वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रे सचिन...!!
आजकाल तुझ्याविषयी बोलणं..लिहिणं...इतकंच काय तुला टीव्हीवर बघणंही सोडून दिलंय मी..
का म्हणजे काय??
त्रास होतो रे..खरंच खूप त्रास होतो...
आज तुझा वाढदिवस आहे...म्हटलं बघूया, जमतंय का काही लिहायला..
लिहायला लागतंच काय रे?? तुझ्या एकेका फटक्यावर लेख लिहिता येतील..अजूनही लिहितात ना लोकं..सुरेख लिहितात...
पण कसंय..तुझ्यावर लिहायचं म्हणजे परत भूतकाळात जायचं..त्या आठवणीत रमायचं..आणि आत्ता तू मैदानावर नाहीस हे लक्षात आलं की भर्रकन वर्तमानात यायचं..
त्रास होतो रे..खरंच खूप त्रास होतो...
कसंय ना सचिन..तुझ्याविषयीच्या आठवणी या फक्त क्रिकेटच्या नाहीयेत...तू आम्हाला आमच्या बालपणाशी जोडणारा दुवा आहेस ...एकेकाळी तू संचारला होतास आमच्यात..तुझ्या प्रेरणेने काहीही अशक्य नाही असं वाटायचं..पण परत तेच...वर्तमानकाळ दिसतो....अरे सर्दी झाली म्हणून सिक लिव्ह टाकणारे आम्ही...आम्ही तुमची प्रेरणा घेऊन तरी काय तीर मारणार?.....तुमचं सगळंच वेगळं असतं रे ...करोडोंच्या लोकांच्या अपेक्षा डोक्यावर घेऊन खेळणारा तू काय...डोक्याला बँडेज बांधून खेळणारा तो कुंबळे काय...अन कॅन्सरवर मात करून परत जिद्दीने मैदानावर येणारा तो युवराज काय...!!!...
मी काही तुला कधी देव वगैरे मानलं नाही..आणि ते तुलाही आवडत नाहीच..पण द्वारकेत गेल्यावर कृष्ण नंतर कधीही श्रीकृष्ण बनून गोकुळात परत आला नाही..कारण बाळकृष्णाची तीच छवी गोकुळवासियांच्या मनात कायम राहावी ही त्याची इच्छा होती....तसाच तू प्रशिक्षक वगैरे होऊन संघात वापस यावा असे मलातरी वाटत नाही..क्रिकेट संदर्भात आजकाल तू फारसा दिसत नाहीस ते एका अर्थाने चांगलंच आहे..तू जिथे आहेस तिथेच आनंदात राहावंसं एवढीच त्या श्रीकृष्णचरणी प्रार्थना...!
आणि हो...तो तुझा सिनेमा येतोय असं ऐकलंय..तो काही माझ्याकडून बघणं होईल असं वाटत नाही..माफ कर पण,
त्रास होतो रे...खरंच खूप त्रास होतो...
वाचने
1804
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
रिलेट झालं सगळं.
एक नंबर
सचिन आता निवृत्त झालाय ही
Long Live Sachin! We miss you.