Skip to main content

वेडे'कर'णारी बेडेकर मिसळ

लेखक सरनौबत यांनी गुरुवार, 13/04/2017 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यातील रविवार सकाळ. खरं तर ही वेळ म्हणजे 'सकाळ' च्या बातम्या वाचत (चितळे च्या दुधाचा) चहा पीत आता ब्रेकफास्ट ला रूपाली, गुडलक आणि बेडेकर ह्यापैकी कुठे जायचं हे ठरवण्याची वेळ. पण बायको सुद्धा बरोबर येणार असेल तर हा प्रश्न सहज सुटतो (तिच्या इच्छेनुसार जातो. सकाळी सकाळी वाद कशाला ?!) मित्राबरोबर जायचं असेल तर मग भरपूर चर्चा होऊन ठिकाण निश्चित होतं. गेली ४ वर्षे मस्कत ला नोकरीनिमित्त स्थायिक असल्याने आता मात्र रविवार हा ऑफिस चा पहिला दिवस असतो (इकडे शुक्र -शनि वीकएंड!) पुण्यातील मित्रांच्या भाग्याचा हेवा करीत गप-गुमान ऑफिस ला जावं लागतं... तेव्हा बऱ्याच वेळा मन 'बेडेकर मिसळ' च्या आठवणीत रमतं. पहिल्यापासूनच भेळ आणि मिसळ ह्या दोन्ही 'ळ'कारान्त पदार्थांवर विशेष प्रेम. पक्का पुणेकर असलो तरी 'बेडेकर नाही तर, कुठेच नाही' असा माझा पुणेरी बाणा नाहीये. खरंतर ‘बेडेकर पेक्षा भारी मिसळ कुठे मिळते’ ह्यासाठी अनेक ठिकाणं पालथी घातली. पुण्यातील रामनाथ, श्री, श्रीकृष्ण, काटाकिर्र ह्या सुप्रसिद्ध ठिकाणी जाऊन मिसळ खाल्ली. मित्रांच्या आग्रहावरून डेक्कन वरच्या वाडेश्वर; अगदी टिम्बर मार्केट, पर्वती इंडस्ट्रियल इस्टेट ला देखील गेलो. कोल्हापूरच्या फडतरे, खासबाग, बावडा येथील मिसळ; शिरवळ ची श्रीराम मिसळ, सातारा हायवे येथील ‘विरंगुळा’ पासून पुणे-मुंबई हायवे वरील श्री दत्त पर्यंत सर्व ठिकाणांना भेटी दिल्या. पण ह्या मिसळी हृदयात ...सॉरी जिभेवर स्थान मिळवू शकल्या नाहीत. कुठे अति तिखट, तर कुठे तर्री (रस्सा) बेचव, तर अनेक ठिकाणी मिसळीच्या मानाने बटाटा भाजी चं proportion गंडलेलं. कुठे नुसत्या फरसाण वर रस्सा टाकून फसवणूक तर काही ठिकाणी मिसळी बरोबर चक्क गोडसर पाव!! रविवारी सकाळी ९ नंतर कधीही गेलं तरी ‘बेडेकर’ बाहेर कायम प्रचंड गर्दी! सुट्टी मुळे ऑफिस चा ट्रॅफिक नसल्याने कोथरूड वरून ‘बेडेकर’ ला १५ मिनिटात पोचल्याचा आनंद; बाहेर तुडुंब वेटिंग पाहिलं कि कुठल्या कुठे नाहीसा होतो. मग आधी मिसळीला 'नंबर' लावून Bike साठी पार्किंग शोधण्याची कसरत. अनेक लोकं (बापाचा रस्ता असल्यासारखे!) साईड-स्टँड वर गाड्या लावतात. मग त्यांच्या (नावाने शिव्या घालत) १-२ गाड्या मेन स्टॅन्ड वर लावून आपली गाडी त्यात घुसवायची. मग बाहेर 'ताट'कळत मिसळीच्या 'ताटा'ची प्रतीक्षा. बाहेर उभे राहून आत बसलेल्या लोकांना मिसळ चापतांना बघणे फार अवघड. मग ते frustration बाहेर काढण्यासाठी 'इतके पैसे कमावतात तरी बाजूची जास्त जागा का नाही घेत, कोथरूड ला branch का नाही काढत, कांद्याचे एक्सट्रा पैसे का लावतात, मराठी माणूस धंद्यात मागे का' असले परिसं'वाद'. २०-२५ मिनिटे वाट पाहिल्यावर एकदाचा आपला नंबर लागला कि ह्या चर्चेला आपोआपच पूर्णविराम मिळतो. काउंटर कडे जात असताना उजवीकडे लालभडक तर्री मोठ्या पातेल्यात उकळताना दिसते आणि जीव (त्या) भांड्यात पडतो. मिसळीच्या प्लेट्स घेऊन टेबलाशी बसलो कि स्टीलच्या मग मधली तर्री कधी एकदा आपल्या प्लेट मध्ये येते असं होतं. पोह्याचा खुसखुशीत चिवडा, मटकीची उसळ, बटाट्याची भाजी, जाड शेव आणि बारीक चिरलेला कांदा ह्या मिश्रणावर ती 'जादूई' तर्री ओतल्यावर स्वर्ग दोन बोटे उरल्याचा भास होतो. डाव्या हाताने पाव त्या रश्यात बुडवून त्याचा द्रोणासारखा आकार करून उजव्या हातातल्या चमच्याने त्यात मिसळ भरून पहिला घास खाल्ल्यावर जीवनाचे सार्थक झाल्यासारखं वाटतं. मग त्यावर १-२ चमचे तर्री प्यायल्यावर ब्रह्मानंदी टाळी लागते. 'ह्याचसाठी केला होता अट्टाहास'!!! मालक (पुणेरी असून देखील!) प्रेमाने ताक, लिंबू सरबत, कोकम इत्यादीचा आग्रह करतात. पण ह्या स्वर्गीय चवीत इतर काहीच ‘मिसळू’ नये असं वाटतं. म्हणून दरवेळी मी त्यांना नम्रपणे नकार देतो. पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे बायको देखील 'बेडेकर मिसळ प्रेमी' मिळाली. Hygiene आणि ambience च्या भ्रामक कल्पनेमुळे बेडेकर ऐवजी 'वाडेश्वर' ला मिसळ खाऊ म्हणणाऱ्या काही मित्रांच्या बायका पाहिल्या कि त्यांची कीव आणि स्वतः चा हेवा वाटतो. वेळेअभावी कधीतरी बेडेकर मिसळ पार्सल करून घरी आणून खाणे ठीक आहे. पण त्याची खरी मजा तिथल्या अरुंद टेबलावर (समोर सर्वस्वी अनोळखी माणसासमोर बसून!) खाण्यात आहे. मिसळ तिखट लागल्यास ताक पिण्यापेक्षा थोडा वेळ तिखटपणा सहन करून मग गरम चहा प्यायला तर तो अगदी 'अमृततुल्य' लागतो. तिखट जिभेवर गरम चहाची ‘किक’ किमान अर्धा तास तरी राहते. आता पुण्यात सुट्टीपुरतं थोडेच दिवस येणं होतं. त्यामुळे कमी दिवसांत सगळ्या आवडीच्या ठिकाणांना न्याय देणे अवघड होऊन बसतं. म्हणून आता आधी बेडेकर मिसळ, मग रुपालीत फिल्टर कॉफी आणि नंतर डेक्कनला जरा टाईम पास करून जाता जाता 'गुडलक' मध्ये चहा असे एका दगडात तीन पक्षी मारतो. ह्या पृथ्वीतलावर मिसळ अनेक ठिकाणी मिळते, पण ज्याच्यापुढे 'कर' जोडावे अशी फक्त बेडे'कर'.

वाचने 22015
प्रतिक्रिया 85

प्रतिक्रिया

In reply to by पिशी अबोली

पत्र्या मारुतीकडून जरा वर गेलं की चौकाच्या अलिकडेही एक चहा कॉफीची गाडी आहे. तेथील कॉफी आणि चहा अत्युत्तम आहे.

In reply to by पिशी अबोली

पत्र्या मारुतीच्या आडोशाला असलेला चहा
बन्दुक्षणी निवास? क्या बात! जबरदस्त आहे ते.

एका काकांना रस्ता विचारला तर ते म्हणे " तुम्हाला बेडेकरच हवी असेल तर पत्ता सांगतो पण आमच्याकडेही चांगली मिसळ मिळते." =) मग काय अजुन शोधाशोध करण्यापेक्षा आम्ही तिथेच मिसळ खाल्ली ती श्री मिसळ होती आणि चांगली होती. बाकी बेडेकर खायचा योग पुन्हा कधी आला नाही.

In reply to by इडली डोसा

" तुम्हाला बेडेकरच हवी असेल तर पत्ता सांगतो पण आमच्याकडेही चांगली मिसळ मिळते."
=))

खरे तर अत्यंत टूकार प्रकारची मिसळ आहे ती, आवडण्यासारखी एकही गोष्ट नाही , कशात काहीही टाकून सपक पाणी ........... इतर ठिकाणी झणझणीत तरी मिळतात

आणि मिसळीबद्दल म्हणाल तर.... आमची सौ. एकदम अप्रतिम मिसळ बनवते, त्यामुळे हल्ली मुद्दाम मिसळ खायला म्हणून जात नाही. ती मटकीची उसळ वापरते. असो, खिम्याचा रस्सा, फरसाणातली पापडी, रतलामी शेव, तळलेले मसूर आणि बारीक चिरलेला कांदा हे मला आवडलेले काँबिनेशन.

In reply to by मुक्त विहारि

खिम्याचा रस्सा, फरसाणातली पापडी, रतलामी शेव, तळलेले मसूर आणि बारीक चिरलेला कांदा तों पा सु केंव्हा बोलावताय खायला ?

बेडेकरांनी मिसळीत वांग घातलेलं बघितलं अन तेव्हाच मनातून बाद केल त्यान्ना. पुण्यात मिसळ आवडली ती 'नाद खुळा' ची, राजाराम पुलावरून डावीकडे वळून कर्वेनगर कडे जाताना आहे. हा माझा अनुभव आहे...