माझी मुलगी senior kg मध्ये जाते. वाचन शिकण्याचं तिचं वय. परवा तिचं एक पुस्तक हातात धरून घडाघडा वाचत होती. मला कौतुक वाटलं. मी तिला दुसरा तसाच परिच्छेद लिहून दिला. तर ती गडबडली. नंतर लक्षात आलं कि, शाळेत तो धडा पाठ करून घेतला होता. unit test ला तोच वाचायला सांगणार होते. ज्यांना पाठ नाही झाला त्यांना कमी मार्क्स मिळणार होते.
गेल्या काही दिवसांत मी आठवी ते दहावीच्या बऱ्याच मुलांना भेटले. काही जण ९०% किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स मिळविणारी होती. सहज म्हणून अभ्यासाची चर्चा करताना लक्षात आलं, कि, मुलं पाठ्यपुस्तकं फारशी वाचतच नाहीत. प्रश्नोत्तरे शाळेतून दिली जातात. गाईड्स असतात, ट्युशन मध्ये उत्तरे पाठ करून घेतली जातात. अगदी निबंध सुद्धा रेडीमेड असतात. तेच पाठ करायचं आणि परीक्षेला जायचं. परीक्षा द्यायची आणि मार्क्स मिळवायचे. मार्कांची हि धडपड शाळा सुरु झाल्यापासून (बालवाडीपासून) सुरु होते. मार्क्स मिळतात पण शिक्षण बाजूलाच पडतं. मार्क्स मिळविण्यासाठी घोकंपट्टीचा मार्ग स्विकारला जातो. प्रश्नोत्तरांच्या स्वरूपाने मार्क्स वाढत असतील पण धड्यातली मजाच जाते. अभ्यास कंटाळवाणा होऊ लागतो.
काल माझ्यासमोर एक मुलगा विज्ञानाचे पुस्तक वाचत होता. धडा होता 'World of Matter'. धड्यातला पहिला परिच्छेद खूप छान आहे. तो वाचून झाल्यावर मी त्याला विचारलं, "तुला ह्यातलं काय समजलं?" त्याने पुस्तकातली वाक्यं जशीच्या तशी मला ऐकवली. मी पुन्हा विचारलं, "म्हणजे काय?" आता तो गडबडला. धड्यात काय लिहिलंय त्याचा त्याच्या आयुष्याशी संबंध जोडणं त्याला जमत नव्हतं. matter म्हणजे काय हे सांगताना आजूबाजूची उदाहरणं देणं त्याला जमत नव्हतं. ह्याचा अर्थ असा नाही कि, तो मठ्ठ होता. पण पाठ्यपुस्तकातल्या गोष्टी फक्त परीक्षेतच लिहायच्या असतात असा त्याचा समज झाला होता. आणि त्या तो अर्थ न लावता पाठ करत होता. अशी कितीतरी मुलं आज दिसतात. प्रश्नाची उत्तरे पूर्णविराम, स्वल्पविरामासह पाठ करणारी मुलं सुद्धा आहेत.
'घोकंपट्टी' हा मार्ग खरंतर फार पूर्वीपासून शाळांमध्ये वापरला जातो. पाढे, कविता, सुत्रे ह्या गोष्टींसाठी पाठांतराचा मार्ग पूर्वीपासून वापरला जातो. पण निबंध, प्रश्नांची उत्तरे ह्या गोष्टीही जेंव्हा पाठ केल्या जातात, तेंव्हा विचार करण्याची शक्ती खुंटते. एखादी गोष्ट अर्थ न समजता पाठ केली कि, तात्पुरती लक्षात राहते. त्या गोष्टीमागचा तरतमभाव समजून घेतलाच जात नाही. सुरुवातीला चांगले मार्क्स पडतात म्हणून आई-वडील खुश असतात पण इयत्ता वाढत जाते तशी लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होत जाते. म्हणूनच, "चौथी पर्यंत किंवा सातवी पर्यंत खूप चांगला अभ्यास करायचा पण नंतर अचानक खूपच मागे पडला/ पडली" अशा अर्थाची वाक्यं पालकांकडून येऊ लागतात. शिक्षण म्हणजे विचार करणं. शिक्षण म्हणजे व्यक्त होता येणं. शिक्षण म्हणजे अनुभव घेणं. जागं होणं. न समजता घोकंपट्टी केली कि, ह्या गोष्टी मागे पडतात. आणि "सब कुछ सिखा हमने न सिखी होशियारी.." असं म्हणण्याची वेळ येते.
ह्या घोकंपट्टी च्या पद्धतीला जबाबदार कोण? असा प्रश्न पुढे आल्यानंतर, नेहमी दोन बाजू पुढे येतात. १) पालकांना मुलांचे मार्क्स हवे असतात. त्यामुळे, मार्कांच्या दृष्टीने शिक्षकांना शिकवावंच लागतं. हि शिक्षकांची बाजू. आणि २) हल्ली, सगळीकडेच मार्क्स महत्त्वाचे आहेत. प्रवाहाच्या दिशेने पोहावंच लागतं, हि पालकांची बाजू. दोन्हीही गोष्टी अगदी मान्य. शिक्षणाचे बाजारीकरण झालं आहे, असा मुद्दा मांडणारेही बरेच असतात. 'पूर्वीसारखं शिक्षण राहिलेलं नाही,' ह्यावर सगळ्यांचं एकमत असतं. थोडासा अजून विचार केला तर जाणवेल, कि, प्रश्न सोडविण्यापेक्षा एकमेकांवर दोषारोप करण्यातच आपण वेळ घालवत आहोत. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी कि, आपल्या मुलाने घोकंपट्टी न करता शिकावं असं वाटणारे पालक आहेत तसेच कळकळीने शिकविणारे काही शिक्षकही आहेत. त्यांनी दुसऱ्याने बदलावं असं म्हणण्यापेक्षा स्वत: त्यासाठी प्रयत्न करायला काहीच हरकत नाही.
आपल्या मुलाने कोणत्या पद्धतीने शिकावं हे आपण नक्कीच ठरवू शकतो. मुलांच्या शिक्षणाच्या काळजीने व्याकूळ झालेले अनेक पालक दिसतात. अगदी पहिल्यापासून मुलांच्या शिक्षणाकडे जातीने लक्ष देणारेही असतात. त्यांनी आपला मुलगा खरंच काय शिकतोय? ह्याच्याकडे लक्ष द्यायला हवं. मुलांना कोणत्या वयात काय करता आलं पाहिजे, ह्याकडे लक्ष द्यायला हवं. म्हणजे पाच-सहा वर्षांच्या मुलांना अक्षरओळख असायला हवी. काही अक्षरं एकामागे एक जोडून शब्द बनवता, वाचता यायला हवेत. शाळांमधून जेव्हा धडे च्या धडे ह्या मुलांकडून पाठ करून घेतले जातात, तेव्हा घरी खूप कौतुक होतं. पण इतर ठिकाणी असलेले तेच शब्द मुलाला वाचता येतायत का? ह्याकडे मात्र दुर्लक्ष होतं. ह्याठिकाणी, पाठांतर महत्वाचं नसून वाचता येणं महत्वाचं आहे हे शिक्षक आणि पालक दोघंही विसरतात. निबंध लिहिताना स्वत: विचार करायचा, धडा नुसता वाचायचा नाही लेखकाची भूमिका समजावून घ्यायची, कविता फक्त वाचायची नाही, कवीच्या भावनांशी समरस व्हायचं. हे मुलांना शिकवायला हवं. शाळेत जर हे होत नसेल तर घरी आई-वडिलांनी असं शिकवायला काहीच हरकत नाही.
नंतर प्रश्न येतो मार्कांचा. "आम्ही असं शिकविण्याचा प्रयत्न करतो, पण शाळेत मार्क्स मिळत नाहीत, " हे अनेकदा पालकांकडून सांगितले जाते. परिस्थिती खरंचच तशी असेलही. पण शाळेतल्या मार्कांशिवाय शिक्षण होतंच नाही का? शाळेव्यतिरिक्त आपण आपल्या मुलांना काही शिकवूच शकत नाही का? आपल्या दैनंदिनीत थोडासा वेळ मुलांना शिकविण्यासाठी आणि त्यांच्याबरोबरीने शिकण्यासाठी आपण नक्कीच ठेऊ शकतो. हा शाळेचा अभ्यास नसल्यामुळे मुलं आनंदाने शिकतील. रस्त्याने जाताना अक्षरं ओळखायला लावणे, शब्द वाचायला लावणे, भाजी आणायला जाताना, समान घेताना पैशांचा हिशोब करणे, एखाद्या ठिकाणी जाताना त्या ठिकाणाविषयी पूर्ण माहिती वाचून मुलांनी आपल्याला सांगणे, मुलांचा एखादा वेगळा विचार त्यांनाच लिहू देणे, एखादी छानशी कविता , गोष्ट ह्याचा अर्थ त्यांचा त्यांनाच समजू देणं अशा असंख्य गोष्टींमधून आपण आपल्या मुलांना शिकवू शकतो. अशा शिक्षणातून मुलं स्वत: विचार करू लागतील, अनुभव घेऊ लागतील, व्यक्त होऊ शकतील.
आपल्यालाही तेच हवंय नाही का?
वसुधा देशपांडे-कोरडे
clinical psychologist
माईंड मास्टर कौन्सेलर्स, प्रा. लि.
९२२५५०५३६९
वाचने
6272
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
www.mindmastercounsellors.com
शाळेतली मार्क्स सिस्टीम बंद
अवघड आहे
शाळांची परिस्थिती वाईटच आहे.
अक्षरनंदनचा अनुभव नाही. पण
In reply to शाळांची परिस्थिती वाईटच आहे. by पिलीयन रायडर
मी एका आयआयटीची पूर्वतयारी
यावर तुम्ही सविस्तर लिहावे ही
In reply to मी एका आयआयटीची पूर्वतयारी by श्रीगुरुजी
चांगला धागा
In reply to यावर तुम्ही सविस्तर लिहावे ही by एस
+११११११
In reply to यावर तुम्ही सविस्तर लिहावे ही by एस
नक्कीच. याच्यावर सविस्तर
In reply to यावर तुम्ही सविस्तर लिहावे ही by एस
छान पद्धत
In reply to मी एका आयआयटीची पूर्वतयारी by श्रीगुरुजी
माफ करा पण माझा स्वतःचा अशा
In reply to मी एका आयआयटीची पूर्वतयारी by श्रीगुरुजी
काही मुलांच्या बाबतीत हे खरे
In reply to माफ करा पण माझा स्वतःचा अशा by शब्दबम्बाळ
मी अशाच 10% मुलांबद्दल बोलतोय
In reply to काही मुलांच्या बाबतीत हे खरे by श्रीगुरुजी
क्लास लावल्याने मजा करण्यात
In reply to मी अशाच 10% मुलांबद्दल बोलतोय by शब्दबम्बाळ
आपली शिक्षण पद्धति
पद्धत
दहावीला असताना एकदा एक आख्खा
In reply to पद्धत by जॉनी
क्लासेस मधे देखील सरावाच्या