Skip to main content

बाप्पाचा नैवेद्यः बेसनाच्या वड्या

लेखक रेवती यांनी शनिवार, 26/08/2017 07:43 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- दोन मेजरिंग कप्स बेसन, एक मेजरिंग कप साखर, साखरेच्या अर्धे पाणी, पाऊण मेजरिंग कप साजूक तूप, अर्धा मेजरिंग कप दूध, आवडीप्रमाणे बदामकाप, काजूचे काप, वेलचीपूड एक टीस्पून. कृती- प्रथम ४ टेबलस्पून तूप व सर्व दूध घालून बेसनाला दोन्ही हातांच्या तळव्यांनी चोळून घेणे. हे मिश्रण जाड चाळणीने चाळून घेणे. जड बुडाच्या पातेल्यात किंवा कढईत उरलेले तूप घालून बेसन परतण्यास सुरुवात करावी. सतत हलवत रहावे नाहीतर तळात बेसन करपेल. आंच मध्यम ठेवावी. मी लहान बर्नरवर मध्यम आंच ठेवली होती. आधी परतायला जड वाटणारे मिश्रण परतले जाईल तसतसे हलके होऊ लागेल. रंग फार बदलू देऊ नये. खमंग वास येताच ताटात बेसन काढून गार होण्यास ठेवावे. त्याच पातेल्यात मोजून ठेवलेली साखर व पाणी घालावे. ज्यांच्याकडे कमी गोडीची साखर मिळते त्यांनी दोन टेबलस्पून जास्त घ्यावी. आपल्याला एकतारी पाक तयार करायचा आहे. तो होताच वेलचीपूड व बेसन घालावे. नीट हलवून गॅस बंद करावा. तूप लावलेल्या ट्रेमध्ये मिश्रण घालून वरून बदामाचे काप लावून सजवावे. दहा ते पंधरा मिनिटांनी वड्या पाडाव्यात व थंड झाल्यावर काढाव्यात. बर्फी मऊ हवी असल्यास बेसन पाकात घातल्यावर लगेच आंच बंद करावी. खुटखुटीत वड्या हव्या असल्यास आणखी एखादा मिनिट परतावे. . . 1

वाचने 10993
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया


रेवाक्का, खूप सुरेख आहेत ग या वड्या.. मस्त फोटो. पाक म्हटलं की हादरतेच मी. पण आता या नक्की करून पाहीन.

आम्ही गुजराती त याच वड्यां ना मोहनथाल म्हणतो, फरक इतकाच की , अगदि रंग बदले पर्यंत , खमंग भाजायचे. पण या वड्या लाडवां पे़क्शा टिकतात कमी

वाह... मस्त, यम्मिलिशस् वड्या. फोटो देखील अप्रतिम. एक प्रश्न - यांची चव बेसन लाडवा सारखीच लागते का?

छान पा़कृ ! बेसनाच्या वड्या म्हणल्यावर माझ्या आईच्या हातच्या बेसनाच्या वड्यांची आठवण झाली !!

आगद साजूक दिसताहेत की वड्या ! बरेच दिवस शोधत होते ही पाकृ जालावर. पण नीट होत नव्हत्या. आता करून बघेन !