Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by क्लिंटन on Tue, 03/31/2015 - 21:50
जे कधीतरी नक्की होणार असे वाटत होते ती गोष्ट त्यामानाने फारच लवकर घडली. १० फेब्रुवारी रोजी मतमोजणीत दिल्लीत ७० पैकी तब्बल ६७ जागा जिंकून अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने भाजपचा पुरता धुव्वा उडवला. कॉंग्रेसचा तर व्हाईटवॉशच झाला. २०१३ मध्ये बऱ्यापैकी यश मिळविल्यानंतर केजरीवाल कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले होते त्यावेळीच पक्षातील भांडणे कित्येकवेळा चव्हाट्यावर आली होती.तरीही झाले-गेले विसरून दिल्लीच्या मतदारांनी भरभरून मते दिली.तेव्हा मागच्या अनुभवातून शहाणे होऊन यावेळी तरी आम आदमी पक्ष अशी भांडणे चव्हाट्यावर आणणार नाही आणि जबाबदार राज्यकारभार करेल अशी जनतेची अपेक्षा नक्कीच होती. पण येरे माझ्या मागल्या. मागच्या वेळची भांडणे अगदी सौजन्याचे मेळावे वाटावेत अशी कडाक्याची भांडणे यावेळी झाली.शेवटी काय चळवळ्या लोकांना चळवळी केल्याशिवाय समाधान वाटत नाही. सुरवात झाली पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांनी पाठविलेले पत्र फुटले तेव्हापासून.पक्ष आपल्या तत्वांपासून भरकटत आहे आणि सामूहिक नेतृत्वाला तडा जात आहे अशी तक्रार त्यांनी केली.त्यानंतर पक्षाला एकामागोमाग दुसऱ्या अंतर्गत भांडणाच्या वादळांनी घेरले.रामदासांचे पत्र फुटल्यापासून एका महिन्यात या सगळ्या घडामोडींची परिणीती बंडखोर योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्या केंद्रिय समितीमधून हकालपट्टीमध्ये झाली.एकमेकांवर मोठया प्रमाणावर आरोप प्रत्यारोप झाले.केजरीवाल हुकूमशहा आहेत आणि पक्ष तत्वांपासून भरकटत आहे हा आरोप यादव-प्रशांत भूषण यांनी केला तर दिल्ली निवडणुकांमध्ये यादव-प्रशांत भूषण यांनी पक्षाविरूध्द काम केल्याचा आरोप केजरीवालांनी केला. या भांडणाची सुरवात केजरीवालांच्या दुसऱ्या इनिंगच्या अगदी पहिल्या काही दिवसांपासूनच झाली.दिल्लीतील व्ही.आय.पी कल्चरविरूध्द आकाशपाताळ एक करणारे केजरीवाल मात्र स्वत:साठी मोठा बंगला मागू लागले.त्याचे स्पष्टीकरण काय तर म्हणे मला भेटायला भरपूर लोक येतात, कार्यकर्ते येतात. तेव्हा त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मोठा बंगला गरजेचा आहे. म्हणजे इतर पक्षांच्या नेत्यांनी मोठा बंगला मागितला तर ते व्ही.आय.पी कल्चर आणि यांनी तेच केले तर ते मात्र लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून. वा रे आम आदमी. पक्षांतर्गत मतभेदांच्या बातम्या यायल्या लागल्या त्याप्रमाणे केजरीवालांची शुगर वाढली अशा बातम्या निदान मटामध्ये तरी आल्या होत्या.कुणाच्याही तब्येतीविषयी भाष्य करणे योग्य नाही हे नक्कीच.पण जेव्हा मुख्यमंत्रीपदासारखे मोठे जबाबदारीचे पद भूषवायला मिळते तेव्हा त्याबरोबरच ताणतणाव येणारच, इतर अनेक आतले-बाहेरचे विरोधक वाईटावर टपून बसणारच हे मान्य केलेच पाहिजे. घी देखा पर बडगा नही देखा याला काही अर्थ नाही.आणि हे ताणतणाव जर नेत्याला सांभाळता येत नसतील आणि त्यामुळे त्याची शुगर वाढत असेल तर याचा अर्थ तो नेता नेतृत्व करायला योग्य नाही यापेक्षा दुसरे अनुमान काढणे मला तरी शक्य नाही. २००२ ते २०१२ या काळात मोदींना किती आव्हानांना सामोरे जायला लागले होते. कित्येकवेळा "अ ब्लो टू मोदी" अशा बातम्या आल्या होत्या.तरीही सगळ्या आव्हानांना मोदींनी हिंमतीने टक्कर दिली आणि त्यातूनच त्यांचे नेतृत्व बहरले.लोकसभा निवडणुक जिंकल्यानंतर पंतप्रधानपदाची शपथ घ्यायच्या आधी मोदींनी एन.डी.ए च्या नवनिर्वाचित खासदारांपुढे भाषण करताना म्हटले: "मै कभी निराश वगैरा होता नही. निराश होना मेरे डी.एन.ए मे लिखाही नही है". आणि इथे आपले युगपुरूषजी.जरा खुट्ट वाजले की तो ताण यांना सहन होईनासा झाला.आणि त्या तणावामुळे यांच्या तब्येतीवर परिणाम होत असेल तर हे तणाव सहन करायला म्हणजेच नेतृत्वासाठी नालायक आहेत असे का म्हणू नये? मग काय करा? दिल्लीमध्ये पक्षाच्या नेत्यांमध्ये भांडणे लागली असताना केजरीवाल जाऊन बसले निसर्गोपचार आश्रमात बंगलोरला.दिल्लीत असताना आपण किती साधे म्हणून सगळ्या दुनियेत मिरविणारे केजरीवाल बंगलोर विमानतळावर उतरल्यानंतर मात्र कर्नाटक सरकारच्या व्ही.आय.पी सुरक्षेत आश्रमात रवाना झाले.बरोबर १५-२० गाड्यांचा ताफा आणि विमानतळावरून बाहेर पडतानाही व्ही.आय.पी लेन आणि टोल न भरता महाशय पुढे गेले. हत्तीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असतात तसे यांचे दिल्लीतील वर्तन वेगळे आणि बंगलोरमधील वर्तन पूर्ण वेगळे.एक तर आम्ही किती साधे याचा सतत जप करत स्वत:चा साधेपणा मिरविणाऱ्या लोकांना बघून प्रचंड शिसारी येते. आणि हा आम आदमी बंगलोरमधल्या पंचतारांकित निसर्गोपचार आश्रमात कसा काय जाऊ शकला हा प्रश्न विचारायला बंदीच. असो.मधल्या काळात पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीवरून योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची हकालपट्टी करण्यात आली.त्या बैठकीत नक्की काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असा अजब आदेश केजरीवालांनी समितीच्या सदस्यांना दिला.म्हणजे हे सगळ्या जगाकडून पारदर्शक असायची अपेक्षा करणार पण यांच्या पारदर्शकतेचे काय? एप्रिल २०११ मध्ये अण्णा हजाऱ्यांचे लोकपालासाठीचे पहिले उपोषण झाल्यानंतर लोकपाल कायद्यासाठी युपीए सरकारने समिती नेमली त्यावर अण्णा हजारे आणि केजरीवाल हे दोघेही होते.त्यावेळी समितीच्या बैठकांमध्ये काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असे कपिल सिब्बल यांनी म्हटले तरीही आमची अकाऊंटेबिलिटी जनतेप्रती आहे त्यामुळे त्या बैठकांमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम स्वत: केजरीवाल इमानेइतबारे करत होते.मग तीच वेळ आपल्यावर आल्यानंतर तोच न्याय का लावला नाही? केजरीवालांनी त्या लोकपालाच्या समितीच्या बैठकीमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम केले तेच काम यावेळी मायांक गांधींनी ब्लॉगवर पोस्ट लिहून केले आणि "माझी अकाऊंटेबिलिटी आआपच्या कार्यकर्त्यांविषयी आहे" असा घरचा अहेर केजरीवालांना दिला. म्हणजे इतरांना एक न्याय आणि स्वत:ला दुसरा न्याय हे प्रकार सगळे पक्षच करत असले तरी तोच प्रकार स्वत: करूनही भारतीय राजकारणातले सर्वात धुतल्या तांदळाप्रमाणे हेच हा अहंमन्यपणा हे करताना दिसले की तो प्रकार अगदी प्रचंड म्हणजे प्रचंड डोक्यात जातो. केजरीवाल बंगलोरमध्ये निसर्गोपचार घेत असताना दिल्लीमध्ये तर अगदी कहरच झाला.आम आदमी पक्षाचे माजी आमदार राजेश गर्ग यांनी त्यांचे केजरीवालांबरोबर फोनवर बोलणे झाले होते त्याचे रेकॉर्डिंगच जाहिर केले.त्यात केजरीवाल कॉंग्रेसचे आमदार फोडून त्यांचा वेगळा पक्ष बनवून त्यांचे बाहेरून समर्थन घेण्याविषयी बोलत होते.कॉंग्रेसच्या ८ आमदारांपैकी ३ आमदार मुसलमान आहेत त्यामुळे ते मोदींच्या भाजपबरोबर जाणे शक्य नाही असेही विधान केजरीवालांनी केले असे त्या रेकॉर्डिंगमध्ये आले. १६ जुलै २०१४ रोजी केलेल्या एका ट्विट मध्ये केजरीवालांनी म्हटले होते की भाजप कॉंग्रेसच्या आमदारांना प्रत्येकी २० कोटी रूपये, २ मंत्रीपदे आणि ४ महामंडळ अध्यक्षपदे देऊन फोडायचा प्रयत्न करत आहे.कॉंग्रेसचे ३ आमदार मुसलमान असल्यामुळे त्यांना मोदींची भिती दाखवून द्यायला लागणारी किंमत कमी करायचा प्रयत्न करत होते असे का म्हणू नये? बरं भाजप जो प्रयत्न करत होता तो घोडेबाजार होता पण आआप जे काही करत होते ते मात्र Political realignment करायचा प्रयत्न होता त्यात चुकीचे काय असे निर्लज्ज समर्थन आआपकडून झाले.तसेच त्या रेकॉर्डिंगमधला आवाज केजरीवालांचा नव्हता असे आआपने एकदाही म्हटलेले नव्हते.याचाच अर्थ केजरीवालांनी असे काही म्हटले होते हे नाकारले नाही.म्हणजे इतर करतात तो घोडेबाजार आणि हे करतात ती Political realignment. बरं हे कमीच झाले म्हणून केजरीवालांचे आणखी एक रेकॉर्डिंग आले त्यात मुसलमानांपुढे आआपशिवाय दुसरा पर्याय काय आहे अशा स्वरूपाचेही विधान केल्याचे स्पष्ट झाले.म्हणजे इतर पक्षांनी धर्माधिष्ठीत राजकारण केले तर तो जातीयवाद आणि यांनी केले तर त्यात काही गैर नाही आणि परत आम्ही इतरांपेक्षा कसे चांगले, देशातील भ्रष्टाचार नाहिसा व्हावा ही चिंता केवळ आम्हालाच हे वर तोंड करून बोलायचे. नंतर दोन बाजूंमध्ये समेट होणार अशी चिन्हे दिसू लागली.पण ती शांतता वादळापूर्वीचीच शांतता राहिली.शनीवारी २८ मार्चला पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक बोलावली गेली.योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची राजकीय व्यवहार समितीमधून हकालपट्टी आधीच झाली होती. सर्वात निर्लज्जपणा म्हणजे पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांना तुम्ही या बैठकीस उपस्थित राहू नका असे पक्षाच्या वतीने सांगितले गेले.म्हणजे यांना देशात लोकपाल हवा आणि लोकपाल नावाचा एक मनुष्य त्या जागेवर आणला की चुटकीसरशी भ्रष्टाचार मिटेल अशी वेडगळ स्वप्ने बघायची, उपोषणे करून लोकनियुक्त सरकारला ब्लॅकमेल करायचे आणि वर तोंडाने अंतर्गत लोकपालाला तुम्ही बैठकीला येऊ नका असे सांगायचे? म्हणजे हे स्वत: लोकपालाची चाड राखणार नाही पण सगळ्या जगाने मात्र हे म्हणतील तसाच लोकपाल आणावा ही अपेक्षा!! चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना या अशा. प्रत्यक्ष बैठकीच्या वेळी अगदी कहर झाला. केंदिय समितीच्या बैठकीस खरोखरच्या सदस्यांना प्रवेश नाकारला जात आहे असा आरोप करून योगेन्द्र यादव अर्धा तास धरण्यावरच बसले.कुणाही सदस्याने आत मोबाईल फोन घेऊन जाऊ नयेत ही सक्ती केली गेली.म्हणजे आत जे काही होणार होते त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग कुणी करू नये. ट्रान्सपरन्सी, अकाऊंटेबिलिटी या गोष्टी परत एकदा आम आदमी पक्षात धारातिर्थी पडल्या.आणि त्यावर कहर म्हणजे बैठकीत बाऊन्सरना पाचारण केले गेले.अरे ही राजकीय पक्षाची बैठक होती की दारूच्या बारमधली किंवा पबमधील बाचाबाची होणार होती? बाऊन्सर कशाला हवे होते त्याचे कारण लगेच कळलेच.पक्षाच्या केंद्रीय समितीचे हरियाणातील सदस्य रहमान यांनी कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही बाजूंना आपले म्हणणे मांडायची संधी मिळाली पाहिजे अशी रास्त मागणी केली तर त्यांना बाऊन्सरकरवी मारहाण करण्यापर्यंत आम आदमी पक्षाची मजल गेली. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलाच्या बैठकाही यापेक्षा सुसंस्कृत वातावरणात होत असतील!! मग बैठकीत जे होणार हे माहितीच होते ते झाले. योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची केंदिय समितीमधून हकालपट्टी करण्यात आली. हे झाले ते थोडे म्हणून आता राजेश गर्ग यांचा नवीन आरोप आजच आला.म्हणे अरूण जेटली आणि इतर भाजप नेत्यांच्या नावाने केजरीवालांच्या वतीने कोणीतरी वेगळेच फोन करून आमदारांना प्रलोभने दाखवत होते!! इतकेच काय तर रामदासांचीही लोकपाल पदावरून हकालपट्टी करण्यात आली.म्हणे त्यांचा कार्यकाळ २०१३ मध्येच संपला होता.मग २०१४ च्या लोकसभा आणि २०१५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठीचे उमेदवार त्यांनी क्लिअरन्स दिल्याशिवाय उभे केले गेले होते का?आता तुम्ही काहीही हवे ते बोला.तुमची विश्वासार्हता धुळीस मिळाली आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे मोठा नैतिकतेचा आव आणत असाल तरी तो बुरखा सेकंदभरही टिकायचा नाही. नंतर काय तर म्हणे कुमार विश्वासांना पक्षाच्या एका कार्यकर्तीबरोबर आक्षेपार्ह स्थितीत त्यांच्याच पत्नीने रंगेहात पकडले असा आरोप कुणी केला आणि त्या आरोपाला केजरीवालांनी महत्व दिले म्हणून कुमार विश्वास रूसून बसले होते.तो आरोप खरा आहे की नाही याच्यात मला काडीमात्र इंटरेस्ट नाही.पण तुम्ही ही जी फुकटचे मनोरंजन करून देत आहात त्याची मात्र किंमत करता येणे केवळ अशक्यच आहे. अरे काय चालू काय आहे?कसला पोरखेळ चालवला आहे हा केजरीवालांनी?मधल्या काळात कारभाराचे तीनतेरा वाजले ते वेगळेच.म्हणे भाजपच्या ताब्यातील महापालिका भ्रष्टाचारामुळे आणि अकार्यक्षमतेमुळे तोट्यात आहेत म्हणून त्यांना पैसे द्यायला सरकारने नकार दिला.म्हणे केंद्र सरकारकडून पैसे या महापालिकांनी आणावेत असे सरकारने म्हटले.भाजपच्या ताब्यातील या महापालिकांचा कारभार उत्तम आहे असे कोणीच म्हणणार नाही.पण त्यांच्याकडे २०१२ ते २०१७ या काळासाठी लोकांचे मॅन्डेट आहे हे कसे नाकारता येईल?महाराष्ट्रातील १५ वर्षाच्या आघाडी सरकारच्या कालावधीत मुंबई महापालिका सेना-भाजपकडे होती. सुरवातीला विलासराव १९९५ ते १९९९ या काळातील युती सरकारने राज्य सरकारला कर्जाच्या खाईत लोटले असा आरोप नेहमी करत असत.तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांना पैसे द्यायचे राज्य सरकारचे कर्तव्य त्यांनी आणि इतर मुख्यमंत्र्यांनीही पार पाडले.समजा बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल सत्तेत आला.त्या पक्षाने बिहारची काय वाट लावली होती हे सर्वमान्यच आहे.तेव्हा मोदी सरकारने आम्ही बिहार सरकारला पैसे देणार नाही---तुम्ही कार्यक्षम कारभार करू शकत नाही आमच्या हातात सत्ता द्या आणि मग बघा आम्ही कसा कारभार करून दाखवतो असे म्हटले तर ते कसे समर्थनीय ठरेल? लोकांनी २०१७ पर्यंत भाजपला महापालिकेत मॅन्डेट दिले असेल तर ते सर्वांनी मान्य केलेच पाहिजे--जरी कोणाला ते आवडले नाही तरी. मग काय तर पूर्व दिल्लीच्या महापालिकेकडे सफाई कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे राहिले नाहीत आणि सफाई कर्मचार्यांनी संपच सुरू केला. दिल्लीच्या रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य माजले आहे अशा बातम्या आहेत.दिल्लीवाल्यांच्या दु:खात मी सहभागी आहे पण सगळे काही फुकट पाहिजे म्हणून अडाण्यांना निवडून दिले तर त्याचे परिणाम भोगायचीही तयारी असली पाहिजे.तेव्हा दिल्लीकरांनो २०२० पर्यंत (आणि तुम्हाला हवे असेल तर त्यानंतरही) असाच सावळागोंधळ दिल्लीमध्ये सुरू राहणार आणि त्याची तयारी ठेवा. या सगळ्या भानगडीत केजरीवाल समर्थकांची भूमिका मात्र आश्चर्यकारक आहे.ज्यांना तुम्ही मोदीभक्त म्हणता त्याच मोदीभक्तांपैकी बहुतेकांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादीची मदत घेणे, मसरत आलमला सोडणे अशा निर्णयांना अगदी जाहिरपणे विरोध केला होता.पण तुम्ही का मूग गिळून गप्प आहात?की हा जो सगळा तमाशा चालू आहे तो तुम्हाला मान्य आहे असा त्याचा अर्थ घ्यावा का?तुम्ही आम्हाला भक्त म्हणत असाल तर तुम्ही कोण? मी तर म्हणेन या सगळ्या सर्कशीनंतरही केजरीवाल किंवा आआपविरूध काही न बोलणारे लोक भक्त नव्हे तर गुलाम आहेत गुलाम. आणि साधेसुधे गुलाम नव्हे तर केजरूके गुलाम (जोरूका गुलामच्या धर्तीवर). या भानगडीमध्ये नक्की कोणाची बाजू बरोबर आहे हे मला माहित नाही आणि मला त्यात काडीमात्र इंटरेस्टही नाही.तरीही या सगळ्या कोलाहलामध्ये केजरीवालांचा धर्मराजाचा रथ जमिनीवरून चार बोटे वर जात होता तो मात्र जमिनीत कायमचा गाडला गेला हे नक्कीच. माझ्यासारख्या आआपच्या विरोधकासाठी मात्र ही सर्कस म्हणजे अगदी मोठे मनोरंजन करणारी ठरत आहे. आणि या सगळ्यात केजरूच्या गुलामांची अवस्था बघून बाकी काही नाही तरी असुरी आनंद तरी नक्कीच होत आहे.
  • 206902 views

प्रतिक्रिया

Submitted by पॉइंट ब्लँक on Tue, 03/31/2015 - 22:00

Permalink

लई भारी मुद्दे मांडले आहेत.

लई भारी मुद्दे मांडले आहेत. आप ही जगातील आजवरची सगळ्यात जास्त भ्रष्ट मानसिकतेची पार्टी आहे. फेसबूक वर एक मेमे आला होता. सनी लिओन आणि केजरीवाल ह्यांचात एक साम्य आहे - दोघेही म्हणतात, ये दुनिया पितलदी, बेबी डॉल मैं सोने दी! सनी लिओनचा इतका वाईट अपमान ह्या आधी कुणी केला नसेल ;)

Submitted by कहर on Wed, 04/01/2015 - 10:47

In reply to लई भारी मुद्दे मांडले आहेत. by पॉइंट ब्लँक

Permalink

जबरी टोला

जबरी टोला

Submitted by दिगोचि on Sat, 05/14/2016 - 09:44

In reply to लई भारी मुद्दे मांडले आहेत. by पॉइंट ब्लँक

Permalink

दिगोचि

मला असे वाटते कि आप व इतर मोदीद्वेषीना एक चहा विकणार्याचा मुलगा बीए एमे या पदव्या मिळवू शकतो हे पटतच नाही त्यामुळे ते मोदीन्च्या प्रामाणिकपणा विषयी शन्का उपस्थित करत आहेत. यात गरिबावर अन्याय कसा होते हे कळते. या पदवीवादावरून केजरीवाल यान्ची लायकीकळुन येते. यावर आजच्या (१४ मे) मधे आलेला चेतन भगतचा ब्लॉग वाचा.

Submitted by आजानुकर्ण on Tue, 03/31/2015 - 22:02

Permalink

सहमत

चांगला लेख क्लिंटनशेठ. आपचे तोंड फुटणारच होते. दिल्लीत अजय माकन सारखा चांगला पर्याय सोडून केजरीवालला मतं दिली त्याचं आश्चर्यच वाटतं. मोदीभक्त आणि केजरीभक्त या एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटतात.

Submitted by अनुप ढेरे on Tue, 03/31/2015 - 22:28

In reply to सहमत by आजानुकर्ण

Permalink

सहमत आहे. त्यापेक्षा राहूल

सहमत आहे. त्यापेक्षा राहूल-सोनिया भक्ति करावी. ;-)

Submitted by आजानुकर्ण on Wed, 04/01/2015 - 18:33

In reply to सहमत आहे. त्यापेक्षा राहूल by अनुप ढेरे

Permalink

अनुपशेठ

किरण बेदी आणि अरविंद केजरीवाल या दोन तमाशासम्राटांपेक्षा अजय माकन हे चांगले नेतृत्त्व होते.

Submitted by श्रीरंग_जोशी on Tue, 03/31/2015 - 22:12

Permalink

लेखनाच्या आशयाशी सहमत

लेखनाच्या आशयाशी सहमत.

Submitted by मूकवाचक on Wed, 04/01/2015 - 12:59

In reply to लेखनाच्या आशयाशी सहमत by श्रीरंग_जोशी

Permalink

+१

+१

Submitted by बन्डु on गुरुवार, 06/11/2015 - 00:30

In reply to लेखनाच्या आशयाशी सहमत by श्रीरंग_जोशी

Permalink

नौटंकी साला

नौटंकी साला, घडी घडी ड्रामा करता है !

Submitted by अर्धवटराव on गुरुवार, 06/11/2015 - 02:20

In reply to नौटंकी साला by बन्डु

Permalink

साला नौटंकी :)

अर्थात, तुम्हाला नेमका विरु अपेक्षीत नसेल तर "नौटंकी साला" हरकत नाहि :)

Submitted by अनुप ढेरे on Tue, 03/31/2015 - 22:25

Permalink

http://swarajyamag.com

http://swarajyamag.com/politics/yadav-and-bhushan-deserve-no-sympathy/ हाही एक लेख वाचनात आला.

Submitted by निमिष ध. on Tue, 03/31/2015 - 23:42

Permalink

अंशतः सहमत

लेखाशी पूर्ण पणे सहमत आहे असे म्हणू शकत नाही कारण आपच्या या गोंधळामुळे मला दु:ख झालेले आहे, मी आनंदी नाही. ज्या राजकारणाला कंटाळून जनता आपला पर्याय म्हणत होती ते आता आप मध्ये पण सुरू झाल्याने परत सर्व सामान्यांचा राजकारणावरील विश्वास उडून निवडणूकांबाबत नैराश्य पसरू नये. बाकी महापालीका निधी, केजरीवालांचा खर्च आणि उधळपटी याबाबत सहमत आहे.

Submitted by क्लिंटन on Wed, 04/01/2015 - 13:54

In reply to अंशतः सहमत by निमिष ध.

Permalink

+१/-१

सर्व प्रतिसाद देणार्‍या मिपाकरांना धन्यवाद. वेळ मिळेल त्याप्रमाणे संध्याकाळी आणि रात्री अधिक लिहितोच.
लेखाशी पूर्ण पणे सहमत आहे असे म्हणू शकत नाही कारण आपच्या या गोंधळामुळे मला दु:ख झालेले आहे, मी आनंदी नाही.
आआपमधील गोंधळामुळे आनंद वाटावा की दु:ख हा ज्याचात्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठीची मतमोजणी झाली त्यावेळी हा धागा मिपावर लिहिला होता.त्यावेळी समजलेच की भाजपचा धुव्वा उडाला याचा मोदीविरोधकांना आनंद झाला होता.तसे वाटणे हा लोकशाहीत प्रत्येकाला असलेल्या अनेक अधिकारांपैकी एक अधिकार आहे.पण तसे असेल तर आआपपुढे अडचणी उभ्या राहिल्या असताना आआपविरोधकांनी मात्र पक्षाविषयी सहानुभूती दाखवावी अशी अपेक्षा करता येणार नाही.
ज्या राजकारणाला कंटाळून जनता आपला पर्याय म्हणत होती ते आता आप मध्ये पण सुरू झाल्याने परत सर्व सामान्यांचा राजकारणावरील विश्वास उडून निवडणूकांबाबत नैराश्य पसरू नये.
एकूणच भारतीयांना कुठलेतरी मसीहे किंवा तारणहार हवे असतात.असे मसीहे मधूनमधून उभे राहतात.थोडाकाळ जनता त्यांच्याकडे आकृष्ट होतेही.पण ते फार काळ चालत नाही.पूर्वी वि.प्र.सिंगांबरोबर हा प्रकार झाला.बहुदा केजरीवालही त्याच मार्गाने चालले आहेत. दुसरे म्हणजे जर केजरीवाल अयशस्वी झाले तर (आणि तसेच व्हावे अशी माझी इच्छा आहे. उगीचच ताकाला जाऊन भांडे लपवायचे ढोंग मला तरी जमत नाही) भविष्यात कोणीही भ्रष्टाचारविरोध, जनताभिमुख कारभार वगैरे मुद्दे घेऊन कोणी राजकारणी उभा राहिला तर त्याच्याकडेही जनता संशयानेच बघेल ही शक्यता जास्त.बाकी काही नसले तरी केजरीवालांनी अशा चळवळींच्या पायावर नक्कीच कुर्‍हाड मारली आहे हे नक्की.

Submitted by मराठी_माणूस on Wed, 04/01/2015 - 15:30

In reply to +१/-१ by क्लिंटन

Permalink

दुसरे म्हणजे जर केजरीवाल

दुसरे म्हणजे जर केजरीवाल अयशस्वी झाले तर (आणि तसेच व्हावे अशी माझी इच्छा आहे
अशी नकारात्मक इच्छा कशासाठी ?

Submitted by क्लिंटन on Wed, 04/01/2015 - 17:13

In reply to दुसरे म्हणजे जर केजरीवाल by मराठी_माणूस

Permalink

कारण

अशी नकारात्मक इच्छा कशासाठी ?
याचे कारण मला केजरीवाल आणि आम आदमी पक्षाची मते आणि धोरणे मान्य नाहीत. जर कम्युनिस्ट, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल यांची धोरणे मला मान्य नसतील आणि म्हणून ते यशस्वी होऊ नयेत असे मला वाटत असेल तर केजरीवालांविषयी मात्र वेगळे मत मला ठेवता येणार नाही.

Submitted by हाडक्या on Wed, 04/01/2015 - 17:22

In reply to +१/-१ by क्लिंटन

Permalink

एकूणच भारतीयांना कुठलेतरी

एकूणच भारतीयांना कुठलेतरी मसीहे किंवा तारणहार हवे असतात.असे मसीहे मधूनमधून उभे राहतात.थोडाकाळ जनता त्यांच्याकडे आकृष्ट होतेही.पण ते फार काळ चालत नाही.पूर्वी वि.प्र.सिंगांबरोबर हा प्रकार झाला.बहुदा केजरीवालही त्याच मार्गाने चालले आहेत.
लेखाशी अंशतः सहमत. तसेच या प्रतिसादाबद्दलही. फक्त आता एवढेच म्हणायचेय की मोदींच्या बाबतीतही तेच होऊ नये. आमच्या आप समर्थक मित्रांची जी अवस्था आहे ती मोदी समर्थक मित्रांचीपण होऊ नये इतकेच. कारण या दोन्ही प्रकारच्या लोकांनी इतर मित्र मंडळी वगैरेना इतके दुखवून झालेय की त्याना हे अति होईल. या प्रतिसादावर लिहिलेय तेच इथेही संदर्भासाठी परत लिहितोय.
आप अथवा मोदी यांच्याकडून कोणतीही अपेक्षा नव्हती परंतु खूप सार्‍या मित्रांच्या यांच्याकडून असलेल्या आशा आणि विश्वास पाहून उत्सुकता होती. सध्या जे काही चालले आहे ते पाहून एवढेच म्हणावेसे वाटते की माझ्या पिढीच्या लोकांचा भ्रमनिरास आणि विश्वासघात करायचे सुरु आहे (जे माझ्या वडिलांच्या पिढीत कदाचित व्हिपी सिंग, जद आणि तत्समांनी केले असावे). आता पुढची पिढी आम्हाला विचारत येईल की तुम्ही एवढे उदासीन का तेव्हा कमीत कमी हे घटनाक्रम दाखवता तरी येतील.. असो.

Submitted by क्लिंटन on Wed, 04/01/2015 - 17:39

In reply to एकूणच भारतीयांना कुठलेतरी by हाडक्या

Permalink

+१००

लेखाशी अंशतः सहमत. तसेच या प्रतिसादाबद्दलही. फक्त आता एवढेच म्हणायचेय की मोदींच्या बाबतीतही तेच होऊ नये. आमच्या आप समर्थक मित्रांची जी अवस्था आहे ती मोदी समर्थक मित्रांचीपण होऊ नये इतकेच. कारण या दोन्ही प्रकारच्या लोकांनी इतर मित्र मंडळी वगैरेना इतके दुखवून झालेय की त्याना हे अति होईल.
याला अगदी +१००

Submitted by निमिष ध. on Wed, 04/01/2015 - 18:57

In reply to +१/-१ by क्लिंटन

Permalink

एकूणच भारतीयांना कुठलेतरी मसीहे किंवा तारणहार हवे असतात.

एकूणच भारतीयांना कुठलेतरी मसीहे किंवा तारणहार हवे असतात.
हे सर्व संस्कृतिंबाबत खरे आहे. आणि भारतीय राजकारणात तर खुप मोठे सत्य आहे. त्याचाच वापर मोदींनी अतिशय चातुर्याने करून घेतला. आता विचार करता, माझा कोणाच्या राजकारणाला व्यक्तीगत विरोध असा नाहीये. जो दिल्लीचा प्रयोग आहे (मोदी आणि केजरीवाल दोन्ही) जर सफल झाला असता तर तरूण पिढी हिरीरीने सक्रीय राजकारणात उतरली असती. आणि चांगले पुरोगामी (या शब्दाची वाट लावलेली आहे तरीही मुळ अर्थाला धरून) निर्णय घेण्यासाठी तरूणांचा राजकारणातील सहभाग खुप महत्त्वाचा असतो. परत गळ्यांत साखळ्या घातलेल्या दादा-भाईंचे राज्य येऊ नये यासाठीही ते उपयुक्त असते. तुम्हीच म्हटले आहे
बाकी काही नसले तरी केजरीवालांनी अशा चळवळींच्या पायावर नक्कीच कुर्‍हाड मारली आहे हे नक्की.
त्याचाच मोठा शोक आहे!

Submitted by जयन्त बा शिम्पि on Wed, 04/01/2015 - 00:41

Permalink

केजरूके गुलाम

लेखामधील विचारांबाबत सहमत, पण एकच प्रश्न उरतो. निवडणूकीत वारेमाप आश्वासने सर्वच पक्ष देतात.त्यावर कितपत विश्वास ठेवायचा हा मतदारांचा हक्क हेही मान्य. मग दिल्लीतील सर्व सामान्य जनतेने " आप " च्या उमेद्वारांमध्ये नेमके असे काय पाहिले कि भरभरून मते द्यावीत ? ह्या निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये " उडदामाजी काळे - गोरे काय निवडावे? " कोण कोण कसे रंग भविष्यात उधळणार हे पुढील काही महिन्यात दिसेलच, पण MCD भाजपाच्या ताब्यात , दिल्ली वर नायब राज्यपाल केन्द्राचा , लोकसभेमध्ये भाजपाचे स्पष्ट बहुमत , अशा परिस्थितीत आश्वासने कशी पुर्ण होणार ? दिल्लीकरांच्या नशिबी काय लिहिले आहे , हे त्यांनीच आता पाच वर्षे भोगावे . " यथा राजा , तथा प्रजा ' हे खरे कि ' यथा प्रजा , तथा राजा ' हे खरे ठरते ? पाहू या

Submitted by मिसळ on Wed, 04/01/2015 - 02:39

Permalink

केंद्रीय समितीची बैठक

केंद्रीय समितीची बैठक अ. के. भाषण https://www.youtube.com/watch?v=efn4QWGk7fA कु. वि. भाषण https://www.youtube.com/watch?v=zGXcCb7DPq0 दिल्ली मध्ये आता पर्यन्त केलेली कामे ई-रेशन कार्ड - http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/delhi-to-launch-indias-first-e-ration-card-scheme/articleshow/46637850.cms तक्रार पोर्टल - http://www.pgms.delhi.gov.in/home1.aspx भ्रष्ट अधिकारी निलंबन - http://www.outlookindia.com/news/article/Five-Delhi-Govt-Officials-Suspended-Over-Corruption/887628 नाले सफाई - https://twitter.com/AapsaritaSingh/status/575944024881700864 ज्याचा त्याचा चष्मा.

Submitted by काळा पहाड on Wed, 04/01/2015 - 14:40

In reply to केंद्रीय समितीची बैठक by मिसळ

Permalink

नाले सफाई

हे राज्य सरकारचं काम आहे?

Submitted by क्लिंटन on Wed, 04/01/2015 - 14:46

In reply to केंद्रीय समितीची बैठक by मिसळ

Permalink

:)

अहो यात ते वीजेचे बील ५०% ने कमी करणे आणि २० हजार लीटर पाणी अर्ध्यात देणे विसरलात का? :) बाकी सुरवातीलाच केजरीवाल आणि कुमार विश्वास यांच्या भाषणांच्या लिंका बघून एका माजी मिपा आय.डी धारकाची आठवण झाली. मागच्या वर्षी लोकसभा निवडणुकांच्या वेळच्या रणधुमाळीत काहीही झाले तरी हे गृहस्थ केजरीवालांनी दिल्ली विधानसभेत केलेले भाषण आणि केजरीवालांची राजदीप सरदेसाईंनी घेतलेली मुलाखत हेच पालुपद लावायचे. तुम्ही तेच तर नाही ना? :)

Submitted by मिसळ on Wed, 04/01/2015 - 19:09

In reply to :) by क्लिंटन

Permalink

वीज पाणी

http://indianexpress.com/article/cities/delhi/aap-govt-in-delhi-keeps-poll-promises-slashes-power-tariffs-offers-free-water/ शोधले तर ह्या संदर्भात अनेक बातम्या सापडतील. नाले सफाई चे काम करणे महत्वाचे कि ते कोणाच्या अख्यतारीत येते याची चर्चा करत बसायची. :)

Submitted by दिगोचि on Sat, 05/14/2016 - 10:07

In reply to केंद्रीय समितीची बैठक by मिसळ

Permalink

दिगोचि

तुम्ही वर लिहिलेल्या या सर्व गोष्टी त्यानीच काय पण इतर मुख्यमन्त्र्यानी करायलाच पाहिजेत. त्यासाठी केजरीवालान्ची स्तुती करायला नको. त्यानी दिलेली इतर वचने का पूर्ण केली नाहित हे त्यान्च्या भक्तानी त्याना विचारले पाहिजे.

Submitted by विकास on Wed, 04/01/2015 - 02:54

Permalink

ये तो होना ही था...

मिसळ चटपटीत आणि पौष्टीक एकाच वेळी होऊ शकते हे समजले... अर्थात लेख चटपटीत आणि माहितीपूर्ण दोन्ही आहे! बाकी, आपचे असे होणार होतेच... त्यामुळे दुर्दैवाने आश्चर्य वाटले नाही. दुर्दैवाने अशासाठी की लोकशाहीत सत्तेचा, विचारांचा बॅलन्स रहाण्यासाठी दोन बाजूंची गरज असते. अगदी एक बाजू कितीही कुठच्याही काळात योग्य आणि उत्तम असली तरी, असे माझे मत आहे. आज काँग्रेस आणि काँग्रेसी विचारसरणीची बोंब आहे. प्रादेशिक पक्ष (सुदैवाने) थिजले आहेत आणि वर येण्याची शक्यता नाही. कम्युनिस्टांची पण तीच गत आहे. त्यामुळेच आपच्या निमित्ताने ज्यांना उजव्याशी वावडे आहे त्यांना आशादायक पर्यायी पक्ष निर्मण झाला होता. पण भंपक केजरीवाल आणि तितकेच भंपक आप श्रेष्ठी असल्यामुळे, "सपना मेरा तुट गया" अशी अवस्था झाली आहे. ही विचार करण्याची वेळ या आप समर्थकांवर आली आहे, विशेष करून जे उच्चशिक्षित आहेत त्यांच्यावर. आधी जनता पार्टी, मग व्हि पि सिंग आणि आता म्हणजे अँटीक्लायमॅक्स केजरीवाल... तरी पण त्याच त्याच चकव्यात आपण का अडकतो या प्रश्नाचे उत्तर (या विचारवंत जनतेने) शोधणे महत्वाचे आहे.

Submitted by शिवोऽहम् on Wed, 04/01/2015 - 05:36

Permalink

ये तो होना ही था!!

केजरीवाल अत्यंत आत्मकेंद्रीत आणि तुघलकी विचारांचा माणुस आहे. गप्पा जग बदलण्याच्या आणि वागणे मात्र 'मला पहा आणि फुलं वहा' असे. आआपच्या जहाजाला भगदाड पडले आहेच, अनेक उंदीर आता धडपडत पोबारा करतील. दुर्दैवाने मेधा पाटकरांनीही नुकतीच सोडली पार्टी त्यामुळे जी थोडीफार पुण्याई पदरी होती तीसुद्धा जाते की रहाते असे झाले आहे.

Submitted by नाखु on Wed, 04/01/2015 - 08:36

Permalink

लेख +१

मिसळ चटपटीत आणि पौष्टीक एकाच वेळी होऊ शकते हे समजले... अर्थात लेख चटपटीत आणि माहितीपूर्ण दोन्ही आहे!
याला प्रचंड अनुमोदन टाळी खेच वाक्ये टंकायचा मोह टाळून तपशीलवार घटनाक्रम संगतीसह मापात टाकल्याने क्लिंटनभाऊंचे त्रिवार अभिनंदन.. एखाद्या विद्यार्थ्याला गरीब समजून मदत केली आणि तो व्यसना साठी गरीबीचे सोंग आणत होता असे झाले तर मदत्कर्त्याची जी भावना आहे तीच भावना दिल्लीकरांची असेल आणि यापुढे प्रत्येक प्रामाणिक नवविचारी/क्रांतीवादी नेत्यावरही संशयाने पाहिले जाईल हेच या सर्व प्रकरणाचे कटू पण वास्तव फलीत आहे.

Submitted by खेडूत on Wed, 04/01/2015 - 08:54

Permalink

मस्त!

दिल्लीतल्या घटनांचा मागोवा घेणारा चांगला लेख . वेगळी मतं असणाऱ्यांच्या प्रतीक्षेत. आणि क्लिंटनभौ सन्यासावरून परतले त्याबद्दल आभार ! :)

Submitted by हुप्प्या on Wed, 04/01/2015 - 10:05

Permalink

खंत

केजरीवालांनी पळपुटेपणा केला तरी दुसर्‍यांदा केलेल्या मेहनतीमुळे, प्रांजळपणे चूक कबूल केल्यामुळे दिल्लीकरांनी भरभरून दान दिले. आता तरी काहीतरी चांगले, अगदी आदर्शवत नाही तरी जरा बरे बघायला मिळेल असे वाटले होते. पण नाही. मला हे अनाकलनीय वाटते. इतके भक्कम बहुमत असताना आपल्या खंद्या सदस्यांना काढून टाकण्याइतकी अवदसा का आठवावी? मतभेद सहन करुन एकत्र रहाणे इतके अवघड का व्हावे? तेही इतकी वर्षे एकत्र, खांद्याला खांदा लावून काम केल्यावर? हा निव्वळ हुकुमशाही, अहंकारी वृत्तीचा परिणाम का ह्या प्रकरणाला अजून काही कंगोरे आहेत? अशाने लोकांचा विश्वास सर्व पक्ष गमावणार आहेत. लोकांनी, पक्षांनी कितीही आव आणला तरी शेवटी सगळे गटारगंगेतच न्हाणार असे एक निराशाजनक चित्र समोर येत आहे.

Submitted by सुबोध खरे on Wed, 04/01/2015 - 10:06

Permalink

AAP म्हणजे अकेले अरविंद कि

AAP म्हणजे अकेले अरविंद कि पार्टी

Submitted by चिनार on Wed, 04/01/2015 - 10:08

Permalink

केजरीवाल हे एक अजब रसायन आहे.

केजरीवाल हे एक अजब रसायन आहे. म्हणजे "धरलं त चावते अन सोडलं त पळते" अशी परिस्थिती आहे. पण एक किस्सा आठवला यावरून. केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीत, दिल्लीला स्वतंत्र राज्य बनवण्याची मागणी केजारीवालांनी केली होती. ते म्हणाले, केंद्रात आणि राज्यात बहुमताने सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे असा निर्णय घेण्याची ही योग्य वेळ आहे. त्यावर मोदींनी एक सूचक विधान केलं होतं," राजकारणात काहीही "कायमस्वरूपी" नसतं. परिस्थिती कधीही बदलू शकते". केजारीवालांना या वाक्याचा अर्थ लवकरात लवकर कळावा ही ईश्वरचरणी प्रार्थना !
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Wed, 04/01/2015 - 10:26

Permalink

आता या एकंदर पार्टी संबंधी

आता या एकंदर पार्टी संबंधी बातम्यांचा आणि इतर गोष्टींचा पार कंटाळा आला आहे ! सगळा नुसता तमाशा ! जाता जाता :- चिखलात लोळणारी सर्व डुक्करे सारखीच !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मेरा कुछ सामान..

Submitted by तिमा on Wed, 04/01/2015 - 10:48

Permalink

लेख

लेख अगदी सत्यस्पर्शी आणि मुद्देसूद झाला आहे. राजकीय पक्ष काढणे व तो चालवणे हे इतकं सोपं नाही हे केजरीवालांना आता कळलंच असेल. जनता पक्षाच्या वेळची स्थिती आणि आपची स्थिती यांत साम्य वाटते. तेंव्हाही, एका 'अधु मेंदुच्या मधुने(आचार्य अत्र्यांच्या एका अग्रलेखाचे शीर्षक) एक ठिणगी टाकून मोठी आग पेटवली होती आणि स्वतःला शहाणे समजणारे असे सर्व नेते एकत्र राहू शकत नाहीत, हे भारतातल्या दुर्दैवी जनतेने पाहिले होते. तत्वांचा अतिआग्रह धरला तर राजकीय पक्षच काय, एखाद्याचे वैयक्तिक जीवनही उध्वस्त होते. अहंकार ही फार मजेशीर गोष्ट आहे. ती दुसर्‍याच्या डोक्यावर बसलेली सहज दिसते, पण स्वतःच्या डोक्यावर मात्र ती नाहीच, अशी प्रत्येकाला खात्री असते.

Submitted by संदीप डांगे on Wed, 04/01/2015 - 11:21

In reply to लेख by तिमा

Permalink

अहंकार ही फार मजेशीर गोष्ट

अहंकार ही फार मजेशीर गोष्ट आहे. ती दुसर्‍याच्या डोक्यावर बसलेली सहज दिसते, पण स्वतःच्या डोक्यावर मात्र ती नाहीच, अशी प्रत्येकाला खात्री असते. +१०० खूप आवडलं हे वाक्य आपल्याला...

Submitted by क्लिंटन on Wed, 04/01/2015 - 21:29

In reply to लेख by तिमा

Permalink

+१

तत्वांचा अतिआग्रह धरला तर राजकीय पक्षच काय, एखाद्याचे वैयक्तिक जीवनही उध्वस्त होते.
अगदी. त्यातून असा तत्वांचा वरकरणी आग्रह धरणारा माणूस प्रत्यक्षात त्याच्या विरूध्द वर्तन करताना पकडला गेला की त्याची पूर्ण नाचक्की होते.खरे तर कॉंग्रेस फोडायचा प्रयत्न केजरीवाल करत होते त्यातच नाचक्की झाली आहेच.तरीही गोष्टी फुकटात मिळतील म्हणून दिल्लीचे लोक अजूनही केजरीवालांना पाठिंबा देत असतीलही.शेवटी कुठलीच गोष्ट फुकट मिळत नसते आणि वरकरणी एखादी गोष्ट फुकट मिळत असली तरी त्याची किंमत भरावीच लागते हे लोकांना समजेल तो सुदिन.
अहंकार ही फार मजेशीर गोष्ट आहे. ती दुसर्‍याच्या डोक्यावर बसलेली सहज दिसते, पण स्वतःच्या डोक्यावर मात्र ती नाहीच, अशी प्रत्येकाला खात्री असते.
+१. "मला अहंकार नाही" हे वाटणेच हा एक मोठा अहंकार असतो.त्याचप्रमाणे आपण किती साधे याचे ढोल जगभर बडवणे म्हणजे खरोखरच साधे नसल्याचेच लक्षण आहे. केजरीवालांचा नवीन नखरा म्हणजे मुख्यमंत्री बंगल्यातील ए.सी काढून टाका असे पी.डब्ल्यू.डी ला सांगितले.बरोबर आहे साध्या लोकांना करायचेत काय हे असले श्रीमंती थाट.ए.सी ला एक ऑन-ऑफ बटन असते ते वापरून ए.सी कधी चालू केलाच नाही तरी काम होणाऱ्यातले होते.पण त्यातून लोकांपुढे आपला साधेपणा कसा मिरवता आला असता? म्हणून हा नाटकीपणा.

Submitted by चिगो on Wed, 04/01/2015 - 10:58

Permalink

उत्तम लेख..

उत्तम लेख.. फार काही बोलत नाही. उगाच 'भ्रष्टाचार समर्थक' ठरायचो..
कुणाही सदस्याने आत मोबाईल फोन घेऊन जाऊ नयेत ही सक्ती केली गेली.म्हणजे आत जे काही होणार होते त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग कुणी करू नये.
हे फार वाईट.. अश्याने दस्तुरखुद्द अरविंदबाबूंनी स्थापिलेली "स्टींग इकॉनॉमी" बंद पडेल की..

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 04/01/2015 - 11:15

Permalink

दिल्लीतील राजकिय दुरावस्थेचे

दिल्लीतील राजकिय दुरावस्थेचे सुंदर आणि समतोल विवरण. सर्वात महत्वाचे म्हणजे केजरीवाल आणि आआपचा झेंडा हिरीरीने उचलून धरणार्‍यांची चिडिचूप ! आआपचे बहुतेक सर्व समर्थक स्वतःला शिक्षित आणि समजदार समजतात. पण, त्यांना अजूनही उघडपणे निरक्षिर विवेक करणे जमत नसेल तर, त्यांना "तथाकथित भारतिय अडाणी जनतेच्या गठ्ठा मतदारांपेक्षा" जास्त वेगळे असल्याची शेखी मिरवण्याची लाज वाटली पहिजे. "स्खलनशीलता हा माणसाचा मूल स्वभाव आहे, तो टाळणे हे फार फार विरळ आहे. तेव्हा, कोणत्याही एका नेत्याची अथवा पक्षाची सतत अंध पाठराखण करणे किंवा सतत अंध विरोध करणे, हे दोन्ही शहाणपणाचे नाही." एवढी समजूत जरी त्यांना या सर्व प्रकरणातून आली तरी खूप मिळवले !

Submitted by संदीप डांगे on Wed, 04/01/2015 - 11:44

In reply to दिल्लीतील राजकिय दुरावस्थेचे by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

१०० टक्के सहमत..

जेंव्हा हे लोकपाल आंदोलन सर्वप्रथम सुरु झाले होते तेंव्हा अण्णा हजारे जिकडे तिकडे पेड जाहिरातींतून त्याबद्दल जनजागृती करत होते. बसेसमधे, टीवीवर सगळीकडे भरभरुन चिक्कार पैसे मोजून जाहिराती येत होत्या. एका टीवी कार्यक्रमात (कसलासा रीअ‍ॅलिटी शो होता बहुतेक) अण्णा हजारे केजरीवालचे 'इनके पास दो जोडी कपडा है,' इ. इ. वैगेरे वर्णन करून केजरीवाल कसे इमानदार आणि त्यामुळेच दोनच कपडे बाळगणारे सामान्य माणूस आहेत याची जाहिरात करत होते. त्याच वेळी मला हा सगळा प्रकार पार भंपक असल्याचा पूर्ण विश्वास होता. पुढे केजरीवालांची संपती दोन कोटींच्या वर आहे, त्यांची स्वतःची दोन-तीन घरे आहेत, चारचाकी गाडी आहे इत्यादी कळले तेव्हा खात्रीच झाली की हा सगळा बनाव पब्लिक ला *तिया बनवण्यासाठीच चालू होता. पण त्यावेळेस पब्लिक काहीही समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. यात सुशिक्षीत आणि जाणकार नागरीक यांचा प्रचंड भरणा होता. प्रत्येकाचे खरे स्वरूप ओळखणे सोपे असते. आपणच आपले डोळे उघडून बघत नाही आणि फसवणार्‍यावर दोषारोप करतो. अजूनही आआपसमर्थक त्याच तंद्रीत आहेत. बर्‍याच लोकांनी इथे व्यक्त केलेला धोका जो की भविष्यात कुणी अतिप्रमाणिक जरी उगवला तरी लोक विश्वास ठेवण्याची शक्यता नाही. नविन पिढितले नविन येडे परत हीच चूक करतीलच पण जुनी पीढी आपले व्रण आठवून दुरच राहील. ही फार मोठी शोकांतिका आहे या प्रकरणाची.

Submitted by क्लिंटन on Wed, 04/01/2015 - 18:10

In reply to १०० टक्के सहमत.. by संदीप डांगे

Permalink

आणखी एक

त्याचवेळी टिव्हीवर आणखी एक जाहिरात लागायची. अण्णा हजारे म्हणत होते-- "देशके लिए थोडा त्याग करना पडेगा. अण्णा इतना नही. थोडासा". अण्णांचे मार्ग मान्य नसूनही त्यांच्या कामाविषयीचा आदर कायम ठेवत म्हणतो की हा प्रकार त्यावेळी (आणि आताही) खटकला होता.आपल्याच तोंडाने आपण खूप त्याग केला आहे ही जाहिरात करायची? ही गोष्ट नक्कीच पटली नव्हती.

Submitted by क्लिंटन on Wed, 04/01/2015 - 21:31

In reply to दिल्लीतील राजकिय दुरावस्थेचे by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

+१

कोणत्याही एका नेत्याची अथवा पक्षाची सतत अंध पाठराखण करणे किंवा सतत अंध विरोध करणे, हे दोन्ही शहाणपणाचे नाही
+१

Submitted by ग्रेटथिंकर on Wed, 04/01/2015 - 11:27

Permalink

छान लेख आहे .आवडला .परंतु

छान लेख आहे .आवडला .परंतु केजरिवाल काहि चुकिचे वागलेले नाहित .प्रशांत भुशन आनि योगेंद्र यादव पक्ष विरोधि काम करत होते .

Submitted by विनोद१८ on Wed, 04/01/2015 - 13:08

In reply to छान लेख आहे .आवडला .परंतु by ग्रेटथिंकर

Permalink

....मला का बरे एकसारखे 'फिलॉसॉफर, नान्या नेफळा, माईसाहेब..

...तत्सम इत्यादी इत्यादी आठ्वत आहेत आज ??? बाकी हे मात्र खरेच हो, 'केजरिवाल काहि चुकिचे वागलेले नाहित .प्रशांत भुशन आनि योगेंद्र यादव पक्ष विरोधि काम करत होते', हेच कुणाला कसे समजत नाही हाच एक मोठा गहन प्रश्ण आहे.

Submitted by ग्रेटथिंकर on Wed, 04/01/2015 - 13:26

In reply to ....मला का बरे एकसारखे 'फिलॉसॉफर, नान्या नेफळा, माईसाहेब.. by विनोद१८

Permalink

मी नाना नाहि ,माईसाहेब हा

मी नाना नाहि ,माईसाहेब हा वेगळा आय्डि आहे .फिलोसोफेर हे कोन नविन आहेत काय , या आधि त्यांचे नाव अएकलेले नाहि .

Submitted by विशाखा पाटील on Wed, 04/01/2015 - 12:05

Permalink

विवेचन आवडले. खरे रूप लवकर

विवेचन आवडले. खरे रूप लवकर उघड झाले, हे बरे झाले. पण लोकांचा आता अशा पर्यायांवर विश्वास बसणार नाही, हेही खरेच. आजच्या लोकसत्तेतल्या लेखात योगेंद्र यादव यांनी तिसरा रस्ता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्या रस्त्याची मांडणी आता अवघड आहे.

Submitted by मृत्युन्जय on Wed, 04/01/2015 - 12:11

Permalink

मला हा प्रश्न मेहमीच पडायचा

मला हा प्रश्न मेहमीच पडायचा की मोदी समर्थक नेहमीच विवेकाने लिहितात आणि बोलतात आणि आपटे नेहमीच एकतर्फी लिहितात, वाचतात, बोलतात, थिंकतात. तरीही मोदी समर्थकांना / प्रशंसकांना भक्त म्हटले जाते. महात्मा गांधी आणि नेहरुंनंतर मोदी हा एकमेव असा माणूस आहे की ज्याला इतका जनाधार लाभला. त्यामुळेच या प्रसिद्धीचे आकलन करण्याची विरोधकांची शक्ती कमी पडली आणि हे भक्तीचे टुमणे मागे लागले असे वाटते. असो. एकुण सध्या आपट्ञांची चिडीचुप बघता त्यांना लाजिरवाणे गुलाम म्हणणेच बरे पडेल. अहो त्यांच्या पक्षात केवळ थोडासा विरोध केला म्हणुन योगेंद्र आणी भूषण सारख्या विजयामागच्या ब्रेन्सनाच जर केजरीवाल पक्षातुन काढणार असतील तर या लोकांकडे तर काही पोस्टही नाही. गुलामांना हे एव्हाना कळून चुकले असेल पण चूक मान्य करण्याची हिंमत फार लोकांमध्ये नसते. त्यामुळे जौद्यात मरे हुए को और क्या मारना. उदारपणे माफ करा बिचार्‍यांना.

Submitted by बॅटमॅन on Wed, 04/01/2015 - 13:06

In reply to मला हा प्रश्न मेहमीच पडायचा by मृत्युन्जय

Permalink

हे आपटे कोण त्याचा विचार करत

हे आपटे कोण त्याचा विचार करत होतो. आत्ता ट्यूब पेटली. आप-टे अर्थात आपटार्ड.

Submitted by संदीप डांगे on Wed, 04/01/2015 - 13:16

In reply to हे आपटे कोण त्याचा विचार करत by बॅटमॅन

Permalink

आप-टलेले सुद्धा.

आप-टलेले सुद्धा.

Submitted by बॅटमॅन on Wed, 04/01/2015 - 13:25

In reply to आप-टलेले सुद्धा. by संदीप डांगे

Permalink

=))

=))

Submitted by आजानुकर्ण on Wed, 04/01/2015 - 18:35

In reply to मला हा प्रश्न मेहमीच पडायचा by मृत्युन्जय

Permalink

अगदी खरंय

मोदी समर्थक नेहमीच विवेकाने लिहितात आणि बोलतात
अग्गदी खर्रंय. मोदीभक्तांचे कैसे बोलणे । मोदीभक्तांचे कैसे चालणे । मोदीभक्तांचे सलगी देणे । कैसी असे ॥ असो. जागतिक मोदी दिनाच्या सर्व भक्तांना शुभेच्छा.

Submitted by मृत्युन्जय on Wed, 04/01/2015 - 19:06

In reply to अगदी खरंय by आजानुकर्ण

Permalink

सकाळपासुन व्हॉट्सअ‍ॅपवर फिरत

सकाळपासुन व्हॉट्सअ‍ॅपवर फिरत असलेला विनोदः April Fools day shall extend to whole of India except the state of Delhi. They are being fooled since last 15 years first by Congress and then by AAP.

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • पान 9
  • …
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com