मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बाप्पाचा नैवेद्यः दलिया खीर

इडली डोसा · · पाककृती
मी काही फार सुगरण नाही आणि बाप्पासाठी छान छान खाऊ करायला सुगरण असायची खरंतर गरजच नाही. दलियाची खीर आहेच अशी सहज सोपी आणि पटकन होणारी. शिवाय कोणालाही करता येईल अशी. बाप्पापण खूश आपण पण खूश. आमच्या इथे सज्जनगडावर नेहमी हा प्रसाद असतो, सगळ्यात पहिल्यांदा ही खीर मी गडावरच खाल्ली. आता स्वत: करत असले तरी गडावरच्या खिरीची सर माझ्या खिरीला मुळीच नाही. तरी प्रयत्न चालू आहेत , त्यातलाच एक प्रयत्न या गणेशोत्सवातला इथे सगळ्यांसाठी देत आहे. चला तर मग घ्या साहित्य दलिया - १ कप गूळ - १ कप (मी एक कप गूळ पावडर वापरली आहे) तूप - २ मोठे चमचे दूध - १ कप पाणी - २ कप सुके खोबरे कीस - १/४ कप वेलदोडा पूड - ४ वेलदोड्यांची पूड काजू - ८-१० मनुके - १२-१५ पिस्ता पूड - ५-६ पिस्त्यांची सजावटीसाठी स्ट्रॉबेरी कृती - छोट्या भांड्यात किंवा कुकरमध्ये तूप गरम करायला घ्या. त्यात मनुका, काजू आणि दलिया एकत्रच परतायला घ्या. अगदी २-३ मिनिटं मध्यम आचेवर परतून झाल्यावर यात पाणी टाका, पाणी थोडं कोमट झाल्यावर (साधारण एक दोन मिनिटात ) यात गूळ, वेलदोडा पूड, खोबऱ्याचा कीस घाला. मिश्रण ढवळून एकत्र करा. आता यात दूध घाला. परत एकदा मिश्रण ढवळा. कुकर मध्ये करत असाल आणि गॅसचा स्टव्ह टॉप असेल तर माध्यम आच करून १० - १२ शिट्ट्या करा आणि गॅस बंद करा. झाली खीर तयार.
kheer
माझा फ्लॅट टॉप इलेक्ट्रिक स्टव्ह आहे त्यात पूर्वी कुकरमध्ये खीर तळाला थोडी करपली होती (खोबरं घातलं असेल तरच करपते ). नुसतीच झाकून ठेवली तरी चांगली शिजते, मधून एक दोन वेळा खिरीचं मिश्रण ढवळलं आणि तळाला चिकटलं नाहीये याची खात्री केली की झालं. अर्ध्या तासात खीर झाली सुद्धा. गरम गरम नैवेद्य बाप्पासाठी तयार. ही खीर गार झाल्यावरही छानच लागते. गार झाल्यावर अजून सजावट करायलाही वाव असतो. गार असताना मी टॉपिंग म्हणून पिस्ता पूड आणि स्ट्रॉबेरीज घातल्या.
kheer

वाचने 13552 वाचनखूण प्रतिक्रिया 25

एस Sun, 09/03/2017 - 15:45
छान आणि साधीसोपी आहे पाककृती. एक प्रश्न : पाणी हे दलियात थंडच घालायचं की आधी बाजूला गरम काढून ठेवायचं आणि मग ओतायचं? दोन्ही प्रकारांनी काय फरक पडू शकतो?

इशा१२३ Sun, 09/03/2017 - 20:24
या खिरिला ओल खोबरेच हवे. ओल खोबर +दलिया तुपावर खमंग भाजून, काजु बेदाणे सकट गरम पाणी घालून कुकरमधे शिजवून घ्यायचा.नंतर गुळ, दुध घालून छान शिजवायचा(आधि शिजल्याने पटकन होते)शेवटी जायफळ पुड घालून मिक्स करावे. आयत्यावेळी परत गरम दुध घालावे.ताज्या खवलेल्या ओल्या खोबर्यामुळे नेमकी चव येते.मस्त गरम गरम खावी.

सूड Mon, 09/04/2017 - 12:07
गडावरच्या खीरीत मला थोड्या खारका पण असतील की काय असं वाटलं होतं खाताना. ही खीर करण्याची माझी पद्धत म्हणजे, लापशीचा रवा तूपावर परतून तो बोटचेपा शिजवून घेणे आणि नंतर जरा घोटून मग नारळाचा चव, गू़ळ वैगरे घालून नीट उकळी आणणे. गूळ आधीच घातला की ते आटता आटता कॉन्सन्ट्रेट होऊन मिट्ट गोड व्हायची भीती वाटते म्हणून मग तो मागाहून घालतो मी. आमच्या मेसमध्ये यात बडीशेप भरडून घालतात. पण मेसच्या काकू बनवतात तशी खीर अजून जमली नाहीय.

सविता००१ Tue, 09/05/2017 - 10:04
सूड म्हणतो तशी अगदी १/२ टीस्पून बडीशेप भाजून भरड करून घातली या खिरीत तर भारी लागते अजून.

In reply to by सविता००१

सविता००१ Tue, 09/05/2017 - 12:16
कमी असली बडीशेप तरीही चलते. पण चुकुनही जास्त झाली तर मात्र चवीचा बट्ट्याबोळ उडतो.मगाशी हे लिहायला विसरले.

दलियाचे सर्व प्रकार आवडीचे, त्यातही सांजा जास्त प्रिय. ही खीर नुकतीच मैत्रिण गणपतीला घरी घेऊन आली तेव्हा खाल्ली. छान पाकृ, मला पण यात ओला नारळ अधिक आवडेल.

सारिका होगाडे Wed, 09/06/2017 - 01:09
पाककृती खूपच छान आहे. तुझ्या हातची खाल्ली त्यामुळे चव तर अजून लक्षात आहे. अप्रतिम! आणि लहान मुलांसाठी पौष्टिक पण आहे. सगळे हेल्दी पदार्थ! लगेच करून पाहिली आणि सगळ्यांना आवडली. :)

जुइ Tue, 09/12/2017 - 02:38
अतिशय आवडती खीर आहे माझी. अजूनही दर दास नवमीला आवर्जून करते :-)