भेट हवी की भेटवस्तू ?
सुमारे ४० वर्षांपूर्वीचे लग्नसमारंभ आठवतात का पाहा. लग्न लागल्यानंतर वधूवर मंचावर बसत आणि मग लोक त्याना भेटायला येत. तेव्हा लग्नाला आलेला प्रत्येक पाहुणा हा त्यांच्यासाठी काहीतरी भेटवस्तू घेऊनच येई. वधू आणि वराच्या बाजूस प्रत्येकी एक जवळचा माणूस वही घेऊन बसलेला असे. पाहुण्याने वर किंवा वधूच्या हातात ती वस्तू दिल्यावर ते ती बाजूस बसलेल्या माणसाकडे देत. मग तो त्या वस्तूची व्यवस्थित नोंद (कुणी दिली यासह) त्याच्या वहीत करत असे. एक प्रकारे हा माणूस वधू अथवा वरपक्षाचा ‘ रोखापाल’ च असे ! कार्यक्रम संपेपर्यंत तो हे काम चोख बजावी आणि अखेरीस तो सर्व ‘हिशेब’ ज्या त्या यजमानाच्या स्वाधीन करे.
यथावकाश यजमान मंडळी त्या हिशेब वहीची बारकाईने तपासणी करत. अशा तऱ्हेने लग्नसमारंभाच्या देण्याघेण्याचा हिशेब यजमानाच्या स्मृतीत व्यवस्थित नोंदला जाई. याप्रकारे ‘लग्न हा एक बाजार असतो’ या विधानाला पुष्टीच मिळत असे. लग्नातील ही भेटवस्तू संस्कृती पूर्वापार चालू होती.
साधारण १९८० च्या दशकामध्ये शहरी भागांतील लग्नांमध्ये यावर विचारमंथन होऊ लागले. सुशिक्षित व नवमतवादी तरुणांना या पारंपरिक पद्धती मधले काही दोष चांगलेच खटकू लागले. ढोबळमानाने ते दोष असे होते:
१. एखाद्याने आपल्याला दिलेल्या भेटवस्तूची अंदाजे किंमत आपल्या मनात पक्की नोंदली जाते आणि यथावकाश त्याच्याकडील कार्यात त्या हिशेबी वृत्तीनेच आपण भेटवस्तू देतो. विशेषतः नातेवाईकांमध्ये तर ‘फिट्टम फाट’ होणे फार गरजेचे असते !
२. वस्तूऐवजी रोख रक्कम देणारे लोक आपण किती कुटुंबीय लग्नाचे जेवणार आहोत त्या हिशेबाने ती रक्कम ठरवत. अगदी जेवण्याच्या ताटाचा अंदाजे दर गुणिले आपली माणसे असा व्यवस्थित हिशेब असे!
३. एकूणच देण्याघेण्याच्या वस्तू या दुय्यम दर्जाच्या असतात.किंबहुना ती वस्तू विकत घेताना दुकानदारही तसे सांगूनच देतो. समजा, त्याच प्रकारची वस्तू जर का आपल्या स्वतासाठी घ्यायची असती तर आपण ती नक्कीच वरच्या दर्जाची घेतली असती.
४. तसेच, जेव्हा एखाद्याकडे अशा ठोकळेबाज भेटवस्तू साठतात तेव्हा त्या स्वतःसाठी वापरण्याऐवजी अन्यत्र ‘फिरवण्यासाठीच’ घरच्या माळ्यावर साठवल्या जातात.
५. भेटवस्तूच्या किमतीवरून यजमान ती देणाऱ्या व्यक्तीची ‘आर्थिक लायकी’ ठरवतो. ही मनोवृत्ती तर खूपच खटकणारी. त्यावरून घराघरात होणारे मानापमानाचे संवाद तर ठरलेलेच.
६. एकूणच काय, तर भेटवस्तू देताना धनाढ्य माणसाला आपली श्रीमंती दाखवता येते तर गरिबाला मात्र मनातून चोरट्यासारखे वाटते.
वरील सर्व गोष्टी टाळण्याच्या उद्देशातून ‘भेटवस्तू नकोत’ हा विचार पुढे आला. असा विचार करणाऱ्यांनी सुरवातीस निमंत्रण देताना सर्वाना तसे तोंडी सांगून पाहिले. पण, केवळ या तोंडी आवाहनाने पूर्वापार चालत आलेली ही रूढी मोडणे खरेच अवघड होते. मग यापुढची पायरी होती ती म्हणजे निमंत्रण पत्रिकेत तसे स्पष्ट लिहिणे. अशा पत्रिकांमध्ये नेहेमीच्या मजकुराखाली ‘’आपली उपस्थिती हाच प्रेमाचा आहेर, कृपया भेटवस्तू आणू नयेत’’ अशी तळटीप झळकू लागली.
अशा प्रकारची पत्रिका मी प्रथम १९८५ मध्ये पाहिली. नक्की हा प्रकार कधी सुरू झाला याबद्दल मला कुतूहल आहे कारण, लग्नसमारंभांच्या बाबतीतला हा एक ऐतिहासिक बदल म्हणता येईल. माझ्या लग्नात मी या प्रकाराचे आनंदाने अनुकरण केले हे सांगणे नलगे. सुरवातीस निमंत्रितांकडून याला मिळणारा प्रतिसाद हा संमिश्र होता. परंपरावाद्यांकडून तर प्रखर विरोधच होता. त्यामुळे यजमानांना पत्रिका देताना अशांकडून ‘’विवाहाला रिक्तहस्ते कधीही जाऊ नये’’, ‘’तुमच्या विनंतीचा स्वीकार करायचा की नाही ते आम्ही बघू’’ यासारखी विधाने ऐकून घ्यावी लागत.
काही सनातनी तर ‘’तुम्ही जर आमच्याकडून भेट घेणार नसाल तर आम्ही लग्नाचे जेवायचे तरी कशाला?’’ अशीही मुक्ताफळे उधळत. समाजात कोणताही नवा विचार रुजवणे किती अवघड असते हे यानिमित्ताने अधोरेखित झाले. मात्र, एकीकडे बरेच तरुण या विचाराने प्रभावित होत होते आणि त्यांचे पालकही याला राजी होऊ लागले. त्यामुळे ‘तळटीपयुक्त’ पत्रिकांची संख्या हळूहळू वाढत होती.
हळूहळू काही समंजस पाहुणे ही विनंती ऐकू लागले. मात्र, काही जण हट्टाने भेटवस्तू आणत तर अन्य काही फक्त पुष्पगुच्छ आणत. त्यामुळे यजमानही गोंधळून जात. अशा भेटी हट्टाने देणाऱ्याला मंचावर नकार देणे खूप जड जाई. नंतर निमंत्रितांचाही नक्की काय करायचे याबाबत गोंधळ होऊ लागला. काही जण भेटी देत असतील तर आपण तसेच कसे जायचे? मग काहीनी एक शक्कल लढवली. भेटवस्तू न नेता बरोबर फक्त रकमेचे पाकीट ठेवायचे आणि मग सगळे पाहुणे जसे करतील त्याप्रमाणे आपण करायचे. थोडक्यात, यजमान व पाहुणे या दोघांनीही बराच काळ याबाबत धरसोड वृत्ती अवलंबिली होती.
त्यानंतरची सुमारे १५ वर्षे ही याबाबतीत संभ्रमावस्थेची होती. कालांतराने शहरी पांढरपेशा वर्गात ‘भेटवस्तू अथवा पुष्पगुच्छ नकोत’ ही मनोवृत्ती चांगली रुजली. त्यामुळे अशा ‘तळटीपयुक्त’ पत्रिका सर्रास प्रचलित झाल्या.काही यजमानांची तर ‘’भेटवस्तू आणू नयेत, आणल्यास नाकारल्या जातील’’ इतके परखड छापण्यापर्यन्त मजल गेली. मग निमंत्रीतही त्या सूचनेचा आदर करू लागले. एक नवी सामाजिक संकल्पना समाजातील काही वर्गात तरी रुजल्याचे दिसू लागले. अशा समारंभांना जाताना पाहुण्यांना एक मोकळेपणा वाटू लागला. कधीही एखादे निमंत्रण आले तर ‘’आहेर काय द्यावा बुवा?’’ याचा विचारही करण्याची गरज संपली. लग्नाला निव्वळ उपस्थित राहणे हा निखळ आनंद ठरला. देण्याघेण्यापेक्षा एकमेकांना भेटणे व दिलखुलास गप्पा मारणे हे अधिक महत्वाचे असते, हेही मनात ठसवले गेले.
मात्र समाजातील अन्य काही वर्गांना मात्र या बदलाची दखल घ्यायची कधी गरज वाटली नाही. त्यांनी पारंपारिक राहणेच पसंत केले. त्यांच्यामते या समारंभात वस्तूंची देवाणघेवाण ही एक आवश्यक बाब असते. त्यात उगाचच काहीतरी नवे खूळ आणायची काही गरज नाही, यावर ते ठाम होते व आजही आहेत. या गटातील काही बुजुर्गांनी तर ‘’मला कोणाकडून काही नको’’ हा एक प्रकारचा अहंकार असल्याचा विचार मांडला. तसेच समाजातील श्रमिक वर्गाचे याबाबतीतले विचारही जुन्या परंपरेच्याच बाजूने राहिलेले दिसून येतात. कदाचित पुरेशी आर्थिक समृद्धी असल्याशिवाय ‘काही नको’ हा विचार पचवणे अवघड असावे.
तर, आजच्या घडीला यासंदर्भात शहरी समारंभांमध्ये काय दिसते? खालील प्रकारचे प्रतिसाद पाहायला मिळतात :
१. ज्या निमंत्रणामध्ये तळटीप नसते त्या समारंभांना झाडून सर्व पाहुणे भेटी आणतात. याला म्हणायचे परंपरेचे पालन !
२. ज्या निमंत्रणामध्ये तळटीप असते तिथे त्या सूचनेचे बऱ्याच अंशी पालन होते पण, अजूनही १००% नाही. काही पाहुणे( विशेषतः नातेवाईक) स्वतःला अपवाद करून लग्नापूर्वी किंवा नंतर यजमानाच्या घरी जाऊन भेटी देतातच.
३. अजून एक वेगळाच प्रकार गेल्या ५ वर्षात दिसतो आहे. यात यजमान ‘तळटीप’ जरूर छापतो पण, लोकांच्या घरी जाऊन निमंत्रण देताना मात्र एखादी छोटीशी वस्तू त्यांना पत्रिकेबरोबर देतो. आता यावर पाहुण्याने काय करायचे बरे? यजमानाला परतफेडीची अपेक्षा आहे असेच गृहीत धरावे लागते! मग प्रश्न असा पडतो की, जर देवाणघेवाण हवीच आहे तर ‘तळटीप’ छापायचे नाटक कशाला? केवळ फॅशन म्हणून?
अलिकडे अजून एक प्रकार पाहण्यात आला. समारंभाचे निमंत्रणात 'तळटीप' तर होतीच. प्रत्यक्ष त्या ठिकाणी एक दानपेटी ठेवली होती आणि त्यावर त्यात जमणारे पैसे कोणत्या समाजोपयोगी कार्यास द्यावयाचे आहेत ते ठळकपणे लिहीले होते. ज्या निमंत्रितांची वधूवरांस काही द्यायची इछा होती, त्यांना यजमान ती पेटी दाखवत होते.
‘ लग्नात भेटवस्तू हव्यात की नकोत’ या प्रश्नाचे उत्तर तसे अवघड असून तो एका चांगल्या चर्चा वा वादविवादाचा विषय आहे हे नक्की. आपल्याला जर वस्तूंची देवाणघेवाण हवीच असेल, तर तळटीप देण्याचे नाटक मात्र नको आणि जर तळटीप मनापासून दिली असेल, तर यजमान आणि निमंत्रित या दोघांनीही त्यानुसार वागण्याचे बंधन पाळावे हे उत्तम.
भेटवस्तूच्या औपचारिकतेपेक्षा एकमेकाला मनापासून भेटणे हाच तर समारंभांचा खरा हेतू असतो ना?
************************************************************
याद्या
2734
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
लेख आवडला.
@ कुमार१
भेटवस्तूंचे रीसायकलिंग
In reply to @ कुमार१ by अनिंद्य
भेटवस्तूंचे रीसायकलिंग करण्याच्या आपल्या भारतीय सवयीला वैतागून अनेक देशात..हे कळाले नाही.एकाकडून दुसर्याकडे
In reply to भेटवस्तूंचे रीसायकलिंग by मोदक
@ संग्राम,
In reply to एकाकडून दुसर्याकडे by संग्राम
यात "भारतीय सवय" म्हणून
In reply to @ संग्राम, by अनिंद्य
ही आपली खास भारतीय सवय आहे
In reply to यात "भारतीय सवय" म्हणून by मोदक
अत्रे, आभार !म्हणजे
परदेशात
In reply to अत्रे, आभार !म्हणजे by हेमंतकुमार
अभिदेश, सूचना चांगली आहे.