मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अडगळीतल्या काही कविता.

रामदास · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
काही खास असं नाही या कवितांबद्दल. प्रवासात येता जाता लिहून ठेवल्या होत्या. कधीतरी शंभरेक झाल्यावर प्रसिध्द करू म्हणून.विचार रोज बदलतात.आजच बोर्डावर टाकल्या. १ टाळून कधी वे़ळ कधी नुस्तंच . आयुष्यानी सोडवून घेतलं स्वत:ला. आईनी अंगावरून सोडवावं बाळाला तसंच. आता वेळी अवेळी अनावर हुक्की आली तर .. कविता लिहीतो. * * * * २ दूरच्या दुखणाईत नातेवाईकाला भेटावं औपचारीक . तसा मी भेटतो स्वतःला . आजकाल. भेटीची वेळ संपता संपता. * * * * * ३ दहा वेळा कापूनही परत परत उगवणार्‍या लोचट चामखीळीसारखं . नविन वर्षं परत दारात. * * * *

वाचने 5037 वाचनखूण प्रतिक्रिया 17

प्राजु Tue, 02/17/2009 - 19:18
दहा वेळा कापूनही परत परत उगवणार्‍या लोचट चामखीळीसारखं . नविन वर्षं परत दारात. जबरदस्त.... कल्पना! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अवलिया Tue, 02/17/2009 - 19:21
मस्त रामदास शेट --अवलिया भेटण्यासाठी तुला तैयार होतो पण तुझे फर्मान आले, साद नाही

दूरच्या दुखणाईत नातेवाईकाला भेटावं औपचारीक . तसा मी भेटतो स्वतःला . आजकाल. भेटीची वेळ संपता संपता. हे छानच...पटलं...अगदी माझ्या मनातलीच गोष्ट तुम्हाला कशी कळली ? :-( -स्मिता

सहज Tue, 02/17/2009 - 19:25
लवकर बाकीच्या ९७ येउ दे! पाणी प्यायला देता व भांड्यात एकच घोट? :-)

विसोबा खेचर Tue, 02/17/2009 - 22:39
दूरच्या दुखणाईत नातेवाईकाला भेटावं औपचारीक . तसा मी भेटतो स्वतःला . आजकाल. भेटीची वेळ संपता संपता. क्लासिक..! तात्या.

मुक्तसुनीत Wed, 02/18/2009 - 05:48
आणि श्वास अडकवणार्‍याही. साहिरच्या तल्खियाँची आठवण करून देणार्‍या ..". ...गुजर रही है कुछ इस तरहा से जिंदगी जैसे , इसे किसी सहारेकी आरझू भी नही .."च्या जातीच्या. कसलेही संदर्भ नसूनही - कदाचित नसल्यामुळेच - प्रत्येकाला आपापल्या आयुष्यातल्या कोड्यांबद्दल विचार करायला लावणार्‍या.

नंदन गुरुवार, 02/19/2009 - 19:26
कविता. अधिक काय लिहावे? रग्गेल दोडका ते आजकाल स्वतःलाच दूरच्या दुखणाईत नातेवाईकासारखे औपचारिक भेटणार्‍या तुमच्या अनुभवांची, लेख-कवितांची रेंज विलक्षण आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी