Skip to main content

केजरूके गुलाम

लेखक क्लिंटन यांनी मंगळवार, 31/03/2015 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
जे कधीतरी नक्की होणार असे वाटत होते ती गोष्ट त्यामानाने फारच लवकर घडली. १० फेब्रुवारी रोजी मतमोजणीत दिल्लीत ७० पैकी तब्बल ६७ जागा जिंकून अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने भाजपचा पुरता धुव्वा उडवला. कॉंग्रेसचा तर व्हाईटवॉशच झाला. २०१३ मध्ये बऱ्यापैकी यश मिळविल्यानंतर केजरीवाल कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले होते त्यावेळीच पक्षातील भांडणे कित्येकवेळा चव्हाट्यावर आली होती.तरीही झाले-गेले विसरून दिल्लीच्या मतदारांनी भरभरून मते दिली.तेव्हा मागच्या अनुभवातून शहाणे होऊन यावेळी तरी आम आदमी पक्ष अशी भांडणे चव्हाट्यावर आणणार नाही आणि जबाबदार राज्यकारभार करेल अशी जनतेची अपेक्षा नक्कीच होती. पण येरे माझ्या मागल्या. मागच्या वेळची भांडणे अगदी सौजन्याचे मेळावे वाटावेत अशी कडाक्याची भांडणे यावेळी झाली.शेवटी काय चळवळ्या लोकांना चळवळी केल्याशिवाय समाधान वाटत नाही. सुरवात झाली पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांनी पाठविलेले पत्र फुटले तेव्हापासून.पक्ष आपल्या तत्वांपासून भरकटत आहे आणि सामूहिक नेतृत्वाला तडा जात आहे अशी तक्रार त्यांनी केली.त्यानंतर पक्षाला एकामागोमाग दुसऱ्या अंतर्गत भांडणाच्या वादळांनी घेरले.रामदासांचे पत्र फुटल्यापासून एका महिन्यात या सगळ्या घडामोडींची परिणीती बंडखोर योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्या केंद्रिय समितीमधून हकालपट्टीमध्ये झाली.एकमेकांवर मोठया प्रमाणावर आरोप प्रत्यारोप झाले.केजरीवाल हुकूमशहा आहेत आणि पक्ष तत्वांपासून भरकटत आहे हा आरोप यादव-प्रशांत भूषण यांनी केला तर दिल्ली निवडणुकांमध्ये यादव-प्रशांत भूषण यांनी पक्षाविरूध्द काम केल्याचा आरोप केजरीवालांनी केला. या भांडणाची सुरवात केजरीवालांच्या दुसऱ्या इनिंगच्या अगदी पहिल्या काही दिवसांपासूनच झाली.दिल्लीतील व्ही.आय.पी कल्चरविरूध्द आकाशपाताळ एक करणारे केजरीवाल मात्र स्वत:साठी मोठा बंगला मागू लागले.त्याचे स्पष्टीकरण काय तर म्हणे मला भेटायला भरपूर लोक येतात, कार्यकर्ते येतात. तेव्हा त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मोठा बंगला गरजेचा आहे. म्हणजे इतर पक्षांच्या नेत्यांनी मोठा बंगला मागितला तर ते व्ही.आय.पी कल्चर आणि यांनी तेच केले तर ते मात्र लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून. वा रे आम आदमी. पक्षांतर्गत मतभेदांच्या बातम्या यायल्या लागल्या त्याप्रमाणे केजरीवालांची शुगर वाढली अशा बातम्या निदान मटामध्ये तरी आल्या होत्या.कुणाच्याही तब्येतीविषयी भाष्य करणे योग्य नाही हे नक्कीच.पण जेव्हा मुख्यमंत्रीपदासारखे मोठे जबाबदारीचे पद भूषवायला मिळते तेव्हा त्याबरोबरच ताणतणाव येणारच, इतर अनेक आतले-बाहेरचे विरोधक वाईटावर टपून बसणारच हे मान्य केलेच पाहिजे. घी देखा पर बडगा नही देखा याला काही अर्थ नाही.आणि हे ताणतणाव जर नेत्याला सांभाळता येत नसतील आणि त्यामुळे त्याची शुगर वाढत असेल तर याचा अर्थ तो नेता नेतृत्व करायला योग्य नाही यापेक्षा दुसरे अनुमान काढणे मला तरी शक्य नाही. २००२ ते २०१२ या काळात मोदींना किती आव्हानांना सामोरे जायला लागले होते. कित्येकवेळा "अ ब्लो टू मोदी" अशा बातम्या आल्या होत्या.तरीही सगळ्या आव्हानांना मोदींनी हिंमतीने टक्कर दिली आणि त्यातूनच त्यांचे नेतृत्व बहरले.लोकसभा निवडणुक जिंकल्यानंतर पंतप्रधानपदाची शपथ घ्यायच्या आधी मोदींनी एन.डी.ए च्या नवनिर्वाचित खासदारांपुढे भाषण करताना म्हटले: "मै कभी निराश वगैरा होता नही. निराश होना मेरे डी.एन.ए मे लिखाही नही है". आणि इथे आपले युगपुरूषजी.जरा खुट्ट वाजले की तो ताण यांना सहन होईनासा झाला.आणि त्या तणावामुळे यांच्या तब्येतीवर परिणाम होत असेल तर हे तणाव सहन करायला म्हणजेच नेतृत्वासाठी नालायक आहेत असे का म्हणू नये? मग काय करा? दिल्लीमध्ये पक्षाच्या नेत्यांमध्ये भांडणे लागली असताना केजरीवाल जाऊन बसले निसर्गोपचार आश्रमात बंगलोरला.दिल्लीत असताना आपण किती साधे म्हणून सगळ्या दुनियेत मिरविणारे केजरीवाल बंगलोर विमानतळावर उतरल्यानंतर मात्र कर्नाटक सरकारच्या व्ही.आय.पी सुरक्षेत आश्रमात रवाना झाले.बरोबर १५-२० गाड्यांचा ताफा आणि विमानतळावरून बाहेर पडतानाही व्ही.आय.पी लेन आणि टोल न भरता महाशय पुढे गेले. हत्तीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असतात तसे यांचे दिल्लीतील वर्तन वेगळे आणि बंगलोरमधील वर्तन पूर्ण वेगळे.एक तर आम्ही किती साधे याचा सतत जप करत स्वत:चा साधेपणा मिरविणाऱ्या लोकांना बघून प्रचंड शिसारी येते. आणि हा आम आदमी बंगलोरमधल्या पंचतारांकित निसर्गोपचार आश्रमात कसा काय जाऊ शकला हा प्रश्न विचारायला बंदीच. असो.मधल्या काळात पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीवरून योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची हकालपट्टी करण्यात आली.त्या बैठकीत नक्की काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असा अजब आदेश केजरीवालांनी समितीच्या सदस्यांना दिला.म्हणजे हे सगळ्या जगाकडून पारदर्शक असायची अपेक्षा करणार पण यांच्या पारदर्शकतेचे काय? एप्रिल २०११ मध्ये अण्णा हजाऱ्यांचे लोकपालासाठीचे पहिले उपोषण झाल्यानंतर लोकपाल कायद्यासाठी युपीए सरकारने समिती नेमली त्यावर अण्णा हजारे आणि केजरीवाल हे दोघेही होते.त्यावेळी समितीच्या बैठकांमध्ये काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असे कपिल सिब्बल यांनी म्हटले तरीही आमची अकाऊंटेबिलिटी जनतेप्रती आहे त्यामुळे त्या बैठकांमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम स्वत: केजरीवाल इमानेइतबारे करत होते.मग तीच वेळ आपल्यावर आल्यानंतर तोच न्याय का लावला नाही? केजरीवालांनी त्या लोकपालाच्या समितीच्या बैठकीमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम केले तेच काम यावेळी मायांक गांधींनी ब्लॉगवर पोस्ट लिहून केले आणि "माझी अकाऊंटेबिलिटी आआपच्या कार्यकर्त्यांविषयी आहे" असा घरचा अहेर केजरीवालांना दिला. म्हणजे इतरांना एक न्याय आणि स्वत:ला दुसरा न्याय हे प्रकार सगळे पक्षच करत असले तरी तोच प्रकार स्वत: करूनही भारतीय राजकारणातले सर्वात धुतल्या तांदळाप्रमाणे हेच हा अहंमन्यपणा हे करताना दिसले की तो प्रकार अगदी प्रचंड म्हणजे प्रचंड डोक्यात जातो. केजरीवाल बंगलोरमध्ये निसर्गोपचार घेत असताना दिल्लीमध्ये तर अगदी कहरच झाला.आम आदमी पक्षाचे माजी आमदार राजेश गर्ग यांनी त्यांचे केजरीवालांबरोबर फोनवर बोलणे झाले होते त्याचे रेकॉर्डिंगच जाहिर केले.त्यात केजरीवाल कॉंग्रेसचे आमदार फोडून त्यांचा वेगळा पक्ष बनवून त्यांचे बाहेरून समर्थन घेण्याविषयी बोलत होते.कॉंग्रेसच्या ८ आमदारांपैकी ३ आमदार मुसलमान आहेत त्यामुळे ते मोदींच्या भाजपबरोबर जाणे शक्य नाही असेही विधान केजरीवालांनी केले असे त्या रेकॉर्डिंगमध्ये आले. १६ जुलै २०१४ रोजी केलेल्या एका ट्विट मध्ये केजरीवालांनी म्हटले होते की भाजप कॉंग्रेसच्या आमदारांना प्रत्येकी २० कोटी रूपये, २ मंत्रीपदे आणि ४ महामंडळ अध्यक्षपदे देऊन फोडायचा प्रयत्न करत आहे.कॉंग्रेसचे ३ आमदार मुसलमान असल्यामुळे त्यांना मोदींची भिती दाखवून द्यायला लागणारी किंमत कमी करायचा प्रयत्न करत होते असे का म्हणू नये? बरं भाजप जो प्रयत्न करत होता तो घोडेबाजार होता पण आआप जे काही करत होते ते मात्र Political realignment करायचा प्रयत्न होता त्यात चुकीचे काय असे निर्लज्ज समर्थन आआपकडून झाले.तसेच त्या रेकॉर्डिंगमधला आवाज केजरीवालांचा नव्हता असे आआपने एकदाही म्हटलेले नव्हते.याचाच अर्थ केजरीवालांनी असे काही म्हटले होते हे नाकारले नाही.म्हणजे इतर करतात तो घोडेबाजार आणि हे करतात ती Political realignment. बरं हे कमीच झाले म्हणून केजरीवालांचे आणखी एक रेकॉर्डिंग आले त्यात मुसलमानांपुढे आआपशिवाय दुसरा पर्याय काय आहे अशा स्वरूपाचेही विधान केल्याचे स्पष्ट झाले.म्हणजे इतर पक्षांनी धर्माधिष्ठीत राजकारण केले तर तो जातीयवाद आणि यांनी केले तर त्यात काही गैर नाही आणि परत आम्ही इतरांपेक्षा कसे चांगले, देशातील भ्रष्टाचार नाहिसा व्हावा ही चिंता केवळ आम्हालाच हे वर तोंड करून बोलायचे. नंतर दोन बाजूंमध्ये समेट होणार अशी चिन्हे दिसू लागली.पण ती शांतता वादळापूर्वीचीच शांतता राहिली.शनीवारी २८ मार्चला पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक बोलावली गेली.योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची राजकीय व्यवहार समितीमधून हकालपट्टी आधीच झाली होती. सर्वात निर्लज्जपणा म्हणजे पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांना तुम्ही या बैठकीस उपस्थित राहू नका असे पक्षाच्या वतीने सांगितले गेले.म्हणजे यांना देशात लोकपाल हवा आणि लोकपाल नावाचा एक मनुष्य त्या जागेवर आणला की चुटकीसरशी भ्रष्टाचार मिटेल अशी वेडगळ स्वप्ने बघायची, उपोषणे करून लोकनियुक्त सरकारला ब्लॅकमेल करायचे आणि वर तोंडाने अंतर्गत लोकपालाला तुम्ही बैठकीला येऊ नका असे सांगायचे? म्हणजे हे स्वत: लोकपालाची चाड राखणार नाही पण सगळ्या जगाने मात्र हे म्हणतील तसाच लोकपाल आणावा ही अपेक्षा!! चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना या अशा. प्रत्यक्ष बैठकीच्या वेळी अगदी कहर झाला. केंदिय समितीच्या बैठकीस खरोखरच्या सदस्यांना प्रवेश नाकारला जात आहे असा आरोप करून योगेन्द्र यादव अर्धा तास धरण्यावरच बसले.कुणाही सदस्याने आत मोबाईल फोन घेऊन जाऊ नयेत ही सक्ती केली गेली.म्हणजे आत जे काही होणार होते त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग कुणी करू नये. ट्रान्सपरन्सी, अकाऊंटेबिलिटी या गोष्टी परत एकदा आम आदमी पक्षात धारातिर्थी पडल्या.आणि त्यावर कहर म्हणजे बैठकीत बाऊन्सरना पाचारण केले गेले.अरे ही राजकीय पक्षाची बैठक होती की दारूच्या बारमधली किंवा पबमधील बाचाबाची होणार होती? बाऊन्सर कशाला हवे होते त्याचे कारण लगेच कळलेच.पक्षाच्या केंद्रीय समितीचे हरियाणातील सदस्य रहमान यांनी कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही बाजूंना आपले म्हणणे मांडायची संधी मिळाली पाहिजे अशी रास्त मागणी केली तर त्यांना बाऊन्सरकरवी मारहाण करण्यापर्यंत आम आदमी पक्षाची मजल गेली. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलाच्या बैठकाही यापेक्षा सुसंस्कृत वातावरणात होत असतील!! मग बैठकीत जे होणार हे माहितीच होते ते झाले. योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची केंदिय समितीमधून हकालपट्टी करण्यात आली. हे झाले ते थोडे म्हणून आता राजेश गर्ग यांचा नवीन आरोप आजच आला.म्हणे अरूण जेटली आणि इतर भाजप नेत्यांच्या नावाने केजरीवालांच्या वतीने कोणीतरी वेगळेच फोन करून आमदारांना प्रलोभने दाखवत होते!! इतकेच काय तर रामदासांचीही लोकपाल पदावरून हकालपट्टी करण्यात आली.म्हणे त्यांचा कार्यकाळ २०१३ मध्येच संपला होता.मग २०१४ च्या लोकसभा आणि २०१५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठीचे उमेदवार त्यांनी क्लिअरन्स दिल्याशिवाय उभे केले गेले होते का?आता तुम्ही काहीही हवे ते बोला.तुमची विश्वासार्हता धुळीस मिळाली आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे मोठा नैतिकतेचा आव आणत असाल तरी तो बुरखा सेकंदभरही टिकायचा नाही. नंतर काय तर म्हणे कुमार विश्वासांना पक्षाच्या एका कार्यकर्तीबरोबर आक्षेपार्ह स्थितीत त्यांच्याच पत्नीने रंगेहात पकडले असा आरोप कुणी केला आणि त्या आरोपाला केजरीवालांनी महत्व दिले म्हणून कुमार विश्वास रूसून बसले होते.तो आरोप खरा आहे की नाही याच्यात मला काडीमात्र इंटरेस्ट नाही.पण तुम्ही ही जी फुकटचे मनोरंजन करून देत आहात त्याची मात्र किंमत करता येणे केवळ अशक्यच आहे. अरे काय चालू काय आहे?कसला पोरखेळ चालवला आहे हा केजरीवालांनी?मधल्या काळात कारभाराचे तीनतेरा वाजले ते वेगळेच.म्हणे भाजपच्या ताब्यातील महापालिका भ्रष्टाचारामुळे आणि अकार्यक्षमतेमुळे तोट्यात आहेत म्हणून त्यांना पैसे द्यायला सरकारने नकार दिला.म्हणे केंद्र सरकारकडून पैसे या महापालिकांनी आणावेत असे सरकारने म्हटले.भाजपच्या ताब्यातील या महापालिकांचा कारभार उत्तम आहे असे कोणीच म्हणणार नाही.पण त्यांच्याकडे २०१२ ते २०१७ या काळासाठी लोकांचे मॅन्डेट आहे हे कसे नाकारता येईल?महाराष्ट्रातील १५ वर्षाच्या आघाडी सरकारच्या कालावधीत मुंबई महापालिका सेना-भाजपकडे होती. सुरवातीला विलासराव १९९५ ते १९९९ या काळातील युती सरकारने राज्य सरकारला कर्जाच्या खाईत लोटले असा आरोप नेहमी करत असत.तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांना पैसे द्यायचे राज्य सरकारचे कर्तव्य त्यांनी आणि इतर मुख्यमंत्र्यांनीही पार पाडले.समजा बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल सत्तेत आला.त्या पक्षाने बिहारची काय वाट लावली होती हे सर्वमान्यच आहे.तेव्हा मोदी सरकारने आम्ही बिहार सरकारला पैसे देणार नाही---तुम्ही कार्यक्षम कारभार करू शकत नाही आमच्या हातात सत्ता द्या आणि मग बघा आम्ही कसा कारभार करून दाखवतो असे म्हटले तर ते कसे समर्थनीय ठरेल? लोकांनी २०१७ पर्यंत भाजपला महापालिकेत मॅन्डेट दिले असेल तर ते सर्वांनी मान्य केलेच पाहिजे--जरी कोणाला ते आवडले नाही तरी. मग काय तर पूर्व दिल्लीच्या महापालिकेकडे सफाई कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे राहिले नाहीत आणि सफाई कर्मचार्यांनी संपच सुरू केला. दिल्लीच्या रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य माजले आहे अशा बातम्या आहेत.दिल्लीवाल्यांच्या दु:खात मी सहभागी आहे पण सगळे काही फुकट पाहिजे म्हणून अडाण्यांना निवडून दिले तर त्याचे परिणाम भोगायचीही तयारी असली पाहिजे.तेव्हा दिल्लीकरांनो २०२० पर्यंत (आणि तुम्हाला हवे असेल तर त्यानंतरही) असाच सावळागोंधळ दिल्लीमध्ये सुरू राहणार आणि त्याची तयारी ठेवा. या सगळ्या भानगडीत केजरीवाल समर्थकांची भूमिका मात्र आश्चर्यकारक आहे.ज्यांना तुम्ही मोदीभक्त म्हणता त्याच मोदीभक्तांपैकी बहुतेकांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादीची मदत घेणे, मसरत आलमला सोडणे अशा निर्णयांना अगदी जाहिरपणे विरोध केला होता.पण तुम्ही का मूग गिळून गप्प आहात?की हा जो सगळा तमाशा चालू आहे तो तुम्हाला मान्य आहे असा त्याचा अर्थ घ्यावा का?तुम्ही आम्हाला भक्त म्हणत असाल तर तुम्ही कोण? मी तर म्हणेन या सगळ्या सर्कशीनंतरही केजरीवाल किंवा आआपविरूध काही न बोलणारे लोक भक्त नव्हे तर गुलाम आहेत गुलाम. आणि साधेसुधे गुलाम नव्हे तर केजरूके गुलाम (जोरूका गुलामच्या धर्तीवर). या भानगडीमध्ये नक्की कोणाची बाजू बरोबर आहे हे मला माहित नाही आणि मला त्यात काडीमात्र इंटरेस्टही नाही.तरीही या सगळ्या कोलाहलामध्ये केजरीवालांचा धर्मराजाचा रथ जमिनीवरून चार बोटे वर जात होता तो मात्र जमिनीत कायमचा गाडला गेला हे नक्कीच. माझ्यासारख्या आआपच्या विरोधकासाठी मात्र ही सर्कस म्हणजे अगदी मोठे मनोरंजन करणारी ठरत आहे. आणि या सगळ्यात केजरूच्या गुलामांची अवस्था बघून बाकी काही नाही तरी असुरी आनंद तरी नक्कीच होत आहे.

वाचने 207733
प्रतिक्रिया 893

प्रतिक्रिया

दिल्ली उच्च न्यायालयाचा आप सरकारला झटका; २१ संसदीय सचिवांची नियुक्ती रद्द

In reply to by रुस्तम

मागच्या आठवड्यात दिल्लीला गेलो होतो.माझे हॉटेल होते दक्षिण दिल्लीत अमृतनगर भागात, जो कस्तुरबा नगर विधानसभा मतदारसंघात येतो. कस्तुरबा नगर मतदारसंघाचे आआपचे आमदार मदनलाल हे या २१ संसदीय सचिवांपैकी आहेत.किमान दोन ठिकाणी रस्त्यावर या मदनलालांचे बोर्ड बघितले. त्यात "विधायक (कस्तुरबा नगर) आणि पार्लामेन्टरी सेक्रेटरी-- दिल्ली सरकार" असाही उल्लेख होता. या २१ आमदारांपैकी काहींनी "आम्ही मंत्र्यांच्या ऑफिसात इंटर्न" म्हणून काम करत आहोत असा दावा केला होता.जर इंटर्न असाल तर मग रस्त्यावर पाट्या लावून ते सर्व जनतेला सांगायचे प्रयोजन कळले नाही. ही पाटी मी उबरमधून बघितली होती आणि त्यामुळे फोटो घेता आला नव्हता. जर दिल्लीतील कुणा मिपाकराने (पटाईतकाका किंवा चित्रगुप्त किंवा अरूण जोशी किंवा अन्य कोणी) अशा एखाद्या पाटीचा फोटो घेऊन इथे दिला तर ते फारच चांगले होईल.

गेल्या काही दिवसात दिल्लीमध्ये आआपच्या सरकारमध्ये आणखी काही शिसारी आणणार्‍या गोष्टी झाल्या आहेत. तर झाले असे की दिल्लीमध्ये डेंग्यू आणि चिकनगुनियाची साथ आली.१२-१५ जणांच्या त्यामुळे मृत्यूही झाला.खरे तर आआपचे सरकार कसा लोकाभिमुख कारभार देऊ शकते हे दाखवून द्यायची संधी या साथीच्या निमिताने मिळाली होती. दिल्ली सरकारमध्ये गृहमंत्री नाही कारण दिल्ली पोलिस दिल्ली सरकारला रिपोर्ट करत नाहीत तर ते केंद्र सरकारला रिपोर्ट करतात.तेव्हा दिल्ली सरकारमध्ये गृहमंत्र्याचे कामच नाही.पण दिल्लीच्या मंत्रीमंडळात सत्येंद्र जैन हे आरोग्यमंत्री आहेत. याचाच अर्थ दिल्ली सरकारच्या हातात शहरातील आरोग्यसेवा पुरवायचा अधिकार काही प्रमाणात नक्कीच आहे. बाकी काही नाही तरी एकूण ३८ हॉस्पिटल्स दिल्ली सरकारच्या अंतर्गत येतात हे दिल्ली सरकारचेच संकेतस्थळ म्हणत आहे. मान्य आहे की एम्स किंवा राममनोहर लोहिया हॉस्पिटल ही हॉस्पिटल्स केंद्र सरकारच्या अंतर्गत येतात आणि दिल्ली मनपाची काही हॉस्पिटल्स असतीलच त्यावरही यांचा काही अधिकार नाही.पण दिल्ली सरकारच्या अंतर्गत जी हॉस्पिटल्स येतात त्यात या प्रकाराविषयीची व्यवस्थित उपाययोजना करता आलीच असती. परवा टाईम्स नाऊवर एक डॉक्टर म्हणत होता की चिकनगुनिया १००० मध्ये सरासरी एकाचाच मृत्यू घडवतो.म्हणजे जर १२-१५ जणांचा मृत्यू झाला आहे तर याचाच अर्थ १२ ते १५ हजार लोकांना त्याची लागण झाली असली पाहिजे.डेंग्युचे रूग्ण किती असावेत याची कल्पना नाही. म्हणजे करायचे ठरविले असते तर बरेच काही करण्यासारखे होते. पण कसे आहे की स्वतः काही करायचे नाही आणि इतरांवर दोष ढकलायचा ही आमच्या युगपुरूषांची आणि आआपची जुनी परंपरा आहे.त्यातूनच मग बघा कोर्टाने नायब राज्यपालांना दिल्लीचे सर्वेसर्वा ठरविले आहे ना मग त्यांनाच विचारा, मनपांना विचारा वगैरे मखलाशी करून झाली. एक गोष्ट कळत नाही.जर नायब राज्यपालच सर्वेसर्वा असतील तर शीला दिक्षित दिल्लीमध्ये मोठे रस्ते, फ्लाय-ओव्हर इत्यादी कशा काय बांधू शकल्या? कोर्टाचा आदेश काय आहे हे बघायला हवे पण असे दिसते की दिल्लीचे नायब राज्यपाल राज्य सरकारचे प्रस्ताव 'व्हेटो' करू शकतात (जो अधिकार इतर राज्यांच्या राज्यपालांना नसतो).असो. जे काही असेल ते. टाईम्स नाऊ मध्यल्या त्याच कार्यक्रमात पूर्वाश्रमीच्या आआपच्या आणि सध्या भाजपत असलेल्या शाझिया इल्मी म्हणत होत्या की दिल्ली सरकारच्या आरोग्य मंत्रालयाचे चांगले ३००० कोटींचे बजेट आहे.मग त्या बजेटचा वापर करून यांना चिकनगुनियाविषयी काहीही करता आले नाही? दिल्ली मनपांचा कारभार भ्रष्ट आणि अकार्यक्षम आहे हे अगदी जगजाहीर आहे.अशावेळी दिल्लीतल्या ३ मनपा काम करत नसतील तर ते काम दिल्ली राज्य सरकारला करून त्या मनपांना आणि भाजपला तोंडघशी पाडायची अगदी उत्तम संधी होती.आपले युगपुरूष दिल्लीबाहेर काहीही कुठेही झाले तरी तिथे धाव मारतात.मग ती दादरीची घटना असो की रोहित वेमुलाची आत्महत्या असो. पुण्यातल्या एफ.टी.आय.आय ला दिल्लीमध्ये जागा द्यायची तयारी होती त्यांची.म्हणजे आपल्या अधिकारक्षेत्रात येत नसलेल्या अनेक गोष्टींमध्येही नाक खुपसणारे हे युगपुरूष शहरात फॉगिंग करून डेंग्युचे डास उत्पन्न होणार नाहीत या त्यांच्या अधिकारक्षेत्रात येत नसलेल्या (पण दिल्ली मनपांच्या अधिकारक्षेत्रातील) गोष्टीपासून मात्र दूरच राहिले.भाजपवर डाव उलटवायची नामी संधी त्यांनी घालवली नाही का? असो. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी तर अगदीच कहर केला.पत्रकार परिषदेत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर यांचा पारा चढला आणि म्हणे त्यांनी हातातला फोनच भिरकावला.बरं ही साथ सुरू होण्यापूर्वी हे कुठे होते?तर गोव्यातील विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाची व्यवस्था बघायला तिकडे गेले होते.आपले युगपुरूष त्यावेळी पंजाबमध्ये प्रचार करायला आणि नंतर ऑपरेशनसाठी बंगलोरला गेलेले होते.अन्य एक मंत्री हाजसाठी सौदी अरेबियाला गेलेले आहेत. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया कुठे होते तर फिनलंडमध्ये. काय करायला ते तिकडे गेले आहेत? तर फिनिश शिक्षणव्यवस्था जगात सर्वोत्तम आहे आणि त्या पध्दतीच्या शाळा दिल्लीत आणायच्या या उद्देशाने त्या व्यवस्थेचा अभ्यास करायला तिकडे गेलेले आहेत. एकीकडे म्हणायचे की १० रूपयाचे पेन घ्यायचाही अधिकार दिल्ली सरकारला नाही आणि दुसरीकडे त्या शाळांचा अभ्यास करायला फिनलंडला जायचे? म्हणजे तशा शाळा सुरू करायचा अधिकार यांना आहे का या प्रश्नाचे उत्तर आधी शोधून ठेवले आहे का?की करदात्यांच्या पैशावर एक जीवाचे ब्राझील झालेच आहे तसे दुसरे जीवाचे फिनलंडही होऊन जाऊ द्या!!म्हणजे दिल्लीमध्ये साथ आलेली असताना दिल्ली सरकारच्या मंत्र्यांचाच शहरात पत्ता नव्हता.आता परत नायब राज्यपालही न्यू यॉर्कमध्ये होते ते का विचारत नाही हे केजरूच्या गुलामांनी म्हणूनही झाले. पण प्रश्न असा आहे की आम्ही सोडून इतर सगळे चोर आहेत, भ्रष्ट आहेत, अमक्यातमक्याचे एजंट आहेत असली बकवास यांनीच करून ठेवली होती.त्यामुळे जनतेच्या यांच्यापासूनच्या अपेक्षांची पातळी वाढली तर त्यांनी इतरांकडे बोट दाखवून उपयोग नाही. आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांचे म्हणणे की चिकनगुनियाने कोणी मरूच शकत नाही.हे त्यांनी एकदा म्हटले.आणि त्यावर गदारोळ झाल्यावर परत "गुगल म्हणते की चिकनगुनियाने कोणी मरूच शकत नाही" असेही हास्यास्पद विधान केले. एकूणच काय की हे आआपवाले प्रचंड माजले आहेत.मिळालेल्या ७० पैकी ६७ जागांची हवा यांच्या डोक्यात शिरली आहे आणि दिल्लीच्या मतदारांना हे गृहित धरू लागले आहेत.अशा माजोरड्यांचे विमान कधीनाकधी जोरदार आपटतेच. या आआपवाल्यांचे विमानही लवकरात लवकर आपटू दे हीच सदीच्छा.

In reply to by गॅरी ट्रुमन

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांचा फिनलंडमधील शाळांचा अभ्यास अगदीच जोरदार चालू आहे असे दिसते: S दिल्ली सरकारने आपल्या लोकांची सोय लावायला दिल्ली डायलॉग कमिशन म्हणून एक प्रकार चालू केला आहे. त्याचेच प्रमुख म्हणून आशिष खेतानची नियुक्ती झाली आहे. चीनमध्ये डेंग्युच्या डासांचा बंदोबस्त कसा केला गेला याचा अभ्यास करायला हा मनुष्य मागच्या वर्षी चीनलाही जाऊन आला. या दौर्‍यासाठी करदात्यांचे पैसे खर्च झाले पण त्यातून निष्पन्न काय झाले हा प्रश्न विचारायला बंदी का? बाकी काही म्हणा खुद्द केजरीवालचा चेहरा बघून जितकी तिडिक जात नाही तितकी तिडिक या आशिष खेतान आणि आशुतोषचा चेहरा बघून जाते राव!!

In reply to by गॅरी ट्रुमन

गॅरी भाऊ.. तुम्ही कशाला इतके हात धुवून केजरीवालच्या मागे लागला आहात...? मी पुन्हा एकदा सुचवतो आहे, असले प्रतिसाद टाकून तुम्ही काय सिद्ध करत आहात ते एकदा प्लीज बघा. या न्यायाने मोदी ढोल वाजवताना किंवा तेथील कलाकारांची कला बघतानाचा वेळ वाया गेला असे समजायचे का? आपण हाफिसात १००% वेळ कामातच घालवतो का? ब्रेक, विरंगुळा, पूल खेळणे वगैरे कधी ना कधी करतोच ना..? असे उथळ प्रतिसाद तुमच्याकडून अपेक्षित नाहीयेत राव...!!

In reply to by मोदक

गॅरी भाऊ.. तुम्ही कशाला इतके हात धुवून केजरीवालच्या मागे लागला आहात...?
अहो जुनी सवय आहे ती माझी. मी एखाद्याच्या मागे लागलो की काहीही झाले तरी सोडत नाही. म्हणूनच कधीकधी वाटते की मी कधी भूतबित झालो आणि कुणाच्या मानगुटीवर बसलो तर त्या माणसाची खैर नाही :)
मी पुन्हा एकदा सुचवतो आहे, असले प्रतिसाद टाकून तुम्ही काय सिद्ध करत आहात ते एकदा प्लीज बघा.
जे मिपावर इतर कुठलाही लेख/प्रतिसाद लिहून सिध्द करायचे असते तेच :)
असे उथळ प्रतिसाद तुमच्याकडून अपेक्षित नाहीयेत राव...!!
काय उथळ आणि काय खोल हे व्यक्तिपरत्वे बदलेल. तरीही सूचनेबद्दल आभारी आहे.

When you loose balance, you loose credibility too! बाकी ट्रुमन/क्लिंटन साहेबांची मर्जी!

In reply to by संदीप डांगे

When you loose balance, you loose credibility too!
छे हो असे काही होत नसते. तुम्ही स्वतः चार्ली हेब्डो हत्याकांडासारख्या अश्लाघ्य घटनेचे एका अर्थी समर्थन केलेत तरी तुमची क्रेडिबिलिटी कुठे कमी झाली? उलट तुमच्याविषयीचा आदर दिवसेंदिवस वाढतच चाललेला दिसतच आहे की :)

खुद्द केजरीवालचा चेहरा बघून जितकी तिडिक जात नाही तितकी तिडिक या आशिष खेतान आणि आशुतोषचा चेहरा बघून जाते राव!! मुझे तो सब आप वालो के चेहरे एक जैसे हि लगते है

का हो गजोधरवा तुमका खाट मीली का नाही ? उधर यूपी मा कॉंग्रेस ई कहके खाट पंचायत मा लोगन को बुलाती है का भया आव पपु का कॉमेडी शो भी देखने को मीलेगा और जाते समय खाट भी मीलेगी

मरण पावलेल्यांसाठी आअापने मोर्चा काढला होता. उरीमध्ये आपल्याच देशाचे सैनिक शहीद झालेत. अजून एकही आआप नेता/कार्यकर्ता मोर्चा काढणं तर सोडाच, प्रतिक्रियाही देत नाहीये. निदान गाझामध्ये जाऊन तरी मोर्चा काढा राव!

महामहीम मूर्खमंत्री श्री ४२० अरविंद खुजलीवाल यानी आज आपल्या आत्तापर्यंत केलेल्या सर्व गाढवपणावर कळस केला. आज या मूर्खमंत्र्याने उरी हल्ल्याच्या पार्शवभूमीवर भारत पाकिस्तान ची आंतरराष्ट्रीय कोंडी करू पहात असताना कुठल्यातरी एका भिकार लेखाआधारे भारताचीच आंतरराष्ट्रीय कोंडी कशी होत आहे ( परिणामी पाकिस्तान कसा वरचढ ठरत आहे ) असे सिद्ध करणारे ट्विट केले . मोदींविरुद्ध बोलण्याच्या नादात (किंवा त्यांचे प्रयत्न कमी पडले असे उगीचच दाखवण्याच्या नादात) आपण स्वताच्याच देशाची प्रतिमा लीन करत आहोत इतकेही भान आता या मूर्खमंत्र्यास राहिलेले नाही. माझ्या वैयक्तिक मतानुसार या माणसास एखाद्या चांगल्या समुपदेशनाची गरज आहे असे वाटते . ( तसेही ते विपश्यना करून आले पण त्यानंतरही यांचे वागणे पाहता लोकांचा विपश्यनेवरचाच विश्वास उडाला !) असल्या लोकांना मतेच काय पण भर चौकात ... असो. निर्लज्ज नेते , नालायक पार्टी आणि निर्बुद्ध समर्थक असेच यांचे वर्णन करावे लागेल.

In reply to by सुज्ञ

2014 च्या आधीसुद्धा एक मुख्यमंत्री बहुधा अशीच पंतप्रधानांची येत जाता खेचायचा! हि प्रवृत्ती राष्ट्रीय आहे की काय?

आज या मूर्खमंत्र्याने उरी हल्ल्याच्या पार्शवभूमीवर भारत पाकिस्तान ची आंतरराष्ट्रीय कोंडी करू पहात असताना कुठल्यातरी एका भिकार लेखाआधारे भारताचीच आंतरराष्ट्रीय कोंडी कशी होत आहे ( परिणामी पाकिस्तान कसा वरचढ ठरत आहे ) असे सिद्ध करणारे ट्विट केले . हे नीट वाचलेत का ?? येथे प्रश्न पंतप्रधानांविरुद्ध बोलण्याचा नसून एक जबाबदार मुख्यमंत्री आपल्याच देशाची उगीचच नाचक्की करत आहे याचा आहे. थोडे विचार करून लिहीत चला . प्रत्येक धाग्यावर त्यात मांडलेल्या मताविरुद्ध बोलले कि लोक तुम्हाला शहाणे ठरवतात असे नसते.

"लोक आपल्याला शहाणे ठरवतात का मूर्ख" हा व एवढाच विचार अर्धवट बुद्धीच्या लोकांना येतो. असो. इथे फक्त मोदी-विरोधी केजरीवाल बरळतोय म्हणून आकांततांडव केला जात आहे ह्या धाग्यावर हे जगजाहिर आहे. त्याबद्दल सुज्ञ सदस्यांनी थोडा विचार केलात तर आपण मूर्ख समजले जाऊ अशी काही चिंता सतावत आहे की काय? केजरीवाल काय ट्विट करतो, कुठे जातो, काय बोलतो हे बघत बसायला, त्याबद्दल जिथेतिथे जाऊन बोंबाबोंब करत बसायला लोकांना एवढा वेळ कसा काय मिळतो ह्याबद्दल मात्र माझ्या अतिशाहाण्या मेंदूला फार आश्चर्य वाटत आले आहे. 'अरविंद-मोदीविरोधी-केजरीवाल' बद्दल भक्तलोकांचा कायतरी सॉलिड केमिकल लोचा झालेला आहे. विरोधाच्या नादात एका टिनपाट माणसाला दिवसरात्र एवढी प्रसिद्धी मिळवून देण्याचे फुकट काम करत राहणे एक महान कार्य आहे. अभिनंदन!! आणि हो, केजरीवालच्या एका ट्विटने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची नाचक्की होईल अशी भीती बाळगणार्‍यांनी किमान दोन गोष्टी निश्चितच मान्य केलेल्या दिसत आहेत. एकः केजरीवाल जगातली सर्वात प्रभावशाली व्यक्ती आहे. किंवा दुसरी: भारताची प्रतिमा इतकी तकलादु आहे की केजरीवालसारख्या यत्किंचीत माणसामुळे जगभर नाचक्की वगैरे होईल. -संदीप डांगे (अतिशाहाणा मिपाकर)

In reply to by संदीप डांगे

डांगे अण्णा श्री केजरीवाल हे "दिल्लीचे मुख्यमंत्री" आहेत जी भारताची "राजधानी" आहे. त्यांनी इतर वक्तव्ये केली तर गोष्ट वेगळी आहे. परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला कमीपणा आणणारे वक्तव्य टाळले तर जास्त चांगले होईल. उगाच प्रसिद्धीत राहण्यासाठी सवंग वक्तव्य न करणे हि या क्षणाची गरज असताना असे वक्तव्य केले तर त्याला आपली प्रसार माध्यमे अवास्तव प्रसिद्धी देतात. त्यामुळे ते "काय म्हणाले" यासाठी खोदकाम करायची गरज नाही. विरोधाच्या नादात एका टिनपाट माणसाला दिवसरात्र एवढी प्रसिद्धी मिळवून देण्याचे फुकट काम करत राहणे एक महान कार्य आहे. म्हणजे आपल्या मते "श्री केजरीवाल हे टिनपाट आहेत?"

In reply to by सुबोध खरे

म्हणजे आपल्या मते "श्री केजरीवाल हे टिनपाट आहेत?"
>> हाय हाय डॉक्टरसाहेब, तुम्ही शहाणे नाही ह्याचं फार वैट वाटतंय बॉ म्या अतिशाहाण्याला.. =))

In reply to by सुबोध खरे

नै हो, आणि एका गोष्टीची अपरंपार भीती वाटली ती ही की एका देशाच्या राजधानीच्या पदस्थ मुख्यमंत्र्याला 'टिनपाट' म्हटले तर मी अतिशाहाणा आता रोष ओढवून घेणार की काय?
श्री केजरीवाल हे "दिल्लीचे मुख्यमंत्री" आहेत जी भारताची "राजधानी" आहे.
काय की इकडे आड, तिकडे व्हिर झाली आहे - मोदीभक्तांची हो! (हे फक्त शहाण्यांना कळेल) ;) =))

In reply to by संदीप डांगे

अनाठायी आणि अवांछित वक्तव्य करण्यात श्री मार्कंडेय काटजू आणि श्री केजरीवाल यांची चढाओढ लागली आहे काय असे वाटू लागले आहे.

In reply to by संदीप डांगे

विरोधाच्या नादात एका टिनपाट माणसाला दिवसरात्र एवढी प्रसिद्धी मिळवून देण्याचे फुकट काम करत राहणे एक महान कार्य आहे. अभिनंदन!!
या निमित्ताने केजरीवाल हा टिनपाट माणूस आहे हे मान्य केलेत हे काय कमी आहे!!
आणि हो, केजरीवालच्या एका ट्विटने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची नाचक्की होईल अशी भीती बाळगणार्‍यांनी किमान दोन गोष्टी निश्चितच मान्य केलेल्या दिसत आहेत. एकः केजरीवाल जगातली सर्वात प्रभावशाली व्यक्ती आहे. किंवा दुसरी: भारताची प्रतिमा इतकी तकलादु आहे की केजरीवालसारख्या यत्किंचीत माणसामुळे जगभर नाचक्की वगैरे होईल.
म्हणजे मिसळपावसारख्या कोणत्याही क्षणी ४००-५०० पेक्षा जास्त सदस्य नसलेल्या संकेतस्थळावर केजरीवालविरूध्द काही लिहिले तर त्यामुळे केजरीवालला प्रसिध्दी मिळते पण जगभरात कोट्यावधी लोक असलेल्या ट्विटरवर (ज्यात स्वतः केजरीवालच्या ट्विट्सचे काही लाख फॉलोअर्स आहेत---त्यात मी सुध्दा आहे) केजरीवालेन काही लिहिले तर त्यामुळे काहीच फरक पडत नाही? हे लॉजिक काही कळले नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

या निमित्ताने केजरीवाल हा टिनपाट माणूस आहे हे मान्य केलेत हे काय कमी आहे!!
ओ माय माय!!
म्हणजे मिसळपावसारख्या कोणत्याही क्षणी ४००-५०० पेक्षा जास्त सदस्य नसलेल्या संकेतस्थळावर केजरीवालविरूध्द काही लिहिले तर त्यामुळे केजरीवालला प्रसिध्दी मिळते पण जगभरात कोट्यावधी लोक असलेल्या ट्विटरवर (ज्यात स्वतः केजरीवालच्या ट्विट्सचे काही लाख फॉलोअर्स आहेत---त्यात मी सुध्दा आहे) केजरीवालेन काही लिहिले तर त्यामुळे काहीच फरक पडत नाही? हे लॉजिक काही कळले नाही.
केजरीवालच्या ट्विटचे फॉलोअर असणे आणि त्याचे अ‍ॅट द सेम टाईम विरोधक असणे, बात कुच जम्या नै, केजरीवालचे लाखो फॉलोअर आहेत? अरेवा! म्हणजे माणूस दमदार असला पाहिजे नै? मला नै माहित कारण मी टिनपाट माणसांना फॉलो करत बसून माझी ट्विटफीड फालतू ट्विट्सने भरत बसण्यात इण्टरेस्ट नै. इतरांना असा काय इन्टरेस्ट असतो ह्याबद्दल मात्र कुतूहल आहे. बाकी बचा मिपाका स्वाल! तर केजरीमहोदयांच्या ट्विटबद्दल समस्त सोशलमिडियावर दणादण प्रसिद्धी सुरु आहे, ही प्रसिद्धी करणारे खुद्द नामांकित भक्त लोक्स आहेत. केजरी जर काही लाख लोकांपर्यंत पोचत असतील तर हे भक्त त्याला व त्याच्या सुमार ट्विट्स ना कोट्यावधीपर्यंत पोचवण्याचे काम करत आहेत. त्यातलेच एक मिसळपाव हे ४००-५०० सदस्यांचे संस्थळ. लोकांना आपल्या देशाच्या इभ्रतीची इतकीच कळकळ असती तर यावेळी तरी केजरीवालच्या ट्विटला अनुल्लेखाने मारले असते असे माझे मत. पण असोच! बाकी सुज्ञांसि काय सांगणे!

In reply to by संदीप डांगे

केजरीवालच्या ट्विटचे फॉलोअर असणे आणि त्याचे अ‍ॅट द सेम टाईम विरोधक असणे, बात कुच जम्या नै,
का? एखाद्या माणसाला विरोध करायचा त्यासाठी तो माणूस नक्की काय मते ठेऊन आहे हे बघणे गरजेचे नाही का?ट्विटरवर फॉलो केले की आपल्या फिडमध्ये त्या माणसाचे ट्विट दिसतात त्यामुळे तो काय म्हणत आहे हे त्या ट्विटर अकाऊंटवर न जाताही दिसते. असो.
केजरी जर काही लाख लोकांपर्यंत पोचत असतील तर हे भक्त त्याला व त्याच्या सुमार ट्विट्स ना कोट्यावधीपर्यंत पोचवण्याचे काम करत आहेत.
म्हणजे ते सगळे कोट्यावधी लोक केजरीवालचे समर्थक बनणार का? काही कुंपणावरील लोक असतील तर त्यांच्यापर्यंतही केजरीवाल म्हणजे नक्की काय चीज आहे हे पोहोचावे या उद्देशाने कशावरून हा टिवटिवाट शेअर केला जात नसेल?
लोकांना आपल्या देशाच्या इभ्रतीची इतकीच कळकळ असती तर यावेळी तरी केजरीवालच्या ट्विटला अनुल्लेखाने मारले असते असे माझे मत.
देशाच्या इभ्रतीला केजरीवालमुळे धक्का बसणार नाही हो. पण आपल्याकडे सगळ्या गोष्टी फुकटात मिळत असतील तर त्या माणसाला डोक्यावर घ्यायची फार वाईट सवय अनेकांना असते. दिल्लीतल्या मतदारांनी ते दाखवून दिलेही आहे. इतका सावळागोंधळ घालूनही केजरीवाल समर्थक अजूनही आहेतच.त्यांच्यात भर पडू नये म्हणून हा माणूस किती धोकादायक आहे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलेच पाहिजे. बाकी सूज्ञांस सांगणे न लागे.

In reply to by गॅरी ट्रुमन

राजदिप सरदेसाई, बरखा दत्त, तत्सम पत्रकार हे आपले आदर्श नसावेत?
.त्यांच्यात भर पडू नये म्हणून हा माणूस किती धोकादायक आहे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलेच पाहिजे.
परत दोन गोष्टी: एकतर हा माणूस मोदीविरोधक आहे म्हणून धोकादायक आहे. दुसरं असं की हा माणूस धोकादायक असण्याइतपत प्रभावशाली आहे. आय अ‍ॅम स्टिल नॉट गेटिंग द कोअर ऑफ धिस केजरीहेटींग. त्यामुळे आता गॄहपाठ करणे आले. स्वाध्याय: १. आपच्या स्थापने आधी व नंतर केजरीसमर्थकांची संख्या किती होती ते शोधा. २. दिल्लीत दुसर्‍यांदा मुख्यमंत्री होण्याआधी व नंतरची केजरीसमर्थकांची संख्या कीती ते शोधा. ३. केजरीवाल प्रभावशाली आहे की नाही हे शोधा. ४. केजरीवाल धोकादायक आहे म्हणजे काय ते शोधा. लै अभ्यास आहे, क्लिंटन-ट्रुमन राव. मला अशा फालतू विषयांवर वेळ घालवायला आवडत नाही. सो असो. राम राम! येतो. धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

एकतर हा माणूस मोदीविरोधक आहे म्हणून धोकादायक आहे.
हा माणूस मोदीविरोधक आहे आणि धोकादायक आहे हे मी म्हटले आहे. याचा अर्थ हा माणूस मोदीविरोधक आहे म्हणून धोकादायक आहे असा अर्थ कोणी काढत असेल तर मात्र नाइलाज आहे.
दुसरं असं की हा माणूस धोकादायक असण्याइतपत प्रभावशाली आहे.
नक्कीच.
मला अशा फालतू विषयांवर वेळ घालवायला आवडत नाही. सो असो. राम राम! येतो. धन्यवाद!
रामराम. मी कधी तुमच्यावर प्रतिसाद द्यायची सक्ती केली होती?

In reply to by संदीप डांगे

केजरीवाल काय ट्विट करतो, कुठे जातो, काय बोलतो हे बघत बसायला, त्याबद्दल जिथेतिथे जाऊन बोंबाबोंब करत बसायला लोकांना एवढा वेळ कसा काय मिळतो ह्याबद्दल मात्र माझ्या अतिशाहाण्या मेंदूला फार आश्चर्य वाटत आले आहे.
असाच प्रश्न तुमच्या मेगाबायटी प्रतिसादांविषयी इतर मिपाकर मनातल्या मनात विचारत असतीलच की!! काय म्हणता?

In reply to by गॅरी ट्रुमन

निदान माझे मेगाबायटी टिनपाट लोकांबद्दल विनाकारण लिहीत बसून त्यांना विनाकारण प्रसिद्धी देण्यात खर्च होत नाहीत ह्याबद्दल इतर मिपाकर मनातल्या मनात विचार करत असतील तरच ते शहाणे, अन्यथा मूर्खांना तोटा नाही. काय म्हणता?

क्लिंटन:
या निमित्ताने केजरीवाल हा टिनपाट माणूस आहे हे मान्य केलेत हे काय कमी आहे!!
डॉक्टरसाहेब :
म्हणजे आपल्या मते "श्री केजरीवाल हे टिनपाट आहेत?"
आपण दोघेही ह्याच धाग्यावरच्या माझ्या प्रतिसादांना विसरला असाल असे वाटले नव्हते. असो, आठवण करुन देण्याचे पातक करत आहे. http://misalpav.com/comment/683163#comment-683163 इथून पुढे माझा ह्या धाग्यावरचा प्रत्येक प्रतिसाद वाचून घेऊ शकता. बाकी तुम्हा दोघांच्या वर निर्दिष्ट केलेल्या वाक्यांमधून एक वृत्ती स्पष्ट दिसत आहे. ती काय आहे ह्याचा विचार करावा ही तुम्हा दोघा दिग्गजांना नम्र विनंती.

भारतात दोन विद्वान माणसे एकमेकांशी नेहमी असे प्रेमात का बरे बोलत असतात????? एक जपानी राजदूत आपली भारतातील मुदत संपवून जपानला परत जात होता. त्याला निरोप समारंभात विचारले गेले की, "भारतीय माणूस व जपानी माणूस या दोघांमधे तुम्हाला कोणता फरक जाणवला?" तेव्हा त्यांनी उत्तर दिले, "एकटा भारतीय माणूस हा हिरो असतो तर जपानी असतो झिरो. पण जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा भारतीय होतात झिरो आणि जपानी बनतात हिरो."

इथे फक्त मोदी-विरोधी केजरीवाल बरळतोय म्हणून आकांततांडव केला जात आहे >> असे नसून मोदी विरोधात हा माणूस इतका वाहवत गेला आहे कि स्वतःच्या देशाविरुद्ध आपण बोलत आहोत इतकेही भान याला राहिले नाही. हा ह्याचा दुतोंडीपणा आणि विद्वेष जगासमोर आणणे हे त्या ट्विट ला प्रसिद्धी देण्याचे कारण आहे. आपल्याला उठसूट भक्त , मोदी विरोध केल्याने भक्त पिसाळले वगैरे असले बरळण्याने मजा वाटते का ? पण भक्त वगैरे म्हणावे असे काहीच कुणाच्या कुठल्याही पोस्ट मध्ये मला तरी दिसत नाही. केजरीवाल कसा चुकीचा आहे हे दाखवले म्हणजे लगेच सगळे भक्त ? म्हणून म्हणतो नीट विचार करून मग उत्तर देत चला . बाकी आपण म्हणता तसे केजरीवाल टिनपाट असला तरी तो एका केंद्रशासित प्रदेशाचा मुख्यामंत्री आहे त्यामुळे त्याच्या या देशविरोधी ट्विट ला महत्व येते. गल्लीतील पोराने ट्विट करणे व एका (जबाबदार ?) मुख्यमंत्र्याने ट्विट करणे यात फरक नक्कीच आहे . हाच केजरीवाल चा खरा चेहेरा लोकांसमोर आणायचा आहे म्हणून हा प्रयत्न. .. आणि हो त्यांनी काय ट्विट केले हे बघायला मुद्दाम वेळ काढावा लागत नाही किंवा त्यासाठी "भक्त" असण्याची गरज नाही. कदाचित आपण ट्विटर वापरात नसाल किंवा दिवसात बातम्या वाचत नसाल . आपल्या स्वताच्या या अज्ञानामुळे ज्यांना अरविंद काय ट्विट करतो हे माहित आहे व ते इथे मांडतात ते लगेच भक्त होत नाहीत. आधी स्वतःचे अज्ञान दूर करा. केजरीवालच्या एका ट्विटने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची नाचक्की होईल अशी भीती बाळगणार्‍यांनी किमान दोन गोष्टी निश्चितच मान्य केलेल्या दिसत आहेत. एकः केजरीवाल जगातली सर्वात प्रभावशाली व्यक्ती आहे. किंवा दुसरी: भारताची प्रतिमा इतकी तकलादु आहे की केजरीवालसारख्या यत्किंचीत माणसामुळे जगभर नाचक्की वगैरे होईल.>>> ख्या ख्या ख्या . . भीती या ? या ट्विट मुळे श्री ४२० यांचा मूर्खपणा व ते किती खालच्या पातळी चा विचार करतात हे सर्वाना दाखवणे हा मूळ उद्देश होता. आपण भक्त भक्त वगैरे बरळण्याच्या नादात दुसरीकडेच वहावत गेला की . असो. भारतात कोणीही कुठल्याही पक्षाचे समर्थक असावे त्यांच्याशी किमान चर्चा होऊ शकते पण 'आप' या पार्टीचे कोणी समर्थन करत असेल तर त्याला तिथल्या तिथे हणलाच पाहिजे ( शाब्दिक हा ) असे माझे वैयक्तिक मत. कारण या पक्षाचे नेते, वाटचाल व एकंदर विचारधारा पाहता संपूर्ण देशासाठीच हा पक्ष अत्यंत धोकादायक आहे असे मला वाटते. ( आणि हो .. हे केजरीवाल केवळ मोदींविरोधात बोलतो म्हणून बनलेले मत नाही. नाहीतर याल पुन्हा भक्त भक्त वगैरे करत . )

In reply to by सुज्ञ

जबराट प्रतिसाद. शब्दाशब्दाशी सहमत.
भारतात कोणीही कुठल्याही पक्षाचे समर्थक असावे त्यांच्याशी किमान चर्चा होऊ शकते पण 'आप' या पार्टीचे कोणी समर्थन करत असेल तर त्याला तिथल्या तिथे हणलाच पाहिजे ( शाब्दिक हा ) असे माझे वैयक्तिक मत.
माझेही अगदी असेच मत आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

+११११११११११११११११११११११११११

क्लिंटन उपाख्य गॅरी गॅरी ट्रुमन, केजरीवालांच्या कारकीर्दीचे ६० पैकी २० महिने संपण्याच्या आतच या धाग्यावर जवळपास ८२५ प्रतिसाद आले आहेत. केजरीवालांच्या कारकीर्दीचे संपूर्ण ६० महिने पूर्ण होतील तेव्हा या धाग्यातील प्रतिसादांची संख्या २५०० हून अधिक होऊन एक नवा विश्वविक्रम होईल. हे कार्य सिद्धीस नेण्यास श्री केजरीवाल समर्थ आहेतच. लवकरात लवकर विश्वविक्रम होण्यासाठी आम्हीदेखील खारीचा वाटा उचलू असे आम्ही आश्वासन देतो. अवांतर - केजरीवाल जे काही मह्णतात त्याला आता आआपचे नेते सोडले तर इतर कोणी गांभिर्याने घेत असेल असे वाटत नाही. आआपचे फारसे नेतेदेखील आता केजरीवालांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करीत असावेत. पूर्वी केजरीवालांनी काहीही ट्विट केले की लगेच आशुतोष, संजय सिंह इ. वाचाळ मंडळी पत्रकार परीषद घेऊन त्यात तिखटमीठ ओतायचे. आता असे होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

केजरीवाल आणि इतर जण (राहुल गांधी वगैरे) रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर लगेच हैदराबादला धावले होते. सरकारला दलितविरोधी वगैरे शिव्या घालून झाल्या, स्मृती इराणींना मनुस्मृती इराणी वगैरे नावं ठेवून झाली. मिपावरच्या आॅरगॅझ्मिक अाणि विवेकवादी विचारवंतांनी थयथयाट करुन झाला (त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यात आली ते सोडा). पण त्या सगळ्यांचा फुगा आता फुटला आहे. Rohith Vemula's mother faked Dalit status: Panel http://timesofindia.indiatimes.com/city/hyderabad/Rohith-Vemulas-mother… via @timesofindia न्यायमूर्ती अशोक रुपनवल आयोगाने रोहित वेमुलाच्या आईने दलित असल्याचा खोटा दावा केला हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि बाकीही बरेच फुगे फोडले आहेत. ते लोक्स वाचतीलच. पण केजरीवाल पुन्हा एकदा तोंडघशी पडल्यामुळे आज आनंद मनात माझ्या माईना अशी अवस्था आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आलेली आहे. उत्पादनशुल्क गैरव्यवहारप्रकरणी चौकशीसाठी वारंवार समन्स बजावून देखील त्याकडे दुर्लक्ष करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराची ईडीच्या अधिकाऱ्यांनी २१ मार्चला रात्री झडती घेतली. केजरीवालांचे दूरध्वनी जप्त करून त्यांची तब्बल दोन तासांपेक्षाही जास्त काळ चौकशी करण्यात आली. आणि यानंतर केजरीवालांना अटक करण्यात आली.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

खुद्द न्यायालये देखील, CBI आणि ED ला पाठिंबा देत आहेत... कर नाही तर डर कशाला? बाय द वे, केजरीवालांवर नक्की आरोप तरी काय आहेत?

Anna Hazare on Kejriwal: 'मुझे बहुत दुख है...', CM केजरीवाल की गिरफ्तारी पर अन्ना हजारे का आया बयान https://www.jagran.com/politics/national-arvind-kejriwal-news-anna-haza… -------- मेरी बात नहीं सुनी... अन्ना ने आगे कहा कि मैंने केजरीवाल को शराब नीति को लेकर दो बार चिट्ठी तक लिखी, लेकिन उन्होंने मेरी एक नहीं मानी। अन्ना ने कहा कि मेरी बात नहीं मानने का ही ये नतीजा है कि आज केजरीवाल गिरफ्तार हो गए हैं। उन्होंने कहा कि जब मेरे साथ मनीष सिसोदिया और केजरीवाल काम करते थे, तो उन्हें हमेशा कहता था कि जनता की भलाई ही हमारा काम है, लेकिन आज दोनों ने मेरी बात नहीं मानी।

सुशिक्षितांनी राजकारणात उतरायला हवे असे नेहमी म्हटले जाते. केजरीवाल सारख्या शिक्षिताचा राजकारण प्रवेश झाला तेव्हा आशा पल्लवित झाल्या होत्या परंतु सत्ता आणि अबसोल्युट सत्ता प्राप्त झाल्यावरचे कारनामे पाहता निराशाच पदरी पडली. “Power tends to corrupt and absolute power corrupts absolutely” 

In reply to by चामुंडराय

राजकारण आणि शिक्षण यांचा संबंध कधीही नसतो, नाही. फक्त भाबडे लोक असा विचार करतात.