
सिंधुदुर्ग म्हणजे शिवाजी महाराजांच्या आरमाराची राजधानी. संपूर्णपणे महाराजांनीच बांधून घेतलेल्या काही किल्ल्यांपैकी एक. "८४ बंदरांत असा जागा मिळणार नाही!असं म्हणून मालवणच्या 'कुरटे' बेटावर महाराजांनी हा किल्ला बांधायला घेतला. सुमारे २ वर्ष या किल्ल्याचं बांधकाम चालू होतं. साधारण ५००० मावळे त्यासाठी खपत होते. यातले बहुतांश मावळे कोळी, भंडारी आणि आगरी होते. रायगडाचे बांधकाम करणारा हिरोजी इन्दळकर /इंदुलकर याच्याकडेच या किल्ल्याच्या संपूर्ण बांधकामाची जबाबदारी सोपवलेली होती. हाच स्वराज्याचा PWD हेड म्हणजेच बांधकाम विभागाचा प्रमुख होता. किल्ला बांधत असताना शेवटी शेवटी शिवाजी महाराज लढायांमध्ये व्यस्त होते, त्यावेळी सिंधुदुर्ग साठी निधी येऊ शकला नव्ह्ता. शिवाजी महाराज स्वतःही या काळात वेळ देऊ शकत नव्हते. अश्या वेळी 'सरकारचं लक्ष नाही, corpus available नाही' असं म्हणून हिरोजी बांधकाम थांबवून गप्प बसला नाही. किंवा पैसे कमी दिले म्हणून खालच्या दर्जाचे बांधकाम सुद्धा त्याने केले नाही. किंवा 'सरकारचं कुठे लक्ष आहे!' असं म्हणून 'थोडे पैसे आपण खाऊ आणि थोडे बाकीच्यांना खायला देऊन गप्प बसवू. किल्ला गेला तेल लावत!' असं म्हणत कुठलाही अफरातफरी चा व्यवहार ही या PWD हेड ने केलेला आढळून येत नाही. या उलट महाराजांना लक्ष द्यायला जमत नसून ही, निधी उपलब्ध होत नसूनही आणि पोर्तुगीज, सिद्दी आणि इंग्रजांची आक्रमणं येत असूनही त्याने या किल्ल्याचं बांधकाम अविरत चालू ठेवलं, दर्जा सुद्धा उत्कृष्ट राखला आणि स्वतःच्या खजिन्यातून बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिला. नंतर महाराजांना जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा महाराजांनी सर्व पैसे त्याला परत केले आणि बक्षीस दिलं. हे बक्षीस काय हवं म्हणून विचारलं तेव्हा हा कुठलंही मोठं मंत्रिपद, किंवा मोठी संपत्ती वगैरे मागू शकला असता. पण याने काय मागितलं? किल्ल्यावर चुन्यामध्ये शिवरायांच्या डाव्या पावलाचा आणि उजव्या पंजाचा ठसा! याने काय मिळणार होतं त्याला? तर याने मिळणार होतं शिवरायांचं त्या किल्ल्यावरचं कायमचं जिवंत अस्तित्व, लढण्यासाठीची प्रेरणा आणि अनंत काळापर्यंत पुरणारा शिवरायांचा आशीर्वाद. जसं आपण रोज सकाळी कामावर जायच्या आधी आई वडिलांच्या पायाला हात लावतो (निदान तशी अपेक्षा आहे) आणि आशीर्वाद घेतो त्या प्रमाणे लढाई वर निघण्यापूर्वी सर्व सैनिक या दोन्ही ठश्यांचे दर्शन घेऊन पुढे निघत.

या किल्ल्याचं बांधकाम करणाऱ्या ५००० मावळ्यांपैकी २००० मावळे शिवरायांनी इथे गडावरच ठेवले. त्यांच्यापैकी १७ घराणी आज ही त्या किल्ल्यावर राहतात आणि सध्याची ही त्यांची दहावी पिढी आहे. बहुतांश लोक हे सकपाळ (पूर्वीचे संगपाळ आणि त्याही पूर्वीचे दरबारात शंख वाजवणारे शंखपाळ) आहेत. त्यातल्या अनेकांचा व्यवसाय हा गाईड बनून किल्ल्याची आणि शिवरायांची माहिती पर्यटकांना देणे हा आहे. काहींनी पर्यटकांसाठी सरबताची दुकाने उघडली आहेत. हे लोक पावसाळ्यात सुद्धा किल्ल्यावरच राहतात. साधारण उन्हाळ्याच्या शेवटी समुद्राला उधाण येतं आणि नारळी पौर्णिमेपर्यंत होड्यांचे या किल्ल्यापर्यंत येणं जाणं बंद होतं. त्या चार महिन्यांच्या काळात हे लोक किल्ल्यातच अडकून पडतात. बिनदुधाचा चहा पितात. असलेलं खायचं सामान पुरवून पुरवून वापरतात. तटबंदी ओलांडून किल्ल्यामध्ये समुद्राच्या लाटा घुसतात त्यावेळी जीव मुठीत धरून राहतात. यांची मुलं त्यावेळी किनाऱ्यावरच्या मालवण गावात होडीवाल्यांच्या घरी राहून शाळेत जा-ये करतात. नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करून पहिली होडी किनाऱ्यावरून किल्ल्यापर्यंत सोडली जाते. ती होडी या किल्ल्यात राहिलेल्या लोकांना ४ महिन्यानंतर जमिनीवर घेऊन येते. किनाऱ्यावरचे होडीवाले किल्ल्यातल्या लोकांची ने-आण फुकट करतात. त्यांची मुलं सांभाळतात. त्याबदल्यात किल्ल्यातले लोक किल्ला बाराही महिने जीता जागता ठेवतात. किल्ल्यावर गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, नारळी पौर्णिमा, दसरा आणि मोहरम असे सहा उत्सव होतात. किल्ल्यावरचे हिंदू- मुस्लिम लोक गुण्या गोविंदाने राहतात. मुस्लिमांसाठी मशीद नसल्यामुळे शिवरायांच्या मंदिराच्या आवारातच मोहरम साजरा केला जातो. दोन्ही समाजाचे लोक एकमेकांच्या उत्सवांत आनंदाने सहभागी होतात आणि धार्मिक व राजकीय कारणांसाठी या किल्ल्यावर भगवा झेंडा लावायला शासनाकडून परवानगी नाकारली जाते (!).
शिवरायांच्या नंतर ही हा किल्ला भरपूर लढला. सिद्दी किंवा पोर्तुगीजांच्या आक्रमणाला याने कधीही दाद दिली नाही. शिवरायांनी उभे केलेले आरमार हे प्रचंड बलवान होते. छत्रपती शिवाजीराजे व छत्रपती संभाजीराजे यांच्या नंतर राजाराम महाराजांकडे स्वराज्याची धुरा आली. त्यांनी दक्षिणेत जिंजी कडे जाताना तीन आघाड्यांवर स्वराज्य लढवण्याचा आदेश दिलेला दिसतो. पहिली आघाडी म्हणजे सह्याद्री, जेथे औरंगजेबासह प्रचंड मुघल सैन्य तळ ठोकून बसलं होतं. धनाजी जाधव- संताजी घोरपडे यांच्यासारख्या सरदारांनी सह्याद्री चोख लढवून पुढे इथेच औरंगजेबाला गाडला. दुसरी आघाडी म्हणजे दक्षिण- भारत / कर्नाटक / महाराष्ट्राच्या दक्षिण भागाच्या म्हणजे पन्हाळ्याच्या खालचा प्रदेश. जेथे छत्रपती राजाराम महाराज स्वतः चालले होते. आणि तिसरी आघाडी म्हणजे स्वराज्याचे आरमार. जे स्वराज्याची संपूर्ण कोकण किनारपट्टी लढवत होतं. हे इतकं इतकं बलदंड होतं की आखाती देशांपर्यंत जाऊन छापे मारण्याचे पराक्रम या मराठा नौदलाकडून घडलेले दिसतात. अरबी सागरी चाच्यांचाही मराठी नौदलाने बंदोबस्त केलेला होता. इंग्रज सोडले तर अन्य अनेकांविरुद्ध या नौदलाने यशस्वी लढा दिलेला दिसतो. अश्या या नौदलात सिंधुदुर्ग चे स्थान अतिशय महत्वपूर्ण असे कायम राहिलेले आहे.

किल्ल्याचे बांधकाम नि:संशय बिनतोड आहे. अजूनही तटबंदी व्यवस्थित रीत्या शाबूत आहे. किल्ल्याला मुख्य दरवाजाशिवाय किल्ल्याबाहेर पडायला दिसेल असा दरवाजा एकच. साधारण पश्चिमेच्या तटबंदीमध्ये अंदाजे चार फुट उंचीचा एक दरवाजा बनवला आहे. दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला चौपाटीसारखा छोटासा समुद्रकिनारा आहे. याला 'राणीची वेळा' असं नाव आहे. शिवरायांच्या सूनबाई 'महाराणी ताराबाई' या मनोरंजनासाठी व निवांत वेळ घालवण्यासाठी येथे येत असत असे सांगितले जाते.

युद्धाच्या वेळी शत्रूने या दरवाज्यातून आत यायचा प्रयत्न केला तर त्याला ४ फुटाच्या दरवाज्यातून वाकूनच यावे लागेल आणि आत असलेले मावळे तो आत येताच त्याचा शिरच्छेद करू शकतील अशी व्यवस्था होती. या दरवाज्यातून एका वेळी एकच व्यक्ती आत किंवा बाहेर जाऊ शकेल एवढीच या दरवाजाची रुंदी आहे.

या व्यतिरिक्त किल्ल्याच्या मध्य भागी एक शंभू महादेवाचे देऊळ आहे. त्यात एक भुयारी मार्ग पूर्वी अस्तित्वात होता. बाहेरून दिसायला हे मंदिर होतं. त्यामुळे जर शत्रू मुसलमान असेल तर तो मंदिरात जाण्याची शक्यता कमीच. आत असलेलं भुयार सुद्धा सहज दृष्टीस पडेल असं नाही. सर्वसामान्यपणे चौकोनी आकाराची ही एक बारव (विहीर) दिसते. यात डोकावून बघितलं तर आत पाणीसुद्धा दिसतं. पण इथून आतूनच हा भुयारी मार्ग निघतो. तो थेट ओझर पर्यंत जायचा असा म्हणतात. मावळे महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेऊन भुयारात उतरायचे. इंग्रजांनी हे भुयार बंद करून टाकलं. ते अजूनही बंदच आहे.

किल्ल्यावर एक भवानी मातेचं मंदिर देखील आहे. मुख्य दरवाजाची रचना स्वराज्यातल्या अनेक किल्ल्यांप्रमाणे गोमुखी आहे. म्हणजे बाहेरच्या बाजूने किल्ल्यात प्रवेश करताना उजवीकडे वळण घेत जावे लागते. वळण घेतानाचा हा मार्ग सुद्धा अरुंद आहे. जेणेकरून हल्ला करणारे सैनिक एका वेळी कमी संख्येने हल्ला करू शकतील. या उलट मुख्य दिंडी दरवाजाच्या समोरची जागा रुंद आहे. म्हणजे किल्ल्यातील मावळे बाहेर पडले असता एका वेळी तुलनेने जास्त संख्येने प्रतिकार करू शकतील. दिंडी दरवाजाच्या वरच्या कमानीत शत्रू सैनिकांवर गरम तेल ओतण्याकरिता खाचा बनवलेल्या दिसतात.

आजही हा दिंडी दरवाजा सूर्योदयाला उघडतो आणि सूर्यास्तास बंद होतो. सकाळ संध्याकाळ गडावर नौबत झडते. राजाराम महाराजांनी बांधलेल्या आपल्या या वडिलांच्या मंदिरातल्या शिवरायांच्या पाषाण मूर्तीची वेळच्या वेळी पूजा-अर्चा होते. मंदिरांच्या भिंतींना डागडुजीची गरज आहे. गडावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था विपुल आहे. समुद्राच्या मध्यभागी असूनही येथे पिण्यायोग्य पाणी बाराही महिने मिळते. त्यासाठी हिरोजींनी काही विहिरी खोदून घेतल्या. त्यांना 'दहिबाव', 'साखरबाव', 'दुधबाव' अशी नावे आहेत. सध्याचं rain water harvesting चं तंत्र हिरोजींनी त्या काळात म्हणजे १६६६ साली अवलंबलं होतं.

शिवरायांचं हस्त व पद चिन्ह संरक्षक भिंतींच्या आड ठेवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. हस्त चिन्ह बरचसं पुसट झालं आहे. पदचिन्ह मात्र अजूनही स्पष्ट दिसतं. किल्ल्याचं बरचसं बांधकाम अजूनही बऱ्यापैकी व्यवस्थित आहे, मात्र शिवरायांची किल्ल्यावरची राहण्याची जागा जी दाखवली जाते तिच्याकडे बघून पुरातत्व खात्याची उदासीनता स्पष्ट होते.

या दुर्गाचे विशेष महत्व ऐतिहासिक व भौगोलिक दृष्ट्या तर आहेच पण त्या शिवाय काही गोष्टींमध्ये आहे त्या म्हणजे 'श्री शिवराजेश्वर मंदिर' आणि 'शिवरायांचे हस्त व पद चिन्ह'.

जवळ जवळ तीनशे वर्षांच्या स्वातंत्र्याचा दुष्काळ दूर करणारा शिवाजीराजा हे महाराष्ट्राचे दैवतच, आणि या दैवी व्यक्तीचा आपल्यासारखाच मनुष्य असल्याचा पुरावा म्हणजे चुन्यात उमटवलेली हस्त व पद चिन्हं. सिंधुदुर्गावरील हे मदिर हे महाराष्ट्रातले शिवरायांचे एकमेव मंदिर आहे की नाही हा संशोधानाचा मुद्दा आहे, कारण आत्ताच हे मंदिर बघण्याच्या ६ दिवसांपूर्वी मला पन्हाळ्यावर 'शिवाजी महाराजांचे मंदिर' म्हणून एक दरवाजे बंद असलेली मंदिराची आकृती आमच्या गाडीच्या ड्रायव्हर ने दाखवली. पण सामान्य मनुष्याप्रमाणे जन्म घेऊन आपल्या कर्माने देवत्वाला पोहोचलेल्या व्यक्तीचा हा 'मनुष्य ते देवता' असा प्रवास दाखवणार हा एकमेव किल्ला हे मात्र मी खात्रीने म्हणू शकतो. असा हा सिंधुदुर्ग कुठल्याही तीर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही. पावसाळ्याचे दिवस सोडले तर सर्व आबालवृद्धांसाठी हा किल्ला खुला असतो. प्रत्येकाने या तीर्थक्षेत्राचे दर्शन सहकुटुंब सहपरिवार जरूर घ्यावेच.
प्रतिक्रिया
अवस्था वाईट
अवस्था बिकट
In reply to अवस्था वाईट by चलत मुसाफिर
लेखन आवडले, फोटोही मस्त ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Yalla... نانسي عجرم - فيديو كليب يلا :- Nancy Ajramमस्त लेख
मस्त ट्रेक!!
छान लेख
अनुभव कळवा
In reply to छान लेख by जगप्रवासी
आंबोळगड
In reply to छान लेख by जगप्रवासी
कलाल बांगडी चा फोटो नाहि काढलात ?
कलाल बांगडी जंजिऱ्याला ना?
In reply to कलाल बांगडी चा फोटो नाहि काढलात ? by होबासराव
मस्त.
कलाल बांगडी जंजिऱ्याला ना?
हा किल्ला पाहण्याचा योग्य
वेळ कमी पडतो
आमच्या मालवणच्या किल्ल्यावरचा लेख .......
प्रतिसाद आवडला.
In reply to आमच्या मालवणच्या किल्ल्यावरचा लेख ....... by सुधीर कांदळकर
+१. पुस्तक विकत घेण्यात येईल.
In reply to प्रतिसाद आवडला. by यशोधरा
सुरेख माहिती पूर्ण लेख!