सांगली धागा निमित्ताने : सांगलीची खाद्यभ्रमंती

सुज्ञ's picture
सुज्ञ in भटकंती
9 Jul 2016 - 3:56 am

प्रत्येक गावाला स्वतःचा एक स्वभाव असतो . तेथील माणसे , समाजजीवन , निसर्ग , लोकांचे दैनंदिन आयुष्य , राजकारण , गावात घडलेले बदल अशा अनेक गोष्टींमुळे त्या गावाचा एक स्वभाव तयार होत जातो. अनेक शहरांच्या अनेक तर्हा. थोडीशी खवचट आणि आता 'लोक दमड्या मोजायला तयार आहेत तर थोडी लुटालूट केली तर काय हरकत आहे .. नाहीतरी आपले गत आयुष्य गरिबीतच गेले ' असा स्वभाव बनलेली कोकणातील गावे, राजकारणी आणि दारूची दुकाने यावर नितांत प्रेम करणारी विदर्भ मराठवाड्यातील गावे , जुन्या परंपरा, देवळातील श्रीविष्णू आणि सिनेमातील नट यावर ठाम विश्वास असणारी गावे अथवा पैसा कमाओ और उडाओ इतकेच माहीत असलेली गावे . अनेक गावांचे अनेक स्वभाव तेथील समाजवैशिष्ट्यांमुळे बघायला मिळतात. आताशा प्रत्येक गाव ही फक्त एक बाजारपेठ आहे एवढेच धोरण होत असल्याने हळूहळू गावेही आता जिवंतपणे बोलत नाहीत पण त्याला इलाज नाही. सर्व जगात एकच चव देऊ शकणारे टेकअवे एकदा गावात उघडले की सर्व जगात दुसरीकडे कुठेच मिळणार नाहीत असे पदार्थ मिळणाऱ्या हॉटेलची प्रसिद्धी कमी होऊ लागते आणि अशा शहरीकरणास माझ्यामते चूक किंवा वाईट ठरवता येणार नाही कारण प्रत्येक गोष्टीचे तोट्यांबरोबर फायदेही असतातच. पण अजूनही अनेक गावे आपले स्वतःचे अस्तित्व टिकवून आहेत. सांगली हे त्यापैकीच एक.

सांगली हे शहर असले तरी गावाचे 'तितके शहरीकरण' झालेले अजूनतरी बघायला मिळत नाही. छोटेसे व आटोपशीर गाव. नाट्यपंढरी , हळद, गणपतीचे देऊळ , वेशीवरून वाहणारी कृष्णा नदी , हरिपूर संगम इत्यादी अनेक गोष्टी सांगलीचे वैशिष्ट्य अथवा भेट देण्यासारखी ठिकाणे म्हणून विचारात घेत असताच या शहरात एक खाद्यसंस्कृती तयार आहे अथवा अगदी साध्या भाषेत अनेक उत्तमोत्तम व खाण्याची ठिकाणे उपलब्ध आहेत याचा अचानक विचार आला.

हॉटेल चालवून आपण लोकांची मोठी सेवा करत आहोत अथवा हाटेलाबाहेर तिष्ठत बसलेले गिर्हाईक हेच आमचे समाधान किंवा खाण्यालायक काहीही आणि कसलेही द्या खपेल असे प्रकार येथे तसे कमीच दिसतात हेदेखील इथल्या संस्कृती का काय म्हणतात त्याचे वैशिष्ट्य मानावे लागेल असे जाता जाता नमूद करतो. असो.

तर खाण्याच्या ठिकाणांची यादी करताना पदार्थवार यादी केली आहे . खालील ठिकाणे व तेथे मिळणारे पदार्थ हे स्वतः व अनेक लोकांकडून टेष्ट ( दोन्ही स्पेलिंग !) झाले असल्यामुळे बऱ्यापैकी खात्री बाळगण्यास हरकत नाही. नमूद केलेली ठिकाणे ही सकाळच्या नाष्ट्यापासून दुपारचे जेवण ते संध्याकाळच्या वेळी खाण्याच्या पदार्थांपासून ते 'दस्त ए साकी में आफताब' येईपर्यंतची यादी आहे.

पोहे :
१. मंजू चे पोहे : वालचंद कॉलेज पाठीमागे / विलिंग्डन कॉलेज समोर गाड्यावर . पोहे व भाजी उत्तम मिळतात. . समांतर : सांगलीत पोह्यांवर सांबार घेण्याची पद्धत आहे. येथे सांबार म्हणजे इडली बरोबर देतात ते नसून मिसळीचा रस्सा
(समजण्यासाठी :शॅम्पल) असतो. कुठल्याही तिखट पदार्थात ( उदा तांबडा रस्सा , मटन वगैरे ) तिखटाची भुकटी वापरात नाहीत . त्यामुळे खान्देशी वगैरे तिखट खाऊन जी जळजळ आणि आग होते तसे न होता तिखटाचीही चव घेता येते.
२. गणेश नाष्टा सेंटर. विश्रामबाग. ( येथील जवळपास सर्वच पदार्थ चांगले असतात . मात्र पोहे , उप्पीट , पायनॅपल शिरा, वडा सांबार उत्तम )
३. हळद भवन. ( ब्रेड उसळ /चिवडा , पोहे , वडा सांबार इत्यादी )
४. पहाटे ४ वाजता स्टेन्ड समोर गाड्यावरील पोहे.
५. हॉटेल पैप्रकाश: राममंदीर चौक ( मसाला टोस्ट खाऊन पहाच .)
६. प्रभू प्रसाद : बापट बाल शाळेसमोर ( वडा सांबार . यांच्याकडे थोडेसे रस्सम सारखे सांबार /सॅम्पल मिळते. )
७. के टी नाश्ता सेंटर : एसटी स्टॅन्ड जवळ ( वडा सांबार , पोहे ).
मिसळ या पदार्थास दुर्दैवाने सांगलीत तितका न्याय मिळाला नाही मात्र वडा सांबार मिळणाऱ्या जवळपास सर्वच ठिकाणी मिसळ चांगली मिळेल .
८ . थोडे लांबी जायची तयारी असल्यास अंकली फाट्यावर जैन वडा व अरिहंत वडा येथे वडा सांबर नक्की खाऊन पहा.
९. एन डिज : होंडा शो रूम शेजारी व काळ्या खणी शेजारी ( दूध कोल्ड्रिंक . कॉफी बियर. माझ्या माहितीत कॉफी बियर सांगली सोडून कुठे मिळत नाही)
उसाचा रस वगैरे प्यायचा झाल्यास सगळीकडेच उत्तम मिळतो . कुठेही प्या .

दुधाचे सर्वच पदार्थ हे येतील खास वैशिष्ट्य . सांगलीचेच असलेले चितळे बंधू यांच्या पदार्थाना येथे खूपच कमी मागणी आहे व खूप मोजक्याच दुकानांत त्याचे पदार्थ मिळतात. का ? सुज्ञास सांगणे नलगे .
१. रामविश्वास दुग्धालय :वसंतदादा समाधीमागे ( सर्वच पदार्थ अतिउत्तम . त्यातही बासुंदी व आम्रखंड हे अप्रतीम. सांगलीबाहेरही प्रचंड मागणी .).
२. मंगल मिठाई : मारुती चौक ( पेढे व कलाकंद अप्रतिम )
३. बसाप्पा : मारुती चौक ( गुलाबजाम , अंगूर मलई व अनेक पदार्थ. )
४. सीरवी बंधू : राममंदिर चौक ( ढोकळा , जिलबी कचोरी वगैरे पदार्थ चांगले मिळतात ).
५. सांगलीजवळ कुरुंदवाड व नरसोबावाडी येथेही बासुंदी उत्तम मिळते . दाट व सायीसकट मिळणारी बासुंदी .

संध्याकाळनंतर भेळेचे अनेक गाडे सुरू होतात. तसेच चायनीज ( भारतीय चायनीज) ची छोटी मोठी हॉटेल्स ही चालू होतात. सांगलीत ज्या दर्जाचे चायनीज मिळते तसे मी अन्य कुठल्याही शहरात खाल्याचे आठवत नाही. तरीही कोणत्या चायनीज हॉटेल मध्ये काय खावे हे नमूनेदाखल देत आहे .
१. संभा भेळ : वखारभाग.
२. स्टार भेळ : पंचमुखी मारुती रोड सुरुवात
३. प्रतापसींह उद्यानासमोरील भेळेचे गाडे.
४. क्रांती भेळ : विश्रामबाग ( चायना हट शेजारी ) ( भेळ ,थालीपीठ, शेवपुरी ,पावभाजी वगैरे छान मिळते .)
५. चिकन ६५ चे अनेक गाडे आता चालू झाले आहेत तरीही एस्टी स्टेन्ड येथील कैफ चिकन व पुष्कराज चौक येथील श्रावणी चिकन या गाड्यांवर मस्त चिकन ६५ व सीजन मध्ये एकदम ताजे सुरमई /बोंबील मिळतात.
६. चाइना हट : विश्रामबाग ( क्रांती भेळ शेजारी ) ( सर्वच चायनीज पदार्थ जबरदस्त. येथील चायनीज चे अक्षरशः व्यसन लागते )
७. कॉलेज कॉर्नर ला चायनीज चा एक गाडा असतो तेथे फक्त 'चायनीज भेळ' हा पदार्थ खावा .
८. हॉटेल बावर्ची. प्रताप टॉकीज मागे
९ आनंदराव यांचा गाडा : १०० फुटी सुरुवात ( अंडा पेटीस , भुर्जी . एकदा गाड्यासमोरून निघाला की दरवळनाऱ्या वासामुळे काहीतरी खाऊन जाणारच.)
१० . हॉटेल हनुमान ( विश्रामबाग) : डोश्यांसाठी उत्तम ठिकाण .
११. पैप्रकाश राममंदीर चौक ( सीझलर्स चांगल्या मिळतात. अजूनही वाजवी किंमत ).
१२. एन डिज होंडा शो रूम शेजारी : ( येथे चायनीज गाड्यावर व्हेज मंचुरियन खावे) तिथेच टोस्ट चा गाडा देखील आहे त्याच्याकडील टोस्ट खाणे .
१३. शिवाजी पुतळा जवळ मिरज येथे गाड्यावर भजी.

अशा अनेक ठिकाणी खाऊन झाल्यावर रात्रीसाठी मस्त गरम गरम चिकन / मटण तांबडा पांढरा रस्सा हवाच. . कोल्हापुरात जशा छोट्या खाणावळीं मधून अतिउत्तम घरगुती चिकन मिळते तसेच इथेही मिळते. यादी बरीच आहे पण चांगली ठिकाणी काही ..
१. हॉटेल अनुराधा : सिव्हिल हॉस्पिटल रोड ( जुने) (पांढरा रस्सा ).
२. गिरीजा : खिलारे मंगल कार्यालयाजवळ ( एक्दम ताजे घरगुती गरम चुलीवरील मटन / भाकरी )
३. हॉटेल सौरभ आणि हॉटेल नंदनवन : कोल्हापूर रोड. ( चिकन मॅग्नेट हा पदार्थ इथे घेतलाच पाहिजे . )
४. रहेमतुल्ला : मिरज ( खास इस्लामी चिकन )
५. सांगलीजवळ इचलकरंजी येथे बुगड खानावळ
६. शेतकरी : १०० फुटी रोड
७. क्रांती मेस विजयनगर.
८. पूर्वा गार्डन : विजयनगर
९ आर्य ( आर्या ) :

तर अशी ही थोडक्यात केलेली सांगलीची खाद्यभ्रमंती. ही सर्व ठिकाणे सोडून नेहेमीची पंजाबी भाज्या / दाल फ्राय जिरा राईस देणारी अनेक हॉटेल सांगलीत उपलब्ध आहेत. उदा हॉटेल नटराज :राममंदिर चौक अथवा हॉटेल पर्ल : विजयनगर . डॉमिनोज आणि तत्सम चेनही उघड्या आहेत (!) पण वर नमूद केलेले पदार्थ /ठिकाणे नक्की अनुभवा.
असो . लिहून कितीही भ्रमंती घडवली तरी स्वतः टेस्ट केल्याशिवाय खाद्यभ्रमंती पूर्ण होत नाही हेच खरे.

प्रतिक्रिया

सुज्ञ's picture

9 Jul 2016 - 4:16 am | सुज्ञ

अजूनही माहिती मिळाली तर उत्तमच

प्रचेतस's picture

9 Jul 2016 - 6:40 am | प्रचेतस

भारी.

वाडीच्या बासुंदीत मजा नाय हो हल्ली. खूप गोडमिट्ट देतात.
तिकडच्या सोमणांचे घरगुती जेवण मात्र उत्कृष्ट.

कैलासवासी सोन्याबापु's picture

9 Jul 2016 - 8:40 am | कैलासवासी सोन्याबापु

राजकारणी आणि दारूची दुकाने यावर नितांत प्रेम करणारी विदर्भ मराठवाड्यातील गावे ,

हा निष्कर्ष कसा काढलात? कुठे कुठे फिरला आहात विदर्भात ? हे कसे बुआ ठरवलेत??

अभ्या..'s picture

9 Jul 2016 - 9:19 am | अभ्या..

मराठवाड्यावर केलेल्या टिप्पणीचा तीव्र निषेध. धाग्यातून त्वरित हा उल्लेख काढून टाकण्यात यावा.
.
(मिरजेचा 5 वर्षे रहिवासी) अभ्या

स्मायली र्हायलीये काय टाकायची ? की खरंच म्हणताय निषेध वगैरे!!!

अभ्या..'s picture

9 Jul 2016 - 9:49 am | अभ्या..

जाळपोळ केल्याशिवाय मराठवाड्याचा निषेध कळत नाही का?
लोकभावनेचा असा अंत पाहण्याचा प्रवृत्तीचा निषेध.

अर्र दादा एकदम जाळपोळ...!! ( एक स्मायली र्‍हायली की काय असं परत एकदा वाटतंय...)

=))

अहो खाण्या पिण्या बद्दलचा धागाय हो हा...किती शिरेस होता ते!!! मी काय मंतो, थोडं सबूरीनं घेउ या की...

आता मांडलं एखाद्याने एखादं मत- समजा चुकीचं मत, तर दुर्ल्क्ष करण्यापासून ते, ते मत चुकीचं कसंय हे कृतीतून/शब्दातून दाखवून देण्याचे असंख्य प्रकार हाताशी असताना एकदम असा निषेध/ जाळपोळ असले हिंस्त्र पर्याय नै हो निवडू. असं मला वाटतं.

अभ्या..'s picture

9 Jul 2016 - 10:21 am | अभ्या..

हे वैयक्तिक मत असले तरी खोडीलपणाचे आहे. योग्य उदाहरणासहित हे वाक्य सिद्ध करून दाखवावे अन्यथा असे प्रादेशिक अस्मितेचे धागे काढू नयेत.
झाकीर नाईक च्या निषेधाच्या बोर्डाचे काम चालूच आहे, ह्याही लेखाचा निषेध छापावा म्हणतो ;)

पण कोकण, मराठवाडा-विदर्भ आणि खान्देश यांचं सरसकटीकरण नाही पटलं. खान्देशी तिखट खाऊन जळजळ होते हे तर अजिबातच पटलं नाही. तुमचा खान्देश आणि आंध्र यात गोंधळ झालाय बहुतेक.

कैलासवासी सोन्याबापु's picture

9 Jul 2016 - 9:08 am | कैलासवासी सोन्याबापु

अन नसेलही गोंधळ वगैरे उडाला तरी कोणाचे सरसकटीकरण कोणीच करू नये ही नम्र विनंती

अरे वा हे बरंय....आता करायचंय त्यांना सरसकटीकरण तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे हो? त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या का आड येताय म्हणे?

;)

कैलासवासी's picture

13 Jul 2016 - 4:13 pm | कैलासवासी

त्यामुळे खान्देशी वगैरे तिखट खाऊन जी जळजळ आणि आग होते तसे न होता तिखटाचीही चव घेता येते.

खूप मोठा लोळ...आणि थोडाफार निषेध.

वालचंद च्या आतून मंजुकडे जाणारा रस्ता आता बंद करण्यात आला आहे. खूप वाईट वाटले. कॉलेज मध्ये असताना रोज सकाळी मंजु, संध्याकाळी नकाते आणि सुट्टीच्या दिवशी गणेश हे ठरलेले.

गतीशील's picture

9 Jul 2016 - 10:03 am | गतीशील

वाचून तोंडाला पाणी सुटलं.. वर उल्लेख केलेल्या 90% ठिकाणी जाऊन सर्व पदार्थ चोपून आलेलो आहे .. एक चूक सुधारा फक्त..पै प्रकाश हॉटेल राम मंदिर चौकात नसून, विश्रामबाग च्या चौकात आहे. त्या चौकाला त्या हॉटेल मुले पै प्रकाश चौक असेच म्हणतात आता..
सरासकटीकरणा विषयी, माझे असे मत आहे की ते लेखकाचे वैयक्तिक मत आहे.. :0 :)

संजय पाटिल's picture

9 Jul 2016 - 10:30 am | संजय पाटिल

माहिती चांगली आहे पण प्रदेशीक सरसकटिकरण पटले नाहि..

सुज्ञ's picture

9 Jul 2016 - 12:32 pm | सुज्ञ

सरसकटीकरण करण्यावर काहींनी निषेध इत्यादी वगैरे नोंदवला आहे. मुळात मी एकंदर (in general ) गावांनाही स्वभाव असतात असे सांगण्यासाठी ती सर्व उदाहरणे दिली आहेत त्यामुळे मला सरसकटीकरण च करायचे आहे.

नक्की आशय लक्षात न आल्यामुळे कदाचित सरसकटीकरण केले वर आक्षेप आला असेल. अशा काही गोष्टींमुळे लगेच प्रादेशिक अस्मिता दुखावली गेली भावना भडकल्या गेल्या असतील तर अखिल विदर्भ मराठवाडा खान्देश भडक ग्रुप यांना क्षमस्व . :)

बाकी धागा खाद्यभ्रमंती वर आहे तो त्याच भावनेने वाचावा आणि ही नम्र विनंती .

हुश्श :)

झेन's picture

9 Jul 2016 - 5:55 pm | झेन

अखिल विश्वात फक्त एकाच शहराबद्दल सरसकटीकरण हिरीरीने केले जाते

मराठी_माणूस's picture

11 Jul 2016 - 12:56 pm | मराठी_माणूस

बाकी धागा खाद्यभ्रमंती वर आहे तो त्याच भावनेने वाचावा आणि ही नम्र विनंती .

धागा खाद्यभ्रमंती वर आहे तर त्या पुरताच मर्यादीत असायला हवा होता , ऊगीच अनावश्यक टीपण्णी कशाला हवी ?

आवश्यक अनावश्यक ठरवणार कोण? ही कसली सेन्साॅरशीप?

धागा खाद्यभ्रमंती वर आहे तो त्याच भावनेने वाचावा

हि डायरेक्टर्स सेन्सॉरशिप

मुळे खान्देशी वगैरे तिखट खाऊन जी जळजळ आणि आग होते तसे न होता तिखटाचीही चव घेता येते.

इसका मत्बल तुमने खानदेशी खाना खायाईच नय ???????

इरसाल's picture

9 Jul 2016 - 1:55 pm | इरसाल

बामणोदच्या वांग्याचे भरीत आणी बाजरीच्या पुर्‍या (हो हो पुर्‍याच) आणी भाकरी,
शेवभाजी आणी बाजरीची भाकरी,
शेंगदाण्याचं कुट लावुन केलेली वांग्यांची भाजी,
शेंगदाण्याचं कुट लावुन भरली भेंडी,
काया समारनी (काळा मसाला- कांदे नी जरासे खोबरे चुलीत भाजुन) उडदाची डाळ,
त्याच काळ्या मसाल्यात केलेली काळ्या चण्यांच कालवण,
अळुच्या वड्यांची पातळ भाजी (शिजवुन + तळुन),
पाटोळ्यांच बट्ट,
डुबुकवड्यांची रसोई,
तुरीच काळामसाला लावुन बनवलेलं कालवण,
ह्याच काळ्या मसाल्यात बनवलेल चिकन किंवा मटण, बाजरीच्या भाकरी बरोबर ते पण मामाच्या शेतात संध्याकाळी सहकुटुंब सहपरिवार असेल तर मग विचारायचे काम नाही.
आंब्याचा रस (केशर किंवा लंगडा) पुरणपोळ्या, मिक्स भज्या, पापड कुर्डायी, भात आणी रसोई, आणी वांग्याची बटाट टाकुन कोरडी भाजी, जेवणानंतर तात्काळ टांगा पलटी घोडे फरार,
शेंगदाण्याचं कुट लावुन मिरच्यांची भाजी (हा एक भारी प्रकार आहे.),
शेंगदाण्याचं कुट लावुन गवारीची पातळ भाजी,
या व्यतिरिक्त बरोबर चपाती (पोयी), ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, कळण्याची भाकरी, शाळु ज्वारीची(दादर) भाकरी, ज्वारीच/गव्हाच/बेसन पीठ एकत्र करुन एक कांदा बारीक कापुन त्यात टाकुन, थोडं मीठ, मिरची पावडर टाकुन खरपुस भाजलेली भाकरी नुसतं शेंगदाण्याचं कच्चं तेल टाकुन खाल्ली तर अहा हा हा हा (दोन हा एक्स्ट्रा),
वल्लं तिखट म्हणजे तीळ्/शेंगदाणे मिरची पावडर, मीठ पाट्यावर एकत्र वाटुन कळण्याच्या भाकरी बरोबर,
तिखंमिखं-किसलेला गुळ, मिरीपावडर, स्पेशल मसाला हे चपातीमधे भरुन तिला पराठ्यासारखी तव्यावर शेकुन दुधात कुस्करुन खाल्ली ही एक डेलिकसी असते,
.
.
.
.
.
.
.
.
..
दुबारा मत बोलना, की तिखट्जाळ हय !!!!!!

आता बडोद्याची माहिती येवद्या.

इरसाल's picture

9 Jul 2016 - 3:17 pm | इरसाल

तु स्वतः ये, मी इथे लिहीण्यापेक्षा मी तुला समक्ष नेवुनच दाखवतो.

प्यारेलाल कचोरी आहे का अजून? भेळेने भरलेली.

अविस्मरणीय प्रकार होता एकेकाळी.

इरसाल's picture

9 Jul 2016 - 4:43 pm | इरसाल

मंगळ बाजार सुधी मळे !

इरसाल's picture

9 Jul 2016 - 4:46 pm | इरसाल

http://www.reshareit.com/wp-content/uploads/pyarelal.jpg

यांचे खाते सात दिवस गोठवा रे.

नाखु's picture

9 Jul 2016 - 5:22 pm | नाखु

धाग्याबाहेर सांडलीय अगदी!

अहाहाहा! कुठे मिळते ही कचोरी?

धनंजय माने's picture

9 Jul 2016 - 7:09 pm | धनंजय माने

कसं ओ डॉक्टर असं? वर वाचा की ज़रा.

मुक्त विहारि's picture

10 Jul 2016 - 1:41 am | मुक्त विहारि

हे इतके लिहिण्यापेक्षा, एखादा कट्टा ठरव की.

(स्वगत : हे इरसाल एक नंबरचे डामरट आहे. नुसताच लिहीत बसतो. आत्ता पर्यंत एकपण कट्टा बडोद्याला किंवा खानदेशात केला नाही. आता ह्याच्या बोलण्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा?)

इरसाल's picture

11 Jul 2016 - 11:53 am | इरसाल

पहिली गाडी पकडुन या पाहु संस्थानात येता येता गविंना आणा उचलुन(सॉरी गाडीत बसवुन), मोदक येईलच इतक्यात, घरात खानदेशी पाहुणचार नी बाहेत अस्सल बडोद्याच खाणं............बोला कधी निघताय (असं माहित पडलय की गणपा ठाकुर सध्या मुंबईत डेरा टाकुन आहेत, त्यांना पण ओढा.)

त्रिवेणी's picture

11 Jul 2016 - 11:00 am | त्रिवेणी

इरसाल चार गाव इनाम दिले तुम्हाला.
आणि आपल्या खान्देशी तिखटाला जळजळणारे तिखट म्हटले म्हणून सुद्न यांना खान्देशात यायचे आवतान.
बाकी आज मी आपली वांग्याची घोटलेली भाजी आणि बट्टी केलीय.

कैलासवासी's picture

13 Jul 2016 - 4:17 pm | कैलासवासी

नुसती जळजळ झाली म्हणे - सूत्र

इरसाल's picture

9 Jul 2016 - 1:58 pm | इरसाल

मिरचीचा खुडा राहिलाच..........

धनंजय माने's picture

9 Jul 2016 - 2:13 pm | धनंजय माने

पाटील, याचा एक येगळा धागा झालाच पायजे.

आमाला श्रद्धा कपूर बी आवडती आनि आलिया भट बी...
उगा कुनी कुनाला नावं न ठिवता भन्नाट जाळ आनि धुर संगट च निघाला पायजेल. (कोन रं त्यो आन्नाला रॉकी सावन आवडती म्हनतोय?)

त्रिवेणी's picture

11 Jul 2016 - 11:14 am | त्रिवेणी

खोबर न खसखस न बट्ट बी इसरिग्यात बाै तुम्हीसन.
आखो भरेल मिरच्या, उन्हायामा बनाडतस ती कांदानी भाजी.
काया उडिद ना डाळ नी निसती लसुण मिरची नी भाजी लै आवडस मले.मेथीन खुडूक मिरची न पाणी बी भारी लागस.

इरसाल's picture

11 Jul 2016 - 11:50 am | इरसाल

बठ्ठ आठेच लिखी देतु ते लोकेस्ना टांगा आठेच पलटी जाता. म्हंत कोनी ना कोनी इ सन करीन ते काम म्हणी सोडी देल होत.

धनंजय माने's picture

11 Jul 2016 - 11:56 am | धनंजय माने

ओ इरसाल भो, आयका की ज़रा.
कशाला कटवड्यात शेवभाजी मिसळताय? ;)
प्रतिसाद असाच उचलून तिकडे नवा धागा बनवा की. कधी येऊ भागात तेव्हा चटकन माहिती साठी धागा सापडु शकेल.

मन्याटण्या's picture

9 Jul 2016 - 2:33 pm | मन्याटण्या

पाण्याच्या टाकी खालच गणेश नाश्ता सेंटर आणि पै प्रकाश होटेल आमची खास ठिकान. सांगलीचे दिवस वेगळे होते.अतिशय शांत आणि निवांत शहर आहे. गर्दी, गोंधळ, ट्राफिक पासून दूर(तेव्हा तरी होत आता माहीत नाही).

सामान्य वाचक's picture

9 Jul 2016 - 2:41 pm | सामान्य वाचक

गडद हिरव्या बाटली मधला टॉक्क सोडा

सुज्ञ's picture

9 Jul 2016 - 2:45 pm | सुज्ञ

इरसाल .
चांगली माहिती. . खान्देशी तिखट आणि सांगली कोल्हापुरी तिखट यात फरक मात्र नक्कीच आहे.

खानदेशी खाना खायाईच नय ??????? असे उगीचच म्हणण्यापेक्षा तुम्ही सांगली वगैरे भागातील तिखट खाणे खाऊन बघा आणि मग फरक स्वतःच ठरवा. आपने भी सांगली का खाना खायाईच नय असे म्हणायला आम्हालाही स्कोप आहे कसे ?
असो. धनंजय माने बरुबर बोल्ले . वांडच ओ माने

इरसाल's picture

9 Jul 2016 - 3:11 pm | इरसाल

जे दिलय ते मुळी कोणाबरोबर तुलना करण्यासाठी नाहीच,
खानदेश म्हणजे तिखटजाळ हा गैरसमज मोडावा म्हणुन, आता त्यातले काही पदार्थ आहेत तिखट, पण सगळ तिखटजाळ म्हणजे सरसकटीकरण होतय म्हणुन हा प्रपंच.

सुज्ञ's picture

9 Jul 2016 - 2:49 pm | सुज्ञ

राममंदीर चौक येथील हॉटेल नवरत्न येथे मसाला टोस्ट चांगला असतो . चुकून पैप्रकाश लिहिले.

Vidyadhar1974's picture

9 Jul 2016 - 3:04 pm | Vidyadhar1974

अबबबबबबब भरपूर

उमेश नेने's picture

9 Jul 2016 - 4:37 pm | उमेश नेने

मिरज मध्ये मंगळवार पेठ येथे ' मेघराज ' मधील वाडा सांबार खूप छान होता पण आता कसा असतो माहीत नाही.

मिरज मार्केट - संधयाकाळी "गुडलक " च्या गाडी वर ' रगडा पॅटिस' खूप छान असते तशी चव कोठेच नाही

सामान्य वाचक's picture

9 Jul 2016 - 7:18 pm | सामान्य वाचक

ख्वाजा दरबार भेळ

हे कॉफी बियर काय प्रकरण आहे?

नमकिन's picture

9 Jul 2016 - 9:30 pm | नमकिन

होतो, पै प्रकाश मध्ये नेहमी उतरल्यावर तेथील स्वादिष्ट भोजन चाखलेत, क्रांती भेळ चालत जाण्या इतपत आहे तिथेच थोडे पुढे.
बाकीचे पुढल्या खेपेत.
भडंगाचि ठिकाणे पण मांडली असती तर सामान्य ज्ञानात थोड़ी अजून भर पडली असती.

उमेश नेने's picture

10 Jul 2016 - 9:48 am | उमेश नेने

पै प्रकाश मध्ये ' खिमा पुरी ' (शाकाहारी ) खूप मस्त असते

बहुतेक त्याला कुर्मा पुरी म्हणतात.

सामान्य वाचक's picture

10 Jul 2016 - 11:31 am | सामान्य वाचक

कूर्म पुरी जबर्या

तशी कूर्मापुरी पुण्यात नाही हो मिळत

कैलासवासी सोन्याबापु's picture

10 Jul 2016 - 11:59 am | कैलासवासी सोन्याबापु

आमचे मामेकुळ सांगलीकडले आहे तिकडेच एकदा एका मुंजीत मी आमच्या मामाला वाढप्यावर 'बारक्या कुर्मा आण पटकन' असं ओरडताना पाहिलं अन नखशिखांत दचकलो होतो, कारण आमच्या (अन एकंदरीत उत्तरभारतीय) खाद्यसंस्कृतीत, कुर्मा हा फक्त बकरा चापचा असतो हेच आमच्या डोक्यात असे कायम, मात्र थोड्यावेळात कुर्मा म्हणजे कोबीची (फ्लॉवर) भाजी आहे , हे कळल्यावर निवायला झाले होते, अश्या रीतीने एक आठवण आहे बघा आमची 'कुर्मा पुरीची'

मृत्युन्जय's picture

11 Jul 2016 - 12:00 pm | मृत्युन्जय

बरे झाले सांगुन ठेवलेत. माझ्या डोक्यात कुर्मा म्हणजे फ्लॉवर बटाटा मटारचा तिखट रस्सा

बायदवे पै प्रकाशचा विषय आहेच तर:

शुद्ध शाकाहारी खिमा टोस्ट (कुर्मा नव्हे), ग्रीनपीस ऑम्लेट (ग्रीन पीज नव्हे), आणि कानपुरी मिसळ (हे कुठून उत्पन्न झालं आणि पैप्रकाशमधे कसं पोहोचलं हा विषय गहन आहे) ..हे पदार्थ विसरणं म्हणजे प्रचंड गुन्हा. अर्थात आचारी बदलतात, टेस्ट बदलतात.. पण पदार्थ है सदा के लिए..

नृसिहवाडीतून कोल्हापूर कडे जाणाऱ्या रस्त्यावर शिरोळचा दत्त साखर कारखाना लागतो .तिथे पूर्वी पासून दोन रुपयात झुणका भाकरी मिळते . पण घरातील पत्नीने केलेला झुणका भाकरी व इथल्या गरमा गरम झुणका भाकरीची चव कांही औरच असते . कडकडीत भाकरी व त्यावर लाल झणझणीत कांद्याचा झुणका .फारच मजा येते .अर्थात करणारे हात बदलले की चव पण बदलते . खूप गर्दी असते. भाकरी साठी पाळीत उभारणे थोडे विचित्र वाटते . पण प्रवासात दमून आल्यावर ह्या गावरान खाण्याचा आस्वाद फारच छान .बरोबर कधी कधी कांदा पण देतात .आम्ही खरे कोल्हापुरी बुक्की मारून कांदा फोडतो व खातो .( गावाची ओळख ). अलीकडे त्यांनी दर देखील वाढवले आहेत असे वाटते .

चावटमेला's picture

11 Jul 2016 - 3:51 am | चावटमेला

कुर्मा पुरी हा खास सांगलीकडचा पदार्थ. नवरत्न मध्ये कुर्मा पुरी छान मिळायची. आताशाचे माहीत नाही. ८९-९० च्या सुमारास आमचे वडील मला आणि भावाला राजवाडा चौकातील सांगली बँकेमागे एका लहानश्या टपरीतील लस्सी प्यायला घेवून जायचे. ५० पैसे हाफ आणि १ रू. मध्ये फुल्ल. मला नाव आठवत नाही, पण तशी लस्सी मी जन्मात प्यायलो नाही. आता ते दुकान सुरू आहे की नाही हे सुद्धा माहीत नाही. दूध कोल्ड्रिंक ही सुद्धा खास सांगलीकर डेलिकसी, कोल्हापुरात सुद्धा छान मिळते. पुष्पराज चौकातील दूध कोल्ड्रिंक ला मात्र तोड नाही. बाकी मला विचाराल तर मेन कोर्स पेक्शा सांगली हे स्नॅक्स चे गाव आहे. उप्पीट हे सांगलीचे सिग्नेचर स्नॅक म्हणायला हरकत नाही. बृयाच टपर्‍यांवर, उडप्यांच्या हॉटेलात भरपूर डालडा/तेल, उडीद डाळ आणि कडी पत्ता घालून केलेल्या उप्पीटाची गोल वाफळाती मूद आणि तो कडी पत्त्या मुळे येणारा विशिष्ट कर्नाटकी पद्धतीचा वास डोळे, नाक, जीभ तिन्ही इंद्रिये तृप्त करून जातो. बापट बाल जवळ प्रसाद नाष्ता सेंटर आणि विश्रामबाग मध्ये गणेश, दोन्ही ठिकाणचे उप्पीट मस्त. सांगलीच्या भेळेचा युएसपी म्हणजे सांगली चे चुरमुरे. थोडे से बुटके आणि जाड असे चुरमुरे नुसते सुध्दा खमंग लागतात. चुरमुरे जाड असल्यामुळे, गोड आणि तिखट पाणी अगदी खूप टाकून पण मऊ पडत नाहीत. मुंबई प्रमाणेच सांगलीत सुद्धा सिझन मध्ये भेळेत कैरीच्या फोडी टाकतात. पुणे, कोल्हापूर सारखी छान चटकदार मिसळ मात्र सांगलीत कुठे खाल्ल्याची लक्षात नाही (मिळत ही असेल, पण मला माहीत नाही). मिसळी पेक्षा इथे वडा साम्बार, कट वडा जास्त फेमस आहेत. सांगली-मिरज रोडवर गेस्ट हाऊस ला पंडित पेट्रोल पंप शेजार च्या गाड्यावर मस्त कट वडा मिळायचा. पोह्यांचं विचाराल तर वर बर्‍याच जणांनी सांगितल्या प्रमाणे मंजुचे पोहे दी ब्येष्ट.

असो, आज इतकेच
(णॉष्टॅल्जिक) चावटमेला

सिरुसेरि's picture

12 Jul 2016 - 3:40 pm | सिरुसेरि

सांगलीबद्दल बरीच माहिती मिळाली . एकेकाळी सांगलीतील असंख्य निष्पाप नागरिकांना घाबरवुन सोडणारी तडकडताई आठवली .

vikrammadhav's picture

14 Jul 2016 - 3:40 pm | vikrammadhav

अजुनहि असते तडकडताई !!! याच दिवसात !!!!

भाग्यश्री कुलकर्णी's picture

14 Jul 2016 - 9:40 pm | भाग्यश्री कुलकर्णी

हे तडकताई काय प्रकरण आहे जरा विस्कटुन सांगा की राव.

कैलासवासी सोन्याबापु's picture

16 Jul 2016 - 2:08 pm | कैलासवासी सोन्याबापु