कुडे-गांधारपाले-पन्हाळेकाजी-हर्णे भाग-१
बरेच दिवस कोकणातील तीन लेण्या पाहण्याचे मनात घाटत होते. शेवटी कुड्याची लेणी, गांधारपाले लेणी व पन्हाळे काज़ी या लेण्यांना भेट देण्याचे ठरवले. लेण्यांना भेट देण्यापूर्वी त्या कुठल्या दिशेला तोंड करुन आहेत व त्याच्यावर किती वाजता कसा उजेड पडतो याची अभ्यास करणे छायाचित्रे काढण्याच्या दृष्टीकोनातून अत्यंत आवश्यक. गुगल मॅप्समधे यासाठी अप्रतीम सोय आहे. अर्थात तुम्हाला ती माहिती असेलच पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी खाली एक छायाचित्र दिले आहे. यातील स्लायडर सरकवला की आपल्याला त्यावेळी असलेल्या सावल्या व उन्हे प्रत्यक्ष दिसू शकतात.
आता प्रश्न उरला होता रस्त्याचा. त्यासाठी नुकतेच जाऊन आलेल्या श्री विनीत दाते यांना त्रास दिला. त्यांनी मोठ्या आनंदाने रस्त्याबाबत मार्गदर्शन केले व आमची ट्रीप सुखरुप पार पडली.
कुड्याची बौद्ध लेणी.
अक्षांश/रेखांश
पहाटे साडेपाच वाजता पुण्यातून कुड्याला जायला निघालो. नेहमी लवकर निघण्याने फायदा होतो पण यावेळेस मात्र एवढ्या लवकर निघण्याने थोडा तोटाच झाला. कुड्याला फारच लवकर पोहोचल्यामुळे सूर्य अगदी डोक्यावर आला होता आणि लेण्यांमधे अंधार. तेथे बराच वेळ काढला व सूर्य जरा कलल्यावर छायाचित्रे काढली. ताम्ह्णीतून जाताना घाट संपल्यावर लगेच इंदापूर - तळ्याचा रस्ता पकडायचा आहे हे विसरु नये. हो ! येथेही एक इंदापूर आहे.
रम्य परिसर.
छायाचित्रांवरुन ही लेणी बौद्धलेणी आहेत हे तुम्हाला समजेलच. या समुहात सव्वीस खोदलेल्या लेण्या आहेत. राजापूर खाडीच्या समोर असलेल्या एका डोंगरात अंदाजे २५० फुट उंचावर ही लेणी व विहार खदलेले आहेत. यातील काहीतर माझ्या अंदाजे ख्रिस्तपूर्व काळातील असावीत. जवळजवळ लेण्यांपर्यंत गाडी जाते. फारतर १० ते १५ मिनिटे चालावे लागत असेल.
याच लेण्यांच्या माथ्यावरुन घोसळा व तळ्याचे किल्ले दिसतात. खाडीवरुन येणारे खारे वारे व कोकणातील प्रचंड पावसाला तोंड देत ही लेणी अजूनही उभी आहेत. यातील शिलालेख आता बरेच झिजले आहेत पण काहींचे वाचन झालेले आहे.
जेव्हा जेव्हा मी बौद्ध लेणी पाहतो तेव्हा तेव्हा माझ्या मनात त्या काळातील बौद्ध भिख्कूंबद्दल अपार आदर निर्माण होतो. ही मंडळी कुठे कुठे पोहोचली होती, त्यांच्या धर्माचे व संघाचे नियम पाळून या जागेत धर्माचा अभ्यास करीत. मला तरी सगळेच अद्भूत वाटते. या सर्वांना त्यांच्यावरच एक लेखमाला लिहून ती त्यांनाच अर्पण करण्याची तीव्र इच्छा मला दरवेळेस असल्या जागा पाहिल्यावर होते. पण हा विषय एवढा मोठा ही की कितीही केला तरी अभ्यास कमीच पडतो.
कुड्यामधील एक लेणे सोडले तर बाकी सर्व बहुदा मुक्कामासाठी खोदलेली असावीत. कारण फक्त एकाच लेण्यात सुंदर मुर्ती काम आहे. एक शिलालेखही आहे. जवळजवळ सगळ्याच खोल्यांना व्हरांडा आहे. व त्याच्या कठड्यावर त्या काळातील साधीसुधी पण सुंदर नक्षीही कोरलेली आहे. त्यावरील अंधूकसा दिसणारा लाल रंग तुम्हाला क्षणभर उदास करतो. सर्व दरवाजांना फळ्यांचे दरवाजे बसविण्याची सोय दिसते व झोपण्यासाठी दगडाचे ओटेही दिसतात. त्या काळी सर्व भिंती या माती व भाताच्या तुसांनी सारवलेल्या असाव्यात. काही ठिकाणी अत्यंत फिकट असे रंगही दिसतात बहुदा ती चित्रे असावीत. काहींच्या मते ही लेणी पाचव्या किंवा सहाव्या शतकातील असावीत. या लेण्यांच्या समुहात बरेच शिलालेख आहेत. ते सर्व ज्यांनी दानधर्म केला आहे किंवा ही लेणी खोदण्यासाठी देणग्या दिल्या आहेत त्यांच्या संधर्भात आहेत. त्यातील एक ज्यात शिल्पे आहेत त्या लेण्याकडे आपण वळू.
लेण्यामधे शिरताना डाव्या बाजूला एक अंदाजे बारा फुट उंचीचा हत्ती दिसतो. त्याचा उजव्या बाजूचा साथीदार पूर्णपणे नष्ट झालेला दिसतोय पण त्याच्या पायातील खडकावरुन तो तेथे असावा असे अनुमान काढण्यास हरकत नाही.
याही हत्तीची सोंड भंगलेली आहे.
त्याच्याच मागे व्हरांड्याच्या भिंतीवर एक बुद्धाचे कोरीव शिल्प आहे ज्यात बुद्ध एका सिंहासनावर बसलेला असून त्याचे पाय एका कमळावर ठेवलेले दिसतात.
एकूणच या लेण्यांमधे कमळाचा वापर जास्त केलेला दिसतो. या मूर्तीची उंची साधारणत: अठरा एक इंच असावी. बाजूला हरणे आहेत आणि नागा भक्तांनी त्या कमळाला आधार दिलेला दिसतोय. बुद्धाच्या दोन्ही बाजूला चवरी ढाळणारे दिसत असून त्यातील एक अवलोकितेश्र्वर असावा अशी शंका आहे. व्हरांड्यात जाणाऱ्या पायऱ्या आता मोडकळीस आलेल्या आहेत पण एके काळी त्या नीट बांधलेल्या असणार. हत्तीच्या मागे शिल्प आहे, साधाराणत: तसेच आत शिरताना डाच्या बाजूला दिसते.
व्हरांड्यात डाव्या बाजूला एक सात ओळींचा सुस्थितीतील शिलालेख दिसतो. हा जुन्या पाली लिपीतील शिलालेख काय म्हणतो ते बघुयात...
याचे भाषांतर गॅझेटमधून घेतले आहे. ( मी मराठीत केलेले फक्त अर्थासाठी वापरावे)
हे निवासस्थान खोदण्यासाठी सुलासदाता व उत्तरादता यांच्या सिवामा (शिवम ?) पूत्राने देणगी दिली आहे. याचा मोठा भाऊ शिवभूती हा एक मोठा ग्रंथकार आहे. महाभोज सदागेरी व विजयाचा मुलगा महाभोज मांडव खंदपलित याच्या पदरी सिवामा चाकरी करतो. कोरीव कामासाठी सिवामच्या पत्नीने व त्यांच्या सुलसदाता (सुलसद्त्त) , शिवपलित, शिवदाता (शिवदत्त) यांनी देणगी दिली. खांबांसाठी त्यांच्या मुली सापा, शिवपलिता, यांनी देणगी दिली.’’
यात उल्लेख झालेला स्कंदपलित हा कोंकणाचा त्यावेळचा राजा किंवा सेनापती असावा. बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतरही हे सर्व शिवाचे भक्त असावेत. त्या काळात स्त्रीयांना समाजात दुय्यम स्थान नसावे उलट पुरुषांच्या बरोबरीने त्यांना समाजात स्थान असावे हे या लेखातील स्त्रीयांच्या उल्लेखांवरुन सहज दिसून येते. थोडक्यात या विहाराचा सर्व खर्च या कुटुंबाने वाटून घेतलेला दिसतो.
डावी भिंत...
उजवी भिंत...
आत सभागृहात शिरल्यावर डाव्या भिंतीवर जे शिल्प दिसते ते खालीलप्रमाणे.
१ सगळ्यात वरती ज्ञानमुद्रेत बसलेल्या बुद्धाच्या चार मुर्ती आहेत ह्या वेगवेगळ्या कोनाड्यात दिसतात. त्याच्या खाली दोन भागात दोन बुद्धाच्या मुर्ती दोन कोनाड्यात दिसतात. यात वर अवकाशात विद्याधर हातात मुकुट घेऊन उडत येतान दिसत आहेत तर बुद्धावर मकरतोरणे दिसत आहेत.
एक मकरतोरण...
शेजारीच बुद्धाची एक त्याच मुद्रेतील मुर्ती आहे. शेजारी चवरी ढाळणाऱ्याच्या हातात चवरी आहे तर दुसऱ्याच्या हातात कमळ. वर विद्याधर बहुदा पुष्पवृष्टी करताना दिसतात.
बुद्ध कमळावर बसलेला दिसतो तर त्या कमळाच्या देठाला दोन नागा राजांनी आधार दिलेला दिसतो. एका बाजूला दोन तर दुसऱ्या बाजूला तीन भक्तगण हात जोडलेल्या स्थितीत बसलेले दिसतात. त्याच्या शेजारी ध्यानमुद्रेत बसलेल्या बुद्धाच्या मुर्तीवर एक डागोबा दिसतो.
या भिंतीसमोरच्या भिंतीवर साधारणत: याच प्रकारचे शिल्प दिसते.
सगळ्यात एक अस्पष्ट असा लेख दिसतो. पूर्वी तो वाचता येत असावा. ‘‘शाक्य धर्मगुरु बुद्धसिंघाने या कामासाठी उदार देणगी दिली आहे. त्याच्या मातापितरांना सर्वज्ञान होवो....’’ उजव्य्या बाजूला अजून एक लेख आहे त्यात शापवाणीही आहे. ‘‘या शिल्पासाठी शाक्यगुरु संघदेव याबे उदारपणे देणगी दिली आहे. तसेच चेंदिना येथील जमीन तेलदिव्यांच्या खर्चासाठी दान दिली आहे. यात फेरफार करणाऱ्याला पाचीही पापांचे धनी व्हावे लागेल.’’
गृहाच्या सगळ्यात मागे एक दागोबा आहे व पायऱ्यांवर काही प्राणी कोरले आहेत.
एका बाजूच्या भिंतीवर एक चिन्ह आहे. ते कसले आहे ते कळले नाही. काही जण म्हणतात ते वाळूचे घड्याळ आही पण मला ते पटत नाही. बौद्ध चिन्हांच्या अभ्यासकांनी यावर प्रकाश टाकावा.
या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला पाच फुट उंचीची शिल्पे आहेत जी कार्ल्याच्या शिल्पांसारखी वाटतात.
इतर गुहा/लेणी
सगळे पाहून झाल्यावर बाहेर पडलो. उद्या पन्हाळेकाजीला जायचे. रस्ता खराब व सामसूम आहे असे कळले आहे...बघू काय होते ते असे म्हणून मार्गस्थ झालो. पण रस्त्यात एके ठिकाणी एका स्टुडिओला भेट दिली ती अवचितपणे... हा माणूस पॉट तयार करतो... त्याने केलेल्या भांड्याचे मी काढलेले एक छायाचित्र...
क्रमश:
जयंत कुलकर्णी.
वाचने
7833
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
अद्भूत!
अप्रतिम!
सुंदर धागा..!!
वाह मस्त धागा. खूप दिवसांनी
कुड्याची लेणी ही हीनयान आणि
वाह सुंदरच
थोडा बालिशपणा वाटेल
सगळ्यात वरती ज्ञानमुद्रेत
लेख आणि छायाचित्रे अगदी
विनंती
अतिशय सुंदर छायाचित्रे आणि
सुंदर लेख, सुंदर फोटो.
In reply to सुंदर लेख, सुंदर फोटो. by उगा काहितरीच
प्रेरणा हीच धर्मप्रसार :)
अप्रतिम लेख आणि फोटो.
अतिशय सुंदर!
In reply to अतिशय सुंदर! by पैसा
नाही. त्रिरत्न वेगळे असते आणि
In reply to नाही. त्रिरत्न वेगळे असते आणि by प्रचेतस
लिंक शोधते
In reply to लिंक शोधते by पैसा
चित्राचा लेख
In reply to चित्राचा लेख by पैसा
हो. सांकेतिक चिन्हे तर आहेतच.
अद्भुत !!!!
व्वा..