Skip to main content

बाप्पाचा नैवेद्य - कालाजाम

लेखक सानिकास्वप्निल यांनी बुधवार, 07/09/2016 07:01 या दिवशी प्रकाशित केले.
बाप्पाचा नैवेद्यः कालाजाम . साहित्यः २०० ग्राम खवा किसून घेणे १ वाटी पनीर किसून घेणे ५ टेस्पून मैदा दीड टेस्पून दूध २ वाट्या साखर दीड वाट्या पाणी वेलचीपूड व वेलचीदाणे १/४ टीस्पून लिंबाचा रस पिस्ते चांदीचा वर्ख . पाकृ: एका बाऊलमध्ये पनीर चांगले मऊसूत मळून घ्या. किसलेला खवा ही चांगला मळून घ्या. आता मळलेले पनीर, खवा, मैदा, दूध व १/२ चमचा साखर एकत्र करून मळून घेणे. तयार मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करुन घ्या. प्रत्येक गोळ्यात एक पिस्ता व वेलचीदाणे भरून गोल वळून घ्या. गोळे हलक्या हाताने वळा, एकही भेग / चीर पडता कामा नये. . कढईत तूप गरम करायला ठेवावे. एकीकडे पॅनमध्ये साखर + पाणी एकत्र करून पाक करायला ठेवावा. साखर पूर्णपणे विरघळली की त्यात १/४ चमचा लिंबाचा रस घालून घेणे. तूप गरम झाले की तयार गोळे त्यात सोडा. गोळे हळू-हळू वर आले म्हणजे तूपाचे तापमान योग्य आहे असे समजावे. झारा गोलाकार फिरवत रहा म्हणजे सर्व्ह गोळे समान तळले जातील. कालाजाम करायचे आहेत म्हणून थोडे जास्त तळावे लागतात. एकतारी पाक तयार झाली की त्यात वेलचीपूड घालून एकत्र करावे. तळलेले जाम आता कोमट पाकात घालून मुरू द्यावे. कालाजाम मुरायला साधारण ५-६ तास लागतात. तयार कालाजामावर चांदीचा वर्ख लावून सजवावे. . कालाजाम तयार आहेत, बाप्पाला प्रसाद दाखवून सगळ्यांनी याचा आस्वाद घ्यावा :) . .

वाचने 24155
प्रतिक्रिया 43

प्रतिक्रिया

In reply to by अनन्न्या

काहीही गं, तुझ्या पाकृ अप्रतिम असतात, नाविन्यपूर्ण असतात :)

सुंदर सादरीकरण आणि खूप चॅन पाककृती... करून पाहू आम्ही पण पनीर च्या ऐवजी काही दुसरं वापरता येईल का? पनीरला निषेध आहे आमच्या घरी.

व्वा ! मस्तं ! अजून पर्यंत कधी करून पाहिला नाही. आता करून पाहेन. नक्कीच.

सुरेख दिसत आहेत कालाजाम! शेफिल्डचा राजा खुष! :) (ए फ्रा तही करता येतील ग, गुलाबजाम प्रमाणे.) स्वाती

सानिकास्वप्निल ह्यांची पाककृती आहे म्हणजे दुसरा काही विचार करायचाच नाही. नेहमीप्रमाणे मस्त ...

धन्यवाद मिपाकरांनो ___/\___ मिपावर जवळ जवळ वर्षाने पाकृ देतेय. बाप्पाच्या नैवेद्याने पुन्हा पाकृ विभागात आले, सध्या वेळेअभावी इथे येणे होत नाही, यायची इच्छा खूप असते पण आमच्या "टि्वन्सनी" फुल्ल बिझी ठेवले आहे :) आता येत राहीन, जमेल तसे पाकृही देणार आहेच. पुन्हा एकदा सर्व प्रतिसादकांचे मन:पूर्वक आभार.

सुंदर सादरीकरण आणि करण्याची नजाकत पण भारी. साधे गोळे तयार केलेत ते पण किती सुबक, एकसारखे दिसत आहेत. ते तळण्याचे फोटो आले समोर वाचताना तेव्हा मला वाटल अचानक आकाशातले फटाक्यांचे फोटो कुठुन आले मधेच या पाक्रु मधे. मग थोड अजून खाली आले तेव्हा कळ्ळल की ते का.जा. तळायचे फोटो आहेत.:)