Skip to main content

नास्तिक!

लेखक पिवळा डांबिस यांनी रविवार, 13/07/2008 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
प्रथमच सांगतो की मी एक नास्तिक माणूस आहे. "प्रारंभी विनंती करू गणपती, विद्यादयासागरा...." माझा मुलगा गजाननाच्या तसबिरीपुढे हात जोडून उभा असतो... मी ही त्याच्या मागे उभा रहातो. माझं मन आक्रंदून उठतं, " अरे तुझा विश्वास नाही या सगळ्यावर, सर्व थोतांड आहे ते!!" मनाला न जुमानता नकळत डोळे मिटतात, मस्तक लवतं..... काय जादू आहे ही? पुन्हा सांगतो की मी पूर्ण नास्तिक आहे.... एका ब्राम्हणाच्या घरांत जन्माला आल्यामुळे सर्व ब्राम्हणी संस्कार झाले. पण माझा त्याला काहीच इलाज नव्हता. माराला भिऊन लहान मुलं काहीही शिकू शकतात...... नंतर मोठं होतांना असं लक्षांत आलं की ही आपल्या आजूबाजूची लोकं कुणाच्याही अन् कशाच्याही पाया पडतात..... गावाच्या वेशीवरचा एक धोंडा, तो म्हसोबा, देव कसा होऊ शकेल? आणि जर तेच लॉजिक वापरलं तर मग कोणतीही मूर्ती, मग ती दगडाची असो वा धातूची, देव कशी होऊ शकेल? याऊप्परही जर त्या मूर्तीत देवत्व आहे असं मानलं, तर ती काढून नवी मूर्त बसवतांना, "यांतु देवगणासर्वे, पूजामादाय पार्थिवे, इष्टकामना प्रसिद्ध्यर्थं, पुनरागमनायचं!" असं म्हणून तिचं विसर्जन कसं करता येईल? मनांत विचारांचा नुसता कल्लोळ!!! सगळं शालेय जीवन याच आंदोलनात गेलं..... लहान असतांना मी बर्‍याच वेळा टिटवाळ्याच्या गणपतीला जात असे. आधी आई-वडिलांबरोबर आणि नंतर कॉलेजात असतांना कधी कधी एकटाही.... तेंव्हा ते देवस्थान आजच्याइतकं लोकप्रिय नव्हतं. चतुर्थी सोडुन गेलं तर मंदिरात एक पुरोहित आणि चार-पाचच भक्तगण असायचे. मंदिरही आजच्याइतकं मोठं नव्हतं. किंबहुना एका सरोवराकाठचं ते एक निर्जन मंदिर होतं. गाभार्‍यात अथर्वशीर्ष म्हणत तासभर जरी बसलं तरी पुजारी बाहेर काढायची घाई करीत नसत. उलट अखंड अथर्वशीर्षाचं पारायण करणार्‍या भक्ताकडे कौतुकानेच बघत असत..... आता टिटवाळ्याच्या गणपतीचे ते कमर्शियल रूप पाहिल्यानंतर तर तिथे देव नांदणे शक्यच नाही याची माझी खात्रीच पटलीय...... त्यानंतर माझ्या नशिबाने (चांगलं वा वाईट म्हणा!) मी सायन्सचा विद्यार्थी झालो...... स्वतःला पडताळा आल्याशिवाय, सर्वांनी पडताळून डॉक्युमेंट केल्याशिवाय कशावरही विश्वास न ठेवण्याची सवय अंगी लागली...... त्याचबरोबर आपल्याला जे दिसत नाही (एक्स रे, गॅमा रे, वगैरे) ते प्रत्यक्षात अस्तित्वात असू शकतं याची विनयपूर्वक जाणीवही झाली..... आईवडिलांचं घर सोडून स्वत:चं घर स्थापन केल्यावर त्या नव्या घरात देवाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झालीच नाही.... आज जर मला विचाराल तर, "जगात परमेश्वर आहे का?" याचं उत्तर मी असं देऊ शकेन की,..... 'असावा! कारण अजूनही जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा सायन्सला उलगडा करता येत नाही.... या रॅन्डम विश्वातही अनेक पॅटर्नस दिसून येतात ते कशामुळे? त्या पॉवरलाच ईश्वर म्हणतात का? पण जर ईश्वर असेलच तर तो एखाद्या मूर्तीच्या स्वरूपात तर नक्कीच असणार नाही. ती एक अमूर्त ऍबस्ट्रॅक्ट पॉवर असेल....... माझ्यासारख्या एका क्षुद्र जीवाकडे लक्ष द्यायला त्याला मुळीच अवसर असणार नाही. मी त्याची प्रार्थना करीत आयुष्य घालवतोय की माझी कर्मं करीत जीवनकाल कंठतोय याला त्याच्या दृष्टीने काहीच महत्त्व नाही...... मुंग्यांच्या वारूळावर कुणी फ्लीट फवारल्यावर मरणार्‍या मुंग्या, आणि या अनंत विश्वाच्या पसार्‍यात मरणारा मी याच्यात त्याच्या दृष्टीने काहीच फरक नाही..... मग कशाला ती मूर्तिपूजा आणि कशाला तो देव? या जगात आपण एकटेच असतो! इथे आल्यानंतर आपल्या मानसिक सुरक्षिततेसाठी नातेसंबंध बांधतो, आई, बाप, भाऊ बहीण, बायको, पोरं, मित्र वगैरे..... काही रक्ताच्या नात्याचे, काही मानलेले....... पण आपण प्रत्यक्षात एकाकीच असतो! एकटेच जगतो आणि निघायची वेळ झाली की एकटेच निघून जातो!! इष्ट्मित्रांसाठी आपल्या तेराव्याच्या मिष्टान्नाची सोय करून.... जमेल तितक्या संतांची, महात्म्यांची शिकवण आणि त्यांची प्रत्यक्ष आयुष्यं अभ्यासून पाहिली.... आणि लक्षांत आलं ते हेच, त्यांनी आयुष्यभर काय वाटेल ते सांगितलं असेल, वाटेल तो उपदेश लोकांना केला असेल, पण ते मर्त्य माणसांसारखेच जगले आणि मर्त्य माणसांसारखेच मेले...... जगाला मुक्ततेचा पाठ शिकवणारा गौतम बुद्धसुद्धा अपचन होउन गेला........ एकवचनी रामालाही शरयूच्या पाण्यात आत्महत्या करावी लागली....... "अर्थशून्य भासे मज हा, कलह जीवनाचा, धर्म, न्याय, नीती सारा, खेळ कल्पनेचा" या सर्व विचारांतुन माझी नास्तिकता जन्माला आली..... ईश्वराचं अस्तित्व मी नाकारीत नाही, पण मला स्वतःला अनुभव आल्याखेरीज मी त्यावर विश्वास ठेवणार नाही...... आणि जो मला त्याच्या अनुभव देऊ शकत नाही त्याला मी संत वा महात्मा मानू शकत नाही, मग तो वाटेल ती बडबड करीत असो....... या भूमिकेत अनेक वर्षे गेली असतांनाच एक दिवशी बॉस्टनमधे माझ्या एका गुजराथी मित्राच्या घरी गेलो होतो. त्याच्याकडे भिंतीवर गजाननाची एक सुरेख प्रतिमा लावलेली होती. उत्तरेकडचा वा दाक्षिणात्य गणपती नाही तर एकदम अस्सल महाराष्ट्रीय गणपती! "रत्नखचितवरा तुजगौरीकुमरा" पासून "रुणुझुणुती नुपूरे चरणी घागरीया" पर्यंत सर्व लक्षणे असलेला! मी आरती मनातल्या मनात म्हणून सर्व लक्षणे मोजुन पाहिली..... मला अनिमिषपणे त्या चित्राकडे पहातांना पाहून तो मित्र म्हणाला, "क्या पसंद आया? तुम्हारे महाराष्ट्रकाही गणेश है" "बहुत बढिया पिक्चर है, लेकिन तुम्हें कहांसे मिला?" मी. "तुझें क्या करना है, कहांसे मिला? लेकिन मेरे पास इसकी और एक कॉपी है, मंगता है तो लेके जाव..." मी भारावल्यासारखी मान डोलावली...... ते चित्र घेउन घरी आलो आणि विचारात पडलो, "काय केलं मी हे?" माझा मूर्तिपूजेवर अजिबात विश्वास नाही. त्यातही ईश्वर जर असलाच तर तो हत्तीचं मुख आणि मानवी धड या स्वरूपात असेल यावर तर काडीचाही विश्वास नाही. मग मी ही प्रतिमा का स्वीकारली? असो. दिसतेय तर खास मूर्त, आपल्या भारतीय संस्कृतीची निशाणी असू देत म्हणून ती मी फ्रेम करून घेतली आणि शो-पीस म्हणून लिव्हिंगरूममध्ये एका भिंतीवर टांगली..... माझ्या मुलाच्या आईचा देवावर विश्वास असल्याने तिने मुलाला संस्कार शिकवतांना तीच प्रतिमा वापरली. नाहीतरी घरात इतर देव नव्हतेच!! आता मोठा झाला तरी अजूनही तो आणि त्याची आई त्याच मुर्तीपुढे हात जोडून उभे रहातात........ मुलखाचे अंधश्रद्ध नाहीतर! मी मुळीच तसा उभा रहात नाही. मी माझी बुद्धीवर विसंबून रहाणं जास्त पसंत करतो!! पण मग.... पण मग रोज सकाळी आंघोळ करुन झाल्यावर टॉवेलाने अंग पुसतांना नकळत माझ्या तोंडून, "प्रणम्य शिरसां देवं, गौरिपुत्रं विनायकं, भक्तावाचं स्मरे नित्यं आयु:कामात सिद्धये..." हे निघतं ते कशामुळे?....... खूप विचार केला हे कोडं सोडवायचा! आणि सरते शेवटी या निर्णयाला आलोय!! नसेल माझा कोणत्याही दैवतावर विश्वास! नसेन मी कुणाचाही भक्त!! पण ही गणेशाची मूर्ती तर भावते ना मला? या गणेशमूर्तीचा चाहता तर आहे ना मी? मग त्याचा मित्र बनायला तर काय हरकत आहे? मी अजूनही एक पूर्ण नास्तिक मनुष्य आहे.... पण मित्रहो, या गजाननाचा मी एक स्नेही म्हणून स्वीकार केला आहे....... (डिक्लेमरः वरील स्फुटात मांडलेले विचार हे सर्वस्वी माझे आहेत. वाचणारी व्यक्ती कायद्याने सज्ञान व स्वतःचा असा सारासार विचार करणारी असेल हे गृहीत धरून ती मांडले आहे. दुसर्‍या कोणालाही त्यातून काहीही संदेश, उपदेश द्यायची, काही पटवायची, वा कोणताही प्रचार करण्याची अजिबात इच्छा नाही!!!)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 43789
प्रतिक्रिया 76

प्रतिक्रिया

In reply to by चौकटराजा

तुमच्या म्हणण्याप्रमाणे योगायोगाने देव तुमच्या आयुष्यात येतो. ते पटत नाही. तुम्ही हार्ड्कोर नास्तिक समजता तरीही गणपती बसवता, पूजा करता. कारण आपल्या विचाराला आचारात आणण्याची इच्छा अथवा धैर्य नाही म्हणून. तुम्ही दुसर्‍यांना थांबवू शकत नाही किंबहुना थांबवू नकाच.. त्यांना त्यांचा विचार करू दे. पण स्वतःला न पटणारं स्वतःच वागण्यापासून कोण अडवतय ?? ते जमवणं इतकं कठीण नक्कीच नाही. थोडासा निर्धार लागतो पण इथे योगायोग वगैरे कारणं अजिबात पटत नाहीत. आणि योगायोगाने देव आयुष्यात येणे आणि ही देवाची कृपा वगैरे मनापासून वाटत असेल तर तुम्ही नास्तिक असल्याचे म्हणणे हे स्वतःला फसवण्यासारखे आहे.

In reply to by बाळ सप्रे

एक ,हे सर्व मी एकटा समाजात नाही . माझे कुटुंब ही आहे म्हणून करतो. माझ्यात धैर्य वगरे नाही हा तर्क चुकीचा. अगदी थेरॉट्कली पाहिलेत तर योगायोग असाही काही नसतो पण प्रॅक्टीकल आयुष्य जगताना आपल्या मनाचे समाधान तूर्तास तरी का होईना हे करून घेण्यासाठी नाईलाजाने देवाची इच्छा असे आपण म्हणतो. उदा आपल्या परिचयात जेंव्हा अकाली मृत्यू होतो त्यावेळी नास्तिकही इश्वरेछ्हा बलीयसी म्हणतो कारण तुझ्या बापाने दारू पिली बेसुमार ,म्हणून तो मेला हे सत्य त्या नातेवाईकाला सांगण्याचे धैर्य आपल्यात नसते. नास्तिकातही नसते व अस्तिकातही. धैर्याचा प्रश्न तेथे येतो. आपण म्हणता तेथे नाही.काही वेळा सत्य सांगण्याचे धैर्य आपल्यात नसते किंवा काही वेळा ते ऐकण्याचे धैर्य॑ दुसर्‍यात नसते.

In reply to by चौकटराजा

माझे कुटुंब ही आहे म्हणून करतो
कुटुंबातही आपापल्या श्रद्धे/अश्रद्धेप्रमाणे वागण्याची मुभा असावीच. पण तुमच्याकडे धैर्य नाही हे म्हणणे जर चूक असेल तर कुटुंबात तुमच्या नास्तिक असण्यावर खुलेपणाने चर्चा झाली नसावी. असे असते तर तुमच्या नास्तिकतेला न पटणार्‍या बर्‍याच गोष्टी करण्याची इच्छा / आग्रह/ सक्ती झाली नसती. माणसं जपण्यासाठी जसे नास्तिक आस्तिकांच्या सर्व गोष्टींना घरात विरोध करत नाहीत तसे आस्तिकही घरातल्या नास्तिकांकडून हे सगळं करण्याची अपेक्षा ठेवत नाहीत. माझी श्रद्धा आहे तर मी पूजा करेन, मुलाकडून ती इच्छा अपेक्षा ठेवणार नाही. आणि तो नास्तिक आहे याची पूर्ण कल्पना असेल तर माझ्यासाठी म्हणून पूजा वगैरे करण्यापासून नक्कीच परावृत्त करेन. धैर्य शब्दाऐवजी विचाराप्रमाणे आचार करण्याचा स्वतःचा निग्रह नसणे असे म्हणणे जास्त योग्य ठरले असते.

प्रतिसाद कर्त्यांना अंधश्रद्धा आणि मेंदुविज्ञान हा सुबोध जावडेकरांच्या मेंदुच्या मनात या पुस्तकातील लेख वाचावा अशी आग्रहवजा सूचना आहे. श्रद्धा अश्रद्धा अंधश्रद्धा चे ठिकाण मेंदु आहे. मी माझ्या सोयी वा गरजेनुसार अस्तिक नास्तिक वा अज्ञेयवादी आहे. मानसिक आरोग्य जपण्यासाठी आपला मेंदु केवळ अमुर्तच नव्हे तर अनेक वेडगळ वाटणार्‍या सुद्धा कल्पनांचा आधार घेतो. प्रत्येक वेळी आपले त्यावर नियंत्रण असतेच असे नाही. ते त्या त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असते. ईश्वराचे निर्गुण निराकार, सगुण साकार, भक्तवत्सल करुणाघन अशी रुपे हे त्याच्या मेंदुचे अविष्कार असतात.

असाच सेम असाच विचार व्यक्त करणारा मेघश्याम पुंडलिक रेगेंचा एक लेख आठवला. एक कुतुहल नरहर कुरुंदकरांना मुलाची "मुंज" करावीशी वाटण्या संदर्भात व एक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी लुप्त जुन्या प्राचीन विधीने जी त्यांना माहीत होती असे काहीतरी "त्र्यंबकेश्वर" मंदीरातील प्राण प्रतिष्ठे ची जबाबदारी स्वीकारली होती त्याचेही कुतुहल वाटते एकुण पण बहुधा तेव्हा त्यांनी इथे सर्वांना काही तरी प्रवेश द्यावा अशी काहीतरी अट टाकलेली होती असे अंधुक अंधुक वाचलेले स्मरते. माणुस एक इंटरेस्टींग क्रीएचर आहे व तो विसंगतच आहे मुळात त्याला सुसंगती अपेक्षीत केल्यावर वांधे होतात. सॅम हॅरीस सारखे लोकही आहेत नीरक्षीर विवेक करतात शेणातुन शेंगदाणा बाहेर काढतात असो.