शेअरबाजार – ‘मृगजळास येई पूर……’
गेल्याच पंधरवड्यांतील गोष्ट, माझ्या एका तरुण, आणि व्यवसायाने डॉक्टर असलेल्या क्लायंटचा फोन आला. "सर, जर तुम्हाला वेळ असेल तर मला तुमच्याशी चर्चा करायची आहे" नवगुंतवणुकदार वर्गांत मोडणारे हे उत्साही व्यक्तीमत्व काही कारणवश संपावर होते आणि कधी नव्हे तो मिळालेला मोकळा वेळ सत्कारणी लावण्याचा त्यांचा ईरादा होता. "मी गेले बरेच दिवस 'मल्टीबॅगर' शेअर्स कसे निवडावे याचा अभ्यास करतोय..तुमचे विचार जाणुन घ्यायला मला आवडेल" –डॉक्टर उवाच.. त्यांच्या या गुगलीवर 'सध्या मार्च एन्ड असल्याने जरा घाईत आहे.. सावकाशीने बोलु' असे सांगुन मी विषय टाळला.
दरम्यानच्याच काळांत मी मनाशी नोंदविलेली आणखी एक घटना म्हणजे 'बिट्कॉईन (BitCoin) याबद्दल काही माहिती आहे का?? त्यात गुंतवणुक करावी का?? हे प्रश्न मला गेल्या काही दिवसांत अनेक वेळा विचारले गेले. (या 'बिट्कॉईन’ बद्दल मी एक स्वतंत्र लेख लिहिला आहे)
सीतेला पडलेल्या देखण्या कांचनमृगाच्या त्या सुप्रसिद्ध मोहाने पुढे रामायण घडले..आणि तद्नंतर आजपावेतो तुमच्या माझ्यासारखे अनेक मर्त्य मानव जगाच्या या मयसभेंत पावलोपावली आडव्या आलेल्या मोहजालांत फसतात, आणि स्वतःच्या जीवनांत महाभारत घडवतात. आजची ही पोपटपंची खास अशा माझ्या हितचिन्तकांसाठी...
1999 साली आर्थिक सल्लागार या व्यवसायाला सुरवात करताना मी प्रथमच नवीन संगणक आणि शेअर्सच्या आलेखांचा तांत्रिक अभ्यास करणारे एक महागडे सॉफ्ट्वेअर घेतले होते. सुरवातीला भेटावयास आलेल्या प्रत्येकाला मी ते कौतुकाने दाखवित असे आणि 'तुम्हाला कोणत्या शेअरचा भाव बघायचा आहे का ?? असे विचारत असे.. त्यावेळचा माझा अनुभव हा, की बहुतेक प्रत्येक जण अशा कोणत्या तरी कंडम, डब्यांत गेलेल्या शेअरची नावे घेत...,की आधी तो शोधता शोधता नाकी नऊ येई..आणि मग भाव असलाच तरी तो कवडीमोलाचा असे.. गंमतीचा भाग म्हणजे हे कचरापट्टी शेअर्स संभाव्य ‘मल्टीबॅगर्स’ म्हणुनच कोणीतरी यांच्या गळ्यांत मारलेले असत. याउलट 'Value Investing' ची तत्वे पाळुन भागधारकांवर दीर्घकाळ लक्ष्मीकृपेचा वर्षाव करणारे शेअर्स घेणे बहुधा गुंतवणुकदारांना मानवत नसावे. अगदी एखादा अपवाद वगळता कोणीही असे शेअर्स मुद्दाम होउन घेतले आहेत, असे मला आढ्ळले नाही.
विसाव्या शतकाच्या अखेरीस आलेली बाजारातील अभुतपुर्व तेजी, जिचे वर्णन 'डॉट कॉम वा ईंटरनेट बबल' असे केले जाते..जेंव्हा क्लिक कंपन्यांचे गारुड बाजारावर पडले होते आणि पावलोपावली असणाऱ्या 'सो कॉल्ड मल्टीबॅगर्स'च्या जोरावर कोणीही सोम्या-गोम्या फंड मॅनेजर गलेलठ्ठ फायदा झाल्याचे दाखवित होता, तेंव्हाची गोष्ट, गंतवणुक शास्त्रातील मानदंड समजल्या गेलेल्या श्री वॉरेन बफेट यांच्या पोर्ट्फोलियोमध्ये मात्र 'जिलेट' ह्या FMCG कंपनीचे स्रवाधिक प्रमाण होते. बफेट साहेबांच्या या आणि अशाच 'बोअर' चॉईस बद्दल आणि ईतरांच्या तुलनेने कमी रिटर्न्स दाखविल्याबद्दल श्री. बफेट यांना छेडले तेंव्हा त्यांनी ज्या व्यवसायांतील प्रारुपे (models) मला कळत नाहीत, मी तेथे गुंतवणुक करायचे टाळतो असा तर्क दिला..(आणि पुढे 'संगणकाने जगांत कितीही क्रांती केली तरी लोक दाढी करण्याचे बंद करणार नाहीत' अशी कोपरखळीही मारली)
बाकी आपल्याकडेही या 'जिलेट्' सारख्याच व्यवसायाचे भक्कम प्रारुप असलेया एक नव्हे डझनावारी कंपन्या असताना त्याकडे दुर्लक्ष करणारे आपण 'बिट्कॉईन (BitCoin) सारख्या समजायला क्लिष्ट, अपारदर्शक असलेल्या (आणि कदाचित असंवैधानिकही) गुंतवणुक पर्यायाबाबत मात्र कसलीही माहिती समजवुन न घेता कोणातरी Life Coachच्या सल्यावरुन बिनादिक्कत गुंतवणुक करतो, हे आश्चर्यजनक नाही काय??
‘Making easy Money’ च्या असल्या फॅडामुळेच मल्टीबॅगर वा BitCoin सारख्या मृगजळामागे धावणाऱ्या किंवा अशाच अपारदर्शी नियमबाह्य भीशी वा चिट्स, फसवी आश्वासने देणाऱ्या, अधिक परताव्याचे आश्वासन देणाऱ्या पण मुळात मुद्दलच जोखीमीत टाकणाऱ्या गुंतवणुक योजना,अनावश्यक महागड्या विमा योजना,अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह असलेल्या पतपेढ्यांसारख्या संस्था, यांच्या भजनी लागणारी गुंतवणुकदार मंडळी 'मॅगीबंदीमुळे नेस्ले कंपनीचा शेअर 20% पडलाय.. घेवु का??' किंवा 'टाटा -मिस्त्री मतभेदांमुळे टाटा ग्रुपचे शेअर्स कमी भावात मिळतायत.... काय करायचे ?? अशा मुलगामी चौकशा करताना अभावानेच दिसतात.
अशा 'आज, आत्ता लगेच..' प्रकारच्या अधीर गुंतवणुकदारांनी एकेकाळचे जगांतील सर्वात श्रीमंत व्यक्ती व महान उद्योगपती श्री जॉन रॉकफेलर यांचे तत्वज्ञान न विसरता लक्षांत ठेवावे ते ही की 'Making money is boring...Smart money is slow'
‘क्षितिजाच्या पार दूर....मृगजळास येई पूर' असे लिहिणाऱ्या स्व. शांताबाई शेळक्यांचा जमाना आता सरला. हल्ली मृगजळे क्षितीजापार नव्हे अगदी दारापाशीच दिसु लागली आहेत. आसपास सगळीकडे फिरणारे सपनों के सौदागर, आणि वाढ्त्या संख्येने स्वप्नाळु दुनियेंत वावरणारे भ्रमित सर्वसामान्य गुंतवणुकदार, ही परिस्थिती केंव्हा बदलणार??.
मा. श्री. सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितलेला किस्सा आहे, ते राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री असताना कसल्याश्या संम्मेलनाला प्रमुख पाहुणे म्हणुन गेले होते. भाषणाच्या शेवटी त्यांनी सदर संमेलनास वैयक्तिक 5000 रुपयांची 'रोख' देणगी जाहीर केली...मात्र हा आकडा ऐकुन व्यासपिठावरील आयोजक व समोरील जनता ढिम्म होती.. मग थोड्या वेळाने श्री. शिंदे साहेबांनी 'महाराष्ट्र राज्याचा सांस्कृतिक कार्य मंत्री या नात्याने मी या सस्थेला 05 लाखाचे सरकारी अनुदान मिळावे यासाठी प्रयत्न करेन' असे 'आश्वासन' देताच टाळ्यांचा कडकडाट झाला...या किश्याबरहुकुम गुंतवणुकीच्या क्षेत्रातही दरवर्षी उत्तम लाभांश, नियमित बोनस वा अशाच मार्गानी दीर्घकाळ महागाईपेक्षा जास्त दराने परतावा देवुन गुंतवणुकदारांचे भले करणारी एखादी कंपनी वा म्युचुअल फंडाची बावन्न्कशी ‘रोकडी’ योजना घेण्याऐवजी अशी बहुतेकदा गुंतवणुकदार भाविष्यात मालामाल बनविण्याच्या आभासी 'आश्वासनांनाच' भुलतात......ही निदान मला तरी जाणवलेली वस्तुस्थिती आहे.
सर हेनरी फोर्ड यांना एकदा एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला 'आयुष्यांत यशस्वी कसं व्हायचं?? यावर ते उत्तरले..."काही नाही,तयारीत रहायचे, आलेली संधी ताबडतोबीने पकडायची" ......"पण सर, संधी तर एकदाच येते.. आणि ती कधी येणार हे कुठे माहित असते.??" पुढचा बालसुलभ प्रश्न. "सोपे आहे, म्हणुनच तर'कायम' तयारीत रहायचे!!!" - सर फोर्ड यांनी लाखमोलाचा मंत्र दिला. बाजारात यशस्वी व्हायचे तर योग्य संधी साधता आलीच पाहिजे व त्याकरिता सदैव सावध असले पाहिजे हाच मुलमंत्र लक्षात ठेवुन मी माझ्या बाजारांतील सहभागास नुकतीच कुठे सुरवात केली होती आणि अतिउत्साहात, काहीतरी करुन दाखवायचेच या प्रयत्नांत 'Multi bagger'म्हणुन खात्रीने खरेदी केलेला शेअर मला 'Multi bEgger' बनविणार अशी दुःचिन्हे दिसायला लागली, परिणामी घाबरुन मी एका जाणत्या ब्रोकरला शरण गेलो तेंव्हा त्यांनी मला सर फोर्ड यांच्या विचारांपुढचा पार्ट II समजावुन सांगितला, मला त्यांनी 'संधी' आणि 'सापळा' यातील फरक समजावुन सांगितला.. त्यांचे माझा दृष्टिकोन कायमचा बदलणारे ते वाक्य म्हणजे Opportunity knocks only once....Temptation twice a second !!!.. मित्रांनो (मित्रों.. नको म्ह्णायला, उगीच पुढील भाग वाचायचा राहुन जायचा) 'मोह सर्वनाशाचे कारण ठरु शकतो' हे केवळ आध्यात्मिक नव्हे तर शेअर बाजारातही पुरेपुर लागु पडणारे वाक्य आहे.
सरतेशेवटी, माझ्या शिरस्त्याप्रमाणे कधीतरी वाचलेली, श्रीमद शंकराचार्यांच्या नावे सांगितलेली, एक छोटीशी गोष्ट सांगुन आपली रजा घेतो.. पहा काही आकलन होते का..
काशींतील त्या नयनरम्य घाटांच्या परिसरांत शंकराचार्यांची ख्याती वाढत चालली होती. परिसरांतील अनेक सुबुद्ध,सुशिक्षित,सुसंस्कृत मंडळी त्यांना आदराने मान देवु लागली होती.
शंकराचार्यांच्या ह्या वाढत्या लोकप्रियतेने आपली पिढीजात संस्थाने खालसा होतात की काय?? अशी भिती तेथील प्रस्थापित धर्ममार्तंडांना वाटु लागली आणि ह्याचा काहितरी बंदोबस्त केलाच पाहिजे या ईर्षेने पेटुन या मंडळींनी एक असा हटयोगी शोधला, ज्याला म्हणे हवेंतुन चालण्याची सिद्धी अवगत झाली होती.
ह्या हटयोग्याकरवी शंकराचार्यांना आव्हान द्यायचा बेत शिजला..हटयोगी काशी शहरात दाखल झाले व त्यांनी जाहिर केले "मी हे गंगा नदीचे पात्र चालत ओलांडणार !!" या बरोबरच त्यांनी "या शहरात कोणीही दुसरा उपासनेने, तपश्चर्येने माझ्याएवढा सिद्ध असेल, तर त्यानेही माझ्याप्रमाणे ह्वेतुन चालुन दाखवावे…..अन्यथा माझे शिष्यत्व पत्करावे" अशी गर्जना केली.
शहरांत खळबळ माजली, हा अद्भुत प्रयोग जाहीर केलेल्या दिवशी नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर लोकांनी अलोट गर्दी केली.
ते हटयोगी गंगातीरी दाखल झाले, तोंडाने काही मंत्र पुटपुटत थेट नदीपात्राच्या दिशेने चालु लागले. जमावाच्या उत्कंठेने परिसीमा गाठली होती..काशींतील समस्त जुने ढुढ्ढाचार्य 'बरं होईल, त्या अतिशहाण्या शंकराच्या नादी आता कोणी लागणार नाही' ह्या कल्पनेने विषेश खुष होते...
अहो आश्चर्यम..त्या योग्याने शांतपणे पाण्यावरुन चालत चालत गंगेचे पात्र ओलांडले. ह्या अघटितामुळे लोकांनी योगीरांजाच्या नावाचा जयजयकार केला, त्यांची पालखींतुन मिरवणूक काढली.
पण गंमतीचा भाग म्हणजे या चमत्कारिक प्रयोगाची एवढी आगावु जाहिरात होवुनही शंकराचार्य तो प्रयोग पहायलाही आले नव्हते. "कसा तोड लपवुन बसलाय आता??...पण आता त्याचा पुरता अधिक्षेप केल्याशिवाय सोडायचे नाही.." अशा भावनेने बाजुच्या ब्राम्हणांच्या कंपुने त्या योग्याला शंकराचार्यांच्या भेटीला नेले.
"अरे आत्मकेंद्री मुढ्मती माणसा.. ह्या महानुभावांनी सतत 12 वर्षे कठोर तपश्चर्या करुन अचाट सिद्धी प्राप्त केली...आणि तुम्हाला साधं हा चमत्कार पहायला येता आलं नाही??" त्या घोळक्यांतुन एक शहाणा शंकराचार्यांकडे पाहुन खेकसला.
यावर अविचल शंकराचार्य मंद हसले आणि त्या हटयोग्याकडे पहात म्हणाले "महाराज, अतिव पुण्याईने मिळालेल्या नरजन्मांतील अनमोल बारा वर्ष वेचुन हे काही क्षण अधांतरी चालण्याची सिद्धी आपण प्राप्त केलीत…आजच्या तुमच्या प्रयोगानं तुमचा अहंभाव नकीच सुखावला आहे पण,जगाच्या दृष्टीने या प्रयोगाचा काही उपयोग आहे का?? यापेक्षा एखाद्या कावळ्याचा जन्म घ्यायचा..हवेत चालताच कशाला, उडताही आले असते"
.योगी काय ते समजले, खजिल झाले अन् खाली मान घालून निघून गेले.
ही गोष्ट आध्यात्मिक, पारमार्थिक आहे, रुपकात्मक आहे, दंतकथाही असावी.. पण त्या मागील पोहोचवयाचा विचार खुप स्पष्ट आहे….जमीनीवरील वास्तवाकडे डोळेझाक करावयाची आणि हवेतील मनोरे बांधण्याच्या, काहीतरी अचाट, अमानवी पारलौकिक, आभासी गोष्टीं मिळविण्याच्या मागे लागुन 'होते तेथेचि, परि दुरावलों । ठायींच असोनि भुललो । मृगजळास पाणी समजोनि धांवलों । हरिणापरी ।। अशी परिस्थिती ओढवुन घेण्याची वृत्ती नसावी हेच या कथेतुन संगावयाचे आहे.
त्यापेक्षा वास्तववादी विचार, मुलभुत गोष्टींचा अभ्यास करणे अधिक महत्वाचे आहे. पाच वर्षांत 10(किंवा अधिक) पट वाढेल असे 'अंदाज' असणारा गुंतवणुकीचा अनाकलनीय व धोकेदायक पर्याय शोधण्यापेक्षा सनद्शीर मार्गाने महागाईच्या दरापेक्षा अधिक परतावा दीर्घकाळ देणारी गुंतवणुक, अर्थातच ब्ल्युचीप शेअर्स वा म्युचुयल फंडाच्या प्रमुख योजनांत करणे, हीच यशाची गुरुकिल्ली आहे.
लोहाचे सुवर्णांत रुपांतर करणाऱ्या परिसाच्या शोधांत आयुष्य व्यतित करण्यापरिस जवळील उपलब्ध पोलादाचे एखादे आयुध बनवुन कष्ट केल्यास आयुष्यांत खात्रीने अधिक सोने कमवता येईल.
-प्रसाद भागवत 9850503503
वर्गीकरण
प्रतिक्रिया
उत्तम सल्ला. धन्यवाद.
मस्तं लेख. एकदम समयोचित!
उपयुक्त माहिती
लेख आवडला.
सावध करणारा समयोचित लेख.
लेखाकरता धन्यवाद!
लेख आवडला !!!
यात फंड का निवडला याचे
भागवत साहेब
तुमचे पैसे डबल करून हवेत का ?
लेख
लेख आवडला.
Infy cha funda
स्प्लीट-बोनस
आकडेमोड
लेखात लिहिलेले सत्य नाहिये.
ईत्रेट्रेश्ण म्हणजे काय?
Smile Smile
खुप सोपं आहे...
धन्यवाद
Here 9.51%
शेअर बाजारात सेन्सेक्स मध्ये
खूप सुंदर प्रतिसाद !!
सर्व माहीती उत्तम...
साहेब, क्षमस्व. नाही. माझा
छान लेख
मृगजळ आणि
कालच्या शेअरचे ऊद्या काय