Skip to main content

फटाके आणि दिवाळी..

लेखक वटवट यांनी मंगळवार, 01/11/2016 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
चला दिवाळी संपतीये... बरेच पर्यावरणवादी, धर्मनिरपेक्ष आणि प्राणीमित्र आता सुटकेचा निःश्वास सोडत असतील. मला माहितीये, नव्हे नव्हे खात्री आहे, कि ह्या दिवाळी नंतर ते सर्वजण पब्लिक ट्रान्सपोर्टच वापरणार आहेत. स्वतःच्या गाड्या भंगारात टाकतील. आजूबाजूचा परिसर अजिब्बात घाण करणार नाहीत. थुंकणं तर सोडाच पण दुसरं जर कोणी थुंकताना दिसलं तर त्याच्या थूतरीत द्यायला मागेपुढे पाहणार नाहीत. त्यांची जुनी इलेक्ट्रॉनिक उपकरणे काही झालं तरी विकणार नाहीत कारण इलेक्ट्रॉनिक कचरा ही एक अतिशय भीषण समस्या आहे ह्याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्या लोकांनी आता पूर्णपणे शाकाहारी व्हायचं ठरवलं आहे. कारण कुत्र्या-मांजरांना होणार त्रास बघून कशाला कोंबड्या, बोकडं वगैरे वगैरे कापून खायचं असे विचार त्यांच्या मनात जोरजोरात घोळत आहेत. ते एसीत चुकूनसुद्धा बसणार नाहीत. सिनेमा हॉल मध्ये गेल्यावर एक तर आंदोलन करून एसी बंद करायला लावतील नाहीतर. मल्टिप्लेक्सवर आजन्म बहिष्कार टाकतील.. पुण्यातल्यांसाठी अलका, विजय, निलायम, लक्ष्मीनारायण आहेच कि आणि अगदी तिकीट नाहीच मिळालं तर बुधवारातलं वसंत टॉकीज जिंदाबाद म्हणतील. ज्याप्रमाणे दिवाळीतल्या फटाक्यांचा आणि हिंदुधर्माचा काहीच संबंध नाही त्याप्रमाणे गुरांच्या निरपराध कत्तलीचा आणि मुस्लिम धर्माचा, वेगवेगळ्या चमत्काराचा आणि ख्रिश्चन संत पदाचा काहीच संबंध नाही हेही त्यांनी मान्य केलंय... पण त्यांच्या संदर्भातली लहान मुले जरा गोंधळातअसतील... त्यांच्यासाठी खेळायला मैदानं, शिवारं कोणी ठेवली नाहीत, तिथे सोसायट्या केल्या थोरांनी. पोहायला विहिरी ठेवल्या नाहीत. त्या बुजवल्या, थोरांनी. खांदे पुस्तकांनी आणि डोळे स्वप्नांच्या ओझ्यानीं झुकत आहेत. बहुतांश वेळ हा वेगवेगळ्या क्लासेसनी खाऊन टाकलाय. मनोरंजनाचं एकंच माध्यम टीव्ही आणि व्हिडिओ गेम्स, त्याने डोळे खराब होतायेत.. लहान पण सुंदर असतं? ते कसं बुवा? कदाचित हा प्रश्न त्यांना पडत असेल... आपल्यासारख्या थोरांनी बर्याच गोष्टीची वाट लावली. भोगत आहे आपली पुढची पिढी... तसंही दिवसेंदिवस फटाक्याचं मार्केट कमी होतंच आहे, महागाईमुळे. आई सांगते त्यांच्या लहानपणी २ रुपयात दोन मोठ्ठ्या पिशव्या भरून फटाके आणायचे तिचे वडील. प्रत्येक फटाक्याच्या दुकानासमोर रांग असायची. मी लहान असताना तेव्हढे फटाके नाही बघितले. हजार रुपयात एक पिशवी भरून फटाके आणायचे बाबा. लहानपणी फटाके उडवायचा सोस जेव्हढा असतो मोठेपणी तेव्हढा रहात नसतो. मी अक्षरशः मार खाल्लाय फटाके उडवण्यावरून. आता गेल्यावर्षीचे फटाके ह्या वर्षी उडवले त्यात अजून काही राहिलेच आहेत. कदाचित पुढच्या वर्षी तेच उडवेन... मी लहान असताना दिवाळीच्या आधीच्या आठवड्यापासूनच फटाक्यांच्याआवाजाला सुरुवात व्हायची... आता ऐन दिवाळीत पण तसे आवाज ऐकले नाहीत.. कित्येक सोसायट्यात फटाके नाहीत उडवू देत. ज्यांना उडवायचेत ते बाहेर येऊन उडवताना दिसतात... फटाक्यांचं प्रमाण तसं कमीच होतंय कि... तसंही जसं वय वाढतं तसं फटाक्याची संकल्पना बदलत असतेच कि..... काय??...बरोबर ना? असो... अरे मग जो काही आनंद ज्या काही वयात घ्यायचाय घेऊ द्या कि... एवढीच काळजी असेल तर लावा झाडं खास दिवाळीसाठी. दिवाळीचं वाढणार प्रदूषण होईल त्या झाडांसाठी फराळ... अरे विसरलोच... विरोधकांनी वर सांगितल्याप्रमाणे आधीच ठरवलेलं आहे. त्यामुळे मी कोण पामर त्यावर बोलणारा... बिलेटेड दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...

वाचने 17894
प्रतिक्रिया 95

प्रतिक्रिया

जरा यावर सुद्धा लक्ष द्या फटाके फोडण्यास मज्जाव करणार्या वृद्धाचा वीस वर्षीय तरुणाने खुन केल्याची घटना कालपरवाच सोलापुर येथे घडली,

In reply to by भीमराव

सुधारणा दिसतेय की. आपल्या "धार्मिक" बाबींत लुडबुड करणाऱ्यांना कापून काढण्याचे संस्कार शेवटी दिसू लागलेत एकदाचे. याला म्हणतात धर्मतेज!

सर्व तर्‍हेच्या फटाक्यांवर कायद्याने कायमस्वरूपी बंदी आणायला हवी असे माझे मत आहे. अर्थात कोणी असे करायला गेले तर फटाके निर्मात्यांच्या पोटावर पाय येईल, फटाके विक्रेत्यांचा धंदा बुडणार, कर्मचार्‍यांचा रोजगार बुडणार, दिवाळीच्या आनंदावर विरजण, गरीबांच्या आनंदावर विरजण इ. नेहमीचीच आरडाओरड होईलच. परंतु त्याकडे लक्ष न देता सर्व तर्‍हेच्या फटाक्यांचे उत्पादन, आयात व विक्री यावर कायमस्वरूपी बंदी हवी.

In reply to by श्रीगुरुजी

सहमत आहे. धर्म, समारंभ, राजकारण, खेळ आदिमधले सेलेब्रेशन वगैरे गोष्टी दुसर्‍यांना त्रास न देताच झाल्या पाहिजेत. रस्त्यावर फटाके उडवणार्‍यांवर तर ताबडतोब फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे. गेल्या दिवाळीत रस्त्यावरच्या फटाक्यामुळे अ‍ॅक्टीव्हा बॅलन्स झाली नाही अन डोळ्यासमोर एक मित्र प्राणाला मुकला. ह्या दिवाळीत आम्ही अ‍ॅड एजन्सीवाल्या सर्व मित्रांनी फटाके नकोत अशाच अर्थाचे मेसेज आणि ग्रीटिंग्ज दिवाळीला पाठवले. पॅम्प्लेटही वाटले. कॉलनीत एक दोन अतिशहाण्याखेरीज कुणीही बॉम्ब, लडी वगैरे उडवल्या नाहीत. भुचक्रे फुलबाज्या आणि झाडे लहान मुलांनी उडवले. तेही लिमिटेड एकदम. आनंद वाटला.

In reply to by संदीप डांगे

मुलांसाठी सुतळी अ‍ॅटम बाँब आणायचे बंद करून किमान ९-१० वर्षे झाली. मुलांच्या आवडीसाठी फक्त भुईनळे,भुईचक्र आणि फुलबाजी व लवंगी फटाके (अलिकडे आलेला किटकॅट व लेकीसाठी टिकली) इतके वाजविले जाते तेही फक्त रात्री १०.०० च्या आत व सकाळी ६.३० नंतरच. प्रचंड आवाजी फटाके आणि मोठ्ठ्या माळा कन्येला अजिबात आवडत नाहीत (लेकाला हट्ट करतो म्हणून एकदा मुद्दाम लक्ष्मीपुजनाला चिंचवडगावात नेऊन मोठ्या माळेचा इतरांना कसा उप्द्रव्/त्रास होतो, ते दाखविले तेव्हापासून त्याचाही हट्ट नाही फक्त लवंगी किंवा पानपट्टी वाजवायला आवडते त्याला). नागगोळी,तडतडी,आगपेट्या,रंगीत फुलबाज्या एकदा कन्येला (दुसरीकडे) वाजविताना दाखविल्या आणि दिसलेल्या धूर्+प्रदूषणामुळे तिनेच तेंव्हापासून एक्दाही हट्ट केला नाही. स्वतंत्र घर असल्याने फक्त गच्चीवर फटाके वाजविण्याचा कटाक्ष गेली १० वर्षे पाळत आहे.पक्ष्यांना कसा त्रास होतो हेही कन्येला दाखविले आहे त्या मुळे कन्याही जरा मोठी झाल्यावर स्वतः होऊन फटाके वाजविण्याचे बंद्/कमी करेल याची खात्री आहे. मर्यादीत नाखु संसारी

In reply to by मंदार दिलीप जोशी

सगळ्या लिंक उघडून वाचल्या नाहीत, पहिली वाचली, जरतर च्या भाषेत बुद्धिभ्रम आहे! बाकीच्या साईट्सची नावं बघून इच्छा नै झाली बघायची, तरी वेळ मिळाला की नक्की वाचेन! महत्त्वाचे म्हणजे तुमचा पत्ता द्या, आमच्या कडच्या हजाराची लड, ऍटम बॉम्ब फोडणाऱ्याना तुमच्या घराजवळ पाठवणार, मग तुमची मतं अशीच राहतात का ते बघुया...

In reply to by मंदार दिलीप जोशी

तुमचा प्रतिसाद उखाडला की ओ ! भलत्या ठिकाणी चॅलेंज केला की असा होता =))

आणि हो, फटाके फुटणार, दर वर्षी फुटणार. काहीही झालं तरी फुटणार. वा! याला म्हणतात निष्ठा, जाज्वल्य की काय तो अभिमान. वरवर पाहता हिंदू असणं नेहमीचं सोपं आहे, तेच हिंदू धर्माचं बलस्थान आहे. पण प्रत्यक्षात ते इतकं सोपं नाही. बाकी जुन्या काळच्या सुधारकांना कशाला तोंड द्यावं लागलं असेल याचा नेमका अंदाज यायला आंतरजालाची मदत होते आहे.

इथले प्रदुषण साफ झाले. आनंदाची गोष्ट आहे. लोक दिवसाढवळ्या प्रतिसाद द्यायला बसले की असं होत असावं.