Skip to main content

प्रो कबड्डी - सिझन ४

लेखक धर्मराजमुटके यांनी शनिवार, 25/06/2016 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
प्रो कबड्डीचा ४ था मोसम आज २५ जुन २०१६ रोजी सुरु झाला. अती क्रिकेटचा कंटाळा आल्या नंतर मी दुसर्‍या खेळांचा दर्शक होण्याचा प्रयत्न करत होतो. फुटबॉल कडे मन आकर्षित होत होते आणि अचानक प्रो कबड्डीची सुरुवात झाली. साधारण दुसर्‍या सिझनपासून खेळातला रस वाढत गेला. मुंबईकर असल्यामुळे घरची टीम म्हणून 'यु मुंबा' चा नैसर्गीक समर्थक आणि नंतर चाहता बनलो. 'यु मुंबा' ने दुसर्‍या सिझनचे विजेतेपद पटकावल्यानंतर त्यांचा वाट्याला आलेले प्रेम वेगवेगळ्या ठिकाणी दिसून आले. ३ र्‍या सिझनच्या अंतिम फेरीतील निसटता पराभव मनाला काही काळापुरता टोचत राहिला. या सगळ्या पार्शभुमीवर ४ था सिझन फार लवकर घोषीत झाला तेव्हा कबड्डीचे ही क्रिकेट होणार काय ही शंका मनाला चाटून गेली. काय होते ते पुढे कळेलच मात्र प्रो. कबड्डीमुळे कबड्डीला वलय लाभतेय व मातीतल्या रांगड्या खेळाडूंना चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत हे पाहून मनास आनंद देखील होत आहेत. अनुप कुमार, राकेश कुमार, रिशांक देवाडिगा, मनजित चिल्लर, नरवाल आडनावबंधु, निलेश शिंदे, फजल अत्रांचली (इराण), जां कुं ली (कोरिया) (नाव लिहिण्यात चुकले असल्यास दुरुस्ती सुचवावी) आणि इतर खेळाडुंनी प्रेक्षकांना भरभरुन आनंद दिलाय. या सिझनमधे यु मुंबाचे बरेच तगडे खेळाडू इतर संघांनी खरेदी केले आहेत. जवळपास ५०% संघ नवीन आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरु नये. या खेळात मिनिटामिनिटाला रंग बदलत असल्यामुळे शेवटपर्यंत रंगतदार लढती होत आहेत. त्यामुळे यावेळचे विजेते कोण असतील याचा अंदाज लावणे सद्यातरी अवघड आहे. यंदा पहिल्यांदाच महिला संघ देखील खेळत आहेत. माझ्या माहितीप्रमाणे केवळ दोनच संघ असून एकच सामना होईल. अधिक माहितीसाठी प्रो कबड्डीची अधिकृत वेबसाईट बघता येईल. प्रो कबड्डी सिझन्सचे आत्तापर्यंतचे विजेते याप्रमाणे. सिझन १ : जयपुर पिंक पँथर्स सिझन २ : यु मुंबा सिझन ३ : पटना पायरेटस =================================================== प्रो कबड्डी सिझन ४ चे संघ खालीलप्रमाणे (कंसात माझ्या आवडत्या खेळाडूंची नावे) १. बंगाल वॉरीयर्स (निलेश शिंदे /जां कुं ली / सुरजित नरवाल / विशाल माने / महेंद राजपूत) २. बंगळूरु बुल्स ( मोहित चिल्लर / सुरिंदर नाडा) ३. दबंग दिल्ली ( काशिलींग आडके) ४. जयपुर पिंक पँथर्स ( शब्बीर बाप्पू / राजेश नरवाल / रण सिंग) ५. पटना पायरेटस ( फजल अत्रांचली / बाजीराव होडगे / प्रदिप नरवाल) ६. पुणेरी पलटण ( मनजित चिल्लर / अजय ठाकूर / दिपक निवास हुड्डा) ७. तेलुगु टायटन्स (संदिप नरवाल / राहुल Chaudhari) ७. यु मुंबा (अनुप कुमार / राकेश कुमार / रिशांक देवाडीगा / जीवा कुमार) यंदा एकूण संघांमधला मराठी टक्का देखील लक्षणीय रित्या वाढलेला आहे. सात संघ आणि जवळ जवळ ३५ दिवस हे सामने रंगणार आहेत. तर चला, आपल्या मातीत जन्मलेल्या या खेळाचा आनंद घेऊ या आणि चर्चा करत राहूया. ==================================================

वाचने 35894
प्रतिक्रिया 147

प्रतिक्रिया

In reply to by नाखु

+१

In reply to by नाखु

+१

In reply to by नाखु

सहमत.

दिवस २० वा : सामना क्र. ३४ : पुणेरी पलटण वि. तेलुगु टायटन्स आजचा हा सामना फास्ट फॉरवर्ड प्रकारातला होता. तेलुगु टायटन्सच्या राहुल चौधरी ने पहिल्याच चढाईत जोगींदर ला बाद केले तर त्यानंतरच्या लगेचच्या दुसर्‍या चढाईत पुण्याच्या अजय ठाकूर ने सुपर रेड करत ३ गुणांची वसूली करीत टायटन्सला पहिला धक्का दिला. सामन्यादरम्यान धावफलक सतत हलता होता. नॉट अ सिंगल वेटींग मोमेंट. पुण्याच्या दिपक निवास हुड्डा ने आज पहिल्या सत्रात उत्तम खेळी पेश केली. पहिल्या सत्राच्या सातव्या मिनिटाला तर तेलुगु टायटन्स सर्वबाद झाली. पहिल्या सत्राअखेर पुणे १७ गुणांवर तर तेलुगु टायटन्सकडे १५ गुण होते. पुण्याकडे २ गुणांची आघाडी होती. मात्र दुसर्‍या सत्रात फासे उलटे पडले आणि साधारण २६ व्या मिनिटाच्या खेळात तेलुगु टायटन्सने जोरदार पुनरागमन करीत पुण्याला सर्वबाद करीत दोन गुणांची आघाडी घेतली. पुण्याकडून आज दिपक निवास हुड्डा, अजय ठाकूर यांनी चांगला खेळ केला तर तेलुगु टायटन्सच्या बाजूने सुपरस्टार चढाईपटू रोहित चौधरीने आज सुपर १० गुण कमविले. तर त्यांचाच भरवशाचा खेळाडू निलेश साळुंके ने चढाईत ४ गुणांची कमाई केली. मात्र कर्णधार मनजित चिल्लरच्या अनुपस्थितीत अखेर शनिवारवाड्याचा बचाव ढासळला, गड पडला आणि सामना गमाविला. केवळ एक खेळाडूचा अनुपस्थितीत पुण्याचे हे हाल होणार असतीत तर ती चिंताजनक बाब आहे. मात्र दिपक हुड्डा ला आजच्या सामन्यासाठी पुर्ण गुण दिले पाहिजेत. त्याने एकूण ९ गुण घेतले तर रविंदर पहल ने पकडींमधे ५ गुणांची कमाई केली. अजय ठाकूर ने सुपर रेड मधे ३ गुण घेतले पण त्यानंतर त्याला काही प्रभाव दाखविता आला नाही. एकंदरीत हा एक "लागुभागु टोला" होता असेच म्हणावे लागेल. तेलुगु टायटन्सच्या राहुल चौधरी ने आज प्रो कबड्डीच्या ४ मोसमात ४०० गुणांचा महत्त्वपुर्ण टप्पा गाठला. या ४०० गुणांत तब्बल २० सुपर १० चा समावेश आहेत. म्हणजे २०० गुण केवळ २० सामन्यांत ! संदिप नरवाल ने आज देखील त्याच्या लौकीकाला जागत पकडी करत ६ गुणांची कमाई केली. मात्र पंचांबरोबर वाद घातल्यामुळे आज त्याला दोन मिनिट मैदानाबाहेर बसण्याची शिक्षा फर्मावण्यात आली. पकड फळीमधे आज टायटन्सच्या विनोद आणी संदिप धुल ने देखील चांगली कामगिरी बजावली. त्यांनी अनुक्रमे ३ व २ गुणांची कमाई केली. पुणेरी पलटण (२९ गुण ) वि. तेलुगु टायटन्स (३२ गुण) - तेलुगु टायटन्स ३ गुणांनी विजयी. ================================================================== दिवस २० वा : सामना क्र. ३५ : बंगळुरु बुल्स वि. दबंग दिल्ली आज दिल्ली ने पुन्हा एकदा धक्कादायक निकालाची नोंद करत बंगळुरु बुल्सचा तब्बल २० गुणांनी पराभव करत त्यांचे पुरते वस्त्रहरण केले. आपल्या घरच्या मैदानावर सर्वच्या सर्व म्हणजे ४ सामने हरण्याचा नीचांकी विक्रम आज बंगळुरु च्या नावावर लागला. या अगोदर हा विक्रम दिल्लीच्या नावे होता. दिल्लीने आपल्या घरच्या मैदानावर ३ सामने हरले होते. आज दिल्ली सुरवातीपासूनच जोशात होती. आषाढी एकादशीच्या मुहुर्तावर काशीला त्याच्या जुना खेळ गवसला आणि "आपला हात भारी, आपला पाय भारी, च्यामायला आपलं सगळचं लै भारी (पण कधी कधीच)" म्हणत आज त्याने चक्क सुपर १० पार करीत आज ११ गुणांची कमाई केली त्याला तितकीच दमदार साथ चढाईपटू सेल्वामणीने दिली. त्याने ६ गुणांची कमाई केली. इराणी दिल्लीकर मिराज शेख ने आपल्या एकमेव यशस्वी चढाईत ५ गुण मिळवत (चढाईचे ३ गुण तर सर्वबाद चे २ गुण) प्रतिस्पर्ध्यांना सर्वबाद करीत खेळाचा नुरच पालटून टाकला. चढाईपटूंनी आज जे कमवून आणले ते आज पकडफळीने राखले आणि त्यात भर देखील घातली. डि सुरेश कुमार (३ गुण), सचिन शिंगाडे (३ गुण) तर प्रशांत चव्हाण (२ गुण) आणि संकेत चव्हाण (१ गुण) अशा ७ च्या ७ ही खेळाडूंनी वाहत्या चंद्रभागेत हात धुवून घेतले. बंगळुरु बुल्सचा कर्णधार सुरिंदर नाडा आज सामन्यात गैरहजर होता. त्याची कमतरता संघाला आज नक्कीच जाणवली असेल.त्याच्या अनुपस्थित आज प्रतिस्पर्ध्यांनी आरामात बोनस गुणांची कमाई केली. मोहित चिल्लर ची जादू आज चालली नाही. तर स्टार रेडर रोहित कुमार ला आज फक्त १ गुणावर समाधान मानावे लागले. मात्र बदली खेळाडू योगेश हुड्डा (७ चढाई गुण) आणि पवनकुमार सेहरावत (३ चढाई गुण) ने आज चांगला खेळ पेश केला. आशीष सांगवान आणि अन्य खेळाडू जवळपास निष्प्रभच दिसले. एकंदरीत भारतीय क्रिकेट आणि कबड्डी यांत साम्यस्थळे शोधायची ठरली तर व्यक्तीकेंद्रीत खेळ. जेव्हा जेव्हा सामन्यात सुनिल, सचिन, विराट, धोनी चालला नाही तेव्हा तेव्हा सामना हातातून गेला. मात्र जे संघ व्यक्तीकेंद्रीत नाहित त्यांना कबड्डीत तरी नक्कीच विजयाच्या संधी जास्त आहेत. आता हेच बघा ना ! बंगळुरुचा रोहित कुमार चढाई गुणांचा तक्त्त्यात अव्वलस्थानी आहे मात्र त्याचा संघ सलग ४ वेळा हरतोय. काशी किंवा मिराज खेळला तर संघ जिंकतोय, मनजित नसेल तर संघाचे व्यवस्थापन कोसळतेय. याला अपवाद पाटणा, जयपुर चा संघ नक्कीच आहे. निदान आत्तापर्यंतच्या खेळात तरी. प्रदिप नरवाल नाही खेळला तर राजेश मोंडल खेळतोय, जसवीर मैदानात नसेल तर शब्बीर खेळतोय. मुंबई इज स्टील अंडरडॉग. असो. तर दिल्ली आज चढाई आणि पकडी या दोन्ही आघाड्यांवर उत्तीर्ण झाली आणि या मोसमातल्या आपल्या ३ र्‍या विजयाची नोंद केली. दबंग दिल्ली (४०गुण) वि. बंगळुरु बुल्स (२० गुण) : दबंग दिल्ली २० गुणांच्या प्रचंड फरकाने विजयी. उद्या परत रक्तदाब वाढविणारा सामना. पटणा वि. मुंबई ! विजेत्यांचे अभिनंदन ! राहुल चौधरीचे विशेष अभिनंदन ! उद्या परत भेटू या, शुभरात्री ! बंगळुरु बुल्स आज १७ व्या आणि ३६ व्या मिनिटाला असे मोजून दोनदा सर्वबाद झाले.

In reply to by धर्मराजमुटके

मस्तच...मॅच पाहता आल्या नाही म्हणून काय झालं? तुमचं अगदी डिटेल विश्लेषण ती कसर भरून काढतेय.
उद्या परत रक्तदाब वाढविणारा सामना. पटणा वि. मुंबई !
वाट पाहतोय. मुंबई जिंकावी हीच सदिच्छा!

सर्वच प्रतिसादकांचे आणि वाचकांचे विशेष आभार. आपल्या सहभागामुळेच सलग २० दिवस लिहू शकतोय. सध्या ही तात्पुरती पोहोच समजा. डिट्टेलवारी आभार समारोपाच्या प्रतिसादात करीन म्हणतो ! धन्यवाद !

यू मुंबाला सावरता आलं नाही. पटनाची बॉडी लयांग्वेज मुंबापेक्षा कितीतरी पटीने भारी होती. देवाडीगा, अनुपकुमार, रॉकेश यांच्या राईड्स वर पॉईंट्स मिळालेच नाहीत. मुंबाला सामन्यात परतता आलेच नाही.पटना भारी खेळतात आणि जिंकतात. पटनाच या प्रो कबड्डी चे विजेते राहतील असे वाटते. मुंबाला हरतांना पाहून वाईटच वाटत होतं, जिंकतील असं एकदाही वाटलं नाही. जयपूर बंगळूर सामन्यात बंगळूर सुरेख खेळली. -दिलीप बिरुटे

दिवस २१ वा : सामना क्र. ३६ : बंगॉल वॉरीयर्स वि. जयपुर पिंक पँथर्स आजचा हा सामना पुन्हा एकदा धक्कादायक निकाल देऊन गेला. बंगाल वॉरीयर्स ने आज पहिल्या स्थानावर असलेल्या जयपुर पिंक पँथर्सला चक्क ७ गुणांनी पराभूत केले. आज पहिल्या सत्रात १४ व्या मिनिटाला जयपुर संघ सर्वबाद झाला. घरच्या मैदानावर झालेल्या पहिल्याच सामन्यात सुरुवातीपासूनच बढत घेतली. बंगालच्या यान कुं ली ने आज सुपर १० च्या पलीकडे जाऊन या मोसमातला आपला पहिलावहिला चांगला परफॉर्मन्स दाखविला. त्याने आज १३ गुणांची कमाई केली. त्याला सुरजित नरवालने ६ गुण घेऊन चांगली साथ दिली. आज निलेश शिंदे ने देखील चांगला खेळ दाखवित पकडी करुन ४ गुणांची कमाई केली. आज बंगालच्या ७ पैकी ६ खेळाडूंनी गुणाची कमाई केली. जयपुरचा कप्तान जसवीर सिंग आणि राजेश नरवाल आज अजिबातच प्रभाव टाकू शकले नाही. मात्र त्यांचा बदली खेळाडू अजय कुमार ने देखील सुपर १० करत ११ गुणांची कमाई केली. जयपुरची पकड फळी आज अजिबात प्रभाव टाकू शकली नाही. जयपुर (२५ गुण) वि. बंगाल वॉरीयर्स (३२ गुण) : बंगाल ७ गुणांनी विजयी. ===================================================================== दिवस २१ वा : सामना क्र. ३७ : पटणा पायरेटस वि. यु मुंबा आजच्या सामन्याचा निकाल अपेक्षीत असा लागला. मात्र यु मुंबाने लाजीरवाणा पराभव स्वीकारत मनाला फार वेदना दिल्या. सुरुवातीच्या पहिल्या १० मिनिटांमधे दोन्ही संघ तुल्यबळ वाटत होते मात्र त्यानंतर पटणाने जी आघाडी घेतली ती शेवटपर्यंत टिकवून ठेवली. पटणाचा स्टार चढाईपटू प्रदिप नरवाल आज चालू शकला नाही. मात्र राजेश मोंडल ने नेहमीप्रमाणेच चांगला खेळ केला. त्याने आज ८ गुणांची कमाई केली तर धर्मराज शेलराथन ने आज पकडींमधे ७ गुणांची कमाई केली. एकंदरीतच आज पटणाची चढाई व बचाव अभेद्य होता. आज पटणाच्या सर्वच्या सर्व खेळाडूंनी गुणांची कमाई केली. मुंबईच्या बचाव / पकड फळीने आज बर्‍याच चुका केल्या. पकड फळीने या मोसमात एखाद दुसरा सामना वगळता चुका करण्यात सातत्य दाखविले आहे. रिशांक देवाडीगा आज पहिल्या सत्रात अजिबातच चालला नाही मात्र दुसर्‍या सत्रात त्याने वेगवान खेळ करुन ७ गुणांची भर घातली. मात्र तो "देर आया, दुरुस्त नही आया". अनुप कुमार आज केवळ २ गुण मिळवू शकला. आज मुंबई दोन्ही सत्रात एक एक वेळा अशी २ वेळा सर्वबाद झाली. पटणा पायरेटस (३४ गुण) वि. यु मुंबा (२४) गुण : पटणा १० गुणांनी विजयी. विजयी संघांचे अभिनंदन ! उद्या परत भेटूया ! शुभरात्री.

दिवस २२ वा : सामना क्र. ३८ : पुणेरी पलटण वि. जयपुर पिंक पँथर्स पुणेरी पल्टण वि. जयपुर पिंक पँथर्स चा सामना हा दोन तुल्यबळ संघातला सामना असणार होता. आजच्या सामन्यात शेवटपर्यंत चुरस बघायला मिळाली. मात्र जयपुर ने पुण्याला दोनदा सर्वबाद करत आघाडी घेत हा सामना ६ गुणांनी जिंकला. पुण्याच्या दिपक निवास हुड्डा आणि अजय ठाकूर ने आज चढाईत प्रत्येकी ९ गुणांची कमाई केली. मनजित चिल्लर ला आज पकडीतल्या फक्त २ गुणांवरच समाधान मानावे लागले. जयपुरच्या संघात राजेश नरवाल व जसवीर सिंग यांनी प्रत्येकी ७ गुणांची कमाई केली तर अजय कुमार ने ५ गुणांची कमाई केली. आज शब्बीर बापूने मैदानात फक्त आपली हजेरी लावली. अमित हुड्डा ने पकडीत ३ गुण तर रण सिंग ने २ गुणांची कमाई केली. चढाईमधे दोन्ही संघ तुल्यबळ होते मात्र पकडींमधे जयपुर ने वर्चस्व गाजविले आणि २ वेळा सर्वबाद झाल्यामुळे पुण्यावर पराभूत होण्याची पाळी आली. या सामन्यात मनजित चिल्लर ला एक वेळा ग्रीन कार्ड देण्यात आले. (ग्रीन कार्ड म्हणजे खेळाडूस त्याच्या गैरवर्तनाबदद्ल दिलेली तंबी असते). आजच्या सामन्यात पंचांचा सावळागोंधळही बघायला मिळाला. हा गोंधळ या ४ थ्या मोसमात वारंवार जाणवतोय. बरेचदा पंचांनी दिलेले निर्णय टीव्ही अंपायर ने फिरविलेले आहेत. हा खेळच एवढा वेगवान होतो की पंचांची नजर फारच ती़क्ष्ण हवी. मात्र ३ र्‍या पंचांच्या रुपाने खेळाडूंना एक नवीन आधार मिळाला आहे हे निश्चित. मात्र एकदा एखाद्या संघाने केलेले अपील फेटाळले गेले की त्याला सामन्यादरम्यान परत अपील करता येत नाही. तेव्हा मग मैदानावरच्या पंचाचा निर्णय अंतिम असतो. जयपुर पिंक पँथर्स (३३ गुण) वि. पुणेरी पलटण (२७) गुण - जयपुर ६ गुणांनी विजयी. ================================================================ दिवस २२ वा : सामना क्र. ३९ : पटणा पायरेटस वि. बंगाल वॉरीयर्स हा सामना जवळ जवळ एकतर्फी होईल आणि त्यात पाटणा सहज जिंकेल असा माझा होरा होता पण बंगालच्या खेळाडूंनी तो चुकविला. आज सुरुवातीपासूनच बंगाल ने पटणावर आघाडी घेतली. जवळ जवळ ३० मिनिटांच्या खेळात पटणाचा स्टार प्रदिप नरवाल एकही गुण घेऊ शकला नाही. मात्र शेवटच्या १० मिनिटांत प्रदिपची पटणा एक्सप्रेस सुस्साट सुटली आणि त्याने बंगालचा हातातोंडाशी आलेला विजय हिरावून नेला. इतका की शेवटी बंगाल ने नांगी टाकली व हार पत्करली. पटणाच्या बाजूने प्रदिप नरवाल ९ गुण, सुरजित सिंह ६ गुण, राजेश मोंडल ३ गुण अशी चढायांमधील आकडेवारी होती तर पकडफळीत फजल अत्राचलीने ७ गुण तर धर्मराज शेलरथन ने ३ गुणांची कमाई केली. बंगालच्या बाजूने आज नितिन मदने दुखापतीमुळे गैरहजर होता. मात्र त्याच्या अनुपस्थितीत मोनु गोयत ने चढाईत ९ गुण तर सुरजित नरवालने ३ गुणांची कमाई केली. यांग कुंग ली ने देखील ७ गुणांची कमाई केली. तर पकडफळीत अमित चिल्लर ने ४ आणि विशाल माने ने २ गुणांची कमाई केली. कर्णधार निलेश शिंदे आज प्रभाव दाखवू शकला नाही. पटणा आज पकडींमधे किंचीत सरस ठरल्यामुळे सामना जिंकून गेले. मराठी माणूस युद्धात जिंकतो तर तहात हारतो ह्या म्हणीचा प्रत्यय बंगालचा खेळ पाहताना येतो. बंगालच्या संघात मराठी खेळाडूंचा भरणा सर्वाधिक आहे. बंगाल बर्‍याचदा पहिल्या सत्रात उत्तम कामगिरी करतो मात्र ती दुसर्‍या सत्रात टिकवून ठेवत नाही. इथे त्यांचे डावपेच कमी पडतांना दिसतात. पटणा पायरेटस (३३ गुण) वि. बंगाल वॉरीयर्स (२७) गुण - पटणा ६ गुणांनी विजयी. आजच्या दोन्ही सामन्यांचे वैशिष्ट्य म्हणजे जिंकणार्‍या दोन्ही संघांनी ३३ गुण केले तर पराभूत होणार्‍या दोन्ही संघांनी २७ गुण मिळविले. विजेत्यांचे अभिनंदन ! उद्या पुन्हा भेटूया, शुभरात्री !!

महिला संघांची सुद्धा आज मॅच होती. अधिकतर महिलांचे सामने एकतर्फी होत असल्याने थोडा रसभंग होतो. बाकी बंगालचा आततायी पण त्यांना नडला. अशावेळी अनुप कुमार सारखा " कॅप्टन कूल " हवा.

In reply to by विअर्ड विक्स

आतापर्यंतच्या सर्व सामन्यांत हेच दिसत आलेले आहे. स्वतःकडे असलेली आघाडी त्यांना शेवटपर्यंत राखता येत नाही हेच खरे दुखणे आहे. अगोदरच्या काही सामन्यांमधे त्यांच्या संघात चढाईपटूंची कमतरता होती. मात्र नितिन मदने व मोनू गोयत च्या रुपाने यांग कुंग ली ला चांगली साथ लाभली आहे. पण पकडींमधे ते फारच आतातायीपणा करतात. रेडर कमावतात आणि डिफेंडर गमावतात अशीच गत आहे एकूण ! तरी आज गिरिष एर्नाक बाहेर होता ते एक चांगले झाले नाही तर सामना बरोबरीत सुटण्याच्या ऐवजी गमावला असता.

दिवस २३ वा : सामना क्र. ४० : बंगाल वॉरीयर्स वि. तेलुगु टायटन्स आजचा सामना देखील धक्कादायक ठरला. बंगालने आज सुरुवातीपासूनच टायटन्सवर बढत घ्यायला सुरुवात केली. मात्र टायटन्सने देखील त्याला तोडीस तोड प्रत्युत्तर दिले. मात्र बंगाल हा या मोसमातला गुणतालिकेतला शेवटी असणारा संघ आहे. आणि त्याने शेवटपर्यंत दिलेली लढत तेलुगु टायटन्सच्या खेळाडूंना सर्वस्वी अनपेक्षीत होती हे त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट वाचता येत होते. बंगालतर्फे आज यांग कुंग ली ने चढाईत ११ आणि पकडीमधे १ असे १२ गुण मिळविले. आज त्याचा खेळ खरोखरीच बहारदार झाला. त्याला मोनु गोयत ने ६ गुण तर पकडींमधे विशाल माने ने ५ गुण कमावून चांगली साथ दिली. मात्र आज यांग कुंग ली ने राहूल चौधरीच्या शेवटच्या चढाईत अनावश्यक पकड करण्याचा प्रयत्न करत जिंकणारा सामना हातचा घालवून तो बरोबरीत सोडविला. त्या अगोदरही बर्‍याच वेळ पकड संघाने अनावश्यक चुका केल्या. मात्र आजच्या चुका वेगळ्या प्रकारच्या होत्या. इतर दिवशी संघ विनाकारण / घाईगडबडीच्या निसटत्या पकडी करत होता तर आज काही खेळाडूंनी उत्तम पकडी केल्या मात्र वेळीच इतर खेळाडूंची साथ न लाभल्यामुळे त्या फोल ठरल्या. टायटन्सचा यशस्वी खेळाडू रोहित चौधरी आज बर्‍याच वेळा पकडींमधे बाद झाला. तरी त्याने ८ गुंणांची कमाई केली तर निलेश साळूंके ने सुपर १० करीत १० गुणांची कमाई केली. संदिप नरवाल ने पकडींमधे ६ गुणांची कमाई केली. एकंदरीत हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत हातघाईचा, रोमहर्षक व उत्कंठावर्धक झाला मात्र सामना बरोबरीत सुटल्यामुळे दोन्ही संघातील खेळाडू खूपच नाराज झाले. विशेषतः राहूल चौधरी व यांग कुंग ली. मला देखील बंगालसाठी खुप वाईट वाटले. असो. बंगाल वॉरीयर्स वि. तेलुगु टायटन्स - दोघांना प्रत्येकी ३४ गुण - सामना बरोबरीत सुटला. ----------------------------------------------------------------------------------------------------------- दिवस २३ वा : महिला कबड्डी सामना क्र. ५ : स्टॉर्म क्वीन्स वि. आईस दिवाज सामना सुरु झाल्यावर काही वेळातच वीज गेल्यामुळे हा सामना पुर्ण पाहता आला नाही. मात्र आज स्टॉर्म क्वीन्स ने आपला पहिला वहिला विजय नोंदविला. दोन्ही संघांनी चढाईत केवळ ४-४ गुणांची नोंद केली. मात्र आज आईस दिवाज ची पकड / बचाव फळी कमजोर ठरली आणि त्यामुळेच ते सामना हरले. सामना प्रत्यक्ष न बघता आल्यामुळे संक्षिप्त वृत्तांत देत आहे. स्टॉर्म क्वीन्स (२१ गुण) वि. आईस दिवाज (१५गुण) - स्टॉर्म क्वीन्स ६ गुणांनी विजयी. विजेत्यांचे अभिनंदन ! उद्या पुन्हा भेटूया, शुभरात्री !!

दिवस २३ वा : सामना क्र. ४१ : दबंग दिल्ली वि. तेलुगु टायटन्स अपेक्षेप्रमाणे हा सामना तेलुगु टायटन्स ने मोठ्या फरकाने जिंकला. दबंग दिल्लीचा हंगामी कर्णधार मिराज शेख ने आज चढाईत ८ गुणांची कमाई केली तर सेल्वामणी ने ५ आणि काशिलिंग आडके ने ३ गुणांची कमाई केली. पकडींमधे सचिन शिंगाडे ३, प्रशांत चव्हाण २ आणि डी. सुरेश आणि संकेत चव्हाण यांनी प्रत्येकी १ गुणांची कमाई केली. तेलुगु टायटन्सचा स्टार रोहित चौधरी याने आज चढाईत तब्बल १४ गुणांची कमाई केली. त्याने दोनदा सुपर रेड केल्या. त्याला पकडींमधे संदिप नरवाल आणि जसमेर सिंग गुलिया यांनी प्रत्येकी ५ गुण मिळवून तोलामोलाची साथ दिली. आज निलेश साळुंके १ ही गुण कमवू शकला नाही. आजचा सामना रोहित चौधरी ने जवळ जवळ एकट्याच्या बळावर सामना फिरविला असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. आज त्याने शारीरिक चपळतेबरोबर काही वेळेस आपल्या व्यवस्थापन कौशल्याचे देखील प्रदर्शन घडविले. दोन्ही संघ आज प्रत्येकी एक एक वेळेस सर्वबाद झाले. तेलुगु टायटन्स (३६ गुण) वि. दबंग दिल्ली (२८ गुण) - तेलुगु टायट्न्स ८ गुणांनी विजयी. ============================================================ दिवस २४ वा : सामना क्र. ४२ : बंगाल वॉरीयर्स वि. बंगळुरु बुल्स आपल्या आतापर्यंतच्या किर्तीला जागत बंगालने हा ही सामना स्वतःच्या आततायीपणामुळे प्रतिस्पर्धी संघास बहाल केला. थोडक्यात बंगाल बरोबर खेळतांना समोरचा संघ जिंकत नाही तर त्याला विजय बक्षीस म्हणून मिळतो. नेहमीप्रमाणे सुरुवातीपासून बढत घेतली पण दुसर्‍या सत्रात आततायीपणा करीत पराभव ओढून आणला. बंगालच्या या मानसिकतेचे वर्णन करण्यास मजजवळ शब्द नाहीत. त्यांना पुढील मोसमात कोच बरोबर एका मानसोपचार तज्ञाचीदेखील गरज आहे असे जाणवते. पहिल्या सत्राअखेर बंगालकडे ७ गुणांची आघाडी होती. आज निलेश शिंदे रोहित कुमारच्या पहिल्याच चढाईत बाद झाला. बंगालच्या नितिन मदनेने चढाईत ६ गुण, तर यांग कुंग ली ने ४ आणि मोनु गोयत ने ३ गुण मिळविले. तर पकडफळीत विशाल शिंदे ने ४ गुण आणि सी अरुण ने ३ गुणांची कमाई केली. बंगळुरु बुल्सच्या बाजूने रोहित कुमार ने ८ गुण, आशिष कुमार ७, विनोद कुमार ४, योगेश हुड्डा आणि सुरिंदर नाडा प्रत्येकी ३ तर मोहित चिल्लर ने १ गुणांची कमाई केली. बंगाल वॉरीयर्स (२५ गुण) वि. बंगळुरु बुल्स (२७ गुण) - बंगळुरु २ गुणांनी विजयी. ================================================== आजच्या पराभवाने बंगाल्चे या मोसमातील आव्हान संपुष्टात आले आहे. उद्यापासून चे सामने मुंबईत होणार आहेत. उद्या पहिला सामना यु मुंबा वि. पुणेरी पलटण - पुण्याने केलेल्या मानहानीकारक पराभवाचा बदला मुंबई घेऊ शकेल ? की उद्या परत एकदा पुण्याचीच सरशी होईल ? बघूया काय होते ते.

दिवस २५ वा : सामना क्र. ४३ : यु मुंबा वि. पुणेरी पलटण हुश्श ! जिंकलो एकदाचे !! आजचा सामना संपल्यावर माझ्या तोंडातून प्रथम हेच उद्गार बाहेर पडले. आजचा संपूर्ण सामना श्वास रोखून ठेवायला लावणारा होता. शेवटपर्यंत कोण जिंकेल हे सांगता येणे अशक्य होते. पुण्याचा कप्तान मनजित चिल्लर आज सामना खेळणार नव्हता हे समजताच मुंबईच्या समर्थकांच्या अपेक्षा नक्की उंचावल्या असणार. मनजित चिल्लर हा एकटा एका संघाच्या तोडीस तोड आहे असे म्हटले तरी वावगे ठरु नये. पहिल्याच चढाईत मुंबईच्या कॅप्टन कुल अनुप कुमार ने १ गुण वसूल करुन मुंबईचे खाते उघडले. त्यानंतर लगेच पुणेरी पलटणच्या संघाने चढाईवर गेलेल्या रिशांक देवाडीगाची शिकार केली आणि काळजाचा ठोकाच चुकला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी गुणवसूलीचा सिलसिला सुरु झाला तो काही थांबायचे नाव घेत नव्हता. पहिल्या सत्रात १७ व्या मिनिटाला पुणेरी पलटण सर्वबाद झाली. त्यावेळी मुंबई १४ गुणांवर होती तर पुणे ९ गुणांवर होती. मात्र दुसर्‍या सत्राच्या सुरुवातीलाच पुण्याच्या अजय ठाकूर ने आणि दिपक निवास हुड्डा ने चांगला खेळ करत मुंबईची आघाडी कमी केली व नंतर मुंबईवर आघाडी घेतली. आज पुणेरी संघ २ वेळा सर्वबाद झाला. शेवटपर्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात आज दोन्ही संघांनी उत्तम कामगिरी केली मात्र पकड फळीच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर यु मुंबाने हा सामना खिशात घातला. घरच्या मैदानावर आज यु मुंबाचा विजय चाहत्यांना दिलासा घेऊन गेला. यु मुंबाच्या बाजुने अनुपकुमार ने चढाईत ९ आणि पकडीत २ अशा तब्बल ११ गुणांची कमाई केली तर सुरजित ने आज पकडींमधे ५ गुणांची कमाई केली. सुरजितच्या आजच्या जवळजवळ सर्वच पकडी जबरदस्त ताकदीचे आणि वेळेचे नियोजन दर्शविणार्‍या होत्या. मागच्या काही सामन्यांत आपला खेळ हरविलेल्या रिशांक देवाडिगाने आज ५ गुण मिळविले. तर राकेश कुमार ने पकड आणि चढाई मिळून ४ गुण घेतले. पुणेरी च्या अजय ठाकूर आणि दिपक निवास हुड्डा या नेहमीच्या यशस्वी कलाकारांनी अनुक्रमे ९ आणि ७ गुणांची कमाई केली. पकडींमधे सोमवीर शेखर ने ४ तर जोगींदर नरवाल ने ३ गुण घेतले. रविंदर पहल च्या खात्यावर आज काही जमा झाले नाही. यु मुंबा (३४ गुण ) वि. पुणेरी पलटण (३१ गुण) - यु मुंबा ३ गुणांनी विजयी. ========================================================== दिवस २५ वा : महिला कबड्डी सामना क्र. ६ वा : स्टॉर्म क्वीन्स वि. फायर बर्डस सुरुवातीचे सामने चाचपडत खेळणार्‍या स्टॉर्म क्वीन्स ने आजचा सामना मोठया फरकाने जिंकला. स्टॉर्म क्वीन्सच्या तेजस्विनी बाईने चढाईत ३ गुण तर ज्योती ने २ गुण मिळविले तर पकडफळीत साक्षी कुमारी (४ गुण), मोती चंदन (३ गुण), दिपीका जोसेफ (३ गुण) , क्षितीजा हिरवे (१ गुण) तर सोनाली इंगळे ने चढाईत १ आणी पकडींमधे २ अशा ३ गुणांची कमाई केली. फायर बर्डस च्या चढाईपटूंना आज उल्लेखनिय कामगिरी करता आली नाही व त्याचा फटका बसून ते पराभूत झाले. पुर्ण सामन्यात ममता पुजारी, कर्णधार (२ गुण) आणि बदली खेळाडू रिंजू के. (२ गुण) अशी केवळ ४ चढाई गुणांची कमाई झाली तर पकडींमधे किशोरी शिंदेने ५ गुण आणि सुवर्णा बारटक्के ने २ गुणांची कमाई केली. एकट्या किशोरीचे पकडफळीतील गुण संघातील सर्व चढाई गुणांपेक्षा जास्त ठरले. स्टॉर्म क्वीन्स (२२ गुण) वि. फायर बर्डस (११ गुण) - स्टॉर्म क्वीन्स १० गुणांनी विजयी. ======================================================= यापुढील महिला कबड्डी सामना फायर बर्डस वि. आईस दिवाज असा असेल व त्यात जिंकणारा संघ आणि स्टॉर्म क्वीन्स यांच्यात अंतिम लढत होईल. उद्या परत भेटूया ! शुभरात्री !!

In reply to by धर्मराजमुटके

काल अनुप चा खेळ लाजवाब होता. त्याची कमीत कमी कॅलरीज खर्च करून जास्तीत जास्त पॉईंट घेण्याची कला आणि नजाकत खरचं वाखान्नय आहे.

In reply to by धर्मराजमुटके

वूमन्स कबड्डी लीग अगदीच रटाळ चालू आहे. फक्त तिसर्‍या डू ऑर डाय रेड वरच गुण मिळवण्याचा प्रयत्न करतात.. त्यापेक्षा मग महाराष्ट्र कबड्डी लीग झाली होती ती बरीच चांगली होती.. गुणफरक थोडा तरी हालला पाहिजे तो अगदीच कूर्मगतीने पुढे जातो.. डू ऑर डाय रेड आहे म्हणून त्या रेडला तरी गुण मिळवण्याचा प्रयत्न होतो.. नाहीतर तेही घडणार नाही... उगाच आपलं इकडून तिकडे जायचं आणि तिकडून इकडे यायचं एवढाच काय तो खेळ होईल...

आज सगळा धागा वाचला. मी रोजचे सामने बघतो पण आज हा धागा वाचुन आत्तापर्यंत झालेल्या सामन्यांची क्षणचित्रे बघितल्यासारखे वाटले. तुमच्या चिकाटीला सलाम!! ह्या हंगामात दिल्लि कडुन पण बरेच मराठी खेळाडू (काशी, सन्केत, प्रशांत चव्हाण, सचिन शिंगाडे) आहेत हे बघून बरे वाटले.

यू मुंबाने घरच्या मैदानावर साखळी सामन्यात अपराजित राहण्याचा विक्रम अबाधित राखला. पहिल्या ३ सीझन पेक्षा फारच वेगळा अनुप दिसत आहे... चढाई बरोबर बचावात पण अग्रेसर !!!! मनजीत नि जसप्रीत प्रमाणे एकटाच raid करतोय !!!!! मान गये उस्ताद ! आजचा सामना अविस्मरणीय होता. शेवटच्या रेडपर्यंत धागधुग होती. बरोबरीत सुटला ... फिंगर्स crossed for यू मुंबा !

दिवस २६ वा : सामना क्र. ४४ : जयपुर पिंक पँथर्स वि. दबंग दिल्ली आजचा दिवस बर्‍याच अर्थाने वेगळा ठरला. आज राष्ट्रगीत म्हणण्यासाठी उपस्थित होती सनी लिओनी. तिने बर्‍यापैकी चांगले गायले. आपली पुर्वीची पॉर्नस्टार ची इमेज बदलत हिंदी सिनेतारका म्हणून तिने बर्‍यापैकी बस्तान बसवत आणले आहे. सुरवातीला अतिशय तिरस्कार किंवा ती तसली आहे म्हणून तिच्याबद्दल सैलपणे बोलणार्‍या जिव्हा आता बर्‍यापैकी मंदावल्या आहे. संयम ठेवला तर विरोधाची धार हळूहळू कमी होत जाते याचे उदाहरण म्हणून या केसकडे पाहता यावे. याबदद्ल सनी नक्कीच अभिनंदनास पात्र आहे. आज सनी लिओनी, सोनु सुद आणि अभिषेक बच्चन, रॉनी स्क्रुवाला अशी खाशी बॉलीवुडी मंडळी सामना बघायास जमली होती. असो, आता सामन्यांबद्द्ल ! आज दिल्लीच्या संघाने पहिल्याच चढाईत जयपुरच्या कप्तान जसवीर सिंह ला मैदानाबाहेर धाडले. आतापर्यंत मला आठवते त्याप्रमाणे पहिला गुण नेहमी चढाईपटूने वसूल केलेला आहे मात्र या सामन्यात प्रथमच पकडफळीने गुण वसूल केला. त्यानंतर लगेच काशिने अजून एक गुण मिळविला. सुरुवातीला दिल्लीच्या बाजूने झुकलेला सामना हळूहळू एकदा इकडे तर एकदा तिकडे असा फिरत फिरत शेवटी जयपुरच्या बाहुपाशांत जाऊन विसावला. दिल्ली से निकली गाडी जयपुर चले होले होले ! दिल्ली पहिल्या सत्रातल्या ११ वा मिनिटाला सर्वबाद झाली. पहिल्या सत्राच्या अखेरीस जयपुरकडे १४ गुण होते तर दिल्लीकडे ११. दिल्लीच्या बाजूने कर्णधार मिराज शेख ने आज अप्रतिम खेळी करत चढाईत ८ तर पकडींमधे ३ अशा भरघोस गुणांचा मालक ठरला. काशिलींग ने ४ गुणांची कमाई केली तर सेल्वामणीने फक्त २ गुणांची कमाई केली. पकडींमधे सचिन शिंगाडे आणि प्रशांत चव्हाण यांना प्रत्येकी २ गुण मिळाले. जयपुरच्या वतीने जसवीर सिंह ने सर्वाधिक ७ गुण, अजय कुमार ५ गुण, राजेश नरवाल २ गुणांची कमाई केली तर पकडींमधे अमित हुडा आणि रण सिंह यांनी प्रत्येकी ३ तर रोहित राणा ने १ गुणांची कमाई केली. शब्बीर बापू ला आजही खाते उघडता आले नाही. जयपुर पिंक पँथर्स (२४ गुण) वि. दबंग दिल्ली (२२ गुण) - जयपुर २ गुणांनी विजयी. ========================================================= दिवस २६ वा : सामना क्र. ४५ : यु मुंबा पँथर्स वि. तेलुगु टायटन्स आजच्या दिवसाच्या मोस्ट अवेटेड सामना म्हणून या सामन्याची नोंद झाली. मन म्हणत होते की मुंबई जिंकावी तर मेंदू सांगत होता की टायटन्सचे आव्हान कडवे आहे. त्यांचा संघ कितीतरी पटीने उजवा आहे. मात्र या दिल और दिमागच्या खेळात दोन्हींची बरोबरी होऊन सामना बरोबरीत जिंकला. यु मुंबाने पहिल्या सत्राअखेर मिळविलेली ७ गुणांची आघाडी दुसर्‍या सत्रात पकडफळीच्या चुकांमुळे गमाविली तर काही वेळाने तेलुगु टायटन्स जवळपास ५-६ गुणांच्या फरकाने मुंबईच्या पुढे निघून गेले. तेलुगु टायटन्सच्या स्टार राहूल चौधरी ला आज मुंबईने पहिल्या सत्रात सतत बाहेर बसविले. मात्र दुसर्‍या सत्रात त्याने त्याची पुर्ण भरपाई केली. त्याने आज ८ गुणांची कमाई केली तर निलेश साळूंकेची आजची कामगिरी सरस झाली नाही. त्याला केवळ २ गुणांवर समाधान मानावे लागले. आज टायटन्सच्या पकडफळीतील खेळाडूंनी त्यांचा नेहमीचाच उत्कॄष्ट खेळ केला. संदिप नरवाल (६ गुण), जसमेर सिंह व संदिप धुल प्रत्येकी २ गुण तर विनोद ने एक गुण ची कमाई केली. मुंबईच्या वतीने अनुप कुमार (६ गुण), राकेश कुमार (चढाई व पकडीत प्रत्येकी ३ असे ६ गुण), सुरेशु कुमार (३ गुण ), रिशांक देवाडिगा (२ गुण), बदली खेळाडू विकाश (१ गुण) अशी कमाई चढाईत झाली तर पकडफळीत जीवा कुमार, सुरजित ला प्रत्येकी २ गुण मिळाले. एकंदरीत आज यु मुंबाचा बचाव परत एकदा कमजोर पडला. राकेश कुमारने अखेरच्या चढाईत जे दोन गुण मिळविले ते व शेवटच्या चढाईत विकाश कुमार ने मिळविलेला १ गुण यांच्या जोरावर आज यु मुंबा तेलुगु टायटन्सला बरोबरीत रोखू शकली. राकेश ने जे २ गुण मिळविले ते खरोखरीच अप्रतिम होते त्यामुळेच त्याला आजच्या 'मोमेंट ऑफ दि मॅच' पुरस्काराने गौरविण्यात आले. खरे तर आज टायटन्स जिंकायचे मात्र विकाश कुमारच्या शेवटच्या चढाईत संदिप नरवाल ने अति आत्मविश्वास दाखवित त्याला पकडण्याचा प्रयत्न केला व तो त्याच्या अंगाशी आला. शेवटच्या क्षणाला केलेल्या ह्या चुकीमुळे टायटन्सला सामना बरोबरीत सोडवावा लागला. आज मैदानावर पुन्हा एकदा पंचांची ढिसाळ कामगिरी दिसून आली. एकतर मुंबईने पहिल्या ३-४ मिनिटांतच आपला रिव्हियु गमावला. दुसर्‍या सत्रात तशीच पाळी तेलुगु टायटन्सवर आली. मात्र रिशांक देवाडिगा चढाई करुन येत असतांना संदिप कुमारने लगेच पाठलाग करुन त्याला बाद केले. वस्तूतः दुसरा खेळाडू राकेश कुमार जीवनदान मिळाल्यामुळे मैदानात आला देखील नव्हता. तसेच एकदा राकेश कुमार बाद नसतांना देखील पंचांनी घाईगडबडीने त्याला बाद दिले. ह्या दोन तांत्रिक चुकांचा फटका मुंबईला नक्कीच बसला. यु मुंबा (२५ गुण ) वि. तेलुगु टायटन्स (२५ गुण) - सामना बरोबरीत सुटला. ======================================================= आज यु मुंबा जिंकले नाहीत मात्र घरच्या मैदानावर अजून एकदाही न पराभूत न होण्याचा यु मुंबाचा विक्रम आजदेखील कायम राहिला याचेच आज समाधान मानावे लागले. विजेत्यांचे अभिनंदन ! उद्या परत भेटू या ! शुभरात्री !! आणि धाग्यावर प्रतिसाद देऊन हुरुप वाढविणार्‍या प्रतिसादकांचे तसेच मुक वाचकांचे देखील शतशः आभार. प्रत्येकजणाला प्रतिसाद देऊ शकत नसला तरी धाग्याची एकंदरीत वाचनसंख्या देखील आपले प्रेम दाखविण्यास पुरेसी आहे. पुन्हा एकदा धन्यवाद !

In reply to by धर्मराजमुटके

पंचाची मदत घेण्याची पद्धत अजून निर्दोष आणि पारदर्शक हवी (विशेष्तः बोनस गुणाचे वेळी) एकाच बाजूने कॅमेरा अअँगल दाखवितात, लेखमाला भन्नाट आणि वर्णण तर सुसाट... नितवाचक नाखु

In reply to by नया है वह

चढाईपटुचा एक पाय बोनस रेषेवर असताना दुसरा पाय हवेत हवा असा नीयम आहे, नुसता बोनस रेषेवर पाय घासुन आल्यास बोनस मीळत नाही, बर्‍याच वेळेस चढाईपटु सुधा बोनस बद्दल शासंक असतो, अश्यावेळी तो मागे वळुन आपल्या संघातल्या खेळाडुंकडुन खात्रि करुन घेतो."सकाळ" च्या माहीती प्रमाणे बूटामध्ये चीप लाउन कसे काय बोनस कळेल. मला सुचलेला एक उपायः जसे क्रीकेट मध्ये यष्ट्यांमध्ये कॅमेरे असतात तसा "हाय स्पीड (स्लो मोशन)" कॅमेरा निदान रेषा आणी बोनस रेषा ह्यांच्या मध्ये चीत्रा मध्ये दाखवल्या प्रमाणे मॅट्वर लावावा. test

In reply to by धर्मराजमुटके

दिवस २६ वा : सामना क्र. ४४ : जयपुर पिंक पँथर्स वि. दबंग दिल्ली मिराजने प्रत्येक चढाईत ३० सेकंदातील शेवटी उरलेल्या ४/५ सेकंदात गुण मेहनतीने कमावून आणले होते, ते सचिन शिंगाडेने उगाच घाई करून घालवले आणि सामना जयपूरच्या हवाली केला. काशीला सध्या "ग" पणाची बाधा झाल्यासारखी वाटतेय, वेगळाच ऍटीट्युड घेऊन तो मैदानात वावरत असतो आणि त्यामुळे समोरच्या टीम मधील खेळाडू त्याला सहजरित्या पकडतात. गेल्या मोसमातील काशी यावेळेला वेगळाच वाटतोय.

In reply to by धर्मराजमुटके

हरता हरता बरोबरीत राहिली धड़धड़ वाढवली या सामन्याने.... -दिलीप बिरुटे

दिवस २७ वा : सामना क्र. ४६ : जयपुर पिंक पँथर्स वि. पटणा पायरेट्स मजबूत पटणा पायरेटसला नमवत आज जयपुर ने हा सामना खिशात घालून उपांत्य फेरीत दिमाखदार प्रवेश केला. उपांत्य फेरीत प्रवेश करणारा जयपुर हा या मोसमातला पहिला संघ आहे. आज जयपुरच्या वतीने अजय कुमार ने सर्वात जास्त म्हणजे ७ चढाई गुणांची कमाई केली तर राजेश नरवाल (४ गुण) आणि जसवीर सिंह (३ गुण) अशी त्याला चढाईत साथ मिळाली. अमित हुड्डा ने आज दिमाखदार पकडी करत ५ गुणांची कमाई केली तर रण सिंह ने १ गुणाची कमाई केली. पाटण्याच्या प्रदिप नरवालने चढाईत ७ गुण घेतले मात्र जयपुर ने त्याला बरेच वेळ बाहेर बसविले. दुसरा चढाईपटू सुरजित सिंह हा देखील आज बर्‍यापैकी यशस्वी ठरला. त्याने चढाईत ५ गुणांची कमाई केली. राजेश मोंडल ला आज केवळ १ गुण मिळाला. आज पटणाची पकडफळी सपशेल अयशस्वी ठरली. बाजीराव होडगे, कुलदीप, फजल अत्राचली, धर्मराज या सगळ्यांनीच नाम बडे और दर्शन छोटे असा खेळ केला. पकडफळीत कुलदीप व फजल ला प्रत्येकी २ गुण मिळाले तर बाकी खेळाडू आज खाते उघडू शकले नाही. पटणा संघ आज २ वेळा सर्वबाद झाला. पंचांच्या ढिसाळ कारभारामुळे आज दोन्ही संघांमधे शेवटच्या काही क्षणांमधे बरीच बाचाबाची झाली. दोन तीन वेळा पंचांना आपले निर्णय फिरवावे लागले. जसजसी अंतिम फेरी जवळ जवळ येत जाईल तसतसा चुकीच्या निर्णयांचा फटका संघांना बसल्यास पंचांची अवस्था खराब होऊ शकते. पंच स्वतः तिसर्‍या पंचाचा निर्णय घेऊ शकतात व त्यांनी मनात शंका असेल तर निर्णय रेटून न नेता मदत घ्यायला हवीय ! जयपुर पिंक पँथर्स (२९ गुण) वि. पटणा पायरेट्स (२२ गुण) - जयपुर ७ गुणांनी विजयी. ================================================= दिवस २७ वा : सामना क्र. ४७ : यु मुंबा वि. बंगाल वॉरीयर्स कोणताही विक्रम हा मोडण्यासाठीच बनलेला असतो याचा प्रत्यय आजच्या या सामन्यात आला. बंगाल वॉरीयर्स आजपर्यंत कधीही मुंबईविरुद्ध जिंकले नव्हते. मुंबई कधीही आपल्या घरच्या मैदानावर पराभूत झाली नव्हती. आज हे दोन्हीही विक्रम एका फटक्यात मोडीत निघाले. मोडीत निघाले की रद्दीत निघाले कोणास ठाऊक !! कारण मोडीला थोडा तरी भाव असतो. रद्दी मात्र अतिशय कमी भावाने विकली जाते. बंगालने आज धक्कादायक निकाल नोंदविताना मुंबईला चक्क धुळ चारली. काल सामने संपल्यावर जेव्हा राकेश कुमारची मुलाखत घेतली होती तेव्हा तो म्हणाला होता की बंगालकडे हारण्यासारखे काहीच राहिलेले नाही त्यामुळे ते जास्त धोकादायक ठरु शकतात. आज ते बोल लगेचच खरे ठरले. यु मुंबाचा बचाव / पकड आज अजिबात म्हणजे अजिबातच चालला नाही. बंगालची पकड फळीची ताकत ल़क्षात घेता आज यु मुंबाने जास्त चढाईपटू सामन्यात उतरविले होते मात्र त्याचा परिणाम स्वतःच्याच पकडफळीवर झाला. निलेश शिंदेच्या अनुपस्थितीत आज नितिन मदने कडे कप्तानपद होते. यांग कुंग ली ने आज चांगला खेळ करत चढाईत ८ गुणांची कमाई केली. आज तो शेवटपर्यंत अजिंक्य राहिला. तर मोनु गोयत ने ६ गुणांची कमाई केली. नितीनला आज फक्त १ गुण मिळाला. गिरिश एर्नाक ने आज मजबूत पकडी करत ५ गुणांची कमाई केली तर सी. अरुण (३ गुण), विशाल माने (२ गुण), अमित चिल्लर (१ गुण) अशी पकडफळीची कामगिरी होती. बंगालने आज दोन वेळा मुंबईला सर्वबाद केले. यु मुंबाचा अनुप कुमार (५ गुण), राकेश कुमार (४ गुण), रिशांक देवाडिगा (७ गुण), सुरेश कुमार, विकाश कुमार व नितिन कुमार प्रत्येकी १ गुण अशी चढाईतील कमाई होती. मात्र पकडफळीत जीवा कुमार १ व सुरजित २ गुण याएकूण फक्त ३ गुण मिळविता आले. एकंदरीत यु मुंबाच्या डिफेन्सने आज सर्वात वाईट प्रतीचा खेळ केला. रिशांक देखील अगदी शेवटी शेवटी चालला. राकेश कुमार ने मात्र आजही खेळात सातत्य दाखविले. बंगाल आज शेवटच्या काही क्षणांकरीता सर्वबाद झाली. मात्र उत्तम पकडींच्या जोरावर त्यांनी हा सामना जिंकला. आजचा त्यांचा विजय त्यांना स्पर्धेत परत आणू शकला नाही मात्र मुंबईपुढील आव्हान मात्र अधिक खडतर झाले. आजचा सामना बघून मला आम्हाला शाळेत असलेला डेव्हिड विरुद्ध गोलियथ ह्या धड्याची आठवण झाली. यु मुंबा (२७ गुण) वि. बंगाल वॉरीयर्स (३१ गुण) - बंगाल ४ गुणांनी विजयी. ------------------------------------------------------------------------------------ आपला संघ हरलेला असतांना दु:खी मनाने वार्तांकन लिहिणे फारच अवघड असते मात्र मुंबईने मला ह्यावेळेस ती शक्ती मिळविण्यास मदत केली आहे. बघू आता उद्या काय होतेय ते ! असो. विजेत्यांचे अभिनंदन ! शुभरात्री !!

दिवस २८ वा : सामना क्र. ४८ : पुणेरी पलटण वि. पटणा पायरेटस आजच्या या सामन्यात पटणा पायरेटसने सुरुवातीलाच चांगली पकड घेतली. आज दुखापतीमुळे पुन्हा मनजित चिल्लर संघात सामिल नव्हता. तो नसला की संघाचे मनोधैर्य अगोदरच खच्ची होते की काय अशी परिस्थिती होते. आज पटणाने पुण्याला २ वेळा सर्वबाद केले. पुण्याच्या अजय ठाकूरने चांगली सुरवात केली मात्र दिपक हुड्डा ला २ रे सत्र चालू होईपर्यंत सुर गवसला नव्हता. दुसर्‍या सत्रात दिपक ने बॅकलॉग भरुन काढण्याचा प्रयत्न केला मात्र कबड्डीच्या या खेळात वेगाला फार महत्त्व असते. ४० मिनिटाच्या खेळात शेवटपर्यंत अनिश्चितता असते व काहिही होऊ शकते हे मान्य. मात्र जसजसा वेळ कमी होत जातो तसतसे खेळाडूंवरचा दबाव वाढत जातो व दबावाखाली खेळताना चुका होतात. पहिल्या सत्रातली पिछाडी भरुन काढतांना पुण्याने वेगवान खेळ केला मात्र शेवटी सामना हातचा गमवावा लागला. चढाईत पुण्याच्या दिपक हुड्डा ने ८ गुण, अजय ठाकूर ने ६ गुण तर बदली खेळाडू प्रमोद नरवाल ने धक्कादायक चढाया करत ३ गुण मिळविले. पकडींमधे रविंदर पहल ४ गुण, सोमविर शेखर ३ गुण तर जोगींदर नरवाल ला एक गुण मिळाला. सोनू नरवाल आज खाते उघडू शकला नाही. राजेश मोंडल २ गुण. पटण्याचा यशस्वी चढाईपटू प्रदिप नरवालने नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट खेळ करत चढाईत १२ गुण मिळविले तर सुरजित सिंह ला अवघा १ गुण मिळाला. पकडींमधे बाजीराव होडगे ने ५ गुण, कुलदीप व फजल प्रत्येकी २ गुण, तर धर्मराज ने १ गुण मिळविला. पटणा आज उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. आतापर्यंत जयपुर व पटणा हे २ संघ उपांत्यफेरीत पोहोचले आहेत. पुणेरी पलटण (२८ गुण) वि. पटणा पायरेटस (३१ गुण) - पटणा पायरेटस ३ गुणांनी विजयी. ------------------------------------------------------------------------------------------------- दिवस २८ वा : सामना क्र. ४९ : यु मुंबा वि. बंगळुरु बुल्स हा सामना आज खरोखरीच रक्तदाब वाढवून गेला. हातघाईची लढाई म्हणजे काय हे अनुभवायचे असेल तर आजचा सामना बघण्याला दुसरा पर्यायच असू शकत नाही. सुरुवातीला पुढे असणारी मुंबई दुसर्‍या सत्रात पिछाडीवर पडली. नंतर बंगळुरु बुल्स ने जवळ जवळ १०-१२ गुणांची आघाडी घेतली तेव्हा मुंबई हा सामना हरणार हे निश्चित झाले. मात्र शेवटच्या १२-१३ मिनिटांत मुंबईने इतका तडफदार खेळ केला की ते बघूनच डोळ्याचे पारणे फिरले. शेवटून दुसर्‍या चढाईत दोन्ही संघ बरोबरीत होते. आता आजचा सामना देखील बरोबर सुटणार असे वाटत असतांना राकेश कुमार सामन्याच्या शेवटच्या चढाईत पकडला गेला व बंगळुरु अवघ्या १ गुणांनी विजयी झाली. हा धक्का मुंबईच्या चाहत्यांच्या व खेळाडूंच्या अगदी जिव्हारी लागला. इतका की राकेश कुमार ला मैदानातच रडूच कोसळले. रिशांक, अनुप, राकेश यांनी आज चांगली कामगिरी केली. जीवाने काल व आज चुका अगदी कसोशीने टाळल्या. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत लढणे म्हणजे पराभूत होण्याचे चान्सेस वाढविणे. प्रेक्षकांना जरी अटीतटीचा सामना बघण्यात मजा येत असली तरी स्पर्धेत जिंकण्यासाठी सामना पहिल्यापासून आपलया ताब्यात घेणे केव्हाही उत्तम. आज खरोखरीच अगदी शेवटच्या ३० सेकंदात या सामन्याचा निकाल लागला. मुंबईचा गुणफलक अनुप कुमार (७ ) , राकेश कुमार (४), सुरजित (५), रिशांक देवाडीगा (४), जीवा कुमार (२), गुरविंदर सिंह (१). बंगळुरु बुल्सच्या रोहित कुमारने चढाईत आज केवळ एकदा बाद होत ८ गुण मिळविले तर विनोद कुमार ने २ गुण मिळविले. बदली खेळाडू पवन शेरावत ला १ गुण मिळाला. आज पहिल्या सत्रात एकदम दुबळी भासणारी पकडफळी दुसर्‍या सत्रात चीनची भिंत बनून समोर आली. व पकड फळीत मोहित चिल्लर (५ गुण), सुरिंदर नाडा (३ गुण), आशिष सांगवान (१) गुण अशी गुणांची कमाई केली. यु मुंबा (२७ गुण) वि. बंगळुरु बुल्स (२८ गुण) - बुल्स १ गुणांनी विजयी. ---------------------------------------------------------------------------------------------------------- आजचा सामना बघून मला सीजन ३ च्या अंतीम फेरीतील मुंबई वि. पटणाच्या लढतीची आठवण झाली. तेव्हा देखील शेवटच्या चढाईत मुंबईचा पराभव झाला होता व खेळाडू रडवेले झाले होते. आजचे वार्तांकन लिहायला अजिबातच मूड नव्हता मात्र घेतलेला वसा टाकायचा नाही म्हणून कसाबसा वृत्तांत लिहून पुर्ण करत आहे. विजेत्यांचे अभिनंदन आणि शुभरात्री !! ------------------------------------------------------------------------------------------------------------ आज हे गीत ऐकत ऐकत झोपी जाण्याचा प्रयत्न करणार आहे.

In reply to by धर्मराजमुटके

बंगळुरु बुल्स विजयी होउन सुध्दा हरले. मुंबईचा पराभव झाला असला तरी कमी फरकाने हरल्यामुळे त्यांना १ गूण मिळाला आणि तोच बंगळुरु बुल्स ला महागात पडणार कारण ते आता ३७गुणांच्य च्या पुढे जाउच शकत नाहीत

मुंबाचा म्याच बरोबरीत राहिला असता, असो. मुंबा पिछाड़ीवरुन आघाडीला आली होती. मुंबा जिंकेल असं शेवटी वाटलं पण सुरुवातीचा खेळ पाहता जिंकेल अशी देहबोली नव्हती, ना पकड़ी होत्या... जास्त बचाव मुंबाच्या अंगलट येतो. >>>>>आजचे वार्तांकन लिहायला अजिबातच मूड नव्हता वो मालक असं नाय करायचं. तुमच्या प्रतिसाद आम्ही रेग्युलर वाचतोय ना राव. असं नका करू. लिहित राहा.:) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत. मुटके साहेब, आम्ही वाचतो तुमचे सगळे प्रतिसाद. मॅच पाहताना ज्या गोष्टी लक्षात येत नाहीत ते तुमचे प्रतिसाद वाचून कळतात त्यामुळे मूड असो वा नसो प्रतिसाद जरूर लिहावा ही नम्र विनंती.

दिवस २९ वा : सामना क्र. ५० : दबंग दिल्ली वि. बंगाल वॉरीयर्स आजपासून ४ दिवस कबड्डीचे सामने दिल्लीमधे सुरु आहेत. आजचा हा ५० वा सामना तळाशी असलेल्या दोन संघांमधे होता. बंगाल अगोदरच स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे ते कसे खेळतील ? मुंबईला धुळ चारणारा हा संघ परत एकदा चमत्कार करेल का ? असे अनेक प्रश्न मनात ठेऊन सामना पाहायला सुरुवात केली. मात्र मुंबईला पराभूत करणारा बंगाल आज चक्क "तो मी नव्हेच" असे म्हणत एकदम ढिसाळ खेळला. दिल्लीने सुरुवातीपासूनच तगडी सुरुवात करत आपण अजुनही उपांत्य फेरीच्या स्पर्धेमधे आहोत हे दाखवून दिले. बंगालचा कर्णधार निलेश शिंदे आजही मैदानावर उपस्थित नव्हता. मात्र त्याच्या अनुपस्थितीत बंगालची खेळी अतिशय पुचाट म्हणावी अशी झाली. चढाईपटू मोनु गोयत ने आज उत्तम खेळाचे प्रदर्शन केले. यांग कुन ली ने आज बर्‍यापैकी खेळ केला मात्र त्यांना पकडफळीतून म्हणावी अशी साथ मिळाली नाही. पकडफळीने आज एकदम खराब खेळ केला. गुणफलक : चढाई - मोनु गोयत (चढाईत ८ गुण तर पकडींमधे ३ असे एकूण ११ गुण) यांग कुन ली (५ गुण), नितिन मदने - कर्णधार (१ गुण), बदली खेळाडू रवि दलाल (१ गुण). पकडफळीत गिरिष एर्नाक ला फक्त १ गुण. यावरुन बंगालच्या पकडफळीची कामगिरी लक्षात यावी. दिल्लीच्या काशिलिंग आडके ने आज घरचे मैदान गाजविले. त्याने चढाईत तब्बल १३ गुणांची कमाई केली. तर सेल्वामणी ने ७ गुण घेत त्याला तितकीच तोलामोलाची साथ दिली. मिराज शे़ख - २ गुण पकडफळीमधे डी. सुरेश कुमार, सचिन शिंगाडे, प्रशांत चव्हाण यांनी प्रत्येकी ३ गुण तर अनिल कुमारने २ गुणांची कमाई केली. बंगाल वॉरीयर्स आज चक्क ३ वेळा सर्वबाद झाली. मला वाटते या मोसमात ३ वेळा सर्वबाद होणारी बंगाल बहुधा पहिलाच संघ असावा. प्रेक्षकांनी आज काशिला जणू डोक्यावर घेतले होते असा माहोल होता. दबंग दिल्ली (४१ गुण) वि. बंगाल वॉरीयर्स (२० गुण) - दबंग दिल्ली तब्बल २१ गुणांनी विजयी. आजचा बंगालचा खेळ बघून मी मनातल्या मनात एकच प्रश्न विचारला, "बाबांनो आज जर असेच खेळायचे होते तर मुंबईच्या वाटेत काटे का बरे पेरुन ठेवले ?" ============================================================ दिवस २९ वा : सामना क्र. ५१ : तेलुगु टायटन्स वि. जयपुर पिंक पँथर्स अगोदरच उपांत्य फेरीत पोहोचलयामुळे जयपुर आजचा सामना जास्त मेहनत घेऊन खेळणार नव्हता हे उघड सत्य होते. पण मन म्हणत होते की त्यांनी तेलुगु टायटन्सला हरवावे म्हणजे मुंबईचा उपांत्य फेरीचा प्रवास थोडा तरी सुखकर होईल मात्र तसे घडले नाही. प्रमु़ख खेळाडू जसविर सिंह व शब्बीर बापू आज आराम फर्मावत असतांना इतर खेळाडूंनी सुरुवातीला चांगली सुरुवात केली मात्र नंतर टायटन्सने त्यांचा बचाव भेदत सुंदर खेळ केला. जयपुर तर्फे खेळतांना तुषार पाटीलने आज सर्वाधिक ७ गुण घेतले. त्यापाठोपाठ रण सिंह व महिपत नरवाल प्रत्येकी ३ गुण, राजेश नरवाल व अमित हुडा प्रत्येकी २ गुण अशी संघाची कामगिरी होती. बदली खेळाडू प्रदिप नरवाल व अमित नागर प्रत्येकी १ गुण, तर श्रीकांत तेवठिया यांनी २ गुण कमावले. जयपुर आज चक्क २ वेळा सर्वबाद झाले. आज त्यांच्यात जिंकायचा जुनुन दिसतच नव्हता. मात्र तो दाखवयची त्यांना आवश्यकताही नव्हती हे ही तितकेच खरे ! टायटन्सकडून त्यांचा स्टार चढाईपटू राहूल चौधरी ने चढाईत ११ गुण, निलेश साळुंके ५ गुण तर पकडींमधे विनोद ३ गुण, जसमेर सिंह गुलीया २ गुण, संदिप धुल २ गुण तर सागर क्रिष्णा आणि संदिप नरवाल ने प्रत्येकी १ गुणांची कमाई केली. एकंदरीत आजचे दोन्ही सामने जवळपास एकतर्फीच झाले असे म्हटले तरी चालेल. तेलुगु टायटन्स (३५ गुण) वि. जयपुर पिंक पँथर्स (२३ गुण) - तेलुगु टायटन्स १२ गुणांनी विजयी. उपांत्य फेरीत पोहोचणारा तेलुगु टायटन्स हा ३ रा संघ आहे. ============================================================ विजेत्यांचे अभिनंदन ! प्रतिसादकांचे आणि वाचकांचे आभार आणि शुभरात्री ! परत भेटूया !

दिवस ३० वा : सामना क्र. ५२ : दबंग दिल्ली वि. पटणा पायरेटस मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही या म्हणीचा प्रत्यय सध्या कबड्डीमधे बाहेर पडणारे संघ देत आहेत. आज अगदी असाच प्रत्यय पुन्हा एकदा आला. दबंग दिल्ली ने आज शेवटपर्यंत किल्ला लढविला मात्र शेवटच्या चढाईत पटणा ने काशिची धरपकड करत १ गुणांनी निसटता विजय मिळविला. मात्र पटणा सारख्या संघाला दिल्लीने विजयासाठी शेवटच्या क्षणापर्यंत झुंजविले ते जबरदस्तच होते. याच मोसमात पटणाला दिल्ली ने सर्वप्रथम पराभूत केले होते. आज काशिलींग आडके आणि मिराज शेखने प्रत्येकी ११ गुण कमावले तर सेल्वामणी ने ३ गुण घेतले. पकडीमधे अनिल (३गुण), सचिन शिंगाडे (२ गुण), तर डी. सुरेश कुमार ला १ गुण मिळाला. प्रशांत चव्हाण ची पाटी आज कोरीच राहिली आणि तो जवळ ३ -४ वेळा प्रदिप नरवालकडून बाद झाला. दुसर्‍या सत्राच्या सुरुवातीला दिल्ली सर्वबादवर आली होती मात्र एकटया मिराज शेख ने बाजीप्रभू च्या आवेशात जवळ जवळ ८-१० मिनिटे खिंड लढविली. खरोखरीच त्याचा आजच्या कर्तुत्वाला तोड नाही. यापुर्वी देखील जेव्हा जेव्हा दिल्ली सर्वबाद होण्याच्या जवळ पोहोचली आणि तेव्हा तेव्हा मिराज शेख ने एकहाती किल्ला लढविला आहे. हॅटस ऑफ टु मिराज शेख !! पटण्याचा सुपर हिरो प्रदिप नरवाल ने आज चढाईत ९ गुण, राजेश मोंडल ७ गुण (६ चढाई + १ पकड) , अबुफजल १ गुण, कुलदीप १ गुण तर पकडींमधे फजल अत्राचली ४ गुण, अनिल कुमार २ गुण, विजिन थंगादुराई १ गुण तर बदली खेळाडू हादी १ गुण असा गुणफलक बघायला मिळाला. पटणाच्या प्रदिप ला आज दिल्लीने बरेचदा बाहेर धाडले मात्र त्याच्या अनुपस्थितीत राजेश मोंडल ने किल्ला लढवत प्रतिस्पर्ध्यांना बाद करत प्रदिप ला पुन्हा पुन्हा जीवदान दिले. पटणा संघाच्या प्रदिप व राजेश या दोन्ही खेळाडूंनी या मोसमात सातत्य दाखविले आहे. या दोन्ही पैकी कोणी ना कोणी संघासाठी प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करतच असतो. त्यामुळे या संघाला यंदाच्या मोसमात अंतीम विजयाच्या संधी जास्त आहेत असे मला वाटते. आज पकडी व चढाई दोहोंमधे दिल्ली अव्व्ल राहिले मात्र एकदा सर्वबाद आणि बोनस गुणांच्या जोरावर पटणाने बाजी मारली आणि गुणतालीकेतील प्रथम स्थान पक्के केले. या सामन्याची क्षणचित्र नक्कीच बघा असे सुचवेन. दबंग दिल्ली (३१ गुण) वि. पटणा पायरेटस (३२ गुण) - पटणा पायरेटस १ गुणांनी विजयी. ===================================================== महिला कबड्डी सामना : उपांत्य फेरी - फायर वर्डस वि. आईस दिवाज आज उपांत्य फेरीची लढत फायर बर्डस वि. आईस दिवाज यांच्यात झाली. हा सामना संपुर्ण पाहू शकलो नाही. मात्र शेवटचे काही क्षण पाहता आले. अगोदरच्या सामन्यांप्रमाणे हा ही सामना जवळपास एकतर्फी होऊन फायर बर्डस जिंकले. आईस दिवाज ची कप्तान अभिलाषा म्हात्रे ला आज आपले खाते उघडता आले नाही. सोनाली शिंगटेला चढाईत ३ गुण तर बदली खेळाडू सुमित्रा शर्माला सुपर रेड मधे एकदाच ३ गुण मिळाले. पकडफळीत ललीताचा करिश्मा चालला नाही. खुशबू नरवालला ३ गुण तर मोनू २ आणि रक्षा नारकरला १ गुण मिळविता आला. आईस दिवाज आज एक वेळा सर्वबाद झाले. फायर बर्डस कडून चढाईत बदली खेळाडू के. रिंजू ( ४गुण), मारिया (२गुण) तर कप्तान ममता पुजारी ला १ गुण प्राप्त झाला. पकड फळीत बदली खेळाडू गायत्री हिला ४ गुण तर पायल चौधरी ३ गुण ( पकड -२ गुण, चढाई १ गुण), सुवर्णा बारटक्के (२ गुण), रितु नेगी, मोनिका देवी व किशोरी शिंदे यांना प्रत्येकी १ गुण मिळविला. एकंदरीत आजचा सामना बदली खेळाडूंनीच गाजवला. आईस दिवाज ( १३ गुण ) वि. फायर बर्डस (२२ गुण) - फायर बर्डस ९ गुणांनी विजयी. ============================================= महिला कबड्डीचा अंतिम सामना रविवार दि, ३१ जुलै २०१६ रोजी हैदराबाद येथे फायर बर्डस आणि स्टॉर्म क्वीन्स यांच्यात होईल. उद्या परत भेटूया तोपर्यंत शुभरात्री ! विजेत्यांचे अभिनंदन !!

In reply to by धर्मराजमुटके

एकंदरच ही लिग सगळ्या खेळाडुंसाठी चांगली संधी ठरली आहे, जागतीक पातळीवर स्पर्धांमध्ये इराण हा आपल्या संघाचा कडवा प्रतीस्पर्धीं. विश्वचषकात २वेळा अन्तीम लढत भारत वी. ईराण सामने झाले आणी दोन्ही वेळा भारत वीजयी झाला, २००४ चा वडाळ्याला झालेल्या सामन्याला मी हजर होतो. पंचवीसेक गुणानी भारताने इराण ला हरवलं होतं. सध्याचा इराण्च्या खेळाडुंचा खेळ बघता भवीष्यात इराण आपल्याला भारी पडु शकतो.

In reply to by रघुनाथ.केरकर

तुमच्या मताशी सहमत. फजल अत्राचली, अबोफजल आणि विशेषकरुन मिराज शेख चा यंदाच्या मोसमातला खेळ पाहून मला इराणी खेळाडूंचे फारच कौतुक वाटत आहे. तसेच कौतुक यान कुंग ली चे देखील ! परक्या भुमीतला खेळ यांनी केवळ आत्मसातच केला नाहि तर त्यात विशेष प्राविण्य देखील मिळविले आहे. मी जर यु मुंबाचा मालक असतो तर मिराज ला हवे त्या बोलीवर संघात घेतले असते :) तुमचे प्रतिसाद वाचून मला भारत वि. इराण कबड्डी सामन्यांची रेकॉर्डींग बघाविशी वाटू लागले आहे. बघायला पाहिजे कोठे मिळतात काय ते.

धर्मराज साहेब तुमचे बरं हाय तुम्हाला सर्व सामने पाहता येतात. आम्हाला नऊ नंतर काहे दिया परदेस आणि चाल हवा येऊ ध्य बगाव लागत.

In reply to by पी. के.

होय ! या बाबतीत मी खरोखरीच सुदैवी आहे. मंडळी दुसर्‍या दिवशी ह्या मालिका युट्यूबवर बघतात आणि कधीही रिमोट हातात न देणारा मुलगा अगदी कार्टून्स सोडून देखील माझ्या हातात रिमोट देतो. अशा क्षणी तरी मी स्वत:ला नक्कीच भाग्यवान समजतो. तसे आमच्या घरात सर्वच कबड्डीचे चाहते आहेत त्यामुळे जास्त प्रश्न निर्माण होत नाहित :)

दिवस ३१ वा : सामना क्र. ५३ : पटणा पायरेटस वि. तेलुगु टायटन्स आजचा हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय कमी महत्त्वाचा होता. त्यामुळे मैदानात राखीव / बदली खेळाडूच उतरणार याचा अंदाज होताच. पटणाने एखाद दुसरा खेळाडू वगळता जवळपास सर्वच राखीव खेळाडू उतरविले होते. मात्र तेलुगु टायटन्सने हा ही सामना गंभीरपणे घेत संघात फार थोडे बदल केले. अखेर अनुभवी संघ नवोदितांना भारी पडला आणि तेलुगु टायटन्सने २१ गुणांच्या प्रचंड फरकाने जिंकला. पटणातर्फे आज प्रदिप नरवाल, सुनील कुमार आणि महेश गौड आज बदली खेळाडू म्हणून खेळले. त्यांनी अनुक्रमे २, १ आणि ३ गुणांची कमाई केली. पटणाचा इराणी खेळाडू अबोफजल ने आज स्वतःला सिद्ध करत चढाईत ९ गुणांची कमाई केली. तर आजच्या संघाचा कप्तान हादी याने १ गुण घेतला. पकडफळीमधे केवळ इराणच्या फजल अत्राचलीने ८ गुण मिळविले. इतरांच्या नावासमोर एकही गुण लागला नाही. टायटन्सतर्फे स्टार खेळाडू राहुल चौधरी ने चढाईत ११ आणि पकडींत २ अशा १३ गुणांची मिळकत केली. तर बदली खेळाडू अतुल ने ७ गुण, सुकेश हेगडे ३ गुण आणि प्रपंचन ने १ गुण घेतला. पकडफळीत संदिप नरवाल ने ६ गुण, विशाल भारद्वाज ने चढाईत १ आणि पकडींमधे ४ गुण, रुपेश तोमर ने ३ गुण असा धावफलक होता. पटणा पायरेटस (२५ गुण) वि. तेलुगु टायटन्स (४६ गुण) - टायटन्स २१ गुणांनी विजयी. पटणाचा आजचा धावफलक हा या मोसमातला सर्वोच्च धावफलक होता. ==================================================================== दिवस ३१ वा : सामना क्र. ५४ : दबंग दिल्ली वि. पुणेरी पलटण आजही दिल्लीने पुण्याला शेवटपर्यंत कडवी लढत दिली. मात्र शेवटी पुण्याने हा सामना जिंकला. मनजित चिल्लर आज फक्त मैदानात होता व त्याने फक्त १ च चढाई केली. मात्र त्याची उपस्थिती संघाचे मनोबळ वाढविते याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. पुण्याच्या दिपक निवास हुड्डा ने आज चढाईत चक्क १७ गुणांची कमाई केली तर नितिन तोमर ने ६ गुण कमाविले. अजय ठाकूर ला आज केवळ १ गुणावर समाधान मानावे लागले. पकडफळीत रवींदर पहल ३ गुण तर मनजित चिल्लर आणि जोगींदर नरवाल प्रत्येकी १ गुण. दिल्लीकडून काशिलिंग आडके ने चढाईत ८ आणि पकडींमधे २ असे १० गुण घेतले तर मिराज शेखला ४ गुणांची कमाई झाली. बदली खेळाडू प्रशांत कुमार राय आणि उमेश म्हात्रे अनुक्रमे ४ आणि २ गुण. सेल्वामणी केवळ १ गुण. पकडफळीत अनिल कुमार ४, प्रशांत चव्हाण आणि डि. सुरेश प्रत्येकी १ गुण. सचिन शिंगाडे ला आज खाते उघडता आले नाही. एकंदरीत दिल्लीचा बचाव आज दिपक हुड्डासमोर कोसळून पडला. मात्र सर्वबादच्या स्थितीत आले असतांनाही एकट्या मिराज शेखने जवळपास ५-७ मिनिटे किल्ला लढवत ऑल आऊट रोखून धरला. मिराज खरोखरीच एक जबरदस्त खेळाडू आहे. संकटकाळात तो नेहमीच खंबीरपणे उभा राहिला आहे. आजच्या पराभवामुळे दिल्ली स्पर्धेतून बाहेर फेकली गेली तर पुण्याचे आव्हान अजुन टिकून आहे. मात्र हरणारी दिल्ली उद्या मुंबईचे आव्हान कायम राहू देते किंवा कसे ते उद्याच कळेल. मात्र दिल्लीने गेल्या तीन दिवसांत जो खेळ दाखविला तो अगोदरपासूनच दाखविला असता तर कदाचित वेगळे निकाल पाहायला मिळाले असते. मात्र हे बोलणे म्हणजे आत्याबाईला मिशा असत्या तर ह्या प्रकारातलेच आहे त्यामुळे असो ! दबंग दिल्ली (३४ गुण) वि. पुणेरी पलटण (३९ गुण) - पुणे ५ गुणांनी विजयी. ====================================================== विजेत्यांचे अभिनंदन !! उद्या पुन्हा भेटूया. शुभरात्री !

In reply to by धर्मराजमुटके

कालच्या दिल्ली वी पुणे च्या सामन्यात लक्षात रहाण्या सारख्या दोन गोष्टी होत्या १. कसं खे़ळु नये याचं छान उदाहरण काशी ने दीलं. (डु ऑर डाय चढाई वर बोनस कन्फर्म न करता पट्ठ्या लगेच माघारी परतायचा. ३ च्या कवर मध्ये पण भाई सपोर्ट ला आला नाही.) २. दुसरी म्हणजे दुसर्‍या हाफ च्या १० व्या मिनीटाला मिराज ने मारलेली रेड, अप्रतीम, पुण्याची ७ ची कवर उभी होती, राइट कॉर्नर ला जोगींदर नर्वाल तर लेफ्ट कॉर्नर ला रवींदर पहल, दोन्हि खतरनाक, मीराज ने राईट ला एक अटेंपट करुन लेफ्ट कॉर्नर च्या हाता खालच्या नितिन तोमर ला धावता हात मारायल जात होता, तेवढयात पहल बाहेर आला आणी त्याने वाकुन मिराज चे पाय ब्लॉक करायचा प्रयत्न केला, इथवर बघ्णार्‍याला वाटलं होतं की मीराज ब्लोक झाला, पण सेकंदाच्या १०० व्या हिस्स्याला मीराज ने हनुमान उडी घेत रवींदर पहल ला ओलंडले आणी लॉबीत पोहोचला आणी मध्य रेषा ट्च केली. ज्या पदधतीने मिराज खेळ्तोय ते बघुन वाटत की तो खुप पुढे जाइल.

कालचा सामना बघायला मिळाला. काशी आणि दिल्लीच्या संघाचे वाईट वाटले. @ धर्मराजमुटके साहेब रोज न चुकता तुम्ही update देत असता. कमाल आहे तुमची ! जियो !

दिवस ३१ वा : सामना क्र. ५५ : बंगळुरु बुल्स वि. पुणेरी पलटण आजचा हा सामना पुण्यासाठी अतिशय महत्त्वाचा होता. आजच्या सामन्यातील हार-जीतच पुण्याचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित करणार होती. अखेर मनजित चिल्लर च्या संघाने जिगरबाज खेळी करत सामना जिंकला आणी उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला. पुण्याच्या दिपक निवास हुड्डाने पहिली यशस्वी चढाई करुन लढाईस तोंड फोडले. त्याच्या पहिल्याच चढाईत बुल्सचा महत्त्वाचा मोहरा मोहित चिल्लर गारद झाला. मात्र लगेच दुसर्‍याच चढाईत बुल्सच्या रोहित कुमार ने पुण्याचा खेळाडू बाद करत मोहित ला मैदानात आत आणले. नंतर बंगळुरु ने सलग चांगला खेळ करत पुण्यावर आघाडी घेतली. पहिल्या सत्राअखेरीस पुण्याचे १२ गुण होते तर बंगळुरु बुल्सचे २१. बुल्स ९ गुणांनी आघाडीवर होती. मात्र दुसर्‍या सत्राच्या सुरुवातीपासूनच मनजित चिल्लर ने डावा कोपरा पकडत जबरदस्त पकडी करत बंगळुरुची आघाडी नष्ट करत स्वतः आघाडी घेतली. सामन्याच्या शेवटच्या ४ मिनिटांपर्यंत दोन्ही संघांनी समसमान खेळ केला. मात्र शेवटच्या चार मिनिटात पुण्याने आपला अनुभव पणाला लावत सामना जिंकला. बंगळुरुच्या रोहित कुमारने आज चढाईत ९ गुण घेतले मात्र त्याच्या खेळात नेहमीचा जोश, तडफ आढळून आली नाही. एकतर तो फार दमलेला असावा किंवा उपांत्य फेरीत पोहोचू न शकल्यामुळे मनोधैर्य खच्ची झाले म्हणा, पण आजचा रोहित निस्तेज दिसत होता. बदली खेळाडू योगेश हुड्डा ने आज देखील तडफदार खेळ करत ३ गुण घेतले. तर बदली खेळाडू सुमित सिंह ने अगदी मोक्याच्या क्षणांमधे चांगली कामगिरी करीत चढाई व पकडींमधे प्रत्येकी दोन असे एकूण ४ गुण कमाविले. आशिष कुमार सांगवान चढाई व पकडी यांमधे प्रत्येकी १ असे एकूण २ गुण. पकडींमधे मोहित चिल्लर ६ गुण व चढाईत २ गुण असे एकूण ८ गुण, सुरींदर नाडा ४ गुण, पुणेरी पलटनचा दिपक हुड्डा नेहमीप्रमाणे यशस्वी ठरला. त्याने चढाईत ९ गुण घेतले तर नितिन तोमरने ५ आणि अजय ठाकूरने ३ गुणांची कमाई केली. पकडफळीत आज मनजित चिललर ने जबरदस्त कामगिरी करत चक्क ११ गुणांची लयलुट केली. मला वाटते की पकडफळीत एवढे जास्त गुण घेण्याचा विक्रम बहुधा त्याचा नावे असावा. जोगींदर नरवाल १ गुण. केवळ मनजितच्या उपस्थितीने पुण्याची मानसिक अवस्था जेत्याची बनून जाते हे आज पुन्हा एकदा पाहावयास मिळाले. बंगळुरु बुल्स (३३ गुण) वि. पुणेरी पलटण (३६ गुण) - पुणेरी पलटण ३ गुणांनी विजयी ====================================================== दिवस ३१ वा : सामना क्र. ५६ : यु मुंबा वि. दबंग दिल्ली पुणे जिंकले तेव्हाच मुंबई बाहेर पडणार हे नक्की झाले होते. आज चक्क मुंबई उपांत्य फेरीत जाणार की नाही हे पुण्याच्या हारण्या जिंकण्यावर अवलंबून होते. मात्र "जो दुसर्‍यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला" या उक्तीचा प्रत्यय मुंबईला आला. सामन्याच्या सुरुवातच काशीने चढाईत मुंबईचा गडी बाद करुन केली. सुरुवातीच्या सत्रात ११ व्या मिनिटालाच दिल्लीने मुंबईला सर्वबाद करत त्यांच्यावर आणि मुंबईच्या पाठीराख्यांवर जबरदस्त दडपण आणले. तेव्हा मुंबई होती ६ गुणांवर आणि दिल्लीचे गुण होते १२. चक्क ६ गुणांची आघाडी. दुसर्‍या सत्रात मात्र मुंबईच्या खेळाडूंनी जोरदार पुनरागमन करत दिल्लीवर आघाडी घेतली आणि त्यांना २ वेळेस सर्वबाद केले. मिराज शेख पहिल्या सत्रात बाहेरच होता मात्र दुसर्‍या सत्रात तो मैदानावर बदली म्हणून आला मात्र आज त्याला करीश्मा दाखविता आला नाही. दिल्लीच्या काशिलिंग आडके ने आज चढाईत ७ गुण (चढाईत ६ तर पकडीत १ गुण) घेतले तर प्रशांत कुमार राय ने १० गुणांची कमाई केली. दिपक नरवाल ला २ गुण आणि उमेश म्हात्रे ला ३ गुण (चढाईत १ तर पकडीत २ गुण) मिळाले. पकडफळीत डी. सुरेश कुमार ३ गुण, सचिन शिंगाडे २ गुण. मुंबईच्या वतीने रिशांक देवाडिगा ने चढाईत १० गुण, अनुप कुमार ८ गुण (चढाईत ६ तर पकडीत २ गुण), राकेश कुमार ५ गुण (चढाईत ४ गुण तर पकडीत १ गुण) पकडफळीत जीवा कुमार ३ गुण, सुरजित २ गुण, सुरींदर सिंह १ गुण, तर बदली खेळाडू सुरेशु कुमार ३ गुण (१ चढाई गुण + २ पकडफळीतील गुण). एकंदरीत दुसर्‍या सत्रात मुंबाचा सर्वांगसुंदर खेळ बघायला मिळाला. रिशांक जाता जाता फॉर्मात आला तर ! यु मुंबा (३८ गुण) वि. दबंग दिल्ली (३४ गुण) - यु मुंबा ४ गुणांनी विजयी. ======================================================== या मोसमातल्या साखळीतील हा शेवटचा सामना. आता केवळ २ उपांत्य आणि शेवटी अंतिम सामना असे ३ सामने व्हायचे बाकी आहेत. ३१ जुलै २०१६ रोजी अंतीम सामना होऊन चौथ्या मोसमातील प्रो कबड्डी स्पर्धेचे सुप वाजेल. मुंबई ४ गुणांनी जिंकली मात्र हे गुण त्यांना उपांत्यफेरीत पोहोचवू शकले नाहीत. गुणतालीकेत पुणे व मुंबई दोन्हींचे अंतिम विजयी गुण ४२ होते मात्र एकंदरीत सर्व सामन्यातील एकूण गुणांतील फरकाच्या जोरावर पुण्याने आपला प्रवेश निश्चित केला. सामन्यांच्या शेवटी झालेल्या मुलाखतीत मनजित चिल्लर ने मुंबईच्या उपांत्य फेरीत नसल्याचे दु:ख व्यक्त केले तर अनुप कुमार ने अंतिम फेरी पुणेरी पलटण वि. तेलुगु टायटन्स मधे होईल असा अंदाज वर्तविला. उपांत्य फेरीचे सामने याप्रमाणे सामना क्र. १ - पटणा पायरेटस वि. पुणेरी पलटण - दि. २९ जुलै २०१६, रात्री ८.०० वा. हैदराबाद येथे. सामना क्र. २ - जयपुर पिंक पँथर्स वि. तेलुगु टायटन्स - दि. २९ जुलै २०१६, रात्री ९.०० वा. हैदराबाद येथे. अंतिम फेरीची लढत रविवार दि. ३१ जुलै २०१६, रात्री ७.०० वाजता हैदराबाद येथे. महिला कबड्डी अंतिम फेरीची लढत - ३१ जुलै २०१६, रात्री ८.०० वाजता हैदराबाद येथे.- स्टॉर्म क्वीन्स वि. फायर बर्डस. =============================================================== मुंबई बाहेर गेलयामुळे आता पाठींबा पुण्याला. जिंकणारा संघ महाराष्ट्राचा असावा असा उदार ( कि उधार ? ) विचार !! मात्र माझ्या अंदाजाप्रमाणे अंतिम लढत जयपुर वि. पटणा मधे होऊ शकते. बघू या काय होते ते. ज्यांना पुर्ण महिनाभर सामने बघता आले नाही त्यांना विनंती की शेवटचे दोन दिवस तरी वेळात वेळ काढून सामने बघा. तुम्ही नक्कीच कबड्डीच्या प्रेमात पडाल ! विजेत्यांचे अभिनंदन ! उद्या लेखणीला आराम ! परत भेटूया २९ जुलै २०१६ ला. शुभरात्री !!

In reply to by धर्मराजमुटके

पुणे जिंकले आणि आमचा मूड गलपटला. तरीही आमच्या मुंबाचा सामना पाहिला. जिंकूनही बी हरलो. मूड गेला माझा. -दिलीप बिरुटे

मनजीत चिल्लर नि कमाल केली. अगदी मोक्याचा क्षणी खेळ उंचावला. मागच्या वर्षी सारखेच ह्या वर्षी पण नेमके पाटणा पायरेट्स पुण्याचा समोर उभे राहणार उपांत्य सामन्यात. बघूया काय होत ते. पण ह्या वर्षी माझ्या मते खरी मजा आणली ती मिराज शेख नी. वाघासारखा लढला गडी.

सगळे सामने पहिले. मज्जा आली. पुणेरी पलटण सगळ्या हरलेल्या सामन्यात एक एक गुण मिळवत गेले ज्याचा त्यांना शेवटी फायदा झाला. यु मुंबा एक सामना जास्त जिंकूनही गुणतालिकेत 5व्या स्थानावर राहिले. माझा पाठींबा पुण्यालाच होता पहिल्यापासून आणि पुणे जिंकावं अशी इच्छा आहे. यु मुंबाकडे सरप्राईझ एलिमेंट नव्हता. एकही नवीन प्लेअर नव्हता. त्याचा त्यानां फटका बसला. तेलगू टायटनसकडून निलेश साळुंखे, संदीप धूल, जयपूरकडून अमित हुडा, दबंग दिल्लीकडून मिराझ शेख, उमेश म्हात्रे, पाटणा पायरेट्सचा पूर्ण संघ, पुणेरी पलटणकडून दीपक हुडा, यु मुंबाकडून सुरजीत सिंग, बेंगळुरू बुल्सकडून रोहित कुमार, बंगाल वॉरियर्सकडून जान कुंग ली यांचा खेळ पाहण्यासारखा होता.

जे लोक हे सामने नियमित बघतात त्यांना या सीझन चा सर्वोत्तम ७ चा संघ निवडुन टाकायला संगुया का?? मजा येइल

In reply to by मी-सौरभ

मनजित चिललर (कप्तान) प्रदिप नरवाल (रेडर) रोहित कुमार (रेडर) राकेश कुमार (अष्ट्पैलु) मिराझ शेख (अष्ट्पैलु) अमित हुडा (बचावपटु) फजल अत्रांचली (बचावपटु) बदली खेळाडु काशिलींग आडके (रेडर) राजेश मंडल (रेडर) संदीप नरवाल (बचावपटु) दीपक हुडा (बचावपटु)

In reply to by नया है वह

अख्खी च्य अख्खी तेलुगु टाईटन्स ची टीम

In reply to by नया है वह

अनुप कुमार (रेडर-कप्तान) प्रदिप नरवाल (रेडर) रोहित कुमार (रेडर) मनजित चिललर (अष्ट्पैलु) मिराझ शेख (अष्ट्पैलु) संदीप नरवाल (बचावपटु) फजल अत्रांचली (बचावपटु) बदली खेळाडु काशिलींग आडके (रेडर) अमित हुडा (बचावपटु) राजेश मंडल (रेडर) दीपक हुडा (अष्ट्पैलु) धर्मराज उर्फ अन्ना (बचावपटु)

अनूप कुमार (कप्तान) रोहित कुमार (रेडर) राहुल चौधरी (रेडर) संदीप नरवाल (बचावपटू) मिराज शेख (अष्टपैलू) रविंदर पहल (बचावपटू) बाजीराव होडगे (बचावपटू) बदली खेळाडू दीपक निवास हुडा जसवीर सिंग फजल अत्रांचली राकेश कुमार

In reply to by नाखु

ह गडी यु मुंबा मध्ये असताना जीवा कुमार च्या साथीने जबराट टर्न लावायचा, या जोडिच्या जिवावर यु मुम्बा ने कैक सामने जींकले. आता जीवा - शिवाची जोडी फुटली. आता ना जीवा चा टर्न लागतो ना विशाल चा लागतो. भारतमाता थेटराच्या मागे रामदुत चाळीत रहाणारा हा मध्यमवर्गातला मुलगा, खेळाच्या कौशल्यावर आधी मुंबै च्या कबड्डी संघात मग BPCL मध्ये दाखल झाला. असे अनेक गुणी खेळाडु मुंबई ठाण्यात आहे, जे आता प्रो कबड्डी लिग मुळे लोकांच्या नजरेत येतात.

In reply to by कपिलमुनी

असं नका म्हणु साहेब, ह्या सिजन ला त्याचा कॉर्नर लागला नाही, नाही तर पठ्ठ्या हुकमी चवडा काढतो.

In reply to by रघुनाथ.केरकर

मागच्या सिझनला दिल्ली कडून खेळताना सुद्धा प्रॉब्लेम होता . असो ! नव्या दमाच्या खेळांडूसमोर जुने कमी पडत आहेत असा दिसत आहे उदा: वजीर सिंग , रविंदर , राकेश कुमार यांच्व्ह्या पेक्षा रोहित कुमार , दीपक हुडा यांचा खेळ प्रभावी आणि वेगवान वाटत आहे

In reply to by कपिलमुनी

मागच्या सिजन ला पहल ने चांगली काम्गीरी केली होती, त्याला इतर खेळाडुंची हवी तशी साथ लाभली नाही.

In reply to by शिद

मनजीतची टीम शेवटच्या पाच मिनिटात बाहेर झाली. पुनेरी पलटनच्या शेवटच्या रेड भारी झाल्या. चांगला म्याच बघायला मिळाला. आता तेलगू आणि जयपुरचा सामना आहे, मला तेलगू जिंकतील असं वाटतं... बघूया थोड्या वेळात निकाल आहेच. -दिलीप बिरुटे

अंतिम सामना बघू रविवारी. माझी टीम आता पटना :) शूरा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जयपुर पिंक पँथर्सने (३४) तेलगू टायटन्सला (२४) चांगलाच धोबीपछाड देवून फायनलमध्ये प्रवेश केला. मुटकेसाहेबांच्या विश्लेषणाच्या प्रतिक्षेत. :)

पुण्याची नेहमीची बोंब, ऑल आऊट करता येत नाही. आजही तीच गत झाली. पटना चे 3 गडी असताना सगळी टीम परत आणून दिली.

दिवस ३२ वा : उपांत्य फेरी सामना क्र. १ : पुणेरी पलटण वि. पटणा पायरेटस सलग ३१ दिवस चाललेल्या कबड्डी पारायणात कालचा दिवस आराम केला. मुंबई अगोदरच बाहेर गेल्यामुळे आज मोकळ्या आणि तणाव विरहीत मनाने दोन्ही सामने बघता येणार होते. आजच्या पहिल्या उपांत्य सामन्याची उत्कंठा सकाळपासूनच लागली होती. त्यासाठी आजची संध्याकाळ मोकळीच ठेवली होती. मी घरात पाऊल ठेवायच्या अगोदरच चिरंजीवांनी टिव्ही सुरु करुन परवाच्या सामन्याच्या क्षणचित्रांचे आवर्तन चालू करुन माहौल तयार करुनच ठेवला होता. पुण्याच्या नितिन तोमरने पहिल्याच 'जिंका किंवा मरा' चढाईत ( डु ऑर डाय रेड) बोनस गुण मिळवून पुण्याचे खाते उघडले. मात्र त्यानंर लगेचच पटण्याच्या राजेश मोंडल ने देखील पटणाचा गुणतक्ता हलविण्यास सुरुवात केली. नंतरच्या काही अयशस्वी चढायांनंतर दिपक निवास हुड्डा ने पटण्याच्या प्रदिप नरवाल ला बाहेर पाठवले. पहिल्या सत्राच्या सुरुवातीला सरस असणारी पुणेरी पलटण पहिल्या सत्राच्या अखेर ३ गुणांनी मागे पडली. दुसर्‍या सत्राच्या प्रारंभाला पुण्याने आपली पिछाडी हळुहळू भरत काढून दोन्ही संघ बरोबरीत आले. दोन्ही संघ एक एक वेळेस सर्वबाद झाले. मात्र शेवटच्या ५ मिनिटांत बाजी पलटली व पटण्याच्या राजेश मोंडल, प्रदिप नरवाल ने सुरेख खेळ करत आपले अंतिम सामन्यातील स्थान निश्चीत केले. पुण्याचा दिपक निवास हुड्डा ने आज देखील नेहमीप्रमाणे चांगली कामगिरी करत चढाईत ९ गुण घेतले. नितिन तोमर आणि प्रमोद नरवाल प्रत्येकी ३ गुण. आज अजय ठाकूर चालला नाही. बदली खेळाडू सोनू नरवाल ने २ गुणांची कमाई केली. कप्तान मनजित चिल्लर ने पकडींमधे ७ गुण घेतले तर सोमविर शेखर आणि जोगिंदर नरवाल ने अनुक्रमे ३ आणि २ गुणांची कमाई केली. मात्र मनजितची आणि दिपक ची मेहनत पुण्याला तारु शकली नाही. मनजित यावेळी दुखापतग्रस्त असल्यामुळे चढाया करु शकला नाही. कदाचित त्याने चढाया देखील केल्या असत्या तर चित्र पालटले असते. पटणाचा स्टार प्रदिप नरवालला आज पहिल्या सत्रात पुण्याने शत्रुघ्न सिन्हाचा 'खामोश" डायलॉग ऐकून गप्प बसविले होते मात्र दुसर्‍या सत्रात प्रदिप ने शॉटगन शत्रुघ्न बनत सव्याज परतफेड केली. संपुर्ण सामन्यादरम्यान राजेश मोंडल ने संयमी व सातत्यपुर्ण खेळ केला. संपुर्ण मोसमात प्रदिप चमचमता तारा बनून वावरला मात्र राजेशचा खेळ म्हणजे चंद्राची शीतलता होती. प्रदिप ने ससा बनून भराभर आणि भाराभर गुण कमावले पण राजेश ने कासवाच्या गतीने का होईना पण शेवटपर्यंत जिद्दीने खेळ केला. यावेळेस ससा आणि कासव दोघे एकाच संघात होते एवढाच काय तो फरक ! पटणाचा वतीने प्रदिप नरवाल चढाईत ८ आणि पकडींमधे २ असे एकूण १० गुण, राजेश मोंडल ६ गुण, सुरजित सिंह ५ गुण तर बदली खेळाडू अबोफजल १ गुण. पकडींमधे कुलदीप ५ गुण, फजल अत्राचली ३ गुण, तर बदली खेळाडू हादीने ४ गुण घेतले. सामन्याच्या पहिल्या सत्रात हादीने नेत्रदिपक पकडी केल्या. पुणेरी पलटण ३३ गुण वि. पटणा पायरेटस ३७ गुण - पटणा पायरेटस ४ गुणांनी विजयी. ================================================================== दिवस ३२ वा : उपांत्य फेरी सामना क्र. २ : तेलुगु टायटन्स वि. जयपुर पिंक पँथर्स पहिल्या सामन्याचा प्रभाव मनावर पडतो न पडतो, त्या खेळातील डावपेचांवर मनातल्या मनात रवंथ करतो न करतो तोच दुसरा सामना सुरु झाला. सुरुवातीची काही मिनिटे बरोबरीत, जिंकू किंवा मरु डावांवर चालणारा सामना साधारण १० व्या मिनिटानंतर रंगतदार बनत गेला व त्यानंतर तो इतका रंगला कि पहिल्या सामन्याच्या स्मृती लगेचच धुसर झाल्या. मला पहिल्या सामन्याचे वार्तांकन लिहिणे आज फारच अवघड गेले इतकी मोहिनी दुसर्‍या सामन्याने घातली. बरं मी काही आकडेपटू नाही की केवळ आकड्यांकडेच लक्ष देऊ शकेन. सामन्यांतला थरार अनुभवणे सगळ्यात महत्वाचे. असो. आज सुरुवातीच्या काही खेळीनंतर तेलुगु टायटन्स ३-४ च्या फरकाने पुढे होते. आज पहिल्या सत्रात जयपुरचा राजेश नरवालला चढायांमधे अजिबात सफलता मिळाली नाही. तसेच त्याने पकडी करतांना देखील ३-४ वेळा घाईगडबड करत प्रतिस्पर्ध्यांना गुण बहाल केले. मात्र जयपुरचा कप्तान जसवीर आज सुरुवातीपासूनच पुर्ण जोषात आणि होश मधे राहून खेळत होता. आज त्याने उत्तम नियोजन करत स्वतः चढाईत ७ व पकडींत २ असे एकूण ९ गुण घेतले. त्याखालोखाल आज अजय कुमार ने ६ गुण घेतले. विशेष म्हणजे आज अजय बर्‍याच डु ऑर डाय वर खेळला. त्यामुळेच जसवीर जास्त वेळ मैदानावर राहू शकला. शब्बीर बापू ला आज यशाने हुलकावणी दिली. असाही त्याच्या ह्या मोसमातला खेळ त्याच्या किर्तीला साजेसा झाला नाही. राजेश नरवालने दुसर्‍या सत्रात एक सुपर रेड, एक उत्तम पकड करत बॅकलॉग भरुन काढत ४ गुणांची कमाई केली. पकडफळीत आज दोन्ही बाजूच्या पकडपटूंनी कमाल केली. रण सिंह व अमित हुड्डा ने जबरदस्त पकडी करत ४-४ गुण घेतले. तेलुगु टायटन्सला पाठींबा देतांना आज त्यांच्या घरच्या मैदानावर अनेक फिल्मी तारे आवर्जून उपस्थित होते. राणा दगुबत्ती, व्यंकटेश तर जयपुर संघाचे मालक अभिषेक बच्चन देखील त्यांच्या संघाचा खेळ पाहण्यासाठी आणि त्यांना अधूनमधून उत्साहित करण्यासाठी झटत होते. तेलुगुचा स्टार चढाईपटू रोहित चौधरी ने आज चढाईत ९ गुण, तर निलेश साळुंके ने ६ गुण घेतले. संदिप नरवाल, सुकेश हेगडे, अतुल प्रत्येकी १ गुण. पकडफळीमधे संदिप धुल ३ गुण, सागर क्रिष्णा १ गुण. आज तेलुगु ची बचाव फळी / पकड फळी निष्प्रभ ठरली. टायटन्सने चढाईत जास्त गुण मिळविले तर जयपुर ने पकडींमधे जास्त गुण कमाविले. टायटन्स आज चक्क दोनदा सर्वबाद झाली. दुसर्‍या सत्रात आघाडीवर गेलेल्या पिंक पँथर्सला रोखणे टायटन्सच्या पकडफळीला शक्य झाले नाही व दोघांच्या गुणांमधला फरक ७-९-१२-१३ असा वाढत वाढतच गेला. शेवटी निर्णायक आघाडी मिळविलेल्या जयपुर ने खेळ संथ करीत नेला आणि आघाडी राखत टायटन्सचे अंतिम फेरीत जाण्याचे स्वप्न धुळीस मिळविले. जयपुर प्रचंड फरकाने विजयी ! तेलुगु टायटन्स(२४ गुण) वि. जयपुर पिंक पँथर्स (३४ गुण) - जयपुर पिंक पँथर्स १० गुणांनी विजयी. =============================================================== माझ्या मागच्या प्रतिसादात वर्तविलेला अंतिम फेरीतील संघांविषयीचा अंदाज खरा ठरला. आता अंतिम विजय कोणाचा ? सध्याची स्थिती पाहता ताकदीचा संघ पटणा पायरेटस वाटतोय. बुद्धीचा कौल पटणा पायरेटसच्या बाजूने तर मनाचा कौल जयपुरच्या बाजुने. तरी पण मला असे वाटते की जयपुर पिंक पँथर्स जिंकेल मात्र हा केवळ अंदाजच आहे. अर्थात माझ्या मताशी सहमत असणार्‍यांची संख्या देखील कमीच असेल हे मात्र नक्की ! बघुया ! ३१ तारखेला कळेलच काय ते ! =============================================================== विजेत्यांचे अभिनंदन ! आज प्रतिसादकर्त्यांनी धाग्यावर जास्त प्रमाणात उपस्थिती दर्शविली त्याबद्द्ल त्यांचे विशेष आभार ! परत भेटू या ३१ जुलै २०१६ ला. तोपर्यंत शुभरात्री !

दिवस ३३ वा : ३ र्‍या क्रमांकासाठीची लढत : पुणेरी पलटण वि. तेलुगु टायटन्स ३ र्‍या क्रमांकासाठीची लढत अगदी चुरशीची झाली. पुण्याचा मनजित चिल्लर आज मैदानात नव्हता त्यामुळे पुण्याच्या विजयाच्या आशा धुसर दिसत होत्या. मात्र पुण्याच्या इतर खेळाडूंनी विशेषतः दिपक निवास हुड्डा आणि जोगिंदर नरवाल ने कमालीचा सुंदर खेळ करत पुण्याला विजय मिळवून दिला. पुण्याच्या बाजूने चढाईत दिपक निवास हुड्डा १६ गुण + पकडीत १ गुण असे एकुण १७ गुण, नितिन तोमर २ गुण अजय ठाकूर ३ गुण. पकडींमधे जोगींदर नरवाल ६ गुण, सोमवीर शेखर ३ गुण तर प्रमोद नरवाल १ गुण आणि बदली खेळाडू प्रितम चिल्लर १ गुण. तेलुगु टायटन्सच्या बाजुने आज राहुल चौधरी ने अप्रतिम खेळ करत तब्बल १८ गुण कमाविले तर निलेश साळूंकेला आज फक्त ३ गुणांवर समाधान मानावे लागले. संदिप नरवाल आज पकडींमधे चालू शकला नाही मात्र त्याला चढाईत एकमेव गुण मिळाला. पकडफळीत महालिंगम ३ गुण, विशाल भारद्वाज २ गुण, तर सागर क्रिष्णा १ गुण. टायटन्सची बचाव फळी आज एकदम कमजोर ठरली त्यामुळे राहुल च्या मेहनतीवर पाणी पडले. अखेरपर्यंत रंगतदार झालेल्या या सामन्यात दिपक हुड्डा ने शेवटच्या काहि मिनिटांत टायटन्सला सर्वबाद केले व तिथुनच सामना पुण्याच्या बाजुने फिरला. दोन्ही संघ आज दोन वेळा सर्वबाद झाले. पुणेरी पलटण (४० गुण ) - तेलुगु टायटन्स (३५ गुण) - पुणेरी पलटण ५ गुणांनी विजयी. ================================================================ महिला कबड्डी अंतिम फेरी सामना : फायर बर्डस वि. स्टॉर्म क्वीन्स हा देखील सामना चांगलाच रंगला. सुरुवातीला काही काळ फायर बर्डस पुढे होते नंतर स्टॉर्म क्वीन्सच्या बाजुला झुकलेला सामना परत एकदा फायर बर्डसच्या बाजुने झुकला. शेवटच्या काही क्षणाला अशी परिस्थिती होती की स्टॉर्म क्वीन्स सामना गमावतील असे वाटत असतांना शेवटच्या काही क्षणांत सामना असा फिरला की सामना पुन्हा स्टॉर्म क्वीन्स पुढे गेले आणि अगदी १ गुणांच्या फरकाने जिंकले. शेवटच्या चढाईत स्टॉर्म क्वीन्स १ गुणाने पिछाडीवर होते मात्र तेजस्विनी बाईने शेवटच्या चढाईत २ गुण घेऊन सामना १ गुणाने जिंकला. फायर बर्डस कडून चढाईत मारिया मोनिका २ गुण, ममता पुजारी (कप्तान) चढाई व पकड मधे प्रत्येकी १ असे २ गुण, तर केरळाची बदली खेळाडू रिंजू के ने ७ गुणांची कमाई केली. रिंजुच्या खेळानेच काहि वेळेसाठी सामना फायर बर्डसच्या बाजुने झुकविला. पकडफळीत किशोरी शिंदे ४ गुण, रितु नेगी २ गुण, पायल चौधरी व मोनिका देवी प्रत्येकी १ गुण तर बदली खेळाडू गायत्रीचे चढाई व पकडीमधे प्रत्येकी १ असे एकूण २ गुण. स्टॉर्म क्वीन्सच्या वतीने चढाईत साक्षीकुमारीने चढाईत ६ आणि पकडीत २ असे सर्वाधिक ८ गुण मिळविले तर तेजस्विनी बाई चढाईत २ आणी पकडफळीत १ असे एकूण ३ गुण. बदली खेळाडू भावना यादव २ गुण तर रश्मिता साहू १ गुण. पकडफळीत सोनाली इंगळेने जबरदस्त पकडी करत ४ गुण, दिपीका जोसेफ २ गुण तर ज्योती ने १ गुण घेतला. फायर बर्डस (२३ गुण) वि. स्टॉर्म क्वीन्स (२४ गुण) - स्टॉर्म क्वीन्स १ गुणाने विजयी ================================================================ अंतिम सामना : जयपुर पिंक पँथर्स वि. पटणा पायरेटस मागच्या प्रतिसादात वर्णन केल्याप्रमाणे बुद्धीचा कौल पटणा ला होता मात्र मनाचा कौल जयपुर कडे होता. शेवटी मनावर बुद्धीचा विजय झाला आणि पटणा प्रो कबड्डीच्या इतिहासात दुसर्‍यांदा जेते बनले. सुरुवातीपासून जयपुर ने पकड मिळविलेला हा सामना पहिल्या सत्राच्या अखेरीस पटण्याचा बाजुला झुकला आणि मग पटणाने सामन्याची पकड शेवटपर्यंत ढिली हिऊ दिली नाही. मात्र त्यामुळे दुसर्‍या सत्रात हा सामना एकतर्फी व पर्यायाने मिळमिळीत झाला. पटण्याच्या सुपरस्टार प्रदिप नरवाल ने अपेक्षेप्रमाणे उत्तम कामगिरी करत चढाईत १६ गुण तर सुरजित सिंह आणि राजेश मोंडल ने प्रत्येकी २ गुण घेतले. प्रदिप नरवाल ने आज जवळपास २५-२६ चढाया केल्या. आजचा त्याचा स्टॅमिना आणि खेळ दोन्ही वाखाणण्यासारखे होते. पकडफफळीमधे इराणी हादी ने ५ गुण, बदली खेळाडू धर्मराज ने ३ गुण, कुलदीप सिंह ३ गुण तर फजल अत्राचली १ गुण. आज बाजीराव होडगे चा खेळ होत होत नव्हता त्यामुळे त्याला संघाने बाहेर पाठवून धर्मराज ला त्याच्या जागेवर खेळविले. जयपुर कडून जसवीर सिंह ने नेहमीप्रमाणे उत्तम खेळ करत १३ गुण, राजेश नरवाल ७ गुण, तर अजय कुमार ने १ गुण असे चढाईत गुण घेतले. पकडफळी मात्र आज अपेक्षेप्रमाणे खेळू न शकल्यामुळे जयपुरला हार स्वीकारावी लागली. उताविळपणामुळे बरेच गुण घालवावे लागले. तसेही प्रदिप नरवाल को पकडना नामुंकीन नही लेकीन मुश्कील जरुर है ! पकडफळीत अमित हुड्डा ३ गुण,तर रोहित राणा १ गुण. रण सिंहची पाटी कोरी, शब्बीर बापूची घागर रिकामी. तर बदली खेळाडू महिपत नरवालच्या हाताला देखील काहिच लागले नाही. केवळ २-४ खेळाडू खेळले आणि बाकीच्यांनी त्याच्या पुण्याईवर जगायचे ठरले तर मग हार ही ठरलेलीच ! मात्र जसवीर सिंह चे विशेष कौतुक. या वयातही त्याचा खेळ तरुणांना लाजविणारा आहे. पटणा पायरेटस (३७ गुण) वि. जयपुर पिंक पँथर्स (२९ गुण ) - पटणा पायरेटस ८ गुणांनी विजयी. ================================================================== अशाप्रकारे जवळ जवळ ३३ दिवस चाललेला प्रो कबड्डीचा हा ४ था मोसम आज समाप्त झाला. त्याचबरोबर आज कबड्डी पारायणाची सांगता देखील झाली आहे असे जाहिर करतो. महिनाभर विविध खेळाडूंनी मनास आनंद दिला तर रसिकांनी खेळाडूंना मनात स्थान दिले. कबड्डीचा प्रसार वेगाने होण्यासाठी प्रो कबड्डीचे व्यासपीठ निश्चितच उपयुक्त ठरत आहे याबद्दल देखील आनंद वाटतो. मिपाचे चालक मालक श्री . निलकांत आणि इतर व्यवस्थापक मंडळींनी मिपासारखे लोकप्रिय संकेतस्थळ माझ्यासारख्या सामान्य माणसा साठी उपलब्ध करुन दिले. ज्यामुळे मी सतत ३३ दिवस येथे लिखाण करु शकलो त्याबद्द्ल मी त्यांचा ऋणी आहे. मिपावरील सर्व वाचक, प्रतिसादक यांनी जे प्रेम, प्रतिसाद दिला त्याचे आभार माणने शब्दात शक्य नाही. खरेतर आनंद मोजण्याचे एककच उपलब्ध नाही आणि तो मोजणे देखील योग्य नाही. तो केवळ अनुभवावा या मताचा मी आहे. यावेळी काही वार्तांकनात काही तांत्रिक / तपशीलातील चुका झाल्या असण्याची शक्यता आहे त्या पुढील वेळेस सुधारण्याच्या प्रयत्न करीन. पुन्हा एकदा विजेत्यांचे अभिनंदन ! सर्वांचे आभार ! परत परत भेटत राहूया ! शुभरात्री !!