राणीच्या देशात - ब्राँटे पार्सोनेज (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)
आवडत्या लेखिकेच्या निवासस्थानाला दिलेल्या भेटीबद्दल, त्यांच्या बालपणाबद्दल, त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टींबद्दल मिळालेली माहिती याबाबत पुस्तकदिनानिमित्त आवर्जून लिहावेसे वाटले म्हणून हा लेख.
मला हॅवर्थला जायचे आहे असे मी मागे नवऱ्याला तीन-चार वेळा सांगितले होते पण काही केल्या जाणे होईना. यावर्षी हॅवर्थ बघायचेच आहे असा हट्ट केला तेव्हा त्याने विचारले हॅवर्थला आहे तरी काय? मी म्हटले, मला ब्राँटे पार्सोनेज बघायचे आहे आणि मग नवऱ्याला ही एवढी का हॅवर्थ हॅवर्थ करतेय याची लिंक लागली. शर्लॉट ब्राँटे माझ्या काही आवडत्या लेखकांपैकी एक आणि मला त्यांचे, त्या जिथे साधारण १७० वर्षांपूर्वी राहत होत्या ते घर बघण्याची फार - फार इच्छा होती. सप्टेंबर २०१५ च्या एका वीकांताला हॅवर्थला जायचे आम्ही नक्की केले आणि मी त्या वीकांताची आतूरतेने वाट पाहू लागले.
हॅवर्थ हे वेस्ट यॉर्कशयारमधल्या keighley च्या नैऋत्याला तीन माईल्सच्या अंतरावर वसलेले छोटेसे गाव आहे. या गावाचे वैशिष्टय म्हणजे इथे असलेले ब्राँटे पार्सोनेज आणि त्याभोवती वेढलेले मूरलँड. हे पार्सोनेज, चर्च व कबरस्थानाच्या अगदीच बाजूला आहे. ब्राँटे पार्सोनेज हे लेखिका शर्लॉट ब्राँटे यांचे निवास्थान आहे ज्याला आता ब्राँटे सोसायटीने संग्रहालयात बदलले आहे. ही वास्तू फार जूना इतिहास बाळगून आहे, ब्राँटे बहिणींच्या बालपणीच्या रम्य आठवणी, त्यांच्या उमेदीच्या काळात त्यांनी लिहिलेले जगप्रसिद्ध साहित्य, त्यांचे जीवन-मृत्यु, त्यांचा एकाकीपणा असे सगळेच या वास्तूने पाहिलेले, अनुभवलेले आहे. साधारण दीड तास ड्राईव्ह करुन आम्ही हॅवर्थ गावात प्रवेश केला, पार्सोनेजच्या आवारातचं कार पार्क असल्यामुळे गाडी पार्क करणे सोपे गेले. पार्सोनेजच्या रिस्पेशनवर जाऊन आम्ही तिकिटे काढली तेव्हा रिस्पेशनवरचा माणूस म्हणाला अनेक जुन्या, मौल्यवान वस्तू त्यांनी जतन केल्या असल्यामुळे आत फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. थोडीशी निराशा झाली खरी पण तरी ते पार्सोनेज बघायचे म्हणून उत्साह ही तितकाच जास्त टिकून होता.
*छायाचित्र आंतरजालावरून साभार -
पुढची खोली होती डायनिंग रूम. या खोलीत शर्लॉट, एमिली आणि अॅनी जास्तीत जास्त वेळ घालवत असे. या खोलीत असलेल्या डायनिंग टेबलाच्या अवती-भवती फिरून त्या एक-मेकिंना आपले लिखाण वाचून दाखवत. अॅनी इथे असलेल्या आरामखुर्चीत बसत. इथेच असलेल्या सोफ्यावर एमिलीने १८४८ साली आपले प्राण सोडले. एमिली आणि अॅनीच्या मृत्युंतर शर्लॉटला या खोलीत वावरणे फार अवघड गेले, एकाकीपणा आला. या खोलीला पार्लर असे ही म्हटले जायचे. जेव्हा शर्लॉटची आर्थिक स्थिती बरी झाली तेव्हा तिने या खोलीचे सुशोभिकरण केले. तो सोफा, ती खुर्ची, ते टेबल बघून आणि तिथला ब्राँटे बहिणींचा वावर हे सगळे माझ्यासाठी अद्भुत होते.
*छायाचित्र आंतरजालावरून साभार - reference site www.liveinternet.ru-
पुढची खोली स्वयंपाकघर.
हे स्वयंपाकाघर संपूर्ण वास्तूतील उबदार खोली असे. इथेच ब्राँटे भावंडे शेगडीजवळ बसून घरकाम करणाऱ्या टॅबीच्या डार्क टेल्स ऑफ यॉर्कशायर मुर्स गोष्टी ऐकत असत. १८४२ मध्ये आंट ब्रानव्हेलच्या मृत्युनंतर एमिलीने गृहव्यवस्थेची जबाबदारी घेतली. स्वयंपाकघरात असलेल्या फायरप्लेसला रेंज म्हटले जाई. १८६१ मध्ये पॅट्रिक ब्राँटेच्या मृत्युनंतर हे पार्सोनेज पदाधिकारी जॉन वेड यांच्या मालकीचे झाले. त्यांनी या वास्तूत बरेच बदल केले खासकरुन स्वयंपाकघर. आज या स्वयंपाकघरातील वस्तू, भांडी सगळी ब्राँटे परिवाराची आहेत. या खोलीचे मुळ स्वरूप पुनर्निर्माण करण्याचा ब्राँटे सोसायटीने प्रयत्न केला आहे.
*छायाचित्र आंतरजालावरून साभार - reference site hathawaysofhaworth.wordpress.com
तिथून बाहेर पडून आम्ही मिस्टर. निकोल्सच्या स्टडीत शिरलो.
शर्लॉटची मैत्रीण लेखिका एलिझाबेथ गास्केलच्या म्हण्यानुसार ही खोली पूर्वी पेंढा ठेवायला वापरत असे. निकोल्स हे १८४५ साली हॅवर्थ चर्चमध्ये ब्राँटे यांचे पादरी सहायक म्हणून काम करु लागले. १८५४ साली शर्लॉटने ही खोली आपल्या भावी नवऱ्यासाठी म्हणजेच आर्थूर बेल निकोल्ससाठी स्टडी रूम म्हणून सजवली होती. या खोलीत तिने एक फायरप्लेस बसवले होते. शर्लॉटच्या मृत्युनंतर निकोल्स हे त्याच पार्सोनेजमध्ये पॅट्रिक यांची देखभाल करु लागले. १८६१ मध्ये जेव्हा पॅट्रिक ब्राँटे वारले तेव्हा निकोल्स आपल्या देशी म्हणजे आयरलँडला परतले.
*छायाचित्र आंतरजालावरून साभार - reference site fatalsecret.ucoz.ru
आता बाहेर पडून वर जाण्यासाठी आम्ही कॉरीडोअरमध्ये आलो, समोरचं पायऱ्या होत्या. क्लासिक जॉर्जियन पद्धतीची कमान आणि समोर वालुकाश्माच्या पायऱ्या. पायऱ्या चढून अर्ध्या रस्त्यात एक मोठाले लाकडी घड्याळ आहे. हे घड्याळ बॅराक्लाह ऑफ हॅवर्थ यांनी बनवले असून रोज रात्री पॅट्रिक ब्राँटे याला चावी देत असे. त्याकाळी इथल्या खिडक्यांना कधी पडदे नव्हते कारण पॅट्रिक ब्राँटे ह्यांना भिती वाटत असे की घरात लहान मुले आहेत आणि सर्वत्र प्रकाशासाठी मेणबत्त्यांचा वापर होतो त्यामुळे कधी धक्का लागून पडदे पेटू शकतात. त्यामुळे खिडक्यांना सुरक्षिततेसाठी रात्री झडप लावून बंद केले जाई.
*छायाचित्र आंतरजालावरून साभार -reference site www.pinterest.com
*छायाचित्र आंतरजालावरून साभार -reference site picsify.net
पायऱ्या चढून वर आलो की प्रथम लागते ती सर्व्हंट्स रूम. या खोलीत टॅबी राहत असे. टॅबी ही ब्राँटे परिवारासोबत ३० वर्षाहून अधिक काळ होती. इथे असलेले फडताळ त्याकाळी कपाट म्हणून वापरले जायचे. या शिवाय जी खिडकी दिसते तिथली वाट ब्राँटे काळात बंद केली गेली. मार्था ब्राऊन, जी कबर खोदणाऱ्या इसमाची मुलगी होती, ती टॅबीला घरकामात मदत करत असे व तिच्यासोबत या खोलीत राहत असे. या दोघींचे अंत्यसंस्कार पार्सोनेजच्या आवारात असलेल्या कबरस्थानात केले गेले.
*छायाचित्र आंतरजालावरून साभार -reference site fatalsecret.ucoz.ru
आता आम्ही शिरलो शर्लॉटच्या खोलीत. ही खोली मुख्य झोपेची खोली होती जी अनेक वर्ष या परिवारातील अनेक सदस्यांनी वापरली होती. त्याकाळी या खोलीच्या भिंती नीळसर-हिरवट रंगाच्या होत्या. या खोलीत आता शर्लॉट्च्या स्मरणवस्तू बघावयास मिळतात. या खोलीत आधी पॅट्रिक ब्राँटे व मरिया ब्राँटे राहत असे, मरियाच्या मृत्यूनंतर या खोलीत आंट ब्रानव्हेल रहायला आल्या. १८४२ मध्ये जेव्हा आंट ब्रानव्हेल वारल्या त्यानंतर ह्या खोलीत शर्लॉट आपल्या बहिणी एमिली व अॅनीसह राहू लागली. शर्लॉटच्या लग्नानंतर ते दोघे उभयंता या खोलीत राहत असत. ३१ मार्च १८५५ साली शर्लॉटने याच खोलीत आपले प्राण सोडले. या खोलीत शर्लॉटने आपल्या हनीमूनला, आयरलँडला परिधान केलेला गाऊन, बुटांचा जोड, वेडिंग बॉनेट एका काचेच्या कपाटात पर्यटकांना बघण्यासाठी ठेवला आहे तसेच तिच्या अनेक वस्तू, छायाचित्र, पत्रे ठेवलेली आहेत, तिच्या केसांची बट एका लॉकेटात जतन करुन ठेवलेली बघावयास मिळते. शर्लॉटला आधी एक व्यंगचित्रकार व्हायचे होते, तिने अनेक व्यंगचित्रे पत्रात, कागदावर रेखाटली होती.
*छायाचित्र आंतरजालावरून साभार -reference site www.zimbio.com
पुढची खोली होती चिल्ड्र्न्स स्टडी. या खोलीत ब्राँटे भांवंडे बालपणी गोष्टी ऐकत, बालनाट्य बसवत व त्यांनी बनवलेल्या पुस्तकात ते नाटक लिहून ठेवत. ही खोली ब्राँटे बहिणींचा एकमेव भाऊ ब्रानव्हेल काही काळ वापरत असे मग पुढे ही खोली एमिलीची बेडरूम म्हणून वापरली जाई. या खोलीत असलेले पोर्टेबल लिहिण्याचे टेबल हे एमिलीचे आहे ज्यात अनेक वस्तू जतन करुन ठेवल्या आहेत जसे, पेनची नीब, काही लिफाफे, नाणी, वुथरींग हाईट्सच्या परिक्षणाचे कागद, लेबल्स इत्यादी.
*छायाचित्र आंतरजालावरून साभार
तिथून आम्ही गेलो मिस्टर. ब्राँटे यांची बेडरूम बघायला. या खोलीत पॅट्रिक ब्राँटे आपल्या पत्नीच्या मृत्यपश्चात पुढिल चाळीस एक वर्ष राहिले. या खोलीतले काही सामान ब्राँटे परिवाराचे आहे तर काही ब्रानव्हेलच्या चित्रात बघून बनवून घेतेलेले आहे. या खोलीचे विश्लेषण करता असे समजले की पूर्वी या खोलीत फिकट हिरव्या रंगाचे वॉलपेपर लावले होते त्याप्रमाणे या खोलीचा लुक री-क्रीयेट करण्यात आलेला आहे. खोलीत एक वॉश-स्टँड आहे, पूर्वी बाहेर स्वच्छतागृह असे आणि खोलीत बाथरूम नसे त्यामुळे थंडीच्या दिवसात बाहेर जाणे होत नसे म्हणून असे खोलीत एक वॉश-स्टँड बसवलेला असे.
या खोलीत काही काळाने ब्रानव्हेल आपल्या वडिलांसोबत राहू लागला होता, दारु आणि नशेच्या व्यसनामुळे त्याची प्रकृती खालावली होती व त्याला अधून-मधून भ्रम होत असे की दुसऱ्या दिवशी तो किंवा त्याचे पिता सकळी मृत्युमुखी पडले असतील. एकदा दारूच्या नशेत त्याने त्याचा पलंगाला आग देखील लावली होती व त्या प्रसंगातून एमिलीने त्याला वाचवले होते. २४ सप्टेंबर १८४८ ला ब्रानव्हेलची प्राणज्योत अवघ्या एकतीसाव्या वर्षी याच खोलीत मालवली. खरंतर त्याला फार मोठे व्ह्यायचे होते पण तो तितका यश मिळवू शकला नाही.
*छायाचित्र आंतरजालावरून साभार -reference site www.pinterest.com
*छायाचित्र आंतरजालावरून साभार - reference site fatalsecret.ucoz.ru
एंट्रंस स्टेयरकेसपाशी त्याने ब्राँटे भांवडाचे मोठे पोर्ट्रेट काढले होते, ते पूर्ण झाल्यावर त्याने स्वतःची प्रतिमा त्या चित्रातून खोडून काढली होती.
*छायाचित्र आंतरजालावरून साभार - reference site en.wikipedia.org
या खोलीतून बाहरे एक एक्स्टेंशन केले आहे जो मुख्य पार्सोनेजचा भाग आधी नव्हता. ते एक्स्टेंशन म्हणजे एक्झिबिशन रूम ज्यात ब्राँटे परिवाराबद्दल बरीच माहिती मिळते, काही जुन्या वस्तू, पत्रे, अॅनीचा रक्ताळलेला रुमाल्,ब्रानव्हेलची तो ट्युटर असतानाची गोष्ट ऑडिओ स्वरुपात पर्यटकांना बघण्यासाठी / ऐकण्यासाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. तिथून खाली उतरल्यावर स्मरणवस्तू घेण्यासाठी छोटेसे दुकान आहे व पार्सोनेजच्या बाहेर यायला एक्झिट आहे. ब्राँटे पार्सोनेजबद्दल बरीच माहिती मिळाली होती, त्या वास्तूत वावरताना विलक्षण आनंद झाला होता, एक स्वप्न पूर्ण झाले होते, ब्राँटे बहिणींची पुस्तके आजही जगात पुस्तकवेडी लोकं आवर्जून, मनापासून वाचतात. त्यांची तिथली आठवण म्हणून मी एक ब्राँटे सिस्टर्स नावाचे पुस्तक व पुस्तकखूण विकत घेतले व पार्सोनेजच्या बाहेर पडलो.
मुळ पार्सोनेजचा फोटो
*छायाचित्र आंतरजालावरून साभार - reference site www.mick-armitage.staff.shef.ac.uk
आता पार्सोनेजबाहेर होते सेंट.मायकेल अँड ऑल एंजल्स चर्च व कबरस्थान.
सेंट.मायकेल चर्च हे हॅवर्थमधले मध्ययुगीन पारिश चर्च आहे. सध्याच्या चर्चचे बांधकाम १८७९ ते १८८१ दरम्यान करण्यात आले. याच चर्चमध्ये पॅट्रिक ब्राँटे पदाधिकारी होते. चर्चच्या आवारात एक कबरस्थान आहे व शाळेची इमारत म्हणजेच संडे स्कूल आहे जिथे शर्लॉट काही वर्ष शिक्षिका म्हणून काम करत होती.

वाचने
16188
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
किती सुखद सुंदर अनुभव आहे हा
वाह , खुप मस्त लेख, फोटोही
Jane Eyre वाचायचा योग आलेला नाही अजून
अहा ! काय सुंदर लिहिलं आहेस !
लेखातून तुझं वाचनप्रेम,
+१
अप्रतिम फोटो आणि लेख!!
अप्रतिम फोटो आणि लेख!!
छान फोटो आणि लेख.
लेख व फोटो अप्रतिम
In reply to लेख व फोटो अप्रतिम by पूर्वाविवेक
अगदी ! चौघीजणी च आठवत होतं.
मस्तच लेख.
तुझ्या पाकृ प्रमाणेच.
खुप सुंदर लिहले आहेस सानि.
In reply to खुप सुंदर लिहले आहेस सानि. by Mrunalini
<<ह्या लेखिकेचे साहित्य कधी वाचले नाही.>>
सुरेख
वा!!
सुन्दर लिहिलंय..वुदरिंग
सुंदर लेख आणि छान फोटो
In reply to सुंदर लेख आणि छान फोटो by वीणा३
:-)