मराठी शाळा - आणखी एक प्रयत्न
नमस्कार,
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर एक प्रयत्न करावासा वाटतो. त्यासाठी मराठी शाळांना उद्देशून एक पत्राचा मजकूर लिहिला आहे. हे पत्र माझ्या जवळच्या शाळांना पाठवायचा मानस आहे. आपण सगळ्यांनी जर आपापल्या शहरातल्या, गावातल्या शाळांना हे पत्र पाठवलं, तर या प्रयत्नाला बळ येईल. पत्र खाली देत आहे. मतं, प्रतिक्रियांचं स्वागत आहे.
हा विषय जुना, नकोसा, कीस पडलेला असल्यास दुर्लक्ष करावे.
संचालक,
शाळेचं नाव>,
शाळेचा पत्ता>
माननीय महोदय,
सर्वप्रथम, तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण शाळेला नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा. नवीन वर्ष, म्हणजे नवीन सुरुवात, आणि नवीन उत्साह या गोष्टी ओघाने आल्याच. शिवाय गुढी हे विजयाचं प्रतीक आपण मानतोच. परंतु शिक्षण, शाळा यांच्याबद्दल बोलायचं झालं तर जुनं ते सोडून नव्याची कास धरणं हे वाक्य भीषण वाटायला लागतं. याला कारण गेली तीन दशकं होत आलेला एक बदल आणि त्याने आज धारण केलेलं रूप आहे. यात तुमचा आमचा, भावी पिढीचा नेमका विजय होतोय की पराभव हा कळीचा प्रश्न आहे.
इंग्रजी माध्यम व त्याच्याशी जोडली गेलेली प्रतिष्ठेची, प्रगतीची विशेषणं यांनी बहुतांश पालकांच्या मनांवर गारूड घातलेलं आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून आपल्या मुलाला शिकवणं हे जणू क्रमप्राप्त असल्यासारखं चित्र शहरात बघायला मिळतं. जसा आजार तसा उपचार या समीकरणाप्रमाणे शाळांनाही इंग्रजी माध्यमात त्यांचं बर्याच प्रकारचं हित दिसल्यामुळे परंपरांचा गाशा गुंडाळून शाळाही या प्रवाहात सामील होत आहेत. शासनाबद्दल बोलायचीच खोटी आहे कारण त्यांच्याकडून मराठीची कळकळ फक्त सणासुदीला आणि निवडणुकांच्या वेळी व्यक्त होते. बाकी उलटंच चित्र असतं.
गेली दोन वर्ष ठाणे, दादर येथील काही नामांकित मराठी शाळांनी इंग्रजी माध्यम सुरू करण्याचे निर्णय जाहीर केले आहेत. या बातम्या वाचून दु:ख होतं, व नेमकं काय नाही म्हणून एक एक करून एकेकाळच्या नावाजलेल्या मराठी शाळा अशी इंग्रजीची कास धरत आहेत हा प्रश्न पुन्हा पुन्हा पडतो.
मी आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी नाही, किंवा राजकीय पक्षाचा कार्यकर्ताही नाही. परंतु मराठी, किंबहुना मातृभाषेतून शिक्षण घेतलेली मी एक व्यक्ती आहे, आणि मातृभाषा शिक्षणावर माझा विश्वास आहे.
तसे पूर्वीपासूनच इंग्रजी-मराठी हे पर्याय महाराष्ट्रात शिक्षणासाठी उपलब्ध होते आणि पालक आपापल्या मतीनुसार ते निवडत असंत. पण अधिकाधिक शाळांनी मराठी सोडून इंग्रजी सुरू करण्याचे निर्णय घेतल्याने आताच्या पालकांसमोर पर्यायच उरत नाहीसे झाले आहेत.
मातृभाषा शिक्षणाबद्दल मी काही म्हणण्यापेक्षा आंतरजालावर उपलब्ध माहिती तपासली तर अधिक उत्तम होईल. वानगीदाखल युनेस्को सारख्या जागतिक संघटनेने जगभरात मातृभाषेतून शिक्षणाची शिफारस केली आहे हे सांगतो. त्यांच्या संकेतस्थळावर त्या विषयावरचं श्वेतपत्र तुम्हाला वाचता येईल. याशिवाय अनेक तज्ञांनी केलेले अभ्यास हेच सांगत आलेले आहेत. फ्रान्स, जर्मनी, जपान, चीन यासारख्या आपल्याहून पुढे असलेल्या देशांमधेही शिक्षणाचं 'माध्यम' इंग्रजी नसतं, कारण त्याचा मुलांच्या वैचारिक विकासाशी, मेंदूशी थेट संबंध असतो. पण दुर्दैवाने आपल्या देशात इंग्रजी म्हणजे भविष्य असं मानणारा, आणि ती भाषा यावी म्हणून सबंध शिक्षणच इंग्रजीतून देण्याचा जो एक विचारप्रवाह बळावलाय तो मुलांसाठी घातक आहे.
असं असतानाही अनेक जिल्हा परिषद शाळा, मुंबईबाहेरच्या शाळा मराठीचीच कास धरून आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करत आहेत, पालक इंग्रजीतून काढून मुलांना अशा शाळेत टाकत आहेत हे नमूद करतो. अशा काही शाळा मी प्रत्यक्ष बघून आलो आहे. परंतु ही जाणीव शहराबाहेर बघायला मिळते, शहरात मात्र प्रवाहामुळे अंध झालेले पालक आपल्या मुलासाठी योग्य काय हे बघू शकत नाहीयेत.
अशा परिस्थितीत शाळांनी पालकांचं मनपरिवर्तन करण्यात पुढाकार घ्यावा अशी मनापासून इच्छा आहे. आपली शाळा कदाचित असा विचार करत नसेलही; कदाचित करत असेल किंवा कदाचित आपण एव्हाना इंग्रजी माध्यम सुरू केलंही असाल. नसेल तर उत्तमच आहे. तो पर्याय विचाराधीन असेल तर या बदलात वेगळी वाट धरून मोठेपणा मिळवायची ही संधी आहे असं म्हणतो. आणि निर्णय घेऊन झालेला असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही असं सुचवतो.
पालकांना कुठेतरी मातृभाषा शिक्षणाचं महत्व पटतं परंतु शाळेतली इतर मुलं, सुविधा, किंवा इंग्रजीतली प्रगती अशी कारणं देत पालक समाजाबरोबर जातात. खरं तर त्यांच्या या प्रश्नांबाबत त्यांना आश्वस्त करणं गरजेचं असतं आणि शाळांइतकं प्रभावीपणे हे कुणीही करू शकत नाही असं मला वाटतं. पालक शुल्क द्यायला तयार असतात, ते इंग्रजीतही देतातच. इंग्रजीचे वर्ग पहिलीपासून सक्तीचे आहेतच. मग हे असताना शाळेचं संपूर्ण माध्यम इंग्रजी करून शेकडो मुलांच्या भविष्याशी खेळण्याचं कारण खरं तर काहीच नसतं.
याउलट शिक्षणाच्या नवनवीन पद्धती राबवण्याची आज खरी गरज आहे. हसत खेळत शिक्षण, ज्ञानरचनावाद यासारख्या शिक्षणपद्धती राबवून मुलांना चाकोरीबद्ध अभ्यासक्रमात न बांधता त्यांच्या कलागुणांना, विचारक्षमतेला पूर्ण वाव देण्याची गरज आहे. पण दुर्दैवाने माध्यमवेडापायी हा मुद्दा दुर्लक्षित राहतो, आणि मुलांना 'स्पर्धेचं युग' नावाच्या एका वेड्या गर्दीत लोटलं जातं. खरं तर बदल इथे व्हायला हवाय.
इंग्रजी ही एक भाषा म्हणून शिकायलाच हवी, पण ते माध्यम असण्याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. त्याचे दुष्परिणाम मात्र प्रचंड आणि दूरगामी आहेत. पण शाळांनी पालकांना आणि पालकांनी शाळांना हा विश्वास द्यायला हवा. तेंव्हा तुमच्या शाळेला, तुमचा इंग्रजी माध्यम सुरू करण्याचा विचार नसल्यास किंवा असल्यास, असं मनापासून सुचवतो की एकदा तुमच्या पालकांना आवाहन करून बघा, विश्वासात घेऊन बघा. शाळा म्हणून अधिकारवाणीने पालकांशी बोला, की 'मराठीतूनच मुलांना शिकवा, ते इंग्रजीत मागे पडणार नाहीत ही जबाबदारी आमची'.
मला खात्री आहे पालक तुमच्या पाठीशी उभे असतील. पालकांना विश्वास हवाय तो शाळांकडून, अन्यथा प्रवाहासोबत वाहण्याची माणसांची वाईट सवय जिंकेल आणि मराठी, शाळा, मातृभाषेतून शिक्षणाचं महत्व पटणारे अनेक पालक, मुलं की नेमकं कोण हरेल, ठाऊक नाही; कदाचित सगळेच. शाळेचं किमान एखादं निवेदन जरी लोकांसमोर आलं, तरी खूप काही होऊ शकेल. हा मुद्दा मराठीचा नव्हे, हा मुलांच्या विकासाचा मुद्दा आहे. याबद्दल जगभर अभ्यास झाला आहे, त्यामुळे त्यात वाद नसावा. तसंही आपण जगाचंच अनुकरण करत आलोत. एका शाळेने हे केलं की इतरही शाळांना उपरती होऊ शकेल.
तेंव्हा विचार करा, या गुढीपाडव्याला मातृभाषा शिक्षणाची गुढी उभारा. इंग्रजी माध्यमाच्या शाळांना हेवा वाटेल अशी मराठी शाळा अस्तित्वात आणण्यासाठी पुढाकार घ्या. अर्थात निर्णय तुमचाच आहे, माझा आपला एक प्रयत्न.
पुन्हा एकदा, नूतन वर्षाभिनंदन
आपला नम्र,
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मिपापुरतं पाचशे वाचने व शून्य
मी तुझा धागा दोनदा वाचला. पण
बाकी पटलं पण सेमी इंग्रजी
सेमी इंगजीही व्यवहार्य नाही
अर्थात आठवी पर्यंत इंग्रजी
*जड गेले होते.
तेच. पहिलंच वाक्य लिहिलंय.
हेतू नक्कीच चांगला आहे
सुरुवात केलेली आहे, बघूच.
हेतू नक्कीच चांगला आहे
आपली अर्थव्यवस्था शेतकी आणि
असो.
सहमत.
पण विचार करता येणे, समजणे,
माझा मुलगा इथल्या पब्लिक
आता तुम्हालाही माहिती आहे
आता मेगाबायटी झालाच बरं का.
अण्णा...
पिराताई,
वॉव संदीप,
साहेब,
हो, चालेल की! धन्यवाद!
माझ्यासाठी तरी नक्कीच नाही
उत्तम इनिशियेटिव. पत्राचा आशय
कोल्हापूर विभागातील मराठी
खरं सांगु का , मराठीत बोलले
चांगला अनुभव आहे. इथे भाषेचा
+१. हा प्रश्न भाषेचा नसून
वेल्ला, तुझा लेख वाचला.
एक वेगळा मुद्दा मांडू इच्छितो
गुगल मुळे ज्ञानसाठा उपलब्ध होतो ?
गुगलमुळे विचारशक्ती कमी होते
माझा सॉफ्ट शब्द वाचायचा
त्या मुलाला "जगातल्या
ज्याने आधीच ज्ञान मिळवले आहे
अरे बापरे.
खरेतर हे अवांतर आहे पण