काही ठिकाणी पटले नाही.
जोक होता, सिरियसली घेऊ नका. वर म्हटल्याप्रमाणे, ती स्पोर्ट आहे; आणि त्यामुळे मी तिचा आदर करतो. शुभेच्छा!

लेख छानच आहे, पण शिर्षक वाचून वाटलं की, ही चितळेंची जाहिरात वगैरे आहे की काय? ज्यांना चितळे माहिती आहेत त्यांच्यासाठी लेखात चितळेंविषयी दोन शब्द जरी ओतले असते तरी सार्थक झालं असतं शिर्षकाचं. अन ज्यांना चितळे माहिती नाहीत त्यांना पूर्ण लेख वाचूनही हे शिर्षकात उल्लेखिलेले चितळे कोण? ते कसे काय माजोरडे? हे जाणून घेण्याची जिज्ञासा पूर्ण होत नाही. एकंदरीत शिर्षकाचं प्रयोजन कळलं नाहीय.

In reply to by mayu4u

तुमच्या समाधानासाठी क्षणभर असे समजूया की, चितळे माहीत नाही असे लोक अस्तित्वातच नसतात. तरी वरच्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे, चितळे माहीत असणाऱ्यांसाठी तरी लेखाच्या शिर्षकाने निराशा केलीय असं वाटतं का?

" पिलावूल्कंडी तेरेपारम्पील उषा! " चा खरा उच्चार ' पिलावूलाकंदी थ्येक्कपरामबिल उषा हाये ,पायजे तर गूगल भावू ला इचारुन बगा . याचा याकुरेट शार्टफाम पी टी उषा बर्का , आनी उगीचच कशापाई चितळ्या ना बदनाम कर्ता ओ ?. मारवाड्या च्या श्वीट शेंटर मदिल डुप्लीकेट खव्या च्या मिठाया खान्या परिस खड़ूस चितळ्या च्या वरिजनल टेस्टी मिठाया लैच भारी .

साडीच्या मोठ्या दुकानांची प्रोसेस अशीच असते. चेन्नईमधल्या आठ मजली कल्याण सिल्क सारीज , प्रत्येक मजल्यावरचे बिलिंग त्याच मजल्यावर पण सामान पहिल्या मजल्यावर किंवा तळमजल्यावर मिळणार, आधी सर्व खरेदि करुन बिलिंग करुन घ्यायचे व नंतर सगळे सामान एकत्र ताब्यात घ्यायचे. यात माजोरडेपणा नाहीये पण जास्त मजले असलेले विस्तीर्ण दुकान व्यवस्थित सांभाळायला असा खटाटोप करावा लागतो.

In reply to by कविता१९७८

अगदी सहमत आहे. लेखकाने परराज्यात जाऊन तेथील स्पेशल समजल्या जाणार्‍या गोष्टींची खरेदी केलिये मात्र त्यांची प्रॉसेस फॉलो करायला नापसंती दर्शवलिये हे जरा खटकले. नुसती गंमत म्हणून वाचायला चांगले आहे पण चितळ्यांकडील गोष्तींशी केलेली तुलना कळली नाही. त्यांच्या दुकानाची ती तर्‍हा आहे. फसवाफसवी करून गेलेले लोक, बिलींग काऊंटरला बदलल्या जाणार्‍या वस्तू असे अनुभव त्यांना आले असतील व त्यावर काढलेला मार्ग आहे. आपली लोकसंख्या इतकी आहे की कस्टमरचा विचार सध्या बाजूला ठेवला तरी गर्दी होणार अशी परिस्थिती आहे. त्यातूनही अमक्या गावात तमक्या ठिकाणी साड्यांच्या दुकानात फलाणा पद्धतीने खरेदी केल्यास अजिबात गर्दी होत नाही, गडबड उडत नाही असे उदाहरण असल्यास तिथे जावे, पण आपल्यालाही स्पेशल खरेदी करायची असते तर असे होणे अपरिहार्य आहे. त्याची कटकट होणार हेही मान्य आहे पण त्यांची तक्रार करण्यासाठी आणखी तिसर्‍याचेच उदाहरण म्हणून नाव वापरणे खटकले. खादी ग्रामोद्योहाच्या दुकानात फारशी गर्दी नसावी. तेथून खरेदी करावी. ;)

In reply to by रेवती

खादी ग्रामोद्योहाच्या दुकानात फारशी गर्दी नसावी. तेथून खरेदी करावी. ;) >> असते,असते! खादी फ्याशन वाक्य आहे!

चितळेच्या मिठाया फार बेक्कार असतात. जव़ळ जवळ सगळ्याच मिठाया सुकलेल्या कडक वाटाव्या अश्या. खाताना पाणी प्यायल्याशिवाय गिळत नाहीत. काजुकतलीचेही तसेच... सुकलेली. मिठायांना नरम पणा नसतोच. काजुकतली मधे वेलची फक्तं आणि फक्तं चितळेच घालत असावेत. चितळेच्या मिठाईच्या वाट्याला न गेलेलेच बरे. बाकरवडीला मात्र तोड नाही.

In reply to by अनामिक

चितळे बंधु च्या मिठाई मध्ये व्हरायटी तरी आहे का ? कुठलाही कराची वा घसीटा च्या इतकी बेसीक रेंज तरी आहे का ? बंगाली मिठाई च्या रेंज ची गोष्ट बाजुला ठेवा एक बरापैकी गवळी आहे चितळे दुधात प्युरीटी असते भेसळ वगैरे नाही दही तुप वगैरे ठीक हे पण जो एक जातिंवंत जसा बंगाली मिठाई वाला असतो कराची वाला असतो तसा चितळे कडे काय आहे ? बाकरवडी चा कुरकुरीत पणा ठीक है पण मिठाई त ते डिंकाचे लाडु वगैरे किती बकवास आयटेम आहेत ते डिंकाचे लाडु मिठाई म्हणून खायचे हा मिठाई चा अपमान च नव्हे का ?

In reply to by मारवा

ते डिंकाचे लाडु मिठाई म्हणून खायचे हा मिठाई चा अपमान च नव्हे का ? अगदी बरोबर. आणि डिंकाचे लाडु सुका मेवा कमी आणि खोबरं जास्तं घालून केलेले असतात. शुद्धं तुपातले म्हणून लाडू, बालुशाही ह्यांना वनस्पती तुपाचा वास असतो.

In reply to by अनामिक

खोबरंवाले डिंकलाडू ( कोपरावाळा गुंदरना लाडवा) गुजराथी प्रकार आहे. तेल काढलेलं खोबरं उर्फ डिसिकेटिड कोकोनट वापरतात.

In reply to by मारवा

महाराष्ट्रीय मिठाया किंवा गोडातले पदार्थ कोणते असतात यावर एकदा चर्चा करुयात. बंगाली असो किंवा दुसरी कोणतीही मिठाई महाराष्ट्रातले, तेही पुण्यातले चितळे का ठेवतील? (ठेवायची असली तर ठेवतील पण न ठेवल्यास चुकीचे ठरणार नाही) महाराष्ट्रीय श्रीखंड हे गुजराथी श्रीखंडापेक्षा वेगळं असतं. महाराष्ट्रातही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं बनत असतं. त्यावरून माझी गुज्जु मैत्रिण आपल्याकडील श्रीखंडाला श्रीखंड मानायलाच तयार नाहीये. मग आता काय करायचे? आता नोकरदार मंडळींची आवक जावक पुण्यात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढल्याने त्यांना आपल्या गावची आठवण येते व ते चितळ्यांकडी (किंवा काका हलवाईकडील, घोडक्यांकडील) पदार्थ वेगळे आहेत म्हणण्यापेक्षा वाईट आहेत म्हणतात. मला आताशा चितळ्यांकडील मिठाई, बाकरवडी वगैरे फारशी आवडत नाही पण दुसरीकडे आवडेल अशी मिळतही नाही. त्यातल्यात्यात काका हलवाईकडील आंबा बर्फी चितळ्यांपेक्षा मऊ आहे. पदार्थ टिकणे न टिकणे, त्यातून दुधापासून बनलेले हे गणित वेगळे आहे. बदलत जाणारी टेंपरेचरे (आठवा, पूर्वी दिवाळी आतासारखी खोडी पुढे मागे आली तरी पहाटे भरपूर थंडी असायची, आता नसते) पाहता त्यांनाही मिठाई ड्राय करावी लागत असेल का हा विचार करतिये. ड्राय आंबा बर्फी मलाही आवडत नाही पण पूर्वी अशी नव्हती हेही माहितिये. जे कोणी अमक्या गावात असं नि तसं म्हणतायत, तिथे असेच परगावचे नोकरदारांचे लोंढे भविष्यात घिरट्या घालू लागले की सामाजिक जीवनावर चांगला, वाईट परिणाम झालेला दिसेल. जे आत्ता तिथे आहे ते टिकेलच असेही सांगता येत नाही. पूर्वी दिवाळी किंवा सणावाराचे पदार्थ घरी करण्यावर भर असे. अशात हलवायांकडील जिन्नस किती खपणार? विकत आणणे हे शरमेचे समजले जाई. आता आम्हाला फराळ विकत आणायला काही वाटत नाही. बदल असणारच! डिंकाचे लाडू चितळ्यांचे खाऊन पाहिले नाहीत पण ते कसे दिसतात हे पाहिले आहे. आवडतील असे वाटत नाही. डिंकाचे लाडू हे बाळंतिणीसाठी किंवा थंडीत खायला म्हणून केले जातात. ते घरचे असावेत असा बेसिक नियम आहे. ज्यांना जमतच नाही अश्यांसाठी पर्याय नाही. आपल्याला करायला जमत नाही आणि हवे तर आहे, मग जे उपलब्ध आहे ते घ्यावे (मी घरी करते). डिंकाचे लाडू ही मिठाई आहे की नाही हे तपासायला हवे. रव्याचे लाडू, बेसनाचे लाडू या मिठाया आहेत का?

In reply to by रेवती

बदलत जाणारी टेंपरेचरे (आठवा, पूर्वी दिवाळी आतासारखी खोडी पुढे मागे आली तरी पहाटे भरपूर थंडी असायची, आता नसते) पाहता त्यांनाही मिठाई ड्राय करावी लागत असेल का हा विचार करतिये. त्यांची गणितं तेच जाणोत. पण बदलत जाणारी टेंपरेचरे हे कारण नसावं, तसं असतं तर नागपुरात हल्दीराम, हैद्राबादमधे दादूज किंवा स्वीट बास्केट ह्यांनीही तेच केलं असतं. वेगळ्याला वाईट म्हणत नाहिये तर जे वाईट आहे त्यालाच म्हणतोय. चितळेंचा साधा पेढा हा सुद्धा ड्राय असतो, १-२ दिवस उन्हात वाळत ठेवला की काय असं वाटण्या एवढा. तरी लोकांना तो आवडत असेल तर धन्य आहे. पण एकदा नाव झालं की काहीही खपतं ह्याचं चितळे एक उदाहरण म्हणता येईल. मला पुण्यात आवडेल असं मिठाईचं दुकान मिळालं नाही अजून. त्यातल्या त्यात मगरपट्ट्यात एक दुकान आहे जिथे आताशा काजुकतली, मलई पेढा आणि रस मलई चांगली मिळू लागली आहे. बेस्ट मोतीचुर लाडू पुण्यात कुठेही मिळाले नाहीत.

In reply to by अनामिक

नाव झालं की काहीही खपतं हे तर सगळीकडेच असतं. अनेक उदाहरणे मीही सांगू शकीन. जौ द्या! उगीच साड्यांच्या दुकानाच्या धाग्यावर नको. वेगळा धागा काढूयात की!

In reply to by अनामिक

इतक नाव नाही मला अचुक सांगता येणार नाही पत्ता पण पान मिठाई खाल्ली तर त्याची चव अजुन जिभेवर आहे. किती सुंदर क्रिएटीव्ह मिठाई बनवतात पानाचा आणी मिठाईचा स्वाद एकत्र संतुलन न बिघडवता. चितळेंकडे असल्या मिठाया मिळत नाहीत बहुधा माझ्या माहीतीप्रमाणे आणि हो चितळ्यांनी बरे केले उगाच महाराष्ट्रीयन मिठाईच विकेल असा बाणेदारपणा दाखवला नाही या भानगडीत पडले असते तर काय झाले असते सर्वात स्टार आयटेम बाकरवडी देखील महाराष्ट्रीयन नाहीच तो गुजराती आहे चितळेंनी कसा कॉपी पेस्ट केला किती चांगली कॉपी केली वगैरे स्टोर्या ही डिंकाच्या लाडवाच्या चिवट पणा ने सांगितल्या जाताअत बंगाल्याने म्हटले मेरे पास रसगुल्ला है मिष्टी है मारवाड्याने म्हटले मेरे पास घेवर है फिणी है तर चितळे काय म्हणाले असते बाणेदार पणे मेरे पास श्रीखंड है मेरे पास डिंक के लाडु है ?

विनोदी लेख असला म्हणून काय झालं ? चितळे आणि पुणे यांचा उल्लेख आला की विनोदाला उताणा पाडून चिकित्सा होणारच. नाहीतर पुण्याला पुणे कसं म्हणणार? ;-) धागा खुसखुशीत छान. खुद्द याच दुकानात खरेदी केलेली असल्याने संपूर्ण वर्णन भिडलं.

पुणेकर असुन देखील चितळे बंधु मध्ये जाण्याचा योग आला न्हवता आणि एक दिवस आला तो असा. गुढीपाडवा होता. आदल्या दिवशी गोड काय आणायचं त्यावर छोटेखानी चर्चा झाली. बासुंदी आपली एकदम फेवरेट म्हनुन मी तिकडं जोर देऊ लागलो. ''इतकी वर्ष पुण्यात राह्तोय आणी चितळेचं तोंड पण नाय पाहीलं'' असला कायतरी फालतु युक्तिवाद करुन मी चितळे यान्ची 'बासुंदी' चा निर्णय पास करुन घेतला. तरी आई म्हनाली, ''कुठं जातो तिकडं बोम्बलत, आपल्या घरापशी एवढ्या डेर्‍या आहेत, तिथुनच कायतरी आन'' तसं मी 'इतर डेर्‍या आणि चितळे बंधु' हा फरक स्पष्ट करुन टाकला, आणि बहुमत मिळवलं व विजयी मुद्रेत वावरु लागलो. झालं , गुढीपाडवा चा दिवस उजाडला, तसं मला 'चितळे बासुंदी' चे वेध लागु लागले त्या प्रमाणे मी मार्गस्थ झालो. राहायला कोथरुडला, तरी अधले मधले २/३ चितळे सोडुन, 'कोर चितळे' म्हणुन विश्रामबाग वाड्याच्या चितळे मध्ये जोशात वेन्ट्री केली. दुकान एकदम झाकपाक होतं, तुडुंब गर्दी होती. योग्य ठिकाणी आल्याचा भास होऊ लागला. गेल्या गेल्या हातामध्ये बशी च्या आकारा एव्ढं टोकन ठेवण्यात आलं, म्हणलं 'वा काय शिश्टीम आहे काय नियोजन आहे' माझ्या निर्णयाचा मला गर्व होऊ लागला. माझा नंबर आला, तसं मी फुल चॉन्फीडन्स मध्ये ऑर्डर दिली '१ किलो बासुंदी द्या' तसा पलीकडुन प्रतीसाद आला ''द्या डबा'' , एकदम बाऊंसर आला ना, मी विचारलं 'कसला डब्बा?' पलीकडुन ''बासुंदीसाठी'' परत मी '' डब्बा नाहीये, '' परत पलीकडुन '' डबा असेल तरच बासुंदी मिळेल'' मी '' बॅग मध्ये द्या की'' पलीकडुन ''बॅग मध्ये नाही देत'' " अहो, आत्ताच्या जमान्यात हे डब्बा वगेरे जरा जास्त नाय वाटत का तुम्हाला?पॅके़जिन्ग मध्ये एव्ढ्या सुधारणा होतायत आणि तुम्ही कुठं आम्हाला बासुंदी साठी डब्बा आणायला सांगताय '' जरा वैतागुनच बोललो, तसा पलिकडचा इसम माझाकडं अजुन खऊन बघु लागला आणि परत त्याची डब्ब्याची कॅसेट टाकली. ईडन गार्डन वर प्लॅश्टिक बॉल ची मॅच चालल्यागत वाटु लागलं, ती पण अंडरआर्म. मला आता जरा अती झाल्या सारखं वाटत होतं, चितळे बंधु ना रामराम ठोकला तो शेवटचाच. पुण्याचा स्वाभिमान अजुन काय :) जाताना आमच्या जवळच्या अमराळे डेअरी मध्ये गेलो, बासुंदीची ऑर्डर दिली सोबत डबा नाहीये हे आधीच सांगीतले, तेव्हा ते पोरगं म्हनालं ''डब्बा? तो कशाला पाहीजे? देतो कि पॅक करुन मी'' काल दिवाळी साठी या डेअरी मधुनच बासुंदी आणली होती. चितळे माहीत नाही, पण ही बासुंदी जाम आवडली :)

In reply to by विखि

पण याला माजोरडेपणा नाही म्हणायचं बर्का! शिस्त किंवा बाणेदारपणा म्हणत असावेत पुण्याकडे. आमच्या मुंबईत याला "चु" ने सुरु होणारा एक शब्द वापरतात.

झकास... ~इनस्विंगिंग यॉर्कर. क्लीन बोल्ड. जमिनीवर पडलेला माझा चेहरा उचलून घेत मी फर्स्ट फ्लोर कडे~ खूप हसलो

चांगली मिठाई सध्या मला सिंहगड रोडवरील जोशी स्वीट्स मध्ये मिळते रांका ज्वेलर्स समोर. बाकी चितळे कडे पुर्वी लहान असताना जायचो पण गेल्या कित्येक वर्षात हिम्मत केलेली नाहीये जायची :) जोशी स्वीट्स मध्ये मस्त व fresh माल असतो तेथील sandwich ढोकळा आणि साधा ढोकळा पण खास असतो.

पण चितळेंच नाव टाकला नसतं तर एवढा टी.आर.पी. मिळाला नसता.