आज ब्ल्यू हैं पानी पानी...
आज ब्ल्यू हैं पानी पानी
परवा कपाटाची आवरा-आवर करताना माझा आवडता Arrow चा पांढरा शर्ट दिसला. पांढरा शर्ट घालणे म्हणजे माझ्यासाठी 'पांढरा हत्ती' पोसण्याइतके अवघड काम आहे. पांढराशुभ्र शर्ट मी माझ्या अब्रु इतका जपतो. सर्फ एक्सेल कंपनीसाठी भले 'दाग अच्छे' असतील, पण पांढऱ्या शर्टसाठी अजिबात नाही. छोटासा डाग देखील पांढऱ्या रंगावर ठळकपणे दिसतो. म्हणून चुकूनही डाग पडू नये म्हणून सतत काळजी घ्यावी लागते. कधीनव्हे तो पांढरा शर्ट घालावा आणि नेमकी त्याच दिवशी घरी आवडती उडदाची आमटी असते. आमटीचे मनसोक्त भुरके मारताना शर्टवर एखादा शिंतोडा उडण्याची भीती. एरवी व्यवस्थित चालणारं पार्कर पेन नेमकं ह्याच दिवसही खिशाला लावल्यावर गळण्याची शक्यता असते.
बऱ्याच दिवसात ऑफिसला पांढरा शर्ट घातला नाही तर घालावा असा विचार मनात आला. वॉशिंग मशीन मध्ये इतर कपड्यांबरोबर पांढरे कपडे टाकू नये म्हणतात. मग अजून १-२ पांढरे शर्ट-टी शर्ट धुवायला काढले. तरी देखील ३ कपड्यासाठी वॉशिंग मशीन लावणे जीवावर आलं. शिवाय मशीन मध्ये कॉलर नीट स्वच्छ होत नाही म्हणून स्वतःच कपडे धुण्याचे ठरवले.
कोमट पाण्यात वॉशींग पावडर घालून भरपूर फेस केला आणि कपडे तासभर भिजायला ठेवले. नंतर ब्रशने घासले आणि १-२ वेळा सध्या पाण्यातून काढले. कॉलर नीट निघाली नाही म्हणून लिंबाचा रस लावला पण तरी विशेष फरक पडला नाही. काय करावे अश्या विचारात असताना बाथरूमच्या कोपऱ्यात 'उजाला सुप्रीम' ची बाटली दिसली आणि माझा चेहरा 'उजळला'. ह्यापूर्वी नीळ प्रकार मी कधी वापरला नसल्याने बाटलीवरच्या 'Instructions' वाचल्या. लिटरला ४ थेंब हे प्रमाण होतं. बादली पाण्याने निम्मी भरत आली होती. १०-१२ थेंब पुरतील ह्या विचाराने घाईघाईने बाटली उलटी केली आणि घात झाला! बादली शेजारी असलेल्या Arrow च्या शर्टवर त्यातले अनेक थेंब उडाले! शाईचा छोटा ठिपका शर्टवर पडल्यावर हळहळणारा मी... आणि इथे तर अख्खा शर्ट जांभळा-निळा झाला होता. व्हाईट ऐवजी वाईट शर्ट झाला! मनात विचार आला कि नीळ चा डाग शाईसारखा नसणार. नीळ जर कपडे पांढरेशुभ्र करण्यासाठी वापरतात तर मग ह्याचाच डाग बहुदा पडणार नाही. लगेचच साध्या पाण्यात शर्ट बुडवला आणि ब्रशने घासला. नाही म्हणायला डाग थोडे फिक्कट झाले पण विशेष उपयोग झाला नाही. 'कुंपणानेच शेत खाल्लं' तर तक्रार कोणाकडे करायची? हे म्हणजे चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी कुत्रा पाळावा तर कुत्र्याने उलट मालकावरच भुंकण्यापैकी आहे!
'उजाला' बनवणाऱ्या ज्योती लॅब्स च्या विरोधात तक्रार करावी असा विचार आला. पत्ता बघण्यासाठी बाटलीमागे पाहिलं तर तिकडे 'Do not directly put on the clothes' असं लिहिलंय. त्यामुळे तो मार्ग देखील बंद झाला. नीळ चा डाग काढण्यासाठी 'संकटमोचन गूगल' कडे धाव घेतली. नीळ ला इंग्रजीत काय म्हणतात ते आठवेना. मग 'Ujala Supreme stains' असा सर्च मारला. हे डाग कसे काढायचे हे सापडलं नाही पण 'उजाला मुळे कपडे पांढरेशुभ्र होत नाहीत, केवळ निळी शेड आल्याने पांढरेशुभ्र असल्याचा आभास होतो' ही ज्ञानात भर पडली.
तूर्तास ह्या शर्टचे काय करावे हा प्रश्न आहे. घरीच ४-५ वेळा धुवून बघावे किंवा ड्रायक्लिनींगला टाकावे असा विचार आहे. आगामी थंडीत स्वेटरच्या आत हा शर्ट घालता येईल. हेही नाही जमलं तर होळी- रंगपंचमीला हा शर्ट घालायचा विचार आहे.
सर्फ एक्सेल, एरियल बनवणाऱ्या कंपन्यांना आवाहन आहे कि लोकांच्या घरी जाऊन चांगल्या स्वच्छ कपडयावर रस्साभाजी, तेल वगैरे ओतून स्वच्छ करून दाखवण्याऐवजी माझ्या शर्ट वरचे निळीचे डाग काढून दाखवा. माझ्या हातचा मसाला चहा पाजीन. त्याबरोबर कॉलर देखील स्वच्छ निघाल्यास बिस्किटे देखील देईन.
मित्रहो, तुम्हाला देखील काही तोडगा माहिती असल्यास ह्या विषयावर 'उजाला' टाकावा हि विनंती.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
Vanish वापरुन बघा.
अता अजून थोडा उजाला घ्या...
इंडीगो हि डायच असते. प्रॉपरली
पांढरा शर्ट आहे ना? मग ब्लिच
पतंजली पेस्ट वापरा
त्या डागा वर पतंजली एडवांस
म्हनजे हमखास ब्लीच हाये
+१००
डागा वर पतंजली एडवांस टूथपेस्ट
पूर्वी पिवळे पडलेल्या बनियनला
पांढरा शर्ट
अवांतर
लक्स
पंतजलीची प्रिमीयर पावडर मधे
एकवेळ
"ala" वापरुन पहा .