सचिननामा-४: दुखापत व बॅड पॅच

फारएन्ड's picture
फारएन्ड in क्रिडा जगत
31 Dec 2016 - 10:24 am

ही पाक विरूद्धची टेस्ट आणि वन डे सिरीज जिंकल्यावर तो सीझन संपला तेव्हा भारताने बरेच काही साध्य केलेले होते. त्या आधी २-३ वर्षे सगळा संघ व सचिनही जबरदस्त क्रिकेट खेळले होते. परदेशात मॅचेस जिंकणे हे तोपर्यंत अत्यंत दुर्मिळ होते (१९३२ ते २००० या काळात फक्त १३ विजय). या २-३ वर्षांत भारताने वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, आणि पाकिस्तान मधे विजय मिळवले. त्यातही पाक मधे सिरीज जिंकल्याने त्याचे महत्त्व जास्त होते, कारण त्याआधी आपण कधीही तेथे कसोटी सामनाही जिंकला नव्हता, आणि कधी जिंकू असेही वाटले नव्हते. जॉन राईट व सौरव गांगुली यांचे ट्युनिंग मस्त जुळले होते, संघही पूर्ण दशक पुरेल असा जमलेला होता व बरेचसे करीयरच्या सुरूवातीलाच होते. द्रविड व कुंबळे हे मेहनती आधीही होतेच, पण या काळात ते मॅचविनर झाले. सचिनची लोकप्रियता तितकीच राहिली, किंबहुना वाढली. पण आता तो "बिग-५" पैकी एक होता (सेहवाग, द्रविड, सचिन, गांगुली, आणि लक्ष्मण). पहिल्या विकेट्स लौकर उडाल्या तर शिल्लक राहिलेला बॅट्समन सचिन असतो, ही २००० च्या आधीची परिस्थिती बदलून तो "मान" द्रविड कडे आला. बोलिंग मधेही झहीर च्या जोडीला नेहरा, बालाजी व इरफान पठाण हे आले होते. कुंबळे अतिशय फॉर्मात होता.

मग दोन महिन्यांच्या ब्रेक नंतर आता हाच संघ खेळ आणखी उंचावेल असे वाटले होते. पण काहीतरी बिघडले. कदाचित या लेव्हलला येइपर्यंत उपयोगी पडलेले टॅक्टिक्स त्यापुढे चालले नाहीत. तेथून पुढे न्यायला वेगळ्या कप्तान व कोचची गरज होती. संघाला एक शैथिल्य/ complacency आलेली जाणवत होती. बॉडी लँग्वेज मधे 'फायर' दिसत नव्हती. जवळजवळ सर्वांचाच फॉर्म गेला होता. सचिनही अनफिट होता. या सीझन मधे २००५ च्या मार्च एप्रिल पर्यंत झालेल्या मॅचेस मधे अजिबात मजा नव्हती. यामुळे झालेले सर्वात मोठे नुकसान म्हणजे घरच्या सिरीज मधे ऑस्ट्रेलियाकडून झालेला पराभव. वास्तविक थोडे नशीब व थोडे प्रयत्न याने भारताने ही सिरीज २-२ अशी ड्रॉ केली असती. पण चेन्नईला चांगली संधी असताना शेवटच्या दिवशी पूर्ण पाऊस झाल्याने भारताचा चान्स हुकला.

नंतर द.आफ्रिका व पाक विरूद्धच्या सिरीज मधे बरीचशी टीम पाट्या टाकत खेळत आहे असे वाटत होते. हातात असलेल्या मॅचेस जिंकू न शकणे, भिकार खेळून हारणे वगैरे दिसू लागले. त्यात जॉन राईटचे कॉण्ट्रॅक्ट संपले व त्याबरोबर सुमारे पाच वर्षातील विजय व पराभव धरले तर एक अत्यंत यशस्वी कालावधी संपला.

८. मार्च २००५ ते एप्रिल २००७

यापुढच्या दोन वर्षातला (साधारण मार्च २००५ ते मार्च २००७) मधला सचिन चा खेळ हा कधी खूप चांगला तर कधी सलग अपयशी डाव असा असे. त्यात कधीकधी हा नक्की काय करतोय असा प्रश्न पडे. २००६ च्या शेवटी झालेला दक्षिण आफ्रिकेचा दौरा हे त्याचे उदाहरण. याकाळात काही वेळा सचिन अगदी संथ पणे, कसलाही उद्देश न दिसणारा खेळ करत असे. पण हाच काळ टेनिस एल्बो व इतर दुखापतींनी त्रस्त असण्याचा काळ. त्यामुळे फटके मारण्यावर बंधने आली होती. दुखापती मुळे ते पंचेस, पुल्स, हुक्स गुंडाळून ठेवलेले होते. ड्राइव्हज ही फारसे दिसत नव्हते. याउलट इकडून तिकडून 'चीकी' शॉट्स मारणारा सचिन दिसू लागला. हा सचिन बघताना फार राग येत असे. त्याचेळेस हर्षा भोगले ने ही त्याची अँग्री यंग मॅन चे रोल सोडून इतर प्रयत्न करणार्‍या अमिताभशी केली होती. "he could do it fine, but that wasn't him"

असेच चित्र पुढच्या दोन वर्षांत अनेकदा दिसले. एरव्ही सहज ज्यांची तो धुलाई करे त्या बोलर्स पुढे चीपली आउट होताना तो दिसू लागला. नेहमीची सहज हालचाल दिसण्याऐवजी क्रीज वर जखडून राहिलेला सचिन, अर्धवट फिरणारी त्याची बॅट, व लाइन हुकून बोल्ड होउन खाली वाकलेला, पराभूत सचिन हे २००७ च्या वर्ल्ड कप मधे लंकेविरूद्ध दिसलेले चित्र आधीही एक दोनदा दिसले होते. २००६ च्या द आफ्रिका सिरीज मधेही एकदा १४ रन्स काढायला त्याने ६५ बॉल्स खाल्ले. टेस्ट मधे वेग महत्त्वाचा नसतो हे खरे पण ज्यांनी तो खेळ पाहिला त्यांच्या लक्षात असेल की त्या बॅटिंग मधे नेहमीचा सचिन नव्हता. मॅच वाचवायची म्हणजे सगळे फटके म्यान करून बॉल तटवत खेळायचे असे काहीतरी विचित्र लॉजिक दिसत असे.

मार्च २००५ च्या घरच्या पाक सिरीज मधल्या चौथ्या डावातील बॅटिंग हे आणखी एक उदाहरण. १९९९ मधे पाठ दुखत असताना खेळलेल्या एक दोन मॅचेस सोडल्या तर सचिन ला आधी कधी 'शेल' मधे गेलेला पाहिला नव्हता. या मॅच मधे मोठा स्कोअर चेस करत असतना अनाकलनीय रीत्या तो अत्यंत हळू खेळू लागला. केवळ बॉल तटवणे हाच फक्त उद्देश असल्यासारखा. तसा त्याचा तो नॅचरल गेम कधीच नव्हता. या आधी टीमची अवस्था वाईट असताना सचिन ने आक्रमक खेळून चित्र पालटवले होते (चेन्नई १९९९ चे उदाहरण सर्वात फेमस आहेच). पण इथे तब्बल ९८ बॉल्स मधे त्याने फक्त १६ रन्स केले आणि शेवटी आउट झाला. अपेक्षेप्रमाणे भारत ही मॅच हरला. पण इथे अपयशापेक्षा सचिन च्या भोवती ५-६ फील्डर्स चे जाळे लावले आहे व स्पिनर (आफ्रिदी) त्याच्यावर दडपण आणतो आहे हे तोपर्यंत कधीही न दिसलेले चित्र सर्वात निराशाजनक होते.

मात्र या सगळ्याच्या अधूनमधून विशेषतः वन डे मधे त्याने काही जबरदस्त डाव खेळले. बहुधा त्याचे मोकळेपणाने खेळणे हे तेव्हाच्या एकूण त्रासावर अवलंबून असावे. २००६ च्या पाक मधल्या वन डे सिरीज मधे दोन अतिशय चांगल्या इनिंग तो खेळला - एकदा १०० व एकदा ९५. दुखापतीमुळे तो अनेकदा बाहेर असे या काळात. व त्यामुळे अनेक मॅचेस त्याच्या "पुनरागमनाच्या" म्हणून मीडियात चर्चा होत असे. २००५ च्या मध्यावर बरेच महिने बाहेर राहिल्यावर तो ऑक्टोबर च्या लंका सिरीज मधे परत आला. आणि पहिल्या दोन्ही मॅच मधे पुन्हा जुना सचिन दिसला. त्यातले पहिल्या मॅच मधल्या ९३ मधले त्याचे शॉट्स जुन्या सचिनचीच आठवण करून देत होते. या काळातील आणखी एक चांगली इनिंग म्हणजे क्वालालंपुर ला वेस्ट इंडिज विरूद्ध मारलेले १४१. हे ही बरेच दिवस बाहेर राहिल्यानंतर संघात परल्यावर मारलेले होते. तसेच डिसेंबर २००५ मधे त्याने लंके विरूद्ध ३५ चे शतक मारून गावसकरचे रेकॉर्ड मोडले. हे शतक त्याने जवळजवळ १८ महिन्यांनंतर मारले होते (तसा मॅचेस खूप कमी खेळला तो त्या काळात).

माझ्या दृष्टीने हे शतक कायम लक्षात राहणारे आहे. मी त्याच दिवशी सकाळी पुण्यात पोहोचलो होतो. दुसर्‍या दिवशी तेथील ऑफिस मधे जायचे असल्याने दिवसभर न झोपता एकदम रात्री झोपून वेळ अॅडजस्ट करून घ्यायचा होता. दुपारी जेवल्यावर झोप येउ लागली, पण त्याचे वेळेस सचिन ची बॅटिंग जोरात होउ लागली व शतकाची चिन्हे दिसू लागली. त्यामुळे झोप वगैरे आपोआपच उडाली. हे त्याचे शतक सुंदर होते, पण यानंतर पुन्हा टेस्ट मधे त्याने बराच काळ काही विशेष केले नाही.

वन डेज मधे सुद्धा मधले काही डाव सोडले तर तसा भाकड काळच होता, तो अगदी वर्ल्ड कप २००७ मधून बाहेर पडेपर्यंत तसाच होता.

२००६ च्या शेवटी शेवटी 'सचिन संपला' अशी चर्चा सुरू झाली. हेल्मेट वर बॉल लागणे, वारंवार 'बोल्ड' होणे, संथ खेळ, म्यान केलेले फटके व एकामागोमाग एक लो स्कोअर्स हे पाहून अपरिहार्यपणे सचिन ने आता निवृत्त व्हावे असे अनेक लोक म्हणू लागले. खुद्द मुंबईत एकदा तो आउट झाल्यावर प्रेक्षकांतील एका गटाने त्याला "Boo" केल्याची चर्चा झाली.

पण सर्वात चर्चा झाली ती दोन गोष्टींची - टाइम्स ऑफ इण्डिया ने त्याच्या अपयशाबद्दल दिलेले शीर्षक "Endulkar?", आणि इयान चॅपेल ने सचिन ने निवृत्त व्हावे असा दिलेला सल्ला. यातील त्याच्या अपयशाची वर्णने बरोबर होती. पण तो खेळाडू म्हणून संपला आहे, आणि जुना सचिन पुन्हा दिसणार नाही असे लोकांनी म्हणणे याचा खूप राग येत असे. मला मुळात 'कमबॅक' करण्याचा प्रयत्न करणार्‍यांना नेहमीच सपोर्ट करावेसे वाटते. सचिन पुन्हा यशस्वी होईल अशी आशा नेहमीच वाटायची.

पण बर्‍याच लोकांना तसे वाटत नव्हते. एक्स्पर्ट्स, जुने खेळाडू, मीडिया अनेक जण सचिन संपला हेच आळवत होते.

तेव्हा कोणालाही ही कल्पना नव्हती की सचिन या सर्वांना खोटे ठरवणार होता. पुन्हा फॉर्म मधे परतून त्याच्या कारकीर्दीतील व भारतीय क्रिकेटच्या इतिहासातला सुद्धा सर्वाधिक यशस्वी काळ अजून यायचा होता! तो पुढच्या भागात.

या काळातील कोच - मार्च २००५ पर्यंत जॉन राईट व नंतर ग्रेग चॅपेल
कॅप्टन्स - मार्च २००५ पर्यंत गांगुली आणि नंतर द्रविड
या काळात आलेले नवे खेळाडू - धोनी, रैना, उथपा, आर पी सिंग

प्रतिक्रिया

स्पार्टाकस's picture

31 Dec 2016 - 10:38 am | स्पार्टाकस

ग्रेग चॅपल कोच असतानाचा काळ हा सचिनच काय संपूर्ण भारतीय संघासाठीच एखाद्या दु:स्वप्नासारखाच होता. याच काळात किरण मोरेच्या सिलेक्शन कमिटीने गांगुलीला ड्रॉप केले होते. २००७ चा टी२० वर्ल्ड कप ही एकच सिल्वर लाइनिंग!

तुषार काळभोर's picture

31 Dec 2016 - 12:11 pm | तुषार काळभोर

सचिनला असं खेळताना पाहवत नसे. त्यापेक्षा त्याने एखादी शानदार इनिंग खेळून निवृत्त व्हावे, असं वाटू लागलं होतं!
कधी कधी असंही वाटायचं :
sachin

पण तो खेळाडू म्हणून संपला आहे, आणि जुना सचिन पुन्हा दिसणार नाही असे लोकांनी म्हणणे याचा खूप राग येत असे.

सिरीयसली सचिन स्वतः साठी खेळतो वगैरे बातम्याच फॅड होतं तेव्हा. असले डोक्यात जायचे हे प्रकार.

रातराणी's picture

31 Dec 2016 - 1:53 pm | रातराणी

बाय द वे मालिका आवडली! पुभाप्र!

श्रीगुरुजी's picture

31 Dec 2016 - 3:49 pm | श्रीगुरुजी

२००७ मध्ये सचिन ६ एकदिवसीय डावात व एका कसोटी डावात ९० ते ९९ या धावसंख्येवर बाद झाला होता.

पद्मावति's picture

1 Jan 2017 - 4:15 am | पद्मावति

खूप छान मालिका.

पी महेश००७'s picture

11 Mar 2022 - 7:56 pm | पी महेश००७

सचिनविषयीची मालिका आवडली.. सचिनविषयीची एक माहिती वाचली होती. अंपायर स्टीव बकनर यांचे दोन निर्णय चुकले होते.(यात काही चूक असेल तर करेक्ट करा). त्यावर बकनर यांनी कबुली दिल्याचे मी वाचले होते. सचिन तेंडुलकरला बाद देणे चुकीचे