मराठी भाषा दिन २०१७: येवां, कोंकण आपलांच आसां! (कोंकण रेल्वे)

नूतन सावंत's picture
नूतन सावंत in लेखमाला
26 Feb 2017 - 6:04 am

1
कोकण रेल्वेतली मराठी
-----------------------------------------------------
'काही नवे करताना' बऱ्याच वेळा कोकण रेल्वेने प्रवास करावा लागला. अगदी सुरुवातीला पॅसेंजरनेच येणे-जाणे व्हायचे. अगोदर दादर-रत्नागिरी पॅसेंजरने आणि नंतर दिवा-सावंतवाडी पॅसेंजरने. प्रत्येक स्टेशनमध्ये चढणारे आणि उतरणारे लोक असत, त्याच्या बोलीभाषेत फरक होत जाई. त्यातच कामानिमित्त आलेले महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील लोकही असत. त्यांच्या भाषेत ते मराठी मिसळून बोलत किंवा त्याच्या भाषेतील शब्दसाधर्म्यामुळे पण अर्थातील फरकामुळेही गमती होत. बारा मैलांवर भाषा बदले, त्यामुळे बोलीभाषेचे बरेच नमुने प्रत्येक वेळी पाहायला, ऐकायला मिळाले. त्यातले काही मराठी भाषादिनाच्या निमित्ताने इथे देत आहे.

सुरुवात व्हायची ती दिव्यालाच. त्या वेळी दिवा अतिशय छोटेसे गाव होते. एकमजली घरे सगळ्यात उंच, जी थोडीशीच होती. तिथे दारू गाळण्याच्या भट्ट्या असत. दादर स्तेशनवरून ३-३०ला सुटणारी पॅसेंजर कधीच लवकर येत नसे. तिला सुटायला पाच वाजतच. दिव्याला पहिला थांबा. पनवेलपर्यंत दिवा-दातिवली, निळजे, तळोजा, नावाडे रोड, कळंबोली, पनवेल ही स्टेशने लागतात. पनवेलपर्यंत राहणारे रिकामटेकडे आगरी कोळी दारुडे रत्नागिरी-दादर पॅसेंजरने दिव्याला उतरून, टाकी फुल्ल करून, परतीच्या गाडीची वाट पाहत असत आणि बायकांच्या डब्याला लागून असलेल्या रिझर्वेशनच्या डब्यात चढत असत. कारण उतरून जायला जवळचा मार्ग, प्लॅटफॉर्मच्या टोकाला उतरून लाईन क्रॉस केली की यांची घरे असत. गाडीत चढले की यांची झुंडशाही सुरु होई. ”आरं,उठ. मना बसाया दे.” खिडकीच्या सीटरच्या माणसाला आज्ञा होई. कुठे दारुड्याशी पंगा घ्या, म्हणून काही जण उठत. काहींनी ”माझे रिझर्वेशन आहे" असे सांगितले की समोरून मशीनगन सुरु होई, ”आरं,आमच्या जमनी घेऊन ही रेल्वे बांद्लीय. आमाला पास हाय, तू काय रिजेशनाची वार्ता करतो?’’
एखादा कुणी म्हणे, ”पण तुमी दुसऱ्या डब्यात जा.” आता समोरच्याचा आवाज आश्चर्याने उंचावे, ”मा**, क बोल्तोस? मना? मना सांगतो? दुस्र्या डब्यात जायला. आड्डर सोरतो? मना? मी काय तुजे बापाचा नोकर हाय?”
“ओ बाप नका काढू?”सीटवरची व्यक्ती.
“का नको करू? का...... नssक्कोss...का ssरू? माजे बापाच्या जमनीवरून गारी चाललीय आणि मना डब्याभायेर कारतो का? बगून झेतो तुला.”
अशा बाचाबाचीत दारूड्याचे स्टेशन आले तर त्याचे सवंगडी त्याला उतरायला हाक देत, ”चाल रं बाला, आपला ठेसन आला. आता उद्याच्याला बग त्याला” असे थोडक्यात आटपे. नाहीतर पनवेलपर्यंत हा दंगा चालू असे. मी बहुतेक शनिवारी जात असल्याने कोकणात सहलीला जाणारी तरुण मंडळी या तोल न सांभाळता येणाऱ्याना ठोकतही एकेकदा. पनवेललनंतर पुढे हा त्रास नसे, असलाच एखाददुसरा एकटा असल्याने किंवा ब्रह्मानंदी टाळी लागल्याने तो गप्प बसून राही, कारण एव्हाना गर्दी झालेली असे. त्यामुळे त्याने गडबड केली तर मार खाण्याची शक्यताच जास्त असे. मग प्रवाशांच्या आपसात गप्पा चालत की, "खरं कोकण रेल्वे असा पास देते का? आमच्या अमुक तमुकांची जागा गेलीय रेल्वेत, त्यांना सांगायला पाहिजे" वगैरे,वगैरे. पण हे रहस्य एका दिवशी उलगडले.

त्याचे असे झाले - एकदा माझ्या वडिलांना बरे नसल्याने हवापालट म्हणून गावी जायचे होते. ते माझ्याबरोबर होते. नुकतेच आजारातून उठले असल्याने त्यांना झोपून जाण्यासाठी तीन सीट आणि माझी चौथी असे आरक्षण केले होते. सुट्ट्यांचे दिवस नसल्याने गाडीला फार गर्दी नव्हती, पण डब्यातल्या सीट भल्या होत्या. गाडी सुरू होताच दरवाजाजवळच्या सीटवर ते झोपले. दिवा येताच हे लोक नेहमीप्रमाणे आत घुसून दमदाटी करू लागले. २०-२२ वर्षांचा एक जण पप्पांना उठवायला गेल्यावर, ते आजारी आहेत असे मी त्याला सांगितले. तर तो मलाच उठायला सांगू लागला. मी आरक्षण केले असल्याचे सांगितले, तर “ता मना काय्येक सांगू नको”म्हणत त्याने नेहमीचे पुराण लावले, ”आमच्या बापाचे जमनी घेऊन......” आतापर्यंत झालेल्या कलकलाटाने पप्पांना जाग आली. ते म्हणाले, ”ए, इकडे बोल. मी तिचा बाप इथे हजर आहे.” त्याला काय वाटले कुणास ठाऊक, तो एकदम गयावया करत म्हणाला, ”बाबा, तुमाना बरा न्हाय, तुमी चीप बसा. तुमाना तरास व्हईल.”
“मग तू कशाला माझ्या पोरीला बापाच्या गोष्टी ऐकवतो?””
“माझी चुकी झाली, मना मापी करा.”
एव्हाना एक झोप झाल्याने पप्पाही ताजेतवाने झालेले. ते उठून बसले आणि त्याला बाजूला बसायची खूण केली. तोही अल्लाद बसला.
पप्पानी त्यला विचारले, ”बघू कुठे आहे तुझा पास?”
“पास? कस्ला पास?” तो गडबडला.
“अरे, तुम्हाला रेल्वेने पास दिलाय न, तुमच्या जमिनी घेतल्या म्हणून?’’ पप्पा.
“नाय वो बाबा. असा काय नाय.”तो.
“मग तिकीट तरी काढलंय का?” पप्पा. त्याने नुसतीच नकारार्थी मन हलवली.
“मग नुसतीच दादागिरी का रे?” पप्पा.
थोडा चुळबुळत तो म्हणाला .“हिते टीशी नसत्यात. मग आमी जाताव तशेच.” आता समजलं की कोकण रेल्वेची हद्द रोह्यापासून सुरू होत असल्याने टीसी पनवेलला उतरतात किंवा चढतात. आणि याचाच गैरफायदा घेऊन हे लोक फक्त दारू पिण्यासाठी हा प्रवास करतात.
”अरे, पण नुसती दारू पिण्यासाठी इतका उपद्व्याप करता? तुमच्या गावात नाही का मिळत दारू?” पप्पा.
“मिलते. पण पिव्वर नाय ना मिलत.” तो प्रामाणिकपणे बोलला.
”म्हणजे काय?” पप्पा.
तो थोडा कुचंबत म्हणाला, “तिते भट्ट्या असतात ना? पयल्या धारंची मिलते.”
“आणि गावात?” पप्पा.
“एका फुग्यात चार पुगे पानी मिसलतात, पांचट ती. त्यापक्षी पाणीच पेवावा.”
पप्पा निरुत्तर आणि मला हसू आवरेना. इतक्यात त्याचे उतराययचे ठिकाण आले आणि तो पप्पांच्या पायाला हात लावून नमस्कार करताना म्हणाला, “बाबा, आराम करा आणि लवकर बरे व्हा हां.”
मग पुढच्या वेळीपासून मीसुद्धा "पास दाखवा" असे सांगायला सुरुवात केली.
दिवा-सावंतवाडी पॅसेंजर सुरू झाल्यवर या दारूविषयी वेगळाच अनुभव आला. दिवा इथे उत्पादित ही दारू फुगे भरून बायकांच्या डब्यात बाकाखाली ठेवलेली असे आणि पनवेलपर्यंत प्रत्येक स्टेशन येण्याअगोदर हे फुगे खाली ढकलून दिले जात असत. टीसी नाहीत आणि पोलीस त्याहून नाहीत. अगदी राजरोस दारूची अवैध वाहतूक चलू असे आणि अजूनही चालू असेलच. असो.

पनवेलला बहुतेक रेवेचे कर्मचारी कुटुंबासहित असत. ते बिगर मराठी असल्याने दोन वेळा गमतीदार अनुभव आले. एकदा एक मुलगी “कमला,कमला” असे ओरडत हट्ट करू लागली. मग समजले, ते बंगाली असून तिला 'संत्री' हवी होती.
तर एकदा एक बाई.“मेले,मेले” असे म्हणू लागली.
सगळे “क्या हुआ? क्या हुआ?” विचारू लागले.
तिच्या शेजारी बसलेला नवरा संथपणे, “कुच नही” म्हणत उठला आणि त्याने वर ठेवलेली एक बॅग खाली काढली. ती गप्प झाली. सगळे बुचकळ्यात. मग समजले की ते तमिळ असून त्यांच्या भषेत मेले म्हणजे वर.

या दोन्ही गाड्याना पॅन्ट्री कार नसल्याने या गाडी चहा, कॉफी, फळे, फरसाण, काकड्या, वडे, सामोसे, भाजी इ. बरेच काही विकणारे लोक असत.

“काssकरीss, थssन्गाssर काकरी”असे ओरडत काकडीवाले चढत.
मग कोणी मुलांना विचारी, “काकरी खावाची तुला?” मुलांनी हो म्हटले की, “ये काकरीवल्या, ये हिकडे” अशी ऑर्डर सुटे.
काकडीचा भाव विचारला जाई. “कवऱ्याला दिली रे काकरी?”
“पाच रुपयाला एक.” काकडीवाला.
तोपर्यंत एखादे मूल ओरडे, “मना आख्खी पायजे.” मग कुटुंबातली माणसे मोजली जात. सात-आठ माणसात पाच काकड्या घ्यायचे ठरे. “पाच पायजेत, कश्या भावन् देशील?”
“त्यात काय? पंचईस व्हतात, दोन रुपे कमी द्या.” काकडीवाला.
“क बोलतंस? एवरी म्हाग काकरी इकून घरावर सोन्याच्ये पत्रे लावणार क काय? ईसानी दे.”
इतक्यात म्हध्येच कोणीतरी तहानेला माणूस पाच रुपये भावाने काकड्या घेई.
मग हा घेणारा वैतागून म्हणे, “रेल्वे चालू झाली तर पैशेवाले लोक वाढले हां कोकनात.”
इतक्यात दुसरे मूल सूर धरी, “मssना काssकरी दे ssना बाssबा.”मग काकड्यांची खरेदी पूर्ण होई.

पुढे रोहा-खेडदरम्यान चढणाऱ्या लोकांची भाषा वेगळीच असे. एक धाकटा दीर आपल्या नवीन लग्न झालेल्या मोठ्या वहिनीला घेऊन तिला माहेरी सोडायला जात होता. तो कॉलेजकुमार असावा. वाटेत चहावाला आला, तेव्हा त्याने वहिनीला “वहिनी, चहा घ्यायचाय का तुला?” विचारले.

“व्हय तर, च्याय खल्ली त्यास मोप येल झाला. घेवया आता.” वहिनी. या चहावाल्यांकडे दूध, साखर आणि पाण्याचे मिश्रण असते. त्यात ते ऑर्डरप्रमाणे कॉफीपूड किंवा चहाच्या डिपबॅग घालून देतात. त्याप्रमाणे त्याने तसा चहा दिला.
पहिल्यांदाच असा चहा घेणारी वहिनी आश्चर्याने उद्गारली, “ह्यँ काय? जल्ला ही कसली चाय?” तोपर्यंत दिराच्या हातातही चहा आला होता. त्याने तिला "थांब" अशी खूण करत तिला सांगितले, “हा दोरा धरून ती बॅग बाहेर काढ.”चहाची तल्लफ आलेल्या वहिनीने पुढचे ऐकण्याआधी, दोरा धरून डिपबॅग बाहेर काढली. एव्हाना डिपबॅग चहाने फुगून तिच्या नव्या कोऱ्या साडीवर चहा सांडू लागला. पण तिचे आणि चहा पिण्यात गुंतलेल्या दिराचे त्याकडे लक्ष नव्हते. वहिनीचे लक्ष कपाकडे आणि ती डोळे विस्फारून ओरडली, “अगे बाय! ह्यँ काय झाला? जल्ला ह्या पिश्विन सग्ली च्याय खाल्लान् ना वो भावोजी.” बिचारे भावोजी जे लाजले, ते काही उतरेपर्यंत एक शब्दही बोलले नाहीत. पहिल्यांदाच माहेरी जाताना खराब झालेली साडी नेसून जावी लागणार, म्हणून ती माहेरवाशीणही खिन्न झाली. मग तिला साडी पाण्याने धुवायचा सल्ला देऊन आम्ही खिडकीतून बाहेर पाहू लागलो नि आमचे हसू भावोजींना दिसू दिले नाही.

“भेsssल... खट्टीsss मीssठ्ठी भेल" करत भेळवाला चढे.
रोह्यापासून कोकणी मुसलमानांची चढउतार चालू होई. कोकणातले मुसलमान मराठीच बोलतात. खूप गोड वाटते ती ऐकायला. भक्ती बर्वेंनीही त्यांच्या सासूबाई कशा बोलतात हे एका मुलाखतीत सांगितले होते.
एखाद मूल म्हणे, “अम्मी, भूक.” अम्मीही लगबगीने भेळवाल्याला बोलावी.
अब्बा म्हणत, “आता मधीचशीं भेल?”
अम्मी लगेच खुलासा करी, “सकालशीं उटल्याशीं उपाशीच हाय तो, कायपन खल्लन् नाय. भुकेला आला लेकरू.” मग अब्बा कुरकुरले, तरी भेल खरेदी होई.

एकदा ऐन मे महिन्यात कोकणकन्या एक्स्प्रेसने जावे लागले. डबा आरक्षित असला, तरी कोकण रेल्वे सावत्र असल्यासारखी दादर, ठाणे येथे टीसी फिरकत नाहीत. तेव्हा अनारक्षित प्रवासीही भरपूर. लहान मुले, म्हातारे-कोतारे आणि गरोदर स्त्रियाही यात सामील.
एका टिपिकल मालवणी म्हाताऱ्या गृहस्थाने मिस्टरांना सरळ सांगितले, “वांयच *ले आवळून बसा, माका एक *लो टेकुक देवा.” मग आम्ही बसलो *ले आवळून आणि एका गरोदर बाईला बसायला दिले. तिने थोड्या वेळाने, “क्म्बार दुकता गे बाय.” असे म्हणत आळोखेपिळोखे द्यायला सुरुवात केली. मिस्टर उठून उभे राहिले आणि ही गुडुप झोपली. मिस्टर उभ्याउभ्या डुलक्या देत आणि ऐन झोपेच्या भरात त्यांचे गुडघे बाकाच्या कडेवर आपटत. शेवटी थोड्या वेळाने मी तिला उठवली आणि मिस्टरांना खिडकीकडे बसवून मी त्याच्या जागी बसले. तर आहेर आला. ”घोव कसो देवमनीस न बायल बघा जखीण.” मी डोक्यावरून चादर ओढली आणि हसू आवरून धरले.

1

प्रतिक्रिया

पैसा's picture

26 Feb 2017 - 10:35 am | पैसा

भारी किस्से!

सतिश गावडे's picture

26 Feb 2017 - 11:03 am | सतिश गावडे

मस्त किस्से.

दिव्यावरुन सकाळी ६.२० ला सुटणारी "दिवा सावंतवाडी" प्यासेंजर एकेकाळी माझ्या आयुष्याचा एक भाग होती. शनिवारी सकाळी या गाडीने मी मुंबईवरुन गावी येत असे.

आम्ही रायगडवाले रत्नागिरी आणि सिंधूदुर्गवाल्यांना खुप शिव्या घालतो कोकण रेल्वेचा विषय निघाला की. सिंधूदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांनी "रत्नागिरी - दादर" आणि "सावंतवाडी - दिवा" इतक्या भरुन येतात की रायगड जिल्ह्यातील स्थानकांवर या गाड्यांमध्ये चढायलाही जागा नसते. मग आम्ही चरफडत म्हणतो, "!@#$% कोकण रेल्वेत जमिन काय तुमचीच गेली आहे का? आमची नाही गेली का?" :)

अभिजीत अवलिया's picture

26 Feb 2017 - 11:46 am | अभिजीत अवलिया

आमका कित्या गाळी घालतास हो गावड्यानु? :)
एक तर ह्या रूट वर गाडये कमी, त्यात केरळाक जाणारे गाडये थांबत पण नायत.
गोव्यातना सुटणारे गोव्यातनाच इतके भरान येतत की भुतर शिरुक पण मिळणा नाय. मग करुचा काय आम्ही ?
xx मारत रत्नागिरी - दादर, सावंतवाडी - दिवा पकडूक लागता.

दिवा सावंतवाडी प्यासेंजर अत्यंत टुकार आहे. कोकण रेल्वे सिंगल लाईन असल्याने प्रत्येक वेळी ही गाडी crossing साठी साईडला उभी केली जाते आणि एक्सप्रेस गाड्या पुढे पाठवल्या जातात. आता 'प्रभू' कृपेने मार्ग दुपदरी झाल्यावर ही डोकेदुखी संपेल आणी गाड्या पण वाढवता येतील.

यशोधरा's picture

26 Feb 2017 - 11:10 am | यशोधरा

सुरन्गीताई, मस्त लिहिलंस!

संदीप डांगे's picture

26 Feb 2017 - 11:16 am | संदीप डांगे

भा री!!!

प्राची अश्विनी's picture

26 Feb 2017 - 12:09 pm | प्राची अश्विनी

भारी लिहिलय!

rain6100's picture

26 Feb 2017 - 12:16 pm | rain6100

आता त कोकनात जावाच लागते न बावा ...क बोल्तोस?

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Feb 2017 - 12:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

खुसखुशीत ! कोकणातल्या फणसासारखे... बाहेर काटे नी आत रसाळ गरे !!

पनवेल स्टेशन बनले त्या सुमारास त्या स्टेशनजवळच्या पोदी नावाच्या वस्तीत पाच वर्षे राहिलो आहे. त्यामुळे जुन्या आठवणी ताज्या होऊन अधिकच मजा आली !

जबरदस्त! रेल्वेत मुलूख बदलत जाताना बदलत्या भाषा टिपणं ही आयड्याच झकास आहे!

सस्नेह's picture

26 Feb 2017 - 1:21 pm | सस्नेह

भारी किस्से !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Feb 2017 - 1:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन आवडलं. आपापल्या मराठी भाषेचा लहजा आवडला. किस्से भारी.

-दिलीप बिरुटे

पद्मावति's picture

26 Feb 2017 - 3:20 pm | पद्मावति

मस्तच लेख सुरन्गी.

अनुप ढेरे's picture

26 Feb 2017 - 4:14 pm | अनुप ढेरे

आवडला लेख! मस्त!

एस's picture

26 Feb 2017 - 4:31 pm | एस

खुसखुशीत लेख.

मित्रहो's picture

26 Feb 2017 - 10:31 pm | मित्रहो

बदलनारी माणसे आणि त्यांची बदलनारी भाषा मस्त आली.

विशाखा राऊत's picture

27 Feb 2017 - 4:22 am | विशाखा राऊत

वाह ताई मस्त... दादर रत्नागिरी पॅसेंजरच्या खुप आठवणी आहेत प्रवासाच्या.. :)

प्रीत-मोहर's picture

27 Feb 2017 - 2:45 pm | प्रीत-मोहर

मज्जा आली किस्से वाचून!!

मार्मिक गोडसे's picture

27 Feb 2017 - 3:51 pm | मार्मिक गोडसे

भारी किस्से. कोकणी मुसलमानांची मराठी ऐकायल गोड वाटते. भिवंडीतील मुसलमान मराठीतून कमी बोलतात. परंतू , पडघ्यापुढील वडवली ,खडवली येथील मुसलमान मराठीतूनच बोलतात फक्त त्यांचे हेल थोडे वेगळे असतात ,तरीही ते कानाला गोड वाटतात.

खूप रम्य आठवणी जाग्या केल्यात ताई तुम्ही . पण जल्ला जेव्हा जावे तेव्हा पेसेंजर गाडीची गर्दी बघून त्या गाडीत जावच वाटत नाही. पण आई-बाबांची फेवेरेट गाडी आहे ती.कोकणातील मुसलमानांची भाषा ऐकण्याची मज्जाच आहे. जेव्हा केव्हा रत्नागिरीत जातो तेव्हा आवर्जून अशी भाषा ऐकतो.

मितान's picture

27 Feb 2017 - 8:05 pm | मितान

नेहमीप्रमाणे तुझ्या गोष्टिवेल्हाळ शैलीत वाचताना मजा आली ! :)

शलभ's picture

27 Feb 2017 - 10:22 pm | शलभ

मस्त

खटपट्या's picture

28 Feb 2017 - 12:22 pm | खटपट्या

मस्त कीस्से. मेले मेले आपलं मेलो मेलो

स्वीट टॉकर's picture

28 Feb 2017 - 3:50 pm | स्वीट टॉकर

मजेदार लिहिलं आहेत सुरन्गीताई.

कविता१९७८'s picture

28 Feb 2017 - 4:43 pm | कविता१९७८

<<<<”घोव कसो देवमनीस न बायल बघा जखीण.>>>>>>>>>

हा हा हा हा हा.

भारी किस्से

आषाढ_दर्द_गाणे's picture

28 Feb 2017 - 10:43 pm | आषाढ_दर्द_गाणे

छान लिहिलेय, वाचायला मजा आली!

पिलीयन रायडर's picture

28 Feb 2017 - 11:21 pm | पिलीयन रायडर

“क बोलतंस? एवरी म्हाग काकरी इकून घरावर सोन्याच्ये पत्रे लावणार क काय? ईसानी दे.”

इतकी हसले न मी बेक्कार!!! नुसती भाषाच नाही, हा जो अ‍ॅटीट्युड आहे ना, तो फार महत्वाचाय!!!

फार मस्त लेख!!

पिशी अबोली's picture

2 Mar 2017 - 10:23 am | पिशी अबोली

दिवा पॅसेंजर! किती आठवणी!

रच्याकने, कोंकणी मुस्लिम त्यांच्या बोलीला आवर्जून 'कोकणी' म्हणतात. त्यांच्या आसपासच्या लोकांच्या आणि त्यांच्या बोलण्यात शब्द वगैरे सोडून काही फार मोठा फरक नसला तरी!

सुबोध खरे's picture

3 Mar 2017 - 10:58 am | सुबोध खरे

कोकण रेल्वेत आमची पण जमीन गेली चिपळूण स्थानकाजवळ वालोपे गावात. त्या बदल्यात घरच्या एका माणसाला कोकण रेल्वेत नोकरी मिळू शकते. आमच्या जमिनीवरील कुळ असणाऱ्या एकाने आमच्याकडे यासाठी तगादा लावला होता कि साहेब तुमच्या कुणाला जातच नसेल तर तसं लिहून द्या म्हणजे मला तरी नोकरी लागेल. आमचे वडील आणि काकांनी त्याला नोकरी देण्यासाठी "ना हरकत' प्रमाणपत्र दिल्यावर त्याला हि नोकरी मिळाली.
या व्यतिरिक्त कोणतीही सोय/ सवलत मिळत नाही. कुणी सांगत असेल तर तो थापा मारत आहे.
बाकी कोकण रेल्वेतून प्रवास भरपूर केला आहे. अनारक्षित पासून वातानुकूलित प्रथम वर्गापर्यंत आणि दादर सावंतवाडी पॅसेंजर पासून जनशताब्दी पर्यंत.
दिवा पनवेल मार्गावर आगरी लोकांच्या अशा दादागिरीरला कंटाळून रेल्वे ने बरेच स्थानक नसतानाही थांबे(UNSCHEDULED STOPS) बनवले होते कारण अन्यथा ते मधला निर्वात ब्रेकचा पाईप कुऱ्हाडीने तोडत असत

मंदार कात्रे's picture

3 Mar 2017 - 11:50 am | मंदार कात्रे

खूप छान

सिरुसेरि's picture

3 Mar 2017 - 12:01 pm | सिरुसेरि

खूप छान आठवणी आणी प्रतिसाद

पूर्वाविवेक's picture

3 Mar 2017 - 12:17 pm | पूर्वाविवेक

Agadi batik barik goshti chan tipalya aahet.
Mihi ha anubhav ghetala aahe.

:-D :-D
मस्त लिहलंय! आवड्ल.

खुसखुशीत लिखाण... आवडले..!! :)

मनिमौ's picture

14 Mar 2017 - 3:39 pm | मनिमौ

असच खुसखुशीत लेखन भरपूर होऊदे तुझ्या हातून आणी मला वाचायला मिळूदे