Skip to main content

'कोसला'सोबत एक दिवस

लेखक समीरसूर यांनी सोमवार, 13/06/2016 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
"कोसला"विषयी खूप काही ऐकून होतो. विकत घ्यायचे मनात होते. पण शनिवारी (दि. ११-जून-२०१६) दुपारी माझ्या मोठ्या भावाच्या घरी पोहोचलो. तिथे सोफ्यावर कोरेकरकरीत "कोसला" दिसले. दादाने नुकतेच मागवले होते. शनिवारी संध्याकाळपर्यंत काही कामांमुळे वेळ मिळाला नाही. संध्याकाळी "कोसला" हातात घेतलं. रात्रीचं जेवण घेतल्यानंतर थोड्या गप्पा झाल्या आणि "कोसला"वर झडप घातली. त्याआधी दादाला 'कसे आहे' म्हणून विचारले. त्याने सुरुवातीची काही पाने वाचली होती आणि नंतर त्याला वेळ मिळाला नाही. तो म्हणाला "तू वाच आणि ठरव. वाटल्यास घरी घेऊन जा. वाचून संपलं की परत आणून दे." मी शनिवारी रात्री सुरुवात केली आणि रविवारी संध्याकाळी पाच पर्यंत वाचवून संपवलं. रविवारी जरा एक-दोन कामांनिमित्त बाहेर जायला लागलं. थोडा वेळ गप्पांमध्ये गेला. अन्यथा अजून थोडं आधी संपलं असतं. असो. "कोसला" हे भालचंद्र नेमाडे या 'ज्ञानपीठ पुरस्कार' विजेत्या लेखकाचं पहिलं पुस्तक. कादंबरी खरं तर. वयाच्या पंचवीसाव्या वर्षी त्यांनी हे पुस्तक १९६३ मध्ये जेमतेम पंधरा दिवसात लिहून पूर्ण केलं. देशमुख आणि कंपनीने हे पुस्तक प्रकाशित केलं तेव्हापासून या पुस्तकाच्या चोवीस आवृत्ती आणि अनेक पुनर्मुद्रणं प्रकाशित झाली आहेत. मराठी साहित्यात "कोसला" हे मैलाचा दगड ठरलं आहे. "कोसला"वर पीएचडी करणार्यांची संख्या लक्षणीय आहे. शिवाय "कोसला"चा साहित्यिक धांडोळा घेणारी आणि त्याचं साहित्यिक मुल्य मोजू पाहणारी जवळपास १०० पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. देशमुख आणि कंपनीने नेमाडेंना त्याकाळी त्यांची ही पहिलीच कादंबरी असूनदेखील वि. स. खांडेकरांना मिळायचे तेवढे मानधन दिले होते. "कोसला"ने त्याकाळी वाचकांना वेडं केलं होतं. अजूनही प्रकाशनानंतर त्रेपन्न वर्षांनी "कोसला"ची मोहिनी पूर्णपणे उतरलेली नाही. या माहितीपैकी बरीचशी माहिती मी आधी ऐकलेली होती आणि म्हणूनच मी शक्य तितक्या लवकर "कोसला" वाचून संपवलं. मला "कोसला" कसं वाटलं याला खरं म्हणजे काहीच अर्थ नाही. "कोसला"ने जो इतिहास रचायचा होता तो कधीच रचला आहे. तरीही इतक्या गाजलेल्या कलाकृतीचा अनुभव कसा होता हे सांगीतल्याशिवाय चैन पडणार नाही म्हणून थोडं धाडस करतोय. मला "कोसला" कसं वाटलं हा या लेखातला एक भाग आहे. "कोसला"ची निर्मितीप्रक्रिया आणि त्यामागची कारणमीमांसा ही मला जास्त आवडली. तीदेखील विशद करण्याचा थोडा प्रयत्न करतो. "कोसला"ची कथा बहुतेक सगळ्यांनाच माहिती आहे. पांडुरंग सांगवीकर हा नायक खान्देशातल्या एका अगदी लहान खेड्यातून पुण्यात फर्गसन महाविद्यालयात बीएचं शिक्षण घ्यायला येतो. त्याची कौटुंबिक, सामाजिक, आणि वैचारिक पार्श्वभूमी फर्गसन महाविद्यालयाच्या एकूण संस्कृतीपेक्षा अगदीच निराळी! पुण्यातली जगण्याची पद्धत त्याच्या गावातल्या जगण्याच्या संकल्पनेपेक्षा अगदीच भिन्न! पांडुरंग सांगवीकर या बदलांना कसा सामोरा जातो; अपयशाचा शिक्का कपाळी बसल्यानंतर पुन्हा गावात जाऊन पांडुरंग काय काय अनुभवतो आणि त्या अनुभवांना कसा सामोरा जातो; आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक घटनेविषयी, परिस्थितीविषयी, विचाराविषयी त्याच्या मनात अगदी खोलवर कुठ्ल्याप्रकारचे सूक्ष्म तरंग उठतात आणि तो एक स्वतंत्र विचार करू शकणारी व्यक्ती म्हणून प्रत्येक प्रसंगात कसा वागतो याचं मनस्वी चित्रण म्हणजे "कोसला" ही कादंबरी होय. हे कथासूत्र आता बहुतेक सगळ्यांनाच माहिती आहे. मला व्यक्तीश: "कोसला" रटाळ वाटलं. अगदी मैलाचा दगड वगैरे माहित असूनदेखील माझ्या एकूण वाचण्याच्या प्रक्रियेवर फारसा फरक पडला नाही. कधी कधी एखाद्या कलाकृतीचं किंवा व्यक्तीचं नावाजलेपण मनात ठेवून आपण त्या कलाकृतीकडे किंवा व्यक्तीकडे पाहतो आणि अशा वेळेस त्या मनातल्या पूर्वकल्पनेमुळे आपण त्या कलाकृतीचा किंवा व्यक्तीचा आपल्याला वैयक्तिक पातळीवर आलेला अनुभव नीटपणे जोखू शकत नाही. शिवाय आधीच्या मोठेपणाचं ओझं असतांना "आपल्याला काय वाटलं हे खरं कसं सांगायचं? बाकी रसिक आपली मापं काढतील" वगैरे दडपण असतंच. अगदी अशा प्रलोभनांना बळी पडून आपली झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवायची असं ठरवूनदेखील मला "कोसला" रटाळ वाटलं. विचारांचं मुक्त, जसं आहे तसं, विचार जसे मनात येतील तसे असं मुद्दाम म्हणून दिलेलं रूप म्हणून जरी "कोसला"कडे बघायचं म्हटलं तरी मला "कोसला" वाचतांना आनंद मिळाला नाही. "कोसला" माझ्या हृदयाचा ठाव घेऊ शकलं नाही. खरं म्हणजे मी देखील फर्गसन महाविद्यालयातच शिकलो; तिथल्या वसतिगृहात राहिलो; पुण्यातून माझ्या खान्देशातल्या गावाकडे जात राहिलो; अकरावी (विज्ञान) मध्ये नापास झालो; त्यानंतर एक वर्ष गावात राहिलो. "कोसला"मधले बरेचसे अनुभव मी देखील घेतले. मला "कोसला" खूप जास्त भावायला खूप जास्त वाव होता. तरीदेखील "कोसला" मला तितकं आवडलं नाही. "कोसला"ला कुठलाच सुसूत्र प्रवाह नाही. अर्थात, सुसूत्रता टाळणे हा लेखकाचाच विचार होता. "कोसला"मध्ये निश्चित अशी कथा नाही. त्यामुळे बरेच अनाकलनीय किंवा मूळ विषयाला धरून नसलेले संदर्भ खूप मोठ्या प्रमाणात येत राहतात. अर्थात हे ही ठरवूनच. कादंबरीचा आवाका आणि पोत मुद्दाम तसाच ठेवलेला आहे. हे मान्यच. पण मला कुठेतरी हे बेताल भरकटणे आणि भरकटल्यानंतर मूळ मुद्द्यावर लवकर न येणे किंवा अजिबातच न येणे हे कादंबरीचा रटाळपणा वाढवते असे वाटले. उदाहरणार्थ, चार-पाच पाने नायकाने फक्त उंदीर मारण्याच्या प्रयत्नांना वाहिलेले आहे. नायकाला उंदरांचा भयंकर राग असतो. हा राग समजू शकतो पण तो थोडक्यात प्रभावीपणे मांडता आला असता. डायरीची तारीखवार पाने तशीच अनाकलनीय. एका तारखेवर "बुंदीचे लाडू आणि रव्याचे लाडू" तर एका तारखेखाली फक्त अ ची बाराखडी आहे. तारखेखालचा बहुतांश सगळाच मजकूर उदाहरणार्थ अनाकलनीय वगैरे आहे. कित्येक घटनांच्या वर्णनातून लेखकाला नेमके काय म्हणायचे आहे हेच कळत नाही. नायकाचे टोकाचे विचार अगदीच समजू शकतात पण घर जमीनदोस्त करून टाकण्याची इच्छा होणे, वडिलांना अरे-तुरे करून त्यांच्याशी भांडणे, त्यांचा खून करण्याची इच्छा होणे, वगैरे भाव कुठल्या कोनातून पटण्यासारखे किंवा समर्थन करण्यासारखे वाटतात हे कळत नाही. नायक सधन घरातला असतो. त्या काळात त्याला व्यवस्थित जगता येईल इतके आणि लागेल तेव्हा पाहिजे तितके पैसे वडील पाठवत असतात. मद्रास हॉटेलमध्ये जाऊन नायक खूप खाऊ शकत असतो आणि भकाभका सिगारेटी फुंकू शकत असतो. घरी आई-वडील, आजी, बहिणी असे सगळे असतात. एवढं सगळं व्यवस्थित असतांना हे अतिभयंकर टोकाचे विचार कशासाठी हा प्रश्न वारंवार पडत राहतो. जीवाची इतकी तगमग, घालमेल कशासाठी? मग केवळ सनसनाटी निर्माण करावी म्हणून तर लेखक असे लिहित नसेल असेही वाटून जाते. विचारांमध्ये आणि ते विचार निर्भीडपणे मांडण्यामध्ये इतका पारदर्शकपणा असतांना झगडू गड्याचे गायब होणे, त्याचे अपत्य नायकाच्या वडीलांनी सांभाळणे वगैरे यातून नायकाला नेमके काय म्हणायचे आहे हे मात्र गुलदस्त्यात राहते. कथेचं एक वेळ जाऊ द्या पण संपूर्ण कादंबरीत निरर्थक वाटणारे असंख्य उतारे आहेत. 'उदाहरणार्थ', 'वगैरे', 'हे एक थोरच', 'हे एक भलतंच' हे शब्द किंवा उद्गार असंख्य वेळा अकारण येत राहतात. लिखाणात उगीच घुसडलेले हे शब्द किंवा उद्गार काही काळानंतर 'भंपक' वाटायला लागतात. "उदाहरणार्थ हे कोसलाचं व्यवच्छेदक लक्षण आहे" असं काहीसं मलपृष्ठावर ज्येष्ठ समीक्षक रा. ग. जाधव लिहितात. म्हणजे नेमकं काय मला अजिबातच उदाहरणार्थ कळलेलं नाही. बाकी पाच वर्षाच्या बहिणीचा देवीमुळे झालेला करुण मृत्यू, त्यामुळे नायकाला झालेलं दु:ख, घरच्यांचा आलेला संताप, सिंहगडावर केलेली पायपीट, वेताळटेकडीवर दिव्याचे रहस्य शोधण्यासाठी केलेले धाडस, मेस सांभाळण्यात नायकाला आलेले अनुभव, गावातल्या गरीब लोकांची मानसिकता असे बरेचसे भाग बऱ्यापैकी अंगावर येतात. या व अशा अजून काही भागांमध्ये नायकाच्या हृदयाची तगमग भाषेचे कुठलेही अलंकार न वापरता अंगावर शहारा आणते. मी जे वाचलं त्या "कोसला"च्या शेवटी लेखकाचं २०१३ मध्ये लिहिलेलं परिशिष्ट आहे. त्यात "कोसला"च्या निर्मितीची कथा आहे. साठच्या दशकात लेखकाच्या म्हणण्यानुसार मराठी साहित्यावर ब्राह्मणी पद्धतीच्या लेखनाचा पगडा होता. अलंकारिक भाषा, कृत्रिम कथावस्तू, कृत्रिम कथामांडणी, अतिशय गोड किंवा अतिशय रडक्या लिखाणाचा तो जमाना होता. वाचकांना अशा प्रकारच्या लिखाणाचा कंटाळा आला होता. त्यातच लेखकाचे देशमुख आणि कंपनीच्या रा. ज. देशमुख यांच्याशी सख्य जुळते. घरगुती गप्पांमध्ये लेखक देशमुख आणि त्यांच्या पत्नी यांच्या जवळ "कादंबरी लिहिणं काही विशेष नाही; मी आरामात चांगली कादंबरी लिहू शकतो" असं म्हणतात. देशमुख लेखकाला आव्हान देतात की तू कादंबरी लिहून दाखवच. लेखक पेटून उठतो आणि एक अतिशय वेगळा आकृतीबंध असलेली कादंबरी लिहून काढतो. तीच ही "कोसला". झपाटल्याप्रमाणे सिगारेटी ओढत लेखकाने "कोसला" अक्षरश: पंधरा दिवसात पूर्ण केली. अलंकारिक भाषा, भावनिक वर्णनं, एका प्रवाहात बांधलेली कथा, कथेमध्ये नेहमी आढळणारी सुसूत्रता अशा रुढार्थाने कादंबरी यशस्वीरीत्या रचण्याच्या पद्धतीला छेद देत लेखकाने ही निराळीच कादंबरी रचली. एका अपयशी विद्यार्थ्याचे अगदी मनापासून आलेले हे प्रामाणिक आणि वास्तवदर्शी अनुभवकथन असे वर्णन लेखक "कोसला"चे करतात. नायकाच्या प्रश्नांना वाचक आपले प्रश्न समजतात. "कोसला"च्या जन्माची ही कहाणी सुरस आणि खूपच हृदयस्पर्शी आहे. एकंदरीत "कोसला"ने भारावून वगैरे जाण्याची जी माझी अपेक्षा होती ती मात्र फोल ठरली. अर्थात, वाचक "कोसला"शी कुठल्या पातळीवर आणि कसा जोडला जातो यावरदेखील "कोसला" आवडणं किंवा न आवडणं अवलंबून आहे. त्यामुळे "कोसला" आवडलेल्या वाचकांविषयी आदर आहेच. मी पुन्हा वाचेन का? शक्यता आहे. विशेषत: "कोसला"च्या जन्माची कथा (परिशिष्ट - ८-१० पाने) मला फारच आवडली. "कोसला"मधला काही भाग मला नक्कीच आवडला. एवढं तर मी दुसऱ्यांदा नक्कीच वाचू शकेन.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 21650
प्रतिक्रिया 122

प्रतिक्रिया

In reply to by समीरसूर

ही कादंबरी कॉलेजला असताना एकदा वाचली होती, तेव्हा असेच प्रश्न पडले होते. नंतर 'stream of consciousness' तंत्राचा अभ्यास केल्यावर आधीपेक्षा कादंबरी नीट कळली आणि आवडलीही. दुसरे असे, फडके, खांडेकर यांचे romantic (साहित्यातले romantic या अर्थाने ) साहित्य, रणजीत देसाई यांच्यासारख्यांचे इतिहासाला गोड मुलामा दिलेले साहित्य यातून मराठी साहित्याला कोसलाने बाहेर काढले.

In reply to by विशाखा पाटील

"संज्ञाप्रवाह" तंत्राचा सुंदर कुशलतेने उपयोग करुन अप्रतिम कथा कादंबरृया (लिलीची फुले इ.) लिहील्या. त्याने मराठी साहीत्य समृद्धच झाले.

In reply to by नीलमोहर

@ नीलमोहर मनात जसे येतील तसे विचार लिहून काढले आणि कुणाला वाचायला दिले तर वाचणाऱ्याला ते पचनी पडतील याची शक्यता खूपच कमी आहे. म्हणजे हे सगळं लिहिणं साहित्य या प्रकारात मोडेल की नाही याबद्दल साशंकता वाटते. वाचकांनी उत्साहाने वाचावं यासाठी लिखाणात नेटकेपणा आवश्यक आहे. नुसता शब्दांचा अफाट पसारा म्हणजे साहित्य होऊ शकत नाही. या न्यायाने फेसबुक, व्हाट्सआप वगैरे वर जे सगळं चालतं त्याला साहित्य म्हणावं लागेल. ग्रेट, ऑसम वगैरे उस्फुर्तपणे एक विशिष्ट संदर्भ घेऊन येतं. त्याला निश्चित अर्थ असतो आणि ज्याला जोडून हे म्हटलं जातं त्याचा अर्थ गहिरा करण्याचं काम हे शब्द करतात. "कोसला"मध्ये 'उदाहरणार्थ' हा शब्द अकारण आणि संदर्भ अजिबातच नसतांना येतो. तसंच बाकीच्या काही शब्दांचं! कादंबरीला प्रयोजन आहे पण क्षुल्लक घटनांवर खर्च केलेली पाने रटाळपणा वाढवतात. हे तर आपण नेहमीच बघतो. असो.

In reply to by समीरसूर

साहित्य म्हणजे नक्की काय आणि त्याची व्याख्या काय हे कसे आणि कोण ठरवणार. साहित्य हे ठराविक चौकटीत बसणारे असावे, त्यात कथानक पाहिजे, सुसूत्रता पाहिजे, अगम्य नको, क्लिष्ट नको इ. अनेक साच्यांमध्ये ते फिट्ट बसवण्याचा प्रयत्न तरी का करावा. साहित्यात वेगवेगळे लेखनप्रकार, प्रयोग असावेत, आपण त्यांचा आस्वाद घ्यावा, आवडले तर चांगलेच अन्यथा सोडून पुढे जावे. यातूनच नवीन विचार समोर येतात, असलेल्या विचारांना चालना मिळते, नवे अनुभव येतात, त्यातून आपणही घडत जातो. 'मी देखील फर्गसन महाविद्यालयातच शिकलो; तिथल्या वसतिगृहात राहिलो; पुण्यातून माझ्या खान्देशातल्या गावाकडे जात राहिलो; अकरावी (विज्ञान) मध्ये नापास झालो; त्यानंतर एक वर्ष गावात राहिलो. "कोसला"मधले बरेचसे अनुभव मी देखील घेतले. मला "कोसला" खूप जास्त भावायला खूप जास्त वाव होता. ' - माझे याच्या अगदी उलट आहे, वरीलपैकी कोणतेही अनुभव मी घेतले नाहीत, तरीही पांडुरंग सांगवीकरचे विचार माझ्यापर्यंत पोहोचले, मी त्यांच्याशी रिलेट करू शकले, यामागे काय कारण असेल. लेखनामागील भावना, विचारांशी, त्या विचारांमागे जो माणूस आहे त्याच्याशी, माणूस म्हणून हे कनेक्शन झाले. बाकी यासाठी अजून काही स्पष्टीकरण देता येणारही नाही. कोसला एक कमिंग ऑफ इज, अर्थात वयात येण्याच्या प्रोसेसबद्दलची कादंबरी आहे, मात्र हे वयात येणं निव्वळ तारुण्याशी निगडित नसून, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर येत जाणाऱ्या प्रगल्भतेशी जोडलेलं आहे. त्यामुळे यातील विचारांशी कुठल्याही वयातील वाचक रिलेट करू शकतो, ती भावना सर्वांमध्ये सारखी असते. सौरा यांनी प्रतिसादात लिहिले आहे तसे, ' कथेच्या शेवटाकडे जाताना एक प्रकारची आर्तता जाणवते, खुप तुटल्यासारखं वाटतं. त्या सर्वस्व हिरावलं गेल्याची भावना प्रत्येकानेच कधी ना कधी अनुभवलेली असते त्यामुळे तिच्याशी रिलेट होता येतं असं वाटतं (सर्वांनाच नाही).' - ही जी तुटलेपणाची, अस्वस्थपणाची, आतून येणारी भावना असते, ती आपण कधी न कधी अनुभवली असते त्यामुळे आपल्यापर्यंत कादंबरीतील लेखन पोहोचते, अगदी त्यातील विस्कळीत, असंबद्ध, अगम्यपणासकट. ती एक हत्ती आणि सहा आंधळ्या माणसांची गोष्ट आहे, ज्यात प्रत्येकजण त्या हत्तीच्या सोंड, पाय, शेपूट इ. एकेका अवयवावरून तो हत्ती म्हणजे नक्की काय असेल याबद्दल वेगवेगळे अंदाज लावतो. यातील प्रत्येकाचा व्यक्तिनिष्ठ अनुभव योग्य वाटत असला तरी एकूणात तेच सत्य असेल असे नाही. कुठल्याही गोष्टीचा प्रत्येकजण आपल्या परीने अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो पण तोच अर्थ बरोबर असे कुणी म्हणू शकत नाही. तसेच एखाद्या कलाकृतीकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असणार, तो व्यक्ती सापेक्ष राहणार. एक पुस्तक शंभर जणांनी वाचले तर त्याबद्दल शंभर मते, त्यात मतांतरे ही असणारच, त्या प्रत्येक मताचा आदर असावा एवढेच.

In reply to by आतिवास

हे सर्वकालीन असंच मत असत नाही, असू नये असं वाटतं. सगळ्यांच्या मताचा आदर फ़क्त 'आदर्श स्थितियों में' शक्य आहे.

In reply to by नीलमोहर

संयत आणि नेमका प्रतिसाद. आवडला. माझे ही हेच म्हणणे - कोसला आवडणे न आवडणे हे व्यक्तीसापेक्ष आहे. If someone does not like an artistic creation, there is absolutely nothing right, wrong, intellectual, or unintellectual about it. Opinions can be debated, but not the genuineness of one's feelings and experiences.

In reply to by नीलमोहर

+१०० कोसला नावावरून कादंबरीकडे बघितलं का?

इथे "कोसला" समजलेले वाचक आहेत. मला वाटलं त्यांच्याकडून कळेलच. नेमाडेंना नको विचारायला. उगीच "तुमच्यासारख्या मठ्ठ वाचकांना डोक्यात दगड टाकून ठार केलं पाहिजे" म्हणत चिडले तर पळता भुई थोडी होईल. ;-) अजून एक आठवला: "कोसला" या शब्दाचा अर्थ काय? मला संपूर्ण पुस्तकात हा शब्द आढळला नाही.

In reply to by समीरसूर

कोसला म्हणजे माझ्या ज्ञानानुसार सुगरणीचा खोपा. ते काड्यकाड्याने विणलेले घरटे. अपार्टेमेंटाच्या जाहीरातीत असते ना हो? तेच.

In reply to by अभ्या..

धन्यवाद. "घोसला"सारखं? सारखे वाटतायेत दोन्ही शब्द. "कोसला" मराठीमध्ये वापरलेला इतरत्र मी कधीच पाहिला नाही.

In reply to by समीरसूर

मला तरी कुठे म्हैते. अंदाजाने दिला भिरकावून. बादवे परवाच एका मराठी टीवी प्रोग्रामात "त्याने इतकं कोसलं ना मला" हा मिंदी शब्दप्रयोग ऐकण्यात आलेला आहे. ;)

In reply to by अभ्या..

बादवे परवाच एका मराठी टीवी प्रोग्रामात "त्याने इतकं कोसलं ना मला" हा मिंदी शब्दप्रयोग ऐकण्यात आलेला आहे. ;) "मिंदी" बहुधा मराठी अधिक हिन्दी चा कॉम्बिनेशन आज शब्दसंग्रह वाढवला की हो आमचा अभ्या साहेब. आजपर्यंत हिंग्लीश माहीत होत फक्त धन्स ह

In reply to by पुंबा

कोसला = कोष. पांडू सांगवीकर एक फेल्युअर बनून त्याच्या कोषात राहतो असा गोष्टीचा आणि टायटलचा संबंध आहे बहुधा.

मला कोसलाही आवडली आणि तिच्या पाठोपाठ वाचलेली गारंबीचा बापुसुद्धा आवडली. लोक काही का म्हणेनात मला हिंदु सुद्धा आवडलीच. आक्रुतीबंध खुप वेगळा आहे हे खरंच आहे पण आवडण्याचं कारण ते नाही. या कथेच्या शेवटाकडे जाताना एक प्रकारची आर्तता जाणवते, खुप तुटल्यासारखं वाटतं. त्या सर्वस्व हिरावलं गेल्याची भावना प्रत्येकानेच कधी ना कधी अनुभवलेली असते त्यामुळे तिच्याशी रिलेट होता येतं असं वाटतं (सर्वांनाच नाही).

In reply to by पुंबा

या कथेच्या शेवटाकडे जाताना एक प्रकारची आर्तता जाणवते, खुप तुटल्यासारखं वाटतं. त्या सर्वस्व हिरावलं गेल्याची भावना प्रत्येकानेच कधी ना कधी अनुभवलेली असते त्यामुळे तिच्याशी रिलेट होता येतं असं वाटतं (सर्वांनाच नाही).

In reply to by पुंबा

@ सौरा आपण "कोसला" आवडण्य़ाचं अतिशय नेमकं आणि पटण्यासारखं कारण दिलेलं आहे. आपल्या दृष्टीकोनातून विचार करता हे कारण पटलं. उगीच भारंभार शब्दांचा पसारा नाही; अगम्य अशी थिअरी नाही. आपला प्रतिसाद आवडला.

In reply to by समीरसूर

धन्यवाद. कारण अहो कुणाला काय आवडावे हे एखादी थीअरी सांगू शकेल असं खरच वाटत नाही. इन्जिनीअरींगला दुसर्या वर्षात असताना कोसला वाचलेली तेव्हा थोडी तिरपागडी वाटलेली पण तेव्हा पण मनूचा म्रुत्यू त्यानंतरचे अजिंठ्याला गेल्यानंतरचे स्वगत आणि शेवटची २०-२५ पाने खूप आवडलेली.. त्यानंतर लगेचच गारंबीचा बापू वाचली ती कथेच्या बाबतीत अतिशय सशक्त, जीव मोठा आणि विलक्षण पात्रे यांनी भरलेली. मात्र तेव्हा जाणवलेलं की आपल्याला दोन्ही अनुभव आवडले. जे विश्व उभे करण्याची लेखकाची मनिषा होती ते करणे त्यांना शक्य झाले आहे. कथा हा विचार संगण्याचा एक मार्ग केवळ. बाकी जे दाखवायचं आहे ते खरोखर तितके भव्य असेल तर कथा हा भाग गौण असावा असे मला वाटते.

कोसला बद्दल ची इथली उदाहरणार्थ सखोल चर्चा वाचून मिपा हे एक थोरच संस्थळ आहे असं वगैरे वाटून गेलं.

कोसला बद्दल ची इथली उदाहरणार्थ सखोल चर्चा वाचून मिपा हे एक थोरच संस्थळ आहे असं वगैरे वाटून गेलं.

समीरसूर यांचं कोसलाबदद्लचं हे मत अनेकदा ऐकायला मिळतं. मी कोसला वयाच्या सतरा-अठराव्या वर्षी होस्टेलमध्ये रहात असताना वाचली. तेव्हापासून कोसला प्रचंड आवडली, संग्रहात आहे आणि पुन्हापुन्हा वाचली जाते. आजही कोसला आवडते. अगदी दोन आठवड्यांपूर्वी बँकॉकमध्ये 'रिक्लाइनिंग बुद्ध' पाहतानाही मला आठवला तो पांडुरंग सांगवीकर :-) प्रतिसादातून झालेली चर्चा आवडली. जव्हेरगंज, आदूबाळ, मारवा, बोका-ए-आझम, कानडाऊ योगेशु, नीलमोहर, सौरा यांचे प्रतिसाद आणि एकूण चर्चा उद्बोधक वाटली.

In reply to by आतिवास

नाही हो; मी "कोसला" पहिल्यांदाच वाचलं. याआधी कधीच वाचलं नव्हतं. आणि मिपावर "कोसला"विषयी "कोसला" न वाचताच मी मत दिल्याचं खरंच आठवत नाही. म्हणून तर मिळाल्यावर अधाशासारखं वाचून काढलं. आणि तसं न वाचताच मी "कोसला"विषयी जर खरंच 'हे' मत 'अनेकदा' दिलं असेल तर क्षमस्व! ते चुकीचं आहे. तसे याच लेखात "कोसला" न आवडलेले प्रतिसाद बरेच आहेत. :-)

In reply to by समीरसूर

अनेक लोकांकडून नेमकं असंच मत ऐकायला मिळत - असं म्हणायचं होतं. तुम्ही वारंवार हे मत मांडता असा अर्थ अभिप्रेत नव्हता. गैरसमज होऊ शकेल असं ध्यानात आलं नाही. क्षमस्व.

"अर्थात, वाचक "कोसला"शी कुठल्या पातळीवर आणि कसा जोडला जातो यावरदेखील "कोसला" आवडणं किंवा न आवडणं अवलंबून आहे. त्यामुळे "कोसला" आवडलेल्या वाचकांविषयी आदर आहेच. मी पुन्हा वाचेन का? शक्यता आहे. " हे मी मूळ लेखात म्हटलेलं आहेच. "कोसला" ज्यांना आवडली त्यांच्या मताचा आणि आवडीचा आदर आहेच. फक्त ज्यांना ती आवडली नाही त्यांचा मताचा आणि आवडीचा अनादर होऊ नये एवढीच माफक अपेक्षा. :-)

In reply to by समीरसूर

फक्त ज्यांना ती आवडली नाही त्यांचा मताचा आणि आवडीचा अनादर होऊ नये एवढीच माफक अपेक्षा. :-) हॅ हॅ हॅ. .भलत्याच अपेक्षा ब्वॉ तुमच्या. बाकी, एखाद्याला जर 'कोसला' आवडली नाही तर कसा तो वाचक अत्यंत सुमार दर्जाचा आहे आणि आपण काही तरी वेगळे,प्रगल्भ वाचक आहोत हे लोकांना समजणार कसे? अगम्य (निरर्थक?) शाब्दिक बुडबुड्यांतून हे शाबित करायचा प्रयत्न करणे हे एक थोरंच !

कोसला माझ्या आवडत्या कादंबऱ्यापैकी एक आहे. कोसला संपल्यावर जाणवनारी मेलँकाँली इतर रोमँटीक शोकांत कादंबऱ्यांपेक्शा वेगळी आहे. कोसला वाचल्यानंतर काही वर्षांनी सँलींजरचीं "कँचर इन द राय" वाचनात आली, या दोन्ही कादंबऱ्यांचा घाट आणि काही प्रमाणात कथावस्तु सारखीच वाटली.

कोसला माझ्या आवडत्या कादंबऱ्यापैकी एक आहे. कोसला संपल्यावर जाणवनारी मेलँकाँली इतर रोमँटीक शोकांत कादंबऱ्यांपेक्शा वेगळी आहे. कोसला वाचल्यानंतर काही वर्षांनी सँलींजरचीं "कँचर इन द राय" वाचनात आली, या दोन्ही कादंबऱ्यांचा घाट आणि काही प्रमाणात कथावस्तु सारखीच वाटली.

कोसला माझ्या आवडत्या कादंबऱ्यापैकी एक आहे. कोसला संपल्यावर जाणवनारी मेलँकाँली इतर रोमँटीक शोकांत कादंबऱ्यांपेक्शा वेगळी आहे. कोसला वाचल्यानंतर काही वर्षांनी सँलींजरचीं "कँचर इन द राय" वाचनात आली, या दोन्ही कादंबऱ्यांचा घाट आणि काही प्रमाणात कथावस्तु सारखीच वाटली.

कोसला माझ्या आवडत्या कादंबऱ्यापैकी एक आहे. कोसला संपल्यावर जाणवनारी मेलँकाँली इतर रोमँटीक शोकांत कादंबऱ्यांपेक्शा वेगळी आहे. कोसला वाचल्यानंतर काही वर्षांनी सँलींजरचीं "कँचर इन द राय" वाचनात आली, या दोन्ही कादंबऱ्यांचा घाट आणि काही प्रमाणात कथावस्तु सारखीच वाटली.

In reply to by आबा

जॉन लेनीन ला मारल्या नंतर तो खुनी पोलीस येइ पर्यंत तिथेच थांबला व तो "कॅचर इन द रे" हे पुस्तक वाचत होता असे वाचल्याचे आठवते. काय आहे हे पुस्तक ? याबद्दल लिहा वाचायला आवडेल.

In reply to by राजाभाउ

त्यातला प्रोटँगोनिस्ट सुद्धा सांगवीकरासारखा निरर्तकतेचं तत्वज्ञान बनवू पाहणारा आहे. काँलेज संपेपर्यंत खिन्नतेकडे होत जाणारा त्याचा हळूहळू पण निश्चित स्वरूपाचा प्रवास सँलींजरने दाखवला आहे. सांगवीकर गावाकडे जाऊन राहतो तसा भाग कँचर मध्ये नाही, हा मला कँचरचा प्लस पाँईंट वाटतो. प्रत्येक कथेला क्लोजर देण्याची भारतीय सवय यामागे असावी (ऊदा. "टैक्सी ड्रायव्हर" या सिनेमाचे भारतीय वर्जन "प्रहार"). कथानक असं यात नसल्याने जास्त लिहीणं अवघड आहे, परंतु कँचर हे एक चांगलं पुस्तक आहे. बाय द वे, लेननचा किस्सा माहीत नव्हता

आधुनिक मराठी साहित्याचा ऐतिहासिक विरोध विकासवादी दृस्ठीकोनातून विचार करता असे वाटते कि , कोसला सारखी कादंबरी समाज विन्मुखतेच्या मनोवृत्तीतून एका विशिस्त मनोगन्दातून निर्माण होणार्या पलायनवादी स्वप्न रंजनातून निर्माण झाली आहे .समाजाला अकरणात्मकतेच्या स्थाणुत्वाकडुन कर्णात्मक गतीमानातेकडे जाताना असल्या कलाविहीन कादंबर्या प्रतीविरोधी ठरतील . - Consciousness consists of supercharged electrons of quantum energy. “Quantum” means a deepening of the spatial. We exist as bio-electricity.

आता वाचन सुरु आहे. सर्व पुर्वग्रह वगैरे दुर थेउन वाचणार आहे. पण उत्सुकता वाधली.

In reply to by स्वामिनी

लगेच आपला अभिप्राय द्यावा ही विनंती! :-) तीनशे पानांची आहे फक्त. १-२ दिवसात संपायला हरकत नाही. आपल्याला काय वाटले हे इथे सांगायला विसरू नका फक्त! तेवढीच जरा उदाहरणार्थ गंमत वगैरे... ;-)

--" कोसला आवडणे न आवडणे हे व्यक्तीसापेक्ष आहे. "--------- +१०० असेच एक उदाहरण आठवले ते म्हणजे "चितळेंची बाकरवडी आवडणे न आवडणे हे व्यक्तीसापेक्ष आहे."