✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बाप हाय मी

अ
अभ्या.. यांनी
गुरुवार, 06/16/2016 - 16:55  ·  लेख
लेख
"बरं मग वकीलसाहेब, आलं समदं ध्यानात? ह्येच्यापुढं मी काय सांगू नये, तुमी इचारु नये" "लका, वकीलसाहेब झालो नंतर, आधी जिगरयार हौत. चड्डी घालता येत नव्हती तवापासून दोस्ती आपली" "म्हणूनच. म्हणूनच... चल लाग आता कामाला, लै लेट बी झालाय, वैनीसाब वराडतील" "झोप तू बी. डोळे लेन्स लावल्यागत झालेत लालभडाक" "झोपेचं तेवढं सोडून बोल. ती ग्येली आता कायमची, निघ तू" ................. "नाग्या, सगळं घीवून ये बे वर" "मालक, वैनीसाब येते म्हणतेत वर, कसं करु?" "झोपा म्हनाव त्येंना. तू ये घीवून. च्यायचं आकरामाशी" ************************** तिज्यायला कोनाय बे आकरामाशी. कोन म्हणतंय? समोर ये उंडग्या. नाही उभा जाळला तर पाटलाचं रगात नाय सांगणार. ए नाग्या.... कुठं पळाला? आकरामाशी औलाद पळालीच का अशी? आनतो का आता? आन आन. भर नीट. नीट भर आयगल्या. नीट. हां. चल निघ. भईर थांबायचं. चल. .... .रामराम पाटील. कसं चाल्लंय? लै भारी वाटतंया आं बसून दारु प्याया? प्या...प्या. आपल्याच कारखान्याची गेलेली आसंल तिकडं. तितंबी रिमिक्स करतील आयगले. तसं न्हवं..कलर लैच उतरल्यासारका वाटतय. कुनाचा? आं? कुनाचा? न्हाई म्या म्हणलो ओ...माननीय माजी आमदार श्री. तात्याराव पाटील. कसं वाटतंय? आँ.... माजी. थुततिच्यायला. फुकाट नाय झालो भौ आमदार. लगी माजी? चौथीला होतो तवा जप्ती आलेली डीसीसीची शेतावर. आजा पाया पडायलेला साह्यबाच्या. आदी शेत खायला समदे आलेले आता भावकीतला एक किडा उठला नाय तिज्यायला. आकरामाशी म्हणत व्हती त्या टायमाला आमच्या आज्याला. त्येनं कवा कुटं शेण खाल्ल्यालं पण डाग पडलेलाच. तवाच बाप उठला तिरीमीरीत. धरला हाताला आन म्हनला चल दाखवू पाटलाचं रगात कसं घट्ट हाय ते. पंध्रा वर्स राबला कुत्र्यागत तवा १० एकराचा तुकडा कोरा झाला. शिकिवला मात्र नेटानं आमाला. तालुक्याला कॉलेज केलं संगाट राजकारण बी केलं. खानदानी रक्तय आपलं एवढं कधी इसारलो न्हाय. रुप आन जिगर बघून साह्यबानी घेतलाच ग्रामपंचायतीवर. सदस्याचा सरपंच झालो आन सरपंचाचा आमदार. फुकाट नाय झालो. पानी केलो रक्ताचं पानी. ************************** "नाग्या............पानी आन बे" "मालक, बघवंना ओ मला. काय एकटाच बसला बोलत आरश्याम्होरं?" "ए...चल नीघ, एकटाच है आपण. बास्स्स्स. एकटाच. चल नीघ तू" ************************** हां तर पाटील. काय सांगत होतो म्या? ते आमदारकीचं. कारखाना उभारला की तेच्या आधी. इक्रमी येळेत हां..इक्रमी येळेत. साहेब आलेले उद्घाटनाला. तात्या एकटाच तरणाबांड वाघंय इलाक्यातला म्हणलेले. हायंच आपण. आपली सोयरीक बी बापानं अशी धरली की नादच करायचा न्हाइ. शाण्णव मंजी शाण्णव. बापानं कधी राजकारण न्हाई केलं आपल्या पन आडा़खे न्हाई चुकले. लग्नाला सोता शीएम, बारा कॅबिनेट आन चाळीस आमदारं जेवून गेलेली. नंतर बी तीनचार येळेला आलेलं साह्यब. रातच्याला हितंच फार्म हाउसावर बसायची मिटींग. शीएम तर आपल्या फडावर आन केळ्याच्या बागंवर काय खुश लका. आर्ची बारकी व्हती तवा. सोता साहेब म्हणलेले. आगामी मिनिस्टर हायेत ह्या. च्यायला तवा बी शीएमची कॉलर पकडलेली आर्चीनं. रक्तातंच व तिच्या. पायजेल ते मिळीवणारच. जन्मली तवा लै तरास दिली. रातरातभर आमदारकी इसरुन खांद्यावर खेळवलेलं आर्चीला. तवापासून राहयली न्हाय कधी सोडून मला. खरंच राह्यली न्हाई माझ्याबिगर. तिच्यानंतर पोरगं झालं पण जिगर म्हणली तर आर्चीच. फार्महाउसला तिचं नाव दिलं तवा कसली नाचली. वरची रुम पार फॉरीनगत सजवून दिलेली. सोताबी पाउल न्हाय टाकलं तिच्या परमीशनबिगर. बुलेट दिलेली प्रिन्श्याला पण चलवायची हिच. ट्र्याक्टर बी चलवली तरी आपला फुल्ल पाठिंबा व्हता ओ. ....................... तिच्यायला पलटलं कुटं? कुटं कमी पडलाव आमी? व्ह्य गं आर्चे...आं? कमी पडलाव का कधी कशात? मी म्हणतो केल्या का कधी तुझ्या बापानं अपेक्षा? तू जे करंल ते खरं म्हणलं ना नाय? सगळ्याच्या अपेक्षाच पूर्ण करत चालली ओ जिंदगी. ह्ये तुझ्या परशाचा बाप. जिंदगीभर झटला आसता तरी मिळाला असता का ठेका धरनाचा? हितं बंगल्यावर येऊन पाय धरला तवा मच्छीमार सोसायटी काढून नाव घीवून दिली. ती नाव घीवूनच उडला का नाय आमच्यावर? तू म्हणली शिकती. आडिवली का तुला? नसंना का मार्क? डीग्री तर व्हतीच की हक्काची. कॉलेज आपलंच होतं की. आं. प्रिन्सराजेनी वाजवली त्या मास्तराला. बोललं का कुणी त्येन्ला? तू मंग्याला आडवली. पोरांना बी नडायची. काय झालं का कदी? कशाला बी न्हाइ म्हनलं न्हाइ पोरी तुला..........एकदा तर इचार करायचा बापाचा. काय मिळीवणार हुतीस आं? बापाची मान खाली गेली की लै सुख लागतं का? आगं ही मान वर करायला चाळीस वर्श खपलाय हा बाप. हेच्या पुढच्या इलेक्शनला महिला राखीवची हवा होती. सगळ्यात तरुण आमदार म्हणून थाटात विधानसभेत गेली आसती. हायेच तेवढी पुण्याई आपली. तुला तेवढीच जड झाली व्हय? आं. राजवर्धनराजेंचं स्थळ तर फक्त तुझ्यासाठी थांबलेलं. दहांदा इचारलेलं. म्या म्हणलं आमदार अर्चना पाटील होणार आन मगच समदं. कुटं लागावा तुझा परश्या त्येंच्यापुढं. तरी घरच्याना दहांदा सांगितलेलं. लक्ष असुंद्या, लक्ष असुंद्या. घरचा भेदी निघाला तिज्यायला मंग्या. बापाचा हुंदे येळ्कोट. भावाकडं तरी बघायचं. भैन सांभाळता येईना आन तालुका काय संभाळनारे म्हनून शेण खायची येळ आनली. तू कसाबी कर गं संसार. पण सोताच्या घरावर का निखारा ठेवतीस आं. न्हाई चलायचं. डोळ्यात तेल घालून राखलेली येल आपली. कुठला काटा खुपला ग तुला. फुलून डोलायलीस त्येचा अभिमान करस्तवर आल्लाद खूडून घेउन गेला त्ये कडू. म्या तर म्हणतो तुलाच कसं काय न्हाय वाटलं? आं. समदं इसरली? न्हाई चलायचं अज्याबात. तुला नाही ना किंमत आमची आर्चे? नाही ना कळत आयबापाचं काळीज? असुंदे. कळंल ना एकदिवस. राहतीस न्हवं सुखानं? राहा. पण एक घर इस्कटून दुसरं न्हाई उभं करायचं. मला चलणार न्हाई ते. माझ्या घरावर नांगर फिरीवला तर त्येला उखडून काढनारच. कोन का आसंना. आं.. काय म्हंतीस? तुमचंच रक्त? हॅटतिज्यायला. तू इसरलीस रक्ताला. आमी न्हाय. ................ लै तरास दिला गं आर्चे. लै जळला बघ जीव. टाकलं संपवून एकदाचच. न्हाई जळनार आता. माफ कर बापाला तुझ्या. जमलं तेवढं केलं. सोताच रक्ताचा खेळ मांडला बी आन इस्कटला बी सोताच. तुझा भाव हाय रक्ताचा. जमल तसं करंल आन निस्तरल. म्या लावली बघ सगळी सोय. सगळं आगदी रितीरिवाजानं केलंय बरका. आपला खानदानी रिवाज न्हाई इसरायचा. घेतला बरका सगळा गुन्हा, सगळा घेतला अंगावर. तुझ्या भावावर कायबी येणार न्हाई. सगळं केलय सेटींग. तुझं लेकरु बी राहील त्येच्या नशीबानं. त्येचं जेवढं त्येवढं आपलं वकीलकाका पोहोच करतील. म्या काय न्हाय थांबत इथं. इस्काटलं बघ सारं हातानीच. जगणं संपलं ह्या पाटलाचं. वेव्हार निस्तरला, जीव अडकलेला तुझ्यात. नाही जमत माझी माय. न्हाई जमत. बाप हाय गं मी. ************************** (समाप्त) .................. .................. .................. (समदी पात्रं ओळखीची वाटली असली तरी खेळ सारा मनाचा. इस्कटलेल्या खेळाच्या ह्या कहाणीला कुठलाबी खुलासा न्हाई की समर्थन न्हाई)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
14490 वाचन

💬 प्रतिसाद (82)

प्रतिक्रिया

अहो पण, एखादी भावनेच्या भरात

धनंजय माने
Fri, 06/17/2016 - 15:37 नवीन
अहो पण, एखादी भावनेच्या भरात केली गेलेली कृती आणि well planned brain wash which is seen in these fundamentalists may it be ISIS or any other right extremist organisation like S.P. (नवं नाव जोडलं गेलं आहे) कसं तुलना करणार आहात? काही संबंध आहे का दोन्ही तर्कमध्ये. इथे वैयक्तिक सूड आहे तिकडे वेगळं कारण दिसतंय. हिटलरच्या हातात अमर्याद सत्ता आणि हजारो अनुयायी होते. राजा तारतम्य बाळगनारा नसला की काय होतं त्याचं उदाहरण आहे. अग्नीसाक्षि नावाचा नाना पाटेकर, मनीषा,जॅकी चा चित्रपट होता. (त्या काळात असलेच तीन चार आले होते) नानाच्या भूमिकेचा राग येन्या ऐवजी शेवटी वाईट वाटतं कारण त्याची मानसिकता आपल्याला उलगडत जाते. वाईट ते वाईट च. पण ते 'सुरुवातीला' समजून घेतलं आणि त्याला मुळातनं उखडलं तर काही चांगलं होऊ शकतं एवढंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

एखाद्या किलरचे किंवा

कैलासवासी सोन्याबापु
Fri, 06/17/2016 - 15:41 नवीन
एखाद्या किलरचे किंवा अपराध्याचे मानसिक विश्लेषण करणे किंवा 'तो त्या क्षणी किंवा तो वादळी क्षण येऊन गेल्यावर काय विचार करत असेल' ह्यावर विचार करून एक काल्पनिक क्रम लिहिणे मला नाही वाटत त्या विचारांचे उदात्तीकरण म्हणवेल, उदाहरणादाखल आपण आपल्याच मिपावर प्रसिद्ध झालेले अन मोसाद फेम बोक्याभाऊ ह्यांनी केलेले मायकल कोनेलीच्या 'द स्केरक्रो'चं भाषांतर/भावंतर पाहू शकू त्यात MIT चा पासआऊट असलेला खुनी का खुनी होतो त्याला असलेल्या आवडीनिवडी का विकसित होतात ह्याची सुद्धा चर्चा आहे , अर्थात त्याला आपण त्या खुन्याचे उदात्तीकरण तर नक्कीच म्हणणार नाही असे वाटते मला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

..

नीलमोहर
Fri, 06/17/2016 - 16:00 नवीन
थोडा गैरसमज होतोय, इथे लेख वा लेखनाबद्दल काही म्हणायचे नाही, पाटलाच्या डोक्यात शिरून तिथे काय विचार चालले असतील ते शोधून काढून हे असे मांडण्याचे अवघड काम अभ्या यांनी केले आहेच. फक्त त्या संदर्भात वरती आलेले हे वाक्य खटकले. 'प्रत्येक माणसाच्या प्रत्येक कृतिमागे काही ना काही कारणमीमांसा असते. ती समजून घेण्याचा विचार करु लागलात तर ती पटायला लागते. कळत नकळत समर्थन देखील होतं. केलं जातं.' त्यासाठी माझा वरील प्रतिसाद होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

एखादी कृति केली गेली ती का

धनंजय माने
Fri, 06/17/2016 - 16:12 नवीन
एखादी कृति केली गेली ती का केली गेली हे समजलं की आपला दृष्टिकोन बदलतो. त्याच्या वरती भावनांना किंमत न देता नीति, समाज, कायदा यायाच्या चौकटित काय घडतं किंवा घडायला हवं हे मुद्दे येतात. पाटील अंगावर गुन्हा घ्यायला सिद्ध होतोय कारण त्याला प्रिन्स नंतर काय करणार आहे हे माहिती आहे, आपल्या घराचं काय होणार आहे हे माहिती आहे आणि हे सगळं आपल्याला बघवणार नाही हे ही माहिती आहे. आता गुह्याच्या समर्थनाचा विषय. वैयक्तिक पातलीवर गुन्हा होतो तेव्हा त्या गुह्यामागे तात्कालिक राग किंवा आणखी काही कारणं असतात. बऱ्याच वेळा काही कालानंतर गुन्हे होतात, तेव्हा गुन्हा घडण्यापूर्वी मानसिक पातळीवर तो गुन्हा अनेक वेळा घडून गेलेला असतो. 'मनातल्या मनात'- बॉस ला 100 वेळा दोन दोन लगावुन झालेले असतात. एखाद्याचा खून 5 10 वेळा केलेला असतो.-'मनातल्या मनात' एखादा ते का करतो हे समजलं की त्या बद्दल कदाचित सहानुभूति वाटते, त्याचं समर्थन होतं. यात खटकन्या सारखं काय आहे???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

जाऊद्या,

नीलमोहर
Fri, 06/17/2016 - 17:03 नवीन
ते शब्दांचे खेळ नाही जमत हो खेळायला. आणि तसेही इतक्या कळकळीने लिहीण्याची ही जागा नाही, विषयही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

+१ , असेच म्हणते.

स्रुजा
गुरुवार, 06/16/2016 - 20:58 नवीन
+१ , असेच म्हणते. सैराट एकदाचा पाहिला. मला त्याचा शेवट माहिती नव्हता ( बरेच परिक्षणं म्हणुन आधी वाचलीच नाही) , पटला की नाही भाग पुढचा पण कथेच्या ओघात तो आला नाही. कलम लावल्यासारखा वाटला. उत्तरार्धात आर्ची आणि परशाची जगण्याची धडपड, परश्यामधला समजुतदारपणा, असुरक्षितपणा वगैरे जमुन आलंय. आर्चीची अस्वस्थता पण सुरेख जमलीय. पण या सगळ्यात त्यांचा शोध चालू आहे की संपला हे दिसत च नाही. त्यामुळे ४-५ वर्षं सगळं नीट चालू असताना, यांचे पगार वाढलेले असताना अचानक येऊन असं काही तरी हे थोडं उगाचच द्यायचा म्हणुन धक्का दिल्यासारखं वाटलं. शेवटपर्यंत त्यांचा होणारा शोध जर दिसत राहिला असता तर त्याचं सावट आणि रागाची तीव्रता पण कळली असती. थोडा ओव्हर रेटेड वाटला मात्र सिनेमा. असो, या धाग्यावर हे अवांतर च आहे तसं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

चित्रपटाबद्दल थोडंफार हेच म्ह्णायचंय.

यशोधरा
गुरुवार, 06/16/2016 - 22:54 नवीन
अभ्या, लिखाण आवडलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

१११

खेडूत
गुरुवार, 06/16/2016 - 21:53 नवीन
१११ पाटलाचे म्हणूनच वाचले अन आवडले. चित्रपट अजून बघायचाय.. गविंच्या भाषेत सांगायचं तर जळ. लि....!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आवडले रे,पाटलाच्या तर्फे

स्पा
गुरुवार, 06/16/2016 - 20:42 नवीन
आवडले रे,पाटलाच्या तर्फे बरोबर असेच विचार उतरले असते, लेखणित जोर हाय लेका, अजुन लिहि
  • Log in or register to post comments

छान लिहिल आहे.

त्रिवेणी
गुरुवार, 06/16/2016 - 20:56 नवीन
छान लिहिल आहे.
  • Log in or register to post comments

खूप मस्तं लिहिलंय.

पद्मावति
गुरुवार, 06/16/2016 - 21:10 नवीन
खूप मस्तं लिहिलंय.
  • Log in or register to post comments

मस्तच लिहिले आहे अभ्या !!!

राघवेंद्र
गुरुवार, 06/16/2016 - 21:17 नवीन
मस्तच लिहिले आहे अभ्या !!!
  • Log in or register to post comments

:(

रातराणी
गुरुवार, 06/16/2016 - 21:37 नवीन
:(
  • Log in or register to post comments

लय वंगाळ झालं बगा.

सतिश गावडे
गुरुवार, 06/16/2016 - 22:14 नवीन
लय वंगाळ झालं बगा.
  • Log in or register to post comments

भावा ही पोचपावती आमची!पाटील

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 06/16/2016 - 23:16 नवीन
भावा ही पोचपावती आमची!पाटील खासा उतरवला आहेस लगा!! लहानपणी झालेला अन्याय मरमर मेहनत करून अंगात कायमस्वरूपी आलेली रग, कर्तृत्वाचा माज बाप म्हणून पोरीला लाडात ठेवणे ते शेवटी पोरगी जिवं मारल्यावर स्वतःचेच मनोगत स्वतःच स्वतःला आरश्यासमोर सांगून खेळ संपवणे ह्याहून चांगला पडदा टाकला गेला नसता रे अभ्या! लैच खास!
  • Log in or register to post comments

अप्रतिम लिहिलंयस अभ्या!!

किसन शिंदे
गुरुवार, 06/16/2016 - 23:16 नवीन
अप्रतिम लिहिलंयस अभ्या!!
  • Log in or register to post comments

बापूसाब, सगळं कसं बेजवार

अभ्या..
गुरुवार, 06/16/2016 - 23:40 नवीन
बापूसाब, सगळं कसं बेजवार उलगडलं बघा तुम्ही, ते बी इतक्या कमी शब्दात. पावलं भरून. आन किसनराव शिंदे पाटील, धन्यवाद बरका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

पटलं,

चेक आणि मेट
Fri, 06/17/2016 - 10:44 नवीन
पटलं, गावखेड्या मध्ये स्वतःचा मान अन् घराण्याची अब्रू फार महत्वाची असते अणि ती जोपण्यासाचा प्रयत्न गावखेड्यातील उच्चभ्रू कुटूंबे करीत असतात,आत्मसन्मान ही त्यांच्यासाठी मोठी गोष्ट असते,एखाद्याची पोरगी पळाली कि गावभर कशी उलटसुलट चर्चा रंगते आणि त्यातून त्या सन्मानणीय व्यक्तीचे कसे हसे होते हे गावखेड्यातले लोकच सांगू शकतील.
  • Log in or register to post comments

भारी लिवतोस तू लका अभ्या :)

पियुशा
Fri, 06/17/2016 - 10:55 नवीन
भारी लिवतोस तू लका अभ्या :)
  • Log in or register to post comments

अभ्या भाऊ जबरा

rahul ghate
Fri, 06/17/2016 - 11:54 नवीन
भारी रंगवलाय पाटील, थोड आधी लिवला असता तर नागराज ने पण शिनेमा चा एंड बदलला असता येवढा जबरी जमलाय झक्कास !
  • Log in or register to post comments

मस्त..

ब़जरबट्टू
Fri, 06/17/2016 - 14:32 नवीन
आवडेश
  • Log in or register to post comments

अभ्या पाटील

महासंग्राम
Fri, 06/17/2016 - 15:27 नवीन
अभ्या पाटील, एका बापाची तगमग मस्त उतरवलीत लेखणीतून सलाम सलाम सलाम. बाकी ते ऑस्कर पिस्टोरियस म्हणालात त्याची लिंक द्या की जरा की जरा.
  • Log in or register to post comments

बार्शीकर…यकदम वातावरन उब केलं

मालोजीराव
Fri, 06/17/2016 - 16:26 नवीन
बार्शीकर…यकदम वातावरन उब केलं तुमी… शेम करमाळा स्टाईल
  • Log in or register to post comments

लई भारी लिवलंयस

सुधांशुनूलकर
Fri, 06/17/2016 - 18:20 नवीन
लई भारी लिवलंयस भावा. आवडलं. तुझ्या 'ब्रश'प्रमाणेच तुझ्या 'पेना'तही खूप रंग आहेत, ते अधूनमधून असेच बाहेर यावेत...
  • Log in or register to post comments

सैराटचे फॅन फिक्शन

आनंदयात्री
Fri, 06/17/2016 - 19:31 नवीन
सैराटचे फॅन फिक्शन अप्रतिम जमलेय अभ्या. जियो!
  • Log in or register to post comments

लेख कितीही पटला तरी

विअर्ड विक्स
Sat, 06/18/2016 - 21:00 नवीन
लेख कितीही पटला तरी न्यायाच्या नि धर्माच्या पातळीवर त्याचे पारडे हलकेच वाटते…
  • Log in or register to post comments

अभ्या भौ

आनंद कांबीकर
Sun, 06/19/2016 - 00:30 नवीन
वाचताना शब्दांची ताकत जाणवत राहते. अस्सल पाटील रंगवलाय तुमी. आवडले.
  • Log in or register to post comments

अतिशय समर्पक !

अशोक पतिल
Sun, 06/26/2016 - 23:26 नवीन
अभिजित , काय लिहलेय तुम्ही !!! एखाद्याच्या अंतंरंगात जावुन तन्मय झाल्यावरच असे लिखान जमू शकते. पाटील असला म्हणुन काय झाले. आहे तो शेवटी एक बापच ! त्याच्या काळजाची कालवाकालव अचुक पणे शब्दबध्द केलेय राव !!! सैराट हा चित्रपट यात काही तरी खास आहे. सपुंर्ण महाराष्ट्र भर याने मोहुन टाक्लेय. चित्रपट इतिहासात पुर्वी हे फक्त आणी फक्त शोले च्या बाबतित घडलेय .खुप सिनेमे आले आनी गेले. परंतु मनाच्या इतके पार जानारे हे मोजकेच सिनेमे. एक एक फ्रेम मनामध्ये खोलवर रुतलेली.
  • Log in or register to post comments

शुद्ध लिहता तुम्ही!!!

खालीमुंडी पाताळधुंडी
Sun, 06/26/2016 - 23:41 नवीन
शुद्ध लिहता तुम्ही!!! पातिल काय पाटील??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अशोक पतिल

खा मुं पा धुं, कशाला हात

धनंजय माने
Sun, 06/26/2016 - 23:44 नवीन
खा मुं पा धुं, कशाला हात दाखवून अवलक्षण सुरु आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी

Sorry shaktimaan

खालीमुंडी पाताळधुंडी
Sun, 06/26/2016 - 23:48 नवीन
Sorry shaktimaan
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

धन्यवाद !

अशोक पतिल
Mon, 06/27/2016 - 18:55 नवीन
धन्यवाद ! @ खा मु पा. मी फार पुर्वी मिपा नोदंनी केली तेव्हा मराठी टायपिंग माहीत नव्हती. ते नंतर अनुभवाने जमायल लागले.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा