जिम म्हटलं की तिथे गेलं, व्यायाम केला, परत आलं असं सर्वसाधारणपणे होतं. पण म्हणजे; प्रत्येकाचं नाही. किंवा अगदी प्रयत्न केला तरी तिथे काही किस्से असे घडतात की ते कायम लक्षात राहतात. जेंव्हापासून व्यायाम करायला, किंबहुना जिमला जायला सुरुवात केली तेंव्हापासून आजवर घडलेले निवडक काही किस्से सांगावेसे वाटतात. तसं व्यायामाबद्दल बोलायला #मिपाफिटनेस धागा आहेच; इथे जरा अवांतर.
ठाण्यात पूर्वी एक गोल्ड जिम नावाचं जिम होतं. तळवळकर्स त्या वेळी बरंच लोकप्रिय झालं होतं. आणि गोल्ड हे नवं आणि ठाण्यातलं दुसरं 'जिम' होतं. (बाकी व्यायामशाळा म्हणाव्या अशा) मी आणि माझा मित्र तेंव्हा कॉलेजमधे होतो आणि अर्थातच मस्क्युलर दिसण्याची मनिषा आमची होती त्यामुळे बरेच पैसे घरच्यांना मोजायला लावून गोल्ड जिम चं सभासदत्व आम्ही घेतलं. तिथे छान एसी, गाणी वगैरे चोचले होते. आम्हाला जो पहिलाच इन्स्ट्रक्टर लाभला तो जरी त्याच्या जागी भारी असला तरी जरासा यडा होता. तो जिम कम पब मधे असल्यासारखं वाटायचं. म्हणजे स्पॉट करत नसेल तेंव्हा तो एकटाच आरशात बसून पदलालित्य वगैरे करत पोजिंग चा सराव करायचा. मी आणि माझा मित्र एकमेकांकडे नुसतं बघूनही हसायला लागणार्यांपैकी होतो. त्यामुळे सुरुवातीला आम्हाला ते जड गेलं. म्हणजे जोर मारताना मान वर झाली की हा समोरच्या आरशात फ्लेक्स करून नाचल्यासारखं काहीतरी करताना दिसायचा आणि अवसानच जायचं सगळं. आणि मग पाणी प्यायच्या निमित्ताने बाहेर जाऊन हसून घ्यायचो. अनेकदा तर तो अर्धा जोर सोडून चक्क लोळायची वेळ आलेली. या माणसाचं एक गाणं फार आवडीचं होतं. 'मुंगडा'. ते गाणं लागलं की तो चक्क धावत रिसेप्शन ला जाऊन आवाज वाढवायला लावायचा. पहिल्यावेळी आम्हाला कळलंच नाही. स्क्वॉटरॅकवरून मी भरपूर वजनी बार उचलत होतो आणि बघतो तर मागे तो नाहीच. मग काही सेकंदात आवाज वाढला आणि स्वारी थिरकत थिरकत आली. पुढे इन्स्ट्रक्टर बदलला आम्ही.
याच जिममधला एक जबर हसवलेला पण काहीसा डेंजर किस्सा. हेवी बेंचप्रेस करत होतो. त्या दिवशी एकही इन्स्ट्रक्टर नव्हता, दुपारची वेळ होती. तीन चारच जण जिममधे होतो त्यामुळे मी आणि माझा मित्र एकमेकांना स्पॉट करत होतो, सपोर्टला उभे होतो. माझा मित्र बेंचप्रेस करत होता, पन्नास किलो. त्यावेळी रिसेप्शन वर कोण बया होती ठाऊक नाही पण जुनी हिंदी गाणी लावत होती. 'आप जैसा कोई मेरी ज़िंदगी में आए' हे गाणं लावलं होतं. या गाण्यात '...तो बात बन जाए.........' या ओळीनंतर एक 'टू.....' असा आवाज आहे. जिमच्या त्या (गाण्याव्यतिरिक्त) शांततेत बेंचप्रेस मारत असताना हा 'टू..........' आवाज आला आणि आधीच हसायला कारण न लागणारे आम्ही दोघे क्षणात हसायला लागलो. वेड्यासारखा अॅटॅक! मी सपोर्ट करत होतो ते सोडून खालीच बसलो. मित्राने बार उचलला होता तो त्या 'टू....' सारखाच सेकंदात खाली आला, आणि त्याला उचलताच येईना. छातीवर तो बार बॅलन्स करत तो हसत होता, मी खाली बसून हसत होतो. पण ते खरं तर खूप डेंजर होतं. काही सेकंदानंतर 'बार उचल साल्या लवकर' असं तो ओरडला तेंव्हा हसू थांबवत मी बार उचलला. चुकलं होतं, पण हसू आवरलं नाही. पुढे ते गाणं लागलं की आम्ही बसून रहायचो आणि ते संपलं की पुढचा सेट.
नंतर आमच्या जवळच्या शाळेत जिम सुरू झालं. शाळेने जिम सुरू करणं हा फार धक्का होता. जिथे दहा वर्ष आम्हाला मधल्या सुट्टीतही क्रिकेट खेळायला बॅट आणायची परवानगी नव्हती तिथे चक्क जिम ! परदेशी व्यायाम?? असो. तर जिम सुरू झालं. बाकी जागा मोठी होती, उपकरणं ठीकठाक पण पुरेशी होती. गडबड होती ती व्यवस्थापनात. एक साठीचे सर होते. म्हणजे जिमसाठीचे आणि ते स्वतः साठीचे. ते या जिमचं सगळं बघायचे. मुळात व्यायामाला गाण्यांची जोड हवी याबद्दल मतं भिन्न असू शकतात. त्यात हे सर मागल्या पिढीतले असल्याने त्यांचं मत 'गाणी कशाला हवीत?' हे असणं अपेक्षितच होतं. तरी बरेचदा सांगून मग एक कॉम्प्युटरला योग्य अशी २.१ स्पीकर सिस्टिम आणि एक डीव्हीडी प्लेयर आणण्यात आला. इथे साधारण प्रत्येकी हजार चौफू आकाराचे लेडीज, जेंट्स वेगळे विभाग होते आणि ते वर-खालच्या मजल्यावर होते. शाळेने काय करावं?... या २.१ स्पीकर सेटचा एक स्पीकर भल्यामोठ्या जेंट्स विभागात, आणि एक खालच्या मजल्यावर तितक्याच मोठ्या लेडीज विभागात ठेवला, वायर एक्स्टेंड करून. त्याचा इवलासा सबवूफर लेडीज विभागात. आता या रचनेत गाणी ऐकू आली तरी खूप होतं. आम्ही त्या सरांना विनंती करून डीव्हीडी प्लेयर जेंट्स मधे ठेवायला लावला, जेणेकरून आवाज, गाणी हे तरी आपण नियंत्रित करू. आम्ही घरून सीडी राइट करून आणल्या निवडक गाण्यांच्या. झालं?... आता लेडीजमधल्या कुणीतरी म्हणे सांगितलं आवाज नको म्हणे आम्ही योगासनं करतोय. ते खोडून काढतो तर ते सर म्हणे बाहेरच्या सीडी अलाऊड नाहीत यापुढे. बरंं म्हटलं तुम्ही लावा मग. आणि ते चक्क भावगीतं लावू लागले! म्हणजे उषःकाल होता होता, किंवा ये रे घना ये रे घना या गाण्यांच्या पार्श्वभूमीवर आम्ही स्क्वॉट्स आणि बेंच प्रेस हे व्यायाम केलेत. त्यानंतर काही वर्ष जिम लावलंच नाही.
पुढे त्या ये रे घनातून सावरलो आणि एक उत्तम जिम मिळालं घराजवळ. जिथे अजूनतरी असं काही विचित्र प्रकरण घडलेलं नाही. किस्से अनेक झाले पण हे निवडक मात्र आजही आठवून हसतो आम्ही.
मिपाकरांकडे असे भनाट किस्से असतीलच. सांगा की.
वाचने
7052
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
ये रे घनावर जिम??????!!!!!
हहपुवा! =))
मजेदार किस्से आहेत. जिमचे
येरे घनावर फ्युजन।
ये रे घना सोडल्यास माझेही
अरे किस्से किस्से काय करतोस ,
बस का
In reply to अरे किस्से किस्से काय करतोस , by माझीही शॅम्पेन
सही आहेत किस्से
हा हा हा
कसले भारी किस्से ! लोळून
हाहाहा!
हा हा हा!
मस्तच वेल्ला .
हा हा हा!
In reply to मस्तच वेल्ला . by प्रमोद देर्देकर
लॉल! बाकी जिम मधली स्पीकर वर
अरे!
In reply to लॉल! बाकी जिम मधली स्पीकर वर by अत्रे
पण मला जे म्युझिक व्यायाम
In reply to अरे! by वेल्लाभट
छोटासा एमपीथ्री प्लेयर न्या
In reply to पण मला जे म्युझिक व्यायाम by अत्रे
ते आहेच हो. पण ढॅणढॅण वाजणारे
In reply to छोटासा एमपीथ्री प्लेयर न्या by प्रसन्न३००१
ओके या बाब्तीत मतं वेगळी असू
In reply to ते आहेच हो. पण ढॅणढॅण वाजणारे by अत्रे
एक किस्सा ..
आरारा कचराच केला!
In reply to एक किस्सा .. by नि.पा