मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

घाटवाटांची सायकल राईड - v2.0 - कशेडी घाट (भाग २)

मोदक · · भटकंती
***************************** भाग १ - कुंभार्ली घाट ***************************** चिपळूणमध्ये सकाळी उठलो तेच देशभक्तीपर गाण्यांच्या आवाजाने. आंम्ही मुक्काम ठोकलेल्या हॉटेलच्या शेजारीच एक शाळा + कॉलेज होते त्यामुळे सकाळी अलार्मची गरज भासलीच नाही. गाणी ऐकत ऐकत आवरले.. सहज म्हणून टीव्ही लावला तर बोल्टची १०० मीटरची रेस थोड्या वेळात सुरू होणार होती. मग त्या रेसमुळे आमचे वेळापत्रक कोलमडले.. बोल्टचे सुवर्णपदक बघून आंम्ही हॉटेलच्या डायनींग हॉलकडे मोर्चा वळवला आणि पोहे चहा अशी दिवसाची सुरूवात झाली. या हॉटेलमध्ये बहुदा नाश्ता लिमीटेड होता. आम्ही पहिल्यांदा एक एक प्लेट पोहे खाल्ल्यानंतर पुन्हा दुसरी प्लेट मागवली तर निम्मी प्लेट भरून पोहे आले. दुसर्‍यांदा चहा मागवला तर अर्धा कप चहा आला. :D हॉटेलच्या दारात आमचे फोटो काढून बाहेर पडलो. आजचे टारगेट होते कशेडी घाट आणि शक्य झाल्यास माणगांव. माणगांव जमले नाही तर महाडला मुक्काम. १५ ऑगस्टमुळे पांढर्‍या कपड्यांनी सजलेले लोक्स, विद्यार्थी आजुबाजूने आम्हाला "हे कोण आहेत??" टाईप नजरा देवून जात होते. अनेकदा गाडीतूनच हात करून जात होते. अगदी तीन चार किमी अंतर कापले असेल नसेल तोच ही पाटी समोर आली.. . ती परशुराम घाटाची पाटी होती. आता सिंहगड किंवा पसरणीच्या तुलनेत तसा लहान असलेला परशुराम घाट पार करायचा होता. परशुराम घाटात - अमित . अजून पाऊस आला नव्हता.. . हा असा हिरवाईने ओथंबलेला घाट होता.. . परशुराम मंदिराचे पहिले प्रवेशद्वार.. . वशिष्टी नदीचा झकास व्हू दिसत होता.. . परशुराम मंदिराचे दुसरे प्रवेशद्वार (घाटमाथ्याजवळ आहे) . घाटमाथ्यावर आंम्ही किरकोळ खादाडी केली, पाणी भरून घेतले.. तेथे हे मजेदार दृष्य दिसले.. आधिच सिंगल लेन असलेला तो घाट रस्ता, वाहनांची बर्‍यापैकी गर्दी आणि रस्त्यावर कळपाने बसलेल्या या गाईम्हशी.. . परशुराम घाट चढल्यानंतर लोटेची औद्योगिक वसाहत लागली.. नंतर थोडे थोडे चढ, थोडे उतार असे बराच वेळ सुरू राहिले. लोकांच्या कौतुकाच्या नजरा झेलत आमचा प्रवास सुरू होता. ;) येथे लक्षात राहिले ते दोन जण, एक लहान मुलगा अगदी चौथी पाचवीत असावा इतका लहान.. भारताचा झेंडा हातात घेवून रस्त्याच्या कडेला उभा होता, मी त्याच्या जवळून पार होताना एकदम मला म्हणाला.. "All the best.. टाळी दे..." त्याला टाळी देवून पुढे गेलो. दुसरी एक चिमूरडी शेअर रिक्शात मागे बसली होती. रिक्शाने मला मागे टाकल्यावर अचानक मला सायकल चालवताना बघून तिने आ वासला आणि डोळे विस्फारले.. तिची प्रतिक्रिया इतकी मजेदार होती की मलाच हसू आवरले नाही.. मी हसत हसत टाटा केला तर तिनेही जोरजोरात हात हलवून टाटा केला. :) NH17 वर गाड्यांच्या गर्दीत अमित.. . थोडा थोडा पाऊस सुरू झाला होता.. . वाटेत एका ठिकाणी अमित परत जाताना दिसला म्हणून मी थांबलो व हाक मारून किरणला परत बोलावले. त्यावेळी हा झकास फोटो मिळाला.. . खेड १५ किमी.. . थोड्या वेळाने भोस्ते घाट सुरू झाला.. हा घाट बहुदा उतार असणारा होता कारण आधी काढलेल्या एलेव्हेशननुसार परशुराम घाट आणि कशेडी घाट असे दोनच चढ आजच्या रूटवर होते. . भोस्ते घाट उताराचाच निघाला.. अशाच एका उतारावर.. . काय यमक जुळवले आहे..!! . महाडला पडलेल्या पुलामुळे वाहतुकीत काही बदल आहे का याची माहिती खेड मध्ये काढणे आवश्यक होते. ती माहिती एका बसवाल्याला विचारत असताना मागून "कुठे जायचे आहे तुम्हाला?" अशी विचारणा करत एक जण आला. किरण नामक एक ट्रेकर होता. त्याने सगळी माहिती दिली. कुठून कसे जायचे वगैरे डिट्टेल सांगितले, आगत्याने चहासाठी आग्रह करू लागला. त्याला थॅंक्स म्हणून आंम्ही बाहेर पडलो. किरणनेच जेवणासाठी एक हॉटेल सुचवले होते. तिकडे मोर्चा वळवला. आमटी-भात असा साधा बेत पोटात ढकलला. वर एक एक कोकम सरबतही घेतले. आता आव्हान होते कशेडी घाटाचे.. थोड्या वेळाने कशेडी घाटाच्या डोंगररांगा आणि पाऊस दिसू लागला.. . कशेडी घाट सुरू.. . नो कमेंट्स.. ;) . पाऊस सुरू झाला होता.. . . आमच्या सायकली. कंटेनर आणि पाऊस.. . तेच वळण.. फक्त पावसासोबत.. . तसेच पावसात पुढे निघालो... एक दोन वळणे पार केली.. पावसाचा जोर भरपूर वाढला होता. . . वाटेतले एक सरस्वती मंदिर . वळणावळणाचा रस्ता.. . वाटेत एका धबधब्यावर तिघांनी मिळून क्लिकक्लिकाट करत वेळ घालवला.. . आंम्ही येथून आलो होतो.. . ..आणि इकडे चाललो होतो. . कशेडी घाटात - किरण. . अमित. . मी.. . घाटातच कुठेतरी.. . . . घाटमाथा जवळ आल्यावर सहज मागे वळून पाहिले.. . घाटमाथ्यावर आम्ही एका ठिकाणी कॉफी पीत होतो. तेथे आम्ही बसलो असतानाच एक इनोव्हा येवून थांबली. दार उघडण्याच्या आधीच खिडकीतून रिकामी पाण्याची बाटली बाहेर पडली. नंतर दोन हिरो बाहेर आले. लगेच एक गुड-डे चा पुडा घेवून भटक्या कुत्र्यांना घातला. पुन्हा ते पुड्याचे प्लॅस्टीक इकडेतिकडे फेकले. मग माझा संयम संपला. त्याला हाकारून म्हणालो. "भाईसाब वो रॅपर यहाँ लाके दो. मैं डाल देता हूं डस्टबीनमें" मग तो हिरो ओशाळून सॉरी म्हणाला आणि चिखलातले रॅपर उचलून डस्टबीनमध्ये टाकले. आता पोलादपूरपर्यंत उतार होता.. . पोलादपूर लगेचच पार पडले... पोलादपूर ते महाड हा रस्ता आंम्ही पूर्वी आंबेनळी घाट उतरल्यानंतर एकदा पार केला होता. लगेचच पुढे डावीकडचा रस्ता बंद केलेले बॅरीकेड्स लागले. तो दुर्दैवी पूल समोर आला. . . शिल्लक राहिलेल्या पुलावर पोझ देवून सेल्फी काढणारे पब्लीक.. . पुलाच्या दुसर्‍या बाजुला.. . या पुलावरही व्यवस्थीत खड्डे पडले होते. . महाडला एके ठिकाणी डोसा, चहा वगैरे खाऊन थोडी विश्रांती घेतली.. आज माणगांव गाठणे सहज शक्य होते. NH-17 . गांधारपाळ्याची लेणी. . रस्त्याच्या बाजुला झकास हिरवळ होती . संध्याकाळी ७ च्या दरम्यान माणगांवला पोहोचलो.. . अमित आणि किरण... . आजचा प्रवास.. . येथे पहिला चढ दिसत आहे तो परशुराम घाट, उतरतानाचा भोस्ते घाट.. नंतर कशेडी घाट. . माणगांवला एक हॉटेल शोधले व मुक्काम ठोकला. (क्रमशः)

वाचने 9670 वाचनखूण प्रतिक्रिया 22

जगप्रवासी गुरुवार, 08/25/2016 - 15:51
त्या सावित्री नदीच्या तुटलेल्या पुलावर जाऊन सेल्फी काढणारे महाभाग. दुःखद गोष्टीची आठवण आहे ती, आणि त्याचे कसले फोटो काढताहेत.

In reply to by संदीप डांगे

नाखु Fri, 08/26/2016 - 12:02
अर्थात. या सेल्फीने वात आणलाय नुसता. कुठे गेलो आहोत आणि काय करतोय हे जगाला कळालं नाही तर अगदी आभाळ कोसळणार आहे अस्म वाटतय ह्या काय्प्पग्रस्त सेल्फीवाल्यांना. अडाणी नाखु

सुबोध खरे गुरुवार, 08/25/2016 - 18:22
वा मोदक राव तुम्ही आमच्या गावालाच जाऊन आलात. अर्धा किमी आत गेला असतात तर श्री परशुरामाचे दर्शनही झाले असते आमचे घरही मंदिराला लागूनच आहे. हा सर्व रस्ता अगदी लहानपणापासून पाहत आलोय सर्व मोसमात. बालपणाची आठवण जागृत झाली. तुमचे वर्णन आणि फोटो फारच छान असतात.सगळे भाग आवर्जून वाचतो. लेहचे आणि सायकल वार्यांचेही. बाकी एवढी सायकल चालवायचं "धमक"(स्टॅमिना) आणि धैर्य (PATIENCE) काही माझ्यात नव्हतं /नाही. त्याबद्दल तुम्हाला सलाम--/\--

बाबा योगिराज गुरुवार, 08/25/2016 - 18:29
मोदक भौ, छान लिहिता, फोटू तर एक से एक. दोन्ही लेखमाला सोबत येउद्या. पुलेशु पुभाप्र. आपला वाचक बाबा योगीराज.

बाबा योगिराज गुरुवार, 08/25/2016 - 18:29
मोदक भौ, छान लिहिता, फोटू तर एक से एक. दोन्ही लेखमाला सोबत येउद्या. पुलेशु पुभाप्र. आपला वाचक बाबा योगीराज.

भ ट क्या खे ड वा ला गुरुवार, 08/25/2016 - 20:10
सायकलिंग करावेसे वाटू लागलंय तुमचे लेख आणि फोटो पाहून. या वर्षी मी मध्ये जालोरीपास केल्या पासून सायकलिंग थांबलय

शैलेन्द्र Fri, 08/26/2016 - 18:50
मस्त मी पुण्यात नवीन आलोय, सायकल चालवायला जोडीदार आणि ग्रुप शोधतोय, मिपा वरील सायकलस्वारांचा एखादा ग्रुप आहे का ?

चाणक्य Sat, 08/27/2016 - 19:50
सह्याद्री काय दिसतो पावसाळ्यात. अक्षरशः पारणं फिटतं डोळ्याचं.

पिलीयन रायडर Sun, 08/28/2016 - 07:25
मोदकराव.. कुठे कुठे प्रतिसाद द्यायचेत आम्ही?? काय पायाला भिंगरी लावल्यासारखा पळत असतोस रे! तुझ्या भटकंतीच्या धाग्यांची आता टोटल लागेना मला. हा घाऊक कौतुकाचा प्रतिसाद गोड मानावा! शब्द ऑफिशियली संपलेले आहेत!