'नरकचतुर्दशी: मदनकेतू आणि सोळा हजार एकशे आठ स्त्रियांची कथा '

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in दिवाळी अंक
26 Oct 2013 - 9:04 am

.
चित्र १. प्राग्ज्योतिषपुरातील मंदिरात श्रीकृष्ण-सत्यभामेचा गरुडासह प्रवेश
नेपाळ, इ.स. १७७५-१८०० भागवत पुराण पोथीतील चित्र. (लॉस एन्जेलिस काऊंटी म्यूझियम मध्ये संग्रहित)

मदनकेतु उवाच:

परवा नारदमुनी भेटले, तेंव्हा त्यांच्याकडून द्वारकेबद्दल ऐकून मी सुन्नच झालो. सर्व यादव आपापसात लढून मरतात काय, द्वारकानगरीची 'तस्युनामी' वादळामुळे वाताहात होते काय, यादव-स्त्रियांना घेऊन जाणारा अर्जुन अभीरांकडून पराजित, अपमानित होतो काय, सारेच अतर्क्य.…

नरकासुराकडून सोडवून द्वारकेत आणलेल्या सोळा हजार एकशे आठ स्त्रिया आता हस्तिनापुरापर्यंत सुखरूप कश्या पोहोचणार, त्यांची आता हस्तिनापुरात कशी काय सोय लागणार, कुणास ठाऊक. नरकासुराचा वध आणि त्या स्त्रियांची सुटका, यात माझा महत्वाचा सहभाग असल्याने मला याविषयी विशेष आस्था.

***

नारदमुनींना अगदी पहिल्यांदा बघितले, तेंव्हा मी लहानसा होतो. एवढ्या वर्षांनंतरही ती सकाळ मला अजून स्वच्छ आठवते. कोकिळेच्या कुहू कुहूने आसमंत भरून गेलेला होता. आमच्या कुटीसमोरील सारवलेल्या अंगणात मी खेळत होतो. तात दगडी खलबत्त्यात औषधी कुटत होते आणि माय मोठ्या रांजणात रवीने ताक घुसळण्यात मग्न होती. अचानक "नारायण ... नारायण" … असे शब्द आणि वीणेचा मधुर झणत्कार कानावर आला. मागोमाग एका तेजस्वी व्यक्तीचे आगमन झाले. त्यांना बघताच तात लगबगीने पुढे आले आणि त्यांनी त्या व्यक्तीच्या पायावर लोटांगण घातले. त्यांचे बघून मीही तसेच केले. मायने त्यांच्या पायावर दूध ओतून नमस्कार केला. "बाळ, नारदमुनी आहेत बरे हे, देवलोकातून आले आहेत" तात म्हणाले.

मग नारद मुनिंनी आम्हा सर्वांची प्रेमाने चवकशी केली, आणि झोळीतून मधुर मेवा काढून मला दिला.

.
नारदमुनि (चित्राचे तपशील अनुपलब्ध)

मी त्यावेळी बारा - तेरा वर्षांचा असेन. नारदमुनी देवलोकात राहतात, याचे मला खूपच अप्रूप वाटत होते. मी त्यांना देवलोकाविषयी पुष्कळ प्रश्न विचारले. त्यातून मला समजले, की वरती पर्वतात खूप खूप उंचावर देवांची वस्ती आहे. तिथे देव, यक्ष, गंधर्व, किन्नर, अप्सरा, हे सर्व रहातात... देव हे एकूण तेहेतीस कोटींचे असतात. सर्वात उच्च कोटीत ब्रह्मदेव, विष्णू आणि महादेव. त्यानंतरच्या कोटीत इंद्र, यम, वरूण, कुबेर वगैरे. अश्या प्रकारे सर्वोच्च कोटी, अत्युच्च कोटी, उच्च कोटी, मध्य कोटी असे करत करत सर्वात निम्न कोटी तेहेतिसावी असते. एकंदरीत सगळे देव, देव्या, यक्ष, गंधर्व, किन्नर, अप्सरा वगैरे देवलोकात राहणारे सर्वजण या तेहेतीस कोटींपैकी कुठल्या ना कुठल्या कोटीत असतात. जेवढी कोटी उच्च तेवढा जास्त अधिकार, शक्ती, मान आणि ज्ञान. नारदमुनी हे वरून तिसर्‍या कोटीतले. ते नेहमी सगळीकडे फिरत असतात आणि सगळीकडल्या बातम्या देवलोकात नेऊन पोहोचवत असतात. आमच्यासारख्या मानवांनी अवघड तपश्चर्या केली तर त्यांनापण देवलोकात रहायला मिळते, पण असे लोक फार कमी असतात. काही विशेष लायकी असणार्‍या निवडक लोकांना सुद्धा देवलोकात सरळ प्रवेश मिळतो… वगैरे.

मग मला पण येता येईल का देवलोकात ? मी विचारले.

"का नाही ? तू खूप ज्ञान मिळवलेस, खूप हुशार झालास तर येता येईल तुलापण".

"मोठा चुणचुणीत दिसतो तुझा हा मुलगा, नक्की शिकव बरे तू तुझी सगळी विद्या याला, देवलोकात यायचे आहे बच्चाला" नारदमुनि तातांना म्हणाले.

माय आता काहीतरी गोडाधोडाचे करणार हे ओळखून मी तिच्या मागोमाग आत पळालो. मुनिंचे आणि तातांचे बाहेर बराच वेळ बोलणे चालले होते. परत निघताना मुनी तातांना म्हणाले:

"मग केंव्हा येतोस सोमरसाचे बुधले घेऊन देवलोकात? "

"लवकरात लवकर येतोच" तात म्हणाले.

"या पोराला पण घेऊन ये तिकडली मौज बघायला. आणि हो, त्या कूर्मकेतू कुंभाराच्या मुलीची निवड मी अप्सरा बनण्यासाठी केली आहे. त्या दोघांनाही घेऊन ये. कुबेराकडून कूर्मकेतूला द्रव्य देववेन मी पुष्कळ. येत्या पोर्णिमेला प्रस्थान ठेवा. हे घे चौघांसाठी विसाचे ताईत" असे म्हणून त्यांनी चार ताईत तातांकडे दिले, आणि “लग्नाला जातो मी ... लग्नाssssला जातो मी…” असे गुणगुणत मुनी निघाले.

"कुणाच्या लग्नाला जाताय मुनिवर ? " तातांनी विचारले.

"सांगतो, ऐक. असे म्हणून मुनि गाऊ लागले:

"लग्नाला जातो मी … लग्नाssssला जातो मी... द्वारकापुरा...

उत्सव बहु थोर होत

मिळतिल भूपाल अमित

सुर नर मुनी सकळ येत

नट नर्तक सकळ जमत

न मिळे अशी मौज पुन्हा, पाहण्या नरा...

लग्नाला जातो मी …

देतो निज भगिनी राम, कौरवेश्वरा...

लग्नाला जातो मी, द्वारकापुरा...

अरे, द्वारकेला बलराम त्याच्या बहिणीचे लग्न दुर्योधनाशी लावून देणार आहे, तिकडे जायचे आहे "

असे म्हणत नारदमुनी निघालेच.

***

हिम-पर्वतांच्या पायथ्याशी घनदाट वनातील एका लहानश्या गावात आम्ही रहायचो. आमचा पिढीजात उद्योग म्हणजे रानातल्या दुर्मिळ वनस्पती आणि जीव-जंतूंपासून औषधी बनवणे. नारदमुनी येऊन गेल्यावर एक दिवस तात मला त्यांच्याबरोबर औषधी आणण्यासाठी अगदी घनदाट अरण्यात घेऊन गेले. बरेच चालून गेल्यावर एक मोठा धबधबा लागला. धबधब्याच्या बाजूच्या खूप उंचावरल्या खडकांवर हिरव्यागर्द रंगाच्या लांबट आकाराच्या वनस्पती लटकत होत्या. "सोमवल्ली आहेत त्या. या वनस्पतींना अगदी दमट हवा आणि सतत पाणी लागते, त्यामुळे त्या फक्त इथेच उगवतात" तात म्हणाले.

सतत पाणी पडत असल्यामुळे अगदी बुळबुळीत झालेल्या, शेवाळाने माखलेल्या दरडींवरून तोल सांभाळत चढून तात सोमवल्ली तोडू लागले. मी खालून अगदी जीव मुठीत घेऊन बघत होतो.

घरी आल्यावर मायने सोमवल्लीचा अर्क काढून लहान लहान बुधल्यात भरून ठेवला.

पूर्णिमेच्या आदल्या दिवशी कूर्मकेतू कुंभाराकडे सगळ्या गावाला आमंत्रण होते. सकाळपासून सनई -चौघडा वाजू लागला. सडा-संमार्जन करून, रांगोळ्या घालून सर्वत्र पताका लावून चुलाणावर दोन बोकड कापून शिजायला लावले होते. कमळीला न्हाऊ-माखू घालून, कोरे कपडे घालून फुलमाळांनी सजवून झोपाळ्यावर बसवले. सगळ्या स्त्रियांनी तिची पूजा केली. आपल्या गावातल्या मुलीला अप्सरा म्हणून निवडले गेले, आता ती देवलोकात रहायला जाणार या विचाराने प्रत्येकाचा ऊर अभिमानाने, आनंदाने भरून आला होता. गावात कूर्मकेतू कुंभाराची प्रतिष्ठा आता एकदम वाढलेली होती. त्याच्याकडे आता बक्कळ संपत्ती येणार, हे सर्वांना ठाऊक झाले होते.

दुसर्‍या दिवशी अगदी पहाटे आम्ही सर्वजण गावातून निघालो. नारदाने दिलेले 'विसा' ताईत आम्ही गळ्यात बांधले होते. देवलोकात शिरताना तिथल्या द्वारपालांना विसा दाखल्यावरच प्रवेश मिळेल, असे तात म्हणाले.

देवलोकात सोमरसाचे बुधले दिल्यावर आम्हाला भरपूर द्रव्य मिळाले. कूर्मकेतू कुंभाराला तर जन्माची ददात मिटेल येवढे धन कुबेराच्या भंडारातून लाभले. कमळीला आता तिथे 'कमलनयना अप्सरा' असे नाव मिळाले. काही वर्षे नृत्य, गायन वगैरेंचे धडे घेतल्यावर ती पूर्ण अप्सरा बनणार होती. माझी आणि कमळीची खूप मैत्री होती. तिला तिथे सोडून येताना रडूच आले मला.

... या गोष्टीला बरीच वर्षे उलटली. तातांनी मला त्यांची सर्व विद्या शिकवली होती, मीही आपल्या परीने नवनवीन प्रयोग करून त्यात आणखी भर घालत होतो. आम्ही नाना प्रकारची औषधे बनवत होतो. अस्थिक्षय, रक्तपीति पासून पाठदुखी, डोकेदुखी पर्यंतच्या अनेक व्याधींवरील औषधे, वेदनेतून तात्काळ मुक्ती देणारी शामके, अनेक घटका सर्व चिंता-क्लेशातून मुक्ति देऊन नशेत गुंगवून ठेवणारी ‘द्रुग’ औषधी, पुरुषांना हवी असणारी स्तंभके, म्हणजे ज्यांना आर्यावर्तात 'मदनध्वज वटी' म्हणतात, त्या गेंड्याचे शिंग, शिलाजित आणि मदनवल्ली हे सर्व रानगव्याच्या रेतात खलून केलेल्या वटी, 'मदनबाण' म्हणजे मदनवल्लीच्या रसात बुडवून वाळवलेले बांबूचे अगदी लहान, बारीक टोकदार बाण, अशी सर्व औषधसामग्री तसेच मध, रानमेवा, केवड्याची कणसे वगैरे सर्व पाठीवरल्या पोतडीत भरून नगरात नेऊन विकण्यासाठी खूप भ्रमंती व्हायची. त्यातून नाना देशीच्या नाना लोकांशी ओळखी होत, त्यांचे रीतीरिवाज कळत. नारदमुनींच्या सल्ल्याप्रमाणे मी बरेचदा आर्यावर्त प्रदेशाचा दौरा करत असे. तिकडे स्तंभके आणि उत्तेजके खूप विकली जात. 'मदनकेतु' हे माझे खरे नाव नव्हे, पण माझ्या औषधांमुळे आर्यांनी मला दिलेले हे नावच रूढ झाले.

आमचा सोमरस एवढा प्रभावी असे, जरासा प्राशन केल्यावरही अंमल चढत असे. इंद्रदेवाला आमच्याकडला सोमरसच आवडे. दोन-तीन महिन्यातून एकदा आम्ही देवलोकात सोमरसाचे बुधले घेऊन जायचो. दरवेळी मी कमलनयना अप्सरेला, म्हणजेच माझ्या कमळीला आवर्जून भेटायचो. आता ती अतिशय सुंदर आणि नृत्यनिपुण झालेली होती. खरेतर मी तिच्यावर अगदी अनुरक्त झालेलो होतो, आणि लग्न करावे तर हिच्याशीच, असे मला फार वाटायचे. परंतु ती देवलोकातली अप्सरा, मी मानव. पुढे कधी मलाही जर देवलोकाचा रहिवासी होण्याची संधी मिळाली, तरच ते शक्य होते.

.
कमलनयना अप्सरा

***

एक दिवस अचानक नारदमुनी आमच्या घरी आले. "आज मी तुमच्यासाठी एक शुभवर्तमान आणले आहे. सोमकेतू, तुला आणि सोमवतीला अश्विनिकुमारांचे मदतनीस म्हणून देवलोकाचे कायमचे रहिवासी होण्याची अनुमती मिळाली आहे, हे घ्या तुमचे विसाचे ताईत" असे म्हणत त्यांनी दोन रत्नजडित सोन्याचे ताईत दिले.

"आणि या मदनकेतुची निवडही इंद्रदेवाने एका महत्वाच्या कामासाठी केलेली आहे. मात्र त्याला त्यासाठी नरकासुराच्या प्राग्जोतिषपुरास जाऊन रहायचे आहे. ही कामगिरी उत्तम रीतीने पार पाडल्यास त्यालाही देवलोकात कायम रहायला मिळेल"

हे ऐकून आम्हाला खूप आनंद झाला.तातांनी मोठे गावजेवण दिले. कमळीनंतर देवलोकात रहाण्याचा मान आता तात-मायलाच मिळत होता. आमच्यात एक म्हण आहे, "साठा उत्तराची कहाणी विसाउत्तरी सफळ संपूर्ण" म्हणजे आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते, अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवावी लागतात, त्या सर्वांची सांगता 'विसाचा ताईत' मिळण्याने होते.

लवकरच तात-माय देवलोकात रवाना झाले. प्राग्जोतिषपुरास सर्व औषधींचा भरपूर साठा बरोबर न्यायचा होता. वनौषधी आणण्यासाठी माझ्यासह नारदमुनीही वनात आले. मी भरपूर वनस्पति गोळा केल्या. त्या सर्व झोळीतून वाहून नेणे शक्य नव्हते. रथ वा बैलगाडी हवी होती, पण ती त्या रानात कुठून मिळणार? तेवढ्यात मला तिथे पडलेला एक जुनाट रथ दिसला. पण तो ओढणार कोण?

... माझी पंचाईत बघून नारदमुनी हसून म्हणाले, "बघ आता तू माझ्या या वीणेचा चमत्कार" आणि त्यांनी वीणेवर राग 'सिंहध्वनि' वाजवायला सुरुवात केली. आणि काय आश्चर्य, वनातून तीन सिहिंणी आणि दोन सिंह बाहेर आले, आणि अगदी तल्लीन होऊन वीणावादन ऐकू लागले. "अरे बघतोस काय, जुंप त्यांना आता या रथाला" मुनी म्हणाले. मला भीती वाटली, तरी साहस करून मी ते काम केले. मुनींनी वीणेची गत वाढवताच सिंह जोराने धावू लागले, आणि आम्ही अल्पावधीत घरी पोहोचलो.


चित्रकार: Briton Riviere, 1895

लवकरच आम्ही प्राग्ज्योतिषपुरात दाखल झालो. इथे मला नरकासुराचा विश्वास संपादन करून रहायचे होते. त्याचे मूळचे नाव 'भौमासुर' असे असून तसा तो मूळचा चांगला होता. त्याने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून दिव्य रथ आणि अमोघ शक्ती मिळवलेल्या होत्या. मात्र पुढे बाणासुराच्या संगतीमुळे तो फार गर्विष्ठ आणि अत्याचारी झाला, आणि इंद्रावर स्वारी करून त्याला त्याच्या प्रासादातून हुसकावून लावले, देवलोकातून वरुणाचे सुवर्ण-छत्र, आदितीची मौल्यवान कुंडले आणि अमाप संपत्ती लुटून आणली. मात्र तेंव्हापासून इंद्राला नरकासुर पुन्हा आपल्यावर स्वारी करेल, अशी सतत धास्ती वाटू लागल्यामुळे एकाद्या हुशार, विश्वासू व्यक्तीला त्याच्याकडली बित्तंबातमी काढण्यासाठी तिथे ठेवावे, असे ठरवून नारदांच्या सल्ल्याने माझी निवड केली होती.

नरकासुराच्या दरबारात नारदमुनिंनी माझ्याबद्दल आणि माझ्या औषधांच्या ज्ञानाबद्दल तोंड भरून स्तुती केली आणि याला तुझ्या दरबारात ठेऊन घे, फार कामाचा माणूस आहे, असे सांगितले. नरकासुर त्याच्या सिंहासनावर खूप गाद्या-उश्या घेऊन फार अवघडून बसलेला होता, आणि त्याच्या चेहर्‍यावर वेदना दिसत होत्या. मी ओळखले, की त्याला भगंदराचा फोड झालेला आहे. मग मी त्वरित उपाययोजना करून त्याला वेदनामुक्त केले आणि औषधे, पथ्य सांगून पुन्हा त्याला तो त्रास होणार नाही, अशी हमी दिली. या गोष्टीचे नरकासुराला फार आश्चर्य आणि कौतुक वाटले, आणि त्याने लगेचच राजवैद्य म्हणून माझी नेमणूक केली.

प्राग्ज्योतिषपूर शहराभोवती अतिशय कडेकोट पहारा असे. कित्येक योजने लांबी असलेल्या उंचच उंच अभेद्य दगडी परिकोटाने शहर वेढलेले होते, आणि त्यात जागोजागी उंच टेहळणी स्तंभ होते. शहराची रचना फार आखीव-रेखीव असून जागोजागी रमणीय उद्याने, कारंजी, पुतळे, चित्रशाळा आणि द्यूतगृहे, मोठमोठी स्नानगृहे असून शहराला स्व्च्छ पाण्याचा अहोरात्र पुरवठा करणारी 'आप-वाह-द्रुत' नामक यंत्रणा मोठ्या प्रयत्नाने उभारलेली होती. त्याद्वारे दूरवरच्या डोंगरी प्रदेशातील सरोवरांचे पाणी उंच बळकट दगडी स्तंभांवर पेललेल्या विशाल दगडी पन्हळींमधून शहरापर्यंत आणून शहरातील असंख्य पुष्करिणी, स्नानगृहे आणि कारंज्यांमधे खेळवले जायचे. ही यंत्रणा पूर्वी अगस्त्य ऋषींनी रचलेली होती, आणि प्राग्ज्योतिषपुराखेरीज ती गांधार देशाच्याही पुष्कळ पलिकडे असलेल्या, 'रामन' साम्राज्यातही अगस्त्य ऋषींचे वंशज असल्या 'आगस्त्युस' नामक राजाने उभारली होती. तिकडल्या बोबड्या बोलीत तिला 'आक्वादक्त' असे म्हणत, तर 'रामन' चा उच्चार 'रोमन' असा करीत.


आक्वादक्त अर्थात 'आप-वाह-द्रुत' यंत्रणा आणि अगस्त्य ऋषिचा वंशज आगस्त्युस.

लवकरच माझी ओळख नरकासुराचा मित्र 'मुर' आणि त्याचे सहा मुलगे: ताम्र, अंतरिक्ष, श्रवण, विभावसु, नभश्वान आणि अरुण यांचेशी झाली. त्या सर्वांना माझ्या औषधांविषयी फार कुतूहल वाटत होते. ते सहा भाऊ मला त्यांच्या वाड्यात घेऊन गेले, आणि माझी राजेशाही बडदास्त त्यांनी तिथे ठेवली. उत्तमोत्तम पक्वान्ने, सुखद शैय्या, सेवेला सुंदर दासी ... मी कधी कल्पनाही न केलेली सर्व सुखे माझ्या वाट्याला येत होती. लवकरच मला तिथले ते सुखासीन जीवन आवडू लागले, आणि माझ्या पूर्वीच्या खडतर जीवनाचा विसर पडू लागला.

परंतु हळूहळू मला त्यांच्या स्वभावाची कल्पना येऊ लागली. ते सर्व भाऊ खुशालचेंडू, बेजबाबदार, आणि निर्लज्ज होते. कुणी सुंदर युवती दिसली की ते तिच्या मागे लागत, आणि हर प्रयत्नाने तिला हस्तगत करण्याचा प्रयत्न करत. माझ्याकडे असलेल्या 'मदनबाणां'बद्दल त्यांना समजले तेंव्हा त्यांनी मला त्याचा प्रयोग करून दाखवण्यासाठी गळ घातली, मला नाइलाजाने त्यांचे ऐकावे लागले. एकदा एका उद्यानात फिरणार्‍या काही सुंदर तरुणींच्या नकळत मी त्यांच्यावर मदनबाण सोडले. ते लागताच त्या कामविव्हल होऊन सैरभैर झाल्या. मग काय, त्या बलदंडांनी लगेच त्यांची उचलबांगडी करून आपल्या वाड्यात नेले. आता तर त्यांना मोकळे रानच मिळाले. मला जिवाचा धाक दाखवून माझ्याकडून ते वारंवार मदनबाणांचा प्रयोग करून घेऊ लागले. मला नाहीही म्हणता येत नव्हते, कारण कोणत्याही परिस्थितीत इथे टिकूनच रहायला नारद मुनींनी मला सांगितलेले होते. मग तर त्या सहा भावांनी गावोगावी जाऊन तरूण स्त्रियांना उचलून आणण्याचा सपाटाच लावला.


स्त्रियांचे अपहरण: १६२७-२८. चित्रकार: Pietro da Cortona (1596 – 1669)

अशी काही वर्षे गेली. नारदमुनी इकडे पुन्हा केंव्हा येतात, आणि मी त्यांना हा सगळा प्रकार सांगतो, असे मला झाले होते.

माझ्या सेवेसाठी ज्या दासी दिलेल्या होत्या, त्यातील 'शुभांगी' ही फार विचारी आणि सुस्वभावी होती. तिने मला सांगितले, की ती एका लहानश्या राज्याची राजकन्या होती, आणि तिला त्या सहा भावांनी जबरदस्तीने इथे आणून दासी बनवलेले होते. तिच्या सुरक्षेसाठी आणि खर्चासाठी नरकासुर तिच्या वडिलांकडून मोठी खंडणी घेत असे, आणि खंडणी नियमितपणे दिली नाही, तर मुलीला हालहाल करून ठार करण्याची धमकी देत असे. अश्या अनेक राजांच्या, सावकारांच्या हजारो मुली, सुना तिथे बंदीवासात होत्या, आणि त्यांच्याद्वारे विपुल संपत्तीचा ओघ नरकासुराकडे वाहत होता. कुबेरापेक्षाही जास्त संपत्ती नरकासुराकडे एकवटली होती.

हे सर्व ऐकून मला फार खेद झाला, आणि या नीच कर्मात नाइलाजाने का होईना, आपणही सहभागी होत आहोत याची फार शरम वाटली. परंतु लवकरच मला यावर एक तात्पुरता तोडगा सापडला. माझ्याकडे असलेली गुंगीची 'द्रुग' औषधी त्या साही जणांना त्यांच्या नकळत मद्यातून काही दिवस मी दिली. त्या औषधीचे त्यांना लवकरच भयंकर व्यसन लागले, आणि त्याशिवाय क्षणभरही त्यांना चैन पडेनासे झाले. मीही त्यांना सदैव गुंगीत ठेऊन निदान त्यांच्या नित्य नव्या स्त्रिया उचलून आणण्याच्या खटाटोपास खीळ घातली.

पुढे नारदमुनी आल्याबरोबर त्यांना एकंदरित सर्व परिस्थिती कथन केली, तेंव्हा ते फार चिंतित झाले, आणि यावर तात्काळ काहीतरी उपाय केला पाहिजे, असे म्हणून तातडीने द्वारकेला गेले. मग थोड्याच दिवसात मुनी परत आले. त्यांनी इकडले सर्व वर्तमान द्वारकेला जाऊन श्रीकृष्ण आणि सत्यभामेला सांगितले होते. ते ऐकून सत्यभामेला त्या सर्व अभागी स्त्रियांबद्दल पराकाष्ठेची काकळूत येऊन त्या उभयतांनी स्वत: तिकडे जायचे, आणि त्या दुष्ट नरकासुराचे आणि अन्य सर्व पापी चांडाळांचे पारिपत्य करून त्या दुर्दैवी स्त्रियांना मुक्त करायचे, असे ठरवले. कृष्णाचा बेत सैन्यासह मोठी स्वारी करण्याचा नसून गुप्तपणे येऊन तडकाफडकी निवडक लोकांचा वध करण्याचा होता.

अश्विन कृष्ण चतुर्दशीला श्रीकृष्ण आणि सत्यभामा इकडे येतील, त्यापूवी मी काय काय करायचे हे नारदांनी मला समजावून सांगितले. त्याप्रमाणे पुढले आठ-दहा दिवस मी तटबंदीवरील पहारेकर्‍यांमधे मिळून मिसळून वागणे, औषधे देऊन त्यांच्या समस्यांचे निराकारण करणे, त्यांच्या मुला-बाळांची चवकशी करणे वगैरेंनी त्यांना आपलेसे केले. खरेतर ते बिचारे पोटासाठी, नरकासुराच्या धाकाने नोकरी करत होते. मी हळूहळू त्यांना समजावले, की नरकासुराचे केलेले हजारो स्त्रियांचे अपहरण आणि अत्याचार यामुळे देवांनी आता त्याला शासन करण्याचे ठरवले असून सर्व सहायकांसह आता त्याचा नाश होणार आहे, तरी या प्रसंगी त्यांनी देवांना मदत केली, तर त्यांना अभय मिळेल. यावर त्या सर्वांना नरकासुराच्या जाचातून सुटका होणार, याचा आनंदच झाला, आणि त्यांनी मी सांगेन त्याप्रमाणे करण्याचे वचन दिले.

नरकासुराचा मुलगा भगदत्त हा चांगल्या स्वभावाचा होता, त्याला आपल्या पित्याचा निर्दय, अत्याचारी स्वभाव आणि त्याने मुरासुराच्या दुष्ट मुलांना देऊन ठेवलेली सूट हे काहीच आवडत नसे. भगदत्ताकडेही मी याविषयी सुतोवाच करून ठेवले.

ठरलेला दिवस उजाडला. मी नेहमीप्रमाणे मुरासुराच्या मुलांना गुंगीचे औषध देऊन ठेवले. नरकासुर आणि मुरासुर रात्री कुठे असतील याची माहिती घेऊन ठेवली. पहारेकर्‍यांशी आधीच संगनमत झालेले असल्याने कृष्ण-सत्यभामेला मी सहजच नरकासुराच्या प्रासादापर्यंत घेऊन गेलो.

आधी मी त्यांना मुराच्या सहा मुलांकडे घेऊन गेलो. औषधीचा अंमल आता उतरलेला होता. अचानक समोर आलेल्या कृष्णाला बघून ते चकितच झाले. मी त्यांना मोठ्याने ओरडून सांगितले, "दुष्टांनो, आजवर तुम्ही हजारो स्त्रियांवर जे अत्याचार केले, भोगा आता त्यांचे फळ". तेवढ्यात कृष्णाने लांब साखळीस बांधलेले ‘सुदर्शन’ नामक खड्ग अतिशय वेगाने गरगर चक्राकार फिरवून बघता बघता त्या साही जणांचा शिरच्छेद केला. नरकासुर आणि त्याची चांडाळचौकडी मद्यधुंद होऊन द्यूत खेळत बसली होती. कृष्णाने त्या सर्वांचाही शिरच्छेद केला. भगदत्तास अभय देऊन त्याला राजगादीवर बसवले. नरकासुराच्या अत्याचारांनी त्रस्त प्रजेने तर हा दिवस आनंदाचा सण म्हणून साजरा केला.

शुभांगीच्या मदतीने बंदिवासातील सर्व स्त्रियांना हुडकून त्यांना धीर दिला, आणि यापुढे तुमचा छळ होणार नाही, तुम्ही आपापल्या घरी खुशाल जावे, असे सांगितले. त्यांची मोजदाद करता त्या एकूण सोळा हजार एकशे आठ भरल्या. त्यापैकी कित्येकांना असुरांपासून झालेली मुलेही होती.

प्राग्ज्योतिषपूर शहरात आणि अन्य गावांत नरकासुराचा वध, भगदत्ताचे राज्य आणि बंदिवासातील स्त्रियांची सुटका, याबद्दल दवंडी पिटवून माहिती देण्यात आली आणि त्या स्त्रियांच्या कुटुंबियांनी येऊन त्यांना घेऊन जावे असे सांगण्यात आले. खंडणी देणार्‍या राजांना 'आता खंडणी पाठवू नये, मात्र आपापल्या स्त्रियांना घेऊन जावे' असे कळवण्यात आले. परंतु त्यापैकी कोणीही त्या स्त्रियांना घेण्यासाठी आले नाहीत. खुद्द प्राग्ज्योतिषपूर शहरातील ज्या स्त्रिया स्वत: घरी गेल्या, त्यांचा स्वीकार त्यांच्या कुटुंबियांनी केला नाही. 'पुन्हा आलात तर जीवे मारू' असे सांगून परत पाठवले.

त्या परत आलेल्या स्त्रियांनी जोरजोरात आक्रोश करणे चालू केले, त्यांचे बघून अन्य हजारो स्त्रियाही गळे काढून रडू लागल्या. एकच हल्लकल्लोळ माजला. अवघे शहर त्या आर्त रुदनाने दुमदुमले. कुत्री गळा काढून रडू लागली, गर्दभे ओरडू लागली, कावळे कर्कश्य कावकाव करू लागले... काय झाले, हे बघायला हजारो लोक प्रासादाभोवती जमले. मोठाच पेचप्रसंग उभा राहिला. आता एवढ्या हजारो स्त्रियांचा प्रतिपाळ कोण करणार? त्यांचा खर्च कसा चालवणार? त्यांना संरक्षण कोण देणार? नरकासुराच्या भीतीने जी खंडणी येत होती, ती आता बंद झाल्याने भगदत्तास हा खर्च झेपणे शक्यच नव्हते. त्याने कृष्णास विनंती केली, की या सर्व स्त्रियांची सुटका केली आहे, तर आता त्यांच्या योगक्षेमाची व्यवस्थाही त्यानेच करावी. फारतर त्यांना अन्यत्र पोहोचेपर्यंत लागणारी शिधासामुग्री आणि काही शिबंदीची व्यवस्था करण्याची त्याची तयारी होती.

कृष्ण विचारात पडला, सत्यभामेचे तोंड उतरले. मारे स्त्रियांची काकळूत येऊन त्यांची सुटका केली, मोठा पराक्रम गाजवला, आता धर्मसंकट उभे राहिले. नारदमुनी आलेले होते, त्यांचीही मती गुंग झाली, नारायण नारायण … करत ते येरझार्‍या घालू लागले.

नरकासुराचा वध करून, स्त्रियांची सुटका करून लगोलग आपण द्वारकेस परतू, बाकी भगदत्त बघून घेईल, असे कृष्ण-सत्यभामेला वाटले होते, पण आता वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागत होते.

या गोष्टीची कुणकुण बाहेर रडणार्‍या काही स्त्रियांना लागली. त्यामुळे तर गहजबच झाला. आता आपला वाली कुणीच नाही, त्यापेक्षा बंदीत का होईना, दोन वेळी पोटाला मिळत होते, डोईवर छत होते... त्यातील काही स्त्रिया तर वर्षानुवर्षे त्या जीवनास रुळल्या होत्या, त्यांना मुले-बाळे देखील झालेली होती, त्या अगदी भांबावून गेल्या, आणि कुठून ही सुटका झाली, आता अरत्र ना परत्र... असे त्यांना वाटून त्यांनी आणखीनच हंबरडा फोडला.

... शेवटी नाइलाजाने कृष्णाला त्यांची जबाबदारी स्वीकारणे भाग पडले. एवढ्या हजारो स्त्रियांना आणि त्यांच्या मुलांना घेऊन द्वारकेपर्यंतचे शेकडो योजने अंतर कसे पार करणार? एवढा मोठा जथा पायी चालून जाणार म्हणजे किती दिवस लागतील? वाटेत रानटी पशु किंवा रानटी लोकांच्या टोळ्या यांच्यापासून संरक्षण कसे करायचे ? एवढ्या सर्वांच्या रात्रीच्या मुक्कामाची, जेवणाखाणाची, अंथरूण-पांघरुणाची कशी काय सोय करणार? त्यात थंडीचे दिवस. दिवस छोटे आणी रात्री मोठ्या. शेकोटीसाठी, स्वयंपाकासाठी वाळकी लाकडे हवीत, ती कशी मिळवायची ? एवढ्या स्त्रिया, त्यांची आपापसात भांडणे झाल्यास, त्या आजारी पडल्यास वा कुणाला पायी चालणे अशक्य झाल्यास काय करायचे ? सगळेच प्रश्न होते.

दुसरे म्हणजे कसेबसे द्वारकेपर्यंत पोहोचले, तरी तिकडे त्यांची राहण्याची सोय कशी, कुठे करणार? त्यांचा खर्च कोण चालवणार? मुळात अन्य यादव त्यांना द्वारकेत येऊ तरी देतील की नाही? त्यातल्या तरूण, सुंदर स्त्रियांवर खुद्द यादवच कश्यावरून जबरदस्ती करणार नाहीत? या सर्व विचारांनी कृष्णाची मुळातच सावळी चर्या आणखीनच काळवंडली. सत्यभामेला तर कुठून आपण या फंदात पडलो असे झाले.

द्वारकेत येवढ्या स्त्रियांची रहाण्याची सोय करण्यासाठी हजारो घरे, निदान झोपड्यातरी बनवणे भाग होते. त्या झोपड्यांमध्ये सरपण, दाणापाणी भरून ठेवणेही आवश्यक होते. मुख्य म्हणजे आधी बलराम आणि अन्य यादव प्रमुखांची समजूत पटवणे अत्यावश्यक होते. हे सर्व करण्यासाठी, कृष्ण-सत्यभामा त्यांच्या ‘गरुड’ नामक विमानातून पुढे रवाना झाले, आणि त्या स्त्रियांना सुखरूप द्वारकेस आणण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. मी वनौऔषधी जाणणारा एक वैदु. या प्रकारचा कोणताच अनुभव नसूनही ही जबाबदारी घेणे मला भागच पडले.

****

कितीतरी वर्षे उलटलीत आता या गोष्टीला. हजारो स्त्रियांचा तांडा बरोबर घेऊन मी कसा द्वारकेपर्यंत पोहोचलो, वाटेत काय काय सोसावे लागले, माझी कशी ससेहोलपट झाली, माझे मलाच ठाऊक.

आता हाच प्रसंग अर्जुनावर ओढवलेला आहे. तो त्या स्त्रियांना घेऊन पुन्हा द्वारकेहून हस्तिनापुराकडे चाललेला आहे, वाटेत कुणी ‘अभीरमन्यु’ नावाच्या अभीराने त्याला पराभूत आणि अपमानित केले, वगैरे कालच नारद मुनींनी सांगितले, त्यावरून पूर्वीचे सगळे आठवले.

मात्र मला ही सर्व कामगिरी यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल देवलोकाचा कायमचा विसाचा ताईत, आणि अश्विनीकुमारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. कमलनयनेशी विवाह करून देवलोकात मी आता सुखाने रहात आहे.

(समाप्त)

*************************************************************************

अर्जुन, अभीरमन्यु, तस्युनामी वादळ वगैरेंबद्दल जे उल्लेख वर आलेले आहेत, त्याविषयी वाचा:

सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय'

http://www.misalpav.com/node/25328

दिवाळी अंक २०१३

प्रतिक्रिया

प्रसाद प्रसाद's picture

1 Nov 2013 - 2:01 pm | प्रसाद प्रसाद

लेख चांगला लिहिला आहे. चित्रे पण एकदम छान.

कथा आवडलीच. तदुपरि विसा ताईत, आप-वाह-द्रुत, अगस्त्य ऋषींचा वंशज आगस्त्युस, इ.इ. जास्त आवडले. मस्त शैली आहे चित्रगुप्तांची खरेच! नाटकातले पदही तसेच चपखल. सौभद्रातले आहे काय?

चित्रगुप्त's picture

1 Nov 2013 - 4:08 pm | चित्रगुप्त

होय, सौभद्रातले पद आहे. यापेक्षा चांगला व्हिडियो हवा होता, पण मिळाला नाही.

चित्रगुप्त's picture

1 Nov 2013 - 4:23 pm | चित्रगुप्त

होय, सौभद्रातले पद आहे. यापेक्षा चांगला व्हिडियो हवा होता, पण मिळाला नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Nov 2013 - 11:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

यासारख्या कथांचा तुमचा हातखंडा झाला आहे ! विसाताईत आम्हलापण मिळेल का? गेलाबाजार मरण्याअगोदर एकदा स्वर्गाचीपण सहल करून यावी म्हणतो :)

कानडाऊ योगेशु's picture

3 Nov 2013 - 11:17 pm | कानडाऊ योगेशु

गेलाबाजार मरण्याअगोदर एकदा स्वर्गाचीपण सहल करून यावी म्हणतो

तसे झाले तर नेहेमीप्रमाणे मि.पावर तुमच्याकडुन एक फक्कड सचित्र प्रवासवर्णनही येऊ द्या. आम्हालाही घरबसल्या स्वर्गाची सहल करता येईल.!
दिवाळीच्या सुभेच्छा!

पैसा's picture

2 Nov 2013 - 8:17 am | पैसा

आणि चित्रांचा वापर नेहमीप्रमाणेच अगदी कल्पक!

चौकटराजा's picture

2 Nov 2013 - 5:41 pm | चौकटराजा

चित्रे फारच मस्त आहेत.अगस्त्य मुनी " तिकडे " ही गेले होते तर ! हं त्याना काय म्हणा ! म्हटला मंत्र ...झूम्म्म्म्म्म्म्म !

चित्रगुप्त's picture

2 Nov 2013 - 6:03 pm | चित्रगुप्त

अगस्त्य मुनी " तिकडे " ही गेले होते तर !

'अगस्त्य मुनी' वरून सुचले, की अगस्त्यांना 'ऋषि' तर नारदांना 'मुनि' असे का म्हटले जाते? ऋषि व मुनि मधे काय फरक आहे, या दोन संस्कृत शब्दांचा काय काय अर्थ आहे?

चौकटराजा's picture

3 Nov 2013 - 10:46 am | चौकटराजा

फक्त भाजप वाले म्हणजे मुनि व भाजप व संघ दोन्ही वाले म्हणजे ॠषि !

शशिकांत ओक's picture

3 Nov 2013 - 6:35 pm | शशिकांत ओक

चित्रगुप्त,
आपल्या नेहमीच्या सहजहस्त लेखणीचा आणखी एक अविष्कार. विशेषतः दिवाळी अंकाचे महत्वाचे आकर्षण.
सर्व संचारी नारदांच्या निमित्ताने चित्रकला दालनाची वैश्विक सफर, वैदिक वाङ्मयातील कथा व पात्रांची रेलचेल व नाट्यसंगीतातून गानक्रीडेची मेजवानी असा त्रिपेडी पेढा मिपा दिवाळीच्या फराळाचे महत्वाचे आकर्षण आहे.
आपण मुनि व ऋषी यातील भेद शोधायचे काम आमच्या सारख्यांच्या हाती दिल्याने आता नारद मुनींकडे दाद मागावी कि अगस्त्य मुनींना शरण जावे असा पेच पडलाय.
अगस्त्य

मुक्त विहारि's picture

3 Nov 2013 - 7:59 pm | मुक्त विहारि

आवडला..

चित्रे फार सुंदर आहेत.

शेवटपर्यंत खेचत जाणारा लेख

अमोल मेंढे's picture

30 Nov 2013 - 3:39 pm | अमोल मेंढे

मग श्रीकृष्णाला राण्या किती होत्या?

त्यांची मोजदाद करता त्या एकूण सोळा हजार एकशे आठ भरल्या.
चित्रगुप्त's picture

28 Oct 2016 - 9:45 pm | चित्रगुप्त

नवीन मिपाकरांसाठी नरकचतुर्दशीच्या निमित्ताने पुन्हा एकदा २०१३ चा हा लेख वर आणत आहे.

या कथेतील सुरुवातीचे सन्दर्भ "द्वारकानगरीची 'तस्युनामी' वादळामुळे वाताहात ... यादव-स्त्रियांना घेऊन जाणारा अर्जुन अभीरांकडून पराजित, अपमानित होणे .... यासाठी खालील दुवा:
http://misalpav.com/node/25328