माननीय व्यवस्थापक,
मादाम तुसॉ वॅक्स म्यूझियम,
मुक्काम पोस्ट लंडन
पत्र लिहिणेस कारण कि परवाची बातमी. तुम्ही आमच्या अतिशय लाडक्या मधुबाला चा मेणाचा पुतळा बनवणार आहात म्हणे! साक्षात विधात्याला पुन्हा इतकी सुंदर स्त्री घडवणे जमले नाही. त्याने माधुरी बनवून पाहिली, गेला बाजार कतरीना देखील केली. पण मधुबाला ची सर काही त्यांना आली नाही.
तुम्ही देखील आत्तापर्यंत अतीव सुंदर पुतळे घडवले. इतके हुबेहूब कि बघणाऱ्यांचा 'पुतळा' झाला. मात्र भारतीयांचे पुतळे तुम्हांला म्हणावे तसे जमले नाहीत बुवा. बच्चन कुटुंबियांवर तुमचा इतका राग का? अमिताभचा पुतळा एखाद्या उर्दू शायर / गज़ल गायकासारखा दिसतो. ऐश्वर्या बच्चन देखील उपासमारीमुळे खंगलेली राखी सावंत वाटते अशी आमची 'राय' आहे. तेंडुलकर चा पुतळा पाहून त्याच्या हातातली बॅट काढून स्वतःच्या (खरं तर तुमच्या!) डोक्यात घालावीशी वाटली.
नाही म्हणायला सलमान चा पुतळा बरा जमलाय. अभिनय करताना देखील त्याच्या चेहेऱ्यावरची रेष हलत नाही. त्यामुळे असा कृत्रिम चेहरा बनवणे सोपे झाले असावे. तुम्ही उदय चोप्रा, सुनील शेट्टी, भारत भूषण आदींचे पुतळे बनवून पहा - उत्तम जमतील असा आमचा अंदाज आहे.
तुम्ही ह्रितिक रोशन चा पुतळा बनवला. मात्र गेली ४० वर्षे उत्तम अभिनय करणाऱ्या अनिल कपूर चा का नाही बनवला? अनिल कपूर चे waxing करण्यात सगळं मेण संपेल कि काय अशी भीती वाटली का?
नाही म्हणलं तरी आमचं देखील मेणाचं नॉलेज अगदी कमी नाही बरं का. चिऊ-काऊ च्या गोष्टीत मेणाचं घर लहानपणापासून ऐकलंय. पावसाळ्यात ते वाहून जात नाही इतपत माहिती आम्हाला आहे. MSEB च्या कृपेने अनेकदा लाईट जायचे तेव्हा अनेक मेणबत्त्या पेटवल्या आहेत. आता इन्व्हर्टर आल्याने मेणबत्त्या वापरात नाहीत. म्हणून वाढदिवसाच्या वेळी मुद्दाम अंधार करून केक वरच्या मेणबत्त्या गेली अनेक वर्षे फुंकतोय.
पुनःश्च एकदा विनंती आहे कि आमच्या मधुबालाचं सौन्दर्य मेणातून साकारण्याचा नाद 'अच्छा जी में हारी ' म्हणून सोडून द्या. जिवंत लोकांची काटेकोर मापे घेऊन अनेक पुतळे जमले नाहीत. तर आता मधुबाला चा पुतळा आता बनवायचे नसते धंदे कोणी सांगितले?
इतकी विनवणी करूनही तुम्ही ऐकणार नाही हे माहिती आहे. 'ऐकावे जनाचे, करावे मेणाचे' हे तुमचे धोरण आहे. त्यामुळे तुमच्या ह्या अवघड कार्यास शुभेच्छा. मधुबालाचे मूर्तिमंत सौन्दर्य त्यात पुरेपूर उतरो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुतळा 'मेणासारखा आणि मनासारखा' बनल्यास तो कृपया वेगळ्या रूम मध्ये ठेवा. नाहीतर त्या सौन्दर्यापुढे इतर पुतळे वितळून थिजून जातील.......
आपला कृपाभिलाषी,
सरनौबत
वाचने
3321
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
नाहीतर त्या सौन्दर्यापुढे इतर
छान लेख
मस्त लिहिलंय!
छान प्रासंगिक.
नाही म्हणायला सलमान चा पुतळा
आवडलं
अनिल कपूर चे waxing करण्यात
'ऐकावे जनाचे, करावे मेणाचे'
छान लिहिलंय
हा हा हा ! मस्तच लिहीलय. कोट्यातर जमून आल्यात.
जबरी.... कोट्या चपखल. आवडला
मस्तं लेख.
मात्र भारतीयांचे पुतळे तुम्हांला म्हणावे तसे जमले नाहीत बुवा.हजारदा बाडीस !धन्यवाद
In reply to मस्तं लेख. by डॉ सुहास म्हात्रे
बाडीस बाय डिफॉल्ट सहमत =))
In reply to धन्यवाद by सरनौबत
बाडीसबाय डिफॉल्ट सहमत =))पुतळा 'मेणासारखा आणि मनासारखा
पुतळा 'मेणासारखा आणि मनासारखा' बनल्यास तो कृपया वेगळ्या रूम मध्ये ठेवा. नाहीतर त्या सौन्दर्यापुढे इतर पुतळे वितळून थिजून जातील.......मस्तच!