समुद्र..
त्याच्या नुसत्या आठवणीनेही जीवाला थंडावा मिळतो, कानांत लाटांची गाज घुमायला लागते, मग लगोलग एखादा
समुद्रकिनारा गाठण्याची, त्याला डोळे भरून पाहण्याची, मन भरून भेटण्याची अनावर ओढ लागते ..
त्याच्याशी कुठले जन्मांतरीचे नाते आहे माहित नाही, पण मनाला त्याच्या भेटीची आस लागून राहिलेली असते सतत .
रोजच्या बेचव जगण्याने जीव शिणला की त्याच्याकडे जायला निघायचं, त्याच्या एका भेटीने सगळा शीण,
सगळी दु:खं, सगळे त्रास नाहीसे होतात, जगण्यासाठी नवी उमेद, भरभरून ऊर्जा मिळत राहते.
किनार्यावर आधी आपले स्वागत करते ती सुळसुळीत, मऊशार वाळू. ही वाळू कधी शुभ्र पांढरी असते, कधी करडी,
कधी पिवळसर, तर कधी चकचकीत सोनेरी, कधी काळीशार. रंग बदलते असले तरी आपला मऊपणा ती सोडत नाही.
वाटेत शंख शिंपल्यांचा खजिना विखुरलेला असतो, त्यातला जमेल तेवढा गोळा करून घ्यायचा, सांभाळून ठेवायचा.
मग वाळूच्या पायघड्यांवरून अनवाणी चालायला लागायचं, वाळूत पाऊल टाकले की ते खोल आत रूतत जाते,
तो मखमली स्पर्श पायापासून डोक्यापर्यंत सर्वांगात झिरपत जातो.
नंतर इथून घरी परतल्यावर रोजच्या जगण्यात बुडून जाण्याचा कितीही प्रयत्न केला तरी वाळूचा तो मऊमुलायम स्पर्श
सतत जाणवत राहतो पावलांना, आठवण करून देत राहतो मागे राहिलेल्या त्या जीवलगाची.
मग त्या मखमली गालिच्यावरून सावकाश पावले टाकत समुद्राकडे चालत जायचे, त्याला मन भरून पाहत..
त्याचे रूप डोळ्यांत जितके जमेल तितके साठवून घेत. तरीही डोळे कमी पडतात, मन भरत नाही.
समोर तो असतो, त्याचे विशाल बाहू पसरून, जणू आपलीच वाट पाहत थांबलेला. वर्षानुवर्षे.
कधीही गेलं तरी त्याला ओळख पटते, दरवेळी तसाच भेटतो तो मनापासून, युगा-युगांचे नाते असल्यासारखा.
जगन्मित्र तो, सगळ्यांशी मैत्री करणारा, त्याच्याकडे कुठले भेदभाव नाहीत, विकार नाहीत,
त्याच्याकडे जाणारे सगळे त्याचेच.
पाण्यात पहिले पाऊल टाकले की त्या थंडाव्याने पायापासून डोक्यापर्यंत एक थंडगार शिरशिरी उठते.
तसंच एकेक पाऊल टाकत पुढे जात रहायचं, मग हळूहळू तो थंडावा कमी होत जातो, पाण्यात ऊब जाणवायला लागते.
गुड्घ्यापर्यंत लाटा येऊ लागल्या की तिथेच थांबायचं, समोरचा त्याचा अफाट विस्तार डोळ्यांत साठवत उभं रहायचं.
नजर दूर जिथवर जाईल तिथवर तोच असतो, अनंत, नेमस्त..
सभोवतालचा नजारा मनसोक्त नजरेत उतरवून झाला की मागे येऊन लाटा अंगावर घेत बसून घ्यायचं,
तंद्री लावायची निवांत.
एकामागे एक येत राहणार्या लाटा जसजसं आपल्याला भिजवत अंगावरून येतात, जातात, तसतसं आपण आतून
बाहेरून स्वच्छ होत चाललोय असं वाटायला लागतं, निर्मळ.. शुध्द..
शरीराबरोबरच मनावरही चढलेली, रोजच्या जगण्याने दान म्हणून पदरात टाकलेली कसली कसली, निराशा, विषाद,
दु:ख, नकारात्मकतेची पुटं हटत जातात. सगळ्या जगण्यावर जणू एक मळभ दाटून आलेलं असतं ते दूर होऊ लागतं.
मग आपलं अस्तित्व शून्य होत जातं, त्याचं अस्तित्व आपल्यात भिनू लागतं हळूहळू .. अलवारपणे..
मग आपणही त्या अंतहीन प्रवाहाचा एक भाग बनून जातो..
मग मन पिसासारखं हलकं होऊन लाटांच्या हेलकाव्यांबरोबर तरंगू लागतं..
किनार्यावरून दिसणार्या समुद्राला रंग नसतो, नुसत्याच करड्या पांढर्या लाटा दिसतात, मात्र जसजसे आपण आतमध्ये
जाऊ लागतो, तसतसे आत लपलेले त्याचे खरे रंग दिसू लागतात. कधी मोरपिशी निळा तर कधी शाईसारखा गडद,
कधी मातकट, कधी पाचूची हिरवाई घेतलेला, कधी फिकट पोपटी, कितीक रंगांची मनमोहक उधळण दिसून येते.
उगवत्या सहस्त्र्रश्मीने त्याच्यावर उधळलेला गुलाबी तांबूस रंग तो हौसेने मिरवतो, मध्यान्हीला सूर्याच्या प्रखरतेने सगळे रंग उतरवून निस्तेज, फिकुटलासा होतो. मात्र त्याची खरी जादू पहायची सांजवेळेला, तेव्हा आसमंतात पसरलेली पिवळसर केशरी आभा सर्वत्र परावर्तित करून तो सारा सभोवताल सोनेरी बनवतो, आपल्या तेजाने सगळ्यांचे डोळे दिपवतो.
संध्याकाळी समोर अस्ताला चाललेले सूर्यबिंब पहात लाटा पायावर घेत नुसतं उभं रहायचं..
पायांखाली वाळू सरकत, गुदगुल्या करत असते, ती सुखद भावना मनभर पसरवून घ्यायची.
गार वारा वाहत असतो, निरामय शांतता पसरलेली असते, फक्त लाटांची गाज ऐकू येत राहते निरंतर.
हा लाटांचा आवाज एकाचवेळी शांतही असतो आणि रौद्रही, संमोहित करणारा.
क्षितीजापार सूर्यदेव आपला सौम्य पिवळा रंग मागे सोडून सर्वत्र गडद केशरी, लाल तांबड्या छटा
पसरवत हळूहळू मावळत असतो. निव्वळ जादूई, भारलेलं, मंतरलेलं वातावरण असतं ते.
सगळं जग त्या एका क्षणासाठी जणू थांबलेलं असतं, स्तब्ध. नि:शब्द.
समुद्राचे रात्रीचे रूप अगदीच वेगळे, धीर गंभीर, गूढ. समोर काहीही दिसत नसतं, रात्रीच्या नीरव शांततेत केवळ लाटांचा
आवाज घुमत असतो, चांदण्यांत शुभ्र लाटा चमकत असतात. दिवसभर जिवाचा सखा वाटणारा तो, त्याचे हे वेगळेच रूप
समोर असते, अगदीच अनोळखी, एकाकी. त्याचं हेही न्यारं रूप अनुभवत किनार्यावर फिरायचं, थकून झोप अनावर
होईपर्यंत. मग परत सकाळी भेट्ण्याचे वचन देऊन जड मनाने मागे फिरायचं.
त्याची गाज कानाशी, त्याच्या आठवणी उशाशी घेऊन झोपायचं, शांत.
सगळ्यात अवघड वेळ असते निरोपाची, ही वेळ फार वाईट. अशा वेळेस वाटतं इथून कुठेही जाऊ नये,
समुद्रकिनारी घर बांधावं अन रहावं तिथेच, कधी प्रत्यक्षात येतील न येतील अशा अनेक स्वप्नांपैकी हे एक.
मग निघायचं, त्याचा लांबूनच निरोप घेऊन, जवळ जायची, त्याच्या नजरेला नजर मिळवायची हिंमत अजिबातच नसते.
मग तिथली थोडी वाळू भरून घ्यायची, घेऊन जायची सोबत, जेव्हा जेव्हा त्याचा आठव अनावर होईल तेव्हा ती वाळू
हातात घेऊन तिच्यात भरून राहिलेला त्याचा स्पर्श अनुभवत राहायचं.
जे हवं ते सगळंच मिळत नसतं, आहे त्यात समाधान मानणं हेच आयुष्य शेवटी.
पृथ्वी सत्तर टक्के पाण्याने बनली आहे म्हणतात, त्यातले किती टक्के पाणी समोर पसरलेय कसे आणि कशाने मोजायचे.
या समुद्राची पुढे जाऊन भेट होते हिंद महासागर, प्रशांत महासागर, आर्क्टिक, दक्षिण, अटलांटिक सगळ्या सागरांशी.
या सार्या समुद्रांचं पाणी एकत्र येऊन एक मोठा जलाशय बनतो जो संपूर्ण पृथ्वीला व्यापून उरलाय.
या पृथ्वीवर आधी काहीही नव्हतं, तेव्हा तो होता, आत्ताही तो आहे, तोच असणार आहे कायम..
एक दिवस असा येईल की जगात कुणीही नसेल, मनुष्य, प्राणीमात्र, जीवसृष्टी, नावालाही काही उरणार नाही,
सगळं संपलेलं असेल.
तेव्हाही तो असेल इथे.. अथांग.. शाश्वत.. चिरंतन..
संपूर्ण पृथ्वीवर त्याची अमर्याद सत्ता असेल, त्याचेच राज्य..
एक तोच, अनादि, अनंत.
वाचने
5655
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
अत्यंत सुंदर लेख. फोटोही
हाही लेख परत वर स्क्रोल करून
वा वा! सुंदर!
फटू लय म्हन्जे लयच आवल्डे..
मिक्स फोटो आहेत,
In reply to फटू लय म्हन्जे लयच आवल्डे.. by टवाळ कार्टा
पालोलिम आणि अगोंदा ना ? मस्त
In reply to मिक्स फोटो आहेत, by नीलमोहर
रत्नागिरी चा नाही पाहिला अजुन
In reply to मिक्स फोटो आहेत, by नीलमोहर
साऊथ गोवा = भरपूर निवांतपणा
In reply to रत्नागिरी चा नाही पाहिला अजुन by स्रुजा
अलिबाग परीसरात फिरताना कुणी
In reply to रत्नागिरी चा नाही पाहिला अजुन by स्रुजा
ई हैवे बिकम गणेशा. कन्नोट सी
फ़ोटो दिसले. डोळे निवले.
In reply to ई हैवे बिकम गणेशा. कन्नोट सी by धनंजय माने
खूप सुंदर
सुंदर विडंबन !
विडंबन? कशाचे?
In reply to सुंदर विडंबन ! by प्रसाद गोडबोले
हा आठवडा
फोटो बघून आम्हाला पाटणे आणि
+१
In reply to फोटो बघून आम्हाला पाटणे आणि by अभ्या..
+१.
In reply to फोटो बघून आम्हाला पाटणे आणि by अभ्या..
सुंदर आहे सगळं !!
लेख आवडला.फोटो जास्त आवडले!
+१
In reply to लेख आवडला.फोटो जास्त आवडले! by अजया
छान लिहिलंय.
+१
In reply to छान लिहिलंय. by उल्का
कडक!!
फोटो भारी लैच भारी
अप्रतिम!! कुणीतरी फार खुश
लेखन व फोटू आवडले. अनेक आठवणी
अप्रतिम मुक्तक.
सुंदर लेख, अप्रतिम फोटो !
मी अनुवाद केलेल्या काही ओळी....
मस्त लिहिलेय ...
अप्रतिम सुंदर लेख व प्रकाशचित्रे !
अप्रतिम!
अधिक काय ?