Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्राची अश्विनी on Tue, 05/24/2016 - 11:03
लेखनविषय (Tags)
विनोद
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
(अत्रन्गि पाउस यांच्या बाल संगोपनातील एक वास्तव या लेखावरून हे पूर्वी लिहिलेलं काही आठवलं. ) काय सांगू तुम्हाला! अशी एकेक विचित्र माणसं असतात ना. परवाचीच गोष्ट. आमच्या ह्यांच्या एका स्नेह्यांकडं गेलो होतो, आमच्या बंटीला घेऊन. बंटी? अहो आमचा सुपुत्र! वय वर्षे साडेतीन. पण इतका हुश्शार म्हणून सांगू, भाssरी चौकस! हं, तर त्यांच्या शोकेसमध्ये इतक्या वस्तू होत्या ना! स्वित्झर्लंडची घंटा, हॉलंडची पवनचक्की, युरोपातल्या काचेचा पेला, काय अन काय! आता लहान मूल म्हटल्यावर जिज्ञासा की काय म्हणतात ते असणारच नाही का? आणि आमच्या बंटीला तर भारीच बाई उत्सुकता! आणि आपणच मुलांच्या या गुणाला प्रोत्साहन द्यायला नको का? कारण अशा जिज्ञासू मुलांमधूनच मोठे मोठे शास्त्रज्ञ जन्माला येतात. कुठच्याही वस्तूला हात लावल्याशिवाय, उचलल्याशिवाय का त्याचा रंग, पोत, वजन ई. ई. चं ज्ञान मिळणाराय? आणि वाजवल्याशिवाय का त्या घंटेचा आवाज कळणारेय? बंटीनं साहजिकच कपाट उघडलं. त्या लेलीण बाईंच थोबाड बघायला हवं होतं. इतकं टेन्शन तिच्या तोंडावर की आम्ही काय बोलतोय तिथं तिचं लक्षच नव्हतं. मी म्हटलं सुद्धा, "साडेतीन वर्षाचं पोर ते, आत्ताच तर शिकायचं वय आहे. आणि नेहमीच तो तोडफोड करतो असं नाही काही." पण तिच्या कपाळावरची आठी हटायचं नाव नाही. मला असा राग आला म्हणून सांगू, मुलांचं एवढं पण कौतुक नाही तर बोलावतात कशाला घरी? आणि समजा, चुकून काही मोडलं, फुटलं तर आभाळ थोडंच कोसळतं? वस्तू पुन्हा आणता येते पण दुखावलेल्या मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद? हे लोक आजकालचे पेपर वगैरे वाचतच नसावेत बहुतेक. वाचन संस्कृतीचा अगदी लोप होत चाललाय तो अस्सा. पण मी मात्र सतत वाचत असते, बाल संगोपनाबाबत तर सारंच. शनिवार रविवारच्या पुरवण्यामध्ये पालकांसाठी कित्ती म्हणून लेख, सदरे( articles हो!) येत असतात. "मुलांशी प्रेमाने वागावे, त्यांना रागावू नये. मुले प्रेमामुळे किंवा लाडामुळे नाही तर शिस्तीमुळे बिघडतात." अहो किती मोलाचे आणि उपयोगी सल्ले असतात एकेक. मी सगळे वाचून एका फाईल मध्ये नीट व्यवस्थित लावून ठेवते. सहा फायल्या भरल्यात आत्तापर्यंत. तर सांगायचं असं की आम्ही मुलांना अज्जिबात म्हणजे अज्जिबात रागवत नाही. गोडच बोलतो. परवाचीच गोष्ट. मी पालकाची भाजी केली होती. बंटीच्या नावडीची. पण काय करणार डॉक्टरांनी सांगितलंय तो स्ट्राँग व्हावा असं वाटत असेल तर हिरव्या भाज्या करत जा म्हणून. बंटी पण लब्बाड असा की त्यानं ताट भिरकावून दिलं. पण मी मुळ्ळी चिडले नाही. मी त्याला दुसरं ताट दिलं, पुन्हा भाजी वाढून. त्यानं पुन्हा फेकलं. पण मीही काही हटले नाही. असं इतक्या वेळा झालं. शेवटी भाजी संपली. पण मी मुळीच चिडले नाही, मी पुन्हा मॉलमध्ये जाऊन पालकाची जुडी घेऊन आले. त्याला पराठे करून दिले आणि शेवटी त्याला पालक खायला घातलाच. नाहीतर आम्ही लहान असताना! बापरे! जे पानात वाढलं जाईल ते खायचंच असा दंडक असायचा. आई म्हणायची, "उद्या शिक्षणासाठी, नोकरीसाठी कुठं बाहेर जायची वेळ आली तर प्रत्येकवेळी आवडीचं मिळेलच असं नाही. म्हणून सगळ्याची सवय पाहिजे." हे वाक्य कायमचं ऐकत आलो. मला आठवतं एकदा मी कारल्याची भाजी अशीच रागानं फेकून दिली. (माझ्यावरच गेलाय ना बंटी ?) आणि बाबा जे जाम रागावले म्हणून सांगू, होती त्याच्या दुप्पट भाजी वाढली आणि ती खाल्ल्याशिवाय जेवण मिळणार नाही म्हणून सांगितलं. मी रडले रडले. शेवटी इतकी भूक लागली की चुपचाप भाजी खावी लागली. काय करणार? आता वाटतं, केव्हढा हा दुष्टपणा? मुलांच्या कोवळ्या मनावर किती ओरखडे उठत असतील याचा कधी त्या पिढीनं विचारच केला नाही. त्यावेळी अशी बाल संगोपन, बालमानसशास्त्र यावरची पुस्तकं, लेख वगैरे नव्हते ना. अहो लहान मुलं ती, त्यांना असली अमानुष शिस्त लावायची? आणि आजकाल देश विदेशात सगळीकडं मॅकडोनाल्ड, पिझ्झा हट वगैरे असतात. त्यामुळं शिक्षणासाठी वा इतर कशाहीसाठी कुठही जायची वेळ आली तरी काहीही अडणार नाही या पिढीचं. आणि आजकाल या सार्‍या ठिकाणी हेल्थ फूड सुद्धा मिळतं. ह्या शिस्तवाल्या पिढीचं आणखी एक पालुपद म्हणजे वस्तू जपून वापराव्यात. तोडफोड करू नये. पण खेळताना तोडफोड होणारच नाही का? अहो खेळणं आपटल्याशिवाय का त्याचा आवाज, फील कळणाराय? पुस्तकाचं पान चुरगळल्यावर असा काही सुंदर चुरचुर असा आवाज येतो म्हणून सांगू? चुरगळल्याचा वेगळा, फाडल्याचा वेगळा, फुटण्याचा वेगळा (यातही काच, मेटल, प्लास्टिक ई. चे वेगळे वेगळे आवाज असतात.) पेचण्याचा वेगळा, भिंतीवर गिरगटण्याचा वेगळा, फर्निचर जोरजोरात सरकवण्याचा वेगळा. अहो द्रव पदार्थांचे पण वेगवेगळे आवाज असतात, चहा उशीवर सांडण्याचा , पुस्तकावर सांडण्याचा, जमिनीवर सांडण्याचा! अशा या आवाजाच्या विश्वाची दारे त्यांना खुली व्हायला नको का? परवा माझ्या मैत्रिणीकडं गेले तर तिथं तिच्या आजीचं जपून ठेवलेलं पहिलीचं पुस्तक होतं, आता आमच्या नकळत बंटीनं ते टर्र्कन फाडलं. तर माझी मैत्रीण चक्क रागावली त्याच्यावर. बंटी रडायलाच लागला. लहान आहे म्हणून काय झालं? त्याचा असा अपमान मी नाही सहन करणार कधी. मी तिथून सरळ निघूनच आले. मुलांचा आत्मसन्मान आपणच नाही का जपायचा? त्या फाटक आजी म्हणे बंटी येणार म्हणून कळलं की सगळ्या कपाटाना कुलूपं लावून ठेवतात. सगळी चांगली चांगली खेळणी कपाटात आणि वेल्वेटचा बॉल, मोडकी पेनं अशा वस्तू बाहेर ठेवतात. आणि त्या कपाटांच्या किल्ल्या त्यांना कधीच वेळेवर सापडत नाहीत. फोन वगैरे सुद्धा अगदी उंचावर ठेवलेला असतो. मी काय मूर्ख आहे कारण न समजायला? मीही आजकाल त्यांच्याकडे जात नाही. त्या दिवशी ह्यांना बरं नव्हतं तर आम्ही डॉक्टरांकडं गेलो होतो. डॉक्टर ह्यांना तपासत होते आणि बंटीनं त्यांचा लॅपटॉप उचलला. आहे तीन वर्षाचा, पण मोबाइल, लॅपटॉप यात भारी बाई गती त्याला. पण आमचे डॉक्टर इतके चांगले ना, म्हणाले "फार हुशार दिसतो तुमचा बंटी." एवढंच नाही तर बंटीच्या हातून लॅपटॉप पडला तरी काही बोलले नाहीत त्याला. "असू द्या असू द्या" म्हणाले. बस! मी म्हटलं ह्यांना, आता आपण नेहमी याच डॉक्टरांकडं जायचं. पण का कोण जाणं आजकाल त्या डॉक्टरांची appointment मिळेनाशी झालीय. खूप बिझी झालेत ते. असो. काहीतरी पडल्याचा आवाज आला वाटतं. बघते, बंटी काय नवीन शिकलाय ते. पण तुम्हाला पटतात ना माझे विचार?
  • Log in or register to post comments
  • 17324 views

प्रतिक्रिया

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on गुरुवार, 05/26/2016 - 06:37

Permalink

=))

=))
  • Log in or register to post comments

Submitted by सिरुसेरि on गुरुवार, 05/26/2016 - 07:42

Permalink

मेरा बेटा

"मेरा बेटा मेरा गरुर है ... आप मेरे गरुरको ना ललकारिये" ..... असे कुठेतरी ऐकले आहे .
  • Log in or register to post comments

Submitted by संजय पाटिल on गुरुवार, 05/26/2016 - 12:53

Permalink

शंभरी निमित्त जेपी याना

शंभरी निमित्त जेपी याना बोलवून सत्कार करावा हि नम्र इनंती..
  • Log in or register to post comments

Submitted by रमेश भिडे on गुरुवार, 05/26/2016 - 13:01

Permalink

शंभरी निमित्त चार काचेच्या

शंभरी निमित्त चार काचेच्या बरण्या, दोन रिमोटवर चालणाऱ्या गाड्या, दोन स्मार्ट फोन आणि एक बाबा असा ऐवज बंटीच्या आईला देण्यात यावा असे सुचवतो.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राची अश्विनी on गुरुवार, 05/26/2016 - 16:20

In reply to शंभरी निमित्त चार काचेच्या by रमेश भिडे

Permalink

=)=)

=)=)
  • Log in or register to post comments

Submitted by ब़जरबट्टू on Fri, 05/27/2016 - 16:11

Permalink

अरे देवा..

कार्टी वय ३.. प्रसंग एक :- पोरगी मोरीत जाउन पाण्याशी खेळत असते, मी (न रागवणारा बाबा) - बाळ, असे करू नये, गुड गर्ल असे करत नाही. Bad गर्ल असे करतात. ऐकणार तू, कारण तू गुड गर्ल आहे. - नाही, मी Bad गर्ल आहे. धिंगाणा पुढे सुरु.. बसा बोम्बलत.. प्रसंग दोन :- दोघेही नोकरीला असतो. त्यामुळे मुलगी दिवसभर पाळणाघरात, तिथे रमते, संध्याकाळी एकदम टुण्टुण उड्या मारत असते, आपण हवा सोडलेल्या फुग्यासारखे मलुल.. मनात असते तरी वागण्यात संथपणा असतो.. त्यात पोर जेवत नाही, मोजुन काही घास, फ़ोन दिला तर मोजणे बंद होऊन छान जेवते. पण फ़ोन देणे पटत नाही (मिपा वाचक, दुसरे काय ).. उपाय म्हणून पाचच मिनिट देणार हे सांगतो. अर्थात या पाच मिनिटाची वेळ ठरवणे तिच्याच हातात जास्त असते. कधीकधी प्रकरण दणके देण्यावर जातेच. प्रसंग तीन :- पिरातै च्या पोरासारखी दोनचार गुणी पोर खाली खेळत असतात, हिला झुला वैगरे मिळाला नाही तर ओरबाडून मोकळी. ते रडताहेत. रागाऊन झाले, डांबून ठेवले. दोनचार दणके तर आम्हीच खातो. तेव्हापुरते परत नाही करणार चे गाणे, परत दुस-या दिवशी येरे माझ्या मागल्या.. अर्थात गरज पडल्यास दणके द्यायला मी मागेपुढे पाहत नाहीच. किंबहुना अश्या वेळी राग आटोक्यात ठेवू शकणा-या आईवडिलाबद्दल मला प्रचंड आदर आहे. पण कुठेतरी मनाला पटत नाही राव धुणे असे...
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com