Skip to main content

कानडी पद्धतीचे सांबार

लेखक शाल्मली यांनी गुरुवार, 22/01/2009 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्याच इमारतीमध्ये रहाणार्‍या माझ्या कानडी मैत्रिणीने ही खास त्यांच्या पद्धतीच्या सांबाराची पाकृ सांगितली. हे अस्सल कर्नाटकी सांबार आहे. इडली बरोबर तेथील लोक हेच सांबार खातात. भाताबरोबरही छानच लागते.
साहित्य :- १ लहान वाटी तुरीची डाळ १+१ कांदा १ टोमॅटो २ लहान बटाटे अर्धी वाटी ओले खोबरे १ लहान चमचा धने १ लहान चमचा जिरे २ चमचे सांबार पावडर १ चमचा रसम् पावडर (रसम् पावडर नसल्यास सांबार पावडर त्यानुसार जास्त) छोट्या लिंबाएवढी चिंच चवीनुसार मीठ फोडणीसाठी- २ चमचे तेल, मोहरी, हिंग, हळद १ चमचा तिखट कृती:- तुरीची डाळ शिजवून, घोटून घ्यावी. बटाटे उकडून फोडी करून घ्याव्यात. एक कांदा चिरून घ्यावा. चिंचेचा कोळ करून घ्यावा. मिक्सरच्या भांड्यात एका कांद्याच्या फोडी, टोमॅटोच्या फोडी, ओले खोबरे, धने, जिरे, सांबार आणि रसम पावडर असे घालून, गरजेनुसार पाणी घालून मऊ, मुलायम पेस्ट करून घ्यावी. एका पातेल्यात तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. त्यात कांद्याच्या फोडी घालून चांगले परतून घ्यावे. त्यानंतर त्यात वाटून घेतलेली पेस्ट घालावी. थोडे परतावे. परतताना त्यात थोडे पाणी घालावे म्हणजे खाली लागणार नाही. या मिश्रणात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालाव्यात. चिंचेचा कोळ घालावा. त्यानंतर घोटून घेतलेली डाळ घालावी. चवीप्रमाणे मीठ आणि एक लहान चमचा तिखट घालावे.गरजेनुसार पाणी घालावे. गरज वाटल्यास वरूनही थोडा सांबार मसाला घालावा. सांबाराला खळखळून उकळी येऊ द्यावी. गरम गरम भाताबरोबर गरमागरम सांबार वाढावे. किंवा इडल्यांबरोबर आस्वाद घ्यावा. :) --शाल्मली.

वाचने 6817
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

वाह! क्या बात है! थंडीच्या दिवसात गरम गरम सांबार आणि भात! पण हे सांबार वेगळेच आहे. असे कधी केले नाही. करून बघते व सांगते. बाकी, तुला ते कांद्याच्या पातीच्या कोशिंबीरीचं कळवलं होतं ते वाचलस का? रेवती

अरे वा! वेगळंच प्रकरण आहे हे. माझा आपला समज होता की दक्षिण भारतीय सांबार सगळे सारखेच असते. पण हे कानडी सांबार आहे. बहुतेक प्रांतानुसार सांबाराची चव आणि करण्याची पद्धतही बदलत असावी. मस्त रेसिपी शाल्मली. तुझ्या रेसिपीज प्रयोग ताबडतोब होतात आमच्याकडे. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

रेवती, प्राजु ही वेगळीच आहे कृती. कारण यात ओले खोबरे घातले आहे.. आपण नेहमी सांबार करतो त्यात खोबरे घालत नाही. या सांबाराला त्या खोबर्‍यामुळे छान दाटपणा येतो. आणि रसम पावडर मुळेही छान चव येते.. --शाल्मली.

In reply to by शाल्मली

पाकृ. छान. पण मी ताजा मसाला केला नसल्यास नेहमीच सांबाराला एमटीआरचा रसम आणि सांबार मसाला एकत्र घालते. ते जास्त चांगले लागते असा अनुभव आहे. करून पाहीन अशा पद्धतीने.

गरमगरम वाफाळत्या भातात खळगा करुन त्यात सोडलेले सांबार आणि चमचाभर तूप! ह्म्म्म्..मनात दरवळायला लागलाय सांबाराचा घमघमाट!! =P~ चतुरंग

शाल्मलीदेवी, सांबाराच्या पाकृ सुरेख. नक्की करून पाहणार. आपल्याला आणि आपल्या कानडी मैत्रिणीला धन्यवाद.. तात्या.

ते कानडी पध्दतीचं सांबार पण काय छान बनवलय बगा... ते येक वेळ करून सोडतोच कि नाही बगा मी आता.. सकाळी सकाळी ईडली बरोबर खायचं म्हणजे कस छान वाटतं ते... पाप. शाल्मलीआक्का खुप खुप धन्यवाद वो..

छानच गं शाल्मली वेगळी पध्द्त आहे...करुन बघेन... :) ---वल्लरी

केले. झक्कास्स्स्स्स्स्स आहे. आईट्म!

In reply to by गरम मसाला

अरे वा! आपण केलेत सुद्धा लगेच..!! धन्यवाद! --शाल्मली.

हे जिवघेणे सदर आहे. सकाळी सकाळी असे काही पाहिले की कसकसच होत.. इडली आणि हे सांबार मस्त नाश्ता . :)

In reply to by विनायक प्रभू

हो.. मी पण खाल्ले आहे तसे.. छान लागते. तसेच सांबारात भेंडी सुद्धा छान लागते. --शाल्मली.

मस्त आहे गं रेसिपी....मी सुद्धा फक्त साउथ इंडियन पद्धतीचे सांबार करत होते....ही रेसिपी तर मस्तच कारण कांदा, टोमॅटो बारीक पेस्ट करुन घालायचा...आणि ज्यांना कांदा,टोमॅटो आवडत नाही त्यांच्यासाठी उत्तम आहे..

मला असं वाट्तं की आणखी तिखट्पणा आणण्यासाठी फोडणीत लाल मिर्चि वापरावी... पुढ्च्या वेळि ट्राय करेन,,,!

सर्व खवय्यांचे मनापासून आभार! धन्यवाद. :) --शाल्मली.