हंपी: भाग ४ - दिवस पहिला - दारोजी अस्वल अभयारण्य

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
11 Sep 2017 - 11:22 am

हंपी: भाग १ - दिवस पहिला- चंद्रशेखर आणि सरस्वती मंदिरं

हंपी: भाग २ - दिवस पहिला- राजवाडा परिसर- भाग २

हंपी: भाग ३ - दिवस पहिला - हजारराम मंदिर आणि पानसुपारी बाजार

.........हजारराम मंदिर बघून होईता दुपारचे जवळपास अडीच तीन वाजले होते. आता जेवण करुन जायचे होते ते हंपीपासूनच जवळच असलेले एक अनोखे आकर्षण बघायला. ते म्हणजे भारतातील एकमेव असलेले अस्वल अभयारण्य. अर्थात दरोजी स्लॉथ बेयर सॅन्क्चरी.......

दारोजी अस्वल अभयारण्य हे हंपीच्या अगदी जवळ म्हणजे सुमारे १५ किलोमीटर अंतरावरच आहे. हे भारतातलं पहिलं अस्वल अभयारण्य. ह्याची स्थापना १९९४ साली झाली. इथला जंगलभाग आपल्या नेहमीच्या दाट जंगलांसारखा नाही. तो बहुतांशी खुरड्या, काटेरी झुडुपांचा आहे. किंबहुना इथले खडकाळ जमिनीवर झाडी उगवणेही तसे अशक्य. तथापी आज इथे ही जी वनसंपदा दिसतेय ती वनखात्याच्या अथक परिश्रमाने, कारण ही इथली झाडी नैसर्गिक नाहीत, अथक वनीकरण करुन आजची इथली समृद्ध हिरवी वनसंपदा निर्माण केली गेली आहे. इथल्या टेकड्यांवरील प्रचंड मोठ्या दगडांत असलेल्या कपारींत अस्वलांना लपायला मुबलक जागा आहे. जवळपास दोनशे अस्वले येथल्या परिसरांत आहे असे सांगण्यात येते. ह्या अस्वल अभयारण्याला काहीसा पौराणिक आधार देखील आहे. किंष्किंधा नगरीपासून (हंपी) जवळ असलेले ऋक्षराज जांबवंतांचे राज्य येथलेच असे येथे मानले जाते. अस्वलांशिवाय येथे मोर, माकडे,बिबटे, कोल्हे, मुंगूस, रानडुकरे आदी प्राणी सुद्धा येथे आढळतात. मोर आणि रानडुकरे तर येथे विपुल प्रमाणात आहेत.

आम्ही हंपीहून येथे येण्यासाठी दुपारी साडेतीनला निघालो ते जेमतेम अर्ध्या तासात दारोजी अस्वल अभयारण्याच्या प्रवेशद्वारावर येऊन पोहोचलो. दारोजी अभयारण्यात यायचे असेल तर दुपारीच यावे लागते कारण हे अभयारण्य सकाळी खुले नसते. ह्याची वेळ आहे दुपारी २ ते संध्याकाळी ६. स्वतःचे वाहन असेल तर येथे येणे अत्यंत सोयीचे आहे. ते जर नसेल तर हंपीहून भाड्याने कार किंवा रिक्षासारखी वाहतुकीची साधने मिळू शकतात पण ते खूप महाग जाते. अर्थात हंपीहून येथे भाड्याने बाईक घेउन येणे स्वस्त पडते. अभयारण्यात प्रवेश फी ही एका चारचाकी वाहनाला ५०० रु. आणि प्रती माणशी ५० रु. अशी आहे जी अर्थातच खूप जास्त वाटते. येथे तिकिट घेऊन आणि वनखात्याच्या नोंदवहीत नोंद करुनच आपल्याला पुढे जाता येते.

अभयारण्यातील रस्ता हा कच्चा आहे. ह्या रस्त्याने जातांना असंख्य मोर आपल्या दृष्टीस सतत पडत असतात. मात्र अस्वलांच्या मुख्य प्रदेशाच्या गाभ्यात जायचे रस्ते हे विविध प्रवेशद्वारे तसेच कुंपणे लावून प्रवेश प्रतिबंधित केलेला आहे. सर्वसामान्यांना अस्वलांचे निरिक्षण करण्यासाठी प्रवेशद्वारापासून सुमारे ४ किलोमीटर वनखात्याने एका टेकडीवर एक निरीक्षण मनोरा बांधलेला आहे. टेकडीवर जाणार्‍या सुमारे सत्तर पायर्‍या चढून आणि प्रचंड मोठ्या खडकांमधून वाट काढतच आपला प्रवेश निरिक्षण मनोर्‍यावर होतो. मनोर्‍याच्या समोरच सुमारे २००/३०० मीटर असणार्‍या टेकड्यांवरील खडकांच्या कपारींत अस्वलांचे वास्तव्य आहे. ही अस्वले जर बघायची असतील तर आपल्याजवळ उत्तम दर्जाची दुर्बिण किंवा टेलीफोटो लेन्स असलेला कॅमेरा असणे अत्यावश्यक आहे. ही साधने जर आपल्याजवळ नसतील तर येथे येऊच नये असे मी म्हणेन कारण येथून जी अस्वले किंवा इतर प्राणी दिसतात ते अक्षरशः एखाद्या ठिपक्यासारखे दिसत असतात. इथल्या विस्तृत परिसरातील राखाडी, तांबड्या हिरव्या रंगाच्या नैसर्गिक कॅमोफ्लाजमुळे प्राणी दुरुन पटकन ओळखणे सुद्धा अवघड होते.

निरिक्षण मनोर्‍याकडे जाणारा रस्ता

a

मनोर्‍यावरुन दिसणार्‍या खडकाळ टेकड्या (ह्याच कपारींमध्ये अस्वलांचे वास्तव्य आहे)

a

अर्थात अस्वले जरी येथून लांबवर दिसत असली तरीही येथे अस्वले दिसण्याची शक्यता खूपच जास्त आहे. कारण वनखात्याचे लोक दुपारी येउन येथील कपारींनजीकच्या खडकांवर गूळ, मधाचे मिश्रण पसरवून जातात. दुपारी चारच्या सुमारास हे मिश्रण खाण्याच्या मिषाने अस्वले हमखास बाहेर पडतात व त्यांचे दर्शन आपणांस होते. मला व्यक्तिशः हे असे मिश्रण खाण्यास देणे आवडले नाही कारण त्याने प्राणी परावलंबी होऊन स्वतःचे अन्न स्वत: मिळवण्याच्या दृष्टीने अक्षम होतात. अर्थात इथल्या ओसाड, रूक्ष भागामुळे प्राण्यांना नैसर्गिक अन्न मिळवणे तसेही अवघडच आहे.

मनोर्‍यावरुन चहुबाजूचा परिसर अतिशय सुंदर दिसतो. इथल्या भव्य प्रस्तरांत, खुरट्या झाडीत एक वेगळेच सौंदर्य आहे. मधूनच एखादा तांबट पक्षी कुटुर्र कुर्र अशी साद घालत होता. तर कुण्या जोडीचे प्रणयाराधन चालले होते.

a

a

तर वेडा राघू झाडाच्या फांदीवर ध्यानस्थ बसून भक्ष्य टिपण्याची वाट बघत होता.

a

हे पक्षी दिसत असतानाच समोरील कपारीमधून अस्वल चालत आले. ही भारतीय काळी अस्वले संथ असतात, गूळ, मध, फुले, किटक हे त्यांचे प्रमुख खाद्य. सहसा शांत असलेली ही अस्वले ही प्रसंगी खूप हिंसक होतात. त्यामुळे ह्यांच्या जवळ न जाणेच हिताचे.

कपारीतून बाहेर आलेले अस्वल

a

a

a

तुम्ही जर नशिबवान असाल तर तुम्हाला येथे एक अविस्मरणीय दृश्य दिसू शकते ते म्हणजे पिल्लांसहित असलेल्या अस्वलमादीचे. आमचे नशिब जोरावर असल्याने आम्हाला दोन पिल्लांसह बाहेर आलेल्या मादीचे दृश्य पाहावयास मिळाले. पिल्लांसह असलेली अस्वलमादीचे दृश्य बघणे हे वर्णनातीत असते कारण मादी आपल्या पिल्लांना पाठुंगळी घेऊन हिंडत असते. मध्येच पिल्लांचे तिच्या पाठीवरुन उतरणे, परत तिच्या पाठीवर बसण्याची चढाओढ बघायला फार मजा येते.

दोन पिल्लांसह असलेली अस्वल मादा

a

a

आईच्या पाठीवर बसण्यासाठी होणारी चढाओढ

a

a

a

अस्वलबाळांच्या लीला पाहात असतानाच एक भला थोरला रानडुक्कर नजरेस पडला. इतका भलाप्रचंड डुक्कर मी आयुष्यात ह्याआधी कधी पाहिला नव्हता. दूर अंतरावरुनही तो अगदी सुस्पस्टपणे दिसत होता.

a

a

a

रानडुकराच्या आजूबाजूने मोर सुखैनैव चरत होते.

a

a

थोड्यावेळाने डोंगरकडा उतरुन रानडुक्कर थेट रस्त्याजवळ आला आणि तिथल्या दगडांवर आपले सुळे घासू लागला

a

सुळ्यांना धार करुन झाल्यावर तिथल्या दगडांवर फासलेले गूळ मधाचे मिश्रण खाऊ लागला

a

a

इतक्यात भर उन्हाळ्यातही एक मोर पिसारा फुलवून नाचू लागला

a

इकडे लांबवर अस्वले दिसतच होती.

a

मध्येच एखादा मोर डौलदारपणे फिरत होता.

a

हे सर्व बघता बघताच सूर्य मावळू लागला व आम्ही निघायची तयारी सुरु लागलो. मगाशी वर सांगताना एक महत्वाची गोष्ट विसरलो. येथे येताना पाण्याची बाटली आणणे आवश्यक आहे कारण संपूर्ण अभयारण्यात पिण्याच्या पाण्याची सोय कुठेही नाही.

इथल्या समृद्ध वनप्रदेशाचे अल्पसे दर्शन घेऊन आम्ही साधारण सहा साडेसहाला येथून निघालो ते साडेसातपर्यंत कमलापूरला आलो. हॉटेलवर जरा फ्रेश होऊन आम्ही निघालो ते इथल्या सुप्रसिद्ध अशा विरुपाक्ष मंदिरात जायला. हंपीचा इतर सर्व परिसर गडद काळ्या अंधारात बुडून जात असताना इथले चैतन्य रात्रीही सुरु असते ते आजही एका प्रमुख देवस्थानांमध्ये गणल्या जाणार्‍या विरुपाक्ष मंदिरात. त्याविषयी पुढच्या भागात.

a

क्रमशः

प्रतिक्रिया

प्रीत-मोहर's picture

11 Sep 2017 - 12:25 pm | प्रीत-मोहर

सुरेख!! आम्ही गेलो नाही इथे तेही बरेच झाले.

अजया's picture

11 Sep 2017 - 12:28 pm | अजया

छान दिसतंय हे अभयारण्य. भरपूर बघायला मिळाले.

वा! क्या बात है! छायाचित्रे विशेष आवडली.

या लेखाचीच वाट पाहात होतो. इतके जवळ - कमलापुर- पट्टभिराम मंदिरापासून बारापंधया किमी - असूनही येथे जाणारी बस नसल्याने राहिलं ते फोटोंतून दिसलं.
अस्वल मादा - हिंदीतले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Sep 2017 - 1:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

बरेच दिवस वाट पहायला लावलीत. आता पुढचे भाग भराभर टाका.

वर्णन आणि फोटो नेहमीप्रमाणेच सुंदर ! इतका रखरखीत प्रदेश असूनही बरीच प्राणीसंपदा आहे तिथे.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Sep 2017 - 4:24 pm | अत्रुप्त आत्मा

सगळ्या प्रतीसादाला प्लस वन.

खूप उशीरा उशीरा टाकतो भाग आगोबा! ल्लूल्लूल्लूल्लू!

पैसा's picture

11 Sep 2017 - 2:21 pm | पैसा

मस्त झालाय हा भाग!

यशवंत पाटील's picture

11 Sep 2017 - 2:41 pm | यशवंत पाटील

अरे वा, हे झकास आहे.
आता आधिचे तिन लेख पण वाचुन काढतो.

शलभ's picture

11 Sep 2017 - 5:51 pm | शलभ

मस्तच फोटो..

पद्मावति's picture

11 Sep 2017 - 6:00 pm | पद्मावति

मस्तच!

स्रुजा's picture

11 Sep 2017 - 6:33 pm | स्रुजा

अरे वा ! किष्किंधा म्हणजे हंपी माहिती नव्हतं.. अप्रतिम आलेत फोटोज !

दुर्गविहारी's picture

11 Sep 2017 - 8:04 pm | दुर्गविहारी

वा!!! वाचताना मजा आली. अस्वलासारख्या काहीश्या बिनडोक प्राण्याचे अभयारण्य म्हणजे थोडे आश्चर्य वाटले. मलाही या प्राण्याविषयी कुतुहल आहेच. नक्की भेट देणार याला. ही माहिती समोर आनल्याबध्द्ल धन्यवाद.

नीलमोहर's picture

11 Sep 2017 - 10:49 pm | नीलमोहर

इथले लॅण्डस्केपही अगदी टिपीकल हंपी आहे. हंपीचे ते खडकाळ डोंगर हा तिथला अत्यंत आवडलेला वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे.
त्या खडकाळ टेकड्या आणि कपारी भारीच, वेगळे काहीतरी पाहिल्याचा अनुभव याठिकाणी नक्कीच येत असेल.
तो पिसारा फुलवून नाचणार्‍या मोराचा फोटो आहे, त्याजवळ छोट्या गोल दगडांची काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण रचना दिसत आहे.

याहून जास्त जवळून अस्वले पहायची असल्यास बंगलोरच्या बनेरगट्ट अभयारण्यात जीप सफारीत पहायला मिळतात, अगदी उदंड.

मस्त रे .. ठिकाण भारी दिसतंय..

मस्तच! पिल्लांची आईच्या पाठीवर बसण्यासाठीची चढाओढ गोडच :)

संत घोडेकर's picture

12 Sep 2017 - 9:33 am | संत घोडेकर

सुंदर सफर

जुइ's picture

15 Sep 2017 - 3:15 am | जुइ

अस्वलमादी आणि पिल्ले पाहून खूप मजा वाटली!!

पुढचा भाग आला का? कधी येणार?

चौथा कोनाडा's picture

29 Mar 2021 - 5:27 pm | चौथा कोनाडा

व्वाम भारी आहे, अस्वल अभयारण्य!
अस्वल अभयारण्य असतं हे पहिल्यांदाच वाचण्यात आलं !
फोटोज नेहमी प्रमाणे अप्रतिम !
कपारींचा खुरटाप्रदेश जबरी दिसत आहे !