Skip to main content

पन्हं

लेखक रामदास यांनी मंगळवार, 04/04/2017 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
कैरीचं पन्हं : पन्हं कधीही , म्हणजे अगदी उन्हाळ्यात सुध्दा उठसूठ प्यायचे नसते . आता बाजारात बारा महीने कैर्‍या मिळतात म्हणून करण्याचा हा प्रकार नव्हे. आणि हा सिंथेटीक सरबतासारखा उठवळ आयटमही नव्हे. पण पन्ह्याची कृतीसुध्दा पाल्हाळीक नसावी. चला बनवू या उत्तम पन्हे. पन्हं म्हणजे कच्च्या कैरीचे की कैर्‍या उकडून ? असा आगाऊ प्रश्न विचाराणार्‍या माणसाला पन्ह्याच्या कार्यक्रमातून आधीच कटाप करावे. पन्हे म्हणजे उकडलेल्या कैर्‍यांचेच !! पन्ह्यासाठी आधी कैरीचे वय बघावे. अगदीच बालिकाबधू कैर्‍या टाळाव्यात. पोटात घट्ट कोय धरलेल्या साधारण पोक्त कैर्‍या निवडून घ्याव्यात. शेपूच्या वासाची बाधा असलेल्या कैर्‍या आधी टाळाव्यात. आमच्याकडे /आम्ही हापूसची कैरी उकडूनच पन्हं बनवतो असे म्हणणार्‍या लोकांकडे पन्हं पिऊ नये. त्यांच्या पन्ह्याला एक बावळट वास येतो. मुंबईतलं सर्वोत्तम पन्हं एकेकाळी फोर्टात खादी भांडारात मिळायचं. माडाचा गूळ वापरून केलेल्या पन्ह्याची चव पुन्हा कधीच चाखायला मिळाली नाही . पण सरकारी असल्याने हे पन्हं काही वर्षानी मिळेनासं झालं. आता माड्गूळ फक्त मिळतो. कधीतरी उत्साहाच्या भरात माडगूळ घेऊ आणि तेव्हा घरी कैर्‍या असतील आणि गृहिणी नाक न मुरडता माडगूळ वापरेल हे जरा कठीणच आहे. त्यातल्या त्यात बोरा बाजारात असलेल्या बेडेकरांच्या दुकानात हवं तसं पन्हं फक्त चैत्रातच प्यायला मिळतं. दुपारी दीडच्या दरम्यान हे पन्हं प्यायला जावं. उत्तम पन्ह्यासोबत ब्यांक , सरकारी हापीसातल्या पुरंध्र्यांची गर्दी हा एक बोनस आहे. बेडेकर त्याचे वेगळे पैसे घेत नाहीत. याखेरीज मान्यताप्राप्त अ‍ॅडीशन म्हणजे वेलचीची पूड. वेलचीचा तोरा नाकापेक्षा मोती जड व्हावा इतकी वेलची वापरू नये. आणि अगदीच जास्त वेलची घातली तर ती शेवटीच्या पातेल्याच्या तलातल्या गाळातच जाते. केशर वापरणे म्हणजे कैरीसमोर सुबत्तेचा ठुमका मारण्यासारखे आहे. इतकी मार्गदर्शक तत्त्वं पाळली की पन्हं पन्हं असं लाडीक कण्हत रहावं. बायको मुकाट्याने बनवून देते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 11581
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

आहाहा! पन्हं झालं आता वाटली डाळ पण येऊद्या. पण कच्च्या कैरीबाबत असहमत. कच्च्या कैरीचं किसून ,न उकडवता केलेलं पन्हं अप्रतिम लागतं. आणि त्याचा रंग तर द्रुष्ट लागेल असा.

आहाहा.. मजा आली काका..
आमच्याकडे /आम्ही हापूसची कैरी उकडूनच पन्हं बनवतो असे म्हणणार्‍या लोकांकडे पन्हं पिऊ नये. त्यांच्या पन्ह्याला एक बावळट वास येतो.
जबरदस्त..

In reply to by मारवा

ह्यावरुन एक अप्रतिम कल्पना सुचली ! मिपावर ऊन्हाळा स्पेशल कॉकटेल स्पर्धा ठेवुयात का ? पन्हाचं अन बीयरचे कॉकटेल भारी लागेल !!

In reply to by प्रसाद गोडबोले

वोडका लागते त्याला पन्ह खूप फ्रेश हवं त्यात वोडका पण अबसोल्यूट वोडका छान लागते . सेम अबाऊट कोकम सरबत थंडगार आणि वोडका मिक्स .

In reply to by प्रसाद गोडबोले

चालेल! माझी एंट्री: पाणीपुरीचं पाणी आणि व्हाईट रम. शेकन, नॉट स्टर्ड.

In reply to by प्रसाद गोडबोले

अजून एकः कोकम सरबत गोठवून केलेले बर्फखडे, टॉनिक वॉटर आणि बॉम्बे सफायर जिन.

In reply to by आदूबाळ

अबसोल्यूट वोडका + नीरा (पालक्कड मधून मागवलेली)

मी पण एक बावळट वासाची कैरी आणलीये. आता तुम्ही इतक्या आठवणी काढताय की पन्हं तरी करुन पाहुच..

शेपूच्या वासाची बाधा असलेल्या कैर्‍या आधी टाळाव्यात.
लहानपणी एकदाच शेपुच्या वासाचा आंबा खाल्ला होता , बेक्कार ! इतक्या वर्षांनी आठवुनही घाण वाटतय .... व्व्व्व्वॉऑऑऑऑऑक्क्क्क्क्क्क थ्थूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊउ

झकास!!! पन्ह पिण्यासाठी उन्हाळाही तसाच कडक असावा. वाटेल त्या कैय्रांचं पन्ह होत नाही.

म्हणुन सरुवात केली रेसेपी डीटेलात न जाता तुम्ही कुठे कसे मिळतत्ायात रमलात की म्हणजे गुळाचे प्रमाण कीती कसे इ नाही दीलत साखर वापरुन पन्ह करणारीला गुळाचा अंदाज येत नाही सुगरणीवर खव्वया हावी झाल्यासारखा खोबरट समजुन घेतलेली कैरी चक्क आंबट निघाली आता हीची मारवाडी लुंजी घालू ? की गुजराती छुंदा बनाउ ? की लोणचं च घालु सरळ सरळ ?

@पन्ह्यासाठी आधी कैरीचे वय बघावे. अगदीच बालिकाबधू कैर्‍या टाळाव्यात. पोटात घट्ट कोय धरलेल्या साधारण पोक्त कैर्‍या निवडून घ्याव्यात. शेपूच्या वासाची बाधा असलेल्या कैर्‍या आधी टाळाव्यात.››› काय ती निवड? ==)) ह्या ह्या ह्या!

शेपूच्या वासाची बाधा असलेल्या कैर्‍या
हां! भयानक लागतो हा प्रकार. पण मला वाटलं नव्हतं शेपूच्या वासाचे आंबे हा प्रकार इतका सार्वत्रिक असेल.
माडाचा गूळ वापरून केलेल्या पन्ह्याची चव पुन्हा कधीच चाखायला मिळाली नाही . पण सरकारी असल्याने हे पन्हं काही वर्षानी मिळेनासं झालं. आता माड्गूळ फक्त मिळतो. कधीतरी उत्साहाच्या भरात माडगूळ घेऊ आणि तेव्हा घरी कैर्‍या असतील आणि गृहिणी नाक न मुरडता माडगूळ वापरेल हे जरा कठीणच आहे.
माडाचा गूळ म्हणजे काय? कुठे मिळतो हा प्रकार?

In reply to by आदूबाळ

शेप्या आंबा म्हणतात त्याला बहुतेक. आकाराने मोठा, हिरवा रंग, आत गर खूप घट्ट आणि तो लिजंडरी वास तसेच चव... अतीप्रचंड घाणेरडा लागतो तो प्रकार.. :))

माडा पासून बनवलेला गूळ बंगालची पेशालीटी आहे. नोलान गोर असं काही म्हणतात तिकडे . पण फ़िल्मी सन्दर्भ पण आहेत. नूतन अमिताभ चा पिक्चर , लीना चंदावरकर पण होती. सजना है मुझे सजना के असं गाणं पण होतं तो पिक्चर !

In reply to by रामदास

हो तो सिनेमा.. चैत्र सुरू झाला आहे आणि तुम्ही पन्ह्याची आठवण काढलीत.. वावा.. स्वाती

माडा पासून बनवलेला गूळ बंगालची पेशालीटी आहे. नोलान गोर असं काही म्हणतात तिकडे . पण फ़िल्मी सन्दर्भ पण आहेत. नूतन अमिताभ चा पिक्चर , लीना चंदावरकर पण होती. सजना है मुझे सजना के असं गाणं पण होतं तो पिक्चर !

In reply to by रामदास

नोलेन गुर. नेहमीच्या शोंदेशापेक्षा नोलेन गुरेर शोंदेशाची चव भन्नाट लागते. अक्वायर्ड टेस्ट असावी बहुतेक ;) (मुनिवर्यांसाठी 'आऊटसाईड द ऑफ-स्टंप' डिलिव्हरी :))

छान माहिती . माहिती वाचुन जी . ए. कुलकर्णी यांची "चैत्र" हि कथा आठवली . याच कथेवर क्रांती कानडे यांनी केलेला चित्रपट आठवतो . त्याचवेळी "कैरी" हा चित्रपट विसरावासा वाटतो .

रामदासकाका, लेखातलं शेवटून दुसरं वाक्य म्हणजे कहर आहे. पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा! ;-) आ.न., -गा.पै.

कोकणात पन्ह्याला चवीसाठी मिरची लावतात. आमच्या वडिलांनी खास पन्हे पिण्यासाठी क्रॉफर्ड मार्केट मधून हिरव्या कंच रंगाचे ग्लास आणले होते. त्यात गुळाचे, मिरची लावलेले फ्रिज मधल्या थंडगार पाण्याचे बर्फ टाकलेले पन्हे म्हणजे आ हा हा हा. त्या ग्लासकडे पाहूनच गा~ ~ र वाटत असे.

उन्हाळ्यातील आठवणी जाग्या झाल्या