Skip to main content

मिपा संपादकीय! - घटं भिंद्यात, पटं छिंद्यात...

लेखक श्रीपाद_कुलकर्णी यांनी सोमवार, 26/01/2009 08:38 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा व्यवस्थापन 'मिपा संपादकीय' हे सदर लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करत आहे. यापूर्वीचे संपादकीय लेखन येथे वाचावयास मिळेल! धन्यवाद... बे एरिया मध्ये महाराष्ट्र मंडळाने येत्या फेब्रुवारी मध्ये पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन करण्याचे ठरवले आहे. त्या बाबत बरीचशी जाहिरातबाजी, स्वतःची पाठ थोपटून घेणे हे प्रकार सुरु झाले आहेत. परंतू या संमेलना मागचा हेतू काय? त्याने नेमक्या कोणत्या गोष्टी साध्य होणार आहेत? आणि हे सर्व करताना कोणाची पोळी भाजून घेतली जाणार आहे? हे आणि असे अनेक प्रश्न बे एरियातील असंख्य मराठी लोकांना पडले आहेत. मुळात हे संमेलन भरवताना जे मुद्दे लपवले गेलेत अथवा खोट्या पध्दतीने सांगीतले गेलेत त्याचे कारण काय? ही धुळफेक करण्याचे प्रयोजन काय? बे एरिया महाराष्ट्र मंडळ किती खोटे बोलते आहे हे लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून हा प्रयत्न. १. मंडळाने असा दावा केला आहे कि त्यांचे २००० सदस्य आहेत: नक्की? मुळीच नाही. मंडळाची सदस्य संख्या २५० च्या वर नक्कीच नाही. मंडळ हे अमेरिकेत ना-नफा (नॉन प्रॉफिट) तत्वावर चालणारी संस्था आहे. ह्या संस्थेच्या साठी असणार्‍या मार्गदर्शक तत्वानुसार मंडळाच्या सदस्यांची संख्या आणि नावे सर्वांना खुली असली पाहिजेत. मंडळ ही यादी प्रसिध्द करू शकते का? त्याच प्रमाणे कॅलिफोर्निया नॉन प्रॉफिट गव्हर्निंग बॉडी कडे याची यादी द्यावी लागते. ती तशी दिली आहे का? त्याच नियमानुसार नॉन प्रॉफिट संस्थेने दरवर्षी अहवाल प्रसिध्द करणे आणि तो सगळ्या सदस्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. मंडळाने गेली कित्येक वर्षे अहवालच प्रसिध्द केला नाही. का? कारण मंडळाच्या कार्यक्रमांना भरगोस(?) प्रतिसाद मिळाला असा तद्दन खोटारडेपणा आणि मागल्या दाराने केलेले व्यवहार उजेडात येतील ना!! 2. मंडळाचा असा दावा आहे कि मंडळ असे मोठे कार्यक्रम करू शकते आणि असे कार्यक्रम करण्यासाठी लागणारे कौशल्य, पैसा आणि मनुष्यबळ मंडळाकडे आहे. आता हे कसे फसवे आहे हे आपण बघूया: - मंडळाचे बहुतांशी कार्यक्रम तोट्यात जातात. - मंडळाचा एप्रिलमध्ये होणारा चैत्रधुन हा कार्यक्रम २००० सालापासून सदैव नफ्यात व्हायचा. २००७ आणि २००८ या दोन्ही वर्षी हा कार्यक्रम १००० डॉलर तोट्यात का आहे? - मंडळाच्या इतिहासात नाटक हे सदैव दुभती गाय होती. २००५ साली मंडळाला ३५०० डॉलर्स इतका निव्वळ फायदा नाटकामुळे झाला. असे असताना २००७ साली झालेल्या नाटकात ५०० डॉलर्स तोटा आणि २००८ साली केलेल्या सुयोगच्या नाटकांना पण प्रचंड तोटा सहन का करावा लागला? सुयोगची नाटके झालीत त्याची तिकीटविक्री होती अवघी १२५. सभागॄहाची क्षमता ४५०. म्हणजे फक्त १/४ सभागॄह फक्त भरले होते. लोकांनी दिलेला हा भरगोस(?) प्रतिसाद बघून मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव सभागॄहाकडे फिरकलेसुध्दा नाहीत. सुयोगचे कलाकार त्यादिवशी मंडळावर भयंकर उखडले होते हे मी प्रत्यक्ष पाहिले आहे. 3. इतर कार्यक्रम अंदाजे २००० डॉलर्सचा तोटा. का? कारण कुठल्याही कार्यक्रमांना लोकंच येत नाहीत. मंडळाने २००७-०८ मध्ये जे ठळक कार्यक्रम केलेत त्याला उपस्थित असलेल्या संख्याच पुरेशी बोलकी आहे. बे एरियात जर १००० मराठी कुटुंबे रहातात तर ही संख्या एव्हढी कमी कशी आणि का? - २००७ नाटक - १३० - २००७ चैत्रधून - १७० - २००८ सुयोग नाट्यमहोत्सव १२५ - २००८ चैत्रधून - १०० - २००८ मराठी सिनेमा (वासूदेव बळवंत फडके) - ५५ 4. मंडळाने साहित्य संमेलन भरवताना स्थानिक लोकांना विश्वासात घेतले होते का? नाही. या बातम्या वर्तमानपत्रातुन कळल्या. जर कार्यक्रम स्थानिक लोकांसाठी आणि त्यांच्या जिवावर करायचा तर त्यांना सांगायला देखील नको? परस्पर घाई घाईत मंडळाकडून १००० डॉलर्स महामंडळाला पाठवायचे. महामंडळानेही त्वरेने त्यांना सदस्य म्हणून मान्यता द्यायची आणि महाराष्ट्रातील इतर संस्थांच्या तोंडाला पाने पुसायची, यात कोणालाच काही काळेबेरे दिसत नाही? ही घाई आणि लपवाछपवी कशासाठी? मग यात मंडळाचे किंवा साहित्यपरिषदेचे काही आर्थिक हितसंबंध तर गुंतले नाहीत ना? अशीच शंका येते. ५. लपवाछपवीचे आणखी एक उदारहण म्हणजे, मंडळाला नक्की किती वर्षे झालीत? मंडळाला २५ वर्षे झालीत मग मंडळाच्याच संकेत स्थळावर १९६९ साली झालेल्या सहलीचे छायाचित्र (सौजन्यः सौ. अलका करंदीकर) दिसते आहे. तसेच मंडळाने प्रसिध्द केलेल्या 'स्पंदन' या वार्षीक अंकात देखील याचा उल्लेख आहे. (या 'स्पंदन' अंकासाठी सौ. कर्‍हाडे यांनी प्रचंड मेहनत घेतली पण मंडळाने अंकातील साहित्य टाईपसेटर कडुन परस्पर पळवून छापला आणि त्यावर संपादक म्हणून सौ. कर्‍हाडे यांचे नाव न टाकता कोणातरी भलत्याच माणसाचे नाव संपादक म्हणून छापले. का? तर सौ. कर्‍हाडे यांनी मंडळातील गैरकारभार उजेडात आणण्याचा गुन्हा केला म्हणून.) आणि त्याच पानावर 'MMBA’s 25th Year Celebration!!!' असेही लिहिले आहे. काय खरे मानायचे? हे काय गौडबंगाल आहे? २५ वर्षे नक्की कशाची पुर्ण झालीत? या बाबत अधिक संशोधन केले असता मंडळाने घुमजाव करून उत्तर दिले कि मंडळाची घटना लिहून २५ वर्षे झालीत म्हणून हे रौप्यमहोत्सवी वर्ष. हरकत नाही भारत नाही का १९४७ साली स्वतंत्र झाला आणि घटना १९५० साली अस्तित्वात आली? पण मग ही माहीती स्पष्ट शब्दात आधीच का नाही सांगता आली? ही धुळफेक का? हा संदिग्धपणा काय साधण्यासाठी केला जातो आहे? आज या घटनेला २५ वर्षे झालीत म्हणून हा खटाटोप चालला आहे त्याच घटनेला काळीमा फासणारी कॄत्ये मंडळाने गेली दोन वर्षे केलीत त्याचे काय? मंडळाच्या कार्यकारणीतील काही लोकांनी तर 'आम्ही ही घटना-बिटना ओळखत नाही' अशी मुक्ताफळे उधळली होती. आणि या मनमानी कारभाराचा जाब विचारायला गेलेल्या श्री. डॉ. भिवंडकर यांचे सदस्यत्वच मंडळाने रद्द केले. हे डॉ. भिवंडकर म्हणजे मंडळाचे संस्थापक. काय गंमत आहे पहा, आपला स्वार्थ साधण्यासाठी, मनमानी कारभार करण्यासाठी आणि लपवाछपवी साधण्यासाठी, संस्थेच्या संस्थापकालाच हाकलून देण्यापर्यंत मंडळाच्या कार्यकारीणीची मजल जाते. या आणि अशा अनेक सुरस कथांनी भरलेला इतिहास आहे या मंडळाचा. मग ही मनमानी करण्यासाठीच का ही २५ वर्षाची सबब? 6. मंडळ बे एरियात ग्रंथालय चालवते असे म्हणतात, मला तर ते कधी रांगताना देखील दिसले नाही. किती नियमीत वाचक आहेत मंडळाच्या ग्रंथालयाचे? २०-२५. मंडळ त्या पुस्तकांमध्ये दरसाली किती भर घालतं? शुन्य. मंडळाच्या कार्यकारीणीपैकी किती लोक ही पुस्तकं वाचतात? यु-ट्युबवरती मुलाखत बघीतल्यावर मनात आलेला आकडा, शुन्य. बाकी काही म्हणा भारतीयांनीच लावलेला शुन्याचा शोध हा फारच उपयुक्त शोध आहे. यु-ट्युब वरती मंडळाच्या प्रतिनिधींनी 'आमच्या लायब्ररीमध्ये ५०० पुस्तके आहेत' (अरे चुकलो! खरं म्हणजे 'बुक्स' म्हणायला हवं नाही का? कारण यु-ट्युब वर तर त्यांनी असेच म्हटले आहे.) अशा प्रकारचे निवेदन केले आहे. मंडळाच्याच संकेतस्थळावर मात्र फार तर २३६ पुस्तकांची यादी दिलेली आहे. ही त्या संबधीची लिंकः http://www.mmbayarea.org/main/library.htm म्हणजे एकतर मंडळ या बाबतीतही दिशाभूल करते आहे किंवा मंडळाच्या ग्रंथालयात जर खरेच ५०० पुस्तके असतील तर त्यांची सुची करण्या इतपत देखील त्यांना आस्था नाही. आणि मग असे अचानक मंडळाचे मराठीवरचे प्रेम एकाएकी का उतू जाते आहे? या कार्यकारीणी पैकी कोणी साहित्तिक आहे? नाही. कोणी साहित्य, कला, नाटक, संगीत याच्यासाठी काही केले आहे? नाही. यांच्यापैकी कोणी साहित्यसंमेलनाला तरी गेले आहे? नाही. यांच्यापैकी कोणी मराठी साहित्य नियमीत वाचतो? यु-ट्युब वरच्या यांच्या मुलाखती बघून तर ही मंडळी मराठी बोलतात तरी का अशीच शंका येते. मग का? याचे उत्तर मला तरी एकच दिसते 'प्रसिध्दी'. एक वचन आहे: घटं भिंद्यात, पटं छिंद्यात, कुर्यातरासभरोहणं, येनकेनप्रकारेण, प्रसिध्द: पुरुषो भवेत। याचाच प्रत्यय येतो आहे. 7. जुलै महिन्यात मंडळाने 'मैत्र' संमेलन सॅन फ्रन्सिस्को येथे आयोजीत केले होते. भयंकर गर्दी झाली होती (म्हणे)!! १७५-२०० लोकं आली होती, आख्ख्या अमेरिकेतून!!! म्हणजे ५० राज्यातून २००, तर प्रत्येक राज्यातून ४!!!! साहित्य संमेलानाची गत याहून वेगळी असण्याचे कारण नाही. आणि त्या साठी ३ लाख डॉलर्स इतका खर्च! का? 8. वर्तमानपत्रात दिलेल्या प्रसिध्दीवरुन असे लक्षात येते कि या संमेलनाला भारतातून लोक आणण्याचा प्रयत्न चालला आहे. राजा-राणी ट्रॅवल्स याच्या साठी पॅकेज देते आहे. तुमचे आई-वडिल, भाऊ-बहिण, काका-मामा यांना संमेलनाला अमेरिकेत बोलवा असा प्रचार चालू आहे. थोडक्यात म्हणजे इथे संमेलनाच्या नावाखाली अमेरिकेत पिकनिक करायला या (जमल्यास तुमच्या मुलीचे/सुनेचे बाळंतपण सुध्दा उरकून घ्या, तेव्हढेच पॅकेजमुळे जरा स्वस्त पडेल. नशीब पॅकेजच्या नावावर मुलाला/मुलीला कळवायला सांगीतले नाही कि यंदा येतोच आहोत तेव्हा बाळंतपणाचे मनावर घ्यावे इ. इ. इ.). तुमचा साहित्याशी (अथवा संमेलनाशी) काही देणे-घेणे असो किंवा नसो. (नशीब संमेलनाला येणार्‍या प्रत्येकाला एक विदेशी मद्याची बाटली मोफत भेट म्हणून देत नाहीयेत. नाही तर महाराष्ट्रात निवडणुकीच्या वेळेला जसे ट्रक भरून माणसं आणतात आणि जय-जय ओरडायला ५० रू., मोर्च्यात नाचायला २०० रु आणि मतदानाला जाण्यासाठी एक मोसंबी-नारंगीची बाटली देतात तसलाच प्रकार केला असता.). हे असेच पॅकेज राजा-राणी ट्रॅवल्सने या पुर्वी महा इतर राष्ट्रातल्या संमेलनाला दिल्याचे कधी स्मरत नाही. मग यंदाच का? कि 'आर्थिक (गैर?) व्यवहार' हेच या मागचे कारण आहे? संमेलन वगैरे सोडा हो! त्याचा आमच्या ट्रॅवल्सशी काय संबध? 9. या यात्रेत किती फुकट्यांची वर्णी लागणार आहे? नक्की साहित्तिक किती? नुसतेच फुकटात हिंडायला मिळते म्हणून येणारी पदाधीकारी किती? ज्यांचा साहित्याशी कसलाही संबंध नाही असे राजकारणी किती? आणि यांचा खर्च नेमका कोण करणार? कि तो भुर्दंड सामान्य सदस्य, जो स्वतःचा वेळ आणि पैसा मोजून जाणार त्याच्याच खिशातून उपटणार? एकंदर अपेक्षीत खर्च आहे 1.5 लाख डॉलर्स. हा खर्च करण्यापेक्षा मंडळाचेच लोकं महाराष्ट्रात संमेलनाला का नाही जात? तिकडून येणार्‍या लोकांना पॅकेज देण्यापेक्षा इथून संमेलनाला जावू इच्छीणार्‍या लोकांनाच का नाही प्रोत्साहन देत? वाटल्यास ह्या पैशातून महाराष्ट्रातच एखादा प्रकल्प का नाही चालू करत? हे विधायक काम संमेलन भरवण्यापेक्षा चांगले नाही का? आणि या सगळ्यांमुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस संमेलनाला मुकणार नाही का? एव्हढेच नाही तर दरसाली पुस्तकांची कोट्यावधींची उलाढाल होते, ते प्रकाशकांचे नुकसान कोण भरून देणार? मराठी भाषेच्या कल्याणाच्या गोष्टी करायच्या पण आपल्याच मराठी लोकांना खड्ड्यात घालायचे, 'अस्सल मराठी बाणा' दुसरे काय? 10. आणखी एक गोष्ट मंडळ सांगते आहे कि संमेलनाला बर्कले-स्टॅनफर्ड यांचे प्राध्यापक वगैरे येतील आणि या विश्वविद्यालयातून मराठी शिकवायला प्रोत्साहन मिळेल. स्टॅनफर्ड मध्ये १८ भाषा शिकवल्या जातात. त्यात हिंदी, पंजाबी आणि संस्कॄत या भारतीय भाषांचा समावेश आहे. तेलगू, तामिळ, गुजराथी, मल्याळी यांची संख्या मराठी लोकांपेक्षा जास्त असून त्या भाषा शिकवल्या जात नाहीत तर मराठी का शिकवतील? आणि त्यांनी असे प्रयत्नही केलेत. मग जर ह्या भाषा या विश्वविद्यालयांनी शिकवायला सुरू नाही केल्यात तर मराठीच का करतील? बरं असे किती प्राध्यापक संमेलनाला येणार आहेत? आणि संमेलनाला आल्याबरोबर मराठीचा उदोउदो सुरू करतील अशी अपेक्षा करणेच मुर्खपणाचे नाही का? ११. या संमेलानाला ज्या-ज्या व्यक्तींनी विरोध केला त्या त्या प्रत्येकाला मंडळाने त्रास द्यायचा भरपूर प्रयत्न केला. का तर त्यांनी "हे साहित्य संमेलन आहे डोंबार्‍याचा खेळ नाही" हे सांगण्याचा प्रयत्न केला म्हणून? काही लोकांच्या विरोधात मंडळाने अमेरिकन सरकारकडे त्यांचा व्हिसा रद्द करा अशा प्रकारची पत्रेही पाठवलीत. खरे तर मंडळाने इथे स्थायीक झालेल्या (वा होवू इच्छीणार्‍या) व्यक्तीला मदत केली पाहीजे नाही का? मग हे कॄत्य कशासाठी? आपल्याला हवे तसे नाचायला आक्षेप घेणार्‍या लोकांना फक्त त्रास देण्यासाठी? 12. सुरुवातीला '२५०० लोकांची उत्साहवर्धक उपस्थीती' असे जाहीर करण्यात येत होते, त्यावेळेस बुकिंग जवळ्पास शुन्य होते. आता परिस्थीतीची जाण आल्यावर कार्यक्रमाची जागा बदलली ज्यात फक्त ७०० लोकांची सोय होवू शकते. त्यात देखील ३००-४०० लोक भारतातून येणार आहेत, जर व्हिसा मिळाला तर. म्हणजे फक्त ३०० लोक सबंध अमेरिकेतुन हजर रहाणार. त्यातही संमेलनात भाग घेणार्‍या कलाकारांनाही तिकीट घेणं अनिवार्य केले आहे. म्हणजे एव्हढा आटापिटा करुन फक्त २०० च्या दरम्यान लोक येणार. काय काही गणीत जमतय का? 13. या संबध कार्यक्रमात साहित्या विषयक कार्यक्रम किती आहेत? अंकुष चौधरी, र्‍हुदयनाथ मंगेशकर, प्रशांत दामले, भरत जाधव, यांना साहित्तीक दर्जा देवून काय साध्य करायचे आहे? कि साहित्य संमेलनाच्या नावावर नाच-गाणी आणि गल्लाभरु कार्यक्रमच करायचे आहेत? कि साहित्य परिषदेचे सदस्य पण फक्त फुकटात अमेरिकावरी वारी करायला मिळते आहे म्हणून याच्या कडे डोळेझाक करून बसलेत? थोडक्यात म्हणजे हे संमेलन करण्यामागचा हेतू जरी उदात्त दाखवण्यात येत असला तरी तो नक्की तितका उदात्त नाही ही शंका घ्यायला भरपूर जागा आहे. या प्रश्नांची मुद्देवार उत्तरे मंडळ देऊ शकेल काय? आणि दिलीत तर 'एव्हढे मोठे कार्य करायचे म्हणजे विरोध होणारच' अशी मंत्र्याच्या थाटातली गुळमुळीतच असणार. - श्रीपाद कुलकर्णी बे एरिया, अमेरिका
विशेष
Taxonomy upgrade extras

वाचने 34113
प्रतिक्रिया 92

प्रतिक्रिया

मला तरी वाटते, की हा महत्वाचा विषय आहे, म्हणून सध्या तरी त्याला पहिल्या पानावर ठेवायला हवे, म्हणून हा प्रतिसाद. -- सर्किट

अरे खेकड्या मित्रांनो, जसा चुल्हा तव्या वर, आधी हाताला चटके, तेंव्हा मिलते भाकर! अरे खेकड्या मित्रांनो, किती चिखल फेकताहो, जरी मंडळ वाईट, पहिले संमेलन सही होणार! अरे खेकड्या मित्रांनो, मी जरी असे ईजिनियर, मेक वर बसणार, मराठीची पुजा करणार! अरे खेकड्या मित्रानो, किती जरी प्रेक्शक येणार, साहित्याची सेवा करु, तुम्ही घरी बसणार! अरे खेकड्या मित्रानो, किती खर्च करणार, शासन जरी म्दत करो, तुम्हा पोटात दुखणार! अरे खेकड्या मित्रांनो, किती कागाळ्या करणार, मराठी चा प्रसार, आम्ही नक्की करणार! अरे खेकड्या मित्रानो, ग्रंथ किती ठेवणार, तुम्ही प्रकाषक असो, आम्ही गुगल बघणार! अरे खेकड्या मित्रानो, जरी अंकुष, प्रशांत येणार, आणी द.मा. फ.मु. येवो, आम्ही भांडी घरी धुणार! अरे खेकड्या मित्रांनो, आजी मामा पाहू येणार, जरी कवी घरी येवो, तुम्ही डबक्यात डुंबणार! अरे खेकड्या मित्रांनो, किती चर्चा करणार, मराठी माणुस पुढे जावो, आम्ही पाय खेचणार! अरे 'कला, कला' मित्रानो, वर्तमान पत्रे लिहीणार, मैत्रिचा हात पुढे करो, आम्ही खोडा घालणार! अरे माझ्या मित्रांनो मित्रांनो, तुम्ही वकील असणार, जरी घाला बहिष्कार, माझे शत्रू नसणार!

In reply to by Dyaneshwar

तुमची तळमळ समजली. पुढील कवितेसाठी शुभेच्छा. -- सर्किट

In reply to by Dyaneshwar

>>साहित्याची सेवा करु, तुम्ही घरी बसणार! काय करणार इक्ता खर्च करून अमेरिकेपोत्तूर येणं परवडत न्हाय खिशाला. >>शासन जरी म्दत करो, तुम्हा पोटात दुखणार! आवो आमच्या म्हाराष्ट्रात लई लई गुणी लोक हायत ज्यांच्यासाठी शास्नाकडे पैसं न्हायीत पण तुम्हा अमेरिकावाल्या धनिकांच्या बोडक्यावर घालायला हायीत.. पोट दुखंल नाहीतर काय!! >>मराठी चा प्रसार, आम्ही नक्की करणार! म्हंजी नक्की काय? >>जरी अंकुष, प्रशांत येणार,आणी द.मा. फ.मु. येवो, आम्ही भांडी घरी धुणार! आगं बाबौ.. अंकुश (ष नव्हे काय!) आणि प्रशांत ह्ये कोन? नट हायीत म्हायती होतं. साहित्तिक बी हेत का? द.मा., फ.मु. अजून कोनीबी आना घरची भांडी आमची आम्हालाच घासावी लागतात की वो? तसं तर तुमच्या अमेरिकेमंदी पण धुण्याभांड्याला बाई नसतीच! >>जरी कवी घरी येवो, तुम्ही डबक्यात डुंबणार! कवी घरी आल्यावर कोन कंच्या ग्लासात डुंबणार तेची फिकीर करा राव! >>अरे 'कला, कला' मित्रानो, वर्तमान पत्रे लिहीणार, मैत्रिचा हात पुढे करो, आम्ही खोडा घालणार! काय पन विनोदी बोलता तुम्ही... >>अरे माझ्या मित्रांनो मित्रांनो, तुम्ही वकील असणार, जरी घाला बहिष्कार, माझे शत्रू नसणार! त्ये गांधीवादी कुटं गेलं हे? - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

In reply to by Dyaneshwar

अरे खेकड्या मित्रानो, किती खर्च करणार, शासन जरी म्दत करो, तुम्हा पोटात दुखणार! अहो पण शासनाचे पैसे म्हणजे आमचेच पैसे ना? मग ते महाराष्ट्रात राहणार्‍या आम साहित्यप्रेमींसाठीच खर्च झाले पाहिजेत ना? पोटात दुखेल नायतर काय भांचोत? आणि ज्ञानेश्वरा, तू कसल्या रे मराठीच्या गप्पा मारतोस? तुला लेका अजून तुझा आयडी नाय मराठीत करता आला! :) अरे खेकड्या मित्रांनो, किती चिखल फेकताहो, जरी मंडळ वाईट, पहिले संमेलन सही होणार! चला, म्हणजे मंडळ वाईट आहे हे तुलाही मान्य आहे तर! :) आपला, (मराठी भाषेचा प्रसार करू अश्या केवळ गप्पा न मारता अंतरजालावर तिचा प्रसार आणि प्रचार करणारा!) तात्या.

सर्वप्रथम मला हे लिहायला हवे की, माझे प्रस्तुत मत एक सामान्य मराठी भाषक /वाचक या नात्याने आहे. त्यात संमेलनाच्या बाजूने किंवा विरोधी अशी भूमिका घेण्यात मला बिलकुल राजकीय किंवा इतर कुठला स्वार्थ नाही. गेले काही महिने चाललेला वाद-विवाद मी वाचतोय. ते लिखाण आणि हा धागा वाचून मला जे वाटले तेच लिहितो आहे. ज्ञानेश्वर यांच्यासारखे , संमेलन-कर्त्यांच्या वतीने जे बोलत आहेत त्यांच्या बाजूचा एक मोठा कमकुवत पैलू मला हा दिसतो की , त्यांच्याकडे प्रतिवाद करायला ठोस मुद्दे दिसत नाहीत. खुद्द ज्ञानेश्वर हे सुद्धा, संमेलन कर्त्यांचे अधिकृत प्रवक्ते किंवा साधे कार्यकर्ते आहेत असे त्यांनी कुठेही म्हण्टलेले दिसत नाही. थोडक्यात असे, की मिसळपावच नव्हे तर अनेकानेक वृत्तपत्रे , संस्था , व्यासपीठे यांच्यावर , या संमेलनाला विरोध झाला आहे आणि ही आजची गोष्ट नव्हे. यापैकी कुठल्याही आघाडीवर , देवकूळे आणि पार्टीने संवाद साधला आहे , आरोपांचे खंडन केले आहे, काही सफाई दिली आहे असे माझ्यासारख्या सामान्य मराठी भाषकास माहिती नाही. (मराठी आंतरजालावरच्याना , या उत्तरदायित्त्वाच्या अभावाच्या या घटनेवरून काही गोष्टींची आठवण येऊ शकेल ..) ज्ञानेश्वर यांच्यासारख्या लोकांकडे अभिनिवेश आहे पण त्यांच्या तात्त्विक किल्ल्याला जी भगदाडे पडलेली आहेत त्यांच्याकडे ते दुर्लक्ष करतात आणि या भगदाडांना "झारीतल्या शुक्राचार्यांनी पाडलेली छिद्रे" असे समजून मोकळे होतात. किंबहुना , आता ही गोष्ट स्पष्ट आहे की , "तात्विक बाजू" या गोष्टीचा , या मंडळीना फारसा थांगपत्ता नसावा. त्यांनी कनेक्शन्स जुळवली आहेत , मंत्री-संत्री , कला-क्रीडादि क्षेत्रातली मंडळी , ट्रॅव्हल एजन्ट्स, व्हिसा ...सर्व सर्व तय्यार आहे. मात्र ज्या लोकांकरता हे करायचे त्या लोकांकरताचे उत्तरदायित्त्व धाब्यावर बसलेले आहे. माझी स्मृती मला दगा देत नसेल तर , २६ नव्हेंबरच्या मुंबई हल्ल्यानंतर रत्नागिरीचे संमेलन रद्द झाले. सॅन होजे वाल्यानी इथेदेखील कोळून प्यालेली दिसते. संमेलनकर्त्यांपेकी कुणी मिपावरच काय , कुठल्याही व्यासपीठावर येऊन काही एक भूमिका , काही मुद्देसूद उत्तरे देण्याची अपेक्षा व्यर्थ आहे हे तर सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.

In reply to by मुक्तसुनीत

मुक्तरावांचा प्रतिसाद आम्हाला अत्यंत आवडला. अगदी पटण्याजोगाच आहे.. "तात्विक किल्ल्याला भगदाडे" हे शब्द आवडून गेले! :) तात्या.

In reply to by मुक्तसुनीत

आपली माहिती बरोबर आहे. सॅन होजे वाल्यानी इथेदेखील कोळून प्यालेली दिसते १०००% सहमत. पैशाला हपापलेले आहेत साले...

In reply to by एक

संमेलनाच्या पहिल्या दिवशी, मुंबईत अतिरेकी हल्ल्याला बळी पडलेल्यांना मंडळ श्रद्धांजली अर्पण करणार आहे. त्यासाठी त्यांना धीरगंभीर आवाजाचे कुणीतरी हवे आहे, म्हणून माझ्याकडे विचारणा झाली होती. परंतु पहिल्या दिवशी मी संमेलनात अनुपस्थित असल्याने मला जमणार नाही, असे कळवले. इथे कुणाचा आवाज धीरगंभीर असेल, तर त्यांनी मंडळाशी संपर्क साधावा. -- सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

परंतु पहिल्या दिवशी मी संमेलनात अनुपस्थित असल्याने मला जमणार नाही, असे कळवले.
म्हणजे, दुसर्‍या दिवसापासून तुम्ही तिकडेच असणार असे गृहीत धरायचे का? च्यायला, नेमके तुम्ही कुठल्या पार्टीतले ते (नेहमी प्रमाणेच) कळेना झालंय राव!!

In reply to by कोलबेर

रीतसर खिशाला चोट देऊन तिकीट काढले आहे (१५० डॉलरचे). त्यामुळे संमेलनाला हजर राहणारच आहे. फक्त पहिल्या दिवशी कामानिमित्त परगावी असल्याने जमणार नाही. च्यायला, नेमके तुम्ही कुठल्या पार्टीतले ते (नेहमी प्रमाणेच) कळेना झालंय राव! चालायचेच ! :-) :-) -- सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

जर का कुणी पक्षनिरपेक्ष भूमिका घेतली असेल तर (निदान अशा बाबतीत तरी) हे स्वागतार्ह मानायला हवे. "जर तुम्ही आमच्याबरोबर नसाल तर तुम्ही आमच्या विरोधातच असला पाहिजे" असा, निर्बुद्ध "झिरो सम" खेळ खेळणारे टेक्सास रांचला गेले परत. थोडासा ठोकताळा करायचाच झाला तर : साहित्य संमेलन अमेरिकेला होते हे चांगले का ? अशा प्रकारचा पायंडा पडणे योग्य का ? : हो. देवकुळे आणि कंपणीने हे मिशन एका स्वयंसेवी आणि विश्वस्त भूमिकेतून केले असल्यास त्यांच्या उपक्रमशीलतेची , श्रमांची , प्रयत्नांची दखल घेतली पाहिजे का ? : हो मात्र हे करताना या मंडळींनी अनेकविध पातळ्यांवरचा विधिनिषेध , उत्तरदायित्व यांचे दर्शन घडवले असे म्हणता येईल का ? : मोठ्या प्रमाणावर सांगायचे , तर नाही. याकरता २५ लाख रुपये बुडीत खात्यातल्या महाराष्ट्र सरकारकडून घेतले असले तर ते बरोबर का ? : नाही. २६ नव्हेंबरच्या घटनानंतर , जेव्हा या संमेलनाचे भावंड रद्द केले जाते तेव्हा हे संमेलन भरवणे योग्य का ? नाही. तेव्हा , माझ्या दृष्टीने , गोळाबेरीज करताना , अनिष्ट बाबींचे पारडे वरचढ ठरते असे दिसते. आता संमेलन होणार हे तर अटळ आहे. मग देवकुळे नि कंपनीला थोडेसे परिमार्जन कसे करता येईल ? - २५ लाख रुपये परत देणे (घेतले असल्यास !). किंवा त्याचा विनियोग महाराष्ट्रात समाजोपयोगी कार्याला करणे. - संमेलनाचे सूप वाजल्यानंतर तरी, कुठल्या ना कुठल्या व्यासपीठावर काही स्पष्टीकरणे देणे. - संमेलनातून काही आर्थिक फायदा झाला असेलच तर , साहित्योपयोगी/समाजोपयोगी कार्याला हे पैसे देणे. -

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

खिशाला 'चोट' देणे म्हणजे काय हो? खिशाला चाट लावणे ऐकले होते, 'चोट देणे' हे काही नविन आहे का? :D आजकाल मिपावर शब्दांना चोट हा प्रत्यय लागला की चांदण्या पडत आहेत. तसली तर काही भानगड नाही ना? ;)

In reply to by कोलबेर

अनेक शक्यता : १. सर्वाधिक शक्यता : फ्रॉईडीयन स्लिप् (मागे कुणीतरी "देवखुळे" असे म्हणून केली होती तशी) . म्हणजे मजे खरोखरी म्हणायचे होते ते "चुकून" म्हणून जाणे ;-) २. मराठी " खिशाला चाट देणे" आणि हिंदी "पैसेकी चोट खाकर" या दोन भाषांचा गंगाजमनी मनोहारी संगम. =)) ३. दादाकोंडके सदृष काहीतरी भयभीषण कोटी - जी आपण सर्व पामरांस झेपणार नाही अशी !

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

रीतसर खिशाला चोट देऊन आँ ? आपल्याला चाट असे म्हणायचे आहे का ? आम्हाला भलतीच शंका आली.

In reply to by मुक्तसुनीत

खुद्द ज्ञानेश्वर हे सुद्धा, संमेलन कर्त्यांचे अधिकृत प्रवक्ते किंवा साधे कार्यकर्ते आहेत असे त्यांनी कुठेही म्हण्टलेले दिसत नाही. असे स्पष्ट म्हणायला कशाला हवे ? मिसळपावाच्या चालकांना त्यांचा इमेल आयडी माहिती आहेच की ! आणि त्यांना मिसळपावाच्या चालकांचा मोबाईल नंबर माहिती आहे. -- सर्किट

कवी घरी आल्यावर कोन कंच्या ग्लासात डुंबणार तेची फिकीर करा राव! नुसते कवी कशाला ..... इतके स्वच्छ आणि सरळ छान छान कलाकार आहेतच, ग्लास कसा पुरेल ..... टाक्या लागतील. या संमेलनाला जो खर्च होणार आहे, तेव्हढा खर्च बे एरिया मराठी मंडळाने महाराष्ट्र शासनाला द्यावा नंतर 'Dyaneshwar' सारख्या लोकांनी गप्पा माराव्यात.

मंडळाने आधी स्वतः सगळा खर्च करतो, कौतिकराव (फुकटे) पाटील यासह अनेकांना फुकट वारी घडवतो अशी प्रलोभने दाखवून संमेलनाला मान्यता मिळवली आणि आता लटपटी खटपटी करून महाराष्ट्र शासनाकडूनच जनतेचे पैसे लाटण्यात यश मिळवले आहे. आता संमेलन होतेच आहे तर जे काही करायचे ते स्वतःच्या पैशांनी करा, आम्हा करदात्यांच्या पैशांवर डल्ला मारुन गल्ला भरू नका एवढेच बे एरिया महाराष्ट्र मंडळाला सांगणे आहे. बीएमेमनेही त्यांच्या उपक्रमांसाठी सरकारकडून मदत पदरात पाडून घेणे गैर आहे. या लुटीविरुद्ध आवाज उठवला पाहिजे असे वाटते.

आताच सकाळ मध्ये 'संमेलनाध्यक्ष पानतावणे यांची आयोजकांवर नाराजी' ही बातमी वाचली. एकंदरीत 'घोळ इथला संपत नाही' अशी परिस्थीती झाली आहे. --> श्रीपाद कुलकर्णी

बरेच दिवस होउन गेले ह्या लेखाला पण संमेलन झाल्यानंतर कोणी इथे टिप्पणी केलेली दिसत नाही. संपादकीय लेखाला असे वार्‍यावर सोडणे बरे नाही. सर्किट ह्यांना काही उत्तर आले का देवकुळेंचे? एकंदर संमेलनाचे कार्यक्रम (दिवसभरातले... संध्याकाळी किंवा रात्रीचे नाहीत) बघून संमेलन चांगले झाले असे वाटते. धर्माधिकारी आणि बाकी व्यक्त्यांचे विचार फार मुद्देसुद होते. ह्या लेखातील बरेचसे मुद्दे खोडले गेलेत असे वाटते. जाणकार लोकांनी ह्यावर प्रकाश टाकावा.... अफाट जगातील एक अडाणि.