Skip to main content

नैसर्गिक शेती की रासायनिक शेती?

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 12/05/2017 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
बटाट्या वड्या बरोबर चिंचेची चटणी हवी का लसूण चटणी? किंवा डोंबोली अधिक प्रदूषित की पुणे? किंवा महाराष्ट्र अधिक प्रगतीशील का बिहार? ह्या इतकाच बहूचर्चित शेतकरी प्रश्र्न म्हणजे ----- नैसर्गिक शेती अधिक उत्तम की रासायनिक? ========== मुंग्या नंतर शेती करणारा ह्या पृथ्वीवरील एकमेव जीव म्हणजे मानव. साधारण पणे गेल्या २०० वर्षां पर्यंत रासायनिक खतांचा किंवा रासायनिक कीटकनाशकांचा शेतीत शिरकाव न्हवता.भारतात पण स्वातंत्र्य मिळेपर्यंत रासायनिक शेतीचा प्रभाव न्हवता. पण १९५० नंतर हरित क्रांतीच्या प्रभावाने, अधिक उत्पादन हवे म्हणून, ह्या प्रकारच्या शेतीचा जाणून-बुजुन प्रसार करण्यात आला. ह्या शेतीचे वाईट परीणाम पाहता, आता विचार फार विचार न करता, नैसर्गिक शेती कडे वळणे भाग आहे. कोणे एके काळी मी स्वतः एका कीटकनाशक तयार करणार्‍या कंपनीत नौकरी करत होतो.तिथे एका फार बुद्धीमान असणार्‍या एका रसायन तज्ञाची ओळख झाली.त्याच्या माहिती आणि अनुभवानुसार कीटक ह्या प्रुथ्वीतलावरून कधीच नाहीसे होणार नाहीत. कीटक मरण्या पुर्वी आपली अंडी जमिनीत पुरतात किंवा झाडा झुडपांवर ठेवतात.त्यामुळे कीटकांच्या पुढील जमातीवर आधीच्या कीटकनाशकाचा फार जास्त परीणाम होत नाही. त्यामुळे दर काही वर्षांनी परत एकदा अधिक परीणाम कारक (म्हणजे अधिक विषारी) कीटकनाशक बनवणे भाग पडते. आपण कितीही वेळा भाज्या किंवा तत्सम शेती आधारीत वस्तू धुतल्या तरी आपल्या शरीरात पण ही अपायकारक द्रव्ये शोषली जात असतातच. जी गोष्ट खतांची, तीच कहाणी खतांची. खतांच्या अति वापराने जमीन हळू हळू पण कधीही लवकर भरू न शकणार्‍या नापीक आणि टणक जमीनीकडे वळू लागते.शिवाय ही खते पण अन्नधान्या स्वरुपात आपण सेवन करत असतोच. ह्या रासायनिक शेतीचे वाढते वाईट परीणाम म्हणजे, आज आपल्या देशात, मधूमेहाच्या आणि किडनीच्या दोषाने हतबल झालेल्या वाढत्या रुग्णांची लक्षणिय संख्या. भारतालाच नाही तर, जगाला देखील रासायनिक शेतीची अजिबात गरज नाही. पण लक्षांत घेतो कोण? गेल्या काही वर्षांत शेतकर्‍यांशी ह्या विषयावर चर्चा करत असतांना जाणवलेले काही मुद्दे. १. मी तर एकच लिटर कीटकनाशक वापरतो, माझ्या बाजूचा २ लिटर वापरतो. २. मी जरी वापरणे बंद केले तरी, बाजूचे शेतकरी वापरणारच मग ते कीटक माझ्या शेतावर हल्ला बोल करणार. मग मीच का आधी नको वापरायला? ३. भाज्या आणि फळे धुवून घेतली की झाले. ४. मी करत असलेली भाड्याची आहे.मला जर उत्पनच नाही मिळाले तर मालकाला हकनाक पैसे द्यायला लागतील. ५. माझी मुले काही शेती करणार नाहीत, मग माझ्या जमीनीची वाट लागली तरी चालेल. ६. माझा मालक मला विचारत नाही, मग तुम्ही कोण मला सांगणारे? ७. तुम्ही स्वतः शेती करता का? मग तुम्हाला काय अधिकार? ----------------- प्रश्र्न बरेच आहेत पण उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे आपली राष्ट्रीय प्रतिज्ञा. त्यात २ फार महत्वाची वाक्ये आहेत. "माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे." --------------------------- माझ्या पुरती तरी, ह्या प्रतिज्ञेला मी माझ्या शेती बाबतीत एक ध्येय वाक्य मानतो.माझ्या बांधवांना मी रासायनिक अन्न खाऊ घालणार नाही. मला तर शेती करण्याचा स्वानुभव फक्त ४ महिन्यांचा. सुरुवातीला मला पण रासायनिक खते वापरा असा सल्ला बर्‍याच जणांनी दिला, पण मी माझ्या मताशी ठाम होतो. भले एकही रोप जगले नाही तरी चालेल, एकही मिरची नाही आली तरी चालेल पण मी रासायनिक शेती करणार नाही. आज मी निदान घरच्या पुरती तरी मिरची घेवू शकलो आणि ते पण नैसर्गिक शेती करून. मग ज्यांना शेतीचा पिढी जात अनुभव आहे ते तर नक्कीच ही नैसर्गिक शेती करू शकतील. हा लेख जरा निबंधात्मक झाला आहे, पण त्याला माझा नाईलाज आहे.

वाचने 14812
प्रतिक्रिया 44

प्रतिक्रिया

In reply to by एस

मुख्य निबंध लिहिणे आपल्या सगळ्यांच्याच , विशेषतः इथल्या शेतकर्‍यांच्या हातात आहे. नैसर्गिक शेतीची सुरुवात, प्रत्येक शेतकर्‍याने, निदान स्वतःच्या कुटुंबा पुरती तरी करावी. आधी प्रपंच करावा नेटका, तसे आधी घरच्या पुरती तरी केमिकल विरहित शेती केली तरी बरेच मोठे काम होईल.

खालील छान लेख आहे. वाचकांना नैसर्गिक शेती अधिक उत्तम की रासायनिक? याचा उलगडा होईल. http://appliedmythology.blogspot.in/2013/03/no-cows-dont-make-fertilize… ह्या रासायनिक शेतीचे वाढते वाईट परीणाम म्हणजे, आज आपल्या देशात, मधूमेहाच्या आणि किडनीच्या दोषाने हतबल झालेल्या वाढत्या रुग्णांची लक्षणिय संख्या>>> ==> ह्या विधानाला काही आधार आहे का? माझ्या ओळखीचे एक काका गेली २० वर्ष नैसर्गिक शेतीतूनच पिकवले आहार घेत आहेत. पण त्यांना मधुमेह आणि मुतखडा दोन्ही दोषांनी पछाडले आहे. जीवामृत, पंचगव्य हे सगळे थोथांड आहे, ही माझी पक्की धारणा आहे. नैसर्गिक आणि रासायनिक खाते/कीटकनाशकांचा संयुक्तिक वापर करून उत्तम शेती होऊ शकते. स्वानुभवाने सांगत आहे. गेली १० वर्ष मी शेती मध्ये लक्ष घालत आहे, तरी जमिनीचा पोत उत्तम रित्या राखला आहे. भारतालाच नाही तर, जगाला देखील रासायनिक शेतीची अजिबात गरज नाही. पण लक्षांत घेतो कोण?>>> ==> काही ही काका... भले एकही रोप जगले नाही तरी चालेल, एकही मिरची नाही आली तरी चालेल पण मी रासायनिक शेती करणार नाही.>>> ==> छंद म्हणून शेती करणाऱ्यासाठी हे एक वेळ ठीक आहे, एक ही मिरची नाही आली तरी चालेल. पण ज्याचा घर संसारच त्यावर चालत असेल त्याचे काय? मुवि काका शहर सोडून, शेतीची पार्श्वभूमी नसताना तुम्ही शेती मध्ये उतरलात, कमालीचे शाररिक कष्ट करत आहात, तुमच्या सौ सुद्धा तुमच्या कामामध्ये मदत करत आहेत हे वाचून खरंच तुमचा खूप अभिमान वाटतो. पण तुम्ही शेतीबद्दल काही पूर्वगृहीतके मनामध्ये घेऊन या क्षेत्रात उतरला आहात, हे नमूद करू इच्छितो.

In reply to by विशुमित

विशुमित वरील दुव्यामधील लेख हा एकांगी आहे आणि भारतातील शेतीला लागू पडत नाही असे वाटते. याचे मूळ कारण त्यांनी दिलेली काही गृहीतके मुळात चुकीची आहेत. शेणात नायट्रोजन तितक्या मोठ्या प्रमाणात नाही हे मान्य पण भारतात जे शेणखत वापरले जाते त्यात गोमूत्र पण असते. गोमूत्रात( किंवा कोणत्याही प्राणिजन्य मूत्रात) मूळ युरिया आणि क्रीएटीनीन हे नायट्रोजन युक्त पदार्थ असतात. हीच परिस्थिती कोंबडी किंवा बदकाच्या विष्ठेत आहे. कारण पक्षांना मल आणि मूत्र यांचा मार्ग शेवटी एकच असतो (CLOACA) https://en.wikipedia.org/wiki/Cloaca आणि त्यांची विष्ठा हि मूत्र आणि मल याचे मिश्रण असते त्यामुळे पक्षांची शीट हि नेहमी "अर्धद्रव्य"(SEMILIQUID) असते. Chicken manure is the feces of chickens used as an organic fertilizer, especially for soil low in nitrogen.[1] Of all animal manures, it has the highest amount of nitrogen, phosphorus, and potassium.स्रोत विकीhttps://en.wikipedia.org/wiki/Chicken_manure http://www.hgtv.com/outdoors/gardens/animals-and-wildlife/the-straight-… Ten samples of urine from dairy cows, five from sheep and four from goats were analysed to assess the distribution of urinary nitrogen (N) among various chemical constituents in order to gain a better understanding of the reactions undergone by urinary N in soil. Total N in the cow urine ranged from 6.8 to 21.6 g N litre−1, of which an average of 69% was present as urea, 7.3% as allantoin, 5.8% as hippuric acid, 3.7% as creatinine, 2.5% as creatine, 1.3% as uric acid, 0.5% as xanthine plus hypoxanthine, 1.3% as free amino acid N and 2.8% as ammonia. In the sheep urine, total N ranged from 3.0 to 13.7 g litre−1 of which an average of 83 % was present as urea; creatine accounted for 5.3% of the N; hippuric acid and allantoin both accounted for 4.3%, while each of the other constituents amounted to less than 1% of the total N. The goat urine was similar to the sheep urine but with a lower ratio of creatine to creatinine and a somewhat higher proportion (2.0 %) of the total N as amino acid. स्रोत - http://onlinelibrary.wiley.com/doi/10.1002/jsfa.2740590316/abstract जीवामृत, पंचगव्य हे सगळे थोथांड आहे, ही माझी पक्की धारणा आहे. हे आपले वैयक्तीक मत असू शकते. त्याचा आदर आहे. बाकी पूर्ण रासायनिक शेती चांगली कि अर्ध रासायनिक कि ऑरगॅनिक याचा वाद आधुनिक वैद्यकशास्त्र चांगले कि इतर पॅथी चांगली याइतकाच वादास्पद असू शकतो. दोन्ही बाजूमश्ये तथ्य असू शकते. आपल्याला पचेल पटेल ते खावे आणि रुचेल ते बोलावे.

In reply to by सुबोध खरे

धन्यवाद डॉक्टर. हा लेख मलाही एकांगी वाटला होता. निव्वळ नायट्रोजनच नव्हे तर इतरही बरीच अन्यद्रव्ये विविध प्रमाणात पिकांना आवश्यक असतात. आणि अमृतपाणी किंवा जीवामृत यात गायीचे, तेही देशी गाईचेच शेण, तूप इत्यादी वापरायचा आग्रह का धरला जातो हे समजत नाही. म्हशीचे शेण व तूप तितकेच उपयुक्त ठरू शकेल असे मला वाटते. खरेतर त्यापेक्षा कोंबडखत हे जास्त सरस असू शकेल. खते, मग ती सेंद्रिय असोत वा कृत्रिम, ती शेवटी रसायनेच असतात. आणि मातीपरीक्षण केल्याशिवाय कुठलेच खत जमिनीला देऊ नये. थेट खत देणे हे रोग्याला न तपासताच औषधपाणी सुरू करणे होईल. तेव्हा एक संतुलित मार्ग म्हणून सेंद्रिय आणि कृत्रिम खतांची मिश्र खतपद्धती शेतीसाठी वापरायला हवी. यात कृत्रिम खतांचे प्रमाण होईल तेव्हढे कमी ठेवावे, पण पूर्ण बंद करून उपयोग नाही.

In reply to by एस

खरेतर त्यापेक्षा कोंबडखत हे जास्त सरस असू शकेल.>>> ==> कोंबडीखत नक्कीच उतपन्नासाठी जबरदस्त आहे फक्त त्याचा एक दोष मला आढळला तो म्हणजे त्याने जमिनीमध्ये खूप उष्णता निर्माण करते. त्याचे विघटन सुरु होई पर्यंत जमिनी मध्ये ओलावा टिकवून ठेवावा लागतो. कोंबडीखताने ऊस तर असला फोपवतो की बोलायलाच नको. मातीपरीक्षण केल्याशिवाय कुठलेच खत जमिनीला देऊ नये.>>> ==>> १०००% की बात की. आमच्या गावात शेण खताचा २-३ इंच थर देण्याचे फ्याड आले होते. शेतकरी हजारो रुपये घालवायचे. त्यातले बरेच पाऊसाने वाहून जायचे ( ज्याचे खाली रान असायचे त्याची चांदी होयची). बाकीच्या खताचे मातीमध्ये विघटन होण्यासाठी बराच वेळ जायचा, शेणखतात असणाऱ्या तण बीजांमुळे गवत माजायचे आणि त्यावर हाईक होमणी किडे पिकांचे देठ खाऊन टाकायचे. रासायनिक आणि नैसर्गिक खतांचे योग्याप्रमाणत वापर फलदायी आहे.

In reply to by विशुमित

वर हेच लिहिले आहे. Chicken manure is the feces of chickens used as an organic fertilizer, especially for soil low in nitrogen. Of all animal manures, it has the highest amount of nitrogen, phosphorus, and potassium पक्षांच्या विष्ठेमध्ये मोठ्या प्रमाणावर आम्लता असते त्यामुळे ते थेट झाडाच्या मुळात घातले तर झाडे जळतात. करवरील विष्ठा पुसायला गेल्यावर कारचा रंग पण त्याबरोबर निघून येतो हे त्यामुळेच. याच कारणासाठी मृत त्वचा काढून चेहरा चकचकीत करण्यासाठी कोंबडीच्या विष्ठेचा फेशियल मध्ये वापर केला जातो.

In reply to by सुबोध खरे

खरे सर, माहिती बद्दल धन्यवाद...!! बेशक लेख एक अंगी असेल पण हे फक्त नैसर्गिक शेती आणि रासायनिक शेतीच्या फायद्या तोट्याची दुसरी बाजू मांडण्यासाठी दिला आहे. दोन्ही बाजू मध्ये तथ्य असू शकते, हे मला सुद्धा मान्य आहे. जे जे चांगले ते ते घेण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असतो.

मला कधी कधी वाटते की शेकडो हजारो वर्षे पारंपरिक पद्धतीनेच शेती होत होती. मग त्या काळी भारतासकट सर्वच जगात अन्नतुटवडा, भूक का होती? रासायनिक शेतीकडे का वळावे लागले आणि शेतकर्‍यांनी आपखुशीने ही खते का स्वीकारली? आपल्याकडे शेणखत, सोनखत सररास वापरले जात होते. शेळ्यामेंढ्यांना रात्रभर शेतात बसवून ठेवीत असत. पालापाचोळ्याची खते होती. मग अन्न का कमी पडू लागले? खाणारी तोंडे वाढली म्हणून? आता सुधारित, संकरित, जेनेटिकली मॉडिफाइड बियाण्यामुळे शेतीला नक्की फायदा तोटा काय होतो?

In reply to by राही

राही ताई पारंपरिक शेती मध्ये एकरी उत्पादन खूपच कमी येते/ येत होते. लोकसंख्या एवढ्या प्रमाणात वाढलेली नसल्यामुळे त्याच शेतीत गुजराण होत असे. १९४७ साली आपली लोकसंख्या ४० कोटी होती शिवाय आपली आयुर्मर्यादा ३२ (बत्तीस) होती https://blogs.wsj.com/indiarealtime/2013/08/15/indias-record-since-inde… हि आयुर्मर्यादा आता ६८. ३ झालेली आहे. http://www.firstpost.com/india/life-expectancy-in-india-on-the-rise-but… आणि लोकसंख्या मात्र १२५ कोटी. दुर्दैवाने हि वाढलेली आयुर्मर्यादा बहुसंख्य लोक लक्षातच घेत नाहीत. या दोन्ही बाबींचा एकंदर परिणाम म्हणजे जमीन आहे तेवढीच राहून खाणारी तोंडं मात्र ६.७ पट झाली आहेत. प्रत्यक्षात अन्नाचा वापर ३२ ते ६८ या वयात जास्त होतो शिवाय लोकांच्या अन्नाच्या गरजा पण वाढल्या आहेत. आता तुम्हीच लक्षात घ्या कि पारंपरिक शेतीवर गुजराण होणं का कठीण आहे. जेनेटिकली मॊडीफाइड बियाण्या बाबत सवडीने लिहितो

In reply to by सुबोध खरे

१९४७ साली आपली लोकसंख्या ४० कोटी होती शिवाय आपली आयुर्मर्यादा ३२ (बत्तीस) होती
१९४७ साली आयुर्वेद नव्हता का असा एक खवचट प्रश्न विचारावासा वाटतोय :)

अमॄतपाणी हे नक्की कसं आणि काय करतं हे या ठिकाणी उत्तम नमुद केलं आहे. http://www.aisiakshare.com/node/5056 यात म्हटल्याप्रमाणे अमृतपाणी काम नक्की करतं. ते का तसं करतं याची रसायनशास्त्रिक कारणं पटण्यासारखी आहेत.
डॉ. आनंद कर्वे व त्यांच्या विद्यार्थ्यानी गोळा केलेल्या सर्व मिश्रणांचा आणि कृतींचा तसेच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या उत्पन्नातील फरकांचाही अभ्यास केल्यावर दोन गोष्टी लक्षात आल्या. एक म्हणजे या मिश्रणांचा शेतावर अनुकूल परिणाम निश्चितच होतो आहे. दुसरे म्हणजे या सगळ्या मिश्रणांचा जर ल.सा.वि. काढला तर तो आहे, कोणत्या ना कोणत्या स्वरूपातील साखर. थोडक्यात म्हणजे देशी किंवा कोणत्याही गायीचे शेण, दूध, तूप (किंवा इतर कोणत्याही जनावराचे काहीही) न घालता, नुसती साखर किंवा गुळाचे पाणी घातले तरी पुरेसे आहे. माझ्या वडिलांनी स्वतःच्या शेतात या पध्दतीने फक्त साखर वापरून (तीही कारखान्यात बनवलेली, आयुर्वेदिक गुणधर्म असलेला गूळही नाही) अमृतपाणी वगैर वापरणाऱ्या शेतकऱ्यांप्रमाणेच चांगले उत्पन्न काढले आहे. त्यासाठी त्यांनी कधीही कोणते मुहुर्त पाहिले नाहीत, किंवा स्रोत्रेही म्हटली नाहीत. अर्थातच अमृतपाणी आणि तत्सम मिश्रणे वापरणारे शेतकरी आपल्या जमिनीतल्या जीवाणूंना पुरेसे गोडधोड खाऊ घालून सुखी ठेवत आहेत, आणि म्हणून जीवाणूंच्या कृपेने वनस्पतींना आवश्यक ती पोषणद्रव्ये आवश्यक तितक्या प्रमाणात मिळत आहेत, हे याआधीचे लेख वाचलेल्यांच्या लक्षात आले असेलच. या साध्या तत्वाला वैदिक ज्ञान, वैश्विक ऊर्जा वगैरे शब्द वापरून एक गूढतेचे वलय प्राप्त करून दिल्याने या तंत्रांचा प्रसार करणाऱ्यांना आधुनिक ऋषित्व प्राप्त झाले आहे. अलिकडेच पद्म पुरस्काराने सन्मानित झाल्यामुळे ज्यांचे नाव साऱ्यांना माहित झाले आहे, ते श्री. सुभाष पाळेकरही याच माळेतले एक मणी आहेत. अशास्त्रीय विधाने करून देशी गायीचे शेण म्हणजे जणू काही दैवी शक्ती लाभलेला पदार्थ आहे, अशी अंधश्रध्दा ही सारी मंडळी पसरवत आहेत, पण या नाट्यातले खरे नायक साखर आणि मातीतील सूक्ष्म जीव आहेत.
सो अमॄतपाणी हे थोतांड नसून त्याच्याअजुबाजुला निर्माण केलेलं कर्मकांड हे थोतांड आहे असं म्हणता यावं. === ऐसीवरची ही पूर्ण लेखमाला वाचनीय आहे. अगदी लेखाच्या विषयाचा भरपूर उहापोह केलेला आहे आठ भागांत. लेखिका, प्रियदर्शिनी कर्वे, स्वतः शेती संबंधी मार्गदर्शन करणारी संस्था चालवतात बहुधा.

In reply to by अनुप ढेरे

मला वाटते की त्यात त्यांनी असेही म्हटले आहे की हिरव्या पानांत फोटोसिंथेसिस द्वारे निर्माण झालेला स्टार्चही साखरेसारखेच काम करतो . म्हणजे कुठल्याही झाडाची हिरवी ताजी पाने मिळवून त्यांची चटणी वाटून ते पाणी रोपांना योग्य मात्रेत दिले तर साखर अथवा गूळपाण्याचाच परिणाम मिळतो . डोक्टर आनंद कर्वे हे जागतिक पातळीवर नाव असलेले जीवशास्त्रज्ञ (मायक्रोबायोलोजिस्ट) आहेत . मोबाइलवरून टंकले आहे .

In reply to by राही

बरोबर. साखर आणि हिरवी पाने, कुटुन घातली तरी जीवाणुंची वाढ खूप होते जे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पुढे पिकांना न्युट्रिएंट्स पोचवायचं काम करतात.

ही संपुर्ण लेखमाला मी वाचली आहे. आणि सध्या टेरेसवर मक्याच्या २० रोपांवर साखरेचे प्रयोग करणार आहे, जुलै पर्यंत रिजल्ट मिळतील. मातीऐवजी पाणी हे माध्यम (हायड्रोपोनिक) वापरून मका करून बघणार आहे.(फक्त १० रोपे)

विशूमती व अनूप , आपण किती एकर शेती कसता ? कोणत्याही व्यक्तीला( सुभाष पाळेकर)किंवा पद्धतीला थोतांड किंवा टिका म्हणन्यापूर्वी किंवा करण्यापुर्वी आपण त्यांची पध्दत अवलंबली आहे का ?पाळेकरांचे कोणत्या शिबीराला आपण हजर होतात का ? मी स्वतः १० एकर नैसर्गिक पद्धती ते शेती करतो , किंबहूना माझ्यासारखे हजारो शेतकरी ह्या पद्धतीने यशस्वी रीत्या शेती करतात. पाळेकरांनी नैसर्गीक शेतीला प्रोसाहन दिले आहे आणि त्यात कुठेही मध- तुपाचा वापर नसतो. तो वैदीक पधतीमधे होता. कृपया वैदिक शेती , सेद्रींय शेती , रासायनिक शेती , नैसर्गिक शेती ह्यातील फरक समजावून घ्या त्यासाठी Youtube वर पाळेकरांच्या शिबीराच्या व्हिडीवो पहा. खालील काही यशस्वी नैसर्गीक शेती करणारे शेतकरी https://youtu.be/lJRHqM8yp2o https://youtu.be/GokLCkZYISQ https://youtu.be/HusH1TCTSR4 असे हजारो शेतकऱ्यांचे अनूभव Youtube वर आहेत

In reply to by महेश श्री देशमुख

मी शेती करत नाही. पण वर म्हटलं आहे की त्या बाईच्या लेखाप्रमाणे अमृतपाणी थोतांड अजिबात नाही. त्याचा फायदा होतोच आहे. मंत्र म्हणणे वगैरे गोष्टींना थोतांड म्हटले आहे.

कर्व्यांच्या लेखातला हा भाग आवडला. थोडक्यात म्हणजे नैसर्गिक शेती वैज्ञानिक तथ्य समजून उमजून करा. त्यासाठी अशास्त्रीय दाव्यांचा आणि पुराणातल्या वानग्यांचा आधार घेण्याची काहीही गरज नाही. उलट वैज्ञानिक सत्यांकडे दुर्लक्ष करून आपण रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके, इ. च्या निर्मात्यांच्या हातात कोलित देत आहोत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

कुठच्याही एका टोकाला न जाता सुवर्णमध्य गाठावा हे बरे. जमिनीचा कस तपासून त्याप्रमाणे कोणती खते क्ती प्रमाणात आवश्यक आहेत हे सहज निश्चित करता येते. कीटकनाशकांचाही अवाच्या सवा वापर टाळला पाहिजे यात दुमत नाही. साखरेच्या पाण्याची मोहरावर फवारणी करून काजूचे उत्पन्न दुप्पट घेता येते हे सिद्ध झालेले आहे. मी अजून ही फवारणी करू शकले नाही. पुढच्या वर्षी निष्कर्ष सांगू शकेन.

In reply to by पैसा

http://www.amazon.in/Complete-Cashew-Cultivation-Processing-Products/dp… उत्खनन करत असतानां या पुस्तकाचा संदर्भ सापडला.कदाचित आपल्याला उपयोगी पडेल.

साखरेच्या पाण्याची मोहरावर फवारणी करून काजूचे उत्पन्न दुप्पट घेता येते हे सिद्ध झालेले आहे. या साखरेमुळे जास्त प्रमाणात कीटक आकर्षित होऊन परागीभवन जास्त चांगले होत असावे म्हणून काजूचे उत्पादन वाढत असावे असा माझा कयास आहे. परंतु प्रत्यक्ष कारण काय आहे हे समजेल काय?

In reply to by सुबोध खरे

नेटवरून एक लेख वाचला होता, त्यात केरळ आणि कर्नाटकातील काही शेतकऱ्यांचे अनुभव लिहिले होते. लिन्क शोधून paste करते.

नैसर्गिक शेती हा खुप मोठा विषय आहे. मीही सुरवातीला माझ्या शेतीला नैसर्गिक शेती म्हणत होते पण नंतर लक्षात आले, मी सेन्द्रिय म्हणजे ओर्गॅनिक शेती करतेय. ती वर्षान्य्वर्षे करत राहुन शेतावर स्वतःच स्वतःचे भरण पोषण करेल अशी व्यवस्था मला निर्माण करता आली तर त्या व्यवस्थेला नैसर्गिक शेती म्हणता येईल. श्री राजेंद्र भट जे करताहेत ती नैसर्गिक शेती. ते गेलेर ३५ वर्षे शेती करताहेत तेव्हा कुठे आता ते नैसर्गिक शेती ह्या स्तराला पोचलेत. तुम्हाला शेतीसाठी शुभेच्छा. तुमची शेती कोकणात आहे असे प्रतिसादांवरुन वाटतेय. मी डिसेंबर २०२० पासुन आंबोलीला सेंद्रिय शेती करतेय. हा भाग function at() { [native code] }ईवृष्टीचा असल्याने इथे शेती करणे खुप अवघड आहे. त्यात सेंद्रियच करणार हा हट्ट. ‘इथे असली शेती चालणार नाही‘ हे मी रोजच ऐकतेय. ऐकुन सोडुन देतेय.

In reply to by काजुकतली

हो... आधी प्रयोग करत होतो. सध्या विश्रांती घेत आहे.

रासायनिक शेती म्हणजे रोज सोन्याचे अंडी देणारी कोंबडी. पण अंडी घेण्या एवजी आज शेतकरी कोंबडीच मारून सर्व एकदमच सर्व अंडी एकदम काढण्याच्या प्रयत्न करतो आहे. परिणाम भविष्यात शेतीतून अंडीच मिळणे बंद होणार.

In reply to by विवेकपटाईत

ह्या रासायनिक शेती मुळे, खते आणि कीटकनाशके, ह्यांचा वाईट परिणाम जमीन, पानी आणि हवेवर होत आहे. मी कीटकनाशक कंपनीतच काम करत होतो. -------- "परिणाम भविष्यात शेतीतून अंडीच मिळणे बंद होणार." असे अजिबात होणार नाही. मी खाली एक युट्यूब व्हिडिओ देतो. श्री. राजेंद्र भट, हे तुम्हाला जास्त उत्तम रीतीने माहिती देऊ शकतील. https://youtu.be/bIxI92ak3AA?si=4wmZKt3JFfEGScAI

मी २०२० पासुन शेती करतेय. मी सुरवातीपासुनच शेतात रासायनिक खते वापरणार नाही, तणनाशके वापरणार नाही अशी भुमिका घेतलेली आहे. माझ्याकडे मुख्य पिक ऊस आहे, जे सगळे करतात. आंबोलीतील हवामान ऊसाला अजिबात साहाय्यकारी नाही पण तसे ते इतर कोणत्याही पिकाला नाही त्यामुळे त्यातल्या त्यात हमखास पैसे मिळवायचे साधन म्हणुन लोक ऊस लावतात. माझी पाच वर्षांची मेहनत आणि मला मिळालेले उत्पन्न यांचा एकत्रीत अभ्यास केला. खर्चाच्या तुलनेत उत्पन्न जेमतेम मिळाले. गेली पाच वर्षे घरचा सेण्द्रिय तांदुळ खातेय हेच त्यातल्यात्यात समाधान. असे का ह्याचा विचार केला, ऊस क्षेत्रात काम करणार्‍या कोल्हापुरातील तज्ञांशी बोलले. मी प्रयोग करत राहिले. मिळेल ते वाचत राहिले. या सगळ्यातुन एक गोष्ट लक्षात आली. शेतातला सेंद्रिय कार्बन कमी असेल तर सेंद्रिय शेतीसाठी टनावारी सेण्द्रिय पदार्थ (शेणखत, गांडुळखत वगैरे) शेतीत घालावे लागणार. तरच मी टाकलेले जीवामृत पिकांना मिळणार. सेंद्रिय कार्बन नाही आणि रासायनिक खतेही नाहीत तर ऊसासारख्या खादाड पिकाचे कुपोषणच होणार. वर काहींनी लिहिलेय तसे पाळेकर तंत्रज्ञानाने शेती केली तर ती फायद्याची होते. ऊसशेतीही उत्तम होते. मी भेटी दिल्यात अशा शेतांना. पण त्यासाठी आधी जमिनीत सेंद्रिय कार्बन हवा. त्यावर पाळेकरांच्या शेतीचे चारही घटक - बीजामृत, जीवामृत, आच्छादन व वाफसा - शेतात वापरात हवे/निर्माण झालेले हवेत. जमिन नुसती लालभडक मुरमी आणि तुम्ही वरुन जीवामृत ओतताय तर शुन्य फायदा. हे कोणी करत असतील तर रिझल्ट मिळणार नाही, ते जीवामृताला थोतांडच म्हणणार. मुळात पाळेकर जीवामृताला खत म्हणत नाही तर विरजण म्हणतात. विरजण चमचाभर व दुध टोपभर असते तेव्हाच टोपभर दही मिळते. नुसते चमचाभर विरजण रात्रभर ठेऊन त्याचे टोपभर दही कसे मिळणार? तर असो. ऐसी अक्षरेवरचे लेखही मी वाचलेत. शेतात सेंद्रिय कर्ब असणे अध्याहृत आहे. तो असला की त्यात जीवजंतु येतात जे जमिनीच्या विविध घटकांतुन वनस्पतीला जे हवे ते मिळवुन घेतात. हे साखरेच्या स्वरुपात मुळे घेत असावीत. एनी वेज, माझ्यापुरती मी युद्धपातळीवर कर्ब वाढवण्याची योजना हाती घेतलीय. त्यातली एक महत्वाची पायरी म्हणजे जमिनीची कमीत कमी हालचाल, पिकांची मुळे जमिनीतच कुजायला देणे. म्हणजे नांगरट नको. पण नांगरट नाही तर तण कसे रोखणार? तणे ही शेतकर्‍यापुढील मोठी समस्या आहे. शेतीचा प्रश्न खुपच जटील आहे. मार्ग काढणे सोपे नाही. सध्या पुर्ण भारतात सेंद्रिय कर्बाची पातळी धोकादायकरित्या खालावलीय. या जमिनीत सेंद्रिय शेती यशस्वी व्हायला ५-६ वर्षे तरी अखंड मेहनतीची द्यावी लागणार. शेतीवर पोट अवलंबुन असलेल्या शेतकर्‍याला हे कसे परवडणार? शेत नांगरुन रासायनिक खते वापरुन पिक घेणे हा त्यातल्यात्यात सोपा मार्ग आहे. रासायनिक खतांचा अनियंत्रित वापर करुन हा मार्गही आता खुप खर्चिक बनवुन ठेवलेला आहे.

In reply to by कंजूस

ट्रॅक्टर भारतात १९४८ लाच आले. ट्रॅक्टर हा कसा अपायकारक आहे यावर मी थोडा अभ्यास केला होता आणि कधीतरी त्यावर लेख लिहायचा विचार होता. परंतु तण येतात म्हणून नांगरणे, नांगरणे म्हणून ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर म्हणून जमिनीची नापिकी ही एक साखळी असली तरी त्यातून सर्वसाधारण शेतकर्‍याची सुटका नाही.

In reply to by काजुकतली

अनेक ठिकाणी आपण म्हणता तसे कार्बन कमी झालाय. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात वर्षानुवर्षे ऊस लागवड करून जमिनीत युरिया घातल्यामुळे बर्‍याच जमिनी क्षारपड झाल्या आहेत.

टनावारी शेणखत ओतणे, ट्रॅक्टर, रोटावेटर वगैरे पुर्ण बंद करुन जरुरीपुरती जमिन मशागत करणे हे पर्याय आहेत जे केले नाहीत तर पुढे अंधार आहे. कोल्हापुरच्या शेतीतज्ञ चिपळुणकरांशी बोलणे होत असते. उस बदलायचा असतो तेव्हा ते फक्त तास मारुन त्यात उस लावतात. जुना खोडवा तसाच जमिनीत सोडतात. त्यावर तणनाशक मारतात. जमिनीचा कर्ब व उसाचे उत्पन्न वाढवण्यासाठी हा मार्ग त्यांना सगळ्यात लाभदायक ठरला आहे. तणनाशकाला पर्यय सापडत नाहीय.

In reply to by काजुकतली

दिल्लीच्या आसपास जुना खोडवा जाळतात. मग त्याचा धूर दिल्लीत जमा होतो. पूर्वी गाडत होते.पण त्यास खर्च येतो.

तो उसाचा नाही. उसाचा खोडवा बाहेर पडला म्हणजे तो उसच. उसाचा खोडवा कोणी जाळत नाही, जाळायला काहीच नसते. ऊस हे गवतवर्गीय पिक आहे. ऊस तोडताना जमिनीलगत तोडतात. थोडा भाग जमिनीत राहतो, त्याला पाणी पाजले की नवे फुटवे येतात. हा खोडव्यापासुनचा ऊस. जमिनीतुन ऊस काढुन टाकायचा तर नांगरट करुन मुळाजवळचा भाग काढुन टाकणे हाच मार्ह आहे. दिल्लीच्या आजुबाजुला पंजाबमध्ये पावसाळ्यात भातशेती करतात. भात पिकला की कापुन घेतात आणि झोडुन दाणे वेगळे करतात. कोकणात हे दाणे काढुन घेतलेले गवत वैरण म्हणुन वापरतात. पण तरी जमिनीत पाव ते अर्धा फुट कापलेले तुकडे राहतात. कोकणात पुढे उन्हाळ्यस्त शेती होत नाही. हे तुकडे तसेच शेतात राहतात. पंजाबात गहु लावायचा असतो म्हणुन सरसकट आग लाऊन मोकळे होतात. या तुकड्यना पाणी पाजले तर परत भात येणार. कारण गवतवर्गीय पिक. म्हणुन पुढचे पिक करायचे तर नांगरणी करुन काढा नाहीतर आग लावा.

काही प्रश्न : १. जमीन काही वर्षे पडीत ठेवली तर तिची झालेली हानी भरुन निघते काय ? २. सध्या आमची गावची शेती वाट्याने दिली आहे पण करणारा नेहमी परवडत नाही म्हणून रडत असतो. पडीत ठेवली तर आज्जी कानीकपाळी ओरडत असते. आजूबाजूचे बांध कोरत असतात. असे कुठले पीक / झाड आहे काय जे जास्त पाण्याशिवाय वाढू शकते आणी त्याच्या आजुबाजूच्या शेतीला त्रास होऊ शकतो ? सध्या मी "नवरा मेला तरी चालेल चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे' या मनस्थितीला आलोय. कंटाळून शेतात बाभळी /वेडी बाभूळ च्या पिया आणून टाकाव्या म्हणतो.

In reply to by धर्मराजमुटके

शेताच्या चारही बाजूने शेवगा लावा. वाढतोही भरपूर, शेंगाही मिळतील आणि शेजारच्या शेतात सावलीमुळे पीकही कमी येईल ह्याची खात्री. पालासुद्धा खूप पडतो. शेजारी वैतागुन जाईल. मुळासकट उपटल्याशिवाय मरतही नाही. शेती करायची झाल्यास काढून टाकण्याची फार त्रास होत नाही. पावसाळ्यात जोरदार वाऱ्याने पडले तर शेजारच्याचे नुकसानही करते. बहुगुणी शेवगा.

In reply to by धर्मराजमुटके

आंम्ही १० वर्षे पडीक असलेले शेत घेतले. त्याला नांगरटीचा व बाभळी व इतर झाडे काढण्याचा सुरूवातीचा खर्च जास्त आला पण पडीक राहिल्यामुळे पहिले दुसरे वर्ष जोमदार पीक आले. हळद जमीन भुसभुशीत करत असल्याने ती लावली होती. पडीक असेल तर गवत व तण वाढते. त्याचा बाजूच्यांना दुहेरी त्रास होतो. तणाचे बी त्यांच्याकडे जाऊन त्यांचा मशागतीचा खर्च वाढू शकतो व साप गवतामुळे सापांची भीती वाढते.