मराठी भाषा दिन २०१७: राजीनामा (वर्‍हाडी)

कैलासवासी सोन्याबापु's picture
कैलासवासी सोन्याबापु in लेखमाला
21 Feb 2017 - 6:25 am

1
लेखक/अनुवादक - सोन्याबापु

कथा - राजीनामा

बोलीभाषा - वऱ्हाडी

मूळ कथा - इस्तीफा

मूळ लेखक - मुन्शी प्रेमचंद.

मूळ भाषा - हिंदी

राजीनामा


---------------------------------------------------------------------------------

कोन्या बी हापिसातला बाबु हा मुक्या ढोरावानी रायते. तुम्ही कोन्या मजुराले डोये झन्नाऊन दाखवसान तर थो बी थुमचा जांगडबुत्ता कराच्या हिशोबानं हुबा राहिन. एखांद्या कुली ले राग दाखवा, थो बी सरका डोक्श्यावरून वजन फेकून चालू लागन. एखाद भिकाऱ्याले हाडहूड करा, थो बी थुमच्याइकडं एकदम बेक्कार नजर मारून सोताची सडक पकडन. इतलच काय बावा, यखादा चिल्लर लंबे कान अन चार टांगावाला एखादा गधा बी, त्याले शिल्लक परेशान केलं कवा फालतूचा काव आनला त एखाद झम्मन डबल तंगड्याइची लात तुमाले बातच मारून जाईन; पर बिचाऱ्या हापिसातल्या बाबुले थूमी डोये मोठे करून पहा का राग भरा का हाडहूड करा नाईतर ढोरकोंबे हाना, थेच्या माथ्यावर आठी बी पडन नाही. तेचा त्येच्या विकारावर जीतला ताबा राह्यते तीतला त एखाद्या साधू ले बी नसन राजेहो. हा म्हंजे सायाचा निस्ता संतुष्टीचा पुतडा, एकदम फुरसतीची मूर्ती, कुत्र्यावानी आज्ञाधारक असा एका संतावानी साऱ्या गुणाचा जांगडबुत्ता तेच्यातनी हाजीर राह्यते. पडक्या गढीचं बी दिवाईच्या रोजी नसीब खुलते, कोनी येऊन कमसकम एखाद पनती तटीसा लावून जाते, पानी पड्याच्या वख्ती कमसकम तेच्या डोक्श्यावरी हराळी फैलते, निसर्गामंदी जे काही उन्नीस बीस होते तेच्यातनी त्या गढीच उल्लीसक का असेना हिस्सा राह्यते. पर हापिसातल्या बाबूची तकदीर काई अळोन्ग घेत ना कइच. त्येच्या जिनगानीतनी कइच लाईट चमकत नाई. त्येच्या पिवड्या जवारीच्या फनकटावानी थुत्तरावर कइच हसी मजाकची रोनक दिसत नाई. त्याले सावन बी सुखा असते अन भादवा बी हिरवा नसते. लाला फतेचंद असाच एक मुका प्रानी होता.

असं म्हनते का एखाद ब्वाच्या नावाचा लई असर त्येच्यावर पडते. पर फतेचंदच्या बाबत काही ते गोठ जमली ना. त्याले फतेचंदच्या जागी ‘हारचंद’ नावं लैच साजरे ज्यमे. हापिसातनी हार, जिनगानीतनी हार, दोस्तयारातनी बी हार, फतेचंद त्येच्या जिनगानी मदी नीरा पैदल होता. त्याले एक बी घोडमा का असना पोरगा नोता, पर पोरी तीन होत्या. गड्याले भाऊ एक बी नोता पर भौजायी २ होत्या. निसता कलेजाच लै मोठा होता गड्याचा. ना गड्याले एक बी दोस्त ज्यानं त्याले कमसकम धोका तरी दिला आसन. गडी दिश्याले बी एकदम फाटक्या बाश्याच्या पिलमपोयावानी होता, ३२ च्या उमर मदीच गड्याचे सब्बन केस साबूदाना झालते. त्येच्या डोयातनी घासलेटाच्या चिळी इतला बी परकास नोता, गड्याचं पोट बारोमास बिघडेल राह्यत जाय, चेहरा बी पिवड्या पिवड्या सुक्या कडब्यावानी पिचकेल, गाल हमेशा आंद्रे, अन कमर जनु कपाशी पिंज्याची धनुकली झालती. न दिलात हिंमत न कलेज्यात ताकद. गडी सकाऊन ९ वाजता हापिसात धशे ते सरकातीर झाकटी नंतरच घरी वापस येत जाय. मंग झाकटी नंतर घराभाईर पड्याले त्येचा झेंडू दाटून येत अशे. गावदुनियेत का चालू हाय, ह्याले काई घेने नशे. त्येच्यासाठी गाव शेगाव पंढरपूर सारे काई फक्त त्याचं हापिसच राह्यत जाय. हमेशा नोकरीच्या दुचक्यात राहू राहू गडी जिंदगीचा एक एक रोज मांगे टाकू राहल्ता. गड्याले ना धर्मासंग घेने होते, न कई एखाद भजन ऐक्याले मंदिरात जाची आस.


________________________________________

अश्याच एका वख्ती, बेकार थंडी पडेल होती. अस्मानात जराशीक बदली लागेल होती. फतेचंद झाकटीच्या टायमाले हापिसातून वापस आला तवा घरी कंदील-बत्ती चालू झालती, चिळ्या पेटू रायल्त्या. फतेचंद आला का कोनासंग काईच न बोलता सरका बाजीवर आळवा होत जाय. चांगला अर्धाक घंटा ब्वा बिना काही हालडूल करता पडेल राहे, तवा कुटी त्येच्या थुत्तरातून येखाद आवाज निंगे. आज बी हमेशावानी त्यानं चुपचाप बाज धरेल होती, तवा एकच मिनिटाच्या आंद्रे त्याले कोनी घराभाईरून आवाज देल्ला. त्येच्या सर्व्यात बारक्या पोरीनं भाईर जाऊन पाहले का ब्वा हापिसचा चपरासी येल हाय. त्याची बायको शारदा नवऱ्याले हातपाय धुयाले पानी काढत होती. ते मोरीतूनच चिल्लावली, म्हने, “बारकेsssss इचारजो व त्याले काय काम हाय म्हना? सद्ध्याच त वापस आले हापिस मंदून अन बातच काहाले वापस बलावले??"
बारकी भाईरूनच चिल्लावली, “माय व, हा चपरासी म्हन्ते बलाव तुयाल्या बाबाले, काई लंब काम हाय म्हनते."
तवा जाऊन फतेचंदची शांती सरली अन त्याने बाजीवरूनच मुंडी उचलून इचारलं, “काय झालं व??”
शारदा - काईच त नाई बापा, चपरासी हाय.
फतेचंद पुरा भेला अन म्हने - हापिसचा चपरासी? सायबानं बलावल का मले?
शारदा – हाव, हा म्हनते सायबान बलावलं. काऊन हो? असा का सायब राहते? जवा पाव तवा बलावते सकाऊन गेल्ते तुमी न सद्ध्याच त वापस आले, अन वापस बलावले तुमाले.
फतेचंद म्हने - अव त कायले बलावते सायब ते त ऐकू दे मले. म्या त मावले सब्बन काम खतम करून आलतो, आलो रे बावा थांब उलसाक.
शारदा - जरासाक काई नास्ता करून घ्याव लागत होता तुमीन, एकडाव चपराश्यासंग बोलत बसले का तुमाले वापस आंद्रे येने बी नाई सुधरीन.
इतले बोलून ते मटकेच उठली अन रसोईतून एका प्लेटीत थोडासाक च्युडा घेऊन वापस आली. फतेचंद गडी जाले तयार झालता थो नास्ता पाहून वापस बाजीवर बसला अन थोडासक हलक्या आवाजात बोलला, “का व, पोरीनले देला का नाई तू नास्ता?”
डोये मोठे करत शारदा चिल्लावली - हाव देल्ला ना बाप्पा , तुमी खायजा.
फतेचंद घास घेईलगच चपरासी चिल्लावला - बडे बाबू लै वेड होऊ राहला हो.
शारदा - सांगा न हो त्या डूचक्याले ना येत म्हना ह्या वख्ती.

फतेचंद न फटाफट दोन मुटी च्युडा गीटला. एक गल्लास पानी पेला अन भाईर पयाला. शारदेन त्येच्यासाठी लावेल पान तिच्या हातीच राहलं.

चपरासी भाईर गेल्या गेल्या म्हने – काय राजेहो बडे बाबू लै वखत घेतला गड्या तुमीन, आता मटकेच चालसान नाई त सायब वापस कनकन करते बाप्पा पायजा.

फतेचंद न दोन ढांगा चपराश्यासंग पयाची कोशिस केली अन जीव भरल्यावर म्हने, “पाय गड्या म्या त मानसावानीच चालन मंग सायब कनकन करे का दात इचकुन दाखवे. मह्याच्यान काई बिंग पयन होत ना. सायब कुटी बंगल्यावरीच हात काय?"
चपरासी म्हने, “नै त मंग काय हापिसात असतीन, इजारदार व्हय न देवा थो.”

चपरासी पऊ शके, पर फतेचंदले त हडूहडू चाल्याचीच आदत होती. थोड्या वक्तातच त्याचा जीव वर आला. पर सायच्या एका फाटक्या चपराश्याले काहाले इनंती करा हडू चाल्याची. जीव खात फतेचंद पाय उचले अन टोंगळे जरासेक कनारले का झक्कत हडू होत जाय. अर्धी सडक संपली तवा फतेचंदच्या तंगड्यान म्हावरे जाले मना केली. पुऱ्या अंगातनी पसीना झाला डोयाम्हावरे झाकट फैलू लागलं.

फतेचंद उल्लीसक हडू झाला का चपरासी बोंबले, “फटफट पाय उचला लागते हो बडे बाबू.”
फतेचंद कसाबसा म्हने – तू जाय बावा, म्या येतो मांगे मांगे तुयाल्या.

फतेचंद सडकेच्या बाजुन खाली बसला अन दोन्ही हातानं डोक्स पकडून दम खाऊ लागला. चपराश्यान त्येची हालत पाहली अन सोताच निंगाला. फतेचंद ले मनातनी भेव लागले, थो इचार करू लागला का हा सायाचा चपरासी साहेबाले काही च्या काही सांगून देईन अन मंग साहेब पुरा माजोन करन. जमिनीवर हात टेकून थो हुबा राहला अन वापस पैदल चालू लागला पर त्याचं अंग पुर कनारु रायलते. त्याची हालत इतली पतली झालती का त्या वख्ती एखाद बारक डूबरं पोट्ट बी त्याले एका फुकरीत लंबा करून गेले असते. फतेचंद कसाबसा मरमर करत सायबाच्या बंगल्यातनी पोचला. सायब वसरीतच भुक्या वाघावानी चकरा मारत होते. हरघडी बंगल्याच्या फाटकाइकडे त्याहीची नजर जात होती. दर खेप त्याईले कोनी दिसले नाही का ते वापस नसनस करु रायल्ते.

चपरासी ले पाहून सायब चिल्लावले – कीडर ठा ईटना डेर?
चपरासी श्वास सांभाडत म्हणे – सायब, ते येतीन तवा न मालक, म्या त पयतच आलो टाकोटाक.
सायब पाय आपटत म्हने – बडे बाबू क्या बोला टूमको?
चपरासी - येऊ राहले न साहेब ते, घंटा तर त्याईले घरून निघ्याले लागला.
तद्लोग फतेचंद आलाच. त्यानं डोक्स झुकवून साहेबाला रामराम केला.
सायब कडक होऊन म्हने – कहा ठा अब टक?
फतेचंद न सायबाच्या थूत्तराइकळे पाहले, साहेब जरा शिल्लक गरम वाटे. थो प्रकार पाहून त फतेचंदचे नल्डेच सुक्के झाले. तो म्हने,
“साहेब सद्ध्याच हापिसातून घरी गेल्तो. जसा का चपरासी आला म्या बातच निन्गलो अन पयतच आलो.”
साहेब – टूम झूट बोलटा हय , आम गंटेभर से खडा हय.
फतेचंद - साहेब आपुन कईच खोटं बोलतच नाई ना. मले फक्त याले जीतला टाइम लागला तितलाच, घरून त म्या मटकेच निन्गलो होतो.

साहेबानं हाती असलेली छडी हवेतनी घुमवली अन वसकन चील्लावला – चूप रओ सुवर, आम गंटाभरसे खडा हे, आपणा काण पकडो.

फतेचंद मानहानी गीटून बोल्ला – साहेब मागले धा वर्ष म्या चाकरी करू राहलो हो तुमची, म्या कईच.....
साहेब – चूप रओ सुवर, आम कहता हय आपणा कान पकडो.
फतेचंद – साहेब, पर मही गलती का व्हय जी?
साहेब – चपरासी, इस सुवर का कान पकडो.
चपरासी हडूच म्हने- सायब, हे बी त मावले अधिकारी हाय, ह्याहीचे कान कसे पकडावं मालक?
सायब - आम बोला कान पकडो, नै तो आम टूमको हंटर से मारता.
चपरासी- ओ सायब, आपुन अटीसा नौकरी कराले येल हाव. मार खाले नाई. मही बी उलशिक का आसना इज्जत हाय. सायब लागन तर मही नौकरी घ्या बाप्पा, तुमचे सारे हुकुम मानने मावले काम व्हय. पर आपुन कोन्या दुसऱ्याच्या इज्जतीवर हात नाई घालू शकत सायब. नौकरी चार रोजाची हाय मालक, चार रोजा पायी ज्यमान्यासंग कायले हेकोडे चालाव.

आता काई सायबाले राग आवरे नाई. थो हंटर घेऊन पयाला. चपराश्यान पायल का ब्वा अटी आता थामने म्हंजे घरावर गोटे आनने होय, तसा थो बी बिंग पयाला तथून. अजूनलग फतेचंद तसाच्या तसा हुबा होता. चपराशी पयाला तसा सायब त्याच्या इकळे पलटला अन त्याचे दोनी कान धरून खैचले. मंग म्हने, “टूम साला सुवर, गुस्टाकी करटा हय, जा कर ऑफिस से फाइल ले कर आ”
“क...कोनती फा...फाईल पाय...जे सायब?”
वापस एकडाव कान खैचले गेले. “टू बहरा हय, सूनटा नय ? हम फाईल मांगता हय.”
फतेचंद कसाबसा जीव गोडा करून म्हने “ तुमाले कोनती फाईल पायजे सायब?”
सायब – वो ही फायल जो हम मांगता हय. वही फाईल लाव. अभी लाव.

आता काई वापस विचार्याची हिंमत पल्डली नाई फतेचंदची, आंदीच सायब गरम वानाचा तेच्यात इजारदारी अंगात कुटू कुटू भरेल, अन आत्ता नेमके दारूचे सात नाई त आठ टाक लावेल होता. हंटर सुरु झाले का फतेचंद छीलुन निंगने लिहेलच होते. फतेचंद मुकाट्यान हापिसकडे जाऊ लागला.
सायब – दौड के जाव
फतेचंद - मालक, पयन काई होत नाही मह्याच्यान.
सायब - ओ टूम भोत सुस्त हय. आम टूमको दौड्ना सिकाता. असा म्हनत सायबान मागून फतेचंदले जोरात लोटून देल्ले अन म्हने, “टूम अब बी नाय दौडेगा?”

इतले बोलून सायब वापस हंटरपाशी गेला. फतेचंद बाबू होता पर मानुसच होता. जर का तेच्यातनी ताकद असती त त्यानं पक्क या होबास्क्या सायबाच रगतच पिऊन टाकलं असत. जर का त्याच्या हाती एखाद औजार असत तर त्यानं वारच केला असता. पर काय करा, आत्ता त मार खानेच त्येच्या तकदीर मंदी होत. थो तसाच बंबाट पयाला अन फाटक पार करून सडकेवरी आल्यावरच थामला.


________________________________________

फतेचंद काई हापिसात गेलाच नाई. जाऊन करन बी काय थो? सायबान फाईलच नाव बी त सांगतलं नोत. दारू पेल्यावर इसरला वाटते सायचा. हडू हडू फतेचंद घराच्या इकळे वापस जाऊ लागला. पर मघाच्या बेइज्जतीन त्येच्या पायातनी बेड्या ठोकल्यावानी झालते. नाई म्हंजे बा ठीक हाय का त्येच्या अंगी जोर उलसाक कम होता, त्येच्या हाती काई औजार नोते, पर तो सायबाले कडक जवाब देऊ शकला नसता काय ? पायातनी जोडे बी होते, त्यानच काम चालवा लागत होतं? मंग त्याहीन इतली बेइज्जती काहाले सहली?

पर आता काय इलाज होता? सायबान राग राग जरका बंदुकीची गोयी मारली असती तरी त्याचं कोन काय उखाडन बावा, चार दोनशे रुपड्याचा दंड. जास्तीत जास्त चारेक मैने जेलात घातला असता, पर फतेचंदच काय? त्याहीच्या बायको ले अन लेकाराईले कोनी थारा देल्ला असता? त्याच्यापाशी जर का दाब्बून पैसा असता ज्यानं का त्याचे घरवाले दोन वख्ती भाकर खाऊ शकले असते तर, त्यानं आज इतली बेइज्जती झेलली नसती. एक तर फतेचंद सोता खपला असता नैतर त्या सैतानाले काई लंबा झाबू तर देलाच असता. सायचं जिंदगीत असं सुखच काय होतं जेच्यापाई असे भेव लागत राहो? प्रश्न फक्त घर बरबाद होयाचा.

फतेचंदले आज त्येच्या कमजोरीवर जीतली शरम आली तितली पैले कईच आली नसन. जर का त्यानं आदीपासूनच कमसकम आखाडा केला असता, नाई काई त लाठी फिरव्यालेच शिकला असता तर आज हे बारी त्येच्यावर आली नसती. त्या सैतानाची फतेचंदचे कान धराची हिंमतच पल्डली नसती. उलशिक पैलवानी असती तर आज सायबाले पटकू पटकू कुनारला असता नंतर भले जेलात जाणं पडन पर सायचं जे होयाच ते पाहून घेतलं असत. अजून जास्तीच काय झालं असता?

फतेचंद जसा जसा म्हावरे चाले, तसा तसा त्याले सोताच्याच डरपोकपानावर लै राग येत जाय. मनातल्या मनात थो विचार करे, सायची द्याच लागत होती सायबाले एखाद उलट्या हाताची, जास्तीत जास्त कायच होन होतं. सायबाचे बैरे खानसामे माह्या अंगावरी भिडले असते, मले रगत निगेलोग कांडले असते. पर सायचं सायबाले एक समजले असते. गरीबाले बेइज्जत करने सोपे नोय. माहे लेकरं वाऱ्यावर आले असते पर फायदा झाला असता. समजा म्या आजच बसल्याच जागीच गचाकलो असतो तरी त माहे लेकरं अनाथ होनेच होते मंग त्या सायबाले कुटण्यात काय फरक पल्डला असता?

हा विचार आला अन फतेचंद वापस सायबाच्या घरा इकळे पलटला अन चार पाच कदम चालत गेला. पर वापस ढिला पल्डला , विचार करू लागला. जाऊद्या गड्या. अशीनतशी जे बेइज्जती व्हाची ते त होऊनच गेली. काय सांगा, सायब बेवडा लेकाचा घरी आसन बी का क्लबात पयाला आसन. त्याचं वख्ती भुंड्या माथ्याची बिना सिंदुराची शारदा अन अनाथ लेकरं बी दिसले फतेचंदले एकदम. तसा फतेचंद वापस थंडा पल्डला. अन मुकाट्यान घरी पयाला.


________________________________________

घरी पोचला नाई का शारदेन पकडला – का हो ? काहाले बलावत होता सायब ? लई वखत लागला ?
फतेचंद न रोजच्या आदतीन बाज पकल्डली अन म्हने – नशा करेल होता गडी. बाकी काई नाई. मले श्या देल्या, भलकाईच्या भलकाई बोलला, बाकी काई बोलेच नाई, बस म्हने इतला टाईम कहाले लावला याले ? मंग त्या चपराश्याले म्हने का बा, तू फतेचंदचे कान पकड.
शारदेन गरम होत इचारलं – तुमीन एखाद जोडा काहाडून हाना लागत होता थ्या डुकरीनीच्या पोटच्याले , हानला काऊन नाई ?
फतेचंद – नाई व असं नोको बोलू, चपरासी सज्जन मानुस हाय तो सायबाले म्हने का हे पा ब्वा साहेब, आपल्याच्यान काई हे काम होत ना. म्या सज्जन लोकाईची इज्जत काढ्याले नौकरी करेल नाही म्हने थो. अन मंग सायबाले सलाम ठोकून वापस चालला गेला थो.
शारदा – हे खरी बहादुरी व्हय . तुमीन सायबाले काई चार गोठी सुनोल्या का नाई?
फतेचंद – हाव मंग, तसा सोडतो का सायच्याले मी. मी बी बोललो त डुरक्या गोऱ्ह्यावानी मह्यावर धावत आला सायचा छडी घेऊन. मंग मायी भानसली त म्या बी जोडा कहाडला अन हाती घेतला. त्यानं मले चार रट्टे देल्ले मंग म्या बी त्याले तीतलेच जोडे हानले.
शारदा हरकून म्हने - खरंच ? त्याचं तोंड तर नीरा जयक्या चिलमीवानी झालं आसन नाई हो?
फतेचंद – चिलम? असं वाटे जसं का कोनी गड्याचं थुत्तर फड्यानं झाल्ड्ल असाव.
शारदा - बाई बाई, लैच साजरं काम केलं हो तुमीन तर. अजून मारा लागत होतं नसानकोंबड्या संतरसोल्याले. म्या असती तर असा तसा सोल्डलाच नसता.
फतेचंद - शारदे, त्याले कुनारून त आलो म्या वापस, पर आता काई भरोसा नाई. पहा, आता काय होते ते पहा लागन. नौकरी त काई वाचत नाई, जेलात बी जाव लागते का काय देव जाने.
शारदा - तुमाले कायले सजा? काई पंचपंचायत हाय का नाई दुनियेत हो? त्यानं काहाले श्या देल्ल्या पहले? छडीन काहाले मारलं तुम्हाले?
फतेचंद – आता बावा तो मोठा सायब हाय, आता त्याच्या म्हावरे माह्या सारख्या बाबूच कोन ऐकन? कोर्ट बी त्याच्या बाजूनंच जायते पायजो.
शारदा - जाणं अशीन तर जाव बाप्पा कोर्ट जिकडे जाचं हाय. पर आता पायसान कोन्या सायबाची हिंमत नाई पडीन कोन्या बाबुले श्या द्याची. तुमीन त त्याच्या तोंडातून श्या निंगल्या बरोबर जोडा हाना लागत होता एकदम त्याच्या कानाखालीच.
फतेचंद - मंग तर ह्या वख्ती असा जिंदा बी बसलो नसतो तुयाल्या म्हावरे, शिद्द्दी गोडीच मारत होता मंग त सायब.
शारदा - पाहून घेतलं असता हो.
फतेचंद मंग हसून म्हने – का वं, असं काई झालं असत तर तुवा अन पोरी कुकडे गेल्या असत्या?
शारदा - जती देवाची मर्जी होत होती तटी. मानसाकरता सर्व्यात मोठा ठेवा हाय इज्जत. इज्जत गमावून लेकरं नै पोसले जात तुमाले सांगतो म्या. तुमीन त्या सैतानाच्या लेकराले जित्त मारून आले असते त खरं सांगते मले लै आनंद वाटला असता. मार खाऊन वापस आले असते तर मले तुमच्या तोंडाइकळे पहाची बी इच्छा झाली नसती. माह्या तोंडानं म्या काईच बोललो नसतो पर माह्या दिलातून तुम्ही उतरले असते. आता जे होने हाय ते मी आनंदानं झेलतो, चिंता करू नोका...... अर्र, सद्ध्याच तर आले, वापस कुकडे चाल्ले थांबा न, अरे ऐका त म्या काय म्हनतो.

आता फतेचंद सरकातीर घरा भाईर पल्डला होता. शारदा उंबरा धरून बोंबलत बसली पर काईच न ऐकता फतेचंद निंगला होता. थो वापस सायबाच्या बंगल्याइकळे जाऊ रायलता. घाबरून टरकून नाई तर एकदम मुंडी सरकी ठेऊन ठोकच्या भावात. त्याचा छातीले माती अन गांडीत खुटे ठोक्याचा इरादा त्येच्या थोबड्यावरी च्यमकत होता. त्येच्या पायातनी कमजोरी, डोयातनी मानखंड्ना वगरे काईच नोते आता. त्याइचा जणू का एका रातीत रब्बीच्या हरबऱ्यात घाटा भराव तसा कडक कायापालट झालता. कमजोर शरीर, फनकटावानी पिवडा चेहरा, मरेलवानाचा हापिसातला बडे बाबू गायब झालता अन त्येच्या जागी आलता तो मर्दाना चेहरा, अन एका जवान ब्वाचा विश्वास. फतेचंद पैले आपल्या एका वयखीच्या दोस्ता दारी गेले तथून एक मजबूत तेल पाजेल लाठी त्याहीन उधार घेतली अन पुरे अकडून सायबाच्या बंगल्यावर धमकले.

रातीचे नौ वाजेल असतीन. सायब जेव्याच्या टेबलावर बशेल होता. पर फतेचंद न काई वाटगीट पाहली नाई. सायबाले ज्योन देऊन त्याईचा नौकर आंद्रे वापस गेला तसा फतेचंद लाठी हाती धरत खोलीत धसले. खोलीत जणू का दरबार होता बावा, मोठाले झुमर काय अन काय काय. गालीचा त असा जसा का फतेचंदच्या लग्नात बी कोनी पाहला नसन. सायबान त्याईच्याकडे रागानं पाहला अन चिल्लावला.

टूम क्यो अंडर आया? बाहेर जाव, क्यो अंडर चला आया?

फतेचंद आरामात लाठी संभाडत बोलले - सायबsssss तुमीन फाईल सांगतली होती ना? थेच घिऊन आलो बाप्पा. ज्योन करा तुमी, मंग दाखवतो तुमाले, फाईल!. तद्लोग म्या अटीसाच बशेल हाव बरं सायब. एकदम आराम आरामात ज्योसान हो साहेब. काय सांगा हे थुमच शेवटलं ज्योन असाव. एकदम पोट भरेलोग खासान.

आता साहेब पुरा हपचक झाला. फतेचंदच्या इकळे तो राग अन भेव दोन्ही नजरेन पायत उगमुगा बसला खरं पायता भेला. फतेचंदचा इरादा तर पक्का दिसू रायलता त्याच्या तोंडावर. सायब पुरा बयाजवार समजला का ब्वा हा गडी आज माऱ्याच्या नाई त मराच्या इराद्याने येल हाय. ताकतीच्या बाबत फतेचंद सायबाच्या आर्दा बी नोता. पर त्याचा निश्चय पुरा बिलाट होता. सायबाच्या इटकरीचा जवाब फतेचंद बंड्यानच नाई त लोह्यानं द्याच ठरवेल होतं. आता का सायबान काई उन्नीस बीस बोलला का फतेचंदचा दंडा बोलतेच बोलते हे तर पक्के झालते.

सायब बसल्या जागी इचार करू लागला. येकावर येक तर तो जिंक्याले काई आशा होती. पर बसल्याजागी डोक्श्यात लाठी खाने काई समजदारी नोती. कुत्र्याले तुम्ही हाडतुड करा का त्याले भेव दाखवा. हे सारी मस्करी तद्लोगच चालते जद्लोग कुत्तल्ड्लं वापस गुर्रावने सुरु करत ना. येकदा का कुत्रं तुमच्यापाठी भुकत लागले का मंग थुमची हिंमत तेल घ्याले जाते. नेमके हेच हाल त्या वख्ती सायबाचे होते. जद्लोग त्याले मालूम होते का फतेचंद श्या, लाता हंटर सारे काई उगामुगा राहून खाते तद्लोग सायब शेर होता. पर आता फतेचंद पुरा बदलेल होता. हाती दंडा घेऊन मांजरीवानी नजर लावून बशेल. जरा का इकडंतिकडं झालं का चाललाच बाबू दंडा. सायब जास्तीत जास्त काय करू शकत होता? फतेचंद ले नोकरीतून काढू शकत होता. पर आता मार खायचे भेव डोक्श्यावर लटकू रायलते. थो फतेचंदले जेलात टाकू शकत होता, तितली त्येची मातब्बरी अन पोच होतीच पर त्या परिस्थितीत बी सायब सोताची बदनामी अन फुकट हन्यास काई टाडू शकत नोता. अश्या टायमाले त्येच्या अंदरचा एक हुशार मानुस जागा झाला. अन थो हुशार मानुस म्हने.

“ओहो, आम अबी समजा, आप आमसे नाराज हय, आमने आपको कूच कहा क्या? आप क्यो आम से नाराज हय?”
फतेचंद पुरा अकडून म्हने - सद्ध्याच त अर्धा घंटा पैले तू मावले कान धरले होते, मले शिल्लकच्या दलिंदर गोष्टी बोलला होता. इतल्या लौकर सय गेली काय तुयाली?

सायब – मय टूमारा कान पकडा? हा हा हा हा हा क्या मजाक करटा हय , आम क्या पागल हय?
फतेचंद - मंग काय म्या खोटं बोलू राहलो काय ? तुयाला चपरासी गवाही हाय, तुयाले नोकर चाकर बी पायत होते.

सायब – कब का बाट हय?
फतेचंद- सद्ध्याचीच, जास्तीत जास्त अर्धा घंटा झाला आसन, तु न मले बलावलं अन काम न कथा मावले कान खैचले, मले धक्के देल्ले.
सायब - अर्र बडा बाबू साहब, ओ टाइम आम नसे मे ठा. बैरा आमको थोडा जियादा ड्रिंक दे दिया ठा. क्या हुआ माय ग्वाड आमको कूच खबर नाय.

फतेचंद - नशेत जरका तू मले गोडी मारली असती, त म्या खपलो नसतो काय? जर का तुले नशा चढेल होता अन नशेत सारे काई माफ आसन, त मंग ऐक आता मी बी नशेत हाव. महा फैसला ऐक, एकतर तू तुयाले कान पकळ अन म्हन का वापस कई कोन्या सज्जन मानसासंग असा वागशीन नाई, नाई, त मंग आता मीच तुयाले कान पकडतो. समजला का तू? हालडूल करू नोको तू, तू का शिल्लक हालला जागचा का माया दांडका चाललाच समज तुवा. मंग तुयाली खोपडी मोडे का काई व्हय आपल्याले फरक पडत नाई. जसं म्या सांगू राहलो तसं मुकाट्याने कर तू आता. चाल पकड कान सोताचे!!!

सायब नकली हसत म्हने – वेल, बडा बाबू टूम हर चीज दिल पे ले लेता हय. टूमको बुरा लागा आम टूमसे माफी मांगता हय.

फतेचंद – ज्यमत ना कान पकळ सोताचे.
सायाबाले काई सोताची बेइज्जती इतली सहज पचने नोते. सायब बिंग उठला, त्याची इच्छा का बा आपून फतेचंदच्या हातून दांडके छीनून घ्या. पर फतेचंद पुरा तेजीत हुबा होता. सायब टेबलावरून उठत नाई का त्यानं एक डाव पद्धतशीर दांडू घुमवला. सायब तर भुंड्या डोक्श्यानच बशेल होता. दांडू डायरेक खोपडीवरी बसला. आय हाय हाय चमचम तारे चमकू पल्डले डोया म्हावरे. एक मिनिटभर तर सायब डोक्स धरूनच बसला.
मंग फतेचंदले म्हने, "आम टूमको नोकरी से डीसमीस कर देगा”
फतेचंद – चाल निंग बे अथून, मले आता फरक पडत ना. पर आज काई मी तुले बिना कान धऱ्याचा सोळत नाई. चाल बाबू पकळ कान अन वादा कर का वापस कई बी कोन्या भल्या मनसाले बेइज्जत नाई करशीन. नाई त बाबू हे पाय आलाच माया दुसरा रट्टा.

इतल बोलून फतेचंद न वापस दांडू उचलला. सायब अजूनलग पैल्याच रट्यातून उबरला नोता. दुसरा रट्टा पल्डला असता त काय सांगा खोपडी खुल्याची शक्यता होती. कानावरी हात ठ्युन सायब म्हने, "अब टो आप खुश हे न?”
“वापस कई कोनाले श्या तर नाई देशीन रे ?”
“कबी नाय”
“हे पाय, वापस जर का तुवा असं काई केलं का एक गोठ ध्यानी ठेवजो, म्या काई अथून जास्ती दूर नाई हाव, समजला?”
“आब किसी को गाली नाय देगा”
“चांगली गोठ हय, आता म्या चाललो, म्या तुयाली नोकरी सोल्डली. उद्या मावला राजीनामा म्या हे लिहून पाठोणार हाव, की ब्वा, तुन मले श्या देल्ल्या, त्येच्यान मले नोकरी कराची नाई, समजला काय?”
“टूम इस्तीफा क्यु डेटा हय? आम तुमको डीसमीस नाय करता हय.”

फतेचंद – निंग रे फोकनीच्या, तुया सारख्या हरामखोर मानसाची नोकरी कोन करल. आता तुया सारख्या चिल्लर मानसाची नोकरी मलेच कराची नाई.

इतले बोलून फतेचंद सायबाच्या खोलीतून भाईर आले अन एकदम संतुष्ट मनाने घरी वापस जाऊ लागले. आज त्याहिले खराखुरा जिंक्याचा आनंद भेटत होता. त्याहिले असा आनंद आधी कईच झाला नोता. हे त्याईच्या जिनगानीतली पाहिली जीत होती.
1

प्रतिक्रिया

पैसा's picture

21 Feb 2017 - 8:12 am | पैसा

_/\_ जबरदस्त प्रयोग आहे हा! वेळ मिळेल तसा अजून येऊ देत!

खेडूत's picture

21 Feb 2017 - 10:52 am | खेडूत

जबरदस्त.
अजून भरपूर लिहा. आमाला समजून र्‍हायलीय भाषा!

प्रीत-मोहर's picture

21 Feb 2017 - 10:29 am | प्रीत-मोहर

अजुन पुर्ण वाचुन नाही झालंय. फक्त पहिलाच भाग वाचलाय.
पण आवडतय. पुर्ण वाचून सविस्तर प्रतिक्रिया देते

प्रीत-मोहर's picture

21 Feb 2017 - 2:40 pm | प्रीत-मोहर

क्लास अनुवाद करुन रायले तुमी तर!!

बबन ताम्बे's picture

21 Feb 2017 - 11:28 am | बबन ताम्बे

मुळ कथा आणि व-हाडी अनुवाद, दोन्ही जबरदस्त.

मार्मिक गोडसे's picture

21 Feb 2017 - 11:57 am | मार्मिक गोडसे

अनुवाद छानच. शेवटी वर्‍हाडी ठेचाच कामाला आला.

दोन भाग वाचले, लई साजरं लिवून रायले तुमी राजेहो....

बाप्या लेका, सगळं समजतंय की. भारीच लेका. आवल्डी स्टुरी.

कैलासवासी सोन्याबापु's picture

22 Feb 2017 - 1:30 pm | कैलासवासी सोन्याबापु

तुला समजलं त्यात नवल काय मेल्या ;)

पद्मावति's picture

21 Feb 2017 - 1:59 pm | पद्मावति

मस्तच.

वऱ्हाडी भाषेतून प्रेमचंदांची कथा फारच छान वाटतेय. भाषा समजायला अवघड वाटली नाही. वर्हाडीतून अजून लिखाण वाचायला आवडेल.
मला 'जांगडबुत्ता' आणि 'हपचक' हे शब्द एकदम आवडले :)

संजय पाटिल's picture

21 Feb 2017 - 3:23 pm | संजय पाटिल

झकास.....

पिशी अबोली's picture

21 Feb 2017 - 3:47 pm | पिशी अबोली

क्लास!

फार आनंद झाला हे वाचून. जबरदस्त बापू!!!
अतिशय आवडलंय! लैच म्हणजे लैच भारी..

अजया's picture

22 Feb 2017 - 8:43 am | अजया

अगदी हेच म्हणायचे आहे.
फार आनंद झाला हे वाचून. जबरदस्त बापू!
अतिशय आवडलंय! लैच म्हणजे लैच भारी..

अनुवाद छान झाला आहे.

सचु कुळकर्णी's picture

22 Feb 2017 - 2:12 am | सचु कुळकर्णी

अनुवाद खतरा झाला आहे. आनंद आ गया. प्रेमचंद ह्यांच लिखाण आन त्याचे अस्सल वर्‍हाडीत भाषांतर करु धजणारा बाप्या, ति मोर्णे - पुर्णे काठचि माह्यावालि अन मायेवालि माय वर्‍हाडी .....बास ईसिलिये ये मिपा नहि छुटता.

सोदाहरण उपमा : हे मंजी अस झाल का बॉ साधु साधु* लाईट मंदी होयेल हाय, समोर भाकरी आन वर्‍हाडी रश्यातल तर्री वाल मटन हाय मंग एकेक घास करुन खाल्ल्यापेक्षा सिद्दा भाकरिचा केला काला त्यावर मटनाचि डिश केलि उपडी.....मंग काय ....वरपा आता.

* साधु साधु होणे अन ते बि लाईट लाईट :- ज्यादा नाई ना बे ओल्ड माँक चे ४ पटियाला.... :)

कैलासवासी सोन्याबापु's picture

22 Feb 2017 - 1:31 pm | कैलासवासी सोन्याबापु

बस भाऊ असंच समजसान का तुमच्यासाठी अन बाकी मित्रायसाठी ल्हेली गोठ :)

जयंत कुलकर्णी's picture

22 Feb 2017 - 2:42 am | जयंत कुलकर्णी

मस्तच !

आनंदयात्री's picture

22 Feb 2017 - 2:46 am | आनंदयात्री

अनुवाद छान झाला आहे. आवडला.
जांगडबुत्ता हा शब्द जांगडगुत्ता असा आहे असे वाटायचे. दोघांचा अर्थ सारखाच का?

कैलासवासी सोन्याबापु's picture

22 Feb 2017 - 1:33 pm | कैलासवासी सोन्याबापु

आनंदयात्री जी,

जांगडगुत्ता मी आमच्या गावात अन भागात तरी ऐकलेला नाही तरी भाषा कायम बदलत असते, वऱ्हाडातच अजून कुठे वापरत असतील तर माहीती नाही आम्ही कायम जांगडबुत्ता असेच वापरतो बोलण्यात

इडली डोसा's picture

22 Feb 2017 - 1:41 pm | इडली डोसा

चांगली गोष्ट निवडली आहे अनुवाद करायला आणि वर्‍हाडीमध्ये वाचताना मस्त वाटले. खूप छान कल्पना.

सस्नेह's picture

22 Feb 2017 - 3:47 pm | सस्नेह

अनुवाद करताना त्या त्या भाषेची वैशिष्ट्ये न सोडता केला तर गोड लागतो. हा एक तसाच !

अत्रुप्त आत्मा's picture

22 Feb 2017 - 3:58 pm | अत्रुप्त आत्मा

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआआआआ! फर्मास!

वरुण मोहिते's picture

22 Feb 2017 - 5:15 pm | वरुण मोहिते

वऱ्हाडी भाषेचा लहेजा बघता मुन्शी प्रेमचंद यांच्या अनेक लघुकथांचा अनुवाद उत्तम होऊ शकेल . मनावर घ्या .

लय म्हंजे लयच जबराट लिहेल हायं बापू !!

अॅस्ट्रोनाट विनय's picture

22 Feb 2017 - 6:32 pm | अॅस्ट्रोनाट विनय

भारी लिव्हलय सोन्याबापु. अनुवाद वर्हाडिमध्ये मस्त खुललाय

नूतन सावंत's picture

22 Feb 2017 - 8:04 pm | नूतन सावंत

सोन्याबापू,अनुवाद झकास झाला आहे. अजून वाचायला आवडेल.

ऊध्दव गावंडे's picture

22 Feb 2017 - 10:39 pm | ऊध्दव गावंडे

झक्काssssस सोन्याबापु
लय पल्ला मारला राज्या तुमी.
मुन्शी प्रेमचंद सारख्या महान मानसाले तुमी आपल्या वर्हाडी त बोल्याले भाग पाळलं. क्या बात है.
मले वाटते Direct Hindi to वर्हाडी अनुवादाचा हा पहिलाच प्रयत्न असावा.जो अभिनंदन !

स्रुजा's picture

23 Feb 2017 - 1:14 am | स्रुजा

झकास !!

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Feb 2017 - 1:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

भन्नाट !

भाषांतर/भावानुवाद वट्ट जमलाय... भाषेची सवय नसली तरी न अडखळता गोष्टीच्या ओघात पुढे पुढे जात राहीलो !

जिओ बाप्पू ! और लिखो, लिखते रहो !!

कैलासवासी सोन्याबापु's picture

23 Feb 2017 - 1:40 pm | कैलासवासी सोन्याबापु

आभार काका __/\__

कथा आणि अनुवाद दोन्ही मस्त.

भावानुवाद एकदम अस्सल झालाय!! बापूसाहेब अजून लिहा!

मित्रहो's picture

26 Feb 2017 - 8:00 pm | मित्रहो

प्रेमचंदच्या गोष्टीचे वऱ्हाडीत अनुवाद ही कल्पनाच मस्त आहे.
अनुवाद मस्त जमला.