ग्रामीण साहित्यातील 'आनंद’ गेला.
लेखनप्रकार (Writing Type)
ग्रामीण साहित्यातील 'आनंद’ गेला.
सकाळीच डॉ.आनंद यादव गेल्याच्या बातमीने धक्काच बसला. डॉ आनंद यादव खूप वर्षापूर्वी औरंगाबादला आले तेव्हा आमच्या मराठवाडा साहित्य परिषदेत त्यांची भेट झाली होती. मिसळपाववर मी आनंद यादवांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यावर त्यांच्या अभिनंदनाचा धागा काढला होता. डॉ. आनंद यादव यांच्या भेटीत फ़ारशी ओळख नसतांनाही काही लेखक मंडळींच्या आणि त्यांच्या गप्पाही रंगल्या होत्या आम्हीही त्यात होतो तेव्हा 'वाचत राहा' हा सल्ला त्यात होता. त्यांच्या गप्पांच्या आठवणींनी आज आत जरा जरा गलबलून आलं होतं.
आनंद यादव यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातला कागलचा. कागलपासून सुरु झालेला हा प्रवास काल पुण्यात थांबला. आनंद रत्नाप्पा जकाते. जकाते हे पडनाव, त्यांचे पूर्वज जकात गोळा करायचे त्यावरुन त्यांना जकाते हे नाव पडलं होतं. आडनाव मात्र यादवच होतं. वडीलांची स्वत:ची शेती नव्हती. एका जमीन मालकाच्या शेतावर राबणारे हे कुटुंब. आईचं नाव ताराबाई. एकूण बारा भावंडापैकी आनंद यादव सर्व मुलात मोठे. मोठ्या मुलाने शेतात हातभार लावला पाहिजे ही वडीलांची अपेक्षा. आजुबाजुचं वातावरण कोणत्याही अर्थाने शिक्षणाला पुरक नव्हतं. गुराढोरांमागे किंवा शेताला जाणे याशिवाय दुसरा उद्योग नव्हता. अशा प्रतिकुल परिस्थितीत त्यांना शिक्षणाची ओढ लागली. शिक्षणासाठी मार्गदर्शन करायला कोणी नव्हतं. शिक्षणासाठी कोणतेही हाल अपेष्टा सोसण्याची तयारी शाळेतल्या गुरुजींनी पाहिली आणि त्यांची शाळा सुरु झाली. शाळेसाठी असलेली जिद्द ’झोंबी’ या आत्मचरित्रात वाचायला मिळते. 'शिक्षण कुणब्याचं काम नव्हं' अशी त्यांच्या वडीलांची धारणा होती. अर्थात अशा मानसिकतेस तेव्हाच्या परंपराच जवाबदार होत्या. वडीलांनी त्याचा हा शिक्षणाचा नाद मोडण्याचा प्रयत्न केला. आपल्या कुटुंबाला शिक्षणाची नव्हे तर कुटुंब चालविण्यासाठी पैशांची गरज आहे, हे बिंबवण्याचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केला. परंतु याचा काहीही परिणाम आनंद यादवांवर झाला नाही. शिक्षणाची त्यांची उर्मी वाढतच गेली. आईकडून मात्र प्रोत्साहान मिळत होते.
आनंदाला शिक्शणाची आवड आहे तर शिकू द्या, असा भोळाभावही आईकडे मनातल्य मनात होता. आनंदाला अप्रत्यक्ष मदत करणा-या पत्नीवरही रत्नप्पा राग काढ्त असे. आनंदाला शेतीकामात त्यांनी इतकं जखडून टाकलं होतं की त्याला अभ्यासाला वेळ मिळु नये, म्हणुन त्यांच्या वडीलांनी पूर्ण प्रयत्न केला. पण अभ्यासाची आवड आणि जिद्दीमुळे मिळालेल्या वेळातही आनंद यादव पुस्तके मिळवत आणि ते वाचून काढत असत. शेतीचे ढोरकाम करता करता आनंद यादव गावात येणारे तमाशे बघायचे, त्यातले संवाद म्हणायचे, नकला करायचे, गाणी म्हणायचे असा उद्योगही त्यांचा चालू असायचा. कविता वाचून वाचून आपण कविता लिहू शकतो ही जाणीव त्यांना झाली. चौथ्या इयत्तेत असतांना त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली. वाचन सुरु असल्यामुळे त्यांची बाल्यवस्था तशी संपूनच गेली ते फ़ार लवकर मोठे झाले. शालेय शिक्षण गावात पूर्ण झाल्यानंतर वडीलांना आता आपला मुलगा नोकरीला लागेल आणि संसाराला हातभार लावेल असे त्यांना वाटत होते. पण आनंद यादव आता थांबणार नव्हते त्यांनी पळून जाऊन कोल्हापूर गाठले. उपासमार, केळीची सालं खाऊन आनंद यादवांनी ते दिवस काढले. पुढे काही स्वातंत्र्य सैनिकांच्या मदतीने त्यांनी रत्नागिरी गाठली. सर्वोदय छात्रालयात राहून त्यांनी आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. कवी प्राचार्य य.द.भावे, प्रा. रा.वा. चिटणीस यांचा सहवास त्यांना लाभला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कवितेचे त्यांचे वाचन वाढले. कविता लेखनास बळही मिळाले. प्राचार्य य.द.भावे यांनी पु.ल.देशपांडे यांची भेटही घडवून आणली. पुलंचा हात त्यांच्या पाठीवरुन फ़िरला ही त्यांच्या जीवनातील महत्वाची घटना होती. महाविद्यालयीन शिक्षण चालू असतांना ते रत्नागिरीहून पुन्हा कोल्हापुरला आले. 'हीरवे जग' मधे संकलीत झालेल्या कविता त्यांनी इथेच लिहिल्या. कोल्हापुरच्या वास्तव्यात त्यांना अनेक नामवंत मोठी लेखक मंडळी भेटली. लेखकांच्या प्रोत्साहानाने त्यांनी ’मातीखालची माती’ हे व्यक्तीचित्रही इथेच लिहिले. बी.ए. झाल्यावर यादवांनी आकाशवाणी केंद्रावर नोकरी केली. पुढे एम. ए. झाल्यावर त्यांनी प्राध्यापकाचा पेशा स्वेच्छेनेच स्वीकारला. आपल्या लेखन वाचनास हाच पेशा अनुकुल आहे याची त्यांना खात्री होती. कविता, कथा, कादंबरी या क्रमाने त्यांनी वाड्मय प्रकार हाताळायला सुरुवात केली. त्याचबरोबर संशोधन आणि समीक्षालेखनही त्यांनी केले. 'पाणभवरे' मधील ललित लेखन अभ्यासनीय होते.
'जानपद' गितांमधून आणि ग्रामीण साहित्यातून खरे ग्रामजीवनाचे चित्रण येत नाही अशी त्यांची प्रामाणिक धारणा होती. म्हणुनच त्यांनी ग्रामजीवन वास्तवपूर्ण लिहिण्याचा प्रारंभ केला. स्वातंत्र्योत्तर काळात तरी ग्रामीण बहुजनसमाजाचे शोषण संपेल असे वाटले होते परंतु ते संपले नाही. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमुळे दलित साहित्याचा एक नवा झंजावात उसळला. दलित साहित्य मराठी साहित्यापुढे एक आव्हान म्हणुन उभे राहीले होते. ग्रामीण समाजात शिक्षणाने एक नवी पिढी निर्माण केली त्या पिढीचे भान आणि प्रतिनिधित्व आनंद यादवांकडे होते म्हणूनच त्यांनी आधुनिक ग्रामीण साहित्याची चळवळ सुरु केली. ग्रामीण साहित्याच्या वास्तववादाला एक सामाजिक अधिष्ठान देण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
आधुनिक ग्रामीण साहित्याची भूमिका यादवांनी मांड्ली. त्यासाठी ग्रामीण साहित्य संमेलने, मेळावे, परिसंवाद घडवून आणले. १९७५ च्या सुमारास ग्रामीण कथेवर लिहिणारी एक पिढी त्यांनी उभी केली. खेड्यातला नवा लेखक लिहिता झाला पाहिजे ही त्यांची भूमिका होती, त्यांच्या लेखनाचे त्यांनी संपादनेही केली. १९७५ च्या या ग्रामीण चळवळीला पाहुन डॉ.गं.ना.जोगळेकर म्हणाले होते की आनंद यादव यांनी मराठी साहित्यात 'यादवकाळ' सुरु केला होता. 'तिस-या पिढीची ग्रामीण कथा' संग्रह संपादित करुन त्यांनी त्यास प्रस्तावना लिहिली आहे. ग्रामीण साहित्य चळवळीचा सतत पाठपुरावा केला. ग्रामीण साहित्य चळवळीस विरोध करणार्या विरोधकांचाही त्यांनी समाचार घेतला आणि हे करत असतांना एका सामान्य शेतक-याच्या मुलाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन यश मिळविले हे त्यांनी 'झोंबी' आणि 'नांगरणी' आत्मचरित्रामधुन दाखवून दिले. या दोन्ही पुस्तकांना पुढे अमाप लोकप्रियताही मिळाली. शिक्षणाच्या माध्यमातून जीवन घडविणा-यांना ती कथा आपली जवळची वाटली. ’हिरवे जग कविता संग्रह १९६० ला त्यांनी लिहिला. तीन कविता संग्रह, सहा कथा संग्रह, एक व्यकीचित्र, सात कादंब-या दोन ललित लेख, एक वग नाट्य, चार समीक्षा ग्रंथ दोन संपादने. असे त्यांचे भरभरुन लेखन आहे.
'संतसूर्य तुकाराम' या कादंबरीच्या निमित्ताने विनाकारण वाद निर्माण झाला. वारक-यांनी हल्लाबोल करुन २००९ चे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या मानापासून त्यांना वंचित केले. विद्येच्या माहेरघरात लेखन परत घेत आहे, असे त्यांना म्हणावे लागले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टीने ते सर्व समर्थनीय नव्हतं. तरीही डॉ. आनंद यादव आपल्या लेखनाने रसिक वाचकांच्या कायम स्मृतीत राहतील, यात काही वाद नाही.
डॉ. आनंद यादव यांना मिपापरिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
![]() |
डॉ.आनंद यादव |
संदर्भ : ग्रामीणता साहित्य आणि वास्तव : आनंद यादव.
२) आनंद यादव व्यक्ती आणि वाड्मय : डॉ.रविंद्र ठाकूर.

प्रतिक्रिया
आनंद यादवांना भावपूर्ण
_/\_
समयोचित लेखन. डॉ. यादव
आनंद यादव ह्यांना श्रद्धांजली
श्रद्धांजली!
सहजसुंदर परिचय.
मी ९ वि मध्ये होतो
संतसूर्य तुकाराम
पत्रावरुन आठवण झाली..
काचवेल जमलं नाही असं माझं मत
मम म्हणते.
+१ असच म्हणते.झोंबी आवडत
श्रद्धांजली
अर्थात
श्रद्धांजली
+१
भावपूर्ण श्रद्धांजली __/\__
श्रद्धांजली
डॉ. आनंद यादवांना श्रद्धांजली
डाॅ. आनंद यादवांना श्रद्धांजली!
ओळख
श्रद्धांजली
यादव सरांना विनम्र श्रध्दांजली
मी शाळेत असताना आनंद
आनंद यादवांना भावपूर्ण
गोतावळा
उत्तम समयोचित लेख,
डॉ. आनंद यादव यांना भावपूर्ण
__/\__
डॉ यादव यांना श्रद्धांजली
ड़ाॅ. आनंद यादव यांना भावपूर्ण