Skip to main content

भुजणं/भुजणे

लेखक उल्का यांनी रविवार, 05/06/2016 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
ही रेसिपी एका मिपा मैत्रिणीला हवी होती. मग इथेच दिली म्हणजे इतरांना पण उपयोग होईल. भुजणं अनेक प्रकारे बनवतात. ते जाडसर असतं. मुख्य घटक कांदा, आलं, लसूण, ओले खोबरे, कोथिंबीर आणि ओल्या हिरव्या मिरच्या हे हवेतच. मी ज्या प्रकारे बनवते ती कृती इथे देते आहे. मी फक्त बोंबलाचे भुजणे बनवते. परंतु बटाटा, वांगे, पापलेट, कोलंबी ह्याचे पण बनवता येते. तर बोंबलाचं भुजणं अशा प्रकारे... Bombil Bombil Rassa १. खूप मोठे बोंबिल असतील तर दोन तुकडे करायचे आणि लहान असतील तर तसेच अख्खे ठेवायचे. चांगले धुऊन घ्यायचे. २. त्याना चवीनुससार मीठ, १/४ चमचा हळद, १ चमचा लाल मिरची पावडर लावुन ठेवयची. मग २ कांदे, १ इंच आलं, ७-८ लसुण पाकळ्या, २-३ ओल्या हिरव्या मिरच्या व मूठ्भर कोथिंबीर हे सर्व कौशल्यपूर्ण जितकं बारीक चिरता येइल तितकं चिरायचं. हे सर्व प्रमाण वरील १० ते १२ बोंबलांसाठी लागू आहे. ३. मिक्सर मध्ये खोबरं कमीत कमी पाणी घालुन वाटायचं. वाटताना दम लागला म्हणुन थांबाल तेव्हा १ चमचा तांदळाचं पीठ घालायाचं. पुन्हा नव्या जोमाने वाटायचं. ४. हे सर्व करेपर्यंत बोंबलांत तिखट-मीठ मुरत असतं. तेव्हा जरा रमत गमत ही कामं केलीत तर बोंबिल चवीष्ट लागतील. ५. काही जण खोबरं न वाटता तसंच घालतात. तर काही जण खोबरं वाटताना अगदी थोडं थोडं आलं-लसूण-मिरची-कोथिंबीर पण वाटतात. पण मला ती चव-वास जास्त कडक-उग्र वाटते. म्हणुन मी खोबरे नुसतेच वाटते. ६. जेवणाची वेळ होत आली की कढईत १ पळीभर तेल गरम करायचं. त्यात कांदा मऊ होइपर्यंत परतायचा. मग मिरच्या-आलं-लसूण घालून आणि थोडा वेळ परतायच. ७. वाटलेलं खोबरं घालायचं. पाणी घालू नका. बोंबिल स्वतःच इतके पाणी पाणी होत असतात की आपण पाण्यासाठी हात आखडताच ठेवायचा. ८. बोंबलाना लावलेलं मीठ ध्यानात ठेवून बेताने मीठ घालायचं. ऊकळी आली की अलगद बोंबिल सोडायचे. ९. बोंबिल खूप नाजुक असतात. पटकन शिजतात. खूप ढवळू नका. मोडतील नाहीतर. कोथिंबीर घालुन एकदाच हलक्या हाताने ढवळा. झालं तयार आपलं बोंबलाचं भुजणं! गरम गरम खायचं. चपाती आणि भात दोन्हीबरोबर छान लागतं म्हणजे अगदी छानच लागतं. नक्की करुन बघा. टीप-शाकाहारी कृतीत तेलात हिंग, मोंहरी, कढिपत्ता याची फोडणी करुन मग कांदा घालावा. - उल्का कडले

वाचने 20300
प्रतिक्रिया 49

प्रतिक्रिया

मी थोडा चींचेचा कोळ घालतो मस्त लागतो

In reply to by नीळा

मी विसरले की. थँक्स! मी पण घालते. :) चिंचेचा कोळ किंवा 4-5 कोकम/आमसुलं. पुन्हा एकदा आभार!

In reply to by उल्का

झालं कल्याण! मिपाकरणी आहात ना दोघी! ;) उल्काताईंचं एकवेळ ठीक आहे पण कवे, तूही फसलीस ना!

In reply to by रेवती

अग हे कालवणच आहे फक्त यात शाकाहारी भाजीची फोडणी दिलीये,आमच्याकडे मासे शिजवतात त्यात कान्दा घालत नाही , कान्द्याने गोडसरपणा येतो,फक्त कोलम्बी करताना वापरतो

वसई विरार डहाणू पट्ट्यात भुजिंग नावाच्या पदार्थाच्या पाट्या पाहिल्या होत्या. खायचंच आता एकदा. हेच ते का? पण तिथे चिकन भुजिंग लिहीलेलं होतं.

In reply to by सुनील

आमचा पण भारी जीव हो! बरं हे भुजिंग कसे करतात माहित आहे का किंवा कुठे खात्रीने चांगले मिळेल सांगू शकाल का? मुंबईतले ठिकाण?

In reply to by उल्का

पालघर, बोईसर , डहाणु पट्ट्यात गल्ली बोळात मिळत अगदि लाम्ब गावातही एक तरी गाडी असतेच सन्ध्याकाळी, ताडी, दारु पिणार्‍यासाठी तर फेमस चखणा आहेच पण घरातहीचवीने बनवुन खाल्ले जाते

In reply to by गवि

हो आमच्याकडे फेमस भुजिग , पोहे असतातच असे नाही, मटण, चिकनच्या तुकड्याना मसाला लावुन निखार्‍यावर भाजणे व नन्तर लिम्बाचा रस लावणे याला भुजिन्ग म्हणतात!

In reply to by गवि

निदान फोटो तरी डकवावा आणि तुम्हा सर्वाच्या वाटेच खाउन याव असा विचार करुन पार्कच्या बाहेर चिकन बिर्यानीच्या दुकानात जाउन विचारल तर भुजिन्ग सम्पल सुद्धा आता उद्या लवकर जाउन पाहीन

In reply to by कविता१९७८

वा वा. अवश्य. धन्यवाद. पाकृही विचारुन घ्या. आणि सर्वसाधारणपणे दक्षिण दिशेस एकदोन पीसेस उडवून मग आस्वाद घ्या.

In reply to by विशाखा राऊत

पालघर , बोईसर , डहाणु पट्ट्यात यालाच भुजिन्ग म्हणतात, मी बोईसरला राहते. यात खायचा कलर घातलाय कारण हे घरी बनवलेले नाही.

In reply to by गवि

मिपावर गणपा यांनी ही रेसेपी दिली आहे. भुजिंग हे मुळचे विरार आगाशीचे. आगाशीच्या जवळपास गेल्यास खावुन बघाच.

In reply to by गवि

आमच्या आगाशी (विरार) चे चिकन भुजिंग फेमस आहे एकदम. रविवारी २-३ किमी रांग लागते विकत घेण्यासाठी; जास्तकरुन अर्नाळा बिचवर धमाल करायला जाणारी पब्लिक असते. मिपावर आलेली गणपा साहेबांची चिकन भुजिंग पाकृ. मी हाय कोळी ह्या यूट्यूब चॅनेलवर आलेली ही जरा वेगळ्या प्रकारची पाकृ.

In reply to by सूड

माहीत नाही...कारण चिकन ऐवजी पनीर, मशरुम अथवा बटाटा कसा लागेल काही कल्पना नाही. तुम्ही करुन पहा व कळवा. कधीतरी व्हेज वर्जन ही खाता येईल त्यानिमित्तानं.

In reply to by यशोधरा

कालवण किंवा रस्सा करायचा असेल तर वजनाखाली ठेवायची गरज नसते. फ्राय करताना आम्ही फडक्यात बांधून पाट्याखाली दाबून ठेवतो.

गवि, भुजिंग वेगळं असतं. मला पण खाऊन बघायचंय. हे ते नव्हे. यशोधरा, ह्यात आम्ही तरी नाही ठेवत. तळायचे असेल तेव्हा मात्र वजनाखाली ठेवतो. माझ्या कोळणीने मला सांगितले की त्या बोंबील तळताना वजन ठेवत नाहीत. तरीही बोंबील कुरकुरीत होतात. हातानेच दाबुन दाबुन भरपूर पीठ लावून भरपूर तेलात मोठ्या विस्तवावर तळतात. :)

बोंबील कुरकुरीत व्हायला एकतर तांदळाच्या पिठात घोळुन तळावेत किंवा रव्यामधे घोळुन तळावेत, रव्यामुळे जास्त कुरकुरीतपणा येतो

शाकाहारी लोकांनी बट्टाट्याचे करा. उत्तम होते.

छान रेसिपी लिहिली आहेस नेहमीप्रमाणे. मी पण बऱ्याच ठिकाणी वेगबेगल्या रेसिपी वाचल्या होत्या त्यातून नेमकी 'भुजणे' रेसिपी कोणती या संभ्रमात होते. तुझी रेसिपी नक्की ट्राय करून पाहीन. कविताने म्हटल्याप्रमाणे आम्ही देखील कोलंबी व खेकडे वगळता मच्छी साठी कांदा व आल वापरत नाही.

In reply to by पूर्वाविवेक

अगं आलं आम्ही फक्त ह्या भुजण्यात आणि बांगड्याच्या 'उकड बांगडा' ह्या पाकृत वापरतो. एरव्ही कांदा आणि मिरी मुख्य. कोकणात निदान आमच्या जातीत 'कांदा मिर्‍याचे चुण' बर्‍याच पाकृत असतेच असते. हे चुण वापरुन केलेली ओल्या मिरचीची साधी डाळीची आंमटी आणि तळलेला तुकडा. मस्तच! मिरीचा वापर खूपच होतो. आलं आणि लसूण जवळ जवळ नाहीच. घटक पदर्थ तेच असतात पण थोडासा फेरफार करुन किती वेग्वेगळं चविष्ट जेवण बनवता येतं नाही? अनेक ध्रर्म, जाती ह्यातील वविविधता ह्यावेळी मला खूप आवडते. कारण प्रत्येकाची जेवणाची खासियत असते. काही पारंपारिक कृती असतात. मला त्यात खूप आवड आहे. तु पण तुमची एखादी खास पाकृ दे ना. मला (आणि मिपाकराना देखिल) आवडेल वाचायला आणि करुन बघायला.

चिकन भुजिंग एकदा खाल्ले होते विरार साईडला..डिव्हाईन चव होती त्याची..अजून पण हा पदार्थ मुम्बईत कुठेही मिळत नाही :( इतका चवदार पदार्थ पण बिर्याणी सारखा फेमस का झाला नाही काय माहीत? जाउदे..बाकी बोंबिल अतिशय प्रिय..